सोमवार, १५ मे, २०१७

सामाजिक बांधिलकी



मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात समाजाची ढोबळ रित्या दोन वर्गात मांडणी केली. एक वस्तू-निर्मिती करणारा आणि दूसरा सेवा- निर्मिती करणारा. परंतू ही मांडणी व्यावहारिक पातळीवरील झाली. मुलतः माणूस समाजाशी ज्या कर्तव्याने स्वतःहाला बांधून घेतो ती 'सामाजिक बांधिलकी' म्हणजे काय? ह्याची ठोस स्वरूपात आणि संक्षिप्त रित्या व्याख्या करणे अवघड आहे. साधा अर्थ म्हणजे माणूसकी. परंतु ती परिपूर्ण व्याख्या होत नाही. ज्या गोष्टी व्याखेत बसत नाही, अशा सार्या गोष्टी निसर्गरम्य असतात, एवढं निश्चीत. मूलतः मनुष्याचं जीवन सामाजिक असते. ह्या जगात जितके म्हणून प्राणीमात्र आहेत, त्या सर्वात मनुष्य बुद्धीमान. त्या बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यापेक्षा मानवाने प्रगती करीत त्यांच्यावर हूकमत मिळविली. परंतु एखादी व्यक्ती दूसर्या व्यक्तीवर हूकमत गाजवावयास लागली, कि त्याला माणूसकी नाही, असे आपण मानतो. कां? येथूनच सामाजिक ह्या शब्दाच्या व्याख्येला सुरवात होते. मुंगीपासून वाघ, हत्ती सारखे प्राणी असोत, वा चिमणीपासून गिधाड्या सारखे पक्षी असोत, त्याचं जीवन सामुदायिक असते. पण सामाजिक नसते. त्यांच्या जीवनात कार्यव्यवस्था असू शकते. परंतु कर्तव्यभावना नसते. त्यांच्या कामात यांत्रिकता असते. पण भावना, बुद्धी, दूरदृष्टी, इतिहास, परंपरा, सम्यक ज्ञान यांचा त्यांच्या जीवनात अभाव असतो. मनुष्याच्या जवळ या सर्व गोष्टी असतात म्हणूनच तो सामाजिक जीवन जगतो.

मान्टेस्क नावाच्या विद्वानाने म्हटले आहे, "Man is a social animal being formed to please and enjoy in society." मनुष्य समाजात असला म्हणजे त्याला आनंद मिळतो. परिवार,विद्यालये,खेळ, नाट्य, संगीत, साहित्य, राष्ट्र, पंथ, संप्रदाय, सभा, संमेलने, उत्त्सव-समारोह, आदी नावाखाली चाललेले मनुष्याचे उद्योग त्याच्या सामाजिकतेचीच ग्वाही देतात. सामाजिक बांधिलकी ह्या शब्दात माणसाचं एकंदरीत समाजातील वागणं, तसेच लोकांशी व्यवहार (relationship) ह्या गोष्टीचाही अंतरभाव असतोच. ह्या संदर्भात एका पाश्चात्य विचारवंताने  म्हटले, "Be Civil to all, Social to many, Familiar with few, Friend to one, and Enemy to none. कोणाशीही वैर नसावे. एकदा का कोणी शत्रू नाहीत, असे आपल्या मनाने स्विकारले कि आपण सर्वांशी सुसंस्कृतपणाने वागू शकतो. Civil ह्या शब्दाचा Civic Science (नागरिक शास्त्र) प्रमाणे, शब्दशः अर्थ पकडला तरी अर्थ बदलत नाही. जसा मी देशाचा नागरिक, तसेच ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती देशाची नागरिक आहे, हे मान्य केले पाहिजे आणि ते ही मनापासून. जास्तीत जास्त लोकांशी सामाजिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोकांशी जवळीक असावी. जवळीक (familiar)    ह्याचा अर्थ आपल्या संताच्या शिकवणीच्या आधारे घ्यावयाचा असेल तर नेहमी सुसंगतीत असावे, असाच धरू या. आणि मैत्री एकाशीतरी असावी.  हा उपदेश ज्या कोणी साहित्याकाने दिला असेल, त्याला "एकच मित्र असावा" असे अभिप्रेत नाही. तसे असते तर त्याने only one friend असा शब्द वापरला असता.

सामाजिक बांधिलकी पुष्कळदा आपण दैनंदिन जीवनात अनुभवीत असतो. कोणाच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर सगेसोयरे, शेजार-पाजारी, मित्रपरिवार, सगेसोयरे, ओळखीपाळखीचे इतकेच काय पण अनोळखी आणि जातीपातीचा संबंध नसलेले लोक ही त्याच्याकडे येतात, त्याला मदत करतात, सात्वंन करतात. तसेच आपण दूसर्याच्यां सुखात ही सामील होतो. कुठे अपघात घडला तर त्या ठिकाणी जाऊन जखमींना रूग्णालयात नेण्याची जबाबदारी स्विकारणे, वादळ, पूर,भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावणे, अलीकडे शेतकर्याच्यां दुर्दैवी स्थितीत त्यांच्यासाठी उभार्यल्या जाणार्या निधीमध्ये आपलाही हातभार लागणे, शहीद जवानांच्या आप्तानां मदत करणे, वनवासी, दलीत-पीडीतांना सहाय्य करणे, रक्तदान, देहदान, वृक्षारोपण इत्यादी कामें करण्यात जो सहभागी होतो तो खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपतो. प्रत्यक्ष समाज कार्य आपल्या हातून घडत नसले तरी काही स्वंयसेवी संघटना आहेत जसे कि बाबा आमटे ह्यांनी सुरू केलेले उपक्रम, गिरीश प्रभुणे ह्यांनी भटक्या व विभुक्त जमातीसाठी यमगरवाडीत शाळा सुरू केलेला उपक्रम, सिंधुताई सकपाळांचा अनाथ मुलांसाठीचा उपक्रम, विश्वहिंदू परिषदेचे वनवासी कल्याण आश्रम, अशांना आर्थिक मदत वा मोफत कपडे, भांडी, पुस्तके, वह्या इत्यादींचं वाटप करून समाज कार्यात हातभार लावता येतो. मराठी विज्ञान षरिषद असो, वा साक्षरता आणि स्वच्छतेची मोहीम ह्यात आपला खारिचा वाटा उचलून अंशतः आपण समाजाचं ऋण फेडू शकतो. सगळ्या जगाशी तुसडेपणाने वागतो, शेजारी रडतोय तर रडू दे, रस्त्यावरून वुध्द आजोबा क्राॅसींग ओलाडंताना चाचपडत आहेत तर राहू द्या त्याला तसेच, गावाला आग लागली तर लागू दे. अशा वेळी माझं काही कर्तव्य आहे, हेच जो विसरतो, त्याला आपण माणूस मानतो का? नाही .

एकदा इसापाचा मालक झांथस इसापला म्हणाला, "मला नदीवर स्नानाला जायचे आहे. तेथे किती माणसे आहेत पाहून ये बरे. गर्दी असेल तर मी इतक्यात जाणार नाही." इसाप नदीवर जाऊन आला आणि म्हणाला,"महाराज तेथे एकही माणूस नाही." "घे तर मग माझे कपडे " असे म्हणून राजा नदीवर जायला निघाला. तेथे जाऊन पाहतो तो, नदीवर बरीच गर्दी होती. तेव्हा राजा इसापवर रागावला आणि म्हणाला, "काय रे,तू तर मला सांगितलेस की नदीवर एकही माणूस नाही!" इसाप म्हणाला, होय महाराज, मी जे सांगितले ते अगदी खरे आहे. हा पाहा, हा वाटेत एक मोठा दगड पडला आहे. येणार्या-जाणार्याला त्याची ठेच लागत आहे; पण कोणीही तो बाजूला सरकवीत नाही. ज्यांच्याजवळ माणूसकी नाही, जे दुसर्याचा विचार करीत नाहीत, त्यांना मी माणूस कसे म्हणू?" इसापने जे म्हटले त्यात काही चूक दिसत नाही.मग  माणूस कोण? असा प्रश्न आपल्याला पडतो.  ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक कथा सांगियली जाते, ती अशी आहे.

ईश्वराच्या मनात एकदा चैतन्याचं स्पूरण चढले. मग फार कष्ट करून त्याने पंचमहाभूते निर्माण केली आणि आपल्या घरी रात्री उशीरा पोहचला. आपल्या पत्नीला म्हणजेच शक्तीदेवीला आंनदाने माहिती दिली नतंर जेवण उरकून झोपी गेला. पण एक तासानंतर त्याला जाग आली. पुन्हा कामाला लागला. देवीने विचारले, हे काय विश्वभंरा, आपण झोप मोडून कामाला कसे लागलात?  ईश्वराने म्हटले, कालच्या पेक्षा आज भरपूर काम आहे आणि ते  बाहेर पडले. आता तर दुप्पट कष्ट घेतले आणि विविध झाडं, फूलं, पर्वत,दर्या-खोर्या, नद्या, समुद्र, डोंगर निर्माण केले.  विविध रंगीबेरंगी अशी सृष्टी तयार झाली. ईश्वर आपल्या घरी. परतला. आज तर स्वारी खुशीत होती. ईश्वराने आंनदाने सृष्टीचे वर्णन करून देवी कडून जेवण घेतले. झोपताना "आज मला चागंली झोप लागेल" असं म्हटलं देखील. कालच्या रात्री पेक्षा आज झोप चांगली लागली असे दिसू लागले. आज झोपून दोन तास झाले तरी त्याला जाग आली नाही. असे समजून देवी झोपण्याची तयारी करणार इतक्यात ईश्वर जागा झाला. आणि म्हणाला, देवी, मला आज फार ऊशीर होईल, असे म्हणून कामाला लागला. सृष्टी चांगली सजली होती, परंतु ईश्वराला तिच्यात हालचाल दिसत नव्हती. ईश्वराला हवी होती सृष्टीत movement. मग ईश्वराने विविध रंगाचे,विविध आकाराचे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, समुद्रांत, नद्यांत, सरोवरात विहार करणारे विविध प्राणी निर्माण केले आणि घरी परतला. आज ईश्वर फारच खुषीत होता. "सृष्टी सजली आणि चालती बोलती झाली, आनंद होणारच ". हे उदगार होते ईश्वराच्या अर्धांगीचे. आता माझे कार्य संपले असे म्हणत ईश्वर झोपी गेला. आज लगेच गाढ झोपली. परंतु चार तासानंतर जाग आली. देवीला झोपेतून ऊठविले आणि सांगितले, काम संपलं नाही. आता जे काम पुढ्यात आहे ते पूर्ण होण्यास अनेक वर्षे  लागतील. देवीलाही कळले. (ईश्वराचं एक वर्ष म्हणजे भूलोकातील सहस्त्र कोटी वर्षे). ईश्वर कामाला लागला. दिवस-रात्र कष्ट चालूच राहिले. कारण त्याला ह्या सृष्टीला सतत सृजन करणारा प्राणी निर्माण करावयाचा होता, नुसती movement करणारा नव्हे, तर improvement करणारा हवा होता आणि तो कसा असावा, तर सृष्टीला सृजन करीत करीत त्याचा म्हणजेच ईश्वराचा शोध घेईल. महत प्रयासा नंतर ईश्वराने हवा तसा प्राणी निर्माण केला. त्याचेच नाव आहे, मानव. 

जी सृजन होते ती सृष्टी. मानवाने समाज नावाची व्यवस्था निर्माण केली. त्यातूनच काही अलिखीत, काही लिखीत असे नियम बनले. त्या नियमाला अनुसरून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती त्याची सहज प्रवृत्ती मानली गेली. त्या नियमाला न जुमानता स्वतःच्याच हिताला प्रधान्य देऊन दुसर्या व्यक्तीचे अहित करून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती विकृती आणि विकृतीचं टोक गाठून अजूनही तसाच व्यवहार ती व्यक्ती करीत राहीली कि हळूहळू खाली पशुत्वाकडे पोहचते. ह्या उलट सामाजिक नियमांचं पालन करीत, आपल्या हिताचा त्याग करीत आपल्या हिस्साचं फळ दुसर्या समाजबांधवा साठी देतो तेव्हा प्रवृत्तीचं रूपांतर संस्कृतीत होते आणि  पुढे संस्कृतीच्या वाटेवर  निवृत्तीची वाट सुरू होत असते.  पण ती कोठून सुरू होत असावी याचा अंदाज बांधता येत नाही. पण ती वाट खडतर आणि प्रदीर्घच असते. तीच संताची वाट. तीच मोक्षप्राप्तीची वाट. तीच  पंढरीची वाट, जिथे जीवा शिवाची भेट होते.
 
सामाजिक भावना ज्याच्याजवळ ज्या प्रमाणात अधिक असेल, तो त्या प्रमाणात श्रेष्ठ मानला जातो. सर्व महापुरूषांच्या चरित्रांचे हेच सार आहे. आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचे हेच गमक आहे. तो महापुरूष प्राचीन असो की अर्वाचीन, पौर्वात्य असो की पाश्र्चिमात्य,तो आपल्या घरापेक्षा मोठा होतो, गावात, प्रांतात, देशात, आणि परदेशातही मोठा होतो. लोकांची दुःखे दुर करतो. त्यांना सन्मार्ग दाखवितो. प्रसंगी निंदानालस्ती,मानहानी सहन करतो. बस रामदास स्वामी ने म्हटल्याप्रमाणे "चंदनाचे परि त्वां झिजावें!". अशा मंडळींना माझे शतशः प्रणाम!.

२ टिप्पण्या:

लोकसभा निवडणूका २०२४ इस बार चारसौ पार बनाम हटाव मोदी सरकार (भाग-३, भाग-४)

पं डीत जवाहरलाल नेहरू नंतर पुढे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी सुत्रे हातात घेतल्यावर पाकिस्तानने (अर्थातच अमेरिकेच्या मार्गदर्...