शनिवार, १७ मार्च, २०१८

॥ परनिंदा भयावहा ॥

" परनिंदा भयावहा " ह्या वचनावर आधारीत एक ऑडीओ पोस्ट Whatapp ग्रुपवर आली. ती ऑडीओ क्लीप ऐकली. मी मनापासून दाद दिली. त्यात आजच्या समाजाला परनिंदा ह्या रोगाने कसा विळखा घातला आहे ह्याचं वास्तव चित्र समोर उभे राहीलं. परनिंदा भयावहा असे माहित असूनही  ती सवय आहे, स्वभाव आहे, चलता है, यही तो जिंदगी है, असे म्हणत आपण परनिंदा ह्या प्रवृत्तीला हसण्यावरून नेत आहोत, अशी जाणीव झाली. मूळात परनिंदा ही मोठी विकृती आहे. हे ही जाणवलं. माणूस परनिंदा का करतो? आणि परनिंदेची साथ समाजाला विळखा घालेपर्यंत वाढत का जाते, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणे सोपं आहे. कारण बहूतांश आपण सारेच ह्या रोगाचे पेशंट आहोत. पण त्यावर इलाज काय? आणि कुठल्या डाॅक्टराकडे जावे लागेल? उपचार घेतले तर त्या बाधेचा संपूर्ण नायनाट होऊ शकेल का? ह्यावरील चर्चा शेवटी करू. प्रथम परनिंदा रोगाची निर्मीती कोठून सुरू होते, ते पाहू या. 

ईश्वराचं अस्तीत्व कोणी मानो की न मानो, तसेच महाभारत घडले की नाही, ह्यावर मतभिन्नता असली तरी एक साहित्यकृती म्हणून महाभारत सर्वोच्च पातळी वरची आहे. आणि तशी उंची गाठणारी साहित्यकृती ना निर्माण झाली, ना भविष्यात निर्माण होणार. हे ही पटण्यासारखे आहे. महर्षी व्यास हे महाभारताचे लेखक. हस्तीनापूरमधील कूरू वंशात १०० कौरव व पांडव ५ असे का जन्मले? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच परनिंदा, परपीडा सारख्या दूर्गणांच्या जन्माचे रहस्य दडले असावे असेच वाटते. ह्या विश्वात जिथे म्हणून मानव समाज आहे, तिथे सर्वत्र १०० कौरव आणि पांडव ५ असावेत असे वाटते. आजच्या मानवी समाजाच्या स्थितीचं जे वर्णन वृत्तपत्रातात लेखाद्वारे वा आपल्या साहित्यकृतीतून तत्त्ववेत्ते , साहित्यिक मंडळी तसेच मानसशास्त्रज्ञ, मांडताना दिसत आहे, ते सारं कलीयुगाची जी वैशिष्टे आपल्या पुराणात, गुरू चरीत्रात तसेच वैदिक ग्रंथात वर्णीले आहे, त्याच्याशी मिळतं-जुळतं आहे.  निसर्गात काटेरी झुडपें वाढतात, त्यांच्या वाढीला ना सूर्यप्रकाशाची गरज, ना खतांची वा मशागताची गरज. मानवी मनाची ठोस व्याख्या आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे मांडता आलेली आहे, असे काही दिसत नाही. पण We get attracted towards bad ideas at faster speed असे मानसशास्त्रही मानते. मानवी मन चंचल आहे आणि त्या चंचलेतेचा कारक चंद्र असतो असे ज्योतिष शास्त्र मानते. ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसला तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती निश्चितच मान्य करेल की आपले मन चंचल आहे आणि विकाराकडे वा विकृतीकडे लौकर धावते. आंबा फणसांची झाडे वाढवावयास वर्षे जातात. हा ही आपला अनुभव आहे. विश्वाच्या उत्त्पत्ती ज्या ऊर्जेने झाली आहे ती ही सकारात्मक (धन) आणि नकारात्मक(ऋण) अशीच आहे. ह्याचा अर्थ परनिंदा, परपीडा हे दोष आपल्यात नैसर्गिक आहेत. परंतु असेच मानावयाचे ठरविले तर नुकताच जन्मलेले बाळ निरागस, निरपेक्ष वृत्तीचे असते हे खोटं कसे मानावे ?

मग आपल्या समोर प्रश्न हा पडतो की जन्मतः आपण निरंकारी, परनिंदेची बाधा न झालेले असतानाही परनिंदा ह्या रोगाला बळी कसे पडतो? कुठल्या वयापासून आपल्याला परनिंदेची लागण होते? बालवयात की पौंगड अवस्थेत? असे प्रश्न उभे राहात असतात. तशा प्रकारच्या शंका येणे हे ही स्वाभिविक आहे. परंतु त्यात रूतण्या ऐवजी शंकेचं निरसन करण्याची जी बुध्दी  ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. तिचा पध्दतशीर  वापर  केला  की, शंका-कुशंकांचे निरसन करता येते. आधूनिक मानसशास्त्रज्ञ, मानवअनुवंश शास्त्रज्ञही  मान्य  करतात की संस्कारक्षम वय असते, तेव्हा जसे घरात वातावरण असते त्याचा परिणाम बालकांवर होत असतो. अध्यात्मिक गुरू ही असेच म्हणतात.  'संस्कारः एक धनं न क्षीण जायते | ' मानवी बुध्दीला जडत्व असते. अध्यात्म विशेष करून आपल्या संस्कृतीतले, म्हणते की बाळावर संस्कार मातेच्या गर्भात असतांना होत असतात. म्हणूनच 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' ह्या आधारावर गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन कुठले मिळावे, त्यांनी कोणती पुस्तके वाचावीत इत्यादी संबधी चळवळ सुरू झालेली पाहतो. प्राचीन काळापासून गर्भ संस्कार विधी आपल्या कडे मान्यता पावलेला आहे आणि त्यात तथ्य असावे. परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहून गरोदर स्त्रीने आधूनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे आहार, औषधे न घेणे म्हणजे जन्माला येणार्या बालकाला संकटात टाकण्यासारखे ठरते. आधूनिक औषधे, उपचारामुळे जन्मतःच मृत्यू होणार्या अर्भकांची संख्या घटली आहे. मानवाचं आयुर्मन वाढले हे ही सत्य आहे. 

साधारणतः एखादं बालक सात वा आठ वर्षाचं होत असते तेव्हापासून त्याला घरात रागाने कोण आणि काय म्हणतयं, प्रेमाने कोण म्हणतयं आणि कसे म्हणतय, इतकंच काय विनोद, चेष्टा, निंदा ह्या संबंधातील घरात होणार्या चर्चा, घरातल्या मंडळींचे अहिर्भाव ते बालक ग्रहण करीत असते. मग हळूहळू वयात यावयास सुरूवात झाली की परनिंदेची लागण त्याला होत असावी. ह्या सृष्टीतील सगळेच प्राणी अनुकरण प्रिय असतात, असे आजचे विज्ञान सांगते. परंतु इथेही एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने पाहता, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र बुध्दी, आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, घेऊनच जन्मते, त्याचे काय? त्यामूळे नैसर्गिक नियम, तसेच अनुकरणीयता, ह्या दोहोंपलीकडे काही कारणे असतात, ज्यामूळे परनिंदाचा रोग जडतो. आता त्यावर थोडेसे बोलत बोलत परनिंदेच्या रोगातून मुक्त कसे होता येईल हे पाहू.

परनिंदेला सर्वात अधिक पूरक आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू कुठला, तर तो अहंकार. तसा तो जन्मतः असतो. त्याचं मूळ स्वरूप स्व. ह्या स्व चा परीणाम असा असतो कि आपण पाहूणे म्हणून कोणाकडे गेलो आणि त्या यजमानांच्या घरातील लहान मुलाला आपलं नाव विचारलं तर ते मूल झटकन नाव सांगत नाही. कारण त्याला ती त्याची वस्तू वाटते. म्हणजेच मालकीची भावना. हा माझा अनुभव आहे. अर्थात ह्याबाबत मतभिन्नता, अपवाद ही असू शकतात. पण अंहकारामुळेच मनुष्य परनिंदा करू लागतो. हे सत्य आहे. मी बुध्दीमान पराक्रमी, कर्तृत्ववान असा माणसाला गर्व होतो, तेव्हा त्याला इतरेजन कःपदार्थ वाटू लागतात. कोणाला रूपाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला श्रीमंतीचा, असे हे गर्वाचे प्रकार. समाजातल्या प्रत्येक थरातील लोकामध्ये अहंकाराचे असे प्रकार दिसतात. आणि हे प्रकार आपल्या अवती-भोवती लोकांच्या तूलनेतून होत असतात. परनिंदेच्या स्वरूपात सापेक्षवाद लागू होत असतो. त्यामुळे अंहकार आणि त्यातून जडलेला परनिंदेचा रोग ह्या दोहोंचं स्वरूप आणि पातळी समाजातील आर्थिक, व शैक्षणिक थरानुसार भिन्न असते. 

दुसरे कारण दांभिकता. स्वतःच्या अंगी गुण नसतात ,म्हणून  परनिंदेचा रोग जडतो. अशी व्यक्ती बढाया मारण्यात पटाईत असतात. परंतु गम्मत अशी आहे कि, तशा इसमाची निंदा करताना आपण सारे परनिंदेचे रूग्ण बनतो. आपण त्या इसमास काय म्हणतो, "अहो आपल्या पायाखाली काय जळते आहे, ते आधी पहा! 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण' असे काय कामाचे?". परनिंदेचं लोण हे अशाच तर्हेने पसरत असावे. हा प्रकार समूह मानसशास्त्राशी निगडीत असावा. 

मत्सरामुळे मनुष्य परनिंदा करतो, मत्सरी वृत्ती कर्तृत्त्वहिनतेतून उत्पन्न होत असावी. गुणाची पारख नसल्यामुळे मनुष्य निंदाशील बसतो. ज्यांच्या अंगी योजकता नसते, किंवा आळस शिरलेला असतो, अशी माणसे परनिंदेचे रूग्ण बनतात. ज्यांच्या समोर ध्येय नाही, वेळेचा सदुपयोग करण्याचा विचार ज्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही, असे लोक परनिंदेत अधिक मग्न होत असावेत असे मला वाटते.

परनिंदा संदर्भातील आपण जी वर चर्चा केली, त्यात ज्या षढरिपूंचा उल्लेख केला आहे ते आपल्यातही कमी अधिक प्रमाणात असतात. चांगले कार्य पार पाडावयाचे असल्यास 'मी' बाजूला ठेवून 'आम्ही' ह्या शब्दाच्या नुसता प्रयोग केला तरी कार्य तडीस जाते. सहकाराच्या तत्वावर मोठमोठे प्रकल्प, उद्योग, चळवळी उभ्या राहील्या आहेत. हा आपला सार्वत्रिक अनुभव आहे. जी काही प्रगत राष्ट्रे आपण पाहतो, ती जरी विज्ञानाच्या आधारामुळे प्रगत झाली असली, तरी तेथील लोकामध्ये परस्पर आदर देण्याची वृत्ती आहे, हे ही एक कारण आहे. कोणी कोणाला टाकून बोलत नाहीत. देशबांधव परस्परांना उमेद देत असतात. आपल्या राजकिय पक्षांमधील संसदेत चाललेली भांडणं, गोंधळ आपण टिव्ही वरून पाहतो, त्यामुळे परनिंदेच्या विकृतीने समाजाला विळखा घातला आहे ह्या बद्दल आश्चर्य वाटत नाही. ज्या मंडळीने समाजाला दिशा द्यावयाची त्याचं वागणं हे असे आहे. 'राजा कालस्य कारणम्।' असे म्हणून त्या मंडळींना गप्प करता येत नाहीं. कारण लोकशाहीत आपणच खरे राजे. परंनिदा ही फार घातक आहे. व्यासमूनींच्या महत्वाच्या दोन वचनातील हे वचन 'पापाय पर पीडनम्।' परनिंदेचे दुष्परीणाम आपल्या दिसत नाही. It is like slow poisioing. व्यक्ती आणि समाजाच्या मनाला किड लागते. निंदेमुळे कालापव्यय होतो. शारिरीक, मानसिक शक्तीचा क्षय होतो. अनेकांची जीवने विनाकारण उध्वस्त होतात. निंदा ज्यावर होते ती व्यक्ती मानसिकरित्या हतबल होण्याची शक्यता असते. आणि निंदा करणार्याच्या मनातील सकारात्मक ऊर्जेचा साठा संपू लागतो आणि शेवटी ती व्यक्ती ही मनोरूग्ण बनण्याची शक्यता असते.

विकोपाला गेलेल्या परनिंदेवर मात करण्यासाठी उपाययोजना करावयाची असेल तर प्रथम 'आपण सारे परनिंदेचे समान रूग्ण आहोत' अशी भावना ठेवली की स्वतः पासून सुधरावयाची इच्छा निर्माण होऊ शकते. Charity begins at home. आसक्ती आणि विरक्तीच्या पलीकडे गेलेले तुकाराम महाराज देवाकडे "बालपण देगा देवा" असे मागणे मागतात. का? त्यांची वृत्ती, आचरण बालमनासारखे स्वच्छ निर्मळ झाले नव्हते का? झाले होतेच की. मग विठ्ठल माऊलीकडे त्यांनी असे मागणें का केले असावे? निवृतीच्या किंवा परमसिध्दीच्या परम टोका कडच्या प्रवासाकडे असताना त्यांनी देवाकडून बालपण मागितले. ह्याचा अर्थ त्या प्रवासातही ते आत्मपरिक्षण करीत असावे. अजूनही आत्मशुध्दी होणे आवश्यक आहे असे त्यांना जाणवत असावे. सार्या संताची चरीत्रे वाचल्यानंतर त्यांनी जे काही देवाकडे मागितले ते आपल्यासाठीच. त्यांचा प्रत्येक शब्द सुविचार. ह्याचा अर्थ हाच की आपण सार्यांनी बालकांसारखे निरागस होण्याचा प्रयत्न करणे. "जसा विचार, तसा आचार; जसा आचार ,तसा जीवनाला आकार." हे सूत्र अध्यात्मिक गुरू मांडतात. आधूनिक वैद्यकशास्त्रही हेच म्हणते. ह्याचा अर्थ हाच की विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोहोंचा संगम घालावा. म्हणजे आपण षढरिपूवर आपण मात करू शकतो. 

माझ्या बहूतांश लेखामध्ये मी विज्ञानाची कास सोडली आहे असे दिसणार नाही. ह्या विश्वातील रहस्यें ही विज्ञानाच्या आधारेच सुटणार. शास्त्रज्ञही आधूनिक ऋषीमुनीच. युरोपातील प्रबोधन काळाचा आपल्या समाजावर सकारात्मक बदल झाला आहे हे ही मी मानतो.(चिज्ञपट आणि समाजमन हा लेख कृपया पहावा) विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनची दोन वाक्ये मी सतत लक्षात ठेवतो, ती अशी आहेत, पहीले "The most mystrious thing in this universe is the universe itself." आणि दुसरे "The immagination is more important than knowledge." म्हणजेच विश्वातील रहस्ये शोधण्याचा प्रवास अनंत आहे. तसेच आपल्या मनात उत्पन्न होणार्या नवीन कल्पनांना वार्यावर सोडू नये. कारण तशा कल्पनांतूनही ज्ञानाची निर्मीती होत असते, असेच आईन्स्टाईन साहेबांना सुचवावयाचे होते असे वाटते. पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, जसे अध्यात्मात तप, ध्यान, जप, योग असे उपचार करून मनाला स्थिर करून परनिंदेची विकृती कमी करता येते, तसेच विश्वातील रहस्यें शोधण्यात रत झाले कि आपोआप परनिंदेची विकृती कमी होत जाते. ह्याला पुरावा काय? असं काय म्हणता राव, जेव्हा शास्त्रज्ञ विश्वाची रहस्ये शोधण्यात गर्क होतात तेव्हा ते आपोआप विश्वमय होतात. ते लौकीक दृष्टीने एखाद्या देशाचे नागरिक असले तरी , त्यांच्या मनात सार्या मानवी जीवनाचे कल्याणच असते. त्यांच्या मुलाखती, चरित्रे धुंडाळून पाहा. थोडक्यात काय अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही विश्वाच्या वा त्या परमात्म्यावरील निष्ठेच्या परम टोकाकडे घेऊन जाणारे दोन मार्ग आहेत पण शेवटी एके ठिकाणीच मिळणार.

मित्रहो, अध्यात्मिक रित्या उन्नत होत जाणे, वा वैज्ञानिक संशोधनात रत होणे हे दोन्ही उपाय आपल्या सारख्या सामान्यजनांना पेलवणारे नाहीत. अधून मधून संत साहित्य वाचणे, विज्ञानातील गमती-जमती ऐकणे, हास्यविनोदाचे वावडे टाळणे, एखादा छंद जोपासणे, सामाजिक बांधिलकी जपणे, इत्यादी गोष्टी करता येतात आणि आपण करीतही असतो. पण गडबड कूठे होते? जेव्हा आपण एकत्र जमतो, तो एक गोंधळ ठरतो. मग सार्वजनिक उत्सवासाठी जमलो असो वा कुणाच्या घरात मंगल कार्यासाठी जमलेले असो.  When many people sit together , it becoms crowd हा आपला दोष आहे. आणि तिथेच पुन्हा अहंकार जागृत होतो आणि परनिंदा सुरू होते. म्हणून संत मडंळीनी सतत नामस्भरण करावे असा सल्ला दिला. भगवंताने गीतेत सर्वात सोपा उपाय दिला आहे ज्यावर मी मागच्या लेखात तसेच इतर लेखात ही चर्चा केलेली आहे. तो सोपा उपाय  म्हणजे  'नियतं कुरू कर्म त्वम्।' तोच अंमलात आणण्याचा प्रयत्न करू या, उद्याच्या नववर्षाच्या सुमूहूर्तावर. क्यों की किसीने कहा है " हम अपने कर्ममें इतने जुटे रहो की हमें दुसरोंकी निंदा करनेका समय ना मिले!"

आपण असे मानतो कि परमेश्वर सर्वत्र आहे. आणि जे काही आपण बोलू त्याला तो तथास्तु तथास्तु असा आशिर्वाद देत असतो. म्हणून आपण चांगले बोलावे. वाईटालाही वाईट म्हणू नये. कारण तशा प्रकारच्या उच्चारामुळे वाईटपणा वातावरणात फैलतो व कुठेतरी रूजतो आणि फोफावतो. आपल्या येथे अशी म्हण आहे की "नकट्याला म्हणू नये नकटे व धाकट्याला म्हणू नये धाकटे!". उद्या आपलं नव वर्ष आगमन करीत आहे. "प्राणीमात्रा जीवे लागे बर्या शब्दे "  हा समर्थ रामदास स्वामीच्या उपदेशाची आठवण करूनच नवे वर्षे येत असते.  गेल्या चैत्र प्रदिपदे पासून मी ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधावयास सुरूवात केली.  ह्या वर्षअखेरचा हा शेवटचा लेख आपल्या पदरात ठेवला आहे. आपण सार्यानी वेळोवेळी चांगल्या सुचना दिल्या, प्रतिक्रीया दिल्या, माझं कौतुकही केले. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. असेच प्रोत्साहान मला देत राहा, अशी विनंती करतो. आपल्या सर्वाना तसेच आपले परिजन इष्ट-मित्रांना हिदू नववर्ष सुखाचे, समृध्दीचे जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून मी इथे विराम घेतो.
धन्यवाद !
जय योगेश्वर !

शनिवार, १० मार्च, २०१८

सेवाधर्म आणि कर्मयोग


एका मित्राकडून ७ मार्चला सकाळी शुभेच्छारूपी एक पोस्ट आली. ती अशी आहे. The most precious thing you can give someone is the gift of your time and attention. ही पोस्ट वाचल्यानंतर लागलीच लक्षात आले कि ह्यात केवळ सेवाभावाचा अर्थ अंतर्भूत नसून आपले नियत कर्म पार कसे पाडावे ह्या संबंधीचं मार्गदर्शनही दिसले. मनातील विचारांना संवादाच्या माध्यमातून वाट दाखवावी, असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच. 


सेवाभावी वृत्ती ही मोक्षप्राप्ती मार्गावरील भली मोठी शिदोरी. आपण ज्यांच्या नावाने गुरू पौर्णिमा साजरी करतो त्या महर्षी व्यासांनी म्हटले आहे,
              " परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्"! 
संपूर्ण अठरा पुराणातील ही दोन वचने महत्वपूर्ण मानली गेली आहेत. ह्याचा अर्थ परोपकार हीच मोक्षप्राप्तीची पहीली पायरी म्हणा वा कसोटी. तर  परपीडा सारखं मोठं पाप नाही. म्हणून म्हटले जाते की जर कोणाचं भलं करता येत नसेल तर निदान कूणाला पीडा देऊ नका. कोणाचं वाईट चिंतू नका. वरील पोस्ट ही पूर्णतः परोपकराची व्याख्या स्पष्ट करते. ह्यात काही शंका नाही. परोपकार कसा करता येतो, त्यासाठी कसली गरज असते, ह्या प्रश्नाचं उत्तर वरील पोस्टमध्ये आहे. दुसर्यांसाठी वेळ देणे आणि त्यांच्याकडे लक्ष देणे. हेच ते उत्तर. परंतु हा झाला शब्दशः अर्थ. ह्या पोस्टवर खोल विचार करू लागतो तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो.


आपण जन्माला येतो तेव्हा एक निरागस बालक असतो. म्हणजेच जन्मतः आपण सत्प्रवृत्तीचे असतो. सेवाभावी वृत्ती सुध्दा जन्मतः प्रत्येकाच्या अंगी असते. आईच्या दुधातून ती आपल्या अंगी येत असते. म्हणजे ती एक नैसर्गिक बाबच. आपलं शरीर सुध्दा पंचमहाभूताचं बनलेलं असते. त्यामुळे पंचमहाभूताची सारी वैशिष्टे ही आपल्यात अंगभूत असतात. पंचमहाभूतामध्ये परस्पर सहयोग आहे. सागर जल घेतो. सुर्य( तेज, अग्नी) सागराच्या पाण्याची वाफ करतो. आकाश त्या वाफेचं गोड जलात रूपातंर करून ढगात साठविते. वायू ढगांना घुसळवितो, पर्वत-डोंगर ढगांना अडवितात, मग पाऊस पडतो. जमीन पाण्याला मुरविते, वनस्पती जल घेते. व फळं-फूले देतात, धरणीमाता अन्न देते. आपण निसर्गाला गुरू मानतो. का तर, निसर्गात सर्वत्र सेवाभावाची उदाहरणे ठासून भरलेली आहेत. नदीचं वाहणं, वृक्षानां फळं लागणं, ती फळं आपल्या खाण्यात येणं, वृक्षाची सावली, तसेच फर्निचर औषधे इत्यादी जीवनोपयोगी मिळणार्या वस्तु; मधमाशीमुळे फुलातून मिळणारी मध, मुंग्या, कोळी सारख्या छोट्या जीवातून मिळणारा शिस्तीचा धडा आणि परभवामुळे खचून न जाण्याची मिळणारी प्रेरणा; वेगवेगळ्या प्राण्यापासून मिळणारे दुध, वाहनासाठी त्यांचा होणारा उपयोग, त्यांच गोबर, लोकर, त्वचा, इत्यादीचा व्यवहारी जीवनात होणारा उपयोग; आकाश नावाचं पंचमहाभूत, जेथून आजच्या माहीती व तंत्रज्ञानाच्या प्रसारणासाठी मिळणार्या संप्रेरणा; अनेक रंगी बेरंगी पक्षी, फूलं, फळं ह्यातून होणारा व्यवहारीक तसेच सात्वीक लाभ; समुद्रातून मिळणारे तेल, मासे, करता येणारी वाहतूक; धरणी मातेकडून मिळणारा आधार, हवे असलेली पीकं, कडधान्ये, धातू-खनिजे; जागोजागी निसर्गात ठासून भरलेलं नादब्रह्म आणि प्राणवायू. हे सारं काय दर्शवित आहे. ही निसर्गाची कृपाच. मानवाने सृष्टी निर्माण केलेली नाही हे तर स्पष्ट आहे. सर्वात बुध्दीमान प्राणी मानव आहे; ईश्वराची सर्वोत्तम निर्मीती मानव आहे. मग आपण निसर्गाला काय देत असतो? काहीच नाही. निसर्गाला देण्यासारखं आपल्यापाशी आहे तरी काय? आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि निसर्गाला आपल्या लालसेसाठी ओरबाडू नये, एवढीच इच्छा निसर्गाची असते. महात्मा गांधीनी म्हटले आहे, "हमारी सब जरूरते पूरी करनेकी क्षमता धरती माॅ के पास निश्चीत है लेकीन लालच नही"! आपल्या अवती-भोवतीच्या निसर्गात जसा सेवाभाव दिसून येतो, तसाच तो आपल्या अंगी असतोच. परंतु आपल्याला त्याचा विसर पडतो. म्हणूनच वेळोवेळी साधु-संत जन्मास येत असावेत. सेवाभाव वा सेवावृत्तीची जोपासना संतमंडळी निसर्गाच्या सानिध्यातूनच करीत असतात. सार्या चांगल्या-वाईट प्रेरणांचा स्त्रोत आकाश नावाचं पंचमहभूतच की. साधु-संताकडे चांगल्या प्रेरणा घेण्याची शक्ती असते. आपल्यापाशीही असावी पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही किंवा आपल्याला तिचा वापर करता येत नाही. म्हणून आपण सारे सामान्यजन. तर "जगाच्या कल्याणासाठी संताच्या विभूती" अशी संताची ओळख. संतांनी आपल्याला संयम, सदाचार, सहकार, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, परोपकार,  सत्य, अंहिसा, रंजले-गांजल्यांची सेवा,  श्रमप्रतिष्ठा, भूतदया,    इत्यादी जीवनमूल्ये छोट्या छोट्या दृष्टांता द्वारे शिकविली. त्यावरून त्यांना चराचरात सद्भाव दिसला; ईश्वर दिसला. त्यामुळे आपल्या मनात 'भूदेव संतासी सदा नमावे' अशी भावना रूजते. तेथूनच आपल्यामध्ये  सेवाभावी  वृत्तीची जागृती होत असते. ती जागृती सतत टिकविण्यासाठी निस्सीम भावनेने आपले कर्म पार पाडणे हेच आवश्यक असते. ह्यावर आपण पुढे चर्चा करू या. सेवाधर्म वा सेवाभाव ह्याची व्याप्ती फार मोठी असते. आपण जे काही कमावितो ते सारं निसर्गाच्या साह्याने. निसर्ग आपल्याकडून काही मागत नसला तरी दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, विविध रोगांची साथ अशी संकटे उभी करतोच की! हा आपल्यासाठी इशाराच नाही का? प्रदुषण थांबविणे, पर्यावरणाची कास धरणे, अती उपभोगता टाळणे, वृक्षारोपण करणे, संयमीत जीवनशैली ठेवणे, वन्यप्राण्यांची तसेच पाळीव प्राण्यांची नीगा राखणे, पक्ष्यांच्या स्वैर विहारावर गदा आणू न देणे, कुठल्याही पक्षी वा प्राण्याची शिकार न करणे, निसर्गाचं संतूलन बिघडू न देणे इत्यादी कार्ये करणे ही निसर्गाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय आणि अंती आपल्या हातून झालेल्या सेवाभावाचं विलोभनीय दर्शनच. वरील पोस्टच्या भाषेत म्हणावयाचे असल्यास Precious gift of time and attention to our beloved Mother Earth. आपल्या धरणी मातेसाठी काढलेला वेळ आणि घेतलेली काळजीच नव्हे का?


मानव हा ही एक निसर्गाचा घटक आहे. म्हणून जे बांधव जन्मतः अपंग आहेत, त्याच्यांकडे लक्ष देणं हे आपले कर्तव्य आहेच. Attention ह्या शब्दाचा अर्थ केवळ लक्ष देणे इतकाच नसून काळजी घेणे असाही आहे. आपण जे काही कमावितो, खातो, त्यातील काही हिस्सा गोरगरीबांना देणे म्हणजे एक प्रकारे यज्ञच होय. जे शिक्षक आहेत त्यांनी विद्यादान करावे, जे धनवान आहेत त्यांनी धनरूपाने मदत करावी. जे वैद्यकीय व्यवसायात आहेत,त्यांनी औषधपोचार करावेत. जे व्यापारी आहेत त्यांनी आपल्याकडील वस्तू रूपाने दान करावे. मग कपडे असो, वा किराणा माल. दान कुठल्याही प्रकारे करता येते. रूग्णांची सेवा एक प्रकारे दानच होय. डाॅ बाबा आमटेंनी कुष्ठरोगांसाठी आपलं जीवन सार्थकी लावले. नानाजी देशमुखांनी साठी ओलाडंली आणि राजकारणातूंन निवृत्ती घेऊन अंत्यदयोच्या कामाला वाहून घेतले. गिरीश प्रभूणे भटक्या जाती-जमातीतील लोकांसाठी शाळा चालवितात. सिंथुताई सकपाळ अनाथ मुलांना आधार देत आहेत. कोणी वृध्दाश्रम चालवितात. कोणी अन्नदान करतात. डाॅ अभय बंग समाजाला व्यसनमूक्तीचं महत्व पटवून देत आहेत.स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुज्यनीय पांडुरंगशास्त्री आठवलेनी भक्तीयोगाची दिक्षा देऊन समाजातील व्यसनाधिनता कमी केली तसेच पर्यावरणाच्या कार्यात योगदान दिले. विश्व हिंदू परिषदेने संस्कार, साक्षर, आणि स्वावलंबन ह्या त्रिसूत्रावर वनवासी बांधवासाठी कल्याण आश्रम उभे करून त्यांच्या जीवनात आमृलाग्र बदल घडविला आहे. १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सेवाभावी संस्था ऊभारून समाजसेवेचं देशभर जाळं विणलयं. शिवाय भूकंप, पूर, अपघात इत्यादी राष्ट्रीय आपत्तीत संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातात. आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात, गावा-गावात  असलेले देव-देवतांच्या देवालयाचे तसेच विविध संप्रदायाचे ट्रस्ट,  गोर-गरीब लोकांसाठी शिक्षण, संस्कार, रूग्णसेवा, अन्नदान, सहकार पर्यावरण सारखे कार्यक्रम वेळोवेळी राबवित आहेत. अनेक भक्तगण अशा सेवासाठी काही मानधन न घेता राबत असतात. ह्या सार्या  संस्थांनी सेवाधर्म हेच कर्म मानलं तेही भक्तीयोगाची जोड देऊन. म्हणून समाजात सद्भाव टिकुन आहे.आजकाल मृत्यु पश्चात देहदान करण्यासंबंधीची चळवळ जोर धरू लागली आहे. ही गोष्ट तशी आपल्या संस्कृतीशी मिळती-जुळती आहे. आपण ऐकलंय वैदिक काळात दधीची ऋषीनी असुरांचा नायनाट करण्यासाठी देवांना आपल्या अस्थी दिल्या होत्या. मृत्यूनंतर आपल्या देहाला अग्नीऐवजी नदी वा समुद्रात आपला पार्थीव देह सोडावा जेणेकरून जलाशयामधील जीवांना अन्न मिळावे अशी आगाऊ सुचना नाशिक येथील पुजनीय गणेशबाबांनी दिली होती आणि ती आज्ञा त्यांच्या शिष्यांनी पाळली ही तर अलीकडची गोष्ट. आत्मा अमर असतो. शरीर हे वस्त्राप्रमाणे आहे असे भगवंतानी गीतेत सांगितले आहे. नेत्रदान, रक्तदान, किडनीदान इत्यादी प्रकाराच्या दानामुळे अनेक नेत्रहीनांना दृष्टी प्राप्त होते. रक्ताच्या पुरवठ्यामूळे अनेक रूग्णांचा जीव वाचतो. किडनी दानातूनही रूग्णाला जीवदान मिळते. 'मरावे परी किर्तीरूपी उरावे' ह्या वचनाला जागं राहण्याची संधी अवयव वा देहदानानेही प्राप्त होऊ शकते. ज्याला आपण काळ म्हणतो, त्याचं अस्तित्व अनादि कालापासून आहे. जेव्हा ह्या सृष्टीत म्हणा वा विश्वात काहीच नव्हते तेव्हापासून काळ अस्तित्वात आहे. तो आपल्या मृत्युसोबतही असतो. जर त्याचं व्यवहारातील नाव वेळ म्हणजे Time हेच असेल तर आपल्या देहदानाची अंमलबजावणी होताना आपण वरील पोस्टमधील most precious gift is to give time हे तंतोतंत पाळले असेच समजावे. देहदान वा अवयवदान ह्यामूळे कोणा रूग्णाचं आयुष्य वाढतं त्याअर्थी त्याला जीवन जगण्यासाठी दिलेला अधिक वेळ. ह्याहून अधिक स्पष्ट कुठला आणि काय अर्थ निघू शकतो?


आता आपण व्यवहारीक जीवनात वरील पोस्टचा अर्थ कसा लागतो, हे पाहू या. आपल्या धार्मीक मान्यतानुसार जीवनात ऐहीक उन्नतीला त्याज्य मानलेलं नाही. सेवाभाव मनात असला तरी तसा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्या मनामधील आसक्ती पुर्णपणे नाहीशी होणे आवश्यक असते. सर्वसामान्यांना अशी विरक्ती प्राप्त करणे हे काम आवाक्याच्या पलीकडचे असते. आणि तशी अपेक्षा आपल्याकडून संतानींही केलेली नाही. समर्थ रामदास स्वामीनी म्हटले आहे ' प्रपंच ते भाग्य, परमार्थ ते वैरागय'! संन्यास ही धर्मातील एक व्यवस्था आहे. धर्माचा पूर्ण अर्थ म्हणजे संन्यास नव्हे. भगवद् गीतेत श्रीकृष्णाने कर्मयोगाची महतीही विषद केली आहे. आणि कर्मयोगाद्वारे आपण परमसिध्दीला पोहचू शकतो अशी खात्रीही भगवंतानी दिली आहे. 


Time is one of the natural resorces man has got from the god. एक प्रकारचे नैसर्गीक संसाधन म्हणजे वेळ. आपल्याकडे काहीतरी असल्या शिवाय आपण दान करू शकत नाही. सर्वात प्रथम निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी म्हणजे मानव म्हणून जन्म. दुसरी देणगी म्हणजे वेळ. तिसरी गोष्ट म्हणजे बुध्दी. चौथी गोष्ट म्हणजे कष्ट करण्यासाठी शरीररूपाने दिलेली शक्ती. देव आपल्याला सतत सांगत आहे. मी तुला दिले आहेत दोन कर; तु त्याचा वापर करून काहीतरी कर ज्यामूळे तुझी किर्ती वाढेल. प्रथम आपण वैद्यकीय व्यवसायिकाचं उदाहरण पाहू या. डाॅक्टरने आपल्या दवाखान्यात यावे आणि आपल्या पेंशटसाठी वेळ देणे गरजेचं आहे. डाॅक्टर दवाखान्यात बसलेच नाही तर तो अक्षम्य गुन्हाच म्हणावा. वरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे कि to give the gift of time and attention. ह्यातील attention ह्या शब्दाचा अर्थ काळजी घेणे तसेच ऐकणे वा लक्ष देणे असाही आहे. पेंशट काय सांगतोय हे डाॅक्टरानी काळजीपूर्वक ऐकावयास हवे. नाहीतर पेशंटच्या रोगासबंधी निदान कसे लागेल? निदान लागण्यासाठी पेशंटची नाडी, पोट, छाती तपासणे आवश्यक असते. त्यानंतर डाॅक्टराने औषध देणं आवश्यक आहे. जितका जास्त वेळ डाॅक्टर आपल्या पेशंटना देईल तितका पेशंटचा डाॅक्टरवरील विश्वास वाढतो. पेशंटचा विश्वास वाढत जातो तेव्हा पेशंटची आजारातून बरे होण्याची शक्यता अधिक असते. हळहळू त्या डाॅक्टरकडे गर्दी वाढत जाते; मग आणखिन वेळ पेशंटसाठी वाढवावा लागतो. हळूहळू डाॅक्टरचा नावलोकीक वाढत जातो. डाॅक्टर असो वा वकील. व्यापारी असो वा विम्याचा एजंट, शेतकरी असो वा शेतमजूर, शिक्षक असो वा प्राध्यापक, वा इंजिनियर , उद्योगपती असो वा नेता प्रत्येकाला आपआपल्या व्यवसायासाठी तसेच आपल्या ग्राहकाला वेळ तसेच लक्ष देणं आवश्यक असते. Customer is always right, हा आजच्या आर्थिक जगतातील महत्वाचा सिंध्दांत. महात्मा गांधीजींनीही ' ग्राहक हाच मालक' ही भावना अंतःकरणात सतत ठेवून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा उपदेश दिला आहे. हा ही अर्थ वरील पोस्ट मध्ये अंतर्भूत आहे. ह्या संदर्भात Attention म्हणजे लक्ष देऊन ग्राहकाचं म्हणणं ऐकून घेणे आवश्यक आहे. त्यावरूनच त्याला काय हवयं हे जाणून घेण्याची आपली क्षमता वाढते. विक्री व्यवसायात आज Service after Sales ही कल्पना चांगलं मूळ धरताना दिसतेय. ह्याचं कारण वरील पोस्टमध्ये अंतर्भूत असलेलं सेवाभाव वा सेवाधर्म हे शाश्वत सत्य. संशोधकालाही फार मोठा वेळ आपल्या कार्यात द्यावा लागतो. सर्वच शास्त्रज्ञांनी अहोरात्र वेळ देऊन कष्ट करून विविध क्षेत्रात अमोल कार्य केले आहे. आणि त्यांच्या शोधकार्यामूळे मानवी जीवन सुकर झाले. हा ही एक प्रकारचा सेवाभावच की. डाॅ एलीयास ह्यूम नावाच्या शास्त्रज्ञाला नाताळ सणापूर्वी शिंपी असणार्या त्यांच्या पत्नीच्या कामाचा डोंगर पाहून काळजी वाटत होती. अनेकांचे कपडे हाताने शिवायचे आणि नाताळापूर्वी ग्राहकाला द्यावे लागत होते. बस संशोधन सुरू केले. दिवस-रात्र कष्ट घेतले आणि कपडे शिवण्याची मशीन तयार केली. हा शोध मानव जातीवर उपकारच नव्हे का!


कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वेळ, प्रयत्न आणि चिकाटी आवश्यक असतात. म्हणजेच आपलं नियत कर्म समरस होऊन करावे. म्हणजेच कुठलाही हलगर्जीपणा नको; ना वेळेचा(time), ना लक्ष (attention) विचलीत करण्याचा. भगवंतांनी गीतेत सांगितले आहे, 
           न च सन्यासनात एवं सिध्दिम् समधिगच्छति! 
कर्माचा संन्यास किंवा त्याग केल्याने सिध्दि प्राप्त होत नसते. 


एक गृहस्थ आपल्या आर्थिक विवंचनेसंबंधी उपाय मागण्यासाठी एका अध्यात्मिक गुरूकडे जातो. गुरूने सारं काही ऐकलं आणि त्याला उजव्या हाताच्या अनामिकेत एक अंगठी घालायला दिली आणि सांगितले कि,  "ह्या अंगठीत एक यंत्र आहे. त्याला रोज सकाळी, दुपारी, आणि संध्याकाळी आपल्या घराचा, शेताचा आणि मळ्याचा प्रत्येक कोपरा दाखवत जा. एक महीन्यानंतर बघ. तुझं दैन्य निघून गेलेलं दिसेल". गुरूच्या आज्ञेनुसार त्या गृहस्थाने त्या यंत्राला कोपरा दाखविण्यास सुरूवात केली. पहील्या दिवशीच त्याला आपला मुलगा खोलीत अभ्यास करण्याऐवजी सिनेमाची गाणी ऐकत बसलेला दिसला. वडीलांना पाहून त्याने अभ्यास करावयास सुरूवात केली. मळ्यात गेल्यानंतर पाहतो तर, तो मळ्याचा रखवालदार भाजी चोरून विकत आहे. म्हशी आणि बैलासमोर कडबा दिसला नाही. शेतात दुसर्यांची गुरे शिरलेली दिसली. नोकर वर्ग कामाच्या वेळी खुशाल झाडाखाली गप्पा मारताना दिसले. मालकाला पाहून त्यांना नवल वाटले. ते उठले आणि कामाला लागले. पण मालकाचा रोज तिन्ही वेळी संचार होऊ लागला. त्याच बरोबर मुलगा अभ्यासाला लागला. मळ्यातील चोरी बंद झाली. दुसर्यांची गुरे शेतात दिसेनासी झाली. पिकाची नासाडी थांबली. नोकरांच्या गप्पा मारणे बंद झाले. महीन्याभरात त्याची आर्थिक स्थिती सुधारली. गुरूजवळ येऊन त्याने सारा वृतांत सांगितला. यंत्राबद्दल गुरूचे आभार मानले. गुरू म्हणाले ती अंगठी साधी आहे. त्यात कुठलेही यंत्र नाही. ईश्वराने तुला time and attention नावाची दोन यंत्रे दिली आहेत, ती तू उपयोगात आणली. म्हणून तुझी स्थिती सुधारली. तात्पर्य हेच की आपल्या कामासाठी वेळ देणे आणि कामावर लक्ष ठेवणे हाच जीवन जगण्याचा मंत्र, तंत्र वा जप आहे. भगवंतानी गीतेत सांगितले आहे, 
             नियतं कुरू कर्म त्वं कर्म ज्यायो अकर्मणः! 
             शरीरयात्रापी च न ते न प्रसिध्येत् अकर्मणः!! 
नियतीने सोपविलेले कर्म वा कर्तव्याचे पालन कर. कारण कर्म करणे निश्चितच निष्क्रियतेपेक्षा श्रेष्ठ असते. निष्क्रियतेमुळे आपला निर्वाह ही होऊ शकणार नाही. निष्क्रियतेने पृथ्वीवर भार होणे हा एकप्रकारे अधर्म होय.


एक भिकारी रेल्वेच्या डब्यात लोकाकडून भीक्षा मागत असे. कोणी पैसे देत असत तर कोणी देत नसत. परंतु एक रूबाबदार कपड्यातील व्यापारी भिक्षा देत नसे पण त्याला सांगत असे कि, तू मला काहीतरी दे की मी तुला भीक्षा देईन. त्या भिकार्याच्या मनात विचार आला, खरेच आपण काही द्यायला हवं. दुसर्या दिवसापासून त्याने त्या रूबाबदार श्रीमंत व्यापाराला फूल देण्यास सुरवात केली. त्या व्यापाराने पैसे द्यायला सुरवात केली. हळूहळू त्या भिकार्याने गाडीतील सर्वच प्रवाशांना फुले देण्यास सुरवात केली. आता त्या भिकार्याचं भिक्षेतील उत्पन्न वाढू लागलं. दिडएक वर्षानंतर त्या गाडीतून प्रवास करताना एके दिवशी त्या व्यापाराच्या शेजारी दुसर्या स्टेशनवर एक श्रीमंत प्रवासी बसला. त्याने व्यापार्याला नमस्कार केला आणि म्हणाला, मला ओळखलं का? त्या व्यापार्याने म्हटलं, नाही बूवा. मग त्या प्रवाशाने म्हटलं अहो, मी तुमच्या बरोबर ह्या गाडीतून प्रवास करीत असे. त्या व्यापाराने आठविण्याचा प्रयत्न केला पण काही ओळख पटली नाही. नंतर त्या प्रवाशाने  व्यापाराला म्हटले आज मी एक व्यापारी झालो आहे. दुसर्या ठीकाणी फुलांची आर्डरच्या निमित्ताने जात आहे. ह्याच गाडीत ह्याच डब्यात तुमच्या कडे भीक्षा मागणारा मी भिकारी. काहीतरी दिल्याशिवाय काही मागायचं नाही हा तुमचा सल्ला मी मानला आणि माझं जीवन बदललं. व्यापार्याला ओळख पटली. त्या व्यापार्याने त्याचं अभिनंदन केल. त्या प्रवाशाने व्यापार्याचे आभार मानले आणि तो दुसर्या स्टेशनवर उतरता झाला. सेवाधर्मातून झालेला एक कर्मयोगीचं हे अस्सल उदाहरण. कोणाकडे जाताना रिक्त हाताने जाऊ नये असे म्हटले जाते त्यात तथ्य आहे. जसे द्याल आणि जे काही द्याल त्यापेक्षा कितीतरी पटीने ते तुमच्याकडे  परत येत असते. परोपकार कराल, तर कधी दुःखी होणार नाही. दुसर्यांना पीडा द्याल तर पीडाच तुमच्याकडे परत येणार हाच निसर्गाचा वा नियतीचा नियम आहे. 


तुम्ही शेतकरी असो वा व्यापारी, उद्योजक असो वा व्यवसायिक, कामगार असो वा कर्मचारी. कलाकार असो वा गायक. जो अविरतपणे काम करतो तोच यशस्वी होतो. हा तर निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी माणसांची यादी पाहीली, तर आपल्या लक्षात येते कि त्यानांही दिवसाचे चोवीस तासच मिळतात. तरीही ते यशस्वी कसे होतात? उत्तर सरळ आहे. वक्तशीरपणा, मेहनतीत कमतरता न ठेवणे, आपल्या कामावरची श्रध्दा,आपल्या क्षेत्रासंबंधी अधिकाधिक ज्ञान,आणि कुशलता मिळविण्यासाठी जाणकारांशी तसेच जे आपल्या व्यवसायावर अंवलंबून आहेत अशा लोकांशी सततचा संपर्क इत्यादी गुणांच्या आधारेच ते यशाच्या शिखरावर पोहचलेले असतात.


अचूक संधी साधणे ही एक यश प्राप्त करण्यासाठी पहीली पायरी आहे. Opportunity means a course of action which is immediately possible. मुखातून एखादा अपशब्द बाहेर पडला तर मागे घेता नाही. हे खरे, पण माफी मागता येते. परंतु वाया घालविलेला वेळ किंवा संधी परत येत नाही. आळसामुळे वेळेचा अपवय्य करणे हा ही एक भ्रष्टाचारच होय. कारण Time is money हे आपण जाणतोच. एका हिन्दी सिनेमात कादरखानच्या मुखी एक डायलाॅग आहे, ' जो वक्तका फिक्र नही करता, वक्त भी उसका फिक्र नही करता है! कवीवर्य माधव ज्युलीयन म्हणतात 'थांबला तो संपला'.ईमर्सन म्हणतात "Run with the time'. गती हाच आजच्या काळाचा मंत्र आहे. गती शिवाय प्रगती नाही हेच खरे. रिकामी पिशवी उभी राहात नाही. एकदा का आपली पिशवी फलाने भरली की आपोआप आपली वृत्ती तामसाकडून राजसाकडे आणि राजसाकडून सात्वीकतेकडे प्रवास करू लागते. शेवटी आपल्यात जन्मतः असलेला सद्भाव आणि सेवाभाव जागा होतो. व्यवहारी जीवन जगत असतांना एखादा व्यवसाय उभा केला, वृंदिगत केला, आणि अनेकांच्या हातांना आपण काम दिले तर ते ही एक प्रकारे दानच होय. भले त्याला कोणी स्वार्थातून परमार्थ साधला असे म्हटले तरी. 


प्रत्येक व्यक्तीत ज्ञान, शौर्य, व्यापार, आणि सेवाभाव जन्मतःच असतात. प्रत्येक व्यक्ती निर्माता तसेच ग्राहक ही असते. डाॅक्टर मंडळीचा व्यवसाय हा सेवा प्रकारात मोडतो. तरी ही मंडळी औषध निर्मीती करणार्या कंपनीचे ग्राहक असतात. तर औषधे विकणारी मंडळी कंपनीचे सेवक असतात. औषधे निर्माण करणारी मंडळी आपल्या आजारावर इलाजासाठी डाॅक्टराकडे जातात तेव्हा ती मंडळी डाॅक्टराचे ग्राहक बनतात. एकदंरीत काय प्रत्येकजण कर्म करीत असता सेवा ही करीत असतो. शेतकरी पीकं काढतो; बाग फुलवितो, फळं विकतो. हे कर्म आणि सेवाधर्मही. तोच शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकं आणि फळापासून बनविलेल्या बिस्कीटाची, औषधाची तसेच फलरसाची खरेदी करतो. औषधे, फलरस,बिस्किटे निर्मीती करणार्या कंपनीचं हे कर्म आणि सेवाभावही. मूंगफली शेतकरी पिकवितो.तर खाद्यतेलाची निर्मीती उद्योजक करीत असतो. पुन्हा खाद्यतेलाची खरेदी शेतकरी करीत असतो तेव्हा शेतकरी ग्राहक बनतो हे आणखीन एक उदाहरण. ह्यालाच कोणी जगरहाटी म्हणतात, तर कोणी निसर्गाचं चक्र. वस्तूतः ते कालचक्रच. मानव एकटा आपल्या सर्व गरजांची पूर्ती करू शकत नाही, म्हणूनच समाजाची निर्मीती झाली आहे. जो पर्यंत मानवी जीवन ह्या धरतीवर अस्तित्वात आहे तो पर्यंत सहजीवनाला महत्व राहणार. त्या सहजीवनाचं अध्यात्मीक पातळीवरचं नाव म्हणजे सेवाधर्म. ह्याचा अर्थ हाच की सेवा आणि कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निस्सीम भक्तीने नियत कर्म पार पाडीत असता आपल्या हातून सेवाधर्म घडत असतोच की. कर्म करताना वेळ वायफळ रित्या दवडणे म्हणजेच आचरण धर्माची अवहेलना होय. त्यामूळेच भगवंताने गीतेत म्हटले आहे, 
            स्वे स्वे कर्माणी अभिरतः संसिध्दी लभते नरः!
आपआपल्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मात जी व्यक्ती नित्य रत असते, त्याला परमसिध्दि प्राप्त होत असते. सारांशरूपाने असेच म्हणता येईल की Time and attention both are precious. आणि ह्या दोन्हीचा सदुपयोग हे दान. म्हणजेच निस्सीम कर्मयोगाचं फल. 

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

साहित्यिकांचे राजकीयकरण झाले आहे का?



बडोदा येथील साहित्यसंमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी 'राजा तू चुकतोय' असे उद्गार काढून मुख्यमंत्र्यांना सुनाविले. दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजने पंतप्रधान मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत अशा शब्दात टिका केली. पाठोपाठ मुबंईत मटा मैफलच्या व्यासपीठावरून साहित्यसंमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षांनी 'समाज ऐतिहासिक साहित्यात रमतोय' असे उद्गार काढून समाजालाही सुनाविले. एकूण सुनाविण्याच्या भाषेने जोर धरलेला दिसतोय. म्हणून हा लेख प्रपंच. केंद्रात तसेच राज्यात हिंदूत्व विचारसरणीचे पक्ष सत्तेवर आहेत, म्हणून संपूर्ण देशाने हिंदूत्व स्विकारले असे होत नाही. तसेच साहित्य-संमेलनांच्या आजी-माजी अध्यक्षांनी केलेली वक्तव्ये सार्या साहित्यिकांची आहेत असे समजण्याचीही गरज नाही हे लक्षात घेऊनच चर्चा करू या.

भाजपाच्या मुंबईतील खासदार पुनम महाजनांनी पुण्यात 'साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य आणि कलेवर लक्ष द्यावे, राजा काय करतोय, ह्यावर लक्ष न देता प्रथम मतदानाचा हक्क बजावा' असे म्हणत पलटवार केला. साहित्यसंमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमूख, माजी अध्यक्ष श्री नागनाथ कोतापल्ले आणि अभिनेता प्रकाश राज ह्यांना पूनम महाजनांनी केलेला पलटवार झोंबला असला तरी बहूतांश वाचक आणि मतदारांना आवडलेला असू शकतो. Every action has Reaction हा वैज्ञानिक वा नैसर्गिक नियमच आहे.

सामान्य  वाचक-रसिक  साहित्यिकांकडून प्रबोधनाची तसेच  मंनोरंजनाची  अपेक्षा करतो  ती त्यांच्या साहित्यिक  कृतीतून.  साहित्यिकांनी राजकिय व्यवस्थेवर केलेल्या टिकेतून प्रबोधनाऐवजी मनोरंजन होत आलेलं आहे हा अनुभव आहे. राजकिय व्यवस्थेवर साहित्यिकांनी भाष्य करू नये असे ना साहित्य रसिकाला वाटतं ना सामान्य मतदाराला. पंरतु साहित्यिकांच्या टिकेवर राजकिय नेत्याने पलटवार केला कि जो साहित्यप्रेमी आहे आणि मतदारही आहे, त्याने कुठलीतरी राजकिय विचारसरणी अंगिकारली असल्याकारणाने त्याची अवस्था फुटबाॅल सारखी होते. मग मात्र  समाजाचे मनोरंजन होते. असो. 

आज केद्रात आणि राज्यात भाजपा-सेनेचं सरकार आहे. म्हणजेच हिंदूत्व विचारसरणीचं. त्यामूळे पूनम महाजन ह्यांनी पलटवार करणं स्वाभाविक आहे. मागे एकदा कवीवर्य वसंत बापट आणि शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यांतही वाक्-युध्द झालेलं होतं. त्यावेळी वसंत बापटांना बाळासाहेबांनी ठाकरे शैलीत फटकारले होते. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात असे वर्णन साहित्यिकांनीच केलेलं आहे. सामान्य वाचकाने वा सामान्य मतदाराने केलेलं नाही. परंतु राजकिय नेत्यांना शब्दाचा शस्त्र म्हणून वापर करण्याची वेळ का यावी? ह्याच उत्तरही सरळ आहे. जेव्हा भाजपा-सेनेचं सरकार असते, तेव्हा सरकारवर टिका करणारे साहित्यिक काँग्रसी, समाजवादी, वा साम्यवादी विचारसरणीचा अंगिकार केलेलेच असतात, हे लपून राहीलेलं नाही. सर्वसामान्यांना राजकीय जाण चांगली आहे, म्हणून लोकशाहीचा प्रयोग आपल्या येथे यशस्वी झालेला आहे. १९७५ च्या आणिबाणीच्या काळानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीच्या निकालानंतर ही बाब अधोरेखीत झाली आहे. 'राजा तू चूकतोय' असे म्हणणार्या संमेलनाध्यक्षांनी आणिबाणीच्या काळात आपण तत्कालीन पंतप्रधानांना फटकारले होते असे जाहीर केले असते, तर बरे झाले असते. त्यांनी खरोखरच आणिबाणीला विरोध दाखविलेला असेल तर आपल्या भाषणात तितक्याच पोटतिडकीने आणिबाणीच्या काळ्याकुट्ट काळाबद्दल तिरस्कार व्यक्त केला असता. पण तसे काही घडले नाही. त्यामूळे समेलनांध्यक्ष देशमूखांच्या 'राजा तू चूकतोय' ह्या टिकेला काही वजन प्राप्त झालेलं दिसलं नाही. मी साहित्यिक आहे आणि आता संमेलनाचा अध्यक्ष आहे, म्हणून 'राजा तू चुकतोय' असे म्हणणे वाचक खपवून घेतील असे होत नाही. ह्याचं कारण त्यांनी केलेली टीकाच मूळी हिंदूत्व विचारसरणीला विरोध करावा ह्या हेतूने केलेली दिसते. 

आजही साहित्यिकांपेक्षा राजकिय नेत्याला अधिक वलय आहे. का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा साहित्यिकांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत का? निदान जे साहित्यिक संधी प्राप्त होताच राजकिय नेत्यावर टिका करतात, त्या साहित्यिकांनी तरी करायला हवे होते की नाही? साहित्य महामंडळ, साहित्य संमेलन, त्याच्या अध्यक्षपदासाठी होणार्या निवडणूका, विभिन्न पातळीवरील साहित्य परिषदेच्या शाखा, त्या शाखांचा कारभार ह्यावर दरवर्षी वर्तमानपत्रातील लेखातून अनेक मान्यवर सूचना करीत असतात. त्यावर साहित्यिक लक्ष देतात का? बहूतांश प्रतिथयश साहित्यिक साहित्य संमेलनात फिरकतही नाहीत. ते सर्व वादविवादापासून दूर राहतात. असे का व्हावे? साहित्यिक जगतात ही राजकारण असतेच ना! तिथेही मतदान असतेच की. मतदान आले की, मॅनेज करण्याची पध्दतही जोडीला येते. आपलं घर अस्वच्छ आणि दुसर्याच्या घरातून दुर्गंधी येते असा आकाडतांडव करणे बरे नव्हे. प्रश्न साहित्यिकांनी सरकारवर टिका करण्याचा नसून राजकीय चष्म्याचा वापर करून टिका करण्याची सवय मोडण्याचा आहे. सवयीतून स्वभाव बनतो. स्वभावातून खोड बनते आणि खोड झाली कि ती जात नाही. लोकसभेच्या निवडणूकीचं वारं साहित्यिकांच्या अंगात संचारले असेल तर अधिक काय बोलावे? 

'ऐतिहासिक साहित्यात समाज रमतोय' हे उद्गार आहेत ,जेष्ठ साहित्यिक आणि ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले ह्यांचे. त्या वक्तव्यात मटाने बदल करून 'उदात्तीकरण केलेल्या इतिहासात समाज रमतोय' अशी हेडलाईन देऊन बातमी दिली. महाराष्ट टाईम्स ह्या वृत्तपत्रानेच आयोजित केलेल्या मटा मैफलच्या व्यासपिठावरूनच श्री नागनाथ कोतापल्लेंनी हे वक्तव्य केले असल्यामूळे मटाच्या संपादकांचा तो हक्क समजून त्यावर फारशी प्रतिक्रीया द्यावीसी वाटत नाही. त्यातही वृत्तपत्रं हा ही एक व्यवसाय आहे. त्यामूळे समाज इतिहासात रमतोय असे लिहीण्यापेक्षा 'उदात्तीकरण केलेल्या इतिहासात' अशी वाक्यरचना केल्यामूळे खप वाढण्याची शक्यता मटाच्या संपादकांना वाटली असावी,असेच समजू या. श्री कोतापल्ले ह्यानी इतिहासात समाज रमतोय हे वक्तव्य केले, त्यावेळी सोबत 'राजा तू चुकतोय' असे वक्तव्य केलेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्री देशमूखही होते. आज ऐतिहासिक कांदबर्यावर टिका करावयाची आणि काल परवा सरकारवर टिका करताना 'राजा' शब्दाचा वापर केला होता हे काय दर्शवित आहे? स्वतः देशमूख इतिहासात रममाण झाले होते असे समजावयाचे का? आपण लोकशाही राज्य प्रणाली स्विकारली आहे, ह्याचा देशमूख साहेबांना कोण्या एके काळी संस्थान असलेल्या बडोद्यात विसर पडला होता का? हे संभवत नाही. संमेलनाध्यक्षांनी राजा हा शब्द उपाहासाने वापरला होता. हे भारतीय राजकारणातील एक अभ्यासू , हुषार, चतूर आणि स्पष्ट वक्ता असलेले भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या मुलीने पक्के हेरले आणि पुण्यातील साहित्यिक विषयक मैफलीतच शिताफीने महाजन स्टाईल वापरून देशमूखांवर पलटवार केला.

अलीकडे सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायधिशांच्या बंडाबाबत लाॅबीचा उल्लेख मिडीयामधून ऐकू आला. तशाच प्रकारच्या लाॅबीचा संसर्ग काही साहित्यिकांना जडला असावा असे दिसते. एकतर 'मटा मैफल' गाजविणार्या साहित्यिकांना इतिहासाची अॅलर्जी असावी किंवा इतिहासातील काही पात्रांच्या समाजमनात असलेल्या स्थानाविषयी अॅलर्जी असावी. श्री नागनाथ कोतापल्ले ह्यांनी आपल्या भाषणात पुढे रामायण, महाभारत ह्या दोन ग्रंथांच्या सोबत स्वामी ह्या कांदबरीच्या खपाबद्दलचा उल्लेख केला असल्यामूळे त्यांचा रोख ह्या ग्रंथातील व्यक्तीरेखांवर असावा असा अंदाज आहे. 

प्रश्न आहे तो ऐतिहासिक कांदबर्यात समाज का रमतोय? समाजाला पुढे जावयाचे नाही, असेच मटा आणि कोतापल्लेना सुचवयाचे आहे का? भारतीय समाज आधूनिक वैज्ञानिक उपकरणांचा वापर करीत नाही का? आजचा तरूण पुस्तके वाचतच नाही का? काही मूलं ई-बूक सेवा वापरत आहेत. सामाजिक आशयघन असलेले नाटकं, सिनेमांना लोक चांगला प्रतिसाद देत आहेत ना. 'आपलं माणूस' ह्या चित्रपटाला इतका उत्स्फुर्त पांठीबा मिळतोय, तो कशामुळे? नाना पाटेकरांच्या अभिनयाचा ह्या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा असला तरी चित्रपटात ब्रिटीश लेखक सर आर्थर काॅनन डाॅयल ह्यांच्या शेरलाॅक होम्सच्या कथांना साजेसे असे प्रसंग उभे केले, आणि ते ही चित्रपटाच्या सामाजिक आशयघनाची, वा समस्येची चौकट न मोडता केले आहेत. ह्याचं श्रेय दिग्दर्शक, पटकथाकार, संवाद लेखनाला जातेच की. ते ही साहित्यिकच ना. अलीकडे आपला समाज संगीत नाटकाकडे आकर्षित होत आहे. संगीत नाटकं हे ही आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा भाग नाहीत का? त्यातील कथा,पात्रे पौराणिक- ऐतिहासिक आहेत. म्हणून ती लोकांनी पाहूच नये का? ज्या प्रथा, रूढीमूळे आपला समाज ग्रासला होता, त्यांच उच्चाटन करण्यासाठी आगरकर, फूले ,आंबेडकर शाहू महाराज, सावरकर, टिळक, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, साधू-संत, इत्यादींनी केलेल्या प्रबोधनात्मक प्रयत्नांवर आधारित कथा, कादंबर्या, नाटकं, टिव्ही सिरियल्सना समाज चांगला पाठींबा देत आहेच की. प्रत्येक वेळी नकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यात काय हशील? एकदा बोरीवलीत शब्द प्रकाशनातर्फे पुस्तकांच प्रदर्शन भरविले असताना एका युवकाला नाटकांची पुस्तके हवी होती. तो युवक अनओळखीचा असूनही त्याने माझ्याकडे विचारपूस केली होती. ययाती कादबंरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ती तर पौरिणिक विषयावर आधारित आहे. स्वामी ही कादंबरी ऐतिहासिक आहे. त्यात माधरवराव पेशव्याच्या कर्तबगारीच दर्शन असलं तरी स्वतःच्या मातोश्रीं आणि राघोबा दादांना कर्मकांड, पूजा-हवन इत्यादींवर सरकारी खजीनाच्या वापरावर कडक निर्बंध घातले होते हे ही कादंबरीकरांनी मांडलेलं आहे. भाऊबंदकी हा विषयही त्यात मांडलेला आहे. अशा कादंबरीच्या खपाबद्दल बोटं मोडणे म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासावरही टिका करण्यासारखे आहे . ऐतिहासिक कादबंर्या लिहिणारे लेखक हे सुध्दा समाजाचे घटक आहेत, हे ही कोतापल्लेंना खटकते की काय? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास, जनाबाई, चोखोबा, बहीणाबाई, गोरा कुंभार, इत्यादी संत मंडळी ही समाजाची दैवते आहेत. कारण ती ह्या भूमीतली आहेत. म्हणून त्यांच्या जीवनावरील साहित्य समाज वाचत राहणारच. संस्कारः एकम् धनम् न क्षीण जायते| असे संस्कृत वचन आहे. आज संस्कृत भाषा व्यवहारातून बाद झालेली असतानाही सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या विभागाचे असो वा सार्वजनिक उद्योगांची  बोध वाक्ये ही संस्कृत भाषेत आहेत. रामायण, महाभारत हे ग्रंथ हे समाजानेच जीवनग्रंथ मानले आहेत, त्यासंबंधी माझ्यासारखा एक सामान्य वाचक काय बोलू शकतो? ज्यांना साहित्य वा लेखन ह्यासंबंधी खपाचा विचार मांडून बाजाराचं स्वरूप द्यावयासं वाटत असेल तर त्यांना कोण अडविणार?

ऐतिहासिक विषयक साहित्याचा खप वाढतोय, तसाच  साहित्याच्या इतर प्रकारांच्या पुस्तकांचाही खप वाढावा, ह्याबाबत दूमत नाही. कारण विख्यात शास्त्रज्ञ आलबर्ट आईनस्टाईननी म्हटले आहे, Immgination is more important than knowlege. मनातील वेगवेगळ्या कल्पना त्यानी प्रयोगात उतरविल्या असाव्यात. त्यातूनच त्यांना सापेक्षवाद गवसला. हा सिध्दांत मानवी जीवनात व्यापलेला आहे.  त्यामुळे कल्पनाधारीत कथा, वैज्ञानिक कथा, ललीत, भटकंती इत्यादी विषयावरील पुस्तकांचा खप वाढावा, ह्याबाबत दूमत नाही. परंतु समाज इतिहासात रमतोय अशी उथळ वा प्रसिध्दीसाठी टिका करणे प्रशस्त नाही. संमेलनाच्या आजीमाजी अध्यक्षांना जर खरी तळमळ असेल तर त्यांनी स्वतः खांद्यावर जबाबदारी स्विकारून साहित्यक्षेत्राचा चौफेर विकास घडणविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी प्रयत्न केले तर समाज त्यांना साथही देईल आणि खांद्यावर घेऊनही नाचेल. हा, एक गोष्ट मात्र अशी आहे कि समाजासाठी तुम्ही ऐतिहासिक पुरूष व्हाल. कदाचीत तुमच्या पश्चात तुमच्या जीवनावर कांदबंरी लिहतील. आपला समाज हा असा आहे. तो दुर्गूण समजावा का? आपल्या देशात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येता-जाता  पाश्चात्य व साम्यवादी मोजपट्टी घेऊन आपल्या समाजाची वैचारिक उंची मोजण्याचा अट्टहास धरावयास नको.

आपल्या देशात थोर योध्देही होते, तसेच अंहिसावादी नेतेही होते. संत होते, शास्त्रज्ञही होते. गणिती होते, तत्वज्ञही होते. महाभारत, रामायण, संताचे अंभग, इत्यादी साहित्याचे प्रकार नव्हेत का? परकिय आक्रमणे मग ती सामरिक, असो वा वैचारिक, समाजाने आपल्या उपजत शक्तीने त्यावर मात केलेली आहे. इतर देशाच्या संस्कृतीतील, साहित्यातील जे काही चांगले, पचेल ते सारं काही आपला समाज स्विकारत आहे, प्रश्न कदाचीत गतीचा असू शकतो. म्हणून भावनावेगात कोणी साहित्यिक समाजाला वाचनाच्या आवडी-निवडीसंबंधी दोष देत असतील, तर तो त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे किंवा त्यातही राजकारण असावे हेच समजून आपला समाज दुर्लक्ष करेल असे वाटते.

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मोठा आर्थिक घोटाळा - PNB



'पंजाब नॅशनल बॅकमध्ये मोठा आर्थिक घोटाळा' अशी बातमी ऐकल्यानंतर सर्वसामान्यांना धक्का बसला. भ्रष्टाचाराची बातमी आपल्याला ऐकण्याची सवय आहे. परंतू बँकेतील त्यातही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेंत घोटाळा झाल्याची बातमी ऐकली की सामान्य माणूस हादरून जातो. ज्यांच पंजाब नॅशनल बँकेत खातं नाही, त्यांच्या मुखातून "आपलं बाबा, त्या बँकेंत खातं नाही" असेच शब्द उमटले असू शकतात. परंतु ज्यांच खातं आहे, त्यांच्या भावना काय असतील? त्यांची मनःस्थिती कशी असेल, हा विचार मनात आल्यावर लक्षात येते, आपलं ही खातं सरकारी बँकेंतच आहे. उद्या आपल्या बँकेतही असे घडू शकते. घडू शकते? अहो, घडलेलं असेलही. फक्त बाहेर आलेलं नसेल. हा ही विचार झपकन मनात आला.

आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्रात दिवसागणिक बदलत जाणारं तंत्रज्ञान ह्यामूळे अनेक गोष्टी घर बसल्या होऊ लागल्या. तसे चोरी करण्याचे प्रकारही घर बसल्या होऊ लागले. कर्ज घेऊन पोबारा करावयाचा आणि घर फोडून चोरी करणे ह्यात फरक तो काय राहीला? सर्वसामान्यांना पैसे काढण्यासाठी एटीमकडे किंवा बॅकेकडे जावे लागते. जिथे पास बुक अपडेट करणे, वा चेकबूक घेण्यासाठी बॅकेत दोन वेळा जावे लागते, तिथे सर्वसामान्यांना कर्ज सहजरित्या मिळण्याची सोय कशी असू शकेल? कर्ज घ्यावयाचे असले तरी बॅकेत जाऊन कर्ज मिळू शकते का, ह्यासंबधी प्रथम विचारपूस करावी लागते. नंतर अर्ज भरणे, सोबत जामिनदार, उत्पन्नाचा दाखला आणि तारण म्हणून जमीन, घर ,दुकान, दागदागिने इत्यादींची मालकी सोडावयाची आणि मग कर्ज मिळते. जी पध्दत मल्या आणि निरव मोदींना कर्ज देण्यासाठी वापरली तिचा अभ्यास बँकिग ह्या विषयाच्या पदवीच्या अभ्यासक्रमात नसणार. असा काही मोठा आर्थिक घोटाळा झाला, की मग वृत्तपत्रांतून टिव्ही चॅनेल्स, किंवा सोशल मिडीयावर येणार्या पोस्ट्स् मधून कळू लागते. पण घोटाळ्याला जबाबदार कोण? हे कधी कळेल? हे कोण सांगू शकेल? 

न्यूज चॅनेल्स अशा घोटाळ्यासंबंधी चर्चा-सत्र आखतात, त्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू तू मै मै असा खेळ पहावयास मिळतो. त्या खेळातूनही अंदाज बांधता आला असता, जर का सार्या चॅनेल्स वरील चर्चा-सत्र निपक्षपातीपणे आयोजीत केल्या असत्या तर. पण तसे प्रत्यक्षात घडते का? नाही. कारण घोटाळ्यासंबंधीत माहीती गोळा करीत असता, मिडीयावाल्यानांच घोटाळा(मॅनेज) करण्यात कुणीतरी खुणावत असतात किंवा ते ही संधी प्राप्त करीत असतात. असे नसते तर सोशल मिडीयावर अमक्या चॅनेलच्या संपादकांचा तमक्या ठिकाणी पाॅश बंगला आहे, अशा बातम्या आल्या नसत्या. आपल्या ज्ञानात भर होते ती एकाच गोष्टीची. ती म्हणजे बँकेला, उद्योगपतीने कुठे आणि कसे गंडाविले? हे झाले बँक घोटाळ्या संदर्भात. 

सरकारी योजनांच्या अमंलबजावणीमध्ये कसा आर्थिक घोटाळा होतो ह्या संबधीत आपल्याला थोडीफार माहीती आहे. सरकारी योजनाचं काॅन्ट्रॅक्ट ज्यांना दिले जाते, ती मंडळी, नोकरशहा आणि राजकीय नेत्यांशी सलगी करून सरकारी तिजोरीतून एक तर त्या योजनासांठी झालेला खर्च वाढीव दाखवून किंवा ज्या योजना राबवयाच्या आहेत, त्या निकृष्ट दर्जाच्या करून, पैसा लुटतात. हा झाला, भ्रष्टचाराचा दूसरा प्रकार. 

घोटाळा कुठल्याही प्रकारचा असो, नोकरशहा, राजकारणी आणि ज्यांचा आर्थिक फायदा होतो ते उद्योगपती वा काॅन्ट्रक्टर ह्यांच्यात मिलीभगत असल्याशिवाय घडतात का? आर्थिक घोटाळे, हे सर्वसामान्यांच्या खिशातून कराद्वारे गोळा केलेल्या महसूलातूनच होतात. सरकारचा पैसा म्हणजे लोकांचाच. आर्थिक घोटाळे फक्त लोकशाही राज्यप्रणाली मध्येच होतात असे काही नाही. एक पक्षीय राजवट असो, वा लष्करशाही तिथेही असे प्रकार घडत असताच. 'तळे राखी तो पाणी चाखी ' अशी म्हण प्रचलीत आहेच की. पण त्याची वार्ता लोकांपर्यंत जात नाही. लोकशाहीत अशा घटनांची माहिती लोकांपर्यंत जरूर जाते. पण आपण काय करू शकतो? खरं काय, खोटं काय हेच कळत नसते. हो, मतदानातून सरकार बदलता येते. पण नव्या प्रकरातील दरोडे बंद होतील का? सगळ्याच पक्षांकडे वकीलांचा ताफा असतो. त्याचं वागणं, उठणं,चालणं, बोलणं ह्यात फरक नसतोच. बोलण्यात पटाईत,आणि मामला थंड कसा करावयाचा ह्यात ही पटाईत. बहुतांश असे वकील राज्यसभेवर निवडून आलेले असतात. लोकांशी ह्यांचा फारसा संबंध येत नसतो. कारण हे पक्षाचे मॅनेजर असतात. कसे काय कोणास ठाऊक? कदाचीत काॅर्पोरेट जगत हे त्यांचे क्लाएंट्स असतात म्हणून. 

निरव मोदी वा चौक्सी ह्याच्या कंपनींची खाते पंजाब नॅशनल बँकेत आणि पैसे काढले किंवा कर्ज म्हणून पैसे मिळाले दुसर्याच बँकांतून. केवळ लेटर ऑफ अंडरटेकींग वरून. अशी कर्जे म्हणजे खात्यात पैसे नसतानाही पैसे मिळण्याची सोय. किती वर्षापासून? साधारणतः २०११ पासून. प्रश्न येतो, तो म्हणजे सरकार कुठल्या पक्षाचं होतं? ह्याचाच अर्थ लोकांचे सरकार नसतेच की. मग लोकाचं काय असते? फक्त कष्ट आणि कमाविलेली मिळकत. सरकारकडे जमा केलेला कर हि सरकारचा. कर आणि कर्ज ह्याची फेड नाही केली तर, तुमची मिळकत, संपत्ती ही सरकारची. उद्योगपती, ज्यांनी कर्जे वाम मार्गाने घेतली, माया जमविली अशी मंडळी, 'कर नाही,त्याला डर नाही' अशा अहिर्भवात वावरताना दिसतात. 

आता शोध सुरू होईल. चौकशी किती वर्षपर्यंत चालेल? अंदाज वर्तीता येत नाही. गुन्हेगारांना शिक्षा मिळेल का आणि कधी? देव जाणो. रिझर्व बँक आॅफ इंडीया ही बँकिंग व्यवहारावर लक्ष ठेवणारी यंत्रणा. २०११ समयी अनेकांकडून कौतुकास प्राप्त झालेले रघुराम राजन हे गव्हर्नर होते. हुषार, प्रामाणिक असे गौरविलेले. मग त्यांनी काय केलं? कि हे सुध्दा पध्दतशीर रित्या मिडीयाच्या साह्याने गौरविलेले? ज्या पक्षांनी त्यांना रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदी बसविले, ते सारे पक्ष तसेच त्यांचे नेतेही भ्रष्टाचारामूळे पराभूत झाले. केंद्रात भाजपाचे सरकार आले. रघुराम राजन ह्यांची गव्हर्नर पदाची मुदत संपली. दुसरी टर्म मिळाली नाही. नंतर हे महाशय पुन्हा शिखागो येथील काॅलेजात प्रोफेसर म्हणून शिकावावयास गेले. भारतात प्रोफेसर म्हणून नोकरी देणारी महाविद्यालयें नाहीत का? आहेत की. पण लठ्ठ पगार देणारी नाहीत. हे देशभक्त. रिझर्व बँकेत पुन्हा गव्हर्नर पद मिळाले असते तर हे महाशय थांबले असते का? सांगता येत नाही. कारण संशयाची सुई त्यांच्या दिशेने जाऊ लागली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यासंबंधी काही प्रतिक्रीया त्यांना द्यावयाची गरज भासत नाही. एरवी अर्थसंकल्पांवर टिका करण्यासाठी ह्यांची घाई असते. सरकारने लोकानुयायचं, सवलती देण्याचा अर्थसंकल्प सादर केला की हे महाशय लोकांना(म्हणजे मध्यम वर्गीयांना) आवडेल अशी टिका अर्थसंकल्पावर करणार. ज्यांना प्रामाणिक म्हटलं जात आहे, तेच नोकरशहा ठग निघाले तर ----. बरं, मग आता नवीन आलेले गव्हर्नर, त्यांनी काय केलं? त्यांना कसा सुगावा लागला नाही, इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळयाचा? मग अशा प्रकारच्या आर्थिक घोटाळ्याला व्यवस्था जबाबदार असेच समजावयाचे का? मुळात जिथे अव्यवस्थेलाच व्यवस्था असे नाव पडले आहे तिथे सुरळीत आणि स्वच्छ व्यवहाराची अपेक्षा कशी काय ठेवावी? बॅकांचे राष्ट्रीयकरण झाले. काही फायदा झाला. पण काळ बदलला, हे ध्यानात घ्यावयास हवे होते ना? मोदीजी म्हणतात "Minimium Governance" मग राष्ट्रीयकृत बॅकां कशाला हव्यात? सहकारी बॅकां कशाला हव्यात? राजकीय नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या सोयीसाठी ठेवावयाच्या का? सहकार क्षेत्रात तर, 'एकमेकां सहाय्य करू ' एवढ्याच अर्थाने. अर्थ म्हणजे पैसा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बॅकांचं राष्ट्रीयकरण केलं. पाठोपाठ स्टेट बॅकेंत घोटाळा झाला. कोण्या नगरवाला अधिकाराचा संशयास्पद रित्या मृत्यु झाला. संशयाची सुई इंदिरा गांधींच्या दिशेने गेली होती असे ऐकावयास मिळाले होते. अनेक सरकारी बँकेंत घोटाळे झालेले असू शकतात. फक्त उघड झाले नाहीत एवढेच. बँकांचे NPA वाढत जात आहेत हे काय दर्शवित आहे?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्याच्या सरकारने नीरव मोदी आणि चोक्सी ह्यांच्यावर मेहरबानी केल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक संघवीचाही सहभाग ह्या घोटाळ्यात आहे असे वृत्त आहे. इतरही नेतेमंडळींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. इतका मोठा भ्रष्टाचार राजकारणातील मोठ्या नेत्यांच्या सहभाग असल्या शिवाय घडणार नाही. Special feature of big scam in India is that it goes vertically and horizontally too, involving more and more politicians and bureaucrats. पण पुष्कळदा मोठ्या नेत्यांऐवजी छोटे नेते किंवा नोकरशहा अडकतात किंवा अडकवले जातात. कालातंराने ज्यांच नशीब थोर ते सही सलामत सुटतात. 

भ्रष्टाचार उघडकीस होण्यात उशीर का होतो, भ्रष्टाचार करणारे विजय मल्या आणि नीरव मोदी अशा मंडळींनी देश सोडून पलायन कसे केले? ह्या दोन्ही प्रश्नावर भाजपा आणि काँग्रेसमध्ये निकाराची लढाई सुरू आहे. दुसरी काही घटना घडली की मग ह्या विषयासंबंधीची चर्चा बंद होणार हे ही पहावयास मिळणार. क्रिकेट खेळात विक्रम असतात ते मोडण्यासाठी. आणि मोडले जात आहेत ते आपण पाहतो. पंजाब नॅशनल बँकेतला हा घोटाळा आतापर्यंत सर्वात मोठा असे मानले जाते. पुढे कधी तरी ह्याहूनही मोठा. नंतर महाघोटाळा. असेच चालू राहणार का? किती रकमेचा महाघोटाळा? अंकगणितात मोजता येईल का? नाही. 

बर्टाड रसेलांचे उद्गार आठवतात, "माणसाचा मूलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही". महात्मा गांधीजींनी म्हटले आहे, "When u do not have what you like, you should love what you have". आपल्याकडे जे आहे त्यातून सचोटी आणि चिकाटीने स्वर्ग निर्माण करा'. पंडीत दिनदयाळ उपाध्याय म्हणत असत, "पैशाचा अभाव नसावा पण प्रभावही नसावा". शेवटी नैतिकता शिल्लक राहावयास हवी ना. असे म्हटले जाते की If you lose money nothing is lost, If you lose health some thing is lost and if you lose character everything is lost. म्हणूनच कोण्या अर्थशास्त्रज्ञाचे बोल आठवतात , The progress of the nation is far less depend upon form of it's institution rather than charcter of it's own men. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथे कुठल्या प्रकारची राजवट आहे, ह्या पेक्षा तेथील नागरिकांच्या शील वरच अधिक अवलंबून असते. आपल्या देशाला प्राचीन काळापासून चागंल्या संस्काराची पंरपंरा आहे. नैतिकतेचे धडे देणार्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होऊन गेली. त्यांनी आपआपल्या विपूल,विविधांगी साहित्य-कृतींतून, त्यांच्या जीवन चरीत्रातून अशी शिकवण दिली आहे कि कोणाच्याही हृदयात मुर्तीमंत पावित्र्य साकार व्हावे. पण ते साहित्य आपण शोकेसमध्येच ठेवले आहे. काॅलेजमध्ये अर्थशास्त्रात शिकलो आहे, A country is poor because it is poor. त्याच न्यायाने दुर्दैवाने म्हणावं लागेल, A country is corrupt because it is corrupt.

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः|



अलिकडे WhatsApp वर एक पोस्ट आली. ती अशी आहे, Life is very similar to a Boxing Ring. Defeat is not declared when you fall down. It is declared when you refuse to rise up. ही पोस्ट वाचल्यानंतर मी एलआयसीत काम करीत असतानाचा एक प्रसंग आठवला. एका रविवारी सकाळी मी आयुर्विमा व्यवसायानिमित्त जोगेश्वरी पश्चिम येथील बेहरामबाग भागात गेलो होतो. माझा एजंट त्याच भागात राहात होता. तेथील काम आटोपून मी जोगेश्वरी स्टेशनला बोरीवलीकडे येणार्या गाडीसाठी वाट पाहात होतो. गाडीला उशीर झाला होता. इतक्यात रेल्वेची अनौन्समेंट झाली. 'बारह बजकर दस मिनिटकी बोरीवली तरफ जानेवाली गाडी आज फ्लॅटफार्म क्रमांक एक के बजह फ्लॅटफार्म क्रमांक तीनपर आ रही है!'. अनौन्समेट 'गाडी आयेगी' अशी नव्हती तर 'गाडी आ रही है ' असा त्यामध्ये उल्लेख होता. विशेषतः मुबंईकरांना लोकलमध्ये प्रवास करीत असताना असा अनुभव येणे हे नित्याचे झाले आहे . धावपळीतच मी एकेक पायरी सोडूनच जीना चढलो आणि फ्लॅटफार्म क्रमांक तीनकडे उतरणार्या जीन्यातून सावधानेतेने उतरून कसाबसा एकदाचा गाडीत चढलो. गाडीत बसल्यानंतर माझं विचारचक्र सुरू झालं. फ्लॅटफार्म क्रमांक एकवरून जीना चढलो असं म्हणण्यापेक्षा अक्षरशः धावलो. परंतु फ्लॅटफार्म क्रमांक तीनसाठी उतरतेवेळी मी जिन्याच्या प्रत्येक पायरीवर पाय ठेवीत होतो. असे का? साधारणतः सारे प्रवासी जीन्यावरून उतरताना अशीच सावधगिरी बाळगत असतात. बस लक्षात आलं एक सत्य. मनुष्य खाली उतरताना सावधगिरी बाळगत असतो. घसरणे,पडणे म्हणजे अवनिती. अवनिती कुणालाही प्रिय नसते. मनुष्याच्या अंगी उन्नतीची आस जन्मतः विराजित असते. हेच ते सत्य. 

विकासाची इच्छा मानवाव्यतिरिक्त कोणताही दुसरा प्राणी करू शकत नाही. आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे आणि ती मिळविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. Growth is the evidence of life. वाढ मग ती शारिरीक असो वा बौध्दीक, आर्थिक असो वा अध्यात्मिक हेच जीवंतपणाचं खरं लक्षण आहे. पृथ्वीच्या पोटात अनेक खनिजं, मौल्यवान रत्ने दडलेली असतात. जो शोधेल त्याला गवसतील. आदिशक्तीने आपल्या अंगी सृशनशिलता, सहनशिलता,उद्योमशिलता, नाविन्यता, शौर्य, धैर्य , इच्छाशक्ती, विविध कला, इत्यादी अनंत क्षमतेचे डबे भरून ठेवले आहेत. आळस, भिती, शंका-कुशंका, न्युनगंड अधंश्रध्दामुळे आपण ते उघडून बघत नसतो. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते डबे उघडून बघणे आवश्यक असते. आर्य चाणक्यने म्हटले आहे 'अयोग्यः पुरुषः नास्ति|' प्रत्येक व्यक्तीत कुठलीतरी क्षमता असेतच. अयोग्य वा बिनकामाचा असा माणूस नसतोच.  आर्य चाणक्यांना स्वतःला काही उपभोगायचं नव्हतं; शारिरीक क्षमता, साधनेही मर्यादित; परंतु यवनांच्या आक्रमणांमुळे आणि अत्याचारांमुळे क्षुब्ध झालेले अंतःकरण होते; कर्तव्यविमुख, विलासी आणि उद्दंड नंदराजाचे वेडेचार पाहून कार्योद्यत झालेली बुध्दी होती; दृढनिश्चय होता;  त्यातूनच त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला घडविले, आणि स्वतः हाती शस्त्र न घेता मायभूमीवरील, देशबांधवांवरील अन्यायाचे निराकरण केले.

दैनंदिन जीवनात अनेक उदाहरणे आपल्याला काय दर्शवित असतात? कुस्ती असो वा कबड्डी ह्या खेळात आव्हान देते वेळी प्रतिस्पर्धी काय म्हणत असतात 'दम आहे का तुमच्यात?'. पूर्ण शक्तीने चढाई आणि पकड म्हणजेच ह्या दोन्ही खेळातील यश. शिकारी जेव्हा शिकारीला जातो आणि योग्य स्थान पाहून बंदूक रोखून बसतो, तेव्हा त्याला दमाचाच अवलंब करावा लागतो. तो त्या वेळी खाणेपिणे, हसणे, बोलणे सारे काही विसरतो. शरीरातील सारी शक्ती त्याने आपल्या डोळ्यात एकवटलेली असते. एक डोळा मिटून, दृष्टी, बंदुकीच्या नळीचे टोक आणि शिकार यांचे ऐक्य साधले रे साधले की, क्षणमात्र तो श्वास रोखून धरतो आणि गोळी मारतो. अचूक नेम लागून शिकार साधते. प्रचंड शक्ती असलेला हिंस्त्र पशू निमिषार्धात धरणीवर लोळू लागतो. पाण्यापासून वीज निर्माण करावयाची असल्यास त्या पाण्याला वर न्यावे लागतेच. सभेमधील भाषण असो वा घोषणा असो आपल्याला आवाज वरच्या पातळीवर न्यावाच लागतो. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायाचं असेल तर आपल्या आंतरिक शक्तीला उच्चतम श्रेणीत न्यावे लागते तरच आपल्याला इच्छीत कार्यात यश मिळते. प्राणशक्ती, प्रतिकारशक्ती, धैर्य इत्यादी वाढविण्यासाठी प्राणायमच आवश्यक असतो. 

पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सुर्याभोवती फिरते. त्यामूळे दिवस -रात्र असे चक्र सुरू झाले. भले हे सत्य असले, तरीही सूर्य उगवतो आणि मावळतो असाच अर्थ जगभरातल्या प्रत्येक भाषेत रूढ झालेला दिसतो. ह्याचं कारण जगभरातील सार्याच तत्ववेत्त्यांनी, संतमहंतानी प्रगती म्हणजे वर चढत जाणे rising up तर अधोगती म्हणजे downfall असेच मानले आहे. "Sunset at one place is always Sunrise at another place and at the same place too after twelve hours. संकटे येतात, ती आपली कसोटी पाहात असतात. पुष्कळदा आपला व्यवसाय, उद्योग, संशोधन वा नोकरीतील बढती असो ह्यातील यशासाठी करावे लागणारे कष्ट , ज्ञान, संपर्क आणि क्षमतामध्ये वृद्धी करण्यासाठी 'Sky is the limit ' असेच मॅनेजमेंट वा मार्केटिंग गुरू सांगत असतात. त्यामागील हेतू हाच कि आपल्यामध्ये आकाश नावाचं पंचमहाभूताचा अंश जन्मतः असतो, त्याचे विस्मरण होऊ नये. There is no limit to our ability and efficiency. Excellence is always a moving target. म्हणूनच वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे कि Defeat is not declared when u fall down .It is declared when u refuse to rise up.

एक साधा भोळा लाकूडतोड्या होता. लाकडे तोडून झाली की तो त्या रानातील साधूची सेवा करायचा आणि मग घरी जात असे. एकदा तो साधूमहाराजांना म्हणाला, "महाराज माझी स्थिती फार वाईट आहे. जेमतेम पोटापुरता मिळते. फाटके कपडे घालतो; मोडक्या झोपडीत राहतो. आपण काही कृपा करा आणि मला चांगले दिवस येतील असा आशिर्वाद द्या". साधू म्हणाला पुढे जा, म्हणजे तुला चांगले दिवस येतील. दुसर्या दिवशी तो नेहमीच्या लाकूड तोडण्याच्या जागी न थांबता पुढे गेला तेव्हा त्याला खैराची आणि शिसवाची लाकडे मिळाली. त्याला नित्यापेक्षा अधिक पैसे मिळाली. मग तो रोज तेथून लाकडे आणू लागला. तो आता श्रीमंत झाला. एकाएकी त्याला आठवण झाली कि साधूने पुढे जा असे म्हटले होते. मग तो पुढे गेला तेव्हा त्याला सागाचे लाकडे मिळू लागली. आता तो लखपती झाला. पण थांबला नाही. साधूचे म्हणणे आठवले पुढे जा. बस तो आता पुढे जाऊ लागला. तिथे चंदनाचे जगंल लागलं. चदंनाची लाकडे विकून तो करोडपती झाला. तरी तो थांबला नाही. ' पुढे जा ' हे साधू महाराजाचे बोल आठवले. तो आणखिन पुढे गेला तर त्याला क्रमाक्रमाने चांदीच्या, सोन्याच्या, आणि रत्नाच्या खाणी सापडल्या. तो सर्वात धनवान म्हणून प्रसिध्दीस पावला. 

वरील कथा आणि पोस्टचा अर्थ हाच कि विधाता आपल्याला पराभूत कधी घोषीत करतो, जेव्हा आपण थोडसं अपयश आल्यावर प्रयत्न सोडून देतो तेव्हाच. जीवन हे बाॅक्सींग रिंग सारखेच आहे. दुसर्या महायुध्दात बेचीराख झालेले जर्मनी आणि जपान देश पुन्हा उठून जोमाने काम करीत प्रगत राष्ट्रात पुन्हा स्थान मिळविते झाले हे आपण पहातच आहोत. इजरायल एक छोटासा देश. पण सामरिक तसेच तंत्रज्ञानात आज अग्रणी देशात स्थान मिळवून आहे. पोखरणच्या अणूचाचणीनंतर जगातील अनेक देशांनी आपल्या देशावर आर्थिक, आयात-निर्यातसंबंधीची बंधने लादली, तरीही आपल्या देशाची प्रगती अडली नाही. 
आल्या जरी कष्टदशा अपार 
न सोडती धीर तथापी थोर | 
केले जरी पोत बळेंची खाली
ज्वाळा तरी ते वरती उफळी|| 
ह्या नियमानुसार,आलेल्या संकटांना जे दुप्पट आवेशाने तोंड देतात, ते यशस्वी होतात. अपयश, पराभव ह्या गोष्टी तात्पुरत्या असतात. पराभवाने खचून जाणे हाच मोठा पराभव असतो. थांबला तो संपला. स्वामी विवेकानंद म्हणत असत, 'नैराश्य म्हणजे मृत्यु, उत्साह म्हणजे जीवन'.

असे वाचनात आले आहे की इंगंल्डचा एक राजा होता. त्याच्या राज्यावर एका पर प्रान्तातील राजाने अकस्मात रित्या आक्रमण केले. इंग्लडच्या राजाचा सपशेल पराभव झाला. तो आपला जीव मुठीत धरून एका गुहेत लपला. अत्यंत निराश अवस्थेत तो तिथे बसला असता, त्या गुहेत एक कोळी आपलं जाळं विणत होता, त्यावर त्याचे लक्ष गेलं. हे करीत असता तो कोळी पुन्हा पुन्हा वर चढण्याचा प्रयत्न करीत होता आणि पुन्हा पुन्हा खाली पडत होता. असे वारंवार घडत होते. इंग्लडचा तो पराभूत राजा टक लावून त्या कोळ्याकडे पाहात होता. त्या कोळ्याने चिकाटी सोडली नाही. शेवटी तो यशस्वी झाला. यत्कचिंत तो कोळी इतक्या वेळा खाली पडत होता तरीही शेवटी यशस्वी झाल्याचं पाहून त्या राजाला स्पुर्ती आली. गुहेतून बाहेर आला, पुन्हा आपल्या सैनिकांना गोळा केलं आणि शेवटी सारी शक्तीपणाला लावून आपलं गमाविलेलं राज्य परत मिळविण्यात यशस्वी झाला. चराते चरति भाग्यः| जो चालत राहतो त्याच्या गळ्यात सदैव भाग्यश्री वा यशश्री माळ घालीत असते. हे त्रिकालातीत सत्य आहे. 

रणागंणात हात-पाय गळून पडलेल्या अर्जुनाला भगवंत टोमणा मारतात, 'क्लैब्यं मा स्म गमः पार्थ'! अरे, अर्जुना काय हा लाजिरवाणा प्रकार, नामर्दपणाची कास धरली आहेस? भगवंत पुढे सागंतात, 'ठार झालास तर स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील'. शेवटी मात्र अधिकारवाणीनेच म्हणतात, 
'तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चयः| 'अर्जुना उठ, युध्दास तयार हो. जीवन जगत असताना अनेक आघाड्यावर आपलाही संघर्ष वा युध्द चालू असते. पुष्कळदा निर्णय घेताना मानसिक गोंधळही  होत असतोच. त्या अर्थाने आपण सारे क्षत्रियच आणि अर्जूनच. Life is challenge ,accept it. आपल्यामधली क्षात्र तेज जे सुप्त अवस्थेत गेलेलं असते, ते वारंवार मनाच्या पृष्ठभागावर आणण्याचा प्रयत्न करीत राहणे हाच खरा धर्म. व्यक्ती असो वा समाज किंवा देश, जो आव्हान स्विकारील, तोच विकास करीत जाईल, त्याचीच प्रगती होईल. स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे "Arise, Awake and stop not till the goal is achived ".

रविवार, २१ जानेवारी, २०१८

भारत-इजरायल संबंधाचं नव पर्व



गुरवार दिनांक १८ जानेवारीच्या मटामधील "नवा अध्याय " ह्या शिर्षकाचा अग्रलेख आणि त्याच्या शेजारी 'विचार' ह्या सदरात जेष्ठ पत्रकार व आतंरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक श्री अभय सांळूखे ह्यांचा "भारत-इजरायल संबंधाचे वास्तव" ह्या शिर्षकाचा लेख वाचला. दोन्ही लेख अभ्यासपूर्ण वाटले. दोन्ही लेख परिपूर्ण वाटले. अग्रलेख अधिक वास्तववादी वाटला. वृत्तपत्रातील एकाच विषयांवर दोन मान्यवरांचे सुदंर लेख एकाच वेळी आतापर्यंत माझ्या वाचनात आलेले नाहीत. म्हणून प्रथम मटाचे संपादक आणि श्री अभय सांळूखेंचे अभिनंदन करतो तसेच आभार ही मानतो. 

भारत-इजरायल देशामधील आतापर्यंतच्या नातेसंबंधातील समज-गैरसमज,आपल्या देशाची अपरिहार्यता, इजरायलची अपरिहार्यता, जागतिक राजकीय पटलावरचे चित्र, इत्यादी  विषय केंद्रस्थानी ठेवून ह्या लेखाची मांडणी करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. इजरायलशी आपल्या देशाच्या संबंधाबाबतीत फार मोकळेपणा येण्यास आपण उशीर लावला असे मला सतत वाटत आले आहे. त्यातूनच हा लेख आकारास आला आहे. 

इजरायल ह्या देशाभोवती नवलाई, तितकीच तिरस्काराची भावना आपल्या देशात आहे. तशी जगातल्या इतर देशातही आहे. वस्तूतः इजरायल देशासंबंधी जी नवलाई वाटते, तिला जागतिक राजकीय पटलावर गुढता ही संबोधली जाते. इजरायल एक छोटसं राष्ट्र. भले सांस्कृतिक दृष्ट्या प्राचीन पण आधूनिक जगाच्या नकाशावर अलिकडचे. असे असूनही कृषी, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वाहतूक आर्थिक, औद्योगिक, माहिती-तंत्रज्ञान आदि क्षेत्रात झपाट्याने विलक्षण प्रगती करणारा हा देश. सामरिक रित्या सामर्थ्यशाली देश म्हणून अग्रणी देशामध्ये गणला जाणारा देश. सामरिक दृष्ट्या अंत्यत आक्रमक देश. म्हणून ह्या देशाभोवती गुढतेचं वलय. 


एके काळी अविकसित देशांची, म्हणजे तिसर्या जगतातील देशांच नेतृत्व करून जागतिक शांततेतूनच जगाचा विकास होऊ शकतो, ह्या जीवनमूल्याधारीत तटस्थ देशाची आघाडी उभी करणार्या आपल्या देशाचे इजरायल देशाशी शत्रुत्व नसले तरी मैत्रीत सावधनता होती हे मान्य करावे लागते. शीतयुध्द काळापासून आजतागायत अमेरिका, सतत पाकिस्तान आणि इजरायल ह्या देशांचा मोठा पाठीराखा म्हणूनच ओळखला जातो. रशिया आपला पाठीराखा तसेच अनेक अरेबीयन समूहातील देशांशी आपल्या देशाशी असलेली मैत्री आणि त्या देशांतून आपली इंधनासंबंधातील पुरी होणारी गरज, ह्या कारणास्तव इजरायल देशाशी आपल्या देशाच्या मैत्रीत सावधानता असणे स्वाभाविक वा अपरिहार्य होते असे मी मानतो.

अमेरिका-रशिया मधील शीतयुध्द संपलं. त्यानंतरही इजरायलशी असलेल्या मैत्रीतील सावधनतेचं धोरण वाजवीपेक्षा अधिक काळ राहीलं असेच मला वाटतं. त्यामागील पहीलं कारण म्हणजे केंद्रात असलेली आघाडी सरकारे आणि त्यातही बराच काळ काॅग्रेस-आघाडीचेच सरकार. इजरायलशी सलगी म्हणजे मुस्लीम बांधवांची मते गमाविण्याचा धोका ह्या भावनेनं आपल्या देशातील डावे, काॅग्रेस आणि मित्र पक्ष सतत ग्रासलेले असतात. त्यामुळे जग बदलत आहे, जागतिक पटलावर समिकरणे बदलत आहेत, ही बाब नजरेआड झाली. भाजपेतर पक्षांना भारत नव्या दमाचा होत आहे हे ही दिसले नाही. ह्याचं कारण स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश सरकारची 'फोडा आणि झोडा' ही नीती. तीच स्वातंत्र्यानंतर काँग्रेस व मित्र पक्षांनी चालू ठेवली वा त्यांच्या अंगवळणी पडली. दुसर्या महायुध्दात हिटलरशाहीचा पराभव झाला असाच अर्थ आपण आपल्या रक्तात भिनविला. ब्रिटीशानीं त्यांच्या राजवटीतील काळात भारतियांवर जणू काही अत्याचार केलेच नव्हते अशा थाटात हिटलरची टींगल उडविण्याची सवय आपण लावून घेतली. त्यामुळे आपल्यावर राज्य करणार्या ब्रिटीशांनी स्वातंत्र्य देताना आपल्या देशाची फाळणी करावयास भाग पाडले ह्याचा ही आपल्याला लागलीच विसर पडला. दुसर्या महायुध्दामूळे ब्रिटीशांच जगभरचं साम्राज्य थोड्या अवधीतच कोसळलं ह्या आनंदांचा उपभोग घेणेही आपल्याला embarassing वाटलं असावं अशीच देहबोली काँग्रेस नेत्यांची दिसली. महात्मा गांधीजींना अर्ध नंगा म्हणून हिणवारे तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चर्चील आणि रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलीन हे काही शांतीचे दूत नव्हते? ह्या बाबी आपण आपल्या देशान्तर्गत राजकीय फायद्यासाठी दुर्लक्षित केल्या. दुसर्या महायुध्दात ब्रिटीशांचं साम्राज्य कोसळले परंतू नवीन साम्राज्यवादी देश दुसरे महायुध्द चालू असतानाच निर्माण झाले होते. म्हणून जर्मनीची फाळणी झाली. हे ही आपल्या ध्यानांत कसे आले नाही? जग शांतीमय व्हावं ही भावना चांगली आणि साम्राज्यवादाची लालसा आपल्यात नाही, हे ही कौतुकास्पद. परंतू त्यासाठी सामरिकरित्या आक्रमक आणि स्वरक्षणार्थ सामर्थ्यशाली होण्यासाठीही आपण उशीर का लावावा? नेहरूवीन परराष्ट्रीय आणि संरक्षण धोरणात त्रुटी होती हे आपल्यातील अनेकांनी मान्य केलं नाही आणि आजही करीत नाहीत, भले आपण सामरिकरित्या सक्षम होत असलो तरी. ह्याच मनोवृत्तीचा पगडा आजही भारत- इजरायल नात्यातील धोरणासंबंधीच्या अभ्यासकांवर तसेच विरोधी पक्षीय नेत्यांवर दिसून येतो. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर आपल्या देशाची प्रतिमा आत्मसन्मानाने भारावलेला देश अशी झाली, असे आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील राजकीय अभ्यासक, तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांनीही म्हटले आहे. एक जागतिक नेता म्हणून आपल्या पंतप्रधानांची छाप जागतिक पटलावर उमटली आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु ती मान्य करावयास काही विरोधी पक्षांना आणि आपल्याच देशातील राजकिय अभ्यासकांना फार कष्ट पडतात. देशांतर्गत सत्ताकरणाच्या राजकिय खेळी वा चालींचा देशाच्या परराष्ट्रीय धोरणात प्रतिबिंब उमटणे हे चूकीचे तितकेच धोक्याचे आहे, असे मला वाटते.

स्वातंत्र्यापासून आपल्या परराष्ट्रीय धोरणात सदैव सर्व पक्षांची एकवाक्यता दिसत आली आहे. स्वातंत्र्यानंतर बहूतांश काळ काँग्रेस सत्तेवर राहिली. त्यामूळे जे काही परराष्ट्रीय धोरण आखले गेले ते काँग्रेसचेच होते. म्हणून जी काही सहमती, एकता राजकीय पक्षात परराष्ट्रीय धोरणांसंबंधी राहीली त्याचं श्रेय सार्या विरोधी पक्षांकडे जाते आणि विशेषकरून भाजपाकडे जाते. ह्याचं कारण एकमेव हिंदूत्ववादी पक्ष भाजपाच होता आणि राहणार. परंतू भाजपाला ह्या बाबतीतलं श्रेय देण्यासाठी भाजपेतर पक्षांनी मनाचा मोठेपणा कधी दाखविला नाही. उलट जे काही परराष्ट्रीय धोरण मोदीजी राबवत आहेत, त्यासंबंधीचं विडंबन करीत विडीओ प्रसारीत करण्याच्या कामात काँग्रेस गर्क आहे. काही अपवादत्मक पत्रकार, संपादक मंडळी आणि परराष्ट्रीय धोरणांसंबंधीचे अभ्यासक सोडता काँग्रेसच्या कृत्याचा निषेध मिडीया करीत नाही, हे काही प्रगल्भतेचं लक्षण नाही. पंतप्रधान मोदीजींनी एक हाती सत्ता मिळविली ह्याच शल्य विरोधी पक्ष तसेच विरोधी पक्षांचे मिडीयातील आप्त मंडळीच्या मनात असले तरी त्याच रूपातंर इतक्या थराच्या द्वेषात होणे हे उचीत नाही. 

परराष्ट्रीय धोरणासंबंधीचे काही जाणकार Prime Minister Modi means Business असे कौतुकाचे उद्गार काढीत आहेत आणि ते रास्त आहेत. आज काही देशामध्ये विनाशकारी शस्त्रांची स्पर्धा दिसत असली, तरी आर्थिक लढाई सर्वत्र दिसत आहे. जो देश आर्थिक रित्या सबळ राहणार तो देशच महासत्ता बनणार हे ओघाने आलेच. कारण शस्त्र निर्मिती आणि त्याचा व्यापार हे ही एक अर्थकरणच की. म्हणून शस्त्र निर्मिती साठीचं ज्ञान, तंत्रज्ञान विकसित करण्यात इजरायल देशाचे सहकार्य हे आपल्या देशासाठी निश्चीतच फायद्याचे आहे. आपल्या येथील काही राजकिय अभ्यासक आणि विरोधी पक्षाचे काही नेतेमंडळी इजरायलला दशहतवादी देश मानतात. ह्याचं कारण विरोधी पक्षातील विशेषतः काँग्रेस आणि साम्यवादी मंडळींना चीन आणि रशिया देशाकडें पाहूनच आपलं परराष्ट्रीय धोरण आखलेल्या चौकटीची सवय अंगवळणी पडलेली आहे, हेच होय. इजरायला सामरिक शक्ती वाढविण्यासाठी आधूनिक विज्ञानाच्या अद्यायवत तंत्राचा वापर करावा लागला, ही त्या देशाची अपरिहार्यता होती आणि आहे. ह्याचं कारण चहूबाजूनी शत्रू देशाच्या सीमा आहेत,आणि असे शत्रू ज्यांच्या देशात विभिन्न नावे असलेल्या दशहतवाद्यांचा सुळसुळाट आहे. तसे पाहिले तर चीन दशहतवादी आणि साम्राज्यवादी नाही का? आपल्या देशाशी कुरापती काढतो तरी आपला त्याच्याशी व्यापार सुरू आहे ना. म्हणून व्यवहारीक दृष्टीने जितक्या जास्त देशाशी आपले परस्पर व्यापार, औद्योगिक, सामरिक, कृषी, तंत्रज्ञान , मुलभूत सोयी सुविधा, आरोग्य, सांस्कृतिक, संरक्षण क्षेत्रातील संबंधात सहकार्य राहील तितकी आपल्या देशाची आर्थिक प्रगती आणि संरक्षण सज्जता वाढीस लागेल. भले इजरायल छोटं राष्ट्र असले तरी जगातील बड्या राष्ट्रानांही त्या देशावर वाकडी नजर टाकण्यास भय वाटते. म्हणून इजरायल देशाच्या पंतप्रधानाची भारत भेट ही अमेरिकन राष्ट्राच्या अध्यक्षाच्या भेटीहून कमी महत्वाची ठरत नाही. चहूबाजूनी शत्रु देशानी वेढलेल्या इजरायलची प्रगती दोन परस्पर विरोधी असे त्रिकालातीत सिध्दांताचं फलीत आहे. त्यातील पहीला आहे  ' Strongest man in the world is he who stands most alone'. आणि दुसरा 'Path of co-operation is so narrow that man and society can not walk is unless they become one'. हे दोन्ही सिध्दांत व्यक्तीच्या जीवनासंबंधीतील वाटचालीचे दिशादर्शक असले तरी ते समाज, देश, आणि आतंरराष्ट्रीय कम्युनिटीला लागू आहेत असंच आजच्या जागतिक पटलावरील स्थिती पाहता वाटते. जो देश ह्या दोन्ही सिध्दांतांच मिश्रण करून आचरणात आणेल तो देश प्रगती करेल. मोदी सरकारची वाटचाल त्या दिशेनेच होत आहे. भारत-चीन सीमेवरील डोकलाम ह्या स्ट्रॅटेजीक भागात चीनची कुरापत आणि अरेरावी सुरू असताना पंतप्रधान मोदींनी सामरिक दृष्ट्या आक्रमक अशा इजरायल देशाची भेट घेऊन चीनला गोंधळात टाकलेच त्याचबरोबर डोकलाम येथील चीनची कुरापत अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय विषय बनवून अमेरिका तसेच रशिया सारख्या बड्या देशांनाही चकविले. इजरायलच्या पंतप्रधानांची ही भारत भेट,  जागतिक पातळीवर बदलती समीकरणे पाहता यथोचितच आहे.

इजरायल देशात पाण्याचं दुर्भिक्षं. वस्तूतः वाळवंटी प्रदेशच तो. तरी त्यावर मात करून देशातल्या सर्व भागावर हिरवळ फूलविली. कृषी क्षेत्रातील त्याची प्रगती ही जगातल्या सार्या देशांना पथदर्शक ठरणारी आहे, असे त्या देशाला भेट देऊन आलेल्या आपल्या देशातील नेतेमंडळी तसेच कृषी तज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. आपल्या देशात वारंवार येणार दुष्काळाचं तसेच अवेळी येणार्या गारपीटाचं संकट ह्यामूळे आपल्या अर्थव्यवस्थेचं कबंरड मोडतंय हे आपण हताश होऊन पाहतो. इजरायलच्या पाणी बचाव, पाण्याचं नियोजन आणि पुनर्वापर इत्यादी तंत्रज्ञानाची आपल्या देशाला नितांत गरज होती. ती पुरी होण्याची आशा धरायला हरकत नाही. इजरायलच्या पंतप्रधानांच्या मुबंईतील भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी मराठवाडा वाॅटर ग्रीन्ड प्रोजेक्टचा करार करून घेतला ह्याबद्दल मुख्यमंत्र्याच्या दुरदृष्टीचे कौतुक करायलाच हवे. इजरायलच्या पंतप्रधानांच्या ह्या भारत भेटीत जे काही द्विपक्षीय करार झाले आणि होऊ घातले आहेत, त्यावर नजर फिरविली कि लक्षात येईल, भले उशीरा का होईना, आपण इजरायल देशाशी उघडरित्या मैत्रीचं पर्व सुरू करण्याचं धाडस आणि शहाणपण दाखविलं आहे. ह्या पर्वाचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे. परंतु झोपेचं सोंग घेतलेल्या काँग्रेस आणि साम्यवाद्यांना उठविता कसे येणार? राहूल गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस साम्यवाद्यांच्या, माओवाद्यांच्या हातातील बटीक होणार असेल तर काँग्रेसला सुगीचे दिवस कसे येणार? बदलत्या भारताला ह्या प्रश्नाचं फारसं सोयरसुतक राहणार नाही असेच मला वाटते. कारण चीनची महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा, चीनची साम्राज्यवादाची वाढती भूख, जागतिक पातळीवर वाढत असलेला जिहादी दशहतवाद, तसेच हिंदी महासागर, दक्षिण चीन समुद्र हा सागरी माल वाहतूक तसेच सामरिक दृष्टया संवेदनशील अशा ह्या भागात अमेरिका ,ऑस्ट्रेलिया, जपान आणि आपला भारत असा समूह गट अस्तित्वात आलेला असताना इजरायल-भारत संबंधातातींल सुरू झालेले हे नवं पर्व साधारणतः पुढचं पाव शतक निश्चीतच राहील असे वाटते.

बुधवार, १७ जानेवारी, २०१८

सर्वोच्च न्यायालय राजकीय आखाडा?


अलिकडे सर्वोच्च न्यायालयातील चार सन्माननिय न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ह्या चार न्यायधिश महाशहांनी भारताच्या सरन्यायाधिशांना पाठविलेले पत्र, आणि त्यातील मजकूरही प्रसिध्दीस दिला. सर्वोच्च न्यायालयातीलच नव्हे तर देशातल्या खालच्या पातळीवरील न्यायालयातही प्रशासकिय कामातील व्याप, न्यायधिशापासून ते शिपाई पर्यंतच्या कर्मचार्यांची अपूरी संख्या, कार्यालयासाठी अपूरी जागा, खात्यातील विविध विभागातील कोआर्डीनिशन असमाधानकारक असणे इत्यादी बाबी स्वातंत्र्यापासून आजतागायात नित्याच्या आहेत. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचारांपासून ते त्याच्यावरील फौजदारी स्वरूपातील गुन्ह्यांपर्यंतचे खटले विविध पातळीवरील न्यायालयात दाखल होऊन त्यासबंधी निकालही लागलेले आपण पाहिले आहेत, ऐकले आहेत. परंतू कोणाही न्यायधिशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन आपल्याच न्यायधिशांच्या विरूध्द तक्रार जनतेसमोर मांडलेली नाही. म्हणून ह्या चार सन्माननिय न्यायधिशांच्या पत्रकार परिषदेमूळे खळबळ माजलेली दिसत आहे. प्रथम ह्या खळबळीचं स्वरूप कसं आहे ह्यावर चर्चा करू या.

लोकशाही राज्यप्रणाली स्विकारलेल्या देशात संविधान, संसद, सरकार, न्यायपालिका, प्रसारमाध्यमें, निवडणूक आयोग, इत्यादी लोकशाहीचे स्थंभ असले तरी अंतिम सत्ता जनतेची असते. जनतेला मिळालेल्या मतदानाच्या हक्कातून सर्व प्रान्तातील तसेच केन्द्रातील सरकार अस्तित्वात येत असते. न्यायपालिका अस्तित्वात आली आहे, ती ही लोकशाहीतील खरा राजा असलेल्या लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठीच. जिथे लोकशाही नसते अशा देशात न्यायव्यवस्था कशी असते, प्रसारमाध्यमांचं काय स्थान आहे, ह्या बाबतीतील जो अनुभव पाहण्यात किंवा ऐकण्यात आला आहे त्यावर क्षणभर जरी लक्ष दिलं, तर राजकिय पक्षाचे नेते मंडळी, टोकांची भूमिका घेणारी न्यायधिश मंडळी, पत्रकार मंडळी इत्यादी घटकांची खळबळ उडवून देण्याची कृती काय किंमतीची असती हे कळू शकते. हे गणित विषयातील एकमेव असं कूट आहे कि निरीक्षर व्यक्ती ही सोडवू शकेल. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर शून्य आहे. स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्यप्रणाली आपण स्विकारली आणि ती यशस्वी होत आहे, ह्याचं सार श्रेय खरं पाहता भारतीय जनतेकडे जाते. सर्वोच्च न्यायालयातील चार सन्माननिय न्यायधिशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंबंधी समाजातील विविध घटकातील लोकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कोणी म्हणतं कि ह्या चार न्यायधिशांना पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं माडांवे लागले ह्याचा अर्थ सरन्यायधिशाचं आणि सरकारचं वर्तन हुकमशाहीचं आहे. तर दुसरी मंडळी म्हणते कि ह्या चार न्यायधिश महाशयांनी पत्रकार परिषदेत आपले गार्हाणं माडंले ही बाब पूर्णतः चूकीची आहे. हे प्रकरण आपल्या कार्यालयांसंबंधीचं असल्यामूळे ते कार्यालयात सोडविणे इष्ट ठरले असते. काही निवृत्त न्यायधिशांनीही असेच मत मांडलेलं आहे. कायद्यासंबधींच प्रचंड ज्ञान आणि प्रत्यक्ष खटल्यात ते वापरण्यासाठी लागणारी तीव्र बुध्दी ज्यांच्याकडे आहे, प्रचंड कष्ट उपसून घेण्यासाठी आवश्यक अशी कणखर मानसिक आणि शारिरीक बैठक ज्यांची आहे, ज्यांच्या अंतःकरणात निरंतर जाज्वल्य देशभक्तीची ज्योत तेवत असते अशा महाराष्ट्र भूषण, सरकारी वकील सन्माननीय उज्वल निकम ह्यांनी चारही न्यायधिशांवर कारवाई करावी असे स्पष्ट मत मांडले आहे. ह्यावरून कायदा, कायद्याचे राज्य, समाजव्यवस्था इत्यादी विषयावरील त्यांच्या संवेदनशील दृष्टीकोनाचं कौतूक करावे तितके कमी. केद्र सरकारने ह्यावर काही मतप्रदर्शन केलेलं नाही. ह्या बाबतीत केंद्र सरकारचं अभिनंदन करावयास हवे. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधीनी चार न्यायधिशांनी केलेली कृती योग्य आहे असे म्हणत भाजपावर आरोप केला. साम्यवादी पक्ष तसेच इतर समदुःखी पक्ष केंद्रात भाजपा सत्तेवर असल्यामूळे ह्या सार्या प्रकरणात भाजपाला दोषी धरीत आहेत. म्हणून भाजपा, पक्ष ह्या नात्याने विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावीत आहे. पत्रकार मंडळी आणि न्यूज चॅनेलचे सपांदकीय मंडळी राजकीय मंचावर सुरू असलेल्या खेळात आपआपल्या संघाचं समर्थन करीत आहेत. कोट्यवधी मतदार जे ह्या देशाचे मालक आहेत त्यांच्यापैकी किती टक्के मतदार ह्या खळबळीने विचलीत झाले असावेत ह्या प्रश्नाचं उत्तर खळबळ माजविणार्या न्यायधिशांना तसेच त्यांच समर्थन करणार्या राजकीय पक्षांना आणि पत्रकारांनाही ह्या घडीला सांगता येणार नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या काही खळबळजनक घटना घडल्या त्यासंबधीच्या प्रतिक्रिया मतदार राजा नेहमी पाच वर्षानंतर होणार्या मतदाना द्वारें देत असतो, ह्याला इतिहास साक्षी आहे. सरकार असो वा विरोधी पक्ष, पत्रकार असो वा न्यायधिश मंडळी, खेळाडू असो वा कलाकार मंडळी ह्यांनी निर्माण केलेल्या खळबळीचं स्वरूप कसं असतं ह्याचं उत्तर एका वाक्यात द्यावयाचं म्हणजे सर्वसामान्यांकडे संयम आहे आणि ते जाणून आहेत की दुसरी खळबळजनक गोष्ट घडली कि ह्या खळबळीचा विषय डब्यात बंद होतो.

आपल्या देशात कुठलीही घटना घडली कि ती आपोआप खळबळजनक होत असते. ह्याचं एकमेव कारण म्हणजे अशा घटनेला राजकीय रंग चढला जात असतो. चार न्यायधीशाचं म्हणणं काय आहे, न्यायमुर्ती लोय्यांचा मृत्यु , विरोधी पक्ष सरकारवर आणि भाजपावर करीत असलेले आरोप, इत्यादीसंबंधीची माहिती वर्तमानपत्रातून तसेच न्यूज चॅनेलवरील बातम्या आणि टाॅक शोजवरून आपल्या पर्यंत रोज येत आहे. त्यासंबंधीची एक PIL दाखल झालेली आहे ह्यावरून तरी लोकशाहीला धोका पोहचण्याचा आरोप निराधार आहे, असे म्हणावयास हरकत नसावी. केंद्रात भाजपाचं सरकार आल्यापासून पुरस्कार वापसी, पंतप्रधान मोदींची हुकूमशाही सुरू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, अल्पसंख्याक भितीने ग्रस्त आहेत, असहिष्णूता वाढत आहे, दलीतानां न्याय मिळत नाही इत्यादी आरोप काॅग्रेस आणि साम्यवादी पक्ष तसेच बसपा आणि समाजवादी, राष्ट्रीय लोकदल इत्यादी पक्ष सतत करीत आहेत. आणि अशा प्रकारचे आरोप विरोधी पक्ष भाजपा सत्तेवर नसताना स्वातंत्र्यापासून करीत आलेले आहेत त्यात फारसं नवीन असे काही नाही.

कोर्टात फक्त खटल्याची सुनावणी ऐकावयास जावे लागते असे नाही. छोट्या मोठ्या एॅफीडीवेट साठी सर्वसामान्यांना जावं लागते. तिथे गेल्यावर कोर्टाच्या इमारतीतील लाॅबीत अनेक वकील आपल्या अशीलांशी बोलत असलेले दिसतात. ह्या चारही न्यायधिशांना मला विचारावसं वाटतयं, अहो न्यायधीश महाराज, आपण कधी न्यायालयाच्या लाॅबीत येऊन वकीलांशी, किंवा आपल्याला न्याय मिळावा ह्यासाठी आलेल्या सामान्यजनांशी चर्चा करता का, तर उत्तर ' नाही ' असे आहे. कारण तशी आचारसंहिता असते. लिखीत स्वरूपात असो वा नसो. लोकांना न्याय मिळावा ह्यासाठी आपण न्यायधीश म्हणून काम करीत आहात. आपणच पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होणार्या अन्यायाची कैयफीत मांडली. कोणत्या आचारसंहीतेत हे बसते? न्यायालयाच्या इमारतीच्या बाहेर राजकीय लाॅबी आहे त्यात आपण अडकले आहात का? इतका कुठला मोठा अन्याय तुमच्यावर सरन्यायधिशांनी केला आहे? अहो, न्यायधिश महाराज, 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण'. असेच समजून आपल्या पूर्वाश्रमीच्या न्यायधिशांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही. ही परंपरा खंडीत करून आपण काय मिळविले? काय साध्य करावयाचे होते? आणि पुर्वाश्रमीच्या न्यायधिशांची परंपरा पाळली असती तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? आम्हां सामान्यजनासांठी आपण न्यायदेवतेसमान. देवालाही भक्त हट्टाने प्रश्न विचारत असतोच ना! आपण राजकीय मंडळीसारखे आपआपसात भांडत बसणार? प्राथमिक शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकासंबंधीची तक्रार आपल्या वडीलानां करावी तद्वतच आपण आपली तक्रार जनतारूपी वडीलांकडे अप्रत्यक्ष रित्या दिली असे समजावं का आमच्या सारख्या सामान्यजनांनी? प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, त्याच्यावर वर्गशिक्षकानी खरोखर अन्याय केलेला असल्याखेरीज तो आपल्या वडीलांकडे तक्रार करणार नाही हे बालमानसशास्त्रांच्या अभ्यासकांनी माडंलेल्या विचारातून सहज समजतं. त्यामूळे खरोखरचं तुमच्यावर अन्याय झाला असेल तर अप्रत्यक्ष रित्या ( पत्रकार परिषद घेऊन) जनतेकडे का आलात? एकतर हा प्रश्न आपण आपल्या कार्यालयातच सोडवावयास हवा होता. लोकशाहीत थेट वडीलाकडे आपली कैयफत माडांवयाची एक दुसरी रीत आहे. ती म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा होता. परंतु ते ही सर्वसामान्यांना फारसे रूचले नसते. आपणासारख्या उच्चशिक्षित समंजस आणि समाजाचा आधारवड असलेली मंडळी एखाद्या राजकीय पक्षाच्या हातातील कोलीत होत आहेत अशी कुजबूज ऐकू यावी! छे,छे, न्यायधिश महाराज, आम्ही सामान्यजन, तुम्हांसारख्या न्यायधिशांना 'निवडणूका न लढविता सच्चे जनप्रतिनीधी' असे अभिमानाने म्हणत असतो. देशाच्या एका माजी पंतप्रधानांचा निवडणूकीतील विजय अवैध मानून त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा धाडसी निर्णय देणार्या अलाहाबाद न्यायालयाचे न्यायधीश शहा ह्यांचे वारस तुम्ही! ह्याचं स्मरण आम्ही करून द्यावे! बघा अजूनही वेळ गेलेली नाही. न्यायालयातले प्रश्न, समस्या न्यायालयात सोडवाल अशी आशा करतो

न्यायमुर्ती लोय्याचा मृत्यु हा नैसर्गिक नसून एक हत्त्या आहे असा आरोप करून आगामी विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील प्रचारात मुद्दा बनविण्याचा सर्व विरोधी पक्षाचा एक कट आहे हे ही ऐकावयास येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी ह्या दोहोपैकी निदान एखावर काही खोटं- नाटं प्रकरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मिडीयाला हाताशी धरावयाचे उद्योग काँग्रेस आणि समदुःखी पक्ष करीत आहेत. परंतु संपूर्ण मिडीयाला हाताशी धरण्यात विरोधी पक्षांना यश मिळत नाही. ह्याचं कारण पंतप्रधान मोदीजी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा ही जोडी वाजपेयी-अडवाणी नाहीत. त्यामुळे हताश विरोधी पक्षांनी सुप्रिम कोर्टातील न्यायधिशांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केलेला असावा असं ऐकू येत आहे. अलिकडचे घटनाक्रम पाहता ह्यात तथ्य असावे असेच दिसते.

२०१९ च्या लोकसभा निवडणूका होई पर्यंत राममंदिर खटल्याचा निकाल राखून ठेवण्यासाठी, तसेच माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्याशी संबंधीत मॅक्सिस प्रकरणात वा मेडिकल घोटाळ्या संबंधीच्या खटल्यात कोण न्यायाधिश नियुक्त व्हावेत हे सरन्यायाधिशांनी नव्हे तर आपल्या मर्जीतल्या कोणा न्यायाधिशाने ते करावेत ह्यासाठी झटणार्या सिब्बल, प्रशांत भुषण व अन्य पुरोगाम्यांना आजची स्थिती अपवादात्मक वाटत आहे. म्हणूनच चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषदेत सरन्यायाधिशांवर मनमानी कारभाराचा आरोप ठेवला. हे म्हणजे परीक्षेत नापास होणार्याने परिक्षकांवरच ठपका ठेवण्यासारखे आहे. ह्याला पुरावा म्हणजे मेडिकल घोटाळाप्रकरणी प्रशांत भुषण ह्या वकिलाने न्यायाधिश चमलेश्वर ( जे पत्रकार परिषद घेणार्या चार न्यायाधिषांपैकी एक आहेत ) ह्याच्या संगमताने आपल्याला हवे असलेले न्यायाधिशांचे खंडपिठ बसविले जे सरन्यायाधिश महाशयांनी रद्द केले कारण तसा अधिकार केवळ सरन्यायाधिशांना असतो. सिबल यांचा राममंदिर प्रकरणाचा निकाल निवडणूकांनंतरच व्हावा हा हट्ट ह्याच सरन्यायाधिशांनी फेटाळून लावला होता आणि वर न्यायालयासच walk-out ची धमकी दिल्यामुळे सिबल ह्यांना धारेवर धरले होते. निवडणूका फार दूर नाहीत. कदाचीत हे चारही न्यायधिश महाशय आता राजीनामा न देता कार्यभार चालू ठेवतील. निवडणूका घोषित झाल्यावर ह्यातील एक दोघे राजीनामा देतील आणि विरोधी पक्षांत( म्हणजेच लाॅबीत) अधिकृत रित्या सामील होतील. परंतु असे करणे ह्या न्यायधिशांना परवडणारे नाही. कारण ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे ह्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असेच धोरण असण्याची शक्यता आहे. त्यामूळे सरन्यायधिशांशी मध्यस्था मार्फत (हे मध्यस्थही काॅग्रेस आणि साम्यवादी पक्षांनीच निवडलेले असणार) तडजोड होऊन प्रकरण थंड होईल. तरीही ह्या चार न्यायधीशांनी इतक्या टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न उरतोच. ह्या चारही न्यायधिशांची नाडी विरोधी पक्षांकडे विशेषतः काॅग्रेस आणि साम्यवादी पक्षाकडे असावी आणि ती मंडळी ह्या न्यायधिश महाशयांना नडत असण्याची शक्यता आहे. शेवटी काय, राजकारण सर्वोच्च न्यायालयातही सुरू झाले असे म्हणावयास हरकत नाही. ह्या चार न्यायधिश महाशयांकडून रामशास्त्री प्रभूणे ह्यांच्या सारखी उच्च कोटीतील निरपेक्षतेची अपेक्षा जनता ठेवणार नाही, निदान हे प्रकरण आपल्या कार्यालयातच मिटविणे हेच त्यांच्या वैयक्तिक तसेच देशाच्या हिताचे आहे अशी अपेक्षा सर्वसाधारणतः सर्वच क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत असताना दिसत आहे. बघू या ह्या न्यायधिश महाशयांना सुबुध्दी सुचते का? तरी काचेवर मारलेल्या दगडाने आलेला ओराखडा कसा काय जाणार? आणि हा ओराखडा राजकीय हेतूनेच काढला असेल तर ह्यांची गाठ पंतप्रधान मोदीजी आणि भाजपा अध्यक्ष अमीत शहाशी आहे. एवढेच तूर्तास म्हणू या.

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...