शुक्रवार, १ मे, २०२०

मुक्काम पोस्ट लाॅकडाऊन वरून (भाग १)


आपण सारे लाॅकडाऊन मध्ये आहोत. मार्च गेला, एप्रिल महिना ही संपला. लाॅकडाऊनमध्ये दोन प्रश्न आपल्यासमोर प्रामुख्याने आहेत ते म्हणजे कोरोनाची दशहत संपून लाॅकडाऊन कधी उठेल आणि कोरोना नंतरचे जग कसे असेल, आपला देश ( विशेषकरून अर्थव्यवस्था व रोजगाराच्या संधी संबंधीत )  कसा असेल? या दोन्ही प्रश्नासंबंधीच्या उत्तराबाबत अनेक जाणकारांची भाष्यें आपल्या पर्यंत विविध माध्यमातून पोहचली आहेत. त्याचा उहापोह करायचा हा प्रयत्न आहे. या शतकाच्या पुढील सर्व घटनांना व्यापून उरणारा हा विषय आहे. त्यामूळे  तसा उहापोह कितीही थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला तरी एका लेखात पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून आपल्या चर्चेचा हा पहीला भाग आहे असे समजू या. प्रथम अर्थातच पहील्या प्रश्नावर कोरोनाची दशहत व त्यातून आपल्या वाट्याला आलेला ऐताहासिक लाॅकडाऊन कधी उठेल या प्रश्ना वर चर्चा करू या.

कोरोनाचा फैलाव व त्यावरील उपाय या बाबतीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळीत ही मतातंरे दिसत आहेत.  स्विडनचे ख्यातनाम इपिडोमीलाॅजिस्ट डाॅ जाॅन जिइसेक यांचे म्हणणे असे आहे की सार्वजनिक आरोग्यबाबत एकंदरीत झालेले दुर्लक्ष आणि त्यातून ढासळलेली रोगप्रतिकार शक्तीमूळे संसर्गजन्य रोगाच्या साथीत मृत्यूची संख्या वाढते असे ते म्हणत आहेत. ते संपूर्ण लाॅकडाऊनला फारसे समर्थन करीत नाहीत.  दुसरे संसर्गजन्य रोगासंबंधीचे डाॅक्टर जे पी मालीयिल लोकांमधील  रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करतात पण पुर्ण लाॅकडाऊनचे समर्थन करतात. डाॅ गॅल्लो यांनी पोलिओची लस एक उपाय सुचविला आहे. आपल्या दिल्लीतील एम्सचे संचालक  डाॅ रणदीप गुरेलियांनी पाच-सहा दिवसापूर्वी कोरोना दशहतीचे स्वरूप वस्तुस्थितीला धरून स्पष्ट केले आहे.  ते मला पटले व भावले ही. ते म्हणतात,
" Stigmatising of Covid-19 patients and families  is resulting in turning up cases late at hospitals, with hightened breathlessness and this could mean increased morbidity and mortality  " त्यानी पुढे म्हटले आहे की  ८० टक्के रूग्ण नीटपणे उपचार व काळजी घेतली तर बरे होतात. १० टक्के रूग्ण अधिक उपचाराने बरे होतात तर ५ टक्के रूग्णाला व्हेन्टीलेटर वर ठेवावे लागते. तर उरलेले ५ टक्के धोक्याची पातळीच्या पलिकडे जाऊन दगाविण्याची शक्यता असते. " थोडक्यात कोरोना बाधित रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेल्या घुसमटीमूळे रूग्णांना हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात उशीर होतो. त्यामूळे मृत्युदर वाढतो असे डाॅ गुरेलियांनी म्हटले आहे. त्यातून असे दिसते की, कुठेतरी क्वाॅरान्टाईनच्या उपायातून आपल्या येथील रूग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या मनात अपराधीपणाची वा न्युनगंडाची भावना उत्पन्न होत असावी व त्यांतून रूग्णाला हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात उशीर होत असावा.  सरकार व प्रशासन, वेळोवेळी लोकांना आवाहन करीत आहे की ' भिती सोडा, कोरोनाची बाधा लपवू नका , उपचार घ्या व बरे होऊन घरी जा.' पण प्रतिसाद कमी मिळतो वा उशीरा मिळत असावा.

या पुढील काळात  कुत्रीम विषाणू वा नैसर्गिक जीवाणूंचा संसर्ग होऊन रोगाची लागण अधूनमधून होत राहणार आहे. अशा वेळी आपल्या समाजाची क्वाॅरान्टाईन बाबत गैरसमज व सतराव्या शतकातील मानसिकता टिकून राहिली तर  ही फार गंभीर बाब आहे. रूग्णाला व त्याच्या परिवाराला संपूर्ण समाज आपला आधार आहे असे वाटले पाहीजे. त्यासाठी वातावरण निर्माण करावे लागणार आहे. जनजागृती ही आवश्यक आहेच. शिवाय आपल्या धर्मातील कलमाच्या आडोशाला जाऊन समाजप्रवाह सोबत न येणार्या समाज वर्गाला कडक शब्दात सुनवावे लागेल. अशा वेळी आपल्या मतपेटीचा विचार करून कोण्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अप्रत्यक्ष रित्या आंदोलने छेडण्यास एखाद्या समाज वर्गाला उद्युक्त केले तर त्या नेत्यांना व आंदोलन करण्यांर्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून वठणीवर  आणायला हवे असे वाटते.  कारण लोकशाही व्यवस्थेची जडण-घडणच मुळी  ' बहूजन हिताय ' या ध्येयावर आधारलेली आहे. आणि हे सूत्र संसर्ग रोगाच्या महामारीत जर न पाळले गेले तर देशाचेच अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पुढचा काळ एक समाज, एक देश हेच राज्यकारभाराचे सूत्र राहणार आहे. आपण एक मतदार, एक नागरिक म्हणून लक्षात ठेवावे की  पुढील काळात संसर्गजन्य रोगाची लागण इतरांना झाली की आपण  सुपात असलो तरी रूग्णासाठी ठेवलेल्या स्वतंत्र जात्यात (म्हणजे रूग्णालय वा क्वाॅरान्टाईन मध्ये) आपण ही असणार आहोत हे सदैव लक्षात ठेवून रूग्णाविषयी आत्मीयता बाळगावी. तसेच आपल्या स्वतःच्या वर्तनाने म्हणजे सामाजिक अंतर न पाळून रोगाचा प्रादुर्भाव वाढू  न देणे हे सध्या आपले केवळ  कर्तव्य मानले जाते ते बंधनकारक करून कठोर शिक्षेची तरतुद करणारा स्वतंत्र कायदा  विद्यमान संसदेने एकमताने संमत करावा जेणे करून समाजाचे भविष्य सुरक्षित करून ठेवता येईल.

दुसरीकडे  ' सामाजिक अंतर ' कायद्याच्या भंग करणार्या अनेक घटना घडतच आहेत. हा लेख लिहीत असताना देशातील कोरोना बाधीत रूग्णाची संख्या ३३००० च्या पुढे गेली आहे आणि मृत्युचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. देशातील कोरोना बाधीत रूग्ण बरें झालेल्याची संख्या ७००० च्या पुढे आहे, म्हणजे २४ टक्याच्या आसपास आहे तर मृत्यूदर ३•७ टक्के आहे. याचा अर्थ सोशल डिस्टन्स्टींग चा उपाय यशस्वी ठरत आहे असे दिसते. त्यामूळे लाॅकडाऊनवर टिका करण्याला केंद्र सरकार तर्फे उत्तर मिळाले आहे. कोरोना बाधीत रूग्णाची आपल्या महाराष्ट्रातील संख्या १००००च्या वर गेली आहे. महाराष्ट्राचा देशातील प्रगत राज्य हा मान टिकवयाचा असेल तर किमान केंद्र सरकार इतकी जरी नसली तरी जवळपास जाऊ शकेल अशी कामगिरी करावी लागेल. तशी कामगिरी महाविकास आघाडी सरकार करेल अशी आशा करू या.

केंद्रीय गृह खात्याने  लाॅकडाऊन अंशतः उठविली आहे अशी बातमी हा लेख लिहीत असताना फ्लॅश झाली आहे. त्यासंबंधी खबरदारी कशी घ्यावी अशी मार्गदर्शिका केंद्र सरकारने राज्यांना पाठविली आहे. जे मजूर देशातील विविध ठिकाणी अडकले होते त्यांना आपआपल्या राज्यात परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.  ही व्यवस्था सुरळीत व्हावी अशी अपेक्षा प्रत्येक राज्यातील सरकार पुर्ण करेल अशी आशा बाळगावयास हरकत नाही. आज लाॅकडाऊन अंशतः संपला आहे. पण देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात यावयास जूलै उजाडेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.  विशेष करून मुंबई व पुण्यातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोनावरील लस शोधण्याचे कार्य जगभरातील सर्व देशात सुरू आहेत. कोरोना वरील उपायाबाबत तज्ञांमध्ये मतभेद असले तरी दिवस- रात्र संशोधन करण्यात गुंतलेले डाॅक्टर्स, तंत्रज्ञ, वैज्ञानिक आपआपले संशोधन शेअर करीत असतात. ही या लाॅकडाऊनच्या काळातील दिलासा देणारी बातमी आहे. दिल्ली येथील आयआयटी चे प्राध्यापक बिस्वजीत कुंडू यांनी ही एक दिलासा देणारी बातमी आपल्याला दिली आहे.  प्राध्यापक बिस्वजीत कुंडू व त्यांच्या सहकार्यांनी कोरोना उपचारावरील डी - किट तयार करण्यात यश मिळविले आहे. काही भारतीय कंपन्याशी बोलणी होतील व पुढील तीन आठवड्यात स्वदेशी बनावटीचे डी-कीट बाजारात उपलब्ध होतील ते ही कमी किमतीत. या संकटकाळात मेक इन इंडीया  च्या वाटचालीतले हे आपल्या मोठे पाऊल आहे. ' हॅट्स ऑफ टू बिस्वजीत ॲन्ड हिज टिममेट्स !'

या लेखात बहूतांश ठिकाणी मी आशावाद व्यक्त केला आहे. ती एक स्वाभाविक बाब आहे. राजकारणातील विभिन्न इझम पेक्षा आशाइझम चांगलाच होय. आज  बैजू बावरा या गाजलेल्या चित्रपटाची आठवण येते. त्यातील  नैराश्याने ग्रासलेला नायक आपली कैफियत ईश्वरासमोर एका गीतात मांडतो. त्याचे पहीले कडवे खालील प्रमाणे आहे--
" ओ दुनियाके रखवाले, सुन दर्दभरे मोरे नालें,
   सुन दर्द भरे मेरे नाले |
"आश- निराश के दो रंगोसे दुनिया तूने सजायी | "
मानवी जीवन एक प्रवास आहे. कुठे सपाट, चांगला रस्ता, तर पुढे खांच-खळगे व धोक्याच्या वळणानी भरलेला. चित्रपटातील बैजू निराश होता पण ईश्वराशी त्रासिक, वा त्वेषाने असभ्य भाषेत बोलत नाही. तो  
'दो रंगोसे दुनिया तूने सजायी है ' असे भावपूर्ण भाषेतच  बोलतो. शेवटी विख्यात गायक तानसेनशी रंगलेल्या जुगलबंदीत तो विजयी ठरतो.  तानसेनच्या नियमामूळे आपल्या पिताश्रीला देहदंडाची जबर शिक्षा आपल्या डोळ्यादेखत, ते ही बालवयात पाहिलेल्या बैजूच्या मनात सूडबुद्धीचा विचार शिवला नाही आणि तानसेनला जीवदान दिले. तानसेनला जीवदान देताना कुठलाही अंहकार नाही उलट  तानसेनासंबंधी आदर व्यक्त करताना त्याच्या मुखातून सहजबोल आले, ' आज संगीतको संजीवनी मिल गयी है | ' ही आपली संस्कृती व हीच खरी संपत्ती. ती ही जपावी लागेल कारण संकटसमयी तीच आपली शक्ती ठरते असा आपला इतिहास आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाने आपले जीवन सुलभ झाले असले तरी जीवनातील आशा व निराशाचा खेळ संपणार नाही असेच वाटते. अन्न, वस्त्र, निवारा, हवा,  पाणी, कपडालत्ता, पैसा, ज्ञान, विज्ञान, इतके जगण्यासाठी असूनही मनुष्य आशेवर जगत असतो. प्रयत्नाने सर्व काही प्राप्त होत असते हे जरी सत्य असले तरी आपल्या नियंत्रणाच्या पलिकडील शक्तीमूळे नको ते घडते व आपल्याला क्लेश देऊन जाते. आपल्या व्यक्तीगत जीवनात अशा घटना घडतात तेव्हा आपण किती हादरतो. पण स्वतःला सावरतोच ना. तशाच घटना देशाच्या बाबतीतही घडतात. आपले काही ही चूकले नसताना आपल्या देशावर लाॅकडाऊनची वेळ आली आहे. ठिक आहे. ' वेळेची एक गोष्ट बरी आहे,  ती कशी का असेना, पण कधी थांबत नाही.' हाच तो शाश्वत नियम आपण लाॅकडाऊनच्या काळात स्मरणात ठेवू या. 

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

कोरोनाशी लढतीतले आपले शस्त्र -- आम्ही एकशे पाच



कोरोनाशी आपली लढत या शिर्षकाखाली चार लेख लिहल्यानंतर या लेखाचे शिर्षक का बदलावे लागले हे आपल्या सारख्या सुज्ञ वाचकांना सांगावयाची गरज नाही. आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे; त्यामूळे माहितीचा महापूर अहोरात्र सुरू असतो. त्यात राजकीय घडामोडीच्या बातम्याचा नंबर पहीला लागतो. असे का होत आहे, त्यासंबंधीचा दोष जितका राजकीय पक्षांना जातो तितकाच लोकशाही राज्यव्यस्थेतील मतदार म्हणून आपल्याकडे ही येतो हे प्रथम मान्य करूनच आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.

कोरोनाशी सुरू असलेली आपली लढत कधी संपेल या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.  प्रगत देशात ही कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आपण पाहात आहोत. आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग इतर देशाच्या तुलनेत कमी असला तरी रूग्णाची वाढती संख्या केवळ चिंताजनकच नाही तर भयावह आहे. याचे कारण कोरोनाशी आपली लढत जितकी लांबली जाईल तितक्या आरोग्य, आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, सामाजिक, क्षेत्रातील समस्या जटील होत जातील. शिवाय कुंटुब व्यवस्थेतील भावनिक समस्या नव्याने उभ्या राहतील. आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तिसर्या स्टेजवर गेला नाही ही आपली जमेची बाजू आहे. त्यासंबंधीचे उच्चस्तरीय श्रेय निश्चीतच आज प्रत्यक्ष रणांगणावर चोवीस तास लढत देणारे डाॅक्टर्स , नर्स, प्रशासकीय वर्ग, सफाई कर्मचारी, पोलीस व जवान, स्वयंसेवी संस्था इत्यादींना जाते. त्यानंतर सरकार मग ते केंद्र असो वा राज्यातले यांना श्रेय जाते. सरकारचे काम लढतीची आखणी, त्यानुसार कार्यन्वाही, विविध यंत्रणेतील समन्वय,आणि धन व रसद पुरवठा हे असते. आजच्या घडीला केंद्र व विविध राज्यातील सरकारचे काम समाधानकारक आहे याबाबत दुमत नाही. पण आपली राजकीय व्यवस्था अशी आहे की देशाच्या शत्रु राष्ट्राने दशहतवादी हल्याच्या रूपाने निर्माण केलेल्या  आपत्ती काळात असो वा  नैसर्गिक आपत्तीच्या काळात, आपल्या राजकीय पक्षांना राजकीय फायद्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करावा, याचे भान राहात नाही. त्यामूळे ज्या राजकीय पक्षाशी आपली जवळीक आहे त्याचे कौतूक व ज्या राजकीय पक्षाशी जवळीक नाही अशा पक्षावर टिका करण्याची सवय लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणून मानला जातो, अशा प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयाला लागली आहे. तेथूनच या सवयीची लागण राजकीय अभ्यासक म्हणून मिरविणारी विचारवंत व संपादक मंडळीना आणि पुढे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांपर्यंत पोहचलेली  दिसते. आपला देशच नव्हे तर आख्ख जग  कोरोना सारख्या महासंकटात सापडलेले असताना राजकिय पक्षांतील सुंदोपोसुंदीचे दर्शन चॅनेल वरील चर्चेतून होत आहे. सोशल मिडीयावर ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भांडत असल्याचे आपण पाहातो. प्रिन्ट व इलेट्राॅनिक्स मिडीयाचे सुत्र नावाचे अपत्य कोणते हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना अजूनही ज्ञात झाले नाही हा आपल्या लोकशाही व्यवस्थेतील मोठा दोष आहे.  त्यामूळे तिथे परस्परात होणारी स्पर्धा आपल्याला मुकाटपणे पाहावी लागते. सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळात राजकीय पक्षांतील नेत्या मध्यें या संकट काळात केलेल्या लोकोपयोगी कामाचे श्रेय घेण्याची सुरू असलेली स्पर्धा, मिडीयातून कोरोना रूग्णाची वाढती संख्या सांगताना अँकरच्या चेहर्यावर न दिसणारे गांभीर्य  या सार्या गोष्टी फारच खटकतात. माझा मुद्दा असा आहे की विज्ञान युगात आपण राहातो, मिरवतो, पण आपले आचार, विचार, वर्तन आदिम काळातील मानवा सारखे होत आहे की काय असा  प्रश्न जगभरातील अनेक समाजशास्त्रज्ञाला भेडसावत आहे.  बर्टाड रसेल नावाच्या विचारवंताने म्हटले आहे की, 'मानवाचा मुलभूत विकास झाल्याशिवाय वैज्ञानिक प्रगती त्याच्या पचनी पडणार नाही.' हे आज पटते. आपले महात्मा गांधीजींनी मानव जातीला सल्ला देताना म्हटले आहे की,  'सबकी जरूरतें पुरी करनेकी क्षमता अपनी धरती माँके पास है पर अपनी लालच पुरी करनेकी नही है | ' हा सल्ला पदोपदी आठवतो. आपल्या अध्यात्माचे मेरूमणी स्वामी विवेकानंदानी अमेरिका व युरोपातून मायदेशी परतल्यावर एके ठिकाणी म्हटले आहे, की आजचा युरोप ज्वालामूखीच्या तोंडाशी उभा आहे.' विवेकानंदाच्या महानिर्वाणनंतर जगात झालेली दोन महायुद्धे, सतत तिसर्या महायुद्धाचे वाहात असलेले ढग, आता सुरू होत असलेले जैविक युद्ध पाहता विवेकानंदाची भविष्यवाणी खरी ठरत आहे. कोरोना व्हायरस हा नैसर्गिक आहे की जैवीक अस्त्राच्या युद्धाचा प्रारंभ आहे हेच कळेनासे झाले आहे. जर हा व्हायरस चीनने बनविला असेल तरी आपल्या धर्मशास्त्रात उत्पत्ती, स्थिती, लय हा निसर्ग नियम असे म्हटले आहे तेच उत्तर आपल्या हाती येते.  मग विज्ञानाने आपण सुसंस्कृत झालो आहोत असे कसें मानावे ? निसर्ग नियमा नुसार कोरोनोचे थैमान थांबणार आहेच, ते काही या सृष्टीचा आताच पुर्ण विंध्वस करणार नाही. पण कोरोनारूपी संकटामूळे जगाचे चित्र बदलणार आहे हे निश्चीत. अनेक देशातील राज्य, समाज, व अर्थ या व्यवस्था पुर्णपणे बदलणार आहेत. जगातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आपले सुदैव आहे की आज आपल्या देशात आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, सुरक्षा, व्यापार, उद्योग, कृषी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी क्षेत्रात तटस्थेने व निरपेक्ष भावनेतून विचार , सुचना, भाष्यें मांडणारी विचारवंत मंडळी व स्वयंसेवी संस्था आहेत. एक समाज म्हणून, एक देश म्हणून आपण काय करायला हवे  यासंबंधी ही निःपक्ष विचारवंत मंडळी, आणि स्वयंसेवी संस्था, विविध माध्यमातून आपली मतें मांडतांना दिसत आहेत.  त्यांचे विचार, त्यांच्या सुचना, त्यांचे विविध क्षेत्रांविषयी वरील भाष्य वाचले, ऐकले की कोरोनाच्या दशहतीवर मात करावयाची असेल तर आपल्याला  सर्व मतभेद विसरून एक समाज, एक देश म्हणून सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धातील आपल्या हाती असलेले हमखास यश देणारे शस्त्र  म्हणजे महाभारतातील युधीष्ठराने व्यक्त केलेली 'आम्ही एकशे पाच आहोत ही भावना होय. प्रश्न हा आहे की त्यासाठी पुढाकार कोणी घ्यवयाचा आहे ?

पुढाकार कोणी घ्यावयाचा या प्रश्नाचं उत्तर आपल्या संस्कृतीत आहे. आपल्या संस्कृती मधील महाजनो या गता सः पंथा,  तसेच राजा कालस्य कारणम् अशी  छोटी छोटी अनेक वचने, सुभाषितं, प्रार्थना अशा आहेत की त्यात  मानव म्हणून जन्माला येण्याचं प्रयोजन सामवलेलं आहे. ही आपल्या संस्कृतीची खासियत आहे. अभिजन वर्ग ज्या दिशेने जातो त्याच दिशेने सर्वसामान्यांनी जावे असे म्हटले आहे. तसे पाहिले तर हा सल्ला नसून ते एक शाश्वत सत्य आहे. साधारणतः सामान्यजन म्हणजे समाज हा प्रवाहपतीत असतो. सामान्यजनांकडे महनीय व्यक्ती सारखी बौद्धिक पातळी नसते म्हणून त्यांच्यात ' महाजना या गता सा पंथः ' हे जीवनाचं सुत्र अंगवळणी पडले आहे. पुढील वचन आहे राजा कालस्य कारणम् | म्हणजे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रजेचं मानसिक व शारिरीक आरोग्य, सुरक्षा, उदरनिर्वाहाची व्यवस्था या सार्या गोष्टींची जबाबदारी राजावर असते. पुर्वी जगातील सर्वच देशात राजेशाही हीच राज्यप्रणाली असल्यामूळे सरकार या शब्दाऐवजी राजा हा शब्द वापरण्यात आला असावा. त्यातून प्रत्येक राजाची कारकिर्द सुद्धा काल गणनेने मानली जात असे.  आज जगात काही देशात लोकशाही, काही देशात लष्करशाही, काही देशात राजेशाही, काही चीन सारख्या देशात एक पक्षीय राज्यप्रणाली आहे. आपल्या येथे लोकशाही आहे. म्हणून सरकार निवडण्यासाठी आपण मतदान करीत असतो. तसे पाहता वैदिक काळात आपल्या देशात जशी राजेशाही होती तशी गणराज्यें ही होती. एकंदरीत आपल्या समाजाच्या प्रकृतीला लोकशाही मानवणारी आहे. देश गुलामशाहीत का गेला यामागील कारणांचा अभ्यास करून एक समाज म्हणून उभे राहण्याची भावना देशबांधवामध्ये निर्माण करून बावनकाशी सुवर्णासारखी राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात आकारास आणण्याचा विचार व धडपड म्हणजे राष्ट्रवाद. या संबंधी मी अनेक लेखात चर्चा केली आहे. म्हणून आज त्यावर चर्चा नको करू या. एक गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे ती म्हणजे भारताचा आत्मा आपले अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्म व विज्ञान याची सांगड घालण्यात आपण कमी पडतोय हे मान्य केलेलं बरे असे वाटते.

राजा म्हणजे सरकार ! म्हणून देशाचा पंतप्रधान व त्याचे मंत्रीमंडळ हे आपले सरकार. पण सत्ताधारी पक्षाला आपण (प्रजा) म्हणजे मतदारच निवडून देत असतो. याचा अर्थ ' आपणच आपले राजे ' असाच आहे. पण या न्यायाने आपण आपली जबाबदारी कर्तव्यें पार पाडत नसतो. म्हणूनच 'आपण आपल्या मनाचे राजे ' हा वाक् प्रचार आपण व्यवहारात स्वच्छंदी व स्वैराचारी वृत्तीच्या वर्णनासाठी वापरतो. लाॅकडाऊन, कर्फ्यू असूनही पाच- दहा टक्के समाजबांधव कायदा व प्रशासकीय सुचना धाब्यावर बसवितात ही गंभीर बाब आहे. त्यावरूनही राजकारण होताना दिसत आहे ती तर अधिक गंभीर बाब आहे. अशा वेळी पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांवर टिका करणे योग्य आहे का, याचा शांत डोक्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय असे दिसत असूनही देशातल्या प्रमूख विरोधी पक्ष काॅग्रेस, त्याचे मित्रपक्ष, व डाव्या पक्षांचे शिर्षस्थ नेते हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून गप्प बसली होती. काॅग्रेसचे सर्वसर्वा सोनिया गांधी व राहूल गांधी शेवटी पंतप्रधान मोदीवर टिकेचं शस्त्र फेकू लागले. म्हणून सोशल मिडीयावर ' इटाली चाची आपके पास कोरोना पर कोई अच्छा इलाज है, तो पहले अपने मैंकेको दिजीए, उन्हे अधिक जरूरत है |'  अशी कडवट टिका व्हायरल झालीच. काॅग्रेसच्या या दोन्ही शिर्षस्थ नेत्यांनी आपणहून कोंडमारा करून घेतला आहे. प्रधानमंत्री केअर फंड ऐवजी पंतप्रधान आपत्ती निवारण फंडात दानापोटी आलेली रक्कम टाकावी असा सोनिया गांधीची मागणी म्हणजे तो हट्ट होता कारण त्या फंडात काॅग्रेस अध्यक्षाचा सदस्य म्हणून समावेश आहे. हे सत्य लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर सोनीया गांधीना फक्त पैशाची हाव आणि ती ही कोरोनो सारख्या गंभीर संकट काळात ही सुटत नाही ही बाब फारच  खालच्या दर्जाची दिसली. पंतप्रधान मोदींना कोरोना आपत्तीचे दिर्घ काळपर्यंत निर्माण होणार्या समस्यांची पुर्ण जाणीव आहे म्हणून त्यांनी एक कायम स्वरूपाचा स्वतंत्र फंड व्हायरस इन्फेशनचे संकट जे वेळोवेळी येऊ लागले त्यासाठी तयार केला.  कोरोनाचे संकट वाटते त्याहून ही फार धोकादायक व दिर्घ कालीन टिकणारी समस्या आहे, असे दिसून आल्यानंतर काल परवा राहूल गांधी शहाणपणाने बोलले. पण तो पर्यंत काॅग्रेस व मित्र  पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घालायचा तो घातलाच. मरण आपल्या दाराशी येत आहे असे दिसल्यावर शहाण्यासारखं वागण्याची सुरूवात करणे म्हणजे आपले राजकीय अस्तित्व संपत आल्यामूळे काॅग्रेसचे हे शिर्षस्थ नेते भयभीत झाल्याचे लक्षण आहे हे न कळण्याइतकी आपली जनता खूळी नाही. 

सध्यातरी कोरोनावर सामाजिक अंतर हेच औषध आहे. आधूनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक साधनांचा ही कोरोनासमोर टिकाव लागत नाही, हे अमेरिका व युरोपीयन देशाची स्थिती कशी झाली आहे त्यावरून सिद्ध झाले आहे. म्हणून आपल्या सरकारने लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तो यशस्वी करण्यासाठी सरकारला सहकार्य करणे हे सर्व विरोधी पक्षांचेच नव्हे तर देशातील सर्व स्वयंसेवी संस्था, विचारवंत, धर्मगुरू व सामान्यजनांचे आद्य कर्तव्य आहे. देशातील, व सर्व राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकजूटीचा नारा द्यावा. आमचे जे काही राजकीय मतभेद असतील ते काही काळ बासनात गुंडाळून ठेवू या. अर्थव्यवस्थेतील समस्यांवर उपाय व योजना इत्यादी हळूहळू आखत पुढे चालत राहू या. देश वाचला तरच स्वातंत्र्याला अर्थ राहील. स्वातंत्र्य राहीलं तरच विकासाच्या योजना अंमलात येतील. कदाचित कोरोनोचे संकट निवाळल्यानंतर आपल्या देशाला अधिक चांगल्या संधी ही मिळतील असे ही काही अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय अभ्यासक सांगत आहेत. त्यासाठी आपल्याला
' साथी हात बढाओ ' याच न्यायाने पुढे जावे लागणार आहे. आजच्या आणिबाणीच्या स्थितीत पंतप्रधान मोदी देशातील वैज्ञानिक, डाॅक्टर्स , विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ, संरक्षण व परराष्ट्र खात्यातील आजी माजी सनदी अधिकारी यांचा सल्ला घेत आहेत. सर्व राज्यातील मुख्यमंत्री ही समाधानकारक कामगिरी बजावित आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांनी राजकीय फायद्याचे गणित विसरून खालच्या पातळीवरील नेत्यांसमोर, कार्यकर्त्यांसमोर , व सामान्यजनांसमोर संयम, सांमजस्य, आणि वेळ पडल्यास कठोर निर्णय घेण्यासाठी एकजूटीचे इतिहासातील सर्वोत्तम असे आदर्श उदाहरण ठेवल्यास करोना संकटावर आपण मात करू शकतो.Yes We can stop Corona.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कोरोनाशी आपली लढत आणि पुराणातील देव दानव


जगातील बहुतांश देश कोरोना व्हायरसची दशहत अनुभवित आहेत. ही दशहत कधी संपणार असा प्रश्न केवळ आपल्या पुढेच नसून तो जगातील बहूतांश देशाच्या पुढे आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंबंधी बरीच माहिती आपल्यापर्यंत माध्यमांद्वारे आली आहे. म्हणून त्याबाबत काही लिहावयाची गरज नाही. प्रत्येक देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे स्वरूप समान दिसत असले तरी त्यातून उद्भवत असलेल्या समस्या व त्याच्याशी लढत देण्यासाठी करावी लागणारी उपाय योजना  देशपरत्वे भिन्न आहे असे दिसते. त्याचे कारण असे आहे की प्रत्येक देशात आरोग्य क्षेत्रातील मुलभूत सोयी, व्यवस्था, मेडीकल उपकरणे, रूग्णालयाची संख्या, लोकसंख्या व तिची घनता, सामाजिक स्थिती, नागरिकांची जीवनशैली व राहणीमान,  हवामान इत्यादीमध्ये भिन्नता आहे. इतर देशातील उपाय योजनांची माहिती आपले सरकार घेत राहणार आहेच व त्यातील आपल्याला जे आवश्यक आहेत तसे उपाय आपले सरकार योजेल याबाबत आपण खात्री बाळगावयास हरकत नाही. शेवटी कोरोना ही आपत्ती वैश्वीक आहे आणि कोरोना बाधीत सर्व देश सहकार्याने या आपत्तीशी झुंज देत आहेत. आजच्या घडीला आपण आपल्या देशातील कोरोनाची भयानकता व उपाययोजनावर चर्चा करू या. पण त्या अगोदर  मी प्रांजळपणे कबूल करतो की  वैद्यकीय व प्रशासन या दोन्ही क्षेत्रातील मी अधिकारी नाही व अभ्यासक ही नाही. मी आपल्यासारखाच  Stay at home and be safe  अशी प्रशासनाकडून आलेली सुचना पाळणारा एक सामान्य नागरिक आहे. म्हणून चर्चा ऐवजी मी आपल्याशी संवाद सांधतोय असेच कृपया समजावे.

आपल्या देशात कोरोना मुळे उभे राहीलेल्या संकटाचे स्वरूप इतर देशात आहे तसेच असले तरी आपल्या राजकीय, व सामाजिक व्यवस्थेत कायम स्वरूपात असलेल्या जहरी विषाणुमूळे आपल्याला दोन बाजूने लढावे लागत आहे. आपण कोरोनाशी लढत उशीरा सुरू केली असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे झाले नाही. आपल्या देशाचे क्षेत्रफळ कमी व लोकसंख्या अधिक आहे. म्हणजेच आपला देश Densly populated आहे. त्यातही शहरात झोपडपट्टी नावाच्या वस्तीची संख्या अधिक आहे. म्हणून कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शंका सरकारला होतीच. कोरोनोची लक्षणे पहिली दिसत नाहीत आणि नंतर झटपट लागण होऊन रूग्णांची संख्या भौमितिक रितीने वाढते. म्हणून सरकारने विलगीकरण , कर्फ्यु, लाॅकडाऊन , सोशल डिस्टन्सींग  हे उपाय तातडीने अमंलात आणावयास सुरूवात केली. परदेशातून येत असलेल्या आपल्या देशबांधवांची कोरोनाची तपासणी, त्यांना क्वारंटाईन ठेवण्याची व्यवस्था इत्यादी कामें तात्काळ सुरू केली . आज  डाॅक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील इतर कर्मचारी वर्ग, पोलिस व सुरक्षा कर्मचारी सोबत लष्कारातील जवान, प्रशासनातील अधिकारी, व कर्मचारी ही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनोशी अहोरात्र झुंज देत आहे. अनेक स्वयंसेवी संघटना, सामाजिक संस्था, रूग्णवाहिकांचे मालक, हाॅटेलचे मालक, उद्योजक, काही कलाकार, हिंदुची देव-देवतांची मंदिरं, आश्रम, चॅरीटेबल संस्था आपआपल्या परिने जसे शक्य आहे तशा प्रकारचे सहाय्य करीत आहेत. ही गोष्ट निश्चीतच स्वागतार्ह व अभिनंदनास पात्र आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाशी रणांगणात लढाई करणार्या यंत्रणेतील देशबांधव व भगिनींमुळे आपण सुखाचा श्वास घेत आहोत. ही मंडळी आपल्यासाठी देवतुल्यच होत.

दुसर्या बाजूला आपल्या येथे कायम वस्ती करीत असलेले विषाणू आहेत, जसे की
१) कोरोनाचे रूग्ण कुठे आहेत, आणि कोरोना-ची
    लागण होऊन कुठे मोठ्या संख्येने मृत्यु  होत  
    आहेत, कशाला ही तपासणी हवी, कशाला हवे हे
    विलगीकरण, संपुर्ण लाॅकडाऊनची गरज आहे का,
    आपल्या मंदिरातील देव-देवता आता कुठे 
     मदतीला धावत आहेत असे वायफळ प्रश्न
     विचारणारी पुरोगामी- ढोंगी बुद्धजीवी, 
२) रस्त्यावर उतरून संचारबंदी तोडणारे व हुज्जत
     घालून पोलीसांनाच मारणारी उनाडटप्पू व मवाली
     युवक आणि पोलीसांनाच सबूरीने घ्या असे सल्ला
     देणारे गुंड प्रवृत्तीचे नेते
३) भितीने शहरातून आपआपाल्या गावाकडे प्रचंड
    संख्येने जाणारे लोक,
४) मुस्लीम समाजातील काही संघटनाचा
     हेखेखोरपणा व त्यांना त्यांच्याच धर्मगुरूंचा व 
     काही राजकीय पक्षांचा असलेला छुपा पाठींबा,
५) मुस्लीमांच्या प्रार्थना स्थळात नमाज पडणे,
     लपून बसलेल्या विदेशी नागरिकांचं पलायन.
     दिल्लीतील निजामउद्दीन येथील १८ मार्च झालेला
     मरकज (तबलिंगी) कार्यक्रमातून वाढलेला धोका.
६) पर्यावरणाच्या, मानवाधिकाराच्या, सेवेच्या नावावर
    कार्यरत असलेल्या विदेशी लाॅब्या, व स्वयंसेवी
    संघटनांची कारस्थानें
७) काही विरोधी पक्षांची निष्क्रीयता,
८) देशातील पाक पुरस्कृत आंतकवाद्यांचे हितचिंतक, 
९) डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, त्यांच्या
    विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, नक्षलवादी
१०) काश्मीर, केरळ, ईशान्य भागातील कार्यरत 
      असलेल्या अलगावादी टोळ्या
११) भाजीपाला मार्केट, किराणा व रेशन दुकानावर
       कर्फ्यु, लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सींग सारखे 
       कायदे धाब्यावर बसविण्याची आपली सवय
इत्यादींशी आपल्या सरकार व प्रशासन यंत्रणेला समातंर पातळीवरून लढत द्यावी लागत आहे. याबाबत दुमत होऊ नये. कोरोना रूपी भस्मासूरचा पाडाव करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण वर नमूद केलेल्या  विषाणूंच्या उपद्रवांमूळे कोरोना बाधित रूग्णांची आकडेवारी वाढती आहे. त्यामूळे आपण देत असलेली लढत लांबली जाण्याची शक्यता दिसत आहे. ईश्वर करो तसे होऊ नये अशी प्रार्थना.

आपल्या देशाची काही ही चुक नसताना, आपला देश आज कोरोना वायरसच्या संकटात सापडला आहे. ह्या प्रसंगाचे गांभीर्य ज्यांना नाही अशा मंडळीमूळे आपले संकट अधिक भीषण बनत जात आहे. भितीने शहरातून आपआपल्या गावकडे जाणार्यांची संख्या वाढती आहे. दिल्लीतील निझामउद्दीन भागात तबलिंगीचा मकरज कार्यक्रमाने देशभरातील राज्यांना (विशेषकरून महाराष्ट्राला) कोरोनाशी खडतर लढाई द्यावी लागेल असे दिसते. एकंदरीत सरकार वारंवार ' जिथे आहात तिथेच राहा, गर्दी करू नका ' असे आवाहन देत आहे, तरी सुद्धा सुजाण नागरिक म्हणून आपण कमी पडणार असू तर सरकारला नाईलाजाने ' शुट ॲट द साईट ' असा आदेश द्यावा लागेल. ईश्वर कृपेने असे न होवो, पण वेळ आलीच आणि काही नागरिक मृत्युमूखी पडले तर ज्यांची मनें हलकट विचाराने कुजली आहेत अशा  विदेशी लाॅब्या सरकारवर टिका करण्यासाठी आपली लेखणी घेऊन तयार आहेत. सध्या ही मंडळी शांत आहे, आणि कोरोना वायरसच्या पाठीमागे चीन देशाचे षडयंत्र आहे अशी बातमी आली आहे त्यामूळे ही मंडळी अधिक काळ शांत राहील. पण त्याच काळात सरकारवर विशेष करून केंद्र सरकारवर खोटे आरोप लिहून ठेवण्याचे काम तयार करून ठेवतील. त्यांची ती खोडच आहे. कारण त्यांच्या दोन कुलदेवता आहेत. त्यांची नावे आहेत ' सत्ता व बंडाळी.' सन २०१४ पासून सत्तादेवी त्यांच्यावर कृपा करीत नाही म्हणून यातील काही मंडळी मनाला जे येईल तसे ओकत आहेत.

आज कोरोनाशी प्रत्यक्ष रणांगणावर दोन हात करीत झुंज देत असणार्या अशा समाजबांधवांना व भगिनींना आपण सारे जण देवतुल्य मानतो. पण काहींना देव या शब्दाची ॲलर्जी आहे. आपल्या समाजात एखाद्याचा स्वभाव चांगला असेल व तो सतत लोकांच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडत असेल त्याला आपण भला माणूस, देवमाणूस, भोळा शंकर असे म्हणतो, ते ही अगदी सहजपणें. आपल्या मातृभाषेंचं सौंदर्याचे वर्णन अमृताते पैजा जिंके असे आहे. पण या डाव्या व पुरोगामी मंडळींना आपल्या भाषेचे सौंदर्य दिसतच नाही मग कळणार तरी कसे? 'आपली दैवते कोरोनाला भिऊन मंदिरात दारे बंद करून बसले आहेत ' असा घसा फोडून सांगणार्या वृत्तपत्राच्या संपादकांवर काही टिका करावी असे वाटत नाही. कारण मंदिरातील आमच्या सार्या दैवतांनी  ट्रस्टींच्या रूपाने प्रगट होऊन सरकारकडे आर्थिक मदत केली आहे. अशा प्रकारचा आर्थिक ओघ झाला की आपण महालक्ष्मीची कृपा झाली असे मानतो. केवळ आर्थिक ओघ म्हणजेच देव असे मानून आपण थांबत नसतो. जिथे गरज आहे तिथे आमची देवता,माता महालक्ष्मीदेवी दानाचं रूप घेते.  हे सत्य त्या संपादक महाशयांना कळतंय कि नाही हे जाणून घेण्याची आमची इच्छा नाही. पण अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळातून चालणारी कारस्थाने व एक दमडीची आर्थिक मदत येत नाही या संबंधी त्यांच्याकडून रोख-ठोक लेख लिहण्याची अपेक्षा आपण ठेवू या. पण ते तसे करतील असे वाटत नाही कारण ' हाताला लकवा येतो का ' असा वाकप्रचार राजकारणात प्रथमच उपयोगात आणणार्या नास्तीक नेत्यांकडे सध्या त्यांची उठबैस आहे. असो.

केंद्र व बहुतांश राज्यातील सरकार जबाबदारीने कामगिरी बजावीत आहेत. सरकार निश्चीतच कौतूकास  पात्र आहे पण त्यांना यश मिळण्यासाठी आपण  सरकारला शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद देत राहणे आवश्यक आहे. आज सत्यवचनी श्रीरामाची जयंती आहे. आपण आपले वचन पाळू या. जाता जाता त्या संपादक महाशयांच्या माहितीसाठी राम नवमीच्या निमीत्ताने  या देशाचा बहुसंख्याक समाजाच्या देव-दैवातांच्या कल्पना कशा स्वरूपाच्या असतात त्या संबधी थोडसं सांगून या लेखाची समाप्ती करतो.

आपल्या पुराणातील देव-दानवांचे स्वरूप व कथा इत्यादी सारं प्रतिकात्मक आहेत. आपल्या पुराणांची भाषा भावगर्भित आहे, तशीच ती लक्षणा व रूपकें यांनी भरलेली असते. बुद्धीवंतानीं आपल्या बुद्धीचा कस लावून त्यातील भावगर्भित अर्थ शोधून आनंद घ्यावयाचा असतो  तर जनसामान्यांनी त्यातील गोष्टी वाचून आनंद घ्यावयाचा असतो. म्हणून जो ईश्वर अनंत आहे, त्याला सान्त रूपात आणले;  तो जो ईश्वर   निराकार आहे, त्याला आकार रूपात आणले. त्यातूनच हिंदुच्या देव-देवतांच्या मुर्ती आल्या, पाठोपाठ पुजा आली, आरती ओवाळणी आली व मंदिरे आली. आपण ज्या ग्रहावर राहतो, ती पृथ्वी, आपली धरणीमाता अवकाशातून एका छोट्या ठिपक्याइतकी दिसते. ईश्वर त्या अवकाशा पलिकडे आहे; तो सर्वत्र आहे; त्याचा थांगपत्ता आपल्याच काय, संपूर्ण मानवजातीला लागत नाही. म्हणून त्याला आपण विविध  मुर्तीरूपात आणले. पण त्यातून  मानव जातीचे काय अकल्याण झाले आहे ते त्या संपादक महाशयांनी उदाहरणे देऊन सांगावे.  आतापर्यंत एकच ईश्वर, तो ही आमचाच असे मानणार्या दोन मानव  जमातीमध्येंच धर्मयुद्धे झाली आहेत. हा इतिहास आहे.  विसाव्या शतकाच्या पुर्वाधात जगात एक नास्तीक जमात उदयास आली. ही जमात साम्यवादी नावाने ओळखली जाते. आमच्या संस्कृतीने नास्तिकांना ही परके मानले नाही. पण या नास्तिक जमातीने मानव जातीला काळीमा फासणारी अघोरी कृत्यें केली आहेत. या जातीच्या नेत्यांनी तर केवळ सत्तेच्या नशेसाठी त्यांच्या देशबांधवांच्याच लाखोंच्या संख्येंने कत्तली उडविल्यात आहेत आणि आज ही ते सत्र सुरूच आहे. विसाव्या शतकात या भूतलावर सत्ता स्पर्धेत जी दोन महायुद्धें झाली व संहारक शस्त्रें वापरली ती ईश्वराला मुर्तीत पाहणार्या हिंदु समाजामूळे झाली नाहीत. हा ही इतिहास आहे. आज ही  कोरोनाच्या रूपाने मानव जातीवर जे मोठे संकट उभे आहे ते साम्यवादी चीनने त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामूळे उभे केले आहे, अशी जगभर चर्चे सुरू झाली आहे. अनेक देव-देवता मानणारा हिंदु समाज व तो जिथे बहूसंख्याक आहे असा आपला भारत देश मानव जातीसाठी खलनायक कधी ठरला नाही व पुढे ही ठरणार नाही. कारण आम्ही  
' इशावास्यम इदं सर्वम् ' म्हणजे ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे असे मानतो. त्यामूळे आम्ही  ' अतिथी देव भव ' अशी भावना ठेवून  समोर भेटणार्या पाहूण्यास नमस्ते म्हणत दोन हात जोडत असतो. त्याच पद्धतीचे महत्व सार्या जगाला सध्याच्या संकट समयी कळून चूकले आहे. आपल्या संस्कृतीत कोणाचा मृत्यु झाल्यावर शवाला अग्नी देण्याच्या पद्धतीचे ही आज जगभर कौतूक तर झाले आहे.  कोरोनाने मृत्युचे तांडव मांडल्यामूळे आपल्या संस्कृतीतील अग्नी संस्कार मध्ये असलेले विज्ञान तत्व ही मान्य होताना दिसते आहे. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची असली तरी आम्ही त्या संबंधीची आत्मप्रौढी मानत नाही हे ज्यांना समजत नाही अशा लोकाबाबत आमची तक्रार नाही. " जे आपल्या स्वार्थासाठी व आपल्या देशातील सत्तेच्या लालसेतून, हिंदु देवांची कुचेष्टा करतात, विदेशी शक्तीशी छुप्या मार्गाने हातमिळवणी करतात तेच पुराणात वर्णन केलेले दानव आहेत.  तसेच " जागतिक पातळीवर कुटील खेळी रचून या जगाची महासत्ता बनण्याच्या अघोरी लालसेतून चीन सारखे देश मानव जातीला महासंकटाच्या खाईत लोटण्याची कृत्यें करतात "  ते ही पुराणात वर्णन केलेले  दानवच होत. " जे कुठल्याही धर्माचा अनादार करीत नाहीत, ईश्वर एक आहे असे मानून अनेक मुर्तीतून त्याला पाहतात, दुसर्याला आपल्या वर्तनाने, वाणीने, लेखणीने जे दुखावित नाहीत " तेच पुराणात वर्णिलेले आजचे देव आहेत.

बुधवार, २५ मार्च, २०२०

गुढी पाडवा-- आपल्या संस्कृतीमधील गोडवा



आज आपल्या नववर्षाचा पहिला दिवस. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुखाचे आणि सुरक्षेचे जावो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.  सन २०१७ च्या गुढी पाडव्याला 'प्रतिपदा संवादाची' असा लेख लिहून ब्लाॅगवर आपल्याशी संवाद साधण्यास सुरूवात केली. काल तीन वर्षे पुर्ण झाली. गेल्या तीन वर्षात विविध विषयावर एकूण ११७ लेखांद्वारें मी आपल्याशी संवाद साधला. सन १९७५ च्या आणिबाणी विरूद्धाच्या संघर्षात मी ओढलो गेलो म्हणून देशातील राजकीय स्थिती व व्यवस्था या विषयावरील लेखांची संख्या अधिक झाली हे मी मागे एका लेखात मान्य केले आहे.  आपण खपवूनही घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. यंदाचा आपला होळीचा सण आनंदाने साजरा झाला. चीनमध्ये कोरोना व्हायरसने काही लोक मृत्यूमूखी पडले अशी बातमी ऐकली होती पण तो व्हायरस जगभर पसरेल व आपल्या दाराशी इतक्या झपाट्याने येईल अशी पुसटशी कल्पनाही आपण केली नव्हती. चीनमध्ये काय होत असते याबाबत सारं जग संभ्रमात असते. साहाजिकच आपण सार्यांनी फार गांभीर्याने घेतले नाही. स्वाईन फ्य्लू, बर्ड फ्ल्यू आले आणि गेले. तशाच पद्धतीने कोरोना व्हायरस जाईल अशी आपली समजूत होती. होळीचा सण साजरा करताना आपल्याला नवीन वर्षाचे स्वागत घरात बसून करावे लागेल असे मनात ही आले नव्हते.

आज संपूर्ण देशभर संचारबंदी आहे. कशासाठी तर, कोरोनो व्हायरसचा पराभव करण्यासाठी. म्हणजेच आपल्या जीवावर आलेले संकट परतावून लावायचे आहे. मग जी मंडळी कोरोना व्हायरसशी प्रत्यक्ष रणागंणात लढत आहेत त्यांना आपल्या वागण्याने, बोलण्याने, लिहीण्याने अडथळा निर्माण करणे हा एक प्रकारचा देशद्रोह ठरेल. गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे आपले धर्मशास्त्र सांगते. याच दिवशी भगवान श्रीरामाचा रावणावरील विजय साजरा करण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याची परपंरा सुरू झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की  " गुढी पाडव्याच्या दिवासापासून ते श्रीराम नवमीपर्यंत रोज चिमूटभर विभूती हातात घेऊन वा उदबत्ती लावून अकरा वेळा रामरक्षा पठण केल्यावर ती रामरक्षा सिद्ध होते. ती विभूती एक डब्यात साठवावी. ती रोज आपल्या कंठात लावली की भगवान श्रीराम सर्व संकटात आपले रक्षण करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे श्रीरामाच्या नावाचा जप वा स्तवन होत असते तिथे संकटमोचन रघुपतीप्रिय भक्त हनुमान ही उपस्थित राहातात." आजपासून देशात संचारबंदी आहे, त्यामूळे आपल्या दिनचर्यात बदल होणार आहे. त्यातून आपल्याला नैराश्य येऊ शकते. तर दुसर्या बाजूला कोरोनो व्हायसच्या फैलावाची भिती आहे. अशा वेळी श्रीरामरक्षाचा हा उपाय करावा. फक्त रामरक्षाचाच उपाय करावा असे नाही. आपण आपल्या इष्ट देवतेचा जप केला तरी आपल्यावर येणारे संकट टळते.  शिवाय या संचारबंदीच्या काळात येणारे नैराश्य नष्ट होऊन आपल्या आत्मिक शक्तीत वाढ होते. अशा प्रकारे रामरक्षा पठणाच्या वा इष्टदेवतेचा जपाच्या  प्रयोगावर कोणी टिका केली तरी त्याकडे दुर्लक्ष करावे. भगवान गौतम बुद्धाच्या चरीत्रातील एक कथा आपल्या समोर मांडतो. ती वाचल्यावर टिकाकांरावर दुर्लक्ष करण्याचे बळ आपल्यात निर्माण होते.

एकदा भगवान गौतम बुद्धांचे शिष्यगण भिक्षा मागत असताना एका इसमाने त्यांच्या भिक्षा मागण्याच्या वृत्तीवर ताशोरे ओढले. त्याने भिक्षा तर दिलीच नाही पण बुद्धांच्या त्या शिष्यगणांवर शिव्या-शापाचा वर्षाव केला. संध्याकाळी ते आपल्या आश्रमात परतल्यानंतर त्यातील एका शिष्याने भगवान बुद्धाकडे त्या इसमाची तक्रार केली व म्हटले,  " गुरूवर्य उद्या तुम्ही आमच्या सोबत या आणि त्या इसमाचा कडक शब्दात समाचार घ्यावा अशी माझी इच्छा आहे. भगवान बुद्ध उत्तरले, " बाळा, उद्याची बात उद्या करू या. पण हा विषय डोक्यातून काढू टाक आणि मला उद्या रात्रीच्या भोजनाच्या वेळे पर्यंत याबाबत काही विचारावयाचे नाही. त्या शिष्याने ती आज्ञा स्विकारली.  दुसरा दिवस उगवला, गौतम बुद्ध स्वतः आपल्या शिष्यांसोबत भिक्षा मागायला निघाले. परंतु त्यांनी भिक्षेसाठी कालच्या मार्गाच्या विरूद्ध दिशाचा मार्ग पत्करला. दुपारचे साडेबारा वाजले तेव्हा एका झाडाखाली मिळालेली भिक्षा शिजवून जेवावयास बसले. बुद्धांनी काल ज्या शिष्याने एका इसमाची तक्रार केली होती त्याला आपल्या जवळ बसावयास सांगितले. जेवण झाले. थोडीशी वामकुक्षी करून पुन्हा भिक्षेसाठी बुद्ध व शिष्यगण निघाले पुढील प्रवासाला. पण निघताना बुद्धांचे कमंडलू जेवावयास बसलेल्या जागेवरच राहीले होते. बुद्धांनी विचारले, ' ते कमंडलू कोणाचे राहीले ? ' बुद्धांच्या बाजूला बसलेल्या त्याच तक्रार बहाद्दूर शिष्याने, त्वरीत उत्तर दिले, ' भगवान ते कमंडलू आपले आहे.' बुद्ध म्हणाले, ' असे  होय ! मग ते घे सोबत आणि ठेव तुझ्याकडेच.' संध्याकाळच्या पाचच्या सुमारास पुन्हा एका झाडाखाली शिष्यगणासोबत बुद्ध विश्रामास बसले. एक बोधकथा ऐकिवली आणि निघाले आपल्या प्रवासास. त्यावेळी बुद्ध आपले कमंडलू घ्यावयाचे विसरले. पुन्हा त्यांनी प्रश्न केला,  'ते कमंडलू कोणाचे राहिले आहे? ' त्याच शिष्याने उत्तर दिले, गुरूवर्य ते आपलेच कमंडलू आहे. ' त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, ' बर ते घे सोबत आणि कायमचे तुझ्याकडेच ठेव.' रात्री भोजनास बसताना पुन्हा त्या शिष्याला आपल्या शेजारी बसविले. भोजन झाल्यानंतर बुद्धांनी विचारले, माझे कंमडलू कोठे आहे, त्यावर त्याच शिष्याने उत्तर दिले, तुमचे कमंडलू माझ्याकडे आहे. तुम्ही संध्याकाळी मला देऊन टाकले आहे ना?' बुद्ध शांततेने म्हणाले, बाळा ते कमंडलू मी तुला दिले म्हणून ते कमंडलू तुझे झाले की नाही ? शिष्याने उत्तर दिले, ' हो गुरूवर्य ' . बुद्ध पुढे म्हणाले, ' त्या इसमाने काल ज्या शिव्या दिल्या होत्या, त्या मला दिल्या होत्या. पण मी त्या घेतल्या नाहीत. म्हणून त्या माझ्या झाल्या नाहीत. काल त्या इसमाने दिलेल्या शिव्या तु घेतल्या म्हणून तुझ्या मनात द्वेष उत्पन्न झाला आहे. ' त्या शिष्याने गुरूवर्याचे पाय धरले व क्षमा मागितली.  क्षमा मागण्याची वेळ येऊ नये अशी आपली वृत्ती व वाणी असावी. क्षमा करण्याचे बळ आपल्यात निर्माण होईल असे कार्य करावे. कारण आपल्या धरणीमातेच्या अनेक नावापैकी एक नाव आहे 'क्षमा.' हाच या कथेचा बोध असावा.

वस्तुतः देवाचा जप वा स्त्रोत्र म्हणण्याने आपल्या भोवती असणार्या नकारात्मक उर्जाचे वलय कापले जाते आणि आपल्या भोवती एक सकारात्मक उर्जाचे वलय तयार होते. विश्वात धन आणि ऋण उर्जा आहेत. हा आधूनिक विज्ञानाचा शोध आहे. आंब्याच्या झाडावरून कोकीळेची सनई वाजत असते तर दुसर्या बाजूला घुबड, वटवाघुळे इत्यादी पक्षी आपल्या कर्कश,  खेसकण्याच्या आवाजाने आपल्यात भिती व नैराश्य निर्माण करतात.  तसे कर्कश खेसकणे आपण आजच्या मुहूर्तावर सोडून देऊ या. आपल्या ऋषीमुनींनी सृष्टीची एक व्याख्या दिली आहे. 
' जी सृजन होते ती सृष्टी '. अशी व्याख्या देऊन ऋषीमुनीं थांबले नाहीत तर एक सुसंकृत समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ऋषीमुनींनी दिलेली शिकवण आपल्या मेंदुतून  हृदयांत विसावू द्यावी. म्हणजे आपल्या संस्कृतीवर, देवदैवातांच्या मंदिरा बाबत टिका करण्यार्यांचे हृदय परिवर्तन होवो की न होवो पण 
' हे विश्वची माझे घर ' असे ज्यांनी मानले आणि आपल्या ज्ञानाने व मृदु स्वभावाने आपल्या जीवनात ते प्रत्यक्षात उतरविले अशा माऊलींची कृपा होऊन आपल्या हृदयात सदभावाचा झरा निर्माण निश्चितच होईल असे वाटते. अनेक वनस्पतीशास्त्रांच्या अभ्यासकांनी फळे, धान्य, भाजीपालांच्या रोपट्याची मशागत करतेवेळी उपनिषदांमधील प्रार्थना वा आपल्या संत साहित्यातील  अंभग वाचले तर त्यावेळी निर्माण होणारे फळे, धान्य व भाजीपाल्यात कुठच्याही प्रकारचे बाधक जीवाणू प्रवेश करीत नाहीत हे सत्य आहे असे मानले आहे. म्हणजे दुधी , वांगी, भेडी, अशा भाज्या व आंबा, फणस, संपरचंद, पपई इत्यादी फळे नासकी निघत नाहीत.  खगोलशास्त्राचे अभ्यासक मोहन आपटे यांनी ' मला उत्तर हवे ' अशा पुस्तकांत संगीताच्या आवडीने वा सानिध्यात रूक्ष वाटणार्या गणितासारख्या विषयात गती मिळते असे स्पष्ट मांडले आहे. अशी अनेक गुढे आपल्या पुर्वाश्रमींनी शोधली आहेत पण त्याची प्रसिद्धी त्यांनी केली नाही. कारण तसा विचार संन्यस्त वृत्तीच्या ऋषीमुनींच्या मनात येणार तरी कसा ?

सारांश असा की आज गुडी पाडवा. चांगल्या कार्याचा संकल्प करण्याचा, गुढी उभारण्याचा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आपण प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करू या आणि संकल्प करू या ' बस फक्त एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनाचा पराभव करणे.' आपल्या संस्कृतीचा ठेवा डोळसपणे जपू या. जीवो जीवस्य जीवनम आणि जियो और जिने दो असे दोन संदेश सृष्टीने दिलेले आहेत. पहीला संदेश  प्राणीमात्रांसाठी आहे तर दुसरा संदेश मानवासाठी आहे. सृष्टी हसतपणे आपल्याला (मानव जातीला) सांगत आहे, " तुम्हीच पर्याय निवडा ' Choice is yours'. योग्य तो निर्णय घ्या. नाहीतर मानवजातीचा नाश होईल. तुम्ही नव्हता तेव्हा ही माझ्यासोबत मानवेतर प्राणी होते, वनस्पती जीवन होतं, झाडे, फुले, फळं होती.  पर्वत, डोंगर कपारी, नद्या सागर होते. तुमचा नाश झाल्यानंतर ही ते माझ्या सोबत राहणार आहेत. " 

आपली संस्कृती सर्वात प्राचीन आहे. आपले उत्सव ऋतुमानानुसार आहेत. उत्सवाच्या पाठीमागची कल्पना,  व भावना  ' समाज संघटीत व सुरक्षित राहावा ' अशी आहे. सांप्रतच्या स्थितीत आपण अंतःकरणातून सर्वत्र सकारात्मक दृष्टीने पाहु या. विजयश्री देवी हातात हार घेऊन आपली वाट पाहते आहे.

सोमवार, २३ मार्च, २०२०

मध्यप्रदेशमध्ये सत्तापालट! आता पुढे कुणाचा नंबर, महाराष्ट्र की राजस्थान ?



मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये २०१८च्या  विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव झाल्यावर देशातील भाजपेतर पक्षांना इतका आनंद झाला होता, की २०१९च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाचे पानिपत होणार हे गृहीत धरले. म्हणून विरोधी पक्षांमध्ये मनापासून आघाडी झाली नाही. युपीए मधील घटक पक्ष असो, वा डावे पक्ष असो या सार्यांनी आपआपल्या खासदारांची संख्या कशी वाढेल अशीच व्युहरचना करीत, निवडणूक लढले. त्यामूळे  लोकसभेच्या २०१९ निवडणूकीत त्यांचेच पानिपत झाले. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड मध्ये भाजपाची पिछेहाट झाली तेव्हापासून तर भाजपेतर पक्षांना इतका गर्व झाला की, त्यांनी सीएएच्या विरोधात हिंसक आंदोलने सुरू केली. दिल्लीत भाजपाचा पराभव झाल्यावर विरोधी पक्ष लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याचे आव्हान देऊ लागले. पण मध्यप्रदेश मधील काॅग्रेसचे सरकार गडगडले आणि सार्या विरोधी पक्षांचे अवसान पुन्हा गळाले. अवसान गळाले म्हणून यांची कोल्हेकुई सुरू झालीच आहे. म्हणे, 'कोरोनो व्हायरसचे संकट असताना मोदींना फक्त विरोधी पक्षांची सरकार पाडण्यात रस आहे.' वस्तुतः इथे भाजपाचा संबंध येतोच कुठे? जे राजकारण झाले ते काँग्रेसचे हाय कमांड व ज्योतिरादित्य सिंधीया मध्ये ! देशावर कोरोनो व्हायरसचे संकट समोर असताना काॅग्रेसच्या श्रेष्ठींना मध्यप्रदेश मधील काॅग्रेस नेत्यांमधील भांडण सोडविता आले नाही हे बेपर्वाइचे तसेच अंहकाराचे लक्षण आहे. काॅग्रेसमध्ये आमच्या कुंटुंबाचा शब्द शेवटचा हेच दाखविण्यात काॅग्रेस हायकमांडांना शौर्य वाटत असेल तर त्यांना सल्ला द्यावयास काॅग्रेस मधील इतर जेष्ठ नेते पुढे कसे सरसावतील ? 

२०१४ पासून देशातील विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारला अनाठायी टिकेचे लक्ष्य बनवित असल्यामूळे पंतप्रधान मोदींचे आसन दिवसें दिवस बळकट होत जात आहे. त्यातूनच २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला मोठा विजय प्राप्त झाला. आजही मोदींची लोकप्रियता केवळ टिकूनच नव्हे तर वाढत जात आहे. म्हणून मध्यप्रदेशात मंत्रीपदावर असलेल्या काॅग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिले, व ज्योतीरादित्यांसोबत भाजपाशी जवळीक साधली आहे. ' भाजपा आमचे राज्यातील सरकार पाडण्याचे काम करीत आहे ' असा विरोधी पक्षांनी कितीही टाहो फोडला तरी त्यांच्या टाहोचा आवाज मतदारांच्या कानीं पोहचत नाही. मध्यप्रदेश व राजस्थान मधील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपा पिछाडीवर राहीला पण तुल्यबळ राहीलाच होता. ही वस्तूस्थिती काॅग्रेस पक्ष मानायला तयारच नाही. २०२४ च्या निवडणूकीतही मोदीच्या विजयावर आताच शिक्कामोर्तब झाल्यासारखे दिसत असल्यामूळे काॅग्रेस ( माता-पुत्र-कन्या-जावई च्या) पक्षात काॅग्रेसजन किती काळ राहतील हा प्रश्न काॅग्रेस व विरोधी पक्षांचे समर्थक संपादक, साहित्यिक मंडळींना पडत नाही, तो पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या काॅग्रेसची घरघर थांबणार नाही. 

मध्यप्रदेशचे लोण राजस्थान व महाराष्ट्रात ही पोहचेल असे दिसत आहे. महाराष्ट्रातही भाजपा-सेनेचा विजय झाला होता आणि तो ही मोदींच्या करिष्मा मुळेच. पण शिवसेनेला अवदसा आठवली आणि काॅग्रेस व राष्ट्रवादी सोबत शय्या केली. शिवसेनेला तात्पुरता लाभ झाला असला तरी तिचा पुढचा प्रवास खडतर आहे हे दिसू लागले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना बिनधास्त असल्याचा आव आणत आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षातील नेते सोनिया गांधी व राहूल गांधीच्या अंहकारामूळे नाराज दिसत आहेत. ते काॅग्रेस सोबत राहतील की जातील अशा प्रश्नचिन्हामूळे शिवसेना चिंतेत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अधून मधून मोदींची प्रशंसा करावी लागत आहे. महाराष्ट्रातील काॅग्रेसमध्ये उभी फूट पडण्या अगोदर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नसेल तर भाजपाकडे शिवसेनेचे आमदार आकृष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना कमकुवत होईल. बाकी लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेण्याचे भाजपाला आव्हान देणार्या शरद पवारांना बारामतीचा ही गड राखत येणार नाही. महाराष्ट्रात महाआघाडी सरकार स्थापन केल्यानंतर शरद पवार पंतप्रधानपदी बसण्याचे दिवसाढवळ्या स्वप्न पाहात आहेत.  त्यातच ते म्हणत आहेत की त्यांना इतर राज्यातील नेते भाजपा विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी बोलावित आहेत. ही निव्वळ थाप आहे. शरद पवारांची महाराष्ट्रात जितकी शक्ती आहे, त्याच्या दुप्पट ताकद भाजपेतर पक्षांची आपआपल्या राज्यात आहे. ते शरद पवारांना का व कशासाठी बोलावतील ? राष्ट्रीय स्तरावर पवारांचा काय मोठा प्रभाव आहे ?  सोनीयांनी जे खातें दिले ते  निमूटपणे दहा वर्षे चघळत बसले,  हे  इतर प्रांतातील स्थानिक पक्षांनी पाहिले आहे. खरोखरीच इतर प्रान्तीय पक्षातील नेते भाजपा विरूद्ध एखादी स्थिर आघाडीसाठी शरद पवारांना मार्गदर्शनासाठी बोलावित असते तर हरियाणातील काॅग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना का बोलाविले नाही , मध्यप्रदेशमधील कमलनाथांनी सरकार वाचविण्यासाठी शरद पवारांना बोलाविले का नाही ?

मध्यप्रदेश काॅग्रेसच्या हातून गेला. तिथे भाजपा सरकार स्थापन करणार हे निश्चीत झाले आहे. राजस्थान व महाराष्ट्रात ही भाजपा प्रणित सरकार स्थापन होणार आहे. प्रथम महाराष्ट्रात की राजस्थानात एवढाच काय तो प्रश्न राहिला आहे. या प्रश्नाचे उत्तर दोन्ही राज्यातील काॅग्रेस पक्षांतर्गत स्थितीवर अवलंबून आहे. मला वाटतं राजस्थानात लौकर सत्तांतर घडेल. याचे कारण असे की मध्यप्रदेश मध्ये कमलनाथ व दिग्विजयसिंगच्या प्रभावामूळे काॅग्रेसने जसे ज्योतिरादित्य सिधींयांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयोग काॅग्रेसचे हाय कमांडने राजेश पायलट यांचे चिरंजीव सचीन पायलटचे खच्चीकरण केले आहे. काॅग्रेस आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहे. उगीच त्यांच्या नेत्यांनी भाजपावर खापर फोडू नये. कर्नाटकात परस्पर विरोधात लढविलेले जेडीयु (एस) व काॅग्रेसला जनादेश होता का? तिथे सरकार स्थापन केले होते ते कुठल्या आधारावर ? मुळात आधार नव्हताच, मग त्यांचे सरकार पडले त्याचे खापर भाजपावर का फोडता ? शरद पवारने शिवसेनेला फितविले नाही असे म्हणत भाजपाने शिवसेनेला फसविले अशी भाषा भाजपेतर विरोधी पक्ष व त्यांचे मिडीयातील संपादक मंडळी, साहित्यिक, कलाकार, व ख्रिस्ती व इस्लाम धर्मगुरू कुठल्या तोंडाने बोलत आहेत ? निवडणूक पुर्व युती ज्या दोन पक्षांची होती त्यानांच लोकांनी निवडून दिले होते ना ? पण असा विचार महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत, संपादक महाशय, साहित्यीक, ख्रिस्ती व मुस्लिम धर्मगुरू करत नाहीत. कारण अर्थस्य पुरूषो दासः | महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा कधी पडेल तेव्हा ही मंडळी भाजपाच्या नावाने शिमगा करणार. हा झाला लहान मुलांच्या खेळातील रडीचा डाव. भारतीय राजकारणात एक गोष्ट स्थिर होऊ लागली आहे ती म्हणजे, ' जहाँ है मोदी  तो सब है मुमकीन | जहाँ है भाजपा, वहाँ रहेगी सत्ता और  जिसका मंत्र है, सबका विकास, सबका विश्वास लेकीन ना किसीपर खास मेहरबान |

शनिवार, २१ मार्च, २०२०

कोरोनाशी लढत आणि आपण



परवा रात्री पंतप्रधान मोदींनी दूरदर्शनवरून कोरोनो व्हायरस संबंधीत देशाला उद्देशून भाषण केले. त्या भाषणात पंतप्रधानांनी देशाचे नागरिक म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी हे सांगितले. देशातील डाॅक्टर्स, हाॅस्पीटल्स व तेथील स्टाफ, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे, सर्वत्र डोळ्यात तेल घालून काम करणारे पोलीस यंत्रणादि सुरक्षा व्यवस्थतेतील कर्मचारी मंडळी गेले काही दिवस अहोरात्र मेहनत करीत आहेत त्यांचे कौतूक करून सामान्यजनांनी त्यांच्या बद्दल जाहिररीत्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला दिला. येत्या रविवारी सर्व देशवासीयांनी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडता एक प्रकारे स्वयंघोषित कर्फ्यू मानण्याचे आवाहन ही पंतप्रधानांनी केले आहे. आपण लोकशाही राज्यप्रणाली स्विकारली असल्यामूळे पंतप्रधानांनी जे आवाहन केले आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे आपले कर्तव्य आहे. देश जेव्हा जेव्हा संकटात असतो त्या त्या वेळी एक समाज म्हणून आपण प्रशासनाला चांगले सहकार्य करीत आलो आहोत. त्यामूळे कोरोनो व्हायरसने निर्माण केलेल्या संकटाला सुद्धा आपण एकजूटीने सामना करणार आहोत या बद्दल कोणाच्या ही मनात शंका नसेल. प्रश्न हा आहे की समाज म्हणून आपण जी एकजूट दाखविणार आहोत तिचे स्वरूप काय असेल हा आहे.

सामान्यतः पावसाने कहर केला असेल आणि अचानकपणे समुद्राला आलेल्या भरतीमूळे शहाराच्या सर्व भागात पाणी तुंबले असेल तर अनेक प्रवाशांना जवळपासचे समाजबांधव आपल्या घरात आश्रय देतात. नदीला पुर आला असेल इतर आसपासच्या जिल्ह्यातील लोक मदत करतात. भुंकपासारखी आपत्ती असो वा मोठा रेल्वे अपघात असो वा दशहतवाद्यांनी केलेल्या बाॅम्ब हल्यातील जखमी झालेले समाजबांधवाच्या मदतीला समाज म्हणून आपण एकजूटीने धावत जातो.  शहर व ग्रामीण भागात आजही आगीत होरपळलेल्या वा अचानक आजारी पडलेल्या समाजबांधवासाठी आपण शेजारधर्म पाळून मदत करतो. भले आपण चंगळवादी दुनियेत राहातो आणि त्यात थोडेसे वाहात जात असलो तरी आपली संवेदनशिलता शाबूत आहे याबाबत दुमत नाही. पण कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या दशहतीला सामोरे जाताना तीच संवेदनशिलता, तोच भावूकपणा काबूत ठेवावा लागेल. आपल्याला सध्याच्या कोरोना व्हायरसशी जी लढत द्यावयाची आहे, ती जितके शक्य होईल तितकी आपल्या घरात बसूनच द्यावयाची आहे. वेळ पडल्यास शासकीय कर्मचारी व डाॅक्टर मंडळींना सहकार्य करण्यासाठी सरकारने आपल्यापैकी काही जणांना प्रत्यक्ष रणागंणात उतरावयास सांगितले तर तशी तयारी सुद्धा ठेवावी लागेल. समाज म्हणून एकजूटीने बाहेर पडून प्रत्यक्ष मदतीला धावण्याची पारंपारिक पद्धत येथे दुरोपयोगी ठरेल हे आपण सारे जाणत आहोत. त्यासाठी आपल्याला कमालीचा संयम पाळावा लागणार आहे. लग्न, साखरपुडा, वाढदिवस, यात्रा, धार्मिक सण, इत्यादी सारे कार्यक्रम रद्द करावे लागतील. कोरोनाची लागण आणि त्यातून होणार्या प्रादुर्भावाचे स्वरूप आपल्याला एव्हाना ठाऊक झाले आहे. आपला देश कोरोनाने केलेल्या आक्रमणाच्या दुसर्या स्टेजवर आहे. म्हणून आपल्याला प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. त्यासाठी जितकं विलग राहाता येईल तितका प्रयत्न करावयाचा आहे. तसा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या हातून देशसेवा घडते असेच मानावे.

हा प्रयत्न करीत असताना पहीला अनुभव येईल तो म्हणजे आपले लहरी मन स्थिर करणे जड जाईल. कारण संपुर्ण दिनचर्या बदलावयाची आहे.  मनात अनेक विचाराचं काहूर माजलेलं असणार . काम-धंदा बुडाला, आर्थिक नुकसान होणार, रजा कापली जाईल, आपलं कोणी नातेवाईक परदेशात असेल त्यासंबंधी चिंतेने त्रस्त होणार, इत्यादी अडथळे निर्माण होणार. त्यासाठी योगाभ्यास करावा लागेल. ते जमत नसेल तर थोडा वेळ इष्ट देवतेचा जप करावा. म्हणजे मन स्थिर होईल. मन स्थिर झालं की सृजनतेकडे वळेल. सृजनता ही एक अशी शक्ती आहे की ती आसक्ती आणि विरक्ती मधील परमावधी गाठण्यास आपल्या अवयवांना मदत करते. भले आपण सामान्यजन असू पण 'ज्याची वंदावी पाऊले अशा ईश्वरनिष्ठांची ही भूमी आहे ' असा अभिमान आपल्यात निर्माण होऊ शकतो. त्यातूनच आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे भान येईल. हाॅटेल्स, माॅल्स, पर्यटन स्थळे, चित्रपटगृहे, बंद झाल्याने आपल्या मनोरंजनाच्या संधी हुकतील. ते ही फार तर एक दोन आठवडे. पण त्या आपल्या प्राथमिक गरजा नव्हेत. आजच्या या व्यापारी व स्पर्धेच्या युगात आर्थिक मंदीचे स्वरूप प्राणावर बेतण्या इतके मारक ठरते असे मला वाटत नाही. आपण स्वतःहून वाढविलेल्या चंगळवादाला लगाम घालण्याची  एक इष्ट आपत्ती म्हणजे कोरोना व्हायरसची दशहत समजू या. शेवटी चंगळवाद म्हणजे विकास नाही. चंगळवाद म्हणजे आधुनिकता नाही, आधुनिकता म्हणजे आपल्या संस्कृतीतील मूल्यें फेकून देणे नव्हेच.  शेवटी ' Econimics is a science of human bhevaiour between scare means and unlimited needs ' असेच अर्थशास्त्राचे आधुनिक काळातील जनक ॲडाम स्मिथने म्हटले आहे.  उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत नव्हे. उत्पन्न वजा बचत म्हणजे खर्च करणे हे आपल्या जीवनाचे सुत्र आहे. आपल्या संस्कृतीत अर्थशास्त्राची व्याख्या अनादि काळापासून अशीच मांडलेली आहे. असेच कौटील्याने मांडले आहे. हेच महात्मा गांधीजी, जनसंघाचे नेते (म्हणजे आजच्या भाजपाचे) स्वर्गीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय, व समाजवादी नेते स्वर्गीय डाॅक्टर राम मनोहर लोहीयांनी मांडले आहे. ' खर्च कमी करा, काही दिवस कळ सोसा व आपला जीव वाचवा ' हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावयाचे आहे. देशावर दुष्काळाचे संकट आले असता स्वतःहून एक दिवस उपवास स्विकारलेल्या सर्वात सनदशीर पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्रींचा हा देश आहे. महाभारतकालीन विदुराचा हा देश आहे. मध्ययुगीन काळातील आर्य चाणक्याचा हा देश आहे, याचे स्मरण आपण करावे. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट टाळावयाचे असेल तर पंधरा दिवसासाठी आपण स्वतःहून आपल्याच घरात स्विकारलेला कारावास व थोडाफार उपवास समजावा. कदाचीत आपल्याला हे आव्हान स्विकारणे कठीण वाटेल पण अशक्य नाही.

शेवटी पंधरा दिवसासाठी चांगल्या सवयी स्विकारयला मन तयार झाले की आपोआप कोरोनोचा पाडाव झाल्यानंतर एक सुजाण नागरिकत्वाच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या आपण पार केल्याचा आपल्याला आपलाच अभिमान वाटेल. आपणच आपले प्राण वाचविल्याचा एक स्वर्गीय आनंद अनुभवयास येऊ शकेल.  फिजूल खर्च टाळणे, वाईट सवयींवर बंधन घालणे, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छतेचे भान येणे, अशा अनेक चांगल्या गोष्टीं आपल्या अंगवळणी पडतील. आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरील राहणीमान असलेल्या आपल्या समाजबांधवांकडे पाहावे. त्यांना आपल्यापेक्षा खडतर तपस्या करावयाची आहे. ते सुद्धा कोरोनशी लढत देणार आहेत. त्यांना आपण आपले मानू या. त्यातूनच एक सशक्त समाज म्हणून आपण नवी उभारी घेण्यासाठी सज्ज होऊ शकतो. प्रत्येक घटना राजकीय विचारसरणीच्या चष्म्यातून पाहावयाची जी सवय आपल्याला लागली आहे, तिचे आपोआप उच्चाटन होईल. राजकीय पक्ष निर्माण होतील व जातील; नेते येतील व जातील; सेलेब्रटी होतील व जातील ; पण समाज हाच आपल्या सर्वांचा आधार आहे. आपला देशच आपला आधार आहे. आणि हो , शेवटी धरणीमाता म्हणजे पृथ्वीवरच आपल्याला जगावयाचे आहे व धरणीमातेत विलीन व्हावयाचे आहे हेच जीवनाचे शाश्वत सत्य आहे. दोन आणखीन शाश्वत सिद्धांत कुठल्यातरी इंग्रजी मासिकातून माझ्या वाचण्यात आले आहेत, त्यांची मला वेळोवेळी आठवण होत असते ते इथे मांडतो आहे, आणि नंतर थांबतो. There are some eternal principles which never change even the time changes. One of them is 
" When there is a conflict between an individual and group, the group's intrest must prevail. When there is comnflict between group and organisation then organisation's intrest must prevail and When there is conflict between organisation and nation, the nation's intrest must and must prevail at any cost."आणि दुसरा सिद्धांत आहे,
" Success comes to those who plan their work and excute the plan with self confidence and determination."

मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना व्हायरसचा धोका आणि नमस्ते इंडीया



कोरोना व्हायरसची साथ जगभर पसरत आहे. प्रथम चीन मध्ये या जीवघेण्या रोगाची लागण सुरू झाली. चीनमध्ये एक पक्षीय राजवट आहे. ती ही साम्यवादी पक्षाची. तिथे माहिती व प्रसारण मंत्रालयावर सरकारचे नियंत्रण असते. तिथे सेन्साॅरशिप असल्यामूळे तेथून प्रसारीत झालेल्या बातमीवर जगभरातल्या लोकांना सतत संभ्रम पडत असतो. म्हणून कोरोना व्हायरस वर अनेक प्रतिक्रिया ऐकू येतात. कोणी म्हणतात कोरोना म्हणजे चीनने आपल्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्राचे केलेलं प्रात्यक्षिक आहे तर कोणी म्हणतं अमेरिका व चीनने आपल्या फार्मासिटीकल कंपनीचा व्यापार वाढावा या हेतूने संगनमताने केलेलं एक कारस्थान आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या रोगाची साथ निर्माण करून त्यावरील औषधे तयार करणे हा एक व्यवसाय झाला आहे असे मानावयाचे की काय?  यात किती सत्यता आहे, हे पडताळून पाहण्याची सोय नसल्यामूळे अशा प्रकारच्या शंका-कुशंका, अफवा, निर्माण होत आहेत का? एक गोष्ट स्पष्ट आहे की आजचे जग अनिश्चतेच्या रोगाने ग्रासले आहे, त्यावर सध्या तरी उपाय नाही. कारण हे कलीयुग आहे. आजच्या जगाची स्थिती गुरू चरीत्रात वर्णन केलेल्या स्थितीशी जुळते. पण सारं काही दैवावर सोडून देण्यात जीवनाचे सार्थक नसते. म्हणून आपण कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाला सहकार्य करायला हवे. त्यातील एक भाग म्हणून सोशल मिडीयाचा वापर या घडीला सुज्ञपणे करू या व कोरोनो विषयीची आपली चर्चा पुढे रेटू या. 

गेल्या तीन दशकापासून अनोळखी तापाच्या ज्याला इंग्रजीत  Unknown Fever असे म्हटले जाते, त्याची साथ अधून-मधून येत आहे. या विश्वात सर्वात अनाकालनीय गुढ म्हणजे हे विश्व होय असे विख्यात शास्त्रज्ञ आर्कमिडीजने म्हटले आहे, ते तंतोतंत पटते. या ब्रह्मांडात काय काय दडले आहे ते आपण सारे काही शोधले आहे अशा भ्रमात आपण राहू नये. पण  विश्वातील रहस्यें शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्याचे नाव विज्ञान होय. आधूनिक वैद्यकशास्त्राने अनाकलनीय तापावर वेळोवेळी तातडीचे औषधोपचार शोधून अनोळखी रोगजंतूचा संसर्ग थाबविण्यात यश मिळविल्याचे आपण अनुभवले आहे. म्हणून विज्ञानाची कास धरण्यात शहाणपण आहे. पण विज्ञानाची कास धरणे म्हणजे चंगळवाद नव्हे. आपण काय खावे, किती खावे, किती मौज करावी, यावर बंधने घालणे आवश्यक आहे हे ही वैद्यकीयशास्त्र आपल्या नजरेत पदोपदी आणत असते. थोडेसं पाठीमागे वळून पाहिले तर काय दिसते, जेव्हा वैद्यकशास्त्र फारसे प्रगत झाले नव्हते, तेव्हा आहार-विहारमध्ये पथ्य पाळणे हा एक उपचार होता. तरीही मृत्युचा दर Death rate  घसरला नव्हता. माणसाचे आयुर्मान कमी होते. हा झाला मध्ययुगातील मानवाचा इतिहास. वैद्यकशास्त्र जस जसं प्रगत होत गेलं, तसतसे अनेक आजारावर लस, औषधे, सर्जरी इत्यादी उपाय उपलब्ध झाले आणि माणसाचे आयुर्मान वाढत गेले. पण या ठिकाणी हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे अकस्मात मृत्युंच्या घटना तसेच एकाच वेळी व एकाच पद्धतीने होणार्या मृत्युंची संख्या अधिक होते आहे. असें का ? यावर आजचं वैद्यकीय शास्त्र समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही. एक सत्य असे आहे की सृष्टीतील प्रत्येक जीवाची  उत्क्रान्ती होत असते. त्यामूळे ॲन्टीबायोटीक औषधें जितके परीणामकारक व्हावयास हवेत तसे अनुभवयास येत नाहीत. शिवाय ॲन्टीबायोटीक औषधांचा साईड इफेक्ट होतो त्याचे काय करावे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. म्हणूनच  उत्क्रान्तीचा मक्ता फक्त मानवाकडे आहे असे आपण जे समजतो ते चुकीचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रात औषधे तयार करताना प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण इत्यादी शाखांच्या अभ्यासकांना ही सामील करून घ्यावयास हवे. तसे घडत नाही. त्यामूळे सृष्टीतील संतुलन बिघडते. शेवटी सृष्टीचे संतुलन बिघडणे हे ही नैसर्गिक आहे कारण उत्पत्ती, स्थिती, व लय ही सृष्टीचे वैशिष्टें आहेत या सत्यापाशी आपण येऊन पोहोचतो.  नव-नवीन जंतुचा वाढत जाणारा संसर्ग व त्यातून होणारे मृत्यू हे आधूनिक वैद्यकशास्त्राच्या समोर फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचे कारण नव-नवीन जंतुची होणारी उत्पत्ती रोखण्याचे काम आधूनिक विज्ञान करू शकत नाही. म्हणूनच  पर्यावरणवादी कार्यकर्ते चंगळवादी जीवनशैलीला दोष देत असतात. पर्यावरणाचा अभ्यास हा ही आधूनिक विज्ञानाचाच भाग असल्यामूळे पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर दुर्लक्ष न करणे हे हितावह ठरते. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबविण्याचा प्रयत्न करणे ही संपूर्ण मानव जातीची जबाबदारी आहे. पण त्याबाबत विकसीत देश आणि विकसनशील-अप्रगत देशांत सहमती होतांना दिसत नाही. शस्त्रात्रे निर्माण करून त्याचा व्यापार हेच जर प्रगतीचे लक्षण व उत्पन्नाचा एकमेव मोठा स्त्रोत मानण्याची मानसिकता प्रगत देश सोडणार नाहीत तो पर्यंत अनोळखी रोगांचे आक्रमण मानव जातीवर अधून-मधून होत राहणार असे दिसते. जागतिक पातळीवर युनो एक संस्था कार्यरत आहे, पण तिथे ही प्रगत राष्ट्रांना मिळालेला (वेटो) अधिकार मानवजातीच्या समस्या सोडविण्यात अडसर ठरतो. बरं त्यातही एक गोम अशी आहे की पर्यावरणवादी सुद्धा शास्त्रज्ञांनी ओके केलेल्या उर्जाप्रकल्पाला नाहक विरोध करीत असतात. तिथे अनेक लाॅब्या आहेत. पर्यावरणवादी होणे हा एक व्यवसाय होतो आहे की अशी शंका उत्पन्न होते. असे असले तरी WHO ह्या संस्थेचा कारभार बर्यापैकी समाधानकारक आहे. अर्थात तिथेही बलशाली देशांच्या फार्मासिटीकल कंपन्याच्या लाॅब्या असव्यात असेच दिसते. आज जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेतून मानवाच्या विभिन्न शारिरीक आजारावर  विभिन्न औषधोपाचारांचा शोध घेतला जातो व निर्मिती होते याबाबत दूमत नाही. त्यात ही व्यापारी वृत्तीचा प्रभाव आहे पण तो ही राहणार आहे त्यासंबंधी खल करण्यात काही अर्थ नाही. कारण आपले अध्यात्म सांगते की,  ज्ञान, शौर्य, व्यापार व सेवा ही वैशिष्टे प्रत्येक व्यक्तीत असतात आणि त्यातून स्वार्थ  कोणालाही सुटला नाही. सत्ता स्पर्धेतून शस्त्रस्पर्धा वाढते. शस्त्रस्पर्धेतून युद्धे होतात. युद्धातून वा शस्त्राच्या चाचणीतून प्रदूषण वाढते आणि प्रदूषणातून रोगराई पसरते. मग आपल्याला हताश होण्यापलिकडे पर्याय राहात नाही. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने थेअरी ऑफ पापूलेशन च्या ग्रंथात युद्ध होणे, रोगराई होणे, चक्रीवादळ, महापूर, भूकंप, अवर्षण इत्यादी संकटातून पृथ्वीवरील प्राणीमांत्राचा भार कमी होतो असे म्हटले आहे. फार दूर कशाला जावे, सातशे वर्षापूर्वी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे,
     युद्धकारण पृथ्वी वरती | विषवायू पसरेल ||
     असंख्य जीव ते विषवायूने | प्राणासी मुकतील ||
     युद्धकारणे पृथ्वीवरती | प्रदुषण पसरेल ||
     अनेक दशके या परिणामे | मानव त्रासवेल ||
     रोग-खुजी निकृष्ट अशी | प्रजोत्पत्ती होईल ||
     पृथ्वावरचे व्यवहार सारे | बंद होऊनी पडतील ||

ज्या देशात ज्ञानेश्वर महाराज जन्मले व समाधिस्त झाले त्याच भारत देशात सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे आणि अशा पेंशटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाचा मृत्यु ही झाला आहे. कोरोनाची लागण झालेले बहुतांश पेंशट विदेशवारी करून आलेले नागरिक असल्याचे दिसतात. म्हणजे कोरोनो हा आयात झालेला रोग आहे. पण त्याचा फैलाव सर्वत्र होऊ शकतो. म्हणूनच राष्ट्रीय, प्रान्तीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवरून आरोग्य खात्यातर्फे काही सूचना, उपायाबाबत माहीती दिली जात आहे. त्याला आपण एक समाज म्हणून सकारात्मक प्रतिसाद द्यावयास हवा. ज्यांना या साथीच्या रोगावर राजकारण करावयाचे त्यांच्यापासून ही आपण दोन हात दूर राहीले पाहीजे. आपले दुर्दैव असे आहे की देशातच नव्हे तर जगाच्या कोपर्यात काही ही घडले,  त्यावर सुद्धा राजकीय पोळी भाजून घेण्याची अनिष्ट प्रथा देशातल्या राजकीय व्यवस्थेत रूजली आहे. त्याला काही अंशी आपण मतदार म्हणून ही जबाबदार आहोत. शेवटी समाज म्हणजे काय?  आपणच सारे मिळून बनला आहे ना ! समाज आहे म्हणून तर राजकीय व्यवस्था आहे. राजकीय व्यवस्था आहे म्हणून तर प्रशासन अस्तित्वात आहे. Goverment is the machinery of the state हे सत्य जाणून आपण सार्यांनी प्रशासनाला मदत होईल असे जे जे शक्य आहे ते सर्वोतपरी करावे. सकारात्मक व्यवहार म्हणजे सदाचारच की. हा संतजनांनी दिलेला सल्लाच. तो आपण पाळावा. कारण संतवाणी, सृष्टीची वाणी आहे म्हणून ती ईश्वर वाणी आहे.

सार्क संस्थेचे आपले शेजारील सर्वच देश कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. या बाबतचा पुढाकार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने घेतला हे आपण टि व्ही चॅनेलवरून पाहीले आहे. त्याबद्दल सार्क देशाच्या प्रमुखांनी आपल्या पंतप्रधानांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. प्रगत देशात ही कोरोनोची लागण झालेले रूग्ण आढळत आहेत. तरीही काॅग्रेसचे नेते राहूल गांधी पंतप्रधान मोदीवर टिका करण्यासाठी सरसावलेले दिसल्याचे पाहीले, तेव्हा काॅग्रेसच्या या युवराजाची कींव कराविशी वाटली. मला वाटतं, उद्या राहूल गांधी कोरोनोचे संकट ही पंतप्रधान मोदीनी निर्माण केले आहे असा आरोप करू लागतील. शेवटी एखाद्या विषयीचा मत्सर डोक्यात शिरला की माणूस वायफळ बडबड करीत राहातो ज्याला आधूनिक मानसशास्त्रात हिप्नोटीझम(वशीकरण) म्हटले जाते, तसेच काहीतरी राहूल गांधी बाबत घडले असावे.  सार्क परिषदेच्या विडीओ काॅन्फरन्समध्ये अनुपस्थित राहीलेल्या पाकचे पंतप्रधान इमरान खान बाबतही तसेच काहीतरी घडले असावे. असे अनूमान काढावे लागले याचे कारण अलीकडे राहूल गांधी व पाकचे पंतप्रधान इम्रान खानच्या भारतातील घडोमोडी वरील भाष्यें सारखीच असतात.

जगातील बहूतांश देश कोरोना नावाच्या विषाणूशी परस्पर सहकाराच्या जोरावर लढत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या संस्कृती मधील परस्पर दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत इतर देशांना भावली आहे, हे टिव्हीवरून पाहायला मिळाले. या बद्दल आपल्याला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याचे भांडवल करण्याचा मोह टाळावयास हवा. कारण आपल्या नमस्ते मध्ये ' ईश्वर जसा माझ्या हृदयात वसला आहे तसाच तो समोरच्या व्यक्तीत आहे, ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे ' अशी व्यापक भावना आहे. म्हणून ' सर्वेत्र सूखीनः सन्तू, सर्वे सन्तू निरामयाः ' अशी  प्रार्थना करून  कोरोनाशी लढाई करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करणे हेच आजच्या घडीला आपले सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे, व ते पार पाडणे हीच आपली प्राथमिक व आत्यंतिक गरज आहे.

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...