गुरुवार, २२ जून, २०१७

चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः |



आपल्या प्रातःस्मरणीय प्रार्थनेत,

"पृथ्वी सगन्धा सरसास्त आपः | स्पर्शीच वायू, ज्वलनच्च तेजः | नभः सशब्दम् महता सैहव|" असे  पंचमहाभूतांचं वर्णन आहे.

ओम् हे नादब्रह्म तसेच शब्दब्रह्म. सा,रे,ग,म,प, ध, नी, हे सप्त स्वर. कळकाच्या बेटातून वाहणार्या वार्याचा सळसळ आवाज, धबधब्याचा एकसूरी ताल, आंब्याच्या झाडावरून ऐकू येणारं कोकीळेचं सुमधूर कुजंन, समुद्राच्या लाटांचा चौघडा, उंच उंच ताडामाडाच्या गुजगोष्टी, विविध पक्ष्यांची सुरेल किलबिल, इत्यादींनी ज्यांच्यावर मोहिनी घातली, त्यापैकी कोणी गायक, कोणी वादक, तर कोणी संगीतकार वा वादन- यंत्रनिर्माते झाले. पृथ्वी ही रसपूर्ण आहे. जसा ज्यांचा स्वभावधर्म, त्याला अनुसरून कोणी काव्ये रचली,कोणी कथा,कादबंरी वा नाटय लिहली. बदलते ऋतुमानातूनही कोणाला काव्ये सूचली. ही सारी साहित्यिक मंडळी.  माणसांच्या, पशू-पक्षी इत्यादींच्या आहार-विहारावरून कोणाला विनोदी कथा,तर कोणाला चूटके- विडबंन स्फुरलें. तर काहींना मनोरंजन करण्याची स्फुर्ती मिळाली. ते कलाकार झाले. हिरव्यागार घनदाट जंगलातील निरव शांतता, खळखळणारे झरे,अजस्त्र डोंगर काहींच्या मनांत मूर्तीमंत पावित्र्य साकार करीत जीवनाचं दर्शन घडविणारे महाकाव्ये स्पूरली, ती मंडळी तत्ववेत्ता आणि संतजन म्हणून अजरामर झाली. पृथ्वीवरील ऋतुमानातील बदल, समुद्राला येणारी भरती-ओहटी, रोज उगवणारा सूर्य, कलेकलेने वाढत आणि कमी होत जाणारा चंद्रमा,मेघांचा गडगडाट, आकाशातून चमकणारी वीज,अंनत तारे-तारकांचा समूह इत्यादींबाबतचे गूढ, ह्यातून कवी मंडळी निर्माण झाली. आणि ह्यांत ज्यांना आव्हान वाटलं ती सारी मंडंळी शास्त्रज्ञ, संशोधक,तंत्रज्ञ,तसेच भौतिक, रसायन, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र इत्यादींचे अभ्यासक म्हणून उदयास आली. पुढे औषधनिर्मिते, डाॅक्टर मंडळी इत्यादी उदयास आली.

पंचमहाभूते म्हणजे सर्वात मोठी संसाधनं. जेथून सार्या प्रेरणा प्रक्षेपीत होतात, तेथेच सार्या घडमोडी, क्रिया विसावल्या जातात आणि त्याही जशाच्या तशाच,तेच आकाश नावाच महाभूत. आजचे रेडीओ, टेलीव्हिजन, मोबाईल, माहिती आणि तंत्रज्ञानातील आधूनिक क्रान्तीचं माहेरघर म्हणजे आकाश. ते ही शास्त्रज्ञांच्या मनाचं आणि बुद्धीच निवासस्थान ठरले. आपली धरतीमाता तर अनेक खनिज संपत्तीचा खजीना. वृक्ष,फळं फूलं,वन-वेली अनेक प्रकारच्या धांन्यांचीही खाण. त्यातून मानवाला लागणार्या भूकेचं शमन करण्यासाठी अन्न निर्माण करण्याची कल्पना सूचली ती सारी मंडळी शेतकरी ,ज्यांना वस्तूनिर्मितीचे अंग आहे अशांना विविध धातूपासून उपयोगी वस्तू, कारखाने, कलाकुसरी,हत्यारे उर्जा निर्मितीचं स्पुरण मिळाले आणि ते सारे उत्पादक वा उद्योजक असे गणले गेले. जिथे उत्पादन,तिथे मागणी आणि ग्राहक ही तयार. ही सुध्दा एक नैसर्गिक साखळीच. त्यातूनच व्यापार उदिम, विक्रीकला उदयास आली. आजच्या जगाचं जे स्वरूप दिसत आहे ते निसर्गाच्या परिवर्तनिय नियमाची म्हणा वा उत्क्रांतीवादाची परिणीती आहे. ह्या जगाचं वर्णन अनेक भागात करता येईल, इतकं ते विस्तराले आहे. हे जग आर्थिक-जगत, कला-जगत, राजकीय-जगत,शिक्षण-जगत, औद्योगिक- जगत,व्यापार-जगत, अध्यात्मिक-जगत, क्रिडा-जगत, स्पर्धा-जगत,विज्ञान-जगत, तंत्रज्ञान-जगत अशा विविध रूपात वाढत जात आहे. ह्यालाच आपण काळाचा महिमा म्हणतो. शास्त्रज्ञ म्हणतात "When there was nothing in existence, time was there". आपल्या संस्कृतीतला महाकाळ, शीवच तो आणि तोच ईश्वर. सृष्टीच्या स्वरूपाची व्याप्ती आपल्याला दिसू लागली, तरी ती अंशात्मकच. कारण अजूनही सृष्टीतील बरीच रहस्ये मानवाला ज्ञात झालेली नाहीत. आणि त्या रहस्यांमागे जितके आपण धावू, तितकी ती पुढे जात राहणार. काही रहस्ये आपल्या हाती गवसतील तर काही नवीन निर्माण होत राहतील. ह्या सृष्टीचा तो नियंता वा विश्वभंर म्हणा वा कानडाचा राजा, त्याचा अंतपांर वेदानांही कळलेला नाही, हेच खरे. आपण जे काही मिळवितो, ते सारे सृष्टीतूनच, आणि जे काही गमावितो ते ही सृष्टीतच समाविले जात असते.

मला वाटते, "विश्वाची निर्मिती ही ईश्वराची लीला आणि तिचा शोध ही मानवाची कला!". कलेचा जन्म मानवाच्या कल्पनाशक्तीतूनच होतो. दस्तुरखुद्द विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणतात 'Imagination is more important than knowledge.' अर्थ हा कि, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्वाची असते. आपले शास्त्रकार म्हणतात, ज्ञान हे पूर्ण असते आणि त्या अनुषंगाने विचार करता आपली कल्पनाशक्ती हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचं माध्यम असावं. त्यामुळे साहित्य, संगीत, गायन, नाट्य, क्रिडा, जाहिरात, चित्रकला, शिल्पकला, अभिनय ह्याच केवळ कला नसून विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, शेती, छोटे-मोठे उद्योग, व्यापार ह्या सार्या कलाच ठरतात. इतकेच नव्हे तर ऋषीमुनींची तपश्चर्या ही सुध्दा एक कलाच होय.

क्षेत्र कुठलेही असो, प्रत्येक क्षेत्राच्या जन्मामागे जी प्रेरणा असते ती निसर्गातूनच प्राप्त होते. त्या प्रेरणाचं स्वरूप "जशी दृष्टी तशी सृष्टी" असेच असावे. त्यामूळेच कला क्षेत्र इतके विस्तृत झालेले आपण पाहात आहोत. कुठल्याही कलेच्या जन्मानंतर सराव, नंतर सवय, त्यापुढे स्वभाव बनत असावा आणि त्या स्वभावानुसार माणसं आपली विहीत कर्म पार पाडीत आली आहेत. त्यातून होणारा निर्मितीचा अविष्कार हा त्या त्या माणसांचा विशेषगूण मानला गेला आणि त्या त्या विशेषगुणांचे नामकरण आणि पाठोपाठ वर्गीकरण झाले असावे. पुढे अंकशास्त्र ,संख्याशास्त्र आणि पैसा नावाचं एक  विनिमयाचं साधन उदयास आले. त्यामूळे आर्थिक प्राप्ती,  ही बाब सुध्दा  समाजचं आणखीन वर्गीकरण करण्यासाठी एक निकष ठरू लागली आणि त्यातून आर्थिक स्तर निच्चित होऊ लागले. म्हणजे आधुनिक युगातही वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहेच. ह्या सार्याचा अर्थ काय? " चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः"|. असाच मानावा कां? बहूदा तेच सत्य.

कलेच्या कुठल्याही वर्गात तुम्ही मोडत असाल तरी, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या कलेतील तुमच्या प्रगतीचा आलेख झटपट उंचावत जातो. परंतु त्या कलेत प्राविण्य मिळविण्यासाठी वा highly professional (निष्णांत) होण्यासाठी करावा लागणारा प्रवास फार खडतर तसाच प्रदीर्घ असतो किंवा अंनतच असतो असेच समजावे. प्रत्येक क्षेत्रात Sky is the limit and Excellence is always a moving target हाच आपला अनुभव. मग आपोआप मुखातून बोल उमटतात "ईश्वरी लीला अगाध; तिला नाही अंत" हेच सृष्टीतील सर्वात पहिले तत्व वा सत्य. आईन्स्टाईन ह्यांनी हीच बाब वेगळ्या शब्दात मांडली आहे. ते म्हणतात ह्या विश्वात सर्वात गुढ वस्तू कूठली तर ती "हे विश्वच होय".

मानवाच्या कल्पनाशक्तीतून विभिन्न कला उत्पन्न झाल्या. त्यातून पुढे कर्म आणि नंतर कर्मानुसार वर्गीकरण झाले असावे, असा निष्कर्ष आपण काढला. त्या व्यवस्थेला आपण जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था वा वर्गव्यवस्था असे जरी म्हणत असलो तरी मूलतः ती नैसर्गिक विविधता आहे. असेच मला वाटते. कारण त्या व्यवस्थेची उत्पत्ती "जशी दृष्टी तशी सृष्टी" ह्या सिध्दांतातून जन्मली आहे. सृष्टीतील विविधतेतून जशी प्रेरणा मिळते, तशी दृष्टी प्राप्त होत असते. दृष्टी म्हणजे नुसते पाहणे नसावे. पाहणे ही क्रिया घडताना मनाची शक्ती आणि बुद्धीची शक्ती किती प्रमाणात जोडली गेली ह्यावर पाहिलेली वस्तू वा प्रसंग ह्याची निश्चित अशी जाणीव निर्माण होत असावी. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या ठायी बौद्धिक पात्रता  भिन्न असते. आणि  मनाची  स्थिती  क्षणोक्षणी  भिन्न होऊ शकते. त्यामुळे सृष्टीतील आणखीन एका सत्याचा परिचय होतो. ते म्हणजे " जशी बुध्दी, जशी मनशक्ती, आणि हो, जसे प्रयत्न, (यत्न तोची देव जाणावा ही तर संत वाणी म्हणजे सृष्टीचेच बोल) तशी कुवत. कुुुवत म्हणजे गुण" . त्याही पुढे "जशी कुवत तसे कर्म". त्यातून समाजात वर्ग निर्मिती झाली असावी. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे," चातुर्वण्यं मया सृष्टी गुणकर्मविभागशः|". ही सृष्टी तामस,रज,सत्व अशा त्रिगुणांची आहे. आणि जी वर्गवारी झाली ती गुणांनुसार. गुण परिवर्तनशील आहेत. उचीत साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात व राजसमधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो. हा उन्नतीचा मार्ग आणि उलटा प्रवास अवनतीचा. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार उच्च स्तरावर पोहचू शकते. जन्मानुसार कोणी उच्च नाही, ना कोणी नीच. परंतु जगभरातल्या प्रत्येक देशात सामाजिक संतुलन वेळोवेळी बिघडलयं आणि बिघडत असते. तसे आपल्या भूमीतही घडलं आणि घडतही आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांनी कुठेही जात-जमात पाहून त्यांच्या आचरणातून आणि व्यवहारातून कोणावर अन्याय केलाय असे महाभारतात उदाहरण दिसत नाही. हो "जसे कर्म तसे फल". हे सृष्टीतील सत्य भगवंतांनी मांडले. ते सत्य पडताळून पाहणे अगदी सोपे आहे. भिंतीवर चेंडू आपल्याकडे परत येण्याच्या उद्देशाने फेकला तर तो आपल्याकडे परत येणारच. चेंडू फेकताना योग्य ती गती आणि योग्य ती दिशा साधली कि नाही हाच खरा प्रश्न असतो. त्याचेच नाव कुवत. म्हणजे गुण. इतकी चर्चा पुुरी करून आपण परत  गुणापाशीच येतो. गुण तसे कर्म आणि कर्म तसे वर्ग.  म्हणूनच ' चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्म विभागशः'! असे  भगवंतांनी  म्हटले आहे, ते पटते. चातुुुर्वण्य व्यवस्था ही जात व्यवस्था नव्हती.  त्यामध्येे दोष उत्पन्न  झाले हेे मान्य. परंतु जगभरातील प्रत्येक देशात काही ना  काही ना दोष समाज व्यवस्थेत निर्माण झालेले आहेतच आणि ह्याचं  मूूूळ माणसांमाणसां मध्ये असलेली श्रेष्ठत्वाची भावना. आता  कर्म कसे  करावे ह्यावर  भगवंत काय  म्हणतात ते पाहू या. "योगस्थःकुरू कर्माणि सड्गं त्यक्त्वा|".आसक्ती सोडून कर्म कर. पुढे म्हटले आहे, "तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"|. एकदा आसक्ती सोडली कि एकाग्रता प्राप्त होते. पूर्णपणे समरस होऊन एकाग्रतेने पार पाडलेली जबाबदारी म्हणजे योग. योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. म्हणजे कर्म पार पाडताना फलाची आशा न धरता निष्काम कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न जो करील तो श्रेष्ठत्वाची पायरी चढत जातो. जातीने नव्हे हे स्पष्ट आहे. 

ह्या विश्वाच्या निर्मितीच्या पाठीमागे कोणती तरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं स्वरूपही जशी दृष्टी तसे तिचं स्वरूप असावं. त्यामुळे तिथेही भिन्नता आलीच. त्यातून मानवजातीत विभिन्न धर्म,संप्रदाय,पंथ निर्माण झाले. त्या शक्तीच्या स्वरूपाचं ज्यांनी ज्यांनी वर्णन केले, स्वाभाविकतः ती मंंडळी  ईश्वराचे पूत्र, दूत,प्रेषित, वा त्या त्या धर्माचे संस्थापक गणले गेले. पुढे धर्माच्या नावावर श्रेष्ठता-कनिष्ठता असा मध्ययुगीन काळात संघर्ष झाला. मानवानेच मानवाचे रक्त सांडले. त्याचे इतिहासात नाव पडले क्रुसेड्स. तेवढ्यावर भागले नाही. पुढे बाटवा-बाटवी,जबरदस्तीने धर्मातंर ,साम्राज्यवादाची स्पर्धा आणि विनाशकारी दोन महायुद्धे झाली. आज जरी बहुतांश देश स्वतंत्र असले तरी साम्राज्यवादी अपप्रवृत्ती आणि धार्मिक उन्माद ह्या दोन्ही गोष्टी जिवंत आहेतच. जे काही धर्म आज गणले जातात, त्या प्रत्येक धर्माला संस्थापक आहे. फक्त हिंदू धर्म सोडून. आणि त्या अर्थी तोच शाश्वत तसेच वैश्विक धर्म आहे अशी आपल्या अध्यात्मिक क्षेत्रातील तज्ञ मंडळींची आणि स्वाभाविकपणे आपली धारणा आहे. राममहात्म्यामध्ये रामनामाचं महत्व विशद करताना " बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम्"| अस शेेेेवटचं चरण आहे. ह्याचा  अर्थ असा ' रामनाम धर्मरूपी वटवृक्षाचे बीज असून  रामनामाचा जप केल्याने सर्वजनांचे कल्याण होते. ह्या ठिकाणी  धर्म असे म्हटले आहे  तो शाश्वत वा वैश्विक धर्म असेच आपल्या शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे,  "यदा यदा धर्मस्य ग्लानीर्भवती भारत|". ह्या ठिकाणीही धर्म म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, सदाचरण हेच अभिप्रेत आहे. जेव्हा ह्या गुणांच अवमूल्यन होते तेव्हा मी अवतार घेतो. आपल्या शास्त्राकारांनी" यथो धर्मः तथो जयः|." जिथे सत्याची बाजू ,    तिथे  विजय असतो. हा शाश्वत नियम मांडला आहे. आपण पूत्रधर्म, माताधर्म, पिताधर्म, शिष्यधर्म, राजधर्म, शरीरधर्म असा उल्लेख नित्याने करीत असतो. शिवाय क्षात्रधर्माचाही, उल्लेख करीत असतो. शांतीचे सारे मार्ग बंद झाले आणि युद्ध लादले गेले तर स्वरक्षणासाठी क्षात्रधर्म आचरणात आणावा असे आपले तत्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदू धर्मीयांनीच आज तागायत सर्वात अधिक सहिष्णुता पाळत आणलेली दिसते. परंतु वाजवीपेक्षा अधिक सहिष्णुता दाखविल्यामूळे आपल्याला पारतंत्र्यात जावे लागले. भगवान श्रीकृष्णाने युध्दाच्या भीषण परीणामांच्या विचाराने हातातील शस्त्र टाकलेल्या अर्जूनाला "तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चयः|" असे सांगत त्याला क्षात्रधर्माची आठवन करून दिली. येथे हे ही लक्षात घ्यायला हवे कि असा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनला केव्हा दिला? संभाव्य युद्ध टाळण्यासाठी स्वतः केलेली शिष्टाई फलद्रूप झाली नाही तेव्हाच. कारण सूर्यप्रकाश, खते,मशागत ह्यांच्या विना जशी काटेरी झुडपे उगवतात, तसेच माणसाच्या मनात ही दुष्ट भावना सहज रित्या उपजते. मग तिला मूळापासून काढावी लागते. बहुतांश देश "जीवो जीवस्य जीवनम्|" हाच मंत्र पाळणारे आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा "अंहिसा परमो धर्मः|" हे तत्व विशिष्ट मर्यादेपर्यंत पाळावे, कारण "देवो दुर्बलो घातकः|" हे ही सृष्टीतील सत्य आहे. भगवंतांनी पुढे विभूती योगात म्हटले आहे, "मृगाणाम मृगेन्द्र अहम् |" मी प्राण्यामध्ये सिंह आहे. असे का म्हटले? तर स्वरक्षण आणि दूष्टांचा संहार हेही धर्माचं अंग आहे. म्हणून आपल्याला सामरिक आणि तंत्रज्ञान दृष्ट्या अधिक सशक्त व्हावे लागेल. आणि त्यासाठी आपले वैज्ञानिक आणि सेनादले अहोरात्र मेहनत करीत आहेत. एकदा का आपण महासत्ता म्हणून उदयास आलो कि विविधता ही सृष्टीची देणगी आहे , सहजीवन हाच मानवाला निसर्गाने दिलेला मूलमंत्र आहे, तसेच आमची जीवनपध्दत ही विश्वकल्याणकारी आहे. हे पटवून देऊ शकतो. त्यासाठी देश, समाज म्हणून काय करावे आणि अडचणी कुठल्या ह्यावरील चर्चा राजकीय स्वरूपाची आहे ती येथे नको करू या.

वस्तूतः सारी मानवजात एक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ज्ञान, शक्ती, व्यापार, सेवा ही चार तत्त्वें चळवळ करणार्या चैतन्यात असतात. शरीरात असणारे चैतन्य तर एकच असते. "सृष्टी असो वा निसर्ग अथवा ईश्वर ह्यांच्या दरबारात भेदभाव नाही." हे सृष्टीतील अनादि कालापासून असलेले सत्य. नदी एका व्यक्तीला गोड आणि दुसर्या व्यक्तीला खारट पाणी देत नाही. परंतु 'River can go no reverse ', हा सृष्टीचा सिद्धांत. त्यात आपण हस्तक्षेप केला तर निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागते. वृक्ष एका व्यक्तीला सावली देणार आणि दुसर्या व्यक्तीला नाकारेल असे होत नाही. परंतु वृक्षावरील फळांच्या मधुरतेत आणि आकारमानात भिन्नता राहणार. त्याचबरोबर आपण मर्यादे बाहेर वृक्षतोड करू लागलो तर ते सृष्टीला सहन होणारं नसतं. आपल्या शरीरात विभिन्न अवयव विद्यमान आहेत. त्यांची कामें ही विभिन्न,परंतु हृदयातूंन शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रोहिणी नावाची रक्तवाहीनी हातांना जास्त रक्त आणि पायांना कमी रक्त पुरविते, असे होत नाही. इतकेच काय हा डावा हात आणि हा उजवा हात असा भेदभाव रोहिणी कडे नसतो. हा जसा शरीरविज्ञानाचा नियम तसाच तो एक सृष्टीचाही सिद्धांत. कारण आपल्या शरीरात पंचमहाभूते विराजमान असतात. सूर्य म्हणजे तेज, ते ही पाण्याच्या तुषारातून जाते तेव्हा सप्त रंगाचे दिसते. परंतु गतीरूप आणि एकरूप होता,एकच पांढर्या रंगाचे दिसते. जे त्या तेजाचे मूळ रूप. सूर्याची भ्रमंती अनेक युगापासून सुरू आहे. आपली पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते हे ही वैज्ञानिक सत्य. Sunset at one place is always Sunrise at another place. एका ठिकाणीचा सूर्याास्त हा पृथ्वीच्या दुसर्या भागातला सूर्योदय असतो. पृथ्वीचा आकर गोलाकार असल्या कारणाने आणि पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते म्हणून असे घडते.  हे ही सत्य. त्यातूनच पौवार्त्य आणि पाच्शिमात्य देश अशी विभागणी झाली. ती मानवाने केली. परंतु मूळ सत्य, "पृथ्वी तीच आणि सूर्य ही तोच ". जल पृथ्वीवर सर्वत्र आढळेल पण त्याचे घटक म्हणजे हैड्रोजन दोन भाग आणि ऑक्सीजन एक भाग असेेच सर्वत्र  असणार. सृष्टीत विविधता ठायीं ठायीं भरलेली आहे. जे ग्रह आपल्याला ज्ञात आहेत. त्याच्यांत ही विभिन्नता आहे. प्रत्येकाचा आकार वेगळा, गती भिन्न, कक्षा भिन्न, तसेच त्यांचेे  गुरुत्वाकर्षण  भिन्न.  ह्याचा अर्थ असाच कि Imbalance is the feature of this Universe. तरीही आजपावेतो कुठल्याही ग्रहाच्या भ्रमणातील गतीमध्ये असा काही मोठा बिघाड निर्माण झाल्याची घटना नाही. कुठल्याही ग्रहाने मर्यादा सोडलेली नाही. आपली कक्षा बदलली नाही. "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे "असाच सृष्टीचा मानवाला संदेश असावा.  ब्रह्मांडामध्ये  एक सुनियोजित व्यवस्था आहे  असे दिसतेे जिच्यामूळे हे सृष्टीचक्र व्यवस्थित सूरू आहे.

सृष्टी म्हणा, ब्रम्हांड म्हणा, विविधता हे खास वैशिष्ट्य. भले चातुर्वण्यव्यस्थेत दोष निर्माण झाले, तरीही काळा-गोरा, पौवार्त्य-पाश्र्चिमात्य, विकसनशील-विकसित देश, विकसित-अविकसित देश, कुठे लोकशाही,तर कुठे एकपक्षीय राजवट,तर कुठे लष्करशाही,आणि  राजेशाही हे सारे भेद अलीकडच्या काळातील. कोणी श्रीमंत, कोणी मध्यमवर्गीय. कोणी गरीब, कोणी दारिद्र्यरेषेखालील. बरं हे वर्ग आर्थिक निकषावरून मानले तरी प्रत्येक देशातील मोजमाप ही वेगळे. कोणी अधिकारी तर कोणी शिपाई . कोणी राज्यकर्ते तर कोणी आम नागरिक,कोणी नोकरशहा. कोणी मालक कोणी नोकर. कोणी विक्रेता कोणी ग्राहक. असे अनेक वर्ग. प्रत्येक क्षेत्राचा विचार करता अगणीत वर्गवारी.
 I therefore feel that at any time, at any part of the world and in any system of government, there can be no classless society. वर्गरहित समाज ही जगातल्या कुठल्याही भागात आणि कुठलीही राजवट का असेना सदाकाळी स्वप्नवतच ठरेल, असं मला वाटते. परंतु सृष्टीत जशी एक सुव्यवस्था दिसते तशी मानव निर्माण करू शकतो. नव्हे ती मानवानेच करावी असा सृष्टीचा वा त्या नियंताचा संदेश असावा.

माझ्या शालेय जीवनात मराठी विषयाच्या पुस्तकात "मानव्याच्या दिशा" नावाचा धडा होता. लेखकाचे नाव वामन चोरघडे. त्या धड्यात एक मेंडपाळ आणि त्याच्याकडे असलेल्या मेंड्याशी त्याच नातं किती अतूट होतं ह्याच सुरेख वर्णन केलं आहे. तो धडा म्हणजे सहजीवनाचा एक आदर्शच. पंचमहाभूतांच कार्य पहा. समुद्र पाणी घेतो, सूर्य वाफ करतो पण संपूर्ण समुद्र आटवित नाही. का? सारा संसार अळणी होऊ नये म्हणून. आणि वाफ आकाशाकडे सोपावितो. आकाश वाफ घेते आणि ती मेघात साठवून गोड जलात रूपातंर करते. कसे? आपल्याला ठाऊक नाही. मग ते गोड जल पावसाच्या रूपाने भूमीकडे देेेते.  वनस्पती जल घेतात. आणि फळं, फुले देतात. एक आंब्याच बी रूजते, अनेक आंबे देते. भूमातेला एक दाणा द्या, हजारो दाणे घ्या. भूमातेचं स्वरूपही पृथ्वीवर विभिन्न. तशी फळं फूलं अन्नही विभिन्न. बस तिच्या पुत्राने देवाण-घेवाणाची सुव्यवस्था निर्माण करावी. सृष्टीचा संदेश आहे "जियो और जिने दो" हा मानव जातीसाठी. दूसरा "जीवो जीवस्य जीवनम्|" हा पशु-प्राण्यांसाठी. सृष्टी मानवाला सांगतेय Choice is yours.

शनिवार, २० मे, २०१७

देश,सरकार,आणि समाज


एका विशिष्ट संस्कृतीने आणि पंरपरेने बांधलेला समाज जेव्हा एका विशिष्ट भूभागावर बर्याच काळासाठी वास्तव्यात असतो, तेव्हा तेथील समाजाला राष्ट्र वा देश अशी संज्ञा प्राप्त होत असते. आणि त्याच देशातील काही लोकांचं एक मंडळ  असते, जे त्या देशाचा कारभार पाहात असते, ते मंडळ म्हणजे तेथील सरकार. मला वाटत, आजच्या चर्चेसाठी सरकारची, तसेच राष्ट्राची इतकी व्याख्या पुरेशी आहे.

जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशात सरकार नावाची यंत्रणा आहे. त्यातही प्रकार आहेत. कुठे लोकांनी निवडून दिलेलं, तर कुठे राजेशाही, कुठे लष्करशाही, तर कुठे एक पक्षीय सरकार आहे. कुठल्याही पध्दतीचं सरकार असो, प्रजेची सुरक्षा आणि ऐहीक विकास ही सरकारची वा राज्यकर्त्यांची प्राथमिक कर्तव्ये होत. संरक्षण, उदरभरण आणि प्रेम या गोष्टीची निश्चिती झाली कि निश्चिंत मन सर्जनशीलतेची भरारी घेत असते. त्यातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राचा विकास होत असतो. पुष्कळदा सरकार आणि प्रशासनातील लोक (नोकरशाही) ह्यांच्यात समन्वय नसतो. नोकरशाही भ्रष्ट असते, असेही ऐकायला येत असते. याउलट "सरकारमधील मंत्री भ्रष्ट असतात. नोकरशाहीला का दोष देता?" असे ही ऐकतो. कुठलाही देश आणि कुठलिही राज्यप्रणाली असो, कमी अधिक प्रमाणात अशा गोष्टी ऐकावयास मिळतात आणि त्या बहुतांशी खर्या असतात. परंतु किती दोषी नेत्यांना वा नोकरशहानां शिक्षा झाली असेल, याबाबत सर्वच देशांना आणि राज्यप्रणालीनां नेगेटिव्ह गुण सारखेच मिळतील असे मला वाटते. आर्थिक घोटाळा रकमेने किती मोठा आणि किती प्रमाणात देशाचं नुकसान करतो, ह्याच प्रमाण मात्र प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असू शकते. अविकसित आणि विकसनशील देशावर भष्टाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर विपरीत परीणाम करीत असतात. हे ओघाने आलेच. आपला देश विकसनशील देशांमध्ये गणला जातो आणि सरकार आपल्या मतदानाच्या हक्कातूनच अस्तित्वात येते, मग भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकिस येते तेव्हा समाज म्हणून आपणही जबाबदार ठरतोच की. आपण ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी खाली देत असलेल्या दोन कथांचा आधार घेऊ या.

एका गावात गावदेवीचं मंदिर असते. ते रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जमिनीवर होते. भाविक गाडी पकडण्याच्या घाईत असल्यामुळे, आपली पादत्राणे न काढताच मंदिरात प्रवेश करून देवीचं दर्शन घेत असत. गावातल्या एका गृहस्थाला हे काही रूचत नव्हते. म्हणून त्याने सरपंचाकडे लेखी तक्रार केली. सरपंच म्हणाले, "मी काय करणार? आपलीच मंडळी ही. मी समजावून सांगितले नाही कां?" असे म्हणत त्यांनी तक्रार दाखल करून घेतली. दुसर्या दिवशी, मंदिराच्या दरवाज्यापाशी "सर्व भाविकांना विनंती करण्यात येते कि, गावदेवीचं गाभार्यातून दर्शन घ्यावयाचे असल्यास, आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवावीत. आपला सरपंच".असे फलक लागले. त्या फलकावर धूळ साचत गेली. काही परीणाम झाला नाही. मग तक्रारदाराने तहसील गाठले. तिथे तक्रार दाखल केली. तहसीलदारांनी लक्ष घालतो असे आश्वासन दिले. तिसर्या दिवशी मंदिराच्या गेटपाशी फलक लागले. फरक इतकाच कि फलकातील  सूचनेमध्ये थोडासा बदल केला. "जो कोणी भाविक पादत्राणे घालून देवीचं दर्शन घेतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शेवटी सूचनेच्या खाली हूकमावरून, मामलेतदार. हे दोन शब्द वाढले. पण स्थितीत काही बदल झाला नाही. ना कोण्या भाविकाने तहसीलदाराच्या सूचनेला मान दिला.  ना कोणा भाविकावर कारवाई झाली. तक्रारदाराने जिल्हाधिकार्यांचं ऑफीस गाठलं. तक्रार केली. जिल्हाधिकार्यांनी लागलीच तक्रारदाराच्या समक्ष तहसीलदारा  फोनवरुन फैलावर घेतले. तक्रारदाराला आश्वस्त केले, आणि सांगितले, कि दोन दिवसात प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यासाठी माझ्या ऑफीसमधील सिनियर अधिकार्याला पाठवितो. तक्रारदाराने टेबलावर आणलेला चहा घेतला आणि आनंदीत होऊन कल्टेक्टरसाहेबांचे आभार मानून घरचा रस्ता धरला. दोन दिवसानंतर जिल्हाधिकारीच्या ऑफीस मधील एक अधिकारी काही काळासाठी त्या गावदेवीच्या मंदिरातील तक्रार निवारण करण्याच्या कामावर रूजू झाले. त्यांची राहण्याची व्यवस्था ही झाली होती. रोज मंदिरात स्वतः जातीने एक बूथ ऊभे करून ते अधिकारी कोणी भाविक पादत्राणे घालून गावदेवीचे दर्शन घेत नाही ना याची खातरजमा करीत होते. तक्रारदाराला आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली हयाचं समाधान मिळाले. काही व्यवसायाच्या कामानिमित्त तक्रारदार बाहेर गावी गेला. काही दिवसानंतर तो परत आला, तर काय पाहतो? भाविक त्या अधिकार्यांच्या टेबलाखालून पैसे देत पादत्राणे न काढता देवीचे दर्शन घेत होते. आपल्याच गावातील बांधवांना देवीच्या दर्शनासाठी पैसे द्यावे लागत असल्याने त्याचे मन कष्टी झाले. त्यानी पुन्हा जिल्हाधिकारीकडे तक्रार केली. जिल्हाधिकार्यांनी एक तडफदार तरूण अधिकार्याची नियुक्ती केली. नवीन अधिकार्याने आपल्यासोबत एका शिपायाला आणलं. मंदिराच्या गेटपासून थोडं दूरवर चप्पल स्टॅंड उभारला. भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी बांबूचा छोटेखानी मंडप आणि चप्पल काढून ठेवण्यासाठी स्टॅन्ड ही उभारला. भाविकांनी चप्पल येथे काढावीत आणि मगच मंदिरात प्रवेश करावा, असा फलक ही लावला. सहा महीने झाले. सारं काही जिल्हाधिकार्याने केलेल्या नियमाप्रमाणे घडत होतं. भाविकांना हया नव्या अधिकार्याला लांच देण्याची हिम्मत झाली नाही. आता देवीच्या दर्शनासाठी वेळ जास्त लागायला सुरुवात झाली. म्हणून घरातूनच भाविक लौकर बाहेर पडू लागले. गावदेवी मंदिराचा वर्धापन दिवस उजाडला. पहाटेपासून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. त्या अधिकार्याचा शिपाई चप्पल स्टॅंड जवळच उभा होता. चप्पल काढा, चप्पल काढा, चला चला, पुढे चला असा घोष शिपाईचा चालू होता. रांग पुढे सरकत होती. एक भाविक अनवाणीच आला होता. त्यालाही चप्पल काढा आणि पुढे चला हेच वाक्य शिपयाने उच्चारले. त्या अनवाणी भाविकाने म्हटलं, मी चप्पल कुठे घातलेत? पंरतु तो शिपाई त्या भाविकाला पुढे जाऊ देत नव्हता. भाविकाने अधिकार्याला विनवणी केली. परंतु त्या अधिकार्याने त्याला पुढे जाण्यास मज्जाव केला. तो भाविक वैतागून म्हणाला, अहो साहेब मी कूठे चप्पल घातलेत? अधिकार्याने उत्तर दिले, "त्या फलकावर काय लिहले आहे, ते वाचले ना! कायदा म्हणजे कायदा. तुम्ही घरी जा. चप्पल घालून या. चप्पल स्टॅन्ड वर ठेवा, मग मंदिरात जा." कलेक्टरसाहेबांचा आदेश आहे ".तो भाविक म्हणाला, अहो साहेब, कलेक्टर साहेबांकडे तक्रार करणारा तो मीच आहे. ते अधिकारी म्हणाले "मग तुम्हाला नियम जास्त माहीत हवा. ते काही नाही तूम्ही चप्पल घालून या. येथे काढा मग दर्शनासाठी आत जा. त्या भाविकाने कपाळावर हात लावला आणि घरी परत गेला. शासकिय पातळीवरील दोन अधिकार्याचे वागणं कसे आहे? एक 'काय द्यायचे' ते बोलतो तर दुसरा अधिकारी म्हणतो, फक्त कायद्याचे बोला.

एखादा मंत्री जेव्हा  नोकरशहासंबधी वरील  ही गोष्ट सांगेल तेव्हा आपण त्यांना सम्राट चंद्रगुप्त ह्यांच्या जीवनातील गोष्ट सांगू शकतो. ती अशी आहे. सम्राट चंद्रगुप्ताला वेष बदलून नगरात फेरी मानण्याची सवय होती. त्यामुळे आपल्या स्वतः बद्दल, सेनापती, प्रधान, दरबारातील इतर अधिकार्याबद्दल प्रजेचं काय मत आहे, ह्याची माहिती मिळत असे. एकदा सम्राट, वेष बदलून नगरात पायी फिरत राहिला. नंतर त्याला थकवा आला. म्हणून रस्त्यावर उभ्या असलेल्या टांग्यात (घोडागाडी) बसतो. आणि टांगेवालाल्या सांगितले, "मला राजमहल पर्यंत सोड आणि पैसे ही तुला तिथेच मिळतील". माझ्याकडे आता पैसे नाहीत. टांगेवालाने नकार दिला. पुढे त्याने सांगितले की, "तुम्ही राग मानू नका, मी राजदरबारातल्या अधिकार्यांना राजमहलापर्यंत अनेकांना सोडलं आहे. परंतु त्या सर्वानी पैसे देण्याचं आश्वासन पाळलं नाही. राजमहल मध्ये शिरतात आणि बाहेर आलेच नाही." टांगेवाल्याला माहित नव्हतं कि तो प्रत्यक्ष आपल्या राजाशी बोलतोय. तो सम्राटाला राजमहलपर्यंत एकाच अटीवर सोडावयास तयार झाला. अट अशी होती कि राजाने आपला सदरा टांगेवाल्याकडे द्यावा आणि टांगाभाडे दिल्यानंतर सदरा राजाला परत मिळेल. बस, सम्राटांनी अट मान्य केली. आणि आपला सदरा टांगेवाल्यापाशी दिला. महलाच्या थोड्या दूरवरच टांगा उभा केला. राजाला त्या अवस्थेतून महलात शिरताना पाहून   प्रधानासकट सर्वच अधिकारी टांगेवाल्याला दम देण्यासाठी टांगेवाल्यापाशी जाऊ लागले. राजाने त्या सर्वांना "मागे फिरा; कोणीही टांगेवाल्याशी हुज्जत घालू नका आणि सर्वांनी दरबारात यावे असे फर्मान सोडले. दरबारात राजाने, सर्वाना फैलावर घेत म्हटले, "तुमच्यामूळे मला आज एका टांगेवाल्याकडून अशा मानहानीला सामोरे जावे लागले. ज्या कोणी, अधिकार्याने, टांगेवाल्याची भाड्याची रक्कम दिलेली नाही, त्यानी ती निमूटपणे माझ्याकडे जमा करावी, नाहीतर मी टांगेवाल्याला बोलावून आपल्या पैकी कोणी त्याचं भाडे थकविले असेल त्या सर्वांची ओळख पटवून त्यांना नगराबाहेर हाकलून देईन". ज्यांनीं ज्यानीं टांगेवाल्याची थकबाकी ठेवली होती ती त्यांनी  सम्राटाकडे सूपूर्त केली. सम्राटांनी स्वतः चे भाडे आणि दरबारातील अधिकार्यांनी जमा केलेली थकबाकी व्याजासकट टांगेवाल्याला दिली. टांगेवाला खूष झाला. तो सम्राटांना नमस्कार करून बाहेर पडला.

वरील दोन्ही कथातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिल्या कथेतून काय स्पष्ट होते, ते हे की नोकरशाही भ्रष्ट असते. तसेच काही वेळा नोकरशाही कायद्याचा पुस्तकी व्याख्या प्रमाण मानते. म्हणजे नको तिथे नियमाचा उदोउदो करते. दोन्ही गोष्टी प्रजेच्या हिताला मारक. दूसर्या कथेतून हे दिसते, की राज्याचा वा देशाच्या प्रमुखावरच आदर्श निर्माण करण्याचं उत्तरदायित्व असत. राज्यकर्त्यांचा नोकरशाहीवर अंकूश असावा. याचा अर्थ "राजा कालस्य कारणम् " हेच तत्व प्रमाण मानायचे कां? थोड्याफार प्रमाणात होय, हेच उत्तर. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रजा आपल्यावरील उत्तरदायित्व झिडकारू शकत नाही. काही प्रमाणात सत्ताधारी पक्षांला मतदानाद्वारे पराजित करून प्रजा आपले कर्तव्य पार पाडते. परंतु ज्यांना सत्तेवर बसविते, त्यांचाही कारभार मागील सरकार प्रमाणेच राहिला, तर मतदार, निवडणूका, ह्या गोष्टींना काही अर्थ उरत नसतो. कित्येकदा आपणच नैराश्याने ग्रासतो आणि म्हणू लागतो, "सत्तेवर कोणी बसला तरी आपल्या जीवनात काय फरक पडतो?" " सध्या मोदींची हवा आहे, असे म्हणतो, का तर प्रशासनातील बदल जाणवत आहे". असे नारायण मूर्तीं सारखे उद्योगपतीही म्हणतात, जे स्वतः मोदींचे समर्थक नाही, अशी पुस्तीही तसे विधान करताना जोडतात. तेव्हा त्यात तथ्य आहे, हे मानण्यासाठी मन मोठं का करू नये? सरकारवर टिका करण्याचा हक्क आहेच परंतु त्यासाठी पाकिस्तानातल्या टिव्हीवरून अय्यर सारख्या नेत्याने, "मोदीं सरकारको आप लोग हटाओ" असं विधान करणे योग्य आहे का? केजरीवालसारखे जे नव्याने राजकीय व्यवस्थेत आहेत, त्याचं ठीक आहे हो, परंतु साठ वर्षाहून अधिक काळ सत्ताधारी म्हणून वावरले, त्या पक्षांच्या नेत्यांनी, अय्यरांच्या विधानांबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता ना! स्वातंत्र्य हे बंधना शिवाय असू शकत नाही. बोलायला वाणी लागते; परंतु कोठे आणि काय बोलावयाचे, ह्यासाठी आपल्या अंगी विवेक असावा लागतो. काळ झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष, सरकार आणि जनता, राष्ट्र आणि जग, ह्यातील नात्यांचा नव्याने विचार करायला हवा. मोदींचं सरकार अस्तित्वात येऊन काही राज्यांच्या निवडणूका झाल्या, निकाल लागले आणि मिडीयात पुढच्या लोकसभेची निवडणूक, पुढचा पंतप्रधान कोण ह्यावर चर्चा होते. ह्याला काही अर्थ आहे का? केवळ निवडणूका म्हणेजचं राजकारण असेच मानायचे कि काय? त्यामुळे संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलण्यास आपण प्रजा किंवा मतदार म्हणा अपुरे पडतो असे नाईलाजाने म्हणावं लागतं. समाज म्हणून आपण किती वर्षे अल्पसंख्याक-बहूसंख्यांक, जाती-जमाती, प्रान्त-भाषा ह्यात विभागलेले राहणार?

राज्यकर्त्यावर प्रजेचा, विरोधी पक्ष, स्वायस्थ संस्था जशा कि न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, सीबीआय ईडी, तसेच स्वंयसेवी संघटना, मिडीया इत्यादींचा अंकुश असणे गरजेचं असते. परंतु ह्यातील फक्त न्यायव्यवस्था जनतेच्या विश्वासास अधिक पात्र आहे असे दिसते. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमें ह्याचांही सरकारवर अकुंश असतो परंतु तो इतका वाखाणण्याजोगा नसतो. ह्याच कारण ह्या क्षेत्रात आलेला बाजारीपणा. निवडणूक आयोग, ईडी, कॅग, ह्या संस्थाचा कारभार समाधानकारक आहे. स्वंयसेवी संघटनाचं कार्य समाधानकारक आहे, तरीही काही स्वंयसेवी संघटनांचं काम वादग्रस्त असल्याचं चित्र समोर येत आहे. परदेशातून येणारी मदत पुष्कळदा देशात कुठलं तरी अंदोलन छेडण्यासाठी वापरली जाते. जगातल्या सामरिक दृष्टया आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि प्रगत देशांची ही नेहमीची खोड आहे. कारण तेथील निवडणूका वा सत्ता जिकंण्याचं आणि मोठमोठ्या बहूराष्ट्रीय कंपन्यांचे तसेच शस्त्रनिर्मीती करणार्या कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध मजबूत करण्याचं हे एक मोठं हत्यार आहे. आजही जगात बळी तो कान पिळी हाच न्याय आहे. बलाढ्य देश सतत संपत्ती आणि अत्याधुनिक शस्त्रांच्या जोरावर अविकसीत तसेच विकसनशील देशांत पर्यावरणाच्या नावाखाली कूठे अंदोलने, तर कुठे दशहतवाद्यांना अप्रत्यक्षरित्या मदत, कूठे नक्षलवाद, कुठे जिहादाचं भूत, कूठे ईलेट्राॅनिक्स मिडीयाला हाताशी घेऊन नवीन वाद निर्माण करून अस्थिरता माजवीत असतात. दूर्दैवाची गोष्ट ही की आपलेच मूठभर युवक, समाजबांधव अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नशेत चूकीची वाट पकडतात. आपण जेव्हा ह्या सार्या व्यवस्थेवर टिका करतो, तेव्हा आपण नागरिक म्हणून आदर्श आहोत कां? हा प्रश्न कोणाला विचारायाचा? वरील दोन्ही कथांत गावदेवीचं दर्शन घेणारे भाविक आणि चंद्रगुुप्ताच्या दरबारातील अधिकारी हे सुद्धा समाजाचे घटकच ना! ज्या संस्थांनी सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवावा,त्यांच्याच कारभारा बद्दल आपण असमाधानी असतो. त्या संस्थां मध्ये उच्चपदस्थ अधिकार्या पासून ते शिपाया पर्यंत काम करणारी मंडळी आपले समाज बांधवच ना! सरकारी आस्थापांनात काय नी खाजगी कंपन्यांत असणारी मंडळी, तेही आपलेच लोक. दस्तुरखुद्द सरकार चालवणारे लोकंही आपलेच. ह्यावरून हेच समजून घ्यावयाचे की आपल्या देशात घडणार्या सार्या बर्या- वाईट घटनांना समाज म्हणून आपणच जबाबदार ठरतो. 'Charity begines at home' हे सर्वसामान्यांना लागू होत नाही का? अगदी शंभर टक्के लागू होते. राज्यशास्त्रात म्हटले जाते कि, 'You get the government, what you deserve'. जसे आपण तसे आपले सरकार, तशा आपल्या संस्था. परंतु हे विधान फक्त लोकशाही राज्यप्रणालीलाच लागू होत असते असे नाही. एक पक्षीय राजवट असो वा राजेशाही किंवा लष्करी राजवट असो,  भ्रष्टाचार, पक्षपात, अशा कुप्रवत्ती सर्वच राज्यप्रणालीत दिसत असतात. एक वाक्य वाचनात आले आहे, ते असे "The progress of the nation is far less depend upon the form of it's institution, rather than the character of it's own men" कुठल्याही राष्ट्राचा विकास हा तिथे कुठल्या पध्दतीची राज्यप्रणाली आहे, ह्याही पेक्षा तिथल्या लोकांच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असतो. असे म्हटले जाते कि, "माणसामध्ये ज्या सहजप्रवृत्ती असतात त्या बदलता येत नाहीत. कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते वाकडेच राहणार! तीच अवस्था सहजप्रवृत्तीची असते". परंतु हे निव्वळ अर्धसत्य असावे. ज्यांच्यासमोर जीवनलक्ष्य नसते केवळ त्यांच्याबाबतीत खरे असावे. ध्येयनिष्ठ माणसांच्या बाबतीत तर 'नर करणी करे तो नरका नारायण बन जाय' हेच खरे असते. भक्त प्रल्हादाकडून इंद्रदेवाचा पराभव होतो. तेव्हा आपलं राज्य, वैभव परत मिळविण्यासाठी इंद्रदेव बृहस्पतीच्या सल्ल्यानुसार प्रल्हादाकडे याचक वेषात जातो. प्रल्हादाकडे शील मागतो. प्रल्हाद म्हणतो, "हे , माझे शील तूला दिले". त्वरित एक तेजस्वी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करते. ती आकृती शीलाची. पाठोपाठ शौर्य नावाची आकृती बाहेर पडते. ती इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करण्याअगोदर प्रल्हादाला म्हणते, "मी शीलाचं रक्षण करणारी, जेथे शील, तेथे मी". नंतर धनलक्ष्मी, विद्यादेवी, शक्तीदेवी, आणि शेवटी राजश्री प्रल्हादाच्या शरीराचा त्याग करून इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करती झाली. तात्पर्य हेच की शील असेल तर निष्ठा उच्च श्रेणीची बनते. मग कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. देशात बदल घडवायचा असेल तर प्रथम आपल्यात बदल केला पाहिजे. मग आपोआप समाजात बदल होतो. सर्व व्यवस्थांमध्ये बदल घडतो. भारताचे माजी राष्ट्रपती सन्माननीय श्री अब्दुल कलाम ह्यांच्या  European Union मधील भाषणातील काही भाग नमूद केल्याशिवाय  ह्या लेखाला पूर्णत्व येत नाही असे ठामपणे वाटत असल्यामुळे तो भाग खाली देऊन लेख  संपवितो.
"Where there is righteouness in the heart there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is an order in the Nation and when there is an order in the Nation there is peace  in the world."

सोमवार, १५ मे, २०१७

सामाजिक बांधिलकी



मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात समाजाची ढोबळ रित्या दोन वर्गात मांडणी केली. एक वस्तू-निर्मिती करणारा आणि दूसरा सेवा- निर्मिती करणारा. परंतू ही मांडणी व्यावहारिक पातळीवरील झाली. मुलतः माणूस समाजाशी ज्या कर्तव्याने स्वतःहाला बांधून घेतो ती 'सामाजिक बांधिलकी' म्हणजे काय? ह्याची ठोस स्वरूपात आणि संक्षिप्त रित्या व्याख्या करणे अवघड आहे. साधा अर्थ म्हणजे माणूसकी. परंतु ती परिपूर्ण व्याख्या होत नाही. ज्या गोष्टी व्याखेत बसत नाही, अशा सार्या गोष्टी निसर्गरम्य असतात, एवढं निश्चीत. मूलतः मनुष्याचं जीवन सामाजिक असते. ह्या जगात जितके म्हणून प्राणीमात्र आहेत, त्या सर्वात मनुष्य बुद्धीमान. त्या बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यापेक्षा मानवाने प्रगती करीत त्यांच्यावर हूकमत मिळविली. परंतु एखादी व्यक्ती दूसर्या व्यक्तीवर हूकमत गाजवावयास लागली, कि त्याला माणूसकी नाही, असे आपण मानतो. कां? येथूनच सामाजिक ह्या शब्दाच्या व्याख्येला सुरवात होते. मुंगीपासून वाघ, हत्ती सारखे प्राणी असोत, वा चिमणीपासून गिधाड्या सारखे पक्षी असोत, त्याचं जीवन सामुदायिक असते. पण सामाजिक नसते. त्यांच्या जीवनात कार्यव्यवस्था असू शकते. परंतु कर्तव्यभावना नसते. त्यांच्या कामात यांत्रिकता असते. पण भावना, बुद्धी, दूरदृष्टी, इतिहास, परंपरा, सम्यक ज्ञान यांचा त्यांच्या जीवनात अभाव असतो. मनुष्याच्या जवळ या सर्व गोष्टी असतात म्हणूनच तो सामाजिक जीवन जगतो.

मान्टेस्क नावाच्या विद्वानाने म्हटले आहे, "Man is a social animal being formed to please and enjoy in society." मनुष्य समाजात असला म्हणजे त्याला आनंद मिळतो. परिवार,विद्यालये,खेळ, नाट्य, संगीत, साहित्य, राष्ट्र, पंथ, संप्रदाय, सभा, संमेलने, उत्त्सव-समारोह, आदी नावाखाली चाललेले मनुष्याचे उद्योग त्याच्या सामाजिकतेचीच ग्वाही देतात. सामाजिक बांधिलकी ह्या शब्दात माणसाचं एकंदरीत समाजातील वागणं, तसेच लोकांशी व्यवहार (relationship) ह्या गोष्टीचाही अंतरभाव असतोच. ह्या संदर्भात एका पाश्चात्य विचारवंताने  म्हटले, "Be Civil to all, Social to many, Familiar with few, Friend to one, and Enemy to none. कोणाशीही वैर नसावे. एकदा का कोणी शत्रू नाहीत, असे आपल्या मनाने स्विकारले कि आपण सर्वांशी सुसंस्कृतपणाने वागू शकतो. Civil ह्या शब्दाचा Civic Science (नागरिक शास्त्र) प्रमाणे, शब्दशः अर्थ पकडला तरी अर्थ बदलत नाही. जसा मी देशाचा नागरिक, तसेच ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती देशाची नागरिक आहे, हे मान्य केले पाहिजे आणि ते ही मनापासून. जास्तीत जास्त लोकांशी सामाजिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोकांशी जवळीक असावी. जवळीक (familiar)    ह्याचा अर्थ आपल्या संताच्या शिकवणीच्या आधारे घ्यावयाचा असेल तर नेहमी सुसंगतीत असावे, असाच धरू या. आणि मैत्री एकाशीतरी असावी.  हा उपदेश ज्या कोणी साहित्याकाने दिला असेल, त्याला "एकच मित्र असावा" असे अभिप्रेत नाही. तसे असते तर त्याने only one friend असा शब्द वापरला असता.

सामाजिक बांधिलकी पुष्कळदा आपण दैनंदिन जीवनात अनुभवीत असतो. कोणाच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर सगेसोयरे, शेजार-पाजारी, मित्रपरिवार, सगेसोयरे, ओळखीपाळखीचे इतकेच काय पण अनोळखी आणि जातीपातीचा संबंध नसलेले लोक ही त्याच्याकडे येतात, त्याला मदत करतात, सात्वंन करतात. तसेच आपण दूसर्याच्यां सुखात ही सामील होतो. कुठे अपघात घडला तर त्या ठिकाणी जाऊन जखमींना रूग्णालयात नेण्याची जबाबदारी स्विकारणे, वादळ, पूर,भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावणे, अलीकडे शेतकर्याच्यां दुर्दैवी स्थितीत त्यांच्यासाठी उभार्यल्या जाणार्या निधीमध्ये आपलाही हातभार लागणे, शहीद जवानांच्या आप्तानां मदत करणे, वनवासी, दलीत-पीडीतांना सहाय्य करणे, रक्तदान, देहदान, वृक्षारोपण इत्यादी कामें करण्यात जो सहभागी होतो तो खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपतो. प्रत्यक्ष समाज कार्य आपल्या हातून घडत नसले तरी काही स्वंयसेवी संघटना आहेत जसे कि बाबा आमटे ह्यांनी सुरू केलेले उपक्रम, गिरीश प्रभुणे ह्यांनी भटक्या व विभुक्त जमातीसाठी यमगरवाडीत शाळा सुरू केलेला उपक्रम, सिंधुताई सकपाळांचा अनाथ मुलांसाठीचा उपक्रम, विश्वहिंदू परिषदेचे वनवासी कल्याण आश्रम, अशांना आर्थिक मदत वा मोफत कपडे, भांडी, पुस्तके, वह्या इत्यादींचं वाटप करून समाज कार्यात हातभार लावता येतो. मराठी विज्ञान षरिषद असो, वा साक्षरता आणि स्वच्छतेची मोहीम ह्यात आपला खारिचा वाटा उचलून अंशतः आपण समाजाचं ऋण फेडू शकतो. सगळ्या जगाशी तुसडेपणाने वागतो, शेजारी रडतोय तर रडू दे, रस्त्यावरून वुध्द आजोबा क्राॅसींग ओलाडंताना चाचपडत आहेत तर राहू द्या त्याला तसेच, गावाला आग लागली तर लागू दे. अशा वेळी माझं काही कर्तव्य आहे, हेच जो विसरतो, त्याला आपण माणूस मानतो का? नाही .

एकदा इसापाचा मालक झांथस इसापला म्हणाला, "मला नदीवर स्नानाला जायचे आहे. तेथे किती माणसे आहेत पाहून ये बरे. गर्दी असेल तर मी इतक्यात जाणार नाही." इसाप नदीवर जाऊन आला आणि म्हणाला,"महाराज तेथे एकही माणूस नाही." "घे तर मग माझे कपडे " असे म्हणून राजा नदीवर जायला निघाला. तेथे जाऊन पाहतो तो, नदीवर बरीच गर्दी होती. तेव्हा राजा इसापवर रागावला आणि म्हणाला, "काय रे,तू तर मला सांगितलेस की नदीवर एकही माणूस नाही!" इसाप म्हणाला, होय महाराज, मी जे सांगितले ते अगदी खरे आहे. हा पाहा, हा वाटेत एक मोठा दगड पडला आहे. येणार्या-जाणार्याला त्याची ठेच लागत आहे; पण कोणीही तो बाजूला सरकवीत नाही. ज्यांच्याजवळ माणूसकी नाही, जे दुसर्याचा विचार करीत नाहीत, त्यांना मी माणूस कसे म्हणू?" इसापने जे म्हटले त्यात काही चूक दिसत नाही.मग  माणूस कोण? असा प्रश्न आपल्याला पडतो.  ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक कथा सांगियली जाते, ती अशी आहे.

ईश्वराच्या मनात एकदा चैतन्याचं स्पूरण चढले. मग फार कष्ट करून त्याने पंचमहाभूते निर्माण केली आणि आपल्या घरी रात्री उशीरा पोहचला. आपल्या पत्नीला म्हणजेच शक्तीदेवीला आंनदाने माहिती दिली नतंर जेवण उरकून झोपी गेला. पण एक तासानंतर त्याला जाग आली. पुन्हा कामाला लागला. देवीने विचारले, हे काय विश्वभंरा, आपण झोप मोडून कामाला कसे लागलात?  ईश्वराने म्हटले, कालच्या पेक्षा आज भरपूर काम आहे आणि ते  बाहेर पडले. आता तर दुप्पट कष्ट घेतले आणि विविध झाडं, फूलं, पर्वत,दर्या-खोर्या, नद्या, समुद्र, डोंगर निर्माण केले.  विविध रंगीबेरंगी अशी सृष्टी तयार झाली. ईश्वर आपल्या घरी. परतला. आज तर स्वारी खुशीत होती. ईश्वराने आंनदाने सृष्टीचे वर्णन करून देवी कडून जेवण घेतले. झोपताना "आज मला चागंली झोप लागेल" असं म्हटलं देखील. कालच्या रात्री पेक्षा आज झोप चांगली लागली असे दिसू लागले. आज झोपून दोन तास झाले तरी त्याला जाग आली नाही. असे समजून देवी झोपण्याची तयारी करणार इतक्यात ईश्वर जागा झाला. आणि म्हणाला, देवी, मला आज फार ऊशीर होईल, असे म्हणून कामाला लागला. सृष्टी चांगली सजली होती, परंतु ईश्वराला तिच्यात हालचाल दिसत नव्हती. ईश्वराला हवी होती सृष्टीत movement. मग ईश्वराने विविध रंगाचे,विविध आकाराचे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, समुद्रांत, नद्यांत, सरोवरात विहार करणारे विविध प्राणी निर्माण केले आणि घरी परतला. आज ईश्वर फारच खुषीत होता. "सृष्टी सजली आणि चालती बोलती झाली, आनंद होणारच ". हे उदगार होते ईश्वराच्या अर्धांगीचे. आता माझे कार्य संपले असे म्हणत ईश्वर झोपी गेला. आज लगेच गाढ झोपली. परंतु चार तासानंतर जाग आली. देवीला झोपेतून ऊठविले आणि सांगितले, काम संपलं नाही. आता जे काम पुढ्यात आहे ते पूर्ण होण्यास अनेक वर्षे  लागतील. देवीलाही कळले. (ईश्वराचं एक वर्ष म्हणजे भूलोकातील सहस्त्र कोटी वर्षे). ईश्वर कामाला लागला. दिवस-रात्र कष्ट चालूच राहिले. कारण त्याला ह्या सृष्टीला सतत सृजन करणारा प्राणी निर्माण करावयाचा होता, नुसती movement करणारा नव्हे, तर improvement करणारा हवा होता आणि तो कसा असावा, तर सृष्टीला सृजन करीत करीत त्याचा म्हणजेच ईश्वराचा शोध घेईल. महत प्रयासा नंतर ईश्वराने हवा तसा प्राणी निर्माण केला. त्याचेच नाव आहे, मानव. 

जी सृजन होते ती सृष्टी. मानवाने समाज नावाची व्यवस्था निर्माण केली. त्यातूनच काही अलिखीत, काही लिखीत असे नियम बनले. त्या नियमाला अनुसरून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती त्याची सहज प्रवृत्ती मानली गेली. त्या नियमाला न जुमानता स्वतःच्याच हिताला प्रधान्य देऊन दुसर्या व्यक्तीचे अहित करून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती विकृती आणि विकृतीचं टोक गाठून अजूनही तसाच व्यवहार ती व्यक्ती करीत राहीली कि हळूहळू खाली पशुत्वाकडे पोहचते. ह्या उलट सामाजिक नियमांचं पालन करीत, आपल्या हिताचा त्याग करीत आपल्या हिस्साचं फळ दुसर्या समाजबांधवा साठी देतो तेव्हा प्रवृत्तीचं रूपांतर संस्कृतीत होते आणि  पुढे संस्कृतीच्या वाटेवर  निवृत्तीची वाट सुरू होत असते.  पण ती कोठून सुरू होत असावी याचा अंदाज बांधता येत नाही. पण ती वाट खडतर आणि प्रदीर्घच असते. तीच संताची वाट. तीच मोक्षप्राप्तीची वाट. तीच  पंढरीची वाट, जिथे जीवा शिवाची भेट होते.
 
सामाजिक भावना ज्याच्याजवळ ज्या प्रमाणात अधिक असेल, तो त्या प्रमाणात श्रेष्ठ मानला जातो. सर्व महापुरूषांच्या चरित्रांचे हेच सार आहे. आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचे हेच गमक आहे. तो महापुरूष प्राचीन असो की अर्वाचीन, पौर्वात्य असो की पाश्र्चिमात्य,तो आपल्या घरापेक्षा मोठा होतो, गावात, प्रांतात, देशात, आणि परदेशातही मोठा होतो. लोकांची दुःखे दुर करतो. त्यांना सन्मार्ग दाखवितो. प्रसंगी निंदानालस्ती,मानहानी सहन करतो. बस रामदास स्वामी ने म्हटल्याप्रमाणे "चंदनाचे परि त्वां झिजावें!". अशा मंडळींना माझे शतशः प्रणाम!.

गुरुवार, ११ मे, २०१७

व्यक्ती आणि समाज


मंडळी, पुष्कळदा संवादातूनही लिखाणासाठी विषय सूचतो, असे ऐकिवात आले आहे. राजेश खन्नाच्या चित्रपटातील एका गाण्यासाठी लागणारी चाल, नायक-नायिकेचं नृत्य, शूटींगचं ठिकाण, इत्यादी बाबी तयार होत्या आणि त्यावरून गीत तयार करण्याचे आव्हान गीतकारांसमोर होते. संगीतकारांच्या घरात बैठक संपली. गीतकारांना गाणं काही सुचलं नाही. गीतकार संगीतकारांना म्हणाले, अच्छा तो हम चलते है! संगीतकारांनी पृच्छा केली, फिर कब मिलोगे? असा संवाद झाला आणि गीतकार घरी गेल्यानंतर या संवादावरून गीत तयार केले. मराठीतील 'सखी चांदणी' ह्या अजरामर गाण्याचा जन्म संपूर्णतया वेगळा आहे. गीतकारांना गाणं सुचत नव्हतं आणि त्या कारणाने गीतकाराला रात्री झोप येत नव्हती. ते झोपेला आमंत्रण देत राहीले आणि तेच गाणं म्हणून स्विकारले गेले. अलीकडे माझ्या एका मित्राने "Your blog is gaining momentum" असा मेसेज मला पाठविला. मी त्याला आभार मानताना सहज म्हणालो, "आपण आपआपसात चर्चा करतो, त्यातूनही विषय सूचतात". मित्राशी बोलणं संपलं, माझं विचारचक्र सुरू झालं. बस त्यातून जे काही सूचत गेलं ते ते सारे लिहित गेलो. लेखाची व्याप्ती वाढत गेली. नंतर असे ठरविले जे काही लिहिलंय ते प्रत्यक्ष आपल्या पर्यंत पोहचवावे ते टप्प्याटप्प्याने. आपण स्वागत कराल अशी आशा बाळगतो.

लिखाणासाठी आधी शब्द सूचतात कि विषय? थोडया वेळासाठी वाटलं, विषय सुचला तरच लिखाण करू शकतो. लगेचच मनातल्या मनात म्हटलं, आपआपसांत चर्चा करतो, तीही आपल्या वाणीद्वारें बाहेर येणार्या शब्दातूनच की. आपण आपल्याशी बोलत असतो ते ही परा नावाच्या वाणीच्या साहाय्यानेच. चीनमधील तत्ववेत्ता कनफ्युशस म्हणतो "शब्द हा आत्म्याचा उद्गगार आहे". ज्ञानेश्वर महाराज, वाड़ःमयरूपी श्री गणेशाचे वर्णन करून, ज्ञानेश्वरी ग्रंथात सुरवातीलाच शब्दब्रह्माला नमन करतात. "हे शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ती सुवेष||". तुकाराम महराजांनीही म्हटले आहे, "तुका म्हणे पहा,शब्दाचि हा देव| शब्देंचि गौरव, पूजा||"

शब्द म्हणजे साक्षात ईश्वराचं रूप. असं म्हटलं जातं, कि भगवान शंकराने डमरू वाजविला. त्यातून "ॐ" असा ध्वनी निघाला. तेच नादब्रह्म आणि तेच ते अ ऊ म हे शब्दब्रह्म. मानवाने हे ईश्वरी रूप प्रथम अनुभविले ते आपल्या वाणीतूनच. पुढे ते क्रमशः अक्षरातून, म्हणजे लेखणीतून अनुभवयास सुरूवात झाली.मग छापखाने आले, शब्द छापून येऊ लागले, आता तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून शब्दांची भेट होत आहे. लेखनाची माध्यमे बदलत गेली. लेखनासाठी विषयाची सूची वाढत आहे. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. असे असुनही, लेखनासाठी लागणार्या विषयाचा उगम आजपावेतो मानवाच्या मेंदूतून आणि मनातील भावविश्वातून होत आहे. पुढेही ही क्रिया अशीच राहिल, असे वाटते. हे आपण शरीर विज्ञानात शिकलो आहे. समाज, आसपासचा परिसर, सृष्टीत घडणार्या घटना, निसर्ग व मानवामधलं नातं ह्या गोष्टी लेखनाचे स्त्रोत आहेत आणि भविष्यातही तेच स्त्रोत राहतील. असे वाटते. ह्याचं कारण या सृष्टीत सर्वात अधिक संवेदनशील प्राणी कोण आहे तर त्याच उत्तर निःसंदिग्धपणे 'मानव' हेच आहे. त्यामुळे आसपासचा परिसर, समाज ह्यांच्यासह राहणे हे त्याच्यासाठी नैसर्गिक आहे.

माणसाला समाजात राहायला आवडणं, हे आपण नैसर्गिक  मानलं. पण समाज म्हणजे काय? आणि निसर्ग म्हणजे काय? ह्या दोन्ही प्रश्नापैकी निसर्गाबाबतची व्याख्या अतिविस्तिर्ण      आहे. एका वाक्यात उत्तर  द्यावयाचे असेल तर    "पंचमहाभूताचा समुदाय" हेच होय. अंबामातेच्या स्तवनात म्हटले जाते "मेळोवोनी पंचमहाभूताचा मेळ, अंंबे त्वां रचिला  गोळ!" अशा ह्या पंचमहाभूतांची आपल्याला अनुभूती येत असते. त्यामुळे आणखिन खोलात जाऊन त्याविषयी चर्चा नको करुयात. निसर्गातील अगदी मेघांचा गडगडाट असो वा त्या पाठोपाठ आकाशात दिसणारे वीजेचे लोळ असो, वा अती वेगाने आणि तेही चक्रगतीने घोंघावणारे वादळ, सागराला येणार्या उंच उंच लाटा, अक्राळविक्राळ प्राणी, त्यांच्या भयंकर आरोळ्या आणि तसेच निसर्गातील न उलगडलेली रहस्यें, यामुळे असुरक्षिततेची भावना अष्मयुगापुर्वीपासूनच मानवामध्ये होती आणि त्यातूनच समूहामध्ये मानव राहू लागला. हा इतिहास आहे. समूहातून समाजाची निर्मिती आणि मग पुढे प्रगती होत होत जगात सर्वत्र प्रगत समाज(Civilized Society) निर्माण झाले. जगभरातील अनेक विद्वानांनी समाजाच्या व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी प्लेटोने म्हटले आहे, "मानवाच्या विविध गरजा व त्यांच्यी पूर्ती स्वतःच करण्याविषयीची त्याची असमर्थता या दोन कारणांमुळे समाज निर्माण झाला असावा". तर अॅरिस्टाॅट्लने, ती माणसाची उपजतप्रवृती असे मानले. आपल्या येथील ऋषीमूनीपासून ते संतांपर्यतांच्या महापुरूषांनी ह्यासंबंधी जे काही म्हटले आहे, त्याच सार एका वाक्यात सांगावयाचे, तर "सृष्टीमाजी जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे " हाच समाज.

आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे, आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. त्यातून समाजाच्या गरजा, त्रूटी तसेच मानव आणि निसर्ग हयामधील नातं काय आहे हे ही त्याला कळत गेलं असावं. समाजातील लोकांच्या ठायीं अंगभूत गुणवैशिष्ट्येही विभिन्न असतात. त्यामुळे समाजातील काही लोक आपल्या अगंभूत गूणांच्या आधारे समाजाच्या ऐहिक, गरजा पूर्ण करण्याचं काम हातात घेतात, तर कोणी वैचारिक गरजा पूर्ण करण्याचा कार्याला लागतात. आणखिन काही लोक भावनिक गरजा पुर्ण करण्याचं काम हाती घेतात. ऐहिक गरजा ह्या बहुतांशीं विविध वस्तूच्यां उपयोगातून वा उपभोगातून पूर्ण होतात. त्यामूळे ज्या लोकांमधला अंगभूत कल वस्तूनिर्मितीकडे असतो, त्यातून लघु उद्योगपती, मोठे उद्योगपती, व्यापारी, कारागिर, ठेकेदार, बिल्डर, औषधी उत्पादक, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलवाले, ट्रान्स्पोर्टवाले, हाॅटेलमालक, इत्यादी मंडळी उदयास आली असावीत. ह्यांना Entrepreneurs असेही म्हटले जाते आणि ज्या लोकांना सेवा निर्मितीचे अंग प्राप्त झाले आहे, त्यातून शास्त्रज्ञ, डाॅक्टर,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, शिल्पकार, शेतकरी, वकील, प्राध्यापक, चार्टड अकौंटंट, प्राध्यापक, प्रवचनकार, किर्तनबूवा प्रबोधनकार ही मंडळी उदयास आली असावी. हा माझा ढोबळ अंदाज आहे असेच समजावे. ह्या बाबतीत अधिक तार्किक दृष्टया खुलासा मानसशास्त्र, समाजशास्त्र, तसेच मानववंशशास्त्रातील तज्ञ मंडळीच करू शकतात.

माणसाच्या गरजा ह्या भौमैतिक पध्दतीने वाढत असतात. कूठलीही एक नविन सुविधा येते, तिच्यासंगे नवीन असुविधाही येत असते. त्यामुळे व्यक्ती, मग ती श्रीमंत असो, वा गरीब,पुरूष असो वा स्त्री, सदाकाळ सुखी राहिल ही गोष्ट असभंवनीय वाटते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे". पण मग सुखी होण्याचा मार्ग काय? समर्थांनीच उत्तर दिलयं, "विचारे मना तूची शोधून पाहे| मना त्वाची रे पूर्वसंचीत केले| तयासारिखे भोगणे प्राप्त झाले||". पूर्वसंचीता प्रमाणे भोग म्हणजे नेमकं काय? मागच्या जन्मीचे पाप पुण्य वगैरे म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून समाजात तुम्ही कसे वागता ह्यालाच तुमचे संचित म्हणावे. पाप काय नी पुण्य काय त्याच्या परीभाषा समाज हितानुरूपच ठरविलेल्या दिसतात. म्हणूनच माणसाने समाजाची चिंता केली पाहीजे. समाजाला दु:खी ठेवून तो एकटा सुखी होऊ शकणार नाही. त्याच प्रमाणे व्यक्तीला दु:खी ठेवून समाजही सुखी होऊ शकणार नाही. शरीरामधे ज्याप्रमाणे हृदयाकडून अवयवांकडे आणि अवयवांकडून हृदयाकडे रक्ताचे अखंड अभिसरण सुरू असते, त्याच प्रमाणे समाजाकडून व्यक्तीकडे आणि व्यक्तीकडून समाजाकडे सुखांचे, इच्छा-आकांक्षांचे, विचारांचे,तत्वज्ञानाचे आणि ध्येयवादाचे अभिसरण होत राहिले पाहिजे. या परस्पर आदान-प्रदानावरच मानवी समाजाचे सुख अवलंबून आहे.

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

मौल्यवान शिक्षण कोणतं?


आपले शिक्षण पूर्ण होते, आणि आपण जस जसे नोकरी -धंद्यात स्थिरावत जातो, तेव्हा आपल्याला एक स्पष्ट जाणीव होऊ लागते कि, आपलं शिक्षण अपुरं आहे. अनुभव हाच खरा गुरू हे पटू लागते. अनुभवाने आपण शहाणे होत जातो and I think that is ever lasting learning process. अर्थ हाच कि जीवनाच्या शाळेत आपण कायमचेच विद्यार्थी असतो. त्यामुळे सतत शिकत रहावे लागते, आणि त्या शिवाय पर्याय नाही. कारण The moment you stop learning, you become obsolete. असं कोणीतरी म्हटल्याचं आठवलं. विद्यार्थी दशेत आपण असतो, तेव्हा एक ठराविक अभ्यासक्रम असतो. तो आपल्याला शिकवला जातो आणि मग परीक्षा होते. पंरतु नोकरी-धंद्यात शिरतो, तेव्हा लक्षांत येते कि, जीवनाच्या शाळेत पावलो-पावली परीक्षा असते. त्यातून अभ्यासक्रमाची ओळख होत जाते. हा अभ्यासक्रम दिवसेंदिवस वाढत जातो. तो विविधांगी होत जातो. आता मी या घटकेला हा लेख लिहीत बसलो आहे, बघा, माझी येथेच चूक झाली. अगदी अचूक सांगायचं तर मी हा लेख सेलफोनवरील सॅमसंग नोट्सवर "टाईप" करीत आहे. मला ही ठाऊक नव्हते कि मी कधीकाळी अशाप्रकारची लिखाणाची पद्धत आत्मसात करीन. शेवटी काय, कालय तस्मै नमः| याहून अधिक काय  ?

कुंतल देशावर कुशलसेन नावाचा राजा राज्य करीत होता. एकदा दरबारात त्याने प्रश्न विचारला, शिक्षण कशासाठी हवं असतं? शिक्षणाची गरज काय? दरबारातील विद्वानांनी आपआपल्या परिने उत्तरं दिली. एक म्हणाला, शिक्षणामूळे मान मिळतो. "विद्या सर्वत्र पूज्यते |" दुसर्याने सांगितले, विद्येतून रोजगार उपलब्ध होतात. तिसर्याने उत्तर दिले, विद्येतूनच आपल्याला ह्या विश्वातील अनेक रहस्यं समजली. पंरतु राजाचं काही समाधान झाले नाही. मग दरबारातील एक विदूषक उभा राहिला, आणि म्हणाला, महाराज मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पंरतु माझी अट अशी आहे कि, उत्तर दिल्यानंतर आपण मला शिक्षा करणार नाहीत अशी हमी द्या. राजाने शिक्षा देणार नाही अशी हमी दिली. मग तो विदूषक म्हणाला, महाराज, असले फालतू प्रश्न कोणाच्याही मनात येऊ नये आणि आले तरी ते विचारून लोकांना सतावू नये. ह्यासाठीच शिक्षणाची गरज आहे. राजा निरूत्तर झाला. केवळ निरूत्तरच नव्हे तर जणू काही एखाद्या लढाईत पराभूत होऊन परतल्यावर जसा चेहरा होतो, तसा त्याचा चेहरा झाला होता. जवळजवळ पंधरा मिनिटभर दरबारात स्थब्धता पसरली होती. राजा भानावर आला, आणि लागलीच त्या विदूषकाला जवळ बोलावून शाबासकी दिली. मोठ्या मनाने विदूषकाचा गौरव केला. तेव्हा दरबारातील विद्वानांनी आणि सरदारांनी टाळ्या वाजविल्या. आता प्रश्न असा, कि राजाने विदूषकाचा गौरव करीपर्यंत दरबारातील विद्वान आणि सरदार गप्प का होते? खरं पाहता विदूषकाच्या उत्तराने राजा निरूत्तर झाला, तेव्हाच त्यांनी टाळ्या वाजवयाला हव्या होत्या. परंतु आपल्या राजाला दुखवावयाचं कसं ही भीती. ह्याचा अर्थ राजाची भाटगिरी करण्याची सवय जडली होती आणि तोच त्यांचा धर्म झाला होता. विदूषकाने दिलेल्या उत्तरामूळे "विद्येमूळे भीती नष्ट होते" ह्या शाश्वत सत्यावर शिक्कामोर्तब झाले. काळ बदलत गेला. राजेशाही नष्ट झाली. प्रजेच राज्य आले, तरीही राजापेक्षाही राजनिष्ठ असे विद्वान आजही पहावयास मिळतात. विशेषतः घराणेशाही लादणारे पक्ष जेव्हा सत्तेवर असतात, तेव्हा अशा प्रकारच्या विद्वानांची सारी मती, "आम्ही खरे निष्ठावंत" हे दाखविण्यात खर्ची पडते. असो.

आज शिक्षणाचं महत्व सर्वाना कळलं आहे. ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत. शिक्षणाच्या पारंपारिक शाखा म्हणजे, विज्ञान, कला,आणि वाणिज्य. ह्यांचा अगणित विस्तार झाला आहे आणि भरीस भर, रोज बदलत जाणारे तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विषयांसंबंधीची नुसती यादी द्यावयाची म्हटलं तरी घाम येईल. सुदैवाने आज विद्येच्या विस्तारित जाणार्या शाखां संबंधीचं मार्गदर्शन करणार्या संस्था ही उपलब्ध आहेत. शिक्षणाची गरज काय, हा प्रश्न संपलाय. आपल्या पाल्यांनी दहावी वा बारावी नंतर कूठच्या शाखेत प्रवेश घ्यावयास हवा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपली मूलंच शोधतात. आता मला पडलेला प्रश्न हा आहे कि कूठलं शिक्षण सर्वात मौल्यवान? आपण म्हणाल ,हा काय प्रश्न झाला? कूठलं शिक्षण मौल्यवान हे कसे ठरविणार? विद्येच्या जितक्या म्हणून शाखा आहेत,त्या सर्व मौल्यवान आहेत म्हणून कूठल्याही एका शाखेतील शिक्षण सर्वात मौल्यवान असं मानताच येत नाही. कूशलसेन राजाचा प्रश्न जसा कालबाह्य, तसाच हा प्रश्न ही कालबाह्य आहे. आपलं म्हणणं उचित आहे. पण जरासा विचार केला तर माझ्या प्रश्नाला उत्तर असावं, असे वाटते. आजचा काळ फार गतिमान आहे. रोज विज्ञान बदलत आहे. सर्वच क्षेत्रात जलदगतीने बदल होत आहेत. त्यामुळे आपल्यालाही बदलून घ्यावे लागतेच. ह्या बाबतीत कूणाच दूमत नसावे. आपल्या सार्यांच्या ह्या सहमतीतच, मौल्यवान शिक्षण कोणते,ह्या प्रश्नाचे उत्तर दडलयं. आपण शोध घेण्याचा प्रयत्न करू या.

एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना नायकाच्या गाडीला खोपोली येथे अपघात झाला. शूटिंग कोल्हापुरात होतं. राजवाडाचा सेट निर्माण केला होता आणि त्यासाठी संपूर्ण यूनिट पूर्ण तयारीत होतं. नायकाचा रोल भिकार्याचा होता. बहूतांश चित्रपटात नायक गरीब, दाखविलेला असतो. त्या शिवाय शेवट गोड कसा दाखविता येणार? असो, तर प्रसंग असा होता, कि त्या भिकार्याला राजाकडे कैफियत मांडायला प्रत्यक्ष राजाला भेटायचे होते. तो भिकारी दारू प्यालेला होता. व्यक्ती कोणीही असो, मद्याची कैफ असली कि त्याला कैफियती सूचतात. तो भिकारी नशेत राजमहालात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि राजमहालाचा द्वारपाल प्रत्येक वेळी त्याला अडवितो. त्या झटापटीत तो जखमी होतो. इतक्या भागाचं शूटिंग करावयाचे होते. कोल्हापुरात शूटिंग स्थळी दिग्दर्शकाला नायकाच्या सेक्रेटरीचा फोन येतो आणि अपघाताची माहिती मिळते. चित्रपटातील नायकाच्या पायाला मार लागला आहे आणि चार दिवस खोपोली येथील रूग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. फोनवरील बोलणं संपलं.  मुंबई येथून संपूर्ण यूनिट पूर्ण तयारीनिशी आलेलं असताना, शूटिंग रद्द करणे परवरडणारं नव्हत. काय करावे ह्या चितेंत असतानाच रस्त्यावरून दोन इसम एकत्र जात होते, ते दिग्दर्शकांनी पाहिले. त्यातील एका इसमाची शरीरयष्टी नायकाच्या शरीरयष्टीशी जूळत होती. दिग्दर्शकाने त्या दोघांना बोलावून घेतले. ज्या इसमाची शरीरयष्टी आपल्या नायकाच्या शरीरयष्टीशी जूळत होती, त्याला भिकार्याचा रोल करण्याविषयी गळ घातली. त्याला प्रसंग समाजावून दिला. तो इसम क्षणार्धात तयार ही झाला. त्याला मेकअप रूममध्ये नेऊन जरूरीप्रमाणे मेकअप करून घेतला. आता प्रत्यक्ष शूटिंग सूरू झालं. भिकार्याची मद्याच्या झिंगेतून द्वारपालाशी हूज्जत सूरू झाली. द्वारपालानी त्याला लोटले. पून्हा ऊठून तो राजमहालात जाण्याचा प्रयत्न करतो, यावेळी द्वारपालाने त्याला जोरात मागे लोटले. तो पून्हा कसाबसा उठत पून्हा हूज्जत घालीत राजमहालात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा द्वारपालाला प्रचंड राग येतो आणि भिकार्याला लाथ मारून तूडवतो. भिकारी दोन फूटांवर उताणा पडून त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागले. Scene ओके झाला आणि तो ही retake न करता. यूनिटमधील सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवून त्या भिकार्याचा जयघोष केला. त्याला आपल्या हाताचा आधार देत स्वतः दिग्दर्शकांनी उठविले आणि त्याच्या पाठीवर शाब्बासकी दिली. त्या इसमाचं मेकअप काढून त्याच्या जखमेवर जरूरी मलमपट्टी केली. नायकाच्या गैरहजेरीत शूटिंग पूर्ण झाल्यामूळे संभावित आर्थिक नूकसान टळलं. मनस्ताप टळला. वेळ वाचला आणि त्यातही नायकाची भूमिका करणार्या अनोळखी इसमाने रिटेक न करता शूटिंग पूर्ण केलं. त्यामुळे दिग्दर्शक महाशय फार खुषीत होते. चहापानाच्या वेळी दिग्दर्शक आपल्या सर्व स्टाफ च्या देखत त्या इसमाचं कौतुक करताना म्हणाले, "महाशय, आपण आज जो अभिनय केला,तो आमच्या ह्या सिनेमातील नायकाच्या तोडीचा आहे. त्यामुळे तुमचे आम्हांवर फार उपकार झाले. आहेत. Hats Off To You". दिग्दर्शकांनी त्याला विचारले, "महाशय, आपण या पूर्वी कधी अभिनय केला आहे कां? आपल्याला अभिनयाचा अनुभव आहे कां? तूम्ही फारच सूदंर रित्या अभिनय केला". त्या इसमाने उत्तर दिले, "सर, तसा काही अनुभव नाही. मी शाळा-काॅलेजमधील गॅदरींगमध्येही कधी भाग घेतला नाही". दिग्दर्शकांनी विचारले, " By the way, तूम्ही करता काय?, I mean your profession?" त्याने शांतपणे उत्तर दिले, "मी Lic चा एजंट आहे. आम्ही संयम शिकलो आहोत. आम्हाला दरवाज्यावरून प्रत्यक्ष असे ढकललेले नसले, तरी विम्यासाठी नकारघंटा फार वेळा अनुभवली आहे". दिग्दर्शकांने स्वतः त्या एजंट कडून विम्याची पाॅलीसी घेण्याचे ठोस आश्वासन दिले आणि अधूनमधून सिनेमात छोटे छोटे रोल देईन असं ही सागिंतले.

वरील उदाहरणवरून मौल्यवान शिक्षण कोणते, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे. काय बरं उत्तर असेल?विद्याच्या कोणत्या शाखेतील शिक्षण सर्वात मौल्यवान आहे? Are you still guessing? उत्तर एका साहित्यिकाच्या (बहुधा बेन्जामिन फ्रॅन्क्लीन) मूखातून ऐकू या. "The best valuable of all the education is to make yourself to do a job which u have to do and when it is ought to be done, whether you like it or not". "आपल्याला जेव्हा एखादं काम पार पाडायचं आहे, आणि ते आपल्या हातूनच व्हावे अशी नियतीची इच्छा असेल तर ते काम वा जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण पूर्णपणे त्या कामात झोकून घ्यावे. आपल्याला ते काम वा जबाबदारी आवडो वा ना आवडो, हेच खरे मौल्यवान शिक्षण आहे".

मंडळी, आजच्या काळात आपल्याला आवडणारं काम मिळेलच ह्याची शाश्वती नाही, आणि मिळालं तरी आपण ज्या पध्दतीने ते काम करतो, ती पद्धत बदललेली असू शकते. तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी तयारी करणे आवश्यक होत आहे. क्षेत्र कूठलेही असो, काळाबरोबर चालण्याची वा धावण्याची कला आत्मसात करणे हीच बाब महत्वाची होत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विख्यात तज्ञ, लेखक, अर्थतज्ञ, आणि सार्या मराठी समाजाला ज्यांचा अभिमान वाटतो असे अष्टपैलू व्यक्तीमत्व अच्युत गोडबोले ह्यांचा कळकळीचा आणि मोलाचा सल्ला आहे "सतत बदला, नाहितर नष्ट व्हा". येत्या काही दशकात आपल्या भोवतालचं जग कसे बदलत जाणार आहे, या विषयी अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती असलेला लेख सकाळ ह्या दैनिकाच्या संकेतस्थळावर वाचावयास मिळेल - http://beta1.esakal.com/saptarang/achyut-godbole-write-article-saptarang-38009. कृपया तो लेख आपण वाचावा आणि इतरानांही वाचण्यासाठी आग्रह धरावा. त्यातून एका परिने आपल्या हातून थोडसा का होईना डाॅ अच्चुत गोडबोले ह्यांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याला हातभार लागेल.

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

आपली वाणी, आपले यश

आपल्या साधू- सतांनी नेहमी चांगले बोलावे, मृदू बोलावे असा उपदेश केलेला आहे. सांजवेळी देवाला दिवा लावतो त्यावेळी आपण प्रार्थना म्हणतो, त्यात संतांनी दिलेला उपदेश आपण जाणीव पुर्वक गात असतो.

"उपासनेला दृढ चालवावें|भूदेव संतांसी सदा नमावे|
सत्कर्मेयोगें वय घालवावे| सर्वां मूखी मंगल बोलवावे|"

समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

"कठीण शब्दें वाईट वाटतें| हे तो प्रत्ययास येतें|
तरी मग वाईट बोलावे तें| काय निमित्य|
आपणांस चिमोटा घेतला| तेणे कासावीस जाला
आपणावरून दुसर्यास| राखीत जावें|
जे दुसर्यास दुःख करी| ते अपवित्र बैखरी|
आपणास घात करी| कोणेयेके प्रसंगी|"

आजच्या काळातील प्रथितयश मॅनेजमेंट गुरूही दासबोधाचा आधार घेतात. अशा रामदास स्वामींचा उपदेश जीवनातील प्रत्येक पायरीवर, प्रत्येक क्षेत्रात, त्रिकाल सत्याइतका उपयोगी पडतो. ह्यात नवल ते काय. आपण एका कथेच्या आधारे रामदास स्वामीच्या "आपणास घात करी!कोणेयेके प्रसंगी"या उपदेशाची प्रचिती कोणासं कशी व का येते?ते पाहू या.

एकदा एका राजाला आपल्या हस्तमूद्रिकावरून भविष्य जाणून घ्यावयाची इच्छा झाली. राजदरबारातल्या ज्योतिषीना  बोलाविण्यात आले. ज्योतिषीबूवा आले. राजाच्या बाजूला त्यांच्यासाठी ठेवलेल्या आसनावर बसले. राजाने आपला उजव्या हाताचा तळवा पुढे करीत म्हटले, बूवा सुरवात करा, आपली भविष्यवाणी! ज्योतिषीबूवा राजाचा हात न्याहाळत म्हणाले, "अहाहा!  किती सूदंर हात आहे आपला. आपल्या तळव्यावरील पराक्रमाची रेषा इतकी स्पष्ट आणि अखंडीत आहे कि, आपण युध्दात बलाढ्य राजांनांही पराभूत करणार आहात; अनेक राजे युद्ध न करतांच मांडलिकत्व स्विकारतील; खर्या अर्थाने चक्रवर्ती होण्याचा हा योग आहे". राजा म्हणाला, "व्वा छान! पुढे चला". जोतिषीबूवांनी रेषा पाहात म्हटले, "हातावरील ही विद्या रेषा गडद आहे; देश-विदेशातील विद्वान आपल्या आश्रायास येऊन आपल्या राज्यात विद्यालय सूरू करतील". "आणि ही धनरेषा, हीचं वर्णन शब्दांत करता येत नाही; आपल्या राज्याचा खजिना कधीच रिक्त होणार नाही; आपल्या राज्यात सगळी प्रजा सूखाने आणि शांततेने गुजराण करील". " महाराज, ही आयुष्य रेषा पहा, कूठे खंडित आहे, असे दिसत नाही; आपल्याला दिर्घ आयुष्य लाभणार आहे". पण---ज्योतिषीबूवा पुढे काही बोलणार, इतक्यांत महाराजांनी विचारले, "बूवा काही अपघात आणि शारीरिक इजा दर्शवित आहे कां?". ज्योतिषीबूवा म्हणाले, "तसं काही नाही, परंतु आपल्याला पूत्रशोक दिसतोय." महाराज गरजले, "खामोश! प्रधानजी, ह्या जोतिषीबूवांना नजरकैदेत ठेवा आणि जो पर्यंत दूसर्या ज्योतिषीबूवांकडून भविष्य कथन आम्हांस ऐकैवात येत नाही, तोपर्यंत ह्यांची सूटका नाही". सारा दरबार हबकला. आपण युवराजाला गमावणार; ही कल्पनाच अंत्यत  क्लेश देऊ लागली. राजदरबारातल्या ज्योतिषबुुुवांच्या ज्ञानासंबंधी कुणालाच शंंका नव्हती त्यामुळे सर्वानांच ज्योतिषीबूवांप्रति दया उत्पन्न झाली. परंतु दूसर्या बाजूला आपण युवराज गमावितो, हे दूःख. करावे तरी काय? महाराजांचं  सांत्वनही  करता येत नव्हतं; आणि  ज्योतिषीबुुुवा  प्रती  सहानुभूती दाखविता येत नव्हती. त्यामुळे महाराजांचा आदेश मोठ्या दूःखद अंतःकरणाने पाळावा लागला. ही वार्ता राज्यभर वार्यासारखी पसरली. प्रजाजनांना ही धक्का बसला. लोक आपआपसांत चावडीवर चर्चा करीत होते.आपल्या आदर्श आणि न्यायी राजासमोर काय हा दुःखाचा पहाड  येऊन  ठेपला आहे; अधूनमधून दबक्या आवाजात ज्योतिषी  बुवावर अन्याय होतो, अशी कुजबुज ही होऊ लागली. थोड्या दिवसानंतर 'आपल्या राजाला हातावरील रेषावरून भविष्य कथनासाठी राज्यातील  ज्योतिषींनी दरबारात यावे आणि जो कोणी अचूक शब्दात अचूक भविष्य वर्तवेल, त्याला मोठ्यात मोठं ईनाम देण्यात येईल'. अशी दवंडी राज्यभर फिरविली गेली. एकदा नव्हे, महिन्याभरात चारवेळा फिरवली. परंतु कोणी ज्योतिषी पुढे येण्यास धजेना.

एके दिवशी राजधानी च्या जवळील गावातील एका ज्योतिषीने हे आव्हान स्विकारण्याचे ठरविले. त्याचे आई-वडील, पत्नी,नातेवाईक, मित्रमंडळी गावकरी सर्वानांच धक्का बसला. सर्वच लोक आपआपल्या परीने या ना त्या प्रकारे त्याची समजूत काढीत होते. कोणी म्हणाले, "अरे राजदरबारातील इतका मोठा विद्वान ज्योतिषीबूवा, त्याला तू काय खोटे ठरविणार?" कोणी वेड्यात काढीत त्याला म्हणत होतं, "अरे, तूझ्या त्या वृद्ध आई- वडीलांकडे बघ, ती तूझी पत्नी, कच्चीबच्ची मूलं सोडून, स्वतःहून मरणाच्या दारात कां जातोस? तूझा काय मोठा ज्योतिषशास्त्रावरील अभ्यास?" बायको तर अक्षरशः पाया पडून रडत होती. रडून रडून तिचे डोळे सूजले. पण तो ऐकायला तयारच नव्हता. आई-वडील व पत्नीने देव पाण्यात ठेवले. त्याने आपले ज्योतिषी पोषाख अंगावर चढवला. कपाळावर चदंनाचा मोठा टिक्का लावला, गळ्यात रूद्राक्ष माळ, काखेवर मोठी झोळी, त्यात पंचाग आणि ज्योतिष शास्त्रवरील एक मोठा ग्रंथ टाकून स्वारी राजमहालाकडे निघाली. राजमहालाच्या द्वारापाशी येतांच रखवालदाराने त्याचा तो पेहराव पाहून त्याला ओळखले आणि प्रधानांकडे ज्योतिषिबूवा आल्याची वर्दी दिली. प्रधानाने राजाच्या आज्ञेप्रमाणे दरबार भरविला आणि त्या ज्योतिषिबूवांना दरबारात आणले. राजाच्या शेजारीच त्यांची आसन व्यवस्था केली. राजाने आपला हात पुढे केला आणि ज्योतिष कथनास सुरूवात झाली. "अहाहा! महाराज, किती सुंदर आहे, आपला हात!" एका मागोमाग एक रेषेवरील दिसत असलेले भविष्यकथन पुढे सरकत होते. आतापर्यत ज्या ज्या रेषांसंबंधीचं भविष्य वर्तवले गेले, त्यातील बरेच राजदरबारांतील ज्योतिषीने वर्णिले होते, त्याच्याशी तंतोतंत जूळत होतं. शेवटी त्या बूवांचे भविष्यकथन आयुष्य रेषेवर येऊन ठेपले. दरबारातील सारेजण तसेच दरबाराच्या वरील दालनात बसलेल्या राजमाता आणि राणीमहाराज ह्यांच्या छातीतील धडधड वाढू लागली. ज्योतिषी बूवा म्हणाले, "राजन, आपल्याला दिर्घ आयुष्य लाभलेले आहे आणि ते ही पूर्णतया निरोगी. ही रेषा आणखिन एक मोठं भाग्य दर्शवित आहे". सर्वांनी कान टवकारले. ज्योतिषी म्हणाले, "महाराज, जे भाग्य, अजूनही कोणत्याही राजाच्या वाटेला आले नाही, ते तुम्हाला लाभलयं. ते म्हणजे तूम्ही आपल्या नातवाला स्वतःच्या हाताने राज्याभिषेक करणार आहात". महाराज पाच मिनिटे स्थब्ध झाले. दरबारात  शांतता पसरली. नंतर राजानी म्हटलं," शाब्बास! ज्योतिषीबूवा! हेच ते, अचूक ज्योतिष,अचूक शब्दांत!" असे म्हणत राजाने ज्योतिषिबूवांना चक्क आपल्या मिठीत घेतले.(वाचकांच्या लक्षात आले असावे,कि ह्या ज्योतिषीबूवांनी अत्यंत खूबीने यूवराजाचा अपमृत्यूच्या भाकिताला बगल दिली). टाळ्यांच्या कडकडाट दरबारात घूमला. नंतर राजाने ज्योतिष बूवांना प्रश्न केला, बूवा तूमचा गूरू कोण? ज्योतिषी म्हणाले, "महाराज, क्षमा असावी, मला या क्षेत्रात कोणी गूरू नाही. ज्योतिषशास्त्र मी थोडेफार जाणतो आणि ते ही पूस्तक वाचूनच शिकलो आहे. मला माफ करा. ज्योतिष कथन हा माझा व्यवसाय नव्हे". राजाने चकित होऊन प्रतिप्रश्न केला, "मग तूमचा व्यवसाय कूठला?" बूवांनी ऊत्तर दिले, "महाराज, मी, एक सामान्य वाणी आहे". नंतर राजाने घोषित केलेल्याहून अधिक मोठ बक्षीस देऊन त्या ज्योतिषींचा सत्कार केला. राजाश्रय प्राप्त असलेले ज्योतिषी निर्विवादपणे ज्योतिष विषयात ज्ञानाने आणि अभ्यासाने सर्वश्रेष्ठ होते. या उलट साधारण प्रतीचं ज्ञान असूनही नंतर आलेल्या ज्योतिषीचा राजाकडून गौरव झाला. राजाने दरबारातील ज्योतिषिमहाराजाची सूटका केली आणि नंतर राजेमहाराज आपल्या विद्वान ज्योतिषीला म्हणाले, "सत्यम् बृयात्, प्रियम् बृयात् | न बृयात् सत्यम् अप्रियम्|" नेहमी सत्य बोलावे आणि जे प्रिय आहे तेच सांगावे. सत्य कडू असले, तर ते सांगू नये आणि तसे बोलणे भाग असले तर ते अशारितीने मांडावे कि ते ऐकणार्याला कडवट वाटू नये. त्या वाण्याचे स्वतःच्या वाणीवर पूर्ण नियंत्रण होते. नेहमी मृदू बोलण्याचा जाणिवपूर्वक सराव केला कि, आपोआप आपला स्वभाव मृदू बनतो. ही संतांची शिकवण त्याच्या वाचनात आली होती, ती त्याने आत्मसात केली. त्यामूळे राजाश्रय लाभलेल्या ज्योतिषबुवांची कूठे चूक झाली होती ही बाब त्याला उमगली होती. म्हणूनच त्याने आत्मविश्वासाने राजाचं भविष्य सांगण्याचं आव्हान स्विकारले होते आणि शेवटी तो यशस्वी झाला.

कठोर वागणे किंवा कठोर बोलणे अधिक परिणामकारक ठरते व तसे केल्याने आपल्या मोठेपणाची छाप पडते अशी आपली समजूत असते. तीच मूळी चुकीची असते. अगदी थोडासा विचार आणि प्रयोग केला तर आपल्या ध्यानात येते कि, सतत कठोर बोलण्यापेक्षा मृदु बोलणे अधिक प्रभावकारी ठरते. हे वरील उदाहरण वरुन आपल्या प्रत्ययास आले. म्हणून समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात

"दुसर्याच्यां दुःखे दुखवावे| परसंतोषे सुखी व्हावे|
प्राणीमात्रांस मिळवूनी घ्यावे| बर्या शब्दें|"

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

देशभक्ती नारेबाजीत नव्हे,अंतःकरणात हवी


सध्या आपल्या देशात देशभक्ती वरून राजकारण गाजत आहे. आपल्या देशात कूठल्या विषयांवर राजकारण होईल याचा नेम नसतो. कोणी राजकरणात धर्म आणतात तर कोणी धर्मावरून राजकारण करतात. कोणी खेळात राजकरण करतात तर कोणी राजकरणाचा खेळखंडोबा करतात. कोणी शिक्षण क्षेत्रात राजकारण करतात, तर कोणी शिक्षण संस्था काढून राजकारण करतात. मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्थंभ पण तिथेही Pro Govt and Anti Govt असे चित्र असते. मोठमोठ्या उद्योगसमूहातही राजकारण असते. असे एक ही क्षेत्र नसेल कि जिथे राजकरण दृष्टीस पडत नाही. शिक्षण संस्था, देवस्थाने, स्पोर्टस् क्लब, सहकारी बॅंका, सहकारी साखर कारखाने, विविध सहकारी संस्था या राजकारण नावाच्या अजगराच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. एकदा का लोकशाही स्विकारली कि तिच्यातील गूणदोषांसकट स्विकारणे क्रमप्राप्त ठरते आणि आपण ती स्विकारली आहे. आपल्या लोकशाहीची वाटचाल ही समाधानकारक सुरू आहे. ह्याचं श्रेय अहिंसेच्या वाटेवरील तसेच क्रांतीच्या मार्गावरील सर्व स्वातंत्र्यसेनानीकडे जाते. अनेक समाजसेवक,स्वयंसेवी संघटना, प्रबोधनकार ह्यांचही मोलाचं योगदान आहे. त्या योगदानातून आपल्याला स्वातंत्र्य आणि महत्वाचे म्हणजे जोडीला एक भक्कम सविंधान मिळाले. संविधानाने प्राप्त झालेल्या सार्वभौमत्वाला टिकवण्यासाठी अहोरात्र कटिबध्द असणार्या सेना व पोलीस दलांच्या बलिदानासही विसरून चालणार नाही.

सध्या बहूचर्चित देशभक्तीच्या विषयासाठी, मी ही प्रस्तावना का मांडली असा प्रश्न पडू शकतो. पंरतु या प्रस्तावनेवरून चर्चेची मांडणी केली कि आपण एका समाधानकारक उत्तरापर्यत पोहचू असे वाटते. स्वातंत्र्योत्तर काळानंतर बहूतांश काळ काॅग्रेसचीच सत्ता देशभर राहीली. त्यातील आणिबाणीचा काळ हा सविंधनावर आणि आपल्या स्वातंत्र्यावर घाला होता. पंरतु आपल्या जनतेने तोही परतवून लावला आणि त्या नंतर पून्हा काॅग्रेसला सत्तेवरही बसविले. हा इतिहास आहे. आणि हा इतिहास मान्य केला तर आपला मतदार सूजाण आणि जागरूक आहे हे ही मान्य करावे लागते. भाजप केंद्रातील सत्तेपाठोपाठ एक एक राज्य काबीज करू लागलाय ही बाब काॅग्रेस तसेच इतर पक्षांना फारसं रूचलेलं दिसत नाही. म्हणूनच वंदे मातरम्, गोहत्या बंदी आणि देशभक्ती सारख्या विषयांवर राजकारण होतय असं प्रथमदर्शनी दिसते. स्वातंत्र्योत्तर काळातील काॅंग्रेसच्या राजवटीविरूद्ध विरोधी पक्षांतर्फे अनेक अंदोलनं छेडली गेली. त्यात भाजप ही सामील होता आणि काही अदोंलने भाजपने स्वतंत्र रित्या छेडली परंतू पाकिस्तान जिदांबाद सारख्या घोषणा (जशा जेएनयू मध्ये झाल्या) कधीही झाल्या नाहीत तसेच पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर टिकाही झाली नाही. आज आपण काय पाहतोय? अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद, राहूल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेष यादव, दिग्विजयसिंह, मणीशंकर ऐय्यर इत्यादी नेते आणि आश्चर्यकारक म्हणजे सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेचे संजय राऊत आणि पक्षप्रमूख ऊद्धव ठाकरे ही वारंवार पातळी सोडून पंतप्रधान मोदींबाबत गरळ ओकत असतात.

वरील सर्व नेत्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करू या. काॅंग्रेस मग ती सोनिया काॅंग्रेस असो, वा राष्ट्रवादी वा तृणमूल, या पक्षांच्या नेत्यांच्या कूटुंबातील दोन चार अगोदरच्या पिढीतील सदस्याने कधीकाळी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला असल्यामूळे ही सारी मंडळी जन्मजात सत्ताधारी म्हणून जन्मले अशी समजूत करून घेत आहेत. लालूप्रसाद यादव तसेच अखिलेश यादव, मायावती आणि इतर जनता दल सारखे पक्ष सत्तेसाठी काॅग्रेस मधून बाहेर पडलेल्या लोकांनी स्थापन केलेल्या पक्षांचे नेते. त्यांची ही मानसिकता काॅंग्रेसच्या नेतेमंडळी सारखीच. तामीळनाडूतील पक्ष भले प्रादेशिक, ते ही काॅंग्रेस गोतावळीतील. कम्युनिस्ट पक्षांची नाळ रशिया आणि चीनशी जूळलेली. फक्त शिवसेनेचा इतिहास वेगळा आहे. तरीही तिच्या जन्मापासून काही काळ ती काॅंग्रेसधर्जिणी राहिली. वरील पक्षांपैकी कम्युनिस्ट सोडता सर्व पक्षांची नाळ देशाशी जोडली आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे कि कम्युनिस्ट उपरे आहेत, पंरतु जगातील कामगारांनो एक व्हा असे म्हणत म्हणत ज्या देशांत या पक्षांचा जन्म झाला ते देश सूद्धा इतर देशांनी आपल्या अंकित रहावे असा प्रयत्न करीत साम्राज्यवादी बनले आणि परिस्थितीनुरूप त्यांनी आर्थिक उदारिकरणही स्विकारले. असे असूनही आपल्या येथील कम्युनिस्ट पक्ष कूठच्या काळात वावरतात ते फक्त त्यानांच ठाऊक. पोथीनिष्ठपणा ज्यांच्या अंगात भिनलाय अशा कम्युनिस्ट पक्षांना भाजपचा राष्ट्रवाद भावणारा नसतो. भाजपशी आगळिक करण्यात ही मंडळी सर्वात पुढे असते. जेएनयू, दिल्ली विद्यापीठ वा कर्नाटकातील रोहित इत्यादी प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर भारतातील विद्यार्थ्यांचं ब्रेनवाॅश कसे करता येईल हाच त्यांचा अंजेडा राहात आला आहे. प.बंगाल मधून भूईसपाट झाले तरी त्यांना शहाणपण येत नाही. भाजपेतर पक्षांच्या सरकारला कम्युनिस्ट पक्षांनी वेळोवेळी समर्थन दिलेलं आहे आणि तसे करता करता ते मृत्यूशय्येवर येऊन पडले. सांराश हा कि राष्ट्रवाद आणि देशभक्ती ह्या विषयांवरील ह्यांच्या मताला भारतीय मतदार किंमत देत नाही. वरीलपैकी इतर पक्षांचं अल्पसंख्याकांच्या मतपेटी कडे भारी लक्ष. त्यामूळे दशहतवाद्यांना आपल्या सैनिकांनी उडवले तरी अशा घटना मानव आयोगा कडे कसे नेता येईल, या प्रयत्नांत ते आपली शक्ती खर्च करतात. मूळात ह्या सगळ्या पक्षांमध्ये अल्पसंख्याकांचे मसीहा होण्यासाठी अंतर्गत स्पर्धा असते. म्हणून भाजपला टारगेट करीत असतात. त्यातून बहूसंख्यक दुखावतो हे त्यांच्या लक्षांत येत नाही. देशभक्ती असो वा गोहत्या ह्यावर जे राजकारण चालू आहे हे अशोभनीय आहे यात काही वाद नाही. परंतु हा वाद आताच का उफाळून आला? यामागचे कारण काय? निःसंदिग्धपणे यात राजकारण आहे. काॅग्रेसच्या राजवटीत काही अमंगल घडले कि यामागे विदेशी शक्ती आहे, नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे असे म्हणण्याची फॅशनच होती. त्यावेळी असे काही अकलेचे कांदे सोलले की विरोधी पक्षांची एकजूट मृगजळ बनत असे आणि त्यामुळेच काॅग्रेसला फार काळ सत्ता भोगता आली. परंतु आता परिस्थिती उलट आहे.

संघ आणि भाजप ह्यांच्यावर सतत टिका करीत असूनही भाजप दिवसेंदिवस शक्तीशाली बनत चाललाय. ह्याचा अर्थ भाजपची विचारसरणी लोकांच्या पंसतीला येत आहे. भारतीय समाज गोहत्या बंदीला, कधी नव्हे इतकं समर्थन सोशल मिडीया वरून करताना दिसतोय. ह्याच कारण केवळ श्रद्धा म्हणून नव्हे तर गाईच दुध, मूत्र, शेण इत्यादीची उपयुक्तता तिही आधूनिक विज्ञानाच्या निकषावरून दाखविलेली लोकांच्या वाचनात येत आहे. वंदे मातरम् गायला आमच्या उपासनेत मान्यता नाही, म्हणून आम्ही गाणार नाही असे सतत बोलत राहिल्याने आपल्याला स्पेशल दर्जा मिळतो असा समज भाजपेतर पक्षांच्या सरकारांनी जोपासला आणि त्यातून तयार झालेल्या मानसिकतेतून बाहेर पडणे, मुस्लिम बांधवांना फार जड होत आहे. परंतु आता केंद्रात तसेच इतर राज्यात भाजपची सरकारं आहेत आणि त्या सरकारांचा कारभार "सबका साथ, सबका विकास‍| ना किसी एकके उपर मेहरबान!" ह्या तत्वावर चालणार. बहुमताने निवडून स्थापन झालेल्या सरकारची धोरणे पटत नसली तर सरकारशी चर्चा करणे हा सर्वमान्य उपाय आहे. सरकारचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी मुस्लिम समाज उत्सूक असूही शकतो. परंतु त्याचं वकीलपत्र मिळाल्याप्रमाणे झाडून सर्व विरोधी पक्ष आणि मिडीयातील तथाकथित बुद्धीवादी आक्रास्ताळेपणा करीत आहेत. आपल्या उपासनेत जे आहे, तेच मानायचे आणि विज्ञानातील संशोधन आणि त्याची उपयुक्तता स्विकारू नये असे थोडेच असते. तीनदा तलाक, तलाक तलाक, म्हणावयाचे आणि धर्माचा आडोसा घ्यावयाचा. कुटूंब नियोजनही स्विकारायचं नाही हे कूठवर चालणार? नवीन युगात वावरायच असेल तर आपण काळानुसार बदलायला हवे. हे अल्पसंख्याकांना समाजावून देण्यासाठी भाजपेतर पक्ष कंबर कसतील कां? अल्पसंख्याक असा दर्जा आणि अनुदानही घेणार, त्यातून काढलेल्या शाळांमधून आधूनिक शिक्षण मात्र घ्यायचे नाही, आपल्या शाळांना ह्या भूमीत जन्मलेल्या संताची नावे द्यावयाची नाही हे कितपत योग्य? यावर अल्पसंख्याक समाजाचे नेते मंडळी विचार कधी करणार? पतंप्रधान मोदींनी "सबका साथ सबका विकास" हाच मंत्र घेउन गुजरातचा कायापालट केला. ही केवळ घोषणा राहिली नाही, तर ही वस्तुस्थिती आहे आणि देशाला त्याच वाटेवरून ते नेत आहेत. याची खात्री लोकांना पटत आहे हे नाकारून कसे चालेल? कूठल्याही समस्येवर खात्रीलायक उपाय म्हणजे संवाद. त्यातून सहमती, पुढे सहकार्य आणि शेवटी सख्य. लोकशाहीचा कारभार हा कायद्यापेक्षा सामंजस्याने चालणे अधिक हितकारक असते.असे जगभरातील राज्यशास्त्रांवरील अभ्यासकांचे म्हणणे आहे.पण त्यासाठी अंतःकरणी एक ध्यास हवा. 

"मी स्वतंत्र आहे,पण इतका नाही कि मी संविधानाचां सन्मान करू नये. मी स्वतंत्र आहे, पण इतका नाही कि जी नैसर्गिक संसाधनं, पाणी, वीज, ह्यांच वारेमाप उपयोग करीन. मी स्वतंत्र आहे, पण इतका नाही कि पेट्राल, डिझेल सारख्या इंधनाची उधळपट्टी करीन. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि, माझ्या मागण्यांसाठी सरकारी मालमत्तेचे नूकसान करीन. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि अपघात, दूष्काळ, भूकंप, अवर्षण, नदीचा पूर , इत्यादी आपत्ती मध्ये सापडलेल्या देशबांधवांना मदत करू नये. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि मी काही समाज घटकाशी तूसडेपणाने वागेन किंवा एखाद्या घटकावर सोशल मिडीयात सभ्यता ओलांडून विनोद वा चूटके शेअर करीन. मी स्वतंत्र आहे परंतू इतका नाही कि, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा सरकार कडून मागत फिरेन. मी स्वतंत्र आहे परंतु इतका नाही कि सरकार मधील पदाचा दूरूपोयग करून माझी व माझ्या कुटुंबीयांच्या संपत्तीत सतत वाढ करीत राहीन. मी स्वतंत्र आहे, पण इतका नाही कि सरकारमध्ये रहावयाचे आणि केवळ सत्तेत वाटा कमी मिळाला म्हणून सरकारवर टिकाही करायची. मी स्वतंत्र आहे पण इतका नाही कि माझ्या उद्योगधंद्यातून मिळणार्या उत्पन्नातून काॅरपोरेट सोशल रीस्पाॅन्सिबीलीटीकडे पाठ फिरवीन. मी स्वतंत्र आहे परंतु इतका नाही कि मी माझ्या मनात येईल त्या पद्धतीने आसपास घड़णार्या घटनांचा विपर्यास करून त्यावर बोलेन वा छापून आणिन. मी स्वतंत्र आहे परंतु इतका नाही कि समाजाच्या कुठल्याही वर्गाच्या भावनांना ठेच पोहचेल असे बोलत राहिन वा तसे कृत्य करीन". या सार्या बाबी देशभक्तीच्या कसोट्या आहेत. त्या अल्पसंख्याक तसेच बहूसख्यांकांनाही लागू आहेत. मग ते मंत्री, आमदार, खासदार, इतर जनप्रतिनिधी असोत वा राजकिय पक्षांचे प्रमूख असोत. देशभक्ती ही केवळ नारेबाजीत नसते. ती अंतःकरणी असावी लागते. सार्वजनिक या शब्दातील सर्वजन मध्ये आपण असतो तेव्हा मी कूठल्या जातीचा, पंथाचा नसतो. मी असतो फक्त आणि फक्त या प्रजासत्ताक भारतातील एक नागरिक. आणि म्हणून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ राहतील हे मी पाहीन. किमान मी ती बिघवडणार नाही. माझ्यालेखी देशभक्ती ची हीच सोपी व्याख्या असू शकते. 

भाजप सत्तेवर आलेला आहे आणि निवडणूकां मागून निवडणूका जिकंत आहे, त्यावरून विरोधी पक्षांनी हे ही समजावयास हवे कि मतदारांना भाजपची धोरणं माहित आहेत. केवळ भावनेच्या आहारी जाऊन मतदार मतं देतात या भ्रमातून विरोधी पक्ष, तसेच त्यांची पाठराखण करीत असणार्या न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रवाल्यांनी बाहेर येणं आवश्यक आहे. अलीकडे मार्क टूली, ह्या बीबीसीच्या प्रथितयश संपादकांनी, भारत मोदींच्या नेतृत्वाखाली बदलत आहे असे आपल्या लेखात म्हटले आहे. इतकंच नव्हे तर मोदी सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लृप्त्या काढण्याचे प्रकार घडत आहेत असेही सूतोवाच करायला विसरले नाहीत. एक शाश्वत सिद्धांत माझ्या वाचनात आला आहे, तो मांडून या लेखाची समाप्ती करतो. There are some eternal principles which never change even with the time. One of them is that, when there is a conflict between individual and a group, then group's interest must prevail. When a conflict is between group and organisation, then organisation's interest must prevail and when there is a conflict between organisation and nation, nation's intrest has to be prevailed at any cost". "काही शाश्वत सिद्धांत असे असतात ते काळ बदलला तरी बदलत नाहीत. त्यापैकी एक असा आहे, कि व्यक्ती आणि समूहामध्ये बखेडा उभा राहिला, तर समूहाच्या हिताला प्राधान्य द्यावे. समूह आणि संस्थेमध्ये बखेडा असला तर संस्थेच्या हिताला, आणि संस्था व देश ह्यांच्यात बखेडा असला तर निःसंदिग्धपणे देशाचेच हित जपलं पाहिजे". वंदे मातरम् ||

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...