मंगळवार, १७ मार्च, २०२०

कोरोना व्हायरसचा धोका आणि नमस्ते इंडीया



कोरोना व्हायरसची साथ जगभर पसरत आहे. प्रथम चीन मध्ये या जीवघेण्या रोगाची लागण सुरू झाली. चीनमध्ये एक पक्षीय राजवट आहे. ती ही साम्यवादी पक्षाची. तिथे माहिती व प्रसारण मंत्रालयावर सरकारचे नियंत्रण असते. तिथे सेन्साॅरशिप असल्यामूळे तेथून प्रसारीत झालेल्या बातमीवर जगभरातल्या लोकांना सतत संभ्रम पडत असतो. म्हणून कोरोना व्हायरस वर अनेक प्रतिक्रिया ऐकू येतात. कोणी म्हणतात कोरोना म्हणजे चीनने आपल्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्राचे केलेलं प्रात्यक्षिक आहे तर कोणी म्हणतं अमेरिका व चीनने आपल्या फार्मासिटीकल कंपनीचा व्यापार वाढावा या हेतूने संगनमताने केलेलं एक कारस्थान आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या रोगाची साथ निर्माण करून त्यावरील औषधे तयार करणे हा एक व्यवसाय झाला आहे असे मानावयाचे की काय?  यात किती सत्यता आहे, हे पडताळून पाहण्याची सोय नसल्यामूळे अशा प्रकारच्या शंका-कुशंका, अफवा, निर्माण होत आहेत का? एक गोष्ट स्पष्ट आहे की आजचे जग अनिश्चतेच्या रोगाने ग्रासले आहे, त्यावर सध्या तरी उपाय नाही. कारण हे कलीयुग आहे. आजच्या जगाची स्थिती गुरू चरीत्रात वर्णन केलेल्या स्थितीशी जुळते. पण सारं काही दैवावर सोडून देण्यात जीवनाचे सार्थक नसते. म्हणून आपण कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाला सहकार्य करायला हवे. त्यातील एक भाग म्हणून सोशल मिडीयाचा वापर या घडीला सुज्ञपणे करू या व कोरोनो विषयीची आपली चर्चा पुढे रेटू या. 

गेल्या तीन दशकापासून अनोळखी तापाच्या ज्याला इंग्रजीत  Unknown Fever असे म्हटले जाते, त्याची साथ अधून-मधून येत आहे. या विश्वात सर्वात अनाकालनीय गुढ म्हणजे हे विश्व होय असे विख्यात शास्त्रज्ञ आर्कमिडीजने म्हटले आहे, ते तंतोतंत पटते. या ब्रह्मांडात काय काय दडले आहे ते आपण सारे काही शोधले आहे अशा भ्रमात आपण राहू नये. पण  विश्वातील रहस्यें शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्याचे नाव विज्ञान होय. आधूनिक वैद्यकशास्त्राने अनाकलनीय तापावर वेळोवेळी तातडीचे औषधोपचार शोधून अनोळखी रोगजंतूचा संसर्ग थाबविण्यात यश मिळविल्याचे आपण अनुभवले आहे. म्हणून विज्ञानाची कास धरण्यात शहाणपण आहे. पण विज्ञानाची कास धरणे म्हणजे चंगळवाद नव्हे. आपण काय खावे, किती खावे, किती मौज करावी, यावर बंधने घालणे आवश्यक आहे हे ही वैद्यकीयशास्त्र आपल्या नजरेत पदोपदी आणत असते. थोडेसं पाठीमागे वळून पाहिले तर काय दिसते, जेव्हा वैद्यकशास्त्र फारसे प्रगत झाले नव्हते, तेव्हा आहार-विहारमध्ये पथ्य पाळणे हा एक उपचार होता. तरीही मृत्युचा दर Death rate  घसरला नव्हता. माणसाचे आयुर्मान कमी होते. हा झाला मध्ययुगातील मानवाचा इतिहास. वैद्यकशास्त्र जस जसं प्रगत होत गेलं, तसतसे अनेक आजारावर लस, औषधे, सर्जरी इत्यादी उपाय उपलब्ध झाले आणि माणसाचे आयुर्मान वाढत गेले. पण या ठिकाणी हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे अकस्मात मृत्युंच्या घटना तसेच एकाच वेळी व एकाच पद्धतीने होणार्या मृत्युंची संख्या अधिक होते आहे. असें का ? यावर आजचं वैद्यकीय शास्त्र समाधानकारक उत्तर देताना दिसत नाही. एक सत्य असे आहे की सृष्टीतील प्रत्येक जीवाची  उत्क्रान्ती होत असते. त्यामूळे ॲन्टीबायोटीक औषधें जितके परीणामकारक व्हावयास हवेत तसे अनुभवयास येत नाहीत. शिवाय ॲन्टीबायोटीक औषधांचा साईड इफेक्ट होतो त्याचे काय करावे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. म्हणूनच  उत्क्रान्तीचा मक्ता फक्त मानवाकडे आहे असे आपण जे समजतो ते चुकीचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रात औषधे तयार करताना प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण इत्यादी शाखांच्या अभ्यासकांना ही सामील करून घ्यावयास हवे. तसे घडत नाही. त्यामूळे सृष्टीतील संतुलन बिघडते. शेवटी सृष्टीचे संतुलन बिघडणे हे ही नैसर्गिक आहे कारण उत्पत्ती, स्थिती, व लय ही सृष्टीचे वैशिष्टें आहेत या सत्यापाशी आपण येऊन पोहोचतो.  नव-नवीन जंतुचा वाढत जाणारा संसर्ग व त्यातून होणारे मृत्यू हे आधूनिक वैद्यकशास्त्राच्या समोर फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचे कारण नव-नवीन जंतुची होणारी उत्पत्ती रोखण्याचे काम आधूनिक विज्ञान करू शकत नाही. म्हणूनच  पर्यावरणवादी कार्यकर्ते चंगळवादी जीवनशैलीला दोष देत असतात. पर्यावरणाचा अभ्यास हा ही आधूनिक विज्ञानाचाच भाग असल्यामूळे पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर दुर्लक्ष न करणे हे हितावह ठरते. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबविण्याचा प्रयत्न करणे ही संपूर्ण मानव जातीची जबाबदारी आहे. पण त्याबाबत विकसीत देश आणि विकसनशील-अप्रगत देशांत सहमती होतांना दिसत नाही. शस्त्रात्रे निर्माण करून त्याचा व्यापार हेच जर प्रगतीचे लक्षण व उत्पन्नाचा एकमेव मोठा स्त्रोत मानण्याची मानसिकता प्रगत देश सोडणार नाहीत तो पर्यंत अनोळखी रोगांचे आक्रमण मानव जातीवर अधून-मधून होत राहणार असे दिसते. जागतिक पातळीवर युनो एक संस्था कार्यरत आहे, पण तिथे ही प्रगत राष्ट्रांना मिळालेला (वेटो) अधिकार मानवजातीच्या समस्या सोडविण्यात अडसर ठरतो. बरं त्यातही एक गोम अशी आहे की पर्यावरणवादी सुद्धा शास्त्रज्ञांनी ओके केलेल्या उर्जाप्रकल्पाला नाहक विरोध करीत असतात. तिथे अनेक लाॅब्या आहेत. पर्यावरणवादी होणे हा एक व्यवसाय होतो आहे की अशी शंका उत्पन्न होते. असे असले तरी WHO ह्या संस्थेचा कारभार बर्यापैकी समाधानकारक आहे. अर्थात तिथेही बलशाली देशांच्या फार्मासिटीकल कंपन्याच्या लाॅब्या असव्यात असेच दिसते. आज जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेतून मानवाच्या विभिन्न शारिरीक आजारावर  विभिन्न औषधोपाचारांचा शोध घेतला जातो व निर्मिती होते याबाबत दूमत नाही. त्यात ही व्यापारी वृत्तीचा प्रभाव आहे पण तो ही राहणार आहे त्यासंबंधी खल करण्यात काही अर्थ नाही. कारण आपले अध्यात्म सांगते की,  ज्ञान, शौर्य, व्यापार व सेवा ही वैशिष्टे प्रत्येक व्यक्तीत असतात आणि त्यातून स्वार्थ  कोणालाही सुटला नाही. सत्ता स्पर्धेतून शस्त्रस्पर्धा वाढते. शस्त्रस्पर्धेतून युद्धे होतात. युद्धातून वा शस्त्राच्या चाचणीतून प्रदूषण वाढते आणि प्रदूषणातून रोगराई पसरते. मग आपल्याला हताश होण्यापलिकडे पर्याय राहात नाही. माल्थस नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने थेअरी ऑफ पापूलेशन च्या ग्रंथात युद्ध होणे, रोगराई होणे, चक्रीवादळ, महापूर, भूकंप, अवर्षण इत्यादी संकटातून पृथ्वीवरील प्राणीमांत्राचा भार कमी होतो असे म्हटले आहे. फार दूर कशाला जावे, सातशे वर्षापूर्वी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे,
     युद्धकारण पृथ्वी वरती | विषवायू पसरेल ||
     असंख्य जीव ते विषवायूने | प्राणासी मुकतील ||
     युद्धकारणे पृथ्वीवरती | प्रदुषण पसरेल ||
     अनेक दशके या परिणामे | मानव त्रासवेल ||
     रोग-खुजी निकृष्ट अशी | प्रजोत्पत्ती होईल ||
     पृथ्वावरचे व्यवहार सारे | बंद होऊनी पडतील ||

ज्या देशात ज्ञानेश्वर महाराज जन्मले व समाधिस्त झाले त्याच भारत देशात सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे आणि अशा पेंशटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाचा मृत्यु ही झाला आहे. कोरोनाची लागण झालेले बहुतांश पेंशट विदेशवारी करून आलेले नागरिक असल्याचे दिसतात. म्हणजे कोरोनो हा आयात झालेला रोग आहे. पण त्याचा फैलाव सर्वत्र होऊ शकतो. म्हणूनच राष्ट्रीय, प्रान्तीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवरून आरोग्य खात्यातर्फे काही सूचना, उपायाबाबत माहीती दिली जात आहे. त्याला आपण एक समाज म्हणून सकारात्मक प्रतिसाद द्यावयास हवा. ज्यांना या साथीच्या रोगावर राजकारण करावयाचे त्यांच्यापासून ही आपण दोन हात दूर राहीले पाहीजे. आपले दुर्दैव असे आहे की देशातच नव्हे तर जगाच्या कोपर्यात काही ही घडले,  त्यावर सुद्धा राजकीय पोळी भाजून घेण्याची अनिष्ट प्रथा देशातल्या राजकीय व्यवस्थेत रूजली आहे. त्याला काही अंशी आपण मतदार म्हणून ही जबाबदार आहोत. शेवटी समाज म्हणजे काय?  आपणच सारे मिळून बनला आहे ना ! समाज आहे म्हणून तर राजकीय व्यवस्था आहे. राजकीय व्यवस्था आहे म्हणून तर प्रशासन अस्तित्वात आहे. Goverment is the machinery of the state हे सत्य जाणून आपण सार्यांनी प्रशासनाला मदत होईल असे जे जे शक्य आहे ते सर्वोतपरी करावे. सकारात्मक व्यवहार म्हणजे सदाचारच की. हा संतजनांनी दिलेला सल्लाच. तो आपण पाळावा. कारण संतवाणी, सृष्टीची वाणी आहे म्हणून ती ईश्वर वाणी आहे.

सार्क संस्थेचे आपले शेजारील सर्वच देश कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. या बाबतचा पुढाकार आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीने घेतला हे आपण टि व्ही चॅनेलवरून पाहीले आहे. त्याबद्दल सार्क देशाच्या प्रमुखांनी आपल्या पंतप्रधानांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. प्रगत देशात ही कोरोनोची लागण झालेले रूग्ण आढळत आहेत. तरीही काॅग्रेसचे नेते राहूल गांधी पंतप्रधान मोदीवर टिका करण्यासाठी सरसावलेले दिसल्याचे पाहीले, तेव्हा काॅग्रेसच्या या युवराजाची कींव कराविशी वाटली. मला वाटतं, उद्या राहूल गांधी कोरोनोचे संकट ही पंतप्रधान मोदीनी निर्माण केले आहे असा आरोप करू लागतील. शेवटी एखाद्या विषयीचा मत्सर डोक्यात शिरला की माणूस वायफळ बडबड करीत राहातो ज्याला आधूनिक मानसशास्त्रात हिप्नोटीझम(वशीकरण) म्हटले जाते, तसेच काहीतरी राहूल गांधी बाबत घडले असावे.  सार्क परिषदेच्या विडीओ काॅन्फरन्समध्ये अनुपस्थित राहीलेल्या पाकचे पंतप्रधान इमरान खान बाबतही तसेच काहीतरी घडले असावे. असे अनूमान काढावे लागले याचे कारण अलीकडे राहूल गांधी व पाकचे पंतप्रधान इम्रान खानच्या भारतातील घडोमोडी वरील भाष्यें सारखीच असतात.

जगातील बहूतांश देश कोरोना नावाच्या विषाणूशी परस्पर सहकाराच्या जोरावर लढत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या संस्कृती मधील परस्पर दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत इतर देशांना भावली आहे, हे टिव्हीवरून पाहायला मिळाले. या बद्दल आपल्याला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याचे भांडवल करण्याचा मोह टाळावयास हवा. कारण आपल्या नमस्ते मध्ये ' ईश्वर जसा माझ्या हृदयात वसला आहे तसाच तो समोरच्या व्यक्तीत आहे, ईश्वर चराचर सृष्टीत सामावलेला आहे ' अशी व्यापक भावना आहे. म्हणून ' सर्वेत्र सूखीनः सन्तू, सर्वे सन्तू निरामयाः ' अशी  प्रार्थना करून  कोरोनाशी लढाई करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करणे हेच आजच्या घडीला आपले सर्वात महत्वाचे कर्तव्य आहे, व ते पार पाडणे हीच आपली प्राथमिक व आत्यंतिक गरज आहे.

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

सीएए वरील संघर्ष शिगेला पोहचण्याची सुरूवात



दिल्लीत उसळलेली दंगल शमली. आनंद आहे. पण केंद्र सरकार व विरोधी पक्षात सीएए वरून सुरू झालेला संघर्ष संपला असे नाही. उलट दिल्लीतील दंगलीने सरकार व विरोधी पक्षात सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहचण्यास सुरूवात झाली आहे असे दिसते. अशा घटना घडतात तेव्हा सर्वसामान्यांना दुःख होते आणि मुखातून ' हे आपले दुर्दैव आहे ' असे उद्गार बाहेर पडतात. याचे कारण सामान्यजन सीएएच्या संदर्भात चाललेल्या संघर्षाला फारशा राजकीय अभिनिवेशात पाहात नसतात. काही वृत्तपत्राच्या संपादकांनी जागतिक महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष श्री ट्रम्प यांचा भारत दौरा सुरू झालेला असताना दिल्लीत दंगल झाली हे दुर्दैव आहे असे म्हटले आणि गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधानांना दोष दिला. मला प्रश्न पडलाय तो असा की वृत्तपत्रातील व ईलेट्राॅनिक्स मिडीयातील त्या संपादक महाशयांना केवळ ट्रम्प महाशयांच्या दौर्यात अशी घटना घडली म्हणून ती दुर्दैवी वाटते का ? देशातील समाजबांधवात दंगल होते हे मोठे दुर्दैव नव्हे काय? माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला पडलेल्या प्रश्नांकडे मिडीया ढुंकूनही पाहणार नाही. मग आपणच आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधावयाचे हा पर्याय स्विकारावयाचा असतो, आणि तसा पर्याय उपलब्ध झाला आहे म्हणून हा लेख प्रपंच.

२५ डिसेंबर पासून ब्लाॅगवर लिहीलेल्या एकूण सहा लेखापैंकी पाच लेख राजकीय विषयावरील आहेत. त्यातील बहुतांश लेखात सीएए संदर्भात चर्चा झाली आहे. कारण आजकाल सर्वच घटना, चर्चा, वक्तव्यें सीएएच्या विषयाशी निगडीत होत आहेत.  त्या चर्चा, ती वक्तव्यें फक्त राजकीय क्षेत्रात काम करणार्या लोकांकडून होत आहेत असे नाही, न्यायालय, उद्योग, साहित्य, कला, सेनादल, प्रशासन, स्वायस्त संस्था, सहकारी, स्वयंसेवी संस्थात वावरणार्यां लोकांकडून होत आहेत. मिडीया क्षेत्र हे तर अशा चर्चांचे उगमस्थान आहे. इथेच घाण साचली आहे. म्हणून सर्वच क्षेत्रात दुर्गंधी पसरत आहे. 

' नागरिकत्वाचं कूळ आणि विरोधकांचे खूळ '  'मुहँमे गांधीजीका नाम और कृती करें माओके नाम ' या दोन लेखात सीएए संबधीत राजकारण कसे पुढे सरकत जाईल यावर अंदाज मी व्यक्त केला आहे. पण ब्लाॅगवरील लेख वा फेसबूकवरील पोस्टच्या प्रसारणाला प्रांतीय, राष्ट्रीय सीमा नसतात म्हणून आपल्या देशांतर्गत होणार्या घटनेवरील चर्चेत काही अंदाज तसेच कडवट प्रतिक्रीया मी लेखांत व्यक्त करीत नाही.  केजरीवाल यांच्या विजयानंतर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत देशाच्या दौर्याला सुरवात झाली असता दिल्लीत दंगलीचा भडका उडाल्याने अनायसे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिका करण्याची संधी मिडीयाला मिळाली. ती त्यांनी साधली. पण हे मला अनुचीत वाटते. म्हणून मला ही आता स्पष्टपणे काही गोष्टी मांडायला हव्यात असे वाटू लागले आहे. काही संपादक महाशहांनी अग्रलेखाद्वारें  ट्रम्पच्या उपस्थितीत भारताच्या पंतप्रधानावर व गृहमंत्र्यावर जी  टिका केली आहे ती कुठल्या आधारावर केली हे स्पष्ट केले नाही. फक्त टिका करण्याची संधी साधली. माझे तर याबाबतीत स्पष्ट मत असे आहे की या संपादक महाशहांनी देशाच्या प्रतीमेबाबत आपली चिंता व्यक्त केली नसून आपला छुपा राजकीय अजेंडा व्यक्त केला आहे. त्यांच्या छुप्या एंजडाच्या स्वरूपात  वेळोवेळी थोडासा बदल होत असतो. कारण या छुप्या एंजडात, ख्रिश्चन मिशनरी लाॅबी, मानवाधिकार लाॅबी,  इस्लामी जगत , साम्यवादी लाॅबी, व मिडीया मालक इत्यादींच्या मर्जींचा सहभाग असतो. अमेरिकेच्या अध्यक्षांचा या दौर्यात पाकिस्तानचा समावेश नाही. मग भारतात अशांतता आहे, इथे इस्लामी बांधव भयाने पछाडलेले आहेत अशी पाकिस्तान स्टाईल टिका कोणीतरी आंतरराष्ट्रीय समुदायाला विशेष करून इस्लामी समाजापर्यंत पोहचण्याचे काम केले पाहीजे ना ! तेच काम काही संपादक मंडळीने केले आहे.

आपल्या मिडीयावर स्वातंत्र्यपासून विदेशी राजकीय शक्ती आणि धनशक्ती यांची गुलामी पत्करलेल्या  वृत्तीच्या लोकांचा प्रभाव आहे. आणि अशी माणसें विचारवंत म्हणून घोषित करण्याचे काम विदेशी शक्तीच करीत असल्याने अशांच्या मदतीने  बहूतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजकारणात आपले बस्तान बसविले. अरविंद केजरीवाल हे अलिकडच्या काळातील उदाहरण आहे. विदेशातील भारतीय वंशजांना नोबेल तसेच तत्सम पारितोषके दिले जातात त्यात ही काही अंशी भारताच्या  राजकीय , सामाजिक, व आर्थिक व्यवस्थेवर आपले अप्रत्यक्ष नियंत्रण असावे अशा हेतूने दिले जात असावेत. मागे रिझर्व बँकेतील गव्हर्नर श्री राजन यांचे मिडीयात भरभरून कौतूक झाले, पण त्यांच्याच काळात देशात सर्वाधिक संख्येने तेही मोठाले आर्थिक घोटाळे झाले. श्री राजन यांना मुदतवाढ मिळाली नाही म्हणून गेले परत शिकागोला आपल्य्या मोठ्या पगारांच्या नोकरीसाठी. भारताच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल त्यांना आस्था होती, तर थांबावयाचे होते आपल्या देशातच. देशात विद्यापीठांचा तुडवडा आहे का?  अमेरिकेतून आता सल्ले देत आहेत आणि आपली मिडीया गौरवाने त्यांचे सल्ले प्रसारीत करीत आहेत. आपल्याला ज्यांचा अभिमान वाटतो ते नोबेल पारितोषक विजेते श्री अमर्त्यसेन विदेशातून सल्ले देत आले आहेत आणि केंद्रात मोदी सरकार आल्यापासून ते जणू काही आपल्या येथील विरोधी पक्षांच्या वतीने बोलत आहेत असेच वाटते. भारतात चार-पाच वर्षे राहून भारतियांना आपल्या ज्ञानाचे दान करण्याचे ते मनात ही आणत नाहीत. सीएए, ३७० कलम इत्यादीवरून जो गोंधळ चालू आहे तो सर्वधर्मसमभाव विरूद्ध हिंदुत्व असा सामना असला तरी आता त्याचे स्वरूप विदेशी शक्ती विरूद्ध स्वदेशी शक्ती असा होऊ पाहात आहे. प्रगत देशाच्या सत्ताधार्यांचे राजकारण म्हणजे इतर देशात आपआपले मांडलीक ठेवून अस्थिरता माजविणे हेच होय. तसे पाहता हा त्यांचा एक मोठा धंदा आहे. आज बहूतांश विकसनशील देशातील निवडणूकातील प्रचार व निकालावर आर्थिक व सामरिक रित्या सशक्त असलेल्या देशांचा प्रभाव असतो. म्हणून दिल्लीतील दंगली वर भाष्य करताना काही मिडीयांनी ट्रम्प महाशयांच्या दौर्यात देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यावर टिका करून आपल्या मालकांची मर्जी राखली आहे.

तसे पाहता ट्रप्म येवो वा चीनचे शी जिनपीन येवो ही मंडळी व्यापार व आपल्या स्वतःच्या देशाच्या फायद्यासाठीच येत असतात. ट्रम्प महाशयांच्या दौर्यात दिल्लीत दंगल झाल्याचे ज्यांना दुःख आहे त्या संपादक महाशयांनी दिल्लीच्या भर रस्त्यात दोन महीने मुस्लीमांचा ठिय्या चालू आहे, दिल्लीकरांना रोजच्या वाहतूकीचा खोळंबा सहन करावा लागतो आहे याबद्दल आंदोलकांचे मन वळवायाचा प्रयत्न केला आहे का?  त्या आंदोलकांना सीएए संबंधी काय कळतेय याची विचारपूस केली आहे का? काॅग्रेसचे शशीथरूर म्हणे बॅ जीनाचा विजय होईल असे वक्तव्य करतात त्यावर या मिडीयांवाल्यांनी पहील्या पानावर बातमी द्यायला कच खाल्ली. अग्रलेख लिहून शशीथरूर यांच्यावर टिका करणे दूरच राहीले. बाकी ट्रम्प महाशय काय किंवा ओबामा काय, किंवा चीनचे शी जिनपीन काय यांची भारतातील सर्वधर्मसमभावाची व्याख्या म्हणजे भारतात ख्रिश्चन मिशनरी, डाव्याची नक्षलवादी, व तुर्कस्तानातील इस्लामी विकृतीच्या प्रचारकांना आपल्या देशात स्वातंत्र्यापासून मिळत असलेले मोकळे रान सुरू राहण्यापुरता सिमीत आहे. जागतीकरणाच्या युगात या विदेशी नेत्यांच्या सर्वधर्मसमभावाच्या व्याखेला थोडीशी व्यापकता आली आहे पण ती ही त्यांच्याच हितासाठी.  आपआपल्या देशात आपली खुर्ची टिकविण्यासाठी आर्थिक मदत करणार्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ज्यांच्या भारतात एन्जीओ आहेत व सतत हिंदू हिताच्या विरूद्ध कार्ये करीत आहेत अशांना भारतात व्यवसायाचा परवाना मिळावा हाच उद्देश असतो. त्यांना भारतातील बहुसंख्य समाजाच्या हिताशी काही देणे-घेणे नसते. सीएए आंदोलनाच्या संदर्भात केरळातील PPF चा पैसा, दिल्लीतील आप पक्षाचा नेत्यां विरूद्धात मिळालेला पुरावा या गोष्टी काय दर्शवितात? भारतात आपले राजकीय, धार्मिक, व आर्थिक क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी माया पुरविण्याचे काम याच एन्जीओ करीत असतात.

दिल्लीतील दंगली संबंधी दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारवर टिका केली ती योग्य आहे. पण याबाबत मिडीयातील त्याच महाभागांनी अशा रितीने प्रतिक्रीया दिल्या आहेत की जणू सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान व गृहमंत्र्यांना आरोपीच ठरविले आहे. हे निःपक्ष पत्रकारीतेचे लक्षण आहे का? मग देशाच्या सन्माननीय सरन्यायाधिश श्रीमान बोबडे साहेबांनी " आधी हिंसाचार रोका मगच आंदोलकांच्या याचिकेवर काय ते बघता येईल " असे सुनाविले तेव्हा याच मिडीयातील महाभागांनी आंदोलकांच्या आडमुठीपणावर ताशोरे ओढायला हवे होते की नाही ? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल दंगल शमविण्यासाठी स्वतः दिल्लीच्या रस्त्यावर उतरले, व दंगल शमली. पण याच मिडीयावाल्यांना यासंबंधी डोवलांचे दोन शब्दाचे कौतूक करावे असे वाटले नाही. अजित डोवल मोदीचे, मोदी भाजपाचे, भाजपा संघवाल्याचा  ही तथाकथीत पुरोगामी, डाव्या, व ढोंगी सर्वधर्मसमभाव मानण्यार्या पक्षांना जडलेली एक खोड आहे. दिल्लीच्या न्यायाधिशाची तडकाफडकी बदली केली यासंबंधी ओरड उठविणे हा कर्तव्याचा भाग आहे, हे मान्य पण सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशाने बंड केले तेव्हा कुठे तुमचा धर्म गेला होता ? आपल्या देशात न्यायालय, व इतर स्वायस्त संस्थेत सरकारचा हस्तक्षेप स्वातंत्र्यापासून होत आहे हा इतिहास विरोधी पक्षांचे पक्षकार झालेल्या संपादकीय मंडळी व विचारवंताना माहीत आहे. माझं म्हणणं असं आहे की यातील बरीच मंडळी याबाबतीत साक्षीदार व सहभागी आहेत. सरकारचा स्वायस्त संसदेतील हस्तक्षेप फक्त गेल्या सहा वर्षात होत आहेत अशाच तोर्यात ही मंडळी ओरड करीत असतात.  पण मतदार फारसे मनावर घेत नाहीत. याचे कारण यांच्या वर्तणुकीचा इतिहास माहीती व तंत्रज्ञानातील साधनांच्या साह्याने एका क्लिकवर सर्वसामान्य लोक वाचत आहेत.

दिल्लीतील दंगली संबंधी रितसर तपास होईल व त्यातून सत्य बाहेर येईल. आरोपींना शिक्षा होईल. पण ठिय्या आंदोलन करण्यासाठी रहदारीची जागा तब्बल दोन महीन्याहून अधिक काळ वापरत आहेत  हा गुन्हा नव्हे काय? ही मिजास नव्हे काय ? भारत सरकारने यांची रोजी-रोटी हिसकावून घेतली आहे का? काही मिडीया न्यायालयाची भूमिका घेऊन वावरत आहेत. ही आंदोलन करणारी कोणाची पिल्लावळ आहे याचा प्रथम तपास  होऊ द्या, दिल्लीत दंगल कोणी सुरूवात केली याचा तपास होऊ द्या. कदाचीत ट्रम्पच्या दौर्याचे वेळी दिल्लीत दंगल घडवून  सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रद्रोही मंडळीने केलेले हे कारस्थान ही असू शकते. मिडीयाने आपल्या मनात आले तसे निष्कर्ष काढू नयेत. वादा करीता मान्य केले की दिल्लीतील दंगल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भडकाऊ भाषणामूळे उसळली असेल तरीही माझे म्हणणे असे आहे की दिल्लीतील रहदारीत आंदोलकच्या ठिय्यामूळे ज्यांना त्रास होतो आहे त्यात प्रवासी वा उतारू म्हणा हिंदू नाहीत का?  रस्त्यावर चार चाकी, तीन चाकी, दुचाकी, वाहनाच्या वापरातून प्रवाशी टॅक्स भरतात ना ! एक प्रवासी म्हणून त्रास सहन करणार्याच्या शक्तीला मर्यादा आहेतच ना ! आणि महत्वाचं म्हणजे हिंदु समाज हा देशाचा बहुसंख्यांक आहे. त्या समाजाच्या सहिष्णूतेचा अवाजवी फायदा घेण्याची, त्याला आव्हानं देण्याच्या घोषणा व फलक लावण्याचे उद्योग  विशिष्ट वसाहातीत सर्वत्र तर भाजपेतर राज्यात तेथील सत्ताधारी पक्षांच्या संमतीने होत आहेत ना? त्यातून हिंदूच्या भावना दुखावल्या जात आहेत की नाही ? मग अशा वृत्तीला लगाम घातला गेला पाहीजे की नाही? सिएए च्या समर्थकांना ही आपले म्हणणे मांडण्याचा हक्क आहे. हे सर्व संबंधीतांनी दक्षतेने जाणून घेण्याची गरज आहे. 

देशातील स्थिती अशी आहे की, डावे, मधले, पळपूटे,  माना डोलाविणारे,विदेशी शक्तीचे चमचे, ढोंगी इत्यादींनी आपला घसा कोरडा होईपर्यंत मोदी-शहा व संघावर आरडा-ओरडा, शिव्याशाप दिल्या तरी भाजपा आपल्या धोरणावर ठाम राहाणार आहे. भारतीय जनता पार्टी जनसंघाच्या स्थापनेपासून आपला एंजडा मतदारासमोर मांडत आलेली आहे. मतदारांनी दोन वेळा भाजपाला केंद्रात बहूमताने सत्तेवर बसविले असल्यामूळे आपल्या निवडणूक जाहिरनाम्यानुसार कायदे करण्याचा हक्क मोदी सरकारला प्राप्त झाला आहे. इतकं सामान्यज्ञान माहीत असूनही देशात अराजक माजविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत राहणार असतील तर मला वाटते आता बस झाले, पुरे झाले. मोदी सरकारने कायदा वाचून दाखविण्याचा प्रयत्न बंद करावा. पुरे झाले.  आता प्रथम देश, देशाचे स्वातंत्र्य व सुरक्षा तीही अंतर्गत व बाह्य यालाच प्राधान्य द्या. देशातील घुसखोर्यांना शोधून काढा, त्यांचे काय करावयाचे ते पुढे ठरविता येईल. भ्रष्टाचारी नेत्यांचे पितळ उघडे करा. मग त्यात भाजपाचे नेते असले तरीही.  बेनामी संपत्ती जप्त करा. अशा केसेस चा निकाल लौकर लागण्यासाठी स्वतंत्र न्यायालय तयार करा. सीएए, एनसीआर अंमलात आणाच. इत्यादी कार्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उभे करा. बेरोजगारांना या कामासाठी नेमा. मिडीया, विविध एनजीओच्या आर्थिक ताळेबंदाची तपासणी होऊ द्या.  देशाशी फितूरी मग ती परकीय आर्थिक मदत मिळवून देशाच्या मूळ संस्कृतीवर घाला घालणारी कार्ये असोत, वा दशहतवाद माजविण्याची कृत्ये असोत,  एनजीओच्या माध्यमातून धर्मातंराची कृत्ये असोत वा  अराजक माजविणारी कृत्यें असोत, ही देशद्रोहाच्या परीभाषेत समाविष्ट करून कायदा कडक करा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा बेताल उपयोग, सार्वजनिक रस्त्यावर अनाठायी ठिय्या मांडणे, स्वतःच्या धार्मिक उपासनेची मिजास दाखविणे, उठसूठ सार्वजनिक मालमत्तेची आगीच्या डोंबात राख करणे, इत्यादी दृष्कृत्यांची देशाच्या कायद्यात काय सजा असते हे धर्माच्या नावाखाली स्वतःच्या फायद्यासाठी एकजूट दाखविणार्यांना, सर्वधर्मसमभावाच्या फुशारक्या मारून राजकारण करणार्या पक्षांना, १९७५ सालच्या आणिबाणीचे समर्थन करणारे पक्ष, पत्रकार,  विचारवंत, विदेशी शक्तीचे दलाल इत्यादींना कळू द्या. मोदी सरकारने कायद्याचा बडगा उगारण्याची तयारी आतापासूनच  करायला हवी .अन्यथा ही नतद्रष्ट मंडळी अधिक शेफारून जातील व देशाला यादवी युद्धाच्या खाईत लोटतील. 

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

शरद पवार - ना चाणक्य, ना वारकरी, फक्त राजकारणी


राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी अलिकडे म्हटले की, " समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरू नव्हते." त्यावर समाज बांधवांनी कुठली ही प्रतिक्रीया दिली नाही. रामदास स्वामींच्या शिष्यांनीही काही गदारोळ केला नाही. यावरून समर्थ रामदास स्वामींनी समाजाला दिलेली राष्ट्रधर्माची शिकवण किती मजबूत आहे याचे प्रत्यंतर आले आहे. कोण्या वारकर्यांने शरद पवारांना हिंदू विरोधी म्हटले त्यावर ही समाज माध्यमातून गदारोळ दिसला नाही.  ज्या कोणी वारकर्याने ते विधान केले त्यावर उलट शरद पवारांनी स्वतःहून प्रत्युत्तर दिले आहे. काय होते ते प्रत्युत्तर ? म्हणे, ' माझ्यावर टिका करणार्या वारकर्याला खरा वारकरी धर्मच समजला नाही. 

वरील दोन्ही विधानावरून शरद पवारांना खरोखरीच राष्ट्रधर्म व वारकरी धर्म कळले आहेत का, की जाणून-बुजून शरद पवार त्याकडे दुर्लक्ष करतात असा प्रश्न पडतो. खरा वारकरी आपल्यावर टिका झाली तरी सुद्धा त्या टिकेवर उत्तर देत नाही. त्याला त्याच्यावर केलेल्या टिकेचे भान ही नसते. कारण त्याने ' हे विश्वची माझे घर ' असे मानलेले असते. शरद पवार हे मुलतः राजकीय क्षेत्रातील नेते आहेत. त्यामूळेच त्यांच्यावर कोण्या वारकर्यांनी केलेल्या टिकेवर त्यांनी उत्तर दिले. पण त्यांतून शरद पवार वारकरी धर्माचे व्याख्याते आहेत अशी समजूत थोडीच होणार ? शेवटी शरद पवार हे शरद पवारच होत.

' मराठा तितुका मेळावावा ' हा खरा महाराष्ट्रधर्म आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे महा राष्ट्रधर्म हाच खरा अर्थ आहे. मराठा या शब्दाचा अर्थ  ' जो महाराष्ट्रात राहातो, ज्याची मातृभाषा मराठी आहे, व या देशावर जो काही परकीयांकडून आघात होईल त्याला सडेतोड उत्तर देत अटकेपार झेंडा रोवण्यासाठी सदैव तयार राहील तो मराठा !'  आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविले तेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीतून, महाराष्ट्र राज्याचा कलश हाती घेऊन आलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना जेव्हा पत्रकाराने विचारले की हे मराठ्यांचे राज्य होईल का, त्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी  
" हे मराठी भाषिकांचे राज्य आहे," असे समर्पक उत्तर दिले होते. ज्या यशवंतराव चव्हांणाना गुरू मानले त्या गुरूने दिलेल्या शिकवणीचा शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सत्तेसाठी जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याची भावना महाराष्ट्रातील काही राजकीय अभ्यासक तसेच बहुतांश मतदारांच्या मनात आहे. म्हणूनच शरद पवार महाराष्ट्रात कधीही स्वबळावर सत्ता तर दूरच पण आपल्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून देऊ शकले नाहीत. स्वतःनीच रचलेल्या राजकीय खेळीमूळे शरद पवार देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकले नाहीत याबाबत कुणाचे दुमत नसावे. या संबंधी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारकाळात 'शरद पवारांची माघार की हार ' या शिर्षकाच्या एका लेखात मी चर्चा केली आहे,  त्यामूळे त्यावर अधिक चर्चा येथे नको करू या.

मराठ्यांचे राज्य, मराठ्यांचा इतिहास असे जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यातून येतात, त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास प्रतिबिंबीत होत असतो. आपल्या देशात पश्चीम व वायव्य दिशेकडून आलेल्या सुलतानी व मोगलशाहीच्या आक्रमणातून स्थिर झालेल्या परकीय राजवटीने आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या देवदेवातांच्या मंदिरावर, आपल्या समाजबांधवावर, माता-भगिनींवर केलेले अत्याचार व विध्वंसक धुडगुसीला सडेतोड उत्तर देण्याच्या पराक्रमाचा जो इतिहास आहे तोच तो मराठा धर्म. तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधल्यापासून ते अटकेपार भगवा झेंडा फडकविण्याचा आणि नंतर  मराठेशाहीच्या अखेरच्या पेशव्याचा ब्रिटीशाकडून पराभव झाल्यापर्यंतचा कालखंड हाच तो मराठाशाहेचा इतिहास. त्या संपूर्ण इतिहासात झालेले विजय व पराजय हे एक समाज म्हणून  स्विकारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि असा विचार करून समाजाला एका सुत्रात बांधण्याचे जे काही रचनात्मक कार्य केले जाते त्याचेच नाव आहे राष्ट्रवाद वा राष्ट्रधर्म. परंतु आपण लोकशाही राज्यप्रणाली स्विकारल्यानंतर, राजकीय पक्ष, निवडणूका व मतदान या गोष्टी ओघाने आल्या व त्यातूनच निवडणूका जिंकण्यांसाठी जाती-पातीमध्ये भेदभाव उत्पन्न करण्याचे शाॅट कट्स जन्माले आले, आणि दुर्दैवाने तेच आपल्या बहुपक्षीय लोकशाही व्यवस्थेचे स्वरूप बनले.  त्यासाठी आपण मतदार म्हणून ही तितकेच जबाबदार आहोत.

अलिकडे शिवसेनेचे संजय राऊत ही इतिहासाचे दाखले देत असतात. त्यावर आदित्य ठाकरेंनी ' इतिहासापासून शिकत पुढे जावयाचे, इतिहास उरकून काढू नये ' अशी प्रतिक्रीया देत संजय राऊत यांना समज दिली. अर्थात तशी समज संजय राऊतानां त्यांनी दिली कारण आपण स्वतः या महाराष्ट्राचे युवराज आहोत या अहंकारातून.  पण त्याच युवराजाने शरद पवार यांनी इतिहास उरकून नव्हे तर खोटा इतिहास मांडला त्यावर काही भाष्य केले नाही. कारण शरद पवारांच्या मेहनतीने आपले पिताश्री मुख्यमंत्री व आपण मंत्री झालो आहोत ही भावना जपावयाची होती. पण या भावनेत कृतज्ञता वा आदर व्यक्त होण्याऐवजी सत्तेसाठी शरद पवारांचे दास्यत्व स्विकारल्याचे दर्शन अधिक झाले.  व्यक्ती एक पण दोन व्यक्तींच्या एकाच धर्तीच्या वक्तव्यावर भिन्न व्यवहार ! कुठे एकाला समज व सापत्न व्यवहार व दुसर्याला आदर द्यावयाचा वा त्याचे दास्यत्व स्विकारयाचे. यालाच आपल्या येथे राजकारण म्हटले जाते. श्री शरद पवारांनी समर्थ रामदास स्वामी संबंधी जे वक्तव्य केले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. शरद पवार एक व्यावसायिक राजकारणी आहेत. त्यामूळे समाजातल्या जाती-जमातीत भेद कसा उत्पन्न होईल असे भाष्य करीत ते इतिहास मांडत असतात. ज्या दिवशी शरद पवारांनी समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असे भाष्य केले त्याच दिवशी एबीपी माझा चॅनेलवरून संध्याकाळी समर्थ रामदास स्वामी हेच छत्रपती शिवरायांचे गुरू होते हे पुराव्यसकट टिव्हीवरून दाखविले. शरद पवार उघडे पडले. पण सुंभ जळला तरी पीळ जात नाही हेच खरे. त्यामूळे शरद पवारांनी कोण्या एका वारकर्याच्या टिकेला उत्तर दिले. शरद पवारांची विश्वासर्हता इतकी कमी झाली आहे की,  ज्या वारकर्याने शरद पवारवर  टिका केली त्याचा बोलाविता धनी सुद्धा शरद पवारच असावेत असे म्हटले तरी ते खरे वाटू शकते. शेवटी त्या वारकर्याला वारकरी धर्मच समजला नाही असे जाहीर कार्यक्रमात बोलून शरद पवारांनी काय साधले ते फक्त शरद पवारच जाणो.

शरद पवार सध्या सतत काही ना काही वक्तव्यें करताना दिसत आहेत.  त्या पाठीमागे दोन करणें आहेत. त्यातील पहीले कारण म्हणजे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमीत शहांनी, तीन तलाक, ३७० कलम, सीएए च्या माध्यमातून राष्ट्रवादाचे जे आव्हान उभे केले आहे, त्याला तोंड कसे द्यावयाचे या विंवचनेत शरद पवार पडले आहेत. फार मोठे कष्ट उपसून (की दुष्कृत्यें करून )  महाराष्ट्रात उभे केलेल्या सरकारातील शिवसेना व काॅग्रेस या घटकांमध्ये तणाव वाढून सरकार पडेल की काय ही भिती त्यांना सतत सतावीत आहे. महाविकास आघाडीच्या सरकार मधील महत्त्वाची खाती शरद पवारांच्याच पक्षाकडे आहेत. म्हणूनच विद्यमान सरकार टिकावे अशी इच्छा इतर दोन्ही पक्षांपेक्षा शरद पवारांची दांडगी दिसते. अलिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  'आम्ही भविष्यात भाजपासोबत जाणार नाही असे कोठे म्हणतोय ' असे वक्तव्य करून या सरकारबाबत ते किती निष्ठावान आहेत हे कळून येते. त्यांना फक्त एकदा तरी मुख्यमंत्री व्हावयाची इच्छा होती ती पुरी झाली आहे बाकी शिवसेनेचा बादशहा तर राहणार आहोतच याहून अधिक मोठा वडीलोपर्जीत वारसा मिळण्याचे समाधान कुठे आहे. तर दुसरीकडे थोरात, अशोक चव्हाण व अधून-मधून पृथ्वीराज चव्हाण इत्यादी काॅग्रेस नेते ही शिवसेनेला इशारा देताना दिसत आहेत. हे सरकार पडले तर अधिक नुकसान शरद पवारांच्या पक्षाचे आहे. हे शरद पवार जाणून आहेत म्हणून सारा महाराष्ट्र जाती-जमातीत विभागला जावा असे राजकारण खेळण्याचे धोरण शरद पवार आखत आहेत. त्यातला सर्वात सोयीचा प्रकार म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उरकून काढणे हा होय. तसे पाहता, शरद पवारांची ती जुनीच खोड आहे. सध्या ती अधिक तीव्र झाली आहे इतकाच काय तो फरक. शरद पवारांचा राजकारणातील संधीसाधूपणा, जातीय कार्ड खेळण्याच्या सवयीचा, व फळापासून दारू बनविण्याची हौस इत्यादी संबंधी  महाराष्ट्राचे जेष्ठ  संपादक स्वर्गीय माधव गडकरींनाही वैताग आला होता. त्या वैतागातून त्यांनी  लोकसत्तेतून 
' काॅग्रेसचा प्रवास - साबरमती ते बारामती ' अशा शिर्षकाचा लेख लिहून शरद पवारांना समज दिली होती.

दुसरे कारण असे आहे की आज ना उद्या अजित पवार हे वेगळा पक्ष काढणार आहेत हे शरद पवारांना उमगले आहे. कारण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत हा घराणेशाहीच्या तत्वावर जन्म झालेल्या राजकीय पक्षाला मिळालेला शाप असतो. अजित पवार यांचा मराठा समाजावर मोठा प्रभाव आहे मग सुप्रिया सुळेचं काय हा प्रश्न शरद पवारांना सतावीत असणारच.  म्हणून शरद पवारांनी शिवसेनेशी सलगी वाढविलेली दिसते. त्यातून शिवसेनेला फायदा किती  व नुकसान किती याचा विचार करण्यापेक्षा सुप्रिया सूळेंना शिवसेनेच्या माध्यमातून ओबीसी समाजात समर्थन वाढविण्याच्या विचाराला (म्हणजेच स्वार्थ साधणे ) शरद पवारांनी प्राधान्य दिले आहे. मग अजित पवारांना राज ठाकरेंशी संधान बांधावे लागेल. शेवटी महाराष्ट्रात सरकार भाजपा प्रणित आघाडीचे येवो वा  शिवसेनाप्रणित आघाडीचे असो,  पवार व ठाकरें घराणे  राजकीय दृष्ट्या सुरक्षित राहू शकतील असा बेरकी हिशोब डोळ्यासमोर ठेवून  शरद पवार आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जातीय तेढ वाढतील अशाच राजकीय खेळी खेळण्याचा संभव आहे.

लागोपाठ दोन विधानसभा निवडणूकीत जीवाचे रान करूनही शरद पवारांच्या पक्षाचे साठ हून अधिक आमदार निवडून आले नाहीत. संसदेत सुद्धा राष्ट्रवादीची संख्या नगण्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करूनही भाजपाचे आमदार गळाला लागले नाहीत. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाचे स्थान अबाधित आहे आणि जोवर दिल्लीत भाजपाचे सरकार आहे तोवर  महाराष्ट्रातही भाजपाचे तेच स्थान अबाधित राहणार हे ही दिसते आहे. दिल्लीत वाजपेयीचे सरकर होते त्यावेळी जो मान शरद पवारांना होता तो ही आता मिळेनासा झाला आहे. युपीए मधील मुख्य पक्ष काॅग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत आहे. इतर प्रादेशिक पक्षांचे नेते आपआपल्या राज्यात शरद पवारांच्या महाराष्ट्रातील ताकदीपेक्षा अधिक सरस आहेत. त्यामूळे शरद पवारांची फार मोठी पंचाईत झाली आहे. मग ' जायें तो जायें कहाँ 'अशी स्थितीत शरद पवारांना महाराष्ट्रातच ठाण माडंण्या पलीकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे. म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर शरद पवारांनी, कुठलेही सरकार दरबाराचे पद नसताना भीमा-कोरेगाव प्रकरणात आपले नाक खुपसले. मोदी सरकारने एका झटक्यात शरद पवारांचे प्रयत्न हाणून पाडले. भीमा-कोरेगाव प्रकारणाचा तपास एनआयए कडे सोपवून शरद पवारांना त्यांनी महाराष्ट्रातच जखडून ठेवले. शरद पवारांना इथे महाराष्ट्रात भले कोणी चाणक्य मानो पण आपल्या उभ्या हयातीत शरद पवारांना दिल्लीच्या राजकारणात वजन प्राप्त करता आले नाही. तसे पाहता चाणक्याची वा छत्रपती शिवाजी महाराजाची उपमा कुठल्याही विद्यमान राजकीय नेत्याला देऊ नये. कारण चंद्रगुप्ताला राज्यसिंहासनावर बसवून स्वतः झोपडीत राहणारा चाणक्य पुन्हा जन्माला आलेला नाही. शिवाजी महाराज तर आपल्या सर्वांचे दैवतच आहे. ( या संबंधीची विस्तृत माहिती  शिवमहाराज्यभिषेक दिन या शिर्षकाच्या तीन भागातील लेखांत मी दिली आहे)  सारांश काय तर, चाणक्य काय, शिवाजी महाराज काय हे जन्माला यावे लागतात. त्यासाठी ब्रिटीश राजवटीत लिहलेल्या आपल्या देशाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात आपल्या पुर्वाश्रमींच्या पराक्रमाचा, त्यागाचा, विद्ववत्तेचा, समावेश करावयास हवा, आणि तो इतिहास आत्मीयतेने शिकवला जावयास हवा. उगीच आपआपल्या आवडत्या विद्यमान नेत्यांना चाणक्य वा शिवाजी महाराज म्हणून पदवी देण्यात काय आनंद मिळतो, देव जाणो ! 

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

शशीथरूर यांचे सिएए संबंधीत अजब भाष्य


केंद्र सरकारने सीएए कायदा मंजूर करून बरेच दिवस झाले. विरोधी पक्ष विशेषतः डावे, काॅग्रेस व मित्र पक्षांनी हिंसक आंदोलने करण्याचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारवर अशा हिंसक आंदोलनाचा काही परीणाम झाल्याचे दिसत नाही. उलट केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या शासकीय ढाच्यात सूचना पाठविल्या आहेत. भाजपेतर पक्षांची ज्या राज्यात सत्ता आहे, त्यातील काही राज्यांच्या विधानसभेत सीएए च्या अंमलबजावणीस विरोध दर्शवून तसा ठराव मंजूर करून घेतला आहे. या शिवाय सुप्रिम कोर्टात बहूतांश विरोधी पक्षांनी तसेच काही स्वयंसेवी संघटना व व्यक्तींनी सीएए विरोधात केसेस दाखल केल्या आहेत.  हे सारे पाहता, सीएए संबंधीत सरकार व विरोधी पक्षांत सुरू झालेल्या लढाईचा काळ लांबला जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामूळे या लढाईचे स्वरूप कसे असेल, या लढाईतून शेवटी काय निष्पन्न निघेल, हे आताच काही सांगता येईल अशी स्थिती नाही. पण  काॅग्रेसचे एक नेते  शशी थरूर ह्यांनी जयपूर येथे सीएए संबंधी केलेले भाष्य म्हणजे अजब तर्कदुष्ट आहे. त्यांनी केलेल्या विधानातून काॅग्रेस मुस्लीम बांधवांना एकप्रकारे बंडखोरीसाठी उद्युक्त करीत आहे तर दुसर्या बाजूला  देशातील हिंदू समाज बांधवात पुन्हा एकदा देशाच्या फाळणीचे भय उत्पन्न करणारी एक धोकादायक खेळी खेळते आहे असे दिसते, ते ही कडव्या डाव्या पक्षांची व हिंसक नक्षलवाद्यांशी साथ घेऊन. 

काय म्हणाले होते हे शशीथरूर महाशय? म्हणे, 
' सीसीए हा कायदा बँरिस्टर जिनांचा विजय करणारा ठरेल.'  हा बॅरिस्टर जीना कोण? स्वातंत्र्यपुर्व राष्ट्रीय सभेचा (म्हणजे आजचा काॅग्रेस पक्ष) एक क्रियाशील पण महत्वकांक्षी नेता. लोकमान्य टिळकांनी जीनाच्या व त्यांच्या मुस्लीम सहकारी मित्रांचा राष्ट्रीय सभेतील वाढत्या उपद्रवाची दखल घेतली होती. म्हणून लखनौ कराराच्या वेळी राष्ट्रीय सभेत स्पष्टपणे म्हटले होते की या पलिकडे जीना आणि त्यांच्या मुस्लीम समाजाची कुठलिही अवाजवी मागणी पुर्ण करू नये. परंतु लोकमान्य टिळकांच्या महानिर्वाणानंतर महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सभेने तुर्कस्थानातील खिलापत चळवळीला पाठींबा दिला. तेथूनच बॅरिस्टर जींनानी राष्ट्रीय सभेला वाकविण्याची सुरूवात केली व पुढे मुस्लीम लिग पक्ष स्थापन करून हिंदुद्वेष वाढवित मुस्लीमासाठी स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करून घेतले. सोबत ५१ कोटी रूपये घेतले. इथल्या मुस्लीम बांधवापैकी ज्यांना पाकिस्तानात जावयाचे होते, त्यांना सन्मानाने जाऊ दिले. चांगली गोष्ट आहे. आपली संस्कृती आहे तशी. पण पाकिस्तानमधून हिंदू बांधव कसे आले? आले कसले, छळ करून पाठविले ! हजारो-लाखो हिंदू बांधवांच्या अमानूष रित्या कत्तली केल्या, बायका मुलींच्यावर बलत्कार केले. जे हिंदू पलायन करून वाचू शकले ते ही अर्ध्या-फाटक्या कपड्यात निर्वासतांसारखे भारतात आले. असा हा हिंदुस्थानच्या फाळणीचा संक्षिप्त इतिहास. श्री शशी थरूरनी बॅरिस्टर जीनांचा विजय झाला असल्याचा तर्क कुठल्या आधारावर केला? युनोमध्यें भारताचे प्रतिनिधीत्व केल्यामूळे देशातील सर्वात विद्वान समजतात काय स्वतःहाला?  प्रथम स्वतःच्या चारीत्र्याचे धिंडवडे उडाले आहेत तिथे लक्ष द्यावे. देशाच्या इतिहासातील घटनांचा सोयिस्कर अर्थ काढून काॅग्रेसला जनमत आपल्या बाजूने वळविण्यात सत्तर वर्षे यश मिळत राहीले असेल, पण आता तशी आशा करून नये आणि असे नसते उद्योग ही करू नयेत. लागोपाठ दोन वेळा लोकसभेत दारूण पराभव झाला तरी ह्या दिडशहाण्यांची खोड मोडली नाही की काय ?  

देशाची फाळणी होऊन आज ७३ वर्षे झाली. मुस्लीम समाजाला स्वतंत्र देश मिळाल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय पक्षांचा, राज्यकर्त्यांचा, लष्करांचा  हिंदूद्वेष अजूनही संपला नाही. उलट वाढत गेला आहे. त्यांच्या हिंदूद्वेषाला खतपाणी आपल्या येथील ही दिडशहाणे मंडळीच देत आली आहेत. पाक पुरस्कृत दशहतवाद्यांचा आपल्या सेनादलाने खात्मा केला की ही मंडळी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतात. जणू काय दशहतवादी ह्यांची जावई मंडळी. मोदी सरकार घेत असलेल्या  प्रत्येक राष्ट्रहिताच्या निर्णयाला फक्त विरोध करणे हाच  झाडून सर्व विरोधी पक्षांचा एक कलमी कार्यक्रम ठरला आहे. तिथे पाकिस्तानमध्ये १९४७ नंतर आजतागायत लोकशाही पेक्षा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लष्करशाहीच्या तंत्राने राज्यकारभार चालत आला आहे. राजकीय स्थिती सतत अस्थिर राहीली आहे. आर्थिक दृष्ट्या पाकिस्तान कंगाल झाला आहे. त्या अर्थी फाळणीतून बॅरिस्टर जीनांने काय कमाविले ? हाच का तो बॅरिस्टर जीनांचा विजय?. भारतात सीएए च्या अंमलबजावणीला होणारा विरोध म्हणजे भारताची पुन्हा फाळणी होईल असे  विधान करून मुस्लिम बांधवांना अधिक आक्रमक व फितूर होण्याची संधी शशी थरूर देत आहेत. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली हे सत्य नजरेआड करणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे. या ढोंगातून मुस्लीम समाजाचे धार्मिक स्वरूपाच्या मागण्या पुरविण्याचे अनेक वर्ष सुरू असलेले धंदे राजधर्माच्या सिध्दांताच्या विपरीत आहे.  ते आपण बंद करायला हवेत. वस्तूतः बँरिस्टर जीनांच्या मुस्लीम लिगापुढे हतबल होऊन फाळणीला मंजूरी देण्यात तत्कालीन काॅग्रेसच्या नेत्यांनी फार मोठी घोडचूक केली आहे.  हे शशी थरून यांनी प्रथम लक्षात घ्यावे, मगच सीएए संबंधी वक्तव्यें करावीत. देशाच्या फाळणीतून बॅरिस्टर जीनांच्या विजयापेक्षा आपल्या येथील तत्कालीन काॅग्रेस पक्षांच्या नेत्यांचा विशेषतः महात्मा गांधीजी आणि पंडीत नेहरूच्या तकलादू धोरणांमूळे हिंदूस्थानचा पराभव झाला असे म्हणणे अधिक तर्कसंगत वाटते. 

आता केंद्रात हिंदुत्ववाद्यांचे भक्कम सरकार आहे. देशाच्या कुठल्याही प्रान्तातून बॅरिस्टर जीना सारखा हटवादी राजकीय नेत्याचा उदय होऊच नये असा कायमचा बंदोबस्त करणारे सरकार केंद्रात आहे. याचा विसर शशी थरूर यांना पडला असेल तर शशी थरूरांना काॅग्रेसने समजावून द्यावे. पण हा सल्ला स्विकारायला काॅग्रेस पक्ष तरी कूठे जागेवर आहे ? काॅग्रेसने आपल्या पक्षाचा कारभार तसेच सीएए विरोधातील अंदोलनाचे नेतृत्व डाव्या विचारसरणीचे पक्ष, त्यांचे नेते, विचारवंत - साहित्यिक व रक्तरंजीत क्रान्ती घडविणार्या नक्षलवाद्यांच्या हातात सोपविले आहे. ज्यांच्या पुढाकाराने सीएए विरोधात हिंसक आंदोलने केली जात आहेत त्यासाठी केरळच्या पीपल पापूल्यर फ्रन्टचा पैसा उपयोगात आणला जातो आहे हे उत्तर प्रदेशमधील बँक खात्याद्वारें उघड झाल्याची बातमी झळकली आहे. याची चौकशी रितसर होईल. त्यातून या पैशाचा स्त्रोत ही कळेल. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमीत शहा यांच्या रणनीतीचा अंदाज विरोधी पक्षांना येत नसावा. म्हणून मुस्लीम धर्जीणे विधाने करणे, मुस्लीम समाजाला फितूर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहेत. यासंबंधी मोदी सरकार नरमाईचे धोरण स्विकारत आहे असे दिसत असले तरी कबड्डी खेळात, चढाई करणार्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला दमवावे व मग त्याची चारही बाजूनी पकड करावयाची अशी एक चाल असते, तशीच चाल मोदी-शहांनी रचून ठेवली असावी. म्हणजे आंदोलकांकडे दुर्लक्ष करीत राहवयाचे. आम जनतेला आंदोलनामूळे होणार्या त्रासामूळे आंदोलन करण्यार्याविषयी राग उत्पन्न होत जावा, आंदोलकांची शक्ती क्षीण होऊ द्यावयाची , मग  'हा आमच्या देशातला अंतर्गत मामला आहे ' असे म्हणत डावे पक्ष, डावे विचारवंत व साहित्यिक,  काॅग्रेस व मित्र पक्ष, पाक पुरूस्कृत दशहतवादी, नक्षलवादी , ख्रिस्ती मिशनरी, पक्षपाती मानवधिकारी आयोगाचे कार्यकर्ते  इत्यादींनाच नाही तर ह्या सर्व मंडळीच्या विदेशातील मालकांना प्रथम ठणकावले जाईल, मग योग्य वेळी आंदोलन करणार्या पक्षांच्या नेत्यांचे,  कार्यकर्त्यांचे कबंरडे मोडावयास सरकार सुरूवात करेल असे वाटते.  पंतप्रधान मोदी  व अमित शहा या जोडीचा राजकीय चाली खेळण्याचा आलेला अनुभव पाहता योग्य वेळ कुठली असेल ती योग्य वेळीच कळेल. 

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

आपल्या उत्सवांची उत्पत्ती (भाग १)


बुधवार १५ जानेवारी २०२० देशात सर्वत्र मकर संक्रातीचा उत्सव साजरा झाला. आपल्या संस्कृतीतील तो एक महत्वाचा सण. हा सण जवळ येऊ लागला असताना मनात काहीतरी लिहावे अशी ऊर्मी आली होती. काय करावे ? ब्लाॅगवर गेल्या वर्षी मकर संक्रान्तवर लेख पब्लीश केला असल्यामूळे मी त्यावर लिहणे टाळले. मकर संक्रान्त नंतर होळी. होळी नंतर  गुडी पाडवा म्हणजे नववर्षप्रतिपदा हा सण जवळ येत आहे हे ही लक्षात आले.  मग वर्षभरातील आपले सर्व उत्सव डोळ्यासमोर येऊ लागले आणि प्रश्नांची एक शृंखला उभी राहीली. सणवार--उत्सव केव्हा सुरू झाले, त्यांचे रचनाकार कोण आहेत,  सणवार साजरे करण्यामागे काही तत्वें आहेत का?  इत्यादी प्रश्नानंतर माझे मन थेट सृष्टीच्या उत्पत्तीपाशी येऊन थबकले. तसे होणे ही स्वाभाविकच म्हटले पाहीजे. कारण असे की उत्सव-सणवार फक्त मानव साजरा करतो आणि मानव जात सृष्टीच्या उत्पत्तीनंतरच निर्माण झाली हे त्रिकालातीत सत्य आहे. मानवाची हळूहळू उत्कान्ती होत गेली.  सुरक्षा कारणास्तव मानव समूहाने राहू लागला व नंतर समाज निर्माण झाला. समाजातील लोकांच्या परस्पर देवाण-घेवाणातून आणि व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानूसार जगभरात भिन्न पण  स्थिर संस्कृती आकारास आल्या, असे इतिहास सांगतो. आपल्या सणवार-उत्सवासंबंधीत प्रश्नांची उत्तरे शोधावयाची असतील तर या विश्वाच्या उत्पत्तीवर ढोबळ मानाने चर्चा करणे गरजेचे वाटते. (या संबंधीची सविस्तर माहितीसाठी कृपया ब्लाॅगवरील ईशावास्यम इदं सर्वम् हा लेख वाचावा) म्हणून प्रथम त्यावर चर्चा करू या मग आपल्या उत्सवासंबंधीच्या पंरपंरेकडे वळू या.

विज्ञान म्हणते, बिंग बँग (मोठा स्पोट) झाला व त्यातून हे विश्व निर्माण झाले. या बाबत दूमत असण्याचे कारण नाही. पण तसा स्पोट का झाला, याबाबत आपण आज ही अनभिज्ञ आहोत. विज्ञान म्हणते हे विश्व अपघाताने निर्माण झाले तर आपले अध्यात्म सांगते, की विश्वाचा जन्म होण्याअगोदर काही तरी अस्तित्वात होते, म्हणून म्हणून सृष्टीची निर्मिती ही ईश्वराची लीला आहे. विज्ञान म्हणते तेजातून विश्व निर्माण झाले, आपले अध्यात्म म्हणते देव हा सृष्टीचा निर्माता आहे. देव हा शद्ब संस्कृत भाषेतला व त्याचा अर्थ ' तेज 'असा होतो. आजचे विज्ञान म्हणते When nothing was in existence in the universe, time was there in the Universe आपल्या समाजास विज्ञानानी मांडलेले हे सत्य हजारो वर्षापुर्वी पासून ज्ञात होते असे मानले जाते. ऋग्वेदात म्हटले आहे, " त्यावेळी ना सत्य होते ना असत्य,  ना दिवस होता ना रात्र, ना पृथ्वी होती ना अंतरिक्ष, ना मृत्यू होता ना जीवन. सर्वत्र अंधकार , अंधकारच होता. त्याचेच नाव काळ वा महाकाळ असे म्हटले जाते. त्याचेच नाव शीव. त्या शीवतत्वास वाटले की आपण एकटे आहोत आता आपण अनंत होऊ या आणि पुढे त्यातून ते एक तेजोमय असे चैतन्य निर्माण झाले. त्याच तेजोमय चैतन्याचा एक अंश म्हणजे आपल्याला प्रकाश देणारा तो सूर्य. सूर्याला तेजोमय चैतन्याचा अंश असे म्हटले याचे कारण या ब्रह्मांडात अनेक सुर्यमाला आहेत असे विज्ञान म्हणते तसेच भगवान श्रीकृष्णानेही कुरूक्षेत्रावर आपल्या अनंत विभूती आहेत व त्याचे वर्णन करणे प्रशस्त नाही असे सांगत फक्त प्रमूख विभूती अर्जूनाला कथन केल्या आहेत. त्यातलाच तो (ज्योतिषाम् रवीःअंशुमान् |) सूर्य. आपण त्याला सूर्यनारायण मानतो व पूजा करतो. कारण पृथ्वीवर जी काही जीवसृष्टी निर्माण झाली ती सूर्यप्रकाशामूळे. पुढे क्रमाक्रमाने सृष्टी उत्क्रान्त होत गेली. 

सृष्टीचा जन्म म्हणे करोडो अब्ज वर्षापूर्वीचा आहे. सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा आहेत. एक धन उर्जा व दुसरी ऋण उर्जा. ऋण उर्जेमूळे  पाणी, खतें,  प्रकाशाची गरज न लागता आपोआप काटेरी झुडपें वाढत असलेली आपण पाहातो. पण फळे, भाजीपाला, धान्य इत्यादीची निर्मितीसाठी उर्जा, पाणी, खतें इत्यादीची गरज लागते. जी सृजन होते ती सृष्टी. आपल्याला उपयोगी न पडणार्या काटेरी झुडपांना जमीनीतून उखडून फेकावी लागतात. कारण ती मानवाला आवश्यक असणार्या अन्न निर्मितीत मोठा अडसर निर्माण करतात. विधात्याची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे मानव. त्याला ईश्वराने शक्ती, मन व बुद्धी इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच सृष्टीला सृजन करण्याचे कार्य मनुष्य प्राण्यावर आले असावे. संस्कृती म्हणजे मानवाची होत गेलेली उत्कान्ती. ह्या सृष्टीत सर्वात पहिली प्रगत संस्कृती आपल्या येथे वेदकालात होती असे अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विचारवंतानीही मान्य केले आहे. म्हणजेच सृष्टीला सृजन बनविण्याचा शुभारंभ आपल्या ऋषीमूनींनी केला असे म्हणणे ना चूकीचे ठरते ना आत्मप्रौढीचे.

वैदिक काळाचा इतिहास सांगतो की कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमद्गनी, वशिष्ठ, अगस्ती इत्यादी ऋषीमूनींनी प्रातःकाळीचे ईशवंदन पासून प्रातःविधी, दंतमंजन, स्नान इत्यादी शरीरधर्माची कर्में, अन्न, वस्त्र, निवारादि मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणारी श्रमसाधना व उपभोग करणे, शेती, वाणीज्य,इत्यादी व्यवसाय व कुटीरोद्योगाचे ज्ञानार्जन व त्यासाठी लागणारी अवजारांची निर्मिती, सूरक्षासाठी विविध शस्त्रं निर्मिती, युद्धनीती, पाककला, योगशास्त्र, नृत्य, संगीत, इत्यादी कला आपआपल्या आश्रमातून शिकविले व समाजाला सुसंस्कृत केले. भारताच्या पश्चीम व पश्चमोत्तर कश्यप ऋषीनीं, अत्री व जमदग्नी ऋषीनीं मध्य भारत, आर्यावर्तमध्यें भृगू, उत्तरपुर्वेस विश्वामित्र, वसिष्ठ,तर दक्षिणेस अगस्तींनी समाजाला सुसंस्कृत बनविण्याचे कार्य केले असे वैदिक संस्कृतीच्या इतिहासातून वाचल्याचे आठवते.

मानवी जीवन सुसंस्कृत व्हावे यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रचंड तपस्या, चिंतन केले. त्यातून  उपनिषदे, स्मृती, श्रुती, ब्राह्मण्यके, आरण्यके, पुराणे, निर्माण झाली. सृष्टीला सृजन बनवायचे असेल तर ते कार्य सृष्टीच्या सौंदर्याला धक्का न लावता करणे गरजेचे असते याबाबत ऋषीमुनींच्या दुरदृष्टीत साम्य आढळते. पुढे सृष्टीत ठराविक वेळेला होणार्या बदलांना ऋतुमान म्हणण्यात आले. मग कालगणना अस्तित्वात आली त्यातून तिथी व पक्ष निर्माण केले गेले. प्रकाश म्हणजे रोशनी, म्हणजेच उत्साह(जीवन) व अंधकार म्हणजे नैराश्य (मृत्यू) या संकल्पनातून दिवसातील प्रकाशमय( Brighter) वेळेसाठी शुद्ध पक्ष व अंधकारमय (Darker) वेळेसाठी कृष्ण पक्ष असे संबोधण्यात येऊ लागले. ऋतुमानावरील चिंतन करतेवेळी आपल्या ऋषीमुनींनी शरीरधर्म कसा सांभाळावा यावर चिंतन केले असावे. त्यातूनच ' शरीरमाद्यम् खलू धर्मसाधनम् ' या वचनाचा उद्घघोष झाला. धर्म, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी कार्यें शरीराद्वारे पार पाडायची असतील तर शरीर निरोगी राहणे आवश्यक असते. त्यातून ऋतुमानानूसार आहार-विहारा संबंधी नियम करण्यात आले असावे. आजचे विज्ञान ही स्थलकालनुसार आहार घ्यावा असे सांगते.  ऋतुकालानुसार आहार-विहाराचे नियम पाळले तर शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढतेच पण सोबत ज्या ऋतुत जे जमिनीत पिकते ते खाल्ले तर निसर्गाच्या नियमाशी सुसंगत असते. त्यातून पर्यावरणाची हानी होऊ द्यावयाची नाही हे ध्येय ही साध्य करता येते.

आपल्या संस्कृतीत व्यक्ती व कुटूंब, कुटूंब व समाज, समाज व राष्ट्र, राष्ट्र व जग इत्यादीसंबंधीचा विचार जो केला आहे, तो फार व्यापक आहे. उपनिषदातील प्रार्थना तसेच सुभाषितांचा अभ्यास केला की आपल्या ऋषीमुनींच्या बुद्धीची व समाजहिताची त्यांची तळमळ पाहता आपण आवाक होऊन जातो. समाज व्यवस्था कशी असावी यावर चिंतन करीत असता चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्मविभागशः या शाश्वत सत्याची प्रचीती ऋषीमूनींना झाली असावी. प्रत्येक व्यक्ती जन्माला येते ती स्वतःचा वर्ण घेऊन. वर्ण व्यवस्थेचा अर्थ म्हणजे,  प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे, व आपल्या रूचीनुसार, कूवतीनुसार,  प्रकृतीनुसार म्हणजेच बालवयात झालेल्या संस्कारातून आपले कर्माचरण म्हणजे व्यवसायाची आवड निर्माण हेत गेली. हे मान्य करणें होय. (वर्ण व्यवस्थेसंबंधी अधिक माहिती साठी कृपया चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः'हा ब्लाॅगवरील लेख वाचावा) वर्ण व्यवस्थेला जाती व्यवस्था मानणे, भेदाभेद व उच-नीचता मानणे म्हणजे सृष्टीत जी विविधता आहे , तिच्या स्वरूपालाच किंवा अस्तित्वालाच धोका निर्माण करणे होय. हाच विचार आपले शास्त्रकार, संत-महात्मे, महात्मा गांधीजी,  लोकमान्य टिळक,आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडीत दिनदयाळ उपाध्याय, साने गुरूजी, इत्यादी थोर पुरूष, पांडूरंगशास्त्रीजी, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, प्रा राम शेवाळकर, प्र ग सहस्त्रबुद्धे सारखे प्रवचनकार, भारतीय अध्यात्माचे मेरूमणी स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, व स्वामी दयानंद सरस्वती तसेच अनेक समाज सुधारक, कवी, साहित्यिक, व धर्मगुरूनीं मांडल्याचे त्यांच्या जीवन चरीत्रातून व त्यांच्या साहित्यातून दिसते. 

प्रत्येकामध्ये असलेल्या गुणाचा उपयोग समाजहितासाठी करता येईल, अशी समाजव्यवस्था ऋषीमूनींनी उभी केली.  या संदर्भातील वचन सुपरिचीत आहे, ते पुढील प्रमाणे आहे --
अमन्त्रम् अक्षरं नास्ति नास्ति मूलम् अनौषधम् |
अयोग्यः पुरूषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ||
एक ही मंत्र असा नाही की त्यात अक्षर नाही, एक ही वनस्पती अशी नाही की जिच्यात औषधी गुण नाही. तसेच एक ही व्यक्ती अशी नाही की जी सर्वथा अयोग्य ठरते. वानवा असते ती फक्त योग्य ती योजना करून तिचा उपयोग करून घेणार्यांची. सर्वानी एकाच प्रकाराच्या कामाची वा व्यवसायाची अभिलाषा धरली तर मात्र संघर्ष व अनावास्था ओढवते. आजकाल आपण ते अनुभवत आहोत पण त्यावर इथे चर्चा नको करू या.

अयोग्यः पुरूषो नास्ती ह्याचा अर्थ समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे कसली तरी क्षमता असतेच. एकदा का या सिद्धांतावर श्रद्धा ठेवली की प्रत्येक व्यक्तीचा समाजासाठी उपयोग करून घेता येतो असे आपल्या ऋषीमुनींचे म्हणणे असे. आपल्या ऋषीमुनींना आप्त असे संबोधले जाते. आप्त म्हणजे आपपरभाव नसणे. ऋषीमुनींमध्ये कोणाविषयी फाजील प्रेम नसे व द्वेष ही नसे. सर्वांच्या बद्दल समान रूपाने कल्याणकारी भावना त्यांच्या हृदयात पाझरत असे. स्पटिकमणी प्रमाणे मातीचे ढेकूळ प्रतिबिंब ग्रहण करू शकत नसले तरी ते सर्वथा निरोपयोगी नसते. फूलाफळांच्या कलमासाठी तसेच घराची भिंत बांधण्यासाठी उपयोग होतो ह्याची प्रात्याक्षिके सर्व ऋषींनी आपआपल्या गुरूकूलात करून दाखविली व समाजाला सज्ञान केले. म्हणूनच साने गुरूजी, प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे सारखी विद्वान मंडळीनी त्यांचा ' प्रयोग करणारे ऋषी ' असा गौरव केला आहे. तसेच आधूनिक वैज्ञानिकांचा ही त्यांनी आधूनिक ऋषी म्हणून गौरव केला आहे हे आपल्याला विसरता येत नाही. शेवटी ज्ञानाची कास म्हणजे ईश्वराचे ध्यानच की !असो. या विषयाच्या पुढील चर्चा साठी या लेखाचा भाग-२ सोबत खाली जोडला आहे.
-------------------------------------------‐--------------

      आपल्या  उत्सावांची निर्मिती (भाग -२)

भाग १ मध्ये सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते मानवी   समाजाची व्यवस्था म्हणजेच जडण- घडण करण्यासाठी ऋषीमुनींनी क्रान्तीच्या ऐवजी उत्कान्ती चा मार्ग कसा स्विकारला यावर चर्चा केली. पुढे मानवी  समाज  कुठल्या माध्यमातून एकत्र येऊ शकतो यावर ऋषीमूनींनी खल केला असावा. सर्वसाधारणतः दैनंदिन प्रपंचाच्या रडगाण्यातून समाजात मरगळ येत असते. समाजात  नवा जोश वेळोवेळी निर्माण व्हावा, समाजबांधवांच्या परस्पर भेटीगाठी व्हाव्यात व एकोपा निर्माण व्हावा त्यातून उत्सव व सणवाराची रचना ऋषीमूनींनी केलेली दिसते. 

पण हे उत्सव साजरे करताना सृष्टीच्या सौंदर्याची हानी होता कामा नये अशी दक्षता पाळावी म्हणून ऋतुनुसार उत्सवाची रचना करण्यात आलेली दिसते. पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवतीच्या भ्रमणातून होणारे बदल म्हणजेच ऋतू होत. प्रत्येक ऋतुचे एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यात दोष नसतात. जे दोष आपल्याला जाणवतात त्याचा दोष सर्वस्व सृष्टीचे पुत्र म्हणून आपल्याकडेच अधिक असतो. आपला व्यवहार सृष्टीच्या नियमानुसार होत नसतो. आपल्या येथील प्रत्येक सणवाराची रचनाच मूळी सृष्टीच्या नियमानुसार आहे. त्याच्या पाठीमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून वैज्ञानिक  सिद्धान्त, समाजशास्त्रीय व शरीरशास्त्रीय तत्वांचा उपोयोग केलेला दिसतो. मकर संक्रान्तीच्या उत्सवाचे उदाहरण वानगी दाखल घेतले तर आपल्याला हे पटू शकते. 

हजारो वर्षापासून संक्रान्त म्हणजे सुर्याचे उत्तरायण म्हणजे  सुर्यप्रकाश पृथ्वीवर अधिक वेळेसाठी असतो, म्हणजे दिवस मोठे, म्हणजे उत्साह अधिक  हे आपण जाणत आलो आहोत. तो एक सण म्हणून आपण साजरा करीत आहोत आणि आधूनिक विज्ञानाने त्याला खगोलशास्त्रीय घटना म्हणून मान्यता दिली आहे ; हे आपल्या वैदिक ऋषीमूनींचा एक प्रकारे मोठा सन्मानच आहे. म्हणूनच आपण उत्सव साजरे करतो ते केवळ कर्मकांड न राहता आपले ऋषीमुनी व सृष्टीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ती एक कर्तव्य भावना ठरली व तिचे पालन आजतागायत सुरू आहे. 

जसा जागतिक योग दिन समजला जाऊ लागला, तसाच मकर संक्रान्तीला ही जागतिक संक्रान्त दिवस समजला जावा अशी मागणी आपण केली तर ती सांप्रादायिक ठरेल असे वाटत नाही. गेल्या वर्षीच्या मकर संक्रान्त उत्सवावर वर एक लेख लिहीला आहे. त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पण जाता जाता मकर संक्रान्ती उत्सवाच्या पाठीमागील समाजशास्त्रीय तत्वाची जाणीव करून देणारी एक कथा आठवली आहे, ती देऊन या लेखाची समाप्ती करतो. असे असले तरी आपल्या संस्कृतीतील प्रत्येक उत्सावांच्या पाठीमागील तत्वांचा (Laws of Nature ) अभ्यास करण्याचे कार्य संपले असे नाही. तसेच जगभरातील विविध संस्कृतीतल्या उत्सवांधील साम्य तसेच काळानुसार होत जाणारे बदल यावर अधून मधून माझ्या कुवतीनुसार चर्चा म्हणजेच लेख लिहीण्याचा प्रयत्न मी करणार आहे.

मकर संक्रान्तीला पतंग उडविण्याच्या खेळाची कथा अशी आहे ---  
एक पिता-पुत्र जोडी पतंग उडविण्याची मजा लुटत असते.  हवा चांगली वाहात असल्यामूळे पंतग चांगल्या उंचीवर पोहचले होते. मुलाला पंतग आणखिन उंचीवर जावयास हवे असते. म्हणून तो पिताश्रीला म्हणतोय, बाबा, पतंग अजून वर जाऊ द्या की '. बाबाने उत्तर दिले,  'बाळा आपल्याकडील धागा संपला आहे. आता पतंग आणखिन वर कसे जाणार?  मुलाने विचारले, ' बाबा पतंग धाग्यामुळेच वरती जाते ना !' बाबा म्हणाले, ' होय.' त्यावर मुलगा म्हणाला, बाबा, आता धागा तोडला तर पतंग आणखिन वर जाईल की नाही ! बाबा म्हणाले, हो.' मग मुलाने हट्ट धरला, बाबा धागा तोडा व जाऊ द्या पतंग आणखिन वर.' त्याच्या बाबाने धागा तोडला. पतंग वार्याच्या वेगाने आणखिन वर वर जाऊ लागले, मुलाने आनंदाने टाळ्या वाजविल्या. पण थोड्याच वेळात ते पतंग वार्याच्या गतीने धाडकन खाली आले, फाटले व एका झाडावर लटकले. मुलगा हिरमूसला. उद्या आपण नवीन पतंग आणू की असे म्हणत बाबाने त्याचे सांत्वन केले. 

घरी परतत असताना बाबाने आपल्या मुलाला सांगितले, " बाळा, वरवर जाणे गमतीचे व आनंदाचे असते. उंचावर पोहचणे म्हणजे आपली उन्नती, भरभराट. भरपूर पैसा, बंगला, गाडी असे ऐश्वर्य. पण आपल्याला त्या ऐश्वर्याचा गर्व झाला की आपण आपल्याच माणसाला तुच्छ लेखतो, आपण नाती-गोती विसरतो, समाज, स्वदेश, स्वभाषा, संस्कृती तुच्छ लेखतो. आपण बंध सोडतो व आपण आपल्याच हवेत वाहातो आणि शेवटी त्या पतंगसारखे खासकन खाली पडतो, फाटतो व लटकून राहातो. पंतगाला जसा दोराचा बंध असतो तसाच आपल्या जीवनात आपल्या आई-वडीलांचा, आप्त-मित्र मंडळीचा, समाजाचा, देशाचा बंध असतो. तो तोडावयाचा नसतो. बरोबर आहे ना ! मुलाला आपल्या वडीलांचे म्हणणे पटते व उत्तर देतो 'बाबा यु आर ग्रेट !' 

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

मुहमें गांधीजीका नाम और कृती करें माओंके नाम


आपल्या देशात सध्या दोन प्रश्नावर निरर्थक धुमाकूळ घातला जात आहे. ते दोन प्रश्न म्हणजे जेएनयू विद्यापिठातील तथाकथीत फी वाढ व सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारीत कायदा. जे काही जेएनयूत घडत आहे व सीएएच्या विरोधात जी काही अंदोलने होत आहेत, त्याचा जनसामान्यांच्या हिताशी काडीचाही संबंध नाही. बरं हे मी म्हणत नाही तर विरोधी पक्षच अप्रत्यक्ष रित्या असे म्हणत आहेत. आपण म्हणाल ते कसे काय ? सर्व विरोधी पक्ष म्हणतात की देश आर्थिक आघाडीवर पिछाडीवर गेल्यामूळे मोदी सरकार जनतेचं लक्ष दूसरीकडे वळविण्यासाठी ३७० कलम, सीएए, सारखे नसते उद्योग करीत आहेत.  विरोधी पक्षांचे नेते सतत जे बोलत असतात, त्याचीच री मिडीयातील काही संपादक व साहित्यिक मंडळी ओढत असतात. ३७० कलम, तीन तलाक, सीएए हे त्यांना नसते उद्योग वाटत आहेत तर ह्या सर्वांनी त्या कायद्याविरोधात आंदोलने तरी का करावीत आणि ती ही हिंसक?,  विरोधी पक्षांना माझं सांगण आहे की, ' तुम्ही दुर्लक्ष करा की या विषयांवर ! आणि आर्थिक मुद्यावरून करा निदर्शने, करा सत्याग्रह, बसा उपोषण करीत ; विरोधी पक्षांची तळी उचलणार्या संपादक मंडळीं, साहित्यिकांनी त्यांच्या सोबत उपोषणाला बसावे.  मुहँमे महात्मा गांधीजीका (अंहिसा) नाम, और कृती करे माओके (हिंसा) नाम अशी वृत्ती का ठेवता?"  मोदी सरकार विरूद्ध जनमत खवळले आहे असे चित्र मिडीयातून दिसत आहे, त्यात तथ्यांश किती आहे हे भारत बंदचा बार फूसका ठरला त्यावरून कळले आहेच. वरील दोन्ही प्रश्नावर धुमाकूळ घालण्याचा पुढाकार काॅग्रेसची बांडगूळे म्हणून ओळखली जाणारे डावे पक्ष व डाव्या विचारसरणीच्या विचारवंतानी घेतलेला आहे असे दिसते. डाव्या विचारसरणीच्या लोकांना असा धुमाकूळ घालण्यासाठी पुढाकार का घ्यावा लागतो आहे, व त्यांच्या अशा कृत्यांना काॅग्रेस, मित्र पक्ष आणि तृणमूल काॅग्रेस पक्षा व्यतिरिक्त इतर प्रादेशिक पक्ष पाठींबा देताना का दिसत नाहीत यावर आपण चर्चा करू या.

गेल्या वर्षभरात मोदी सरकार २ ने देशविरोधी शक्तींचा पुर्णपणे नायनाट करण्यासाठी पाऊले उचलेली दिसत आहेत. मग ते कलम ३७० असो वा सीएए असो. सरकारचे म्हणणे असे आहे की, सरकारने अलीकडे घेतलेल्या निर्णयांचा वा धोरणांचा भारतीय नागरिकांना काहीही त्रास होणार नाही. तरीही डावे व काॅग्रेस पक्ष लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. जेएनयु मधील वाढविलेल्या फी वरून विद्यार्थ्यांनी सुरू केलेला धुमाकूळ व घडत असणारी, फोडतोड, मारामार्या इत्यादी गोष्टीतून तेथील डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनेचे नैराश्य प्रतित होते. हे फक्त नाटक आहे. मूळ कारण वेगळे आहे. जेएनयुमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने तिथल्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेसमोर आव्हान उभे केले आहे, त्यामूळे डाव्या पक्षांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यातून हे आंदोलन सुरू झालेले दिसते.  त्यातच मोदी सरकारने सीएए कायदा आणल्यामूळे, त्या बाबतीत अल्पसंख्यांका मध्ये गैरसमज निर्माण करण्याची संधी मिळाली आहे ती का सोडावी असा विचार करून हिंसक आंदोलने करण्याचा पद्धतशीर कट, डाव्या पक्षांना पुढे करून इतर विरोधी पक्षांनी मोदी सरकार विरूद्ध आखलेला दिसतो. तो राजकीय रणनीतीचा भाग आहे हे स्पष्टपणे दिसते.

प्रथम आपण जेएनयू मध्ये सुरू असलेल्या धुमाकूळा संबंधी चर्चा करू या. जेएनयू हे विद्यापीठ नसून डाव्या पक्षांचा अड्डा बनलेला दिसतोय. आहे. वस्तूतः जेएनयु  जन्मापासूनच (निर्मितीपासूनच) ढोंगी लोकांच्या ताब्यात राहात आलेलं आहे. पण तसे पुर्वी दिसले नव्हते व जाणवले नव्हते. याचे कारण स्वातंत्र्यानंतर देशात काॅग्रेसची अनिर्बध सत्ता होती. म्हणून जेएनयु मधील ढोंगी लोकांना शांतपणे ऐशारामी करता येत होती. विरोध करणार कोण?  तेथील विद्यार्थी संघटना ही डाव्यांच्या कामगार युनियनच्या हातात होती व आजही त्यांचे प्राबल्य आहेच. काॅग्रेसची सत्ता त्यांच्यासाठी एक पर्वणी होती. जेएनयूमध्ये डाव्या विचारसरणीच्या व्यतिरीक्त असलेले विद्यार्थी विशेषतः हिंदूत्व विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी डाव्यांची विद्यार्थ्यी संघटना आपल्या संख्याबळावर विद्यार्थी संघटनेच्या स्तरावरच निकाली काढत होते. आजची स्थिती भिन्न आहे. कारण केंद्रात आज  काॅग्रेसची सत्ता नाही. डाव्यांचा कडवा शत्रू भाजपा सत्तेवर आहे. तो ही मजबूत संख्याबळ असलेला.  देशभरातील सारा विद्यार्थी वर्ग मोदी सरकारच्या विरोधात आहे असे मिडीयाद्वारें भासविण्यासाठी डावे पक्ष आपल्या लाल क्रान्तीच्या स्टाईलने जेएनयु धुमसते ठेवीत आहे. बुरखा घालून दंगल करणारे डाव्या विचारसरणीचे गुंड लोक होते, असा प्राथमिक अंदाज दिल्ली पोलीसांनी काढल्याचे काल परवा समजले आहे. याचा अर्थ हिंसक आंदोलनांच्या पाठीमागे विदेशी शक्तीचा हात आहे हे निश्चीत. 

स्वातंत्र्यानंतर काॅग्रेसला अडचणीच्या काळात डाव्या विचारसरणीच्या पक्षांचा उपयोग होत असे. कारण अमेरिका व रशिया मधील शीतयुद्धाच्या काळात रशियाशी मैत्री ठेवणे आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने  आवश्यक होते. पण त्याची किंमत वसूल करण्यासाठी कम्युनिस्ट देशांनी विशेषतः रशिया व चीनने भारतातील आपल्या विचारसरणीच्या मंडळींना जेएनयु सारखे विद्यपीठे, सरकारी यंत्रणेतील सचीव पदें, कामगारांच्या जगतात डाव्यांचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी केंद्र  सरकारमधील कामगार खातें, हिंदुत्व विचारसरणीचा गोबेल्स तंत्राच्या आधारे नामोनिशाण मिटविण्यासाठी  शिक्षण खाते व शैक्षणिक अभ्यासक्रम निश्चीत करणारी मंडळे, माहिती व नभोवाणी खाते, इतर स्वायत्त संस्थांचा कारभार डाव्या विचारसरणीचे नोकरशहा, विचारवंत व  खासदार--आमदांराच्या हातात ठेवून वसूल केली.  काॅग्रेसमध्ये अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता व आजही आहे. पंडीत नेहरूच्या काळात चीन विरूध्द झालेल्या युद्धात पराभव झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती डाॅ सर्वपल्ला राधाकृष्ण यांनी ज्या मंत्र्याचा राजीनामा मागून घेतला असे  संरक्षण मंत्री कृष्ण मेनन,  इंदिरा गांधीच्या काळातील देवकांत बारूआ, माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी,  राजीव गांधीच्या काळात गुजराल, सोनियाच्या काळातील माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, मणीशंकर अय्यर अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुद्दा हा आहे की अनेक वर्षे सरकारी यंत्रणा डाव्या विचारवंताच्या हातात असून ही त्यांच्या पक्षांची वाढ का झाली नाही ? या प्रश्नाच्या उत्तरातच देशात अस्थिरता माजविण्याचा जो सिलसिला सुरू झाला आहे त्याचे कारण सापडते.

आपल्या येथील डाव्या विचारसरणीच्या पक्षांची झेप फक्त मजूर व कामगार यांच्या समस्यांच्या पलिकडे जात नाही. बरं त्यांनी खरोखरीच मजूर व कामगारांच्या समस्या सोडविल्या आहेत का ? तसे ही नाही. लाल बावट्यावरच त्यांचे प्रेम अधिक. काळ बदलला पण ही मंडळी बदलली नाहीच. आर्थिक उदारीकरण बहूतांश देशांनी स्विकारला आहे, अगदी साम्यवादी चीन व रशियाने सुद्धा ' सारं काही राष्ट्राचे ' हा जयघोष थांबविला आहे. जगातल्या कुठल्याच देशाला जागतिकरणाच्या रेट्यातून परतीच्या मार्गावर येणं शक्य नाही. हे सत्य भारतातील डावे पक्ष स्विकारीत नाहीत.  आपल्या येथे साम्यवादी विचारसरणी मूळ धरू शकली नाही याची दोन कारणें आहेत. एक आर्थिक सुधारणा संबंधी यांचे आडमूठे धोरण व हिंदुत्वासंबंधी यांचा पराकोटीचा द्वेष. तसे पाहता डावे पक्ष केडर बेस आहेत. तिथे  घराणेशाही नाही. या जमेच्या बाजू होत्या व आहेत.  तरीही डाव्यांना  तळागाळातल्या लोकांचाही पाठींबा गमवावा लागला. कारण देशात नक्षलवाद्यांचा सुरू असलेला घातक उपद्रव. गरीब , पिडीत आदिवासी लोकांना फसवून नक्षलवादी चळवळीत घुसवायचे व त्यांनी आपले काम डाव्या नेत्यांच्या रक्तमय क्रान्तीच्या कसोटी नुसार केले नाही तर त्यांना भूकेपोटी ठेवून छळ करावयाचा. या पद्धतीवर तथाकथित मानवाधिकारांचे कार्यकर्ते, पुरोगामी साहित्यिक, इत्यादी सतत दुर्लक्ष करीत राहीले. त्यामूळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जीवनमुल्याधिष्ठीत सुरू केलेली सामाजिक समरसता देशातल्या अनेक दुर्गम भागात राहणार्या भटक्या विभूक्त जाती-जमाती तसेच आदिवासीयांना भावली.  ईशान्य भारतात भाजपाला वाढलेल्या समर्थनाच्या पाठीमागे निस्वार्थी व संन्यस्त वृतीने समाजसेवा करणार्या संघीय मंडळीचे योगदान मोठे आहे. देशाच्या दुर्गम भागात गरीब लोकांच्या गरीबीचा फायदा घेऊन सेवेच्या नावाखाली धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती करण्याचे मिशनरींनी सुरू केलेल्या घातक कृत्यांकडे डाव्या पक्षांची सत्ता असलेल्या राज्य सरकारने दुर्लक्ष केले. धर्म न मानणारी ही डावी मंडळी ख्रिस्ती मिशनरी व मुस्लीम मदरेशाचे काम करणार्या मंडळीवर सतत कृपादृष्टी ठेवीत गेली. आणखिन एक कारण असे आहे की डाव्या विचारसरणीच्या मंडळीत अनेक गट आहेत. विदेशी शक्तीकडून मिळणार्या पैशांचा वाटपा वरून ही मंडळी दुभंगलेली आहे.  देशात जितकी अधिक हिंसक अंदोलने तितकी अधिक विदेशी धनशक्ती त्यांना प्राप्त होत असावी. म्हणूनच डाव्या पक्षांच्या गटा-गटात अन्तर्गत पद व पैशा संबंधी स्पर्धा आहे. 

दुसरीकडे काॅग्रेस पक्षासमोर डावीकडे झुकावे की उजवीकडे असा पेंच आहे. तरीही त्यांचे श्रेष्ठी डाव्यांच्या मेहनतींतून राजकीय फायदा मिळत असेल तर का सोडावा अशा मताचे आहेत. इथे एक सत्य विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी, लक्षात घ्यावयास हवे की १९८०-८१ साली जेएनयू मधील डाव्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी स्वतःच्या देखरेखेखाली पोलीस कारवाई करून तत्कालीन विद्यार्थां संघटनेचे अध्यक्ष सिताराम येचूरींना अटक करून जेएनयूला पंधरा दिवस टाळेच लावले  होते. मोदी सरकरने अजून तरी तशी कारवाई केली नाही. पण त्याच सिताराम येचूरीच्या गळ्यात गळा घालून काॅग्रस सुध्दा आड राहून हिंसक आंदोलने करीत आहे. हे असेच पुढे सुरू राहीले तर मोदी सरकार, इंदिरा सरकार पेक्षा कठोर कारवाई करण्यास मागे पुढे पाहील असे वाटत नाही. काॅग्रेसच्या मित्र पक्षांना राष्ट्रीय स्तरावरील राजकिय घटनांसंदर्भात स्थानच नाही. तिथे त्यांना काॅग्रेस सोबत फरफटत जाण्याशिवाय पर्यायच नसतो.  म्हणून अखिलेश यादव, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इत्यादी मंडळी कुत्रीम तोता ठरत आहेत. त्यातूनच ते सोनीया गांधीना आवडेल तशा प्रतिक्रीया देतात. बंगाल मध्ये तृणमूल काॅग्रसेच्या पायाखालची जमीन घसरली आहे. म्हणून त्यांचा आकडतांडव असतो.  राष्ट्रीय मुद्यावर विरोधी पक्षांपैकी एकाने विरोध केला की इतर विरोधी पक्षांना भाजपाची कोंडी करण्याच्या मोह आवरता येत नाही. तसेच भाजपा नेते त्यांच्यावर करीत असलेल्या देशद्रोहाच्या आरोपातून सूटका करून घ्यावयाची असूनही त्यांच्या पैकी एकाद्याला ही शक्य होत नाही. थोडक्यात सर्व विरोधी पक्षांची स्थिती Between Deep Sea and Devail अशी झालेली आहे. त्यांची अशी विचित्र स्थिती झाल्यामूळे राष्ट्रीय मुद्यावरचा जनाधार भाजपाच्या पारड्यात कधीच जाऊन बसला आहे. म्हणून तेलंगण, ओरीसा, आन्ध्र इत्यादी प्रदेशातील सत्ताधारी पक्ष मोदी सरकार विरोधात उभे राहण्यास तयार नाहीत. राजस्थान, मध्यप्रदेश,  छत्तीसगड, , झारखंड व महाराष्ट्र इत्यादी राज्यात भाजपाला पिछाडीवर रहावे लागले असले तरी राष्ट्रीय मुद्यावर ह्या राज्यात भाजपाला मोठे समर्थन आहे. म्हणूनच भारत बंदचा फज्जा उडाला.  

भाजपाचा राष्ट्रवाद आक्रमक असे म्हणावयाचे व सरकारला विरोध करावयाचा तो स्टॅलीन, लेनीन,
माओच्या धर्तीचा. हे विरोधी पक्षांना शोभणारे आहे का, ह्यावर पुरोगामी संपादक, विचारवंत व साहित्यीक मंडळींनी विचार करून विरोधकांना समज द्यायला हवी. पण ते देत नाहीत व देणार ही नाहीत. कारण हीच मंडळी मूळी कोत्या मनाची आहेत. आता भारत बंदचा फज्जा उडाला हे एक प्रकारे काश्मीर, तीन तलाक, सीसीए इत्यादी विषयावरील सार्वमतच झाले आहे. त्यामूळे सरकार पक्षाचे पारडे जड झाले आहे. दिल्ली पोलीसांनी जेएनयूत झालेल्या दशहतवादी कृत्यांचा प्राथमिक अहवाल सरकारकडे सोपावला आहे. त्यात बुरखा घातलेली मंडळी डाव्या विचारसरणीची मंडळी आहेत असे पोलीसांनी म्हटले आहे. त्यामूळे सरकारला कठोर कारवाई करण्याची ताकद मिळाली आहे.  ह्या पलीकडे जाऊन विचार करता इतर काही कारणे आहेत ज्यामूळे विरोधी पक्षांनी आपली हिंसक आंदोलने अशीच सुरू ठेवली तर त्यांच्यावरच बाजी उलटण्याची शक्यता अधिक आहे. ती कारणे खालील प्रमाणे आहेत --

१) कुठलेही आंदोलन विषेशतः हिंसक, दिर्घकाळ टिकू शकत नाही. कारण कालाय तस्मै नमः|' प्रत्येक वस्तू, कार्यात 'Law of Diminishing Marginal Utiliy'  preavails. त्यातही भारतिय समाजाच्या मानसिक बैठकीला हिंसक आंदोलने पचत नाहीत. म्हणून अशा आंदोलनात भाग घेण्याची संख्या पुढे रोडावत जाईल. (नक्षलवादी चळवळीतून शस्त्र खाली ठेवून शरण येणार्या काॅम्रेडंची संख्या वाढत आहे हे एक उदाहरण आपल्या समोर आहेच).  
२) भाजपाने विरोधी पक्षांच्या हिंसक अंदोलनास समांतर ठरेल असे सरकारी धोरणांच्या समर्थनार्थ मोर्चा सुरू केलेले आहेत. ते ही शांततेने. अशा लढाईत विरोधी पक्ष थकून जातील. कारण हिंसक आंदोलनात शक्ती अधिक खर्च होत असते. त्यातच विरोधी पक्षांकडील शक्ती विभाजीत आहे. काही ठिकाणी विरोधी पक्षांचे नेते आपआपल्या राज्यातील सत्ता कशी टिकावी या विवंचनेत अडकले आहेत.
३) सरकार  विरूद्ध सुरू झालेल्या अंदोलनात विदेशी शक्तीचा हात आहे ही बाब मतदार जाणत आहेत. विदेशी शक्ती फार काळ आपल्या येथील विरोधी पक्षांना मदत करू शकणार नाही. कारण आजच्या जगात व्यापार हे ही युद्धाचे शस्त्र ठरले आहे. मग अन्य देश भारताशी केलेल्या द्विपक्षीय व्यापार करारातील  नुकसान कसे व का म्हणून सोसतील? 
४) जगातील राजकारणात पंतप्रधान मोदीचा दबदबा आहे हे चीन सारखा देश ही जाणत आहे. चीनची डोकोलम येथील वाढत्या अरेरावी च्या वेळी शांत राहून अचानक इझरायल सारख्या आक्रमक देशाचा दौरा करून चीनच नव्हे तर इतर बड्या राष्ट्रांना ही मोदींनी भांबावून करून सोडले होते.
५) अमेरिका व इराण मध्ये सध्या सुरू झालेल्या चकमकीचे मोठ्या युद्धात पर्यवसन होण्याचा धोका उभा आहे. अशा वेळी मोदी सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव देशातंर्गत होणार्या हिंसक अंदोलनावर कठोर पावले उचलावी लागतील. त्यासंबंधीत सारा देश त्यांच्या पाठीमागे ओघाने उभा राहील.
६) अमेरिका व इराण मध्ये काही समझोता झाला तरी आणखिन तीन-चार वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण निसरडे राहण्याचीच शक्यता आहे.
७) मोदी सरकार विरूध्द एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधी पक्षांकडे नाही.

अशा स्थितीत मतदार  विरोधी पक्षांकडे वळण्याची शक्यता कमी होत गेलेली दिसेल. म्हणूनच झाले तितके पुरे, झाकली मूठ सव्वा लाखाची असे समजून विरोधी पक्षांनी भारत बंद, हिंसक अंदोलने हा मार्ग सोडून विधायक विरोधाची कास धरणे हेच शहाणपणाचे ठरेल. विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध व तो ही हिंसक स्वरूपात सुरू ठेवलाच तर त्यांच्या अस्तीत्वासंबंधीचा प्रश्न उभा राहील असे वाटते. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, ती हीच.

सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

जनरल बिपीन रावतांचे वक्तव्य व विरोधकांचा पोटशूळ



भारतीय लष्कराचे भूदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी ' विद्यापीठे आणि काॅलेज विद्यार्थ्याना हिंसाचारासाठी उद्युक्त करते, ते नेतृव नव्हे ' असे अलीकडे विधान केले. त्यावर आपल्या येथील डावे नेते, विचारवंत व संपादक मंडळींचा पोटशूळ उठला आहे. ह्या मंडळीं पैकी बहूताशांनी जनरल बिपीन रावतांचे हे विधान अलिकडे नागरिकत्वाच्या विरोधात होत असलेल्या अंदोलना संदर्भात आहेत असा सोयिस्कर अर्थ काढला आहे. माकपाच्या सिताराम येचूरीनें ' आपण पाकिस्तानच्या दिशेने जात नाही ना ' असे प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र टाईम्सने आपल्या शनिवार दिनांक २८डिसेंबर २०२० च्या अंकातील आपल्या अग्रलेखात  माकपाच्या सिताराम येचूरीच्या प्रत्युत्तरासंबंधी नापंसती दर्शविलेली आहे. पण अग्रलेखाच्या सुरूवातीलाच  देशातील उच्च पदस्थांनी आपले मत व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या प्रतिमेवर होणार्या संभाव्य परीणामाचा विचार करावा,  शक्यतो भाष्य करू नये, व संयम राखावा असा अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्षपणे जनरल बिपीन रावतांना सल्ला दिलेला आहे.  एक वृत्तपत्रांचा वाचक व न्यूज चॅनेलचा एक प्रेक्षक आणि अर्थात एक नागरिक म्हणून जनरल रावतांच्या विधानाचा भाजपा विरोधकांनी जो काही सोयीस्कर अर्थ लावला आहे , त्याबाबत मतप्रदर्शन करणे हा माझा ही हक्क आहे असे मानून माझे विचार मांडतो आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या येथील डावे, पुरोगामी विचारवंत, संपादक मंडळी व विरोधी पक्षांचे नेते  गेली साडेपाच वर्षे मोदी सरकार वर टिका करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवित आहेत. मोदींकडे केंद्रातील सत्ता जनतेने सोपविली आहे हे डाव्या विचारसरणीच्या लोकांना पचविणे जड जात आहे. २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीतील प्रचार दरम्यान भाजपाला बहूमत मिळेल अशी शक्यता बळावत असतानाच मोदी व भाजपाला अस्थिर करण्याचे धोरण डाव्या विचारसणीच्या लाॅबीने आखले होते. म्हणून मोदी सरकार स्थिरावण्याच्या आधीच डावे विचारवंत व साहित्यीकांनी असहिष्णूता वाढली आहे असे दाखवीत पुरस्कार परत करण्याची भाषा सुरू केली होती, हे वाचकांना आठवत असेल. डाव्या विचारवंतानी मोदी सरकारच्या निषेधार्थ ना आपला देश सोडला ना आपले पुरस्कार परत केले. मग मोदी सरकारवरचे आरोप का मागे घेतले नाहीत हा प्रश्न आजही माझ्या सारख्या वाचकांना पडलेला आहे. उचलली जीभ लावली टाळूला अशीच आपल्या येथील  पुरोगामी मंडळीची वृत्ती आहे व तिचे सतत दर्शन होत असते. म्हणून त्यांना मतदारांनी  धुडकावले आहे. डावे पक्ष संपत आलेच पण त्यासोबत काॅग्रेस व मित्र पक्षांच्याही जागा घटल्या. काॅग्रेस व मित्र पक्ष आणि त्यांचे मिडीयातील मित्र वर्ग, आम्ही ना डावे व ना उजवे असे कितीही म्हणत असले तरी यांचे ( यात आपले मटा लोकसत्ता, लोकमत ही वृत्तपत्रे ही आहेत) गोत्र डाव्या  विचारसरणीच्या आम्लात रूतलेले आहे. राहूल गांधींची डाव्या पक्षांशी असलेल्या मैत्रीमूळे ते अमेठीतही पराभूत झाले. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत सपाटून मार खल्ला तरी भाजपा विरोधकांना शहाणपण येत नाही. त्याचेच प्रत्यंतर जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्यावर वादळ उठविण्याचा जो प्रयत्न ते करीत आहेत त्यातून जाणवले आहे.

जनरल बिपीन रावत ह्यांनी केलेल्या वक्तव्याने सरकार पक्षाच्या भूमिकेला ते समर्थन देत आहेत असा अर्थ लावून मटासारखी वृत्तपत्रें व विरोधी पक्ष त्यांना उपदेश करीत आहेत. मुन्शी प्रेमचंदजींच्या एका कादंबरीत वाक्य आहे ते मिडीयावाल्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते वाक्य आहे, ' दुसरोंको उपदेश देना कितना सहज और सरल है |'  भारताच्या सरन्यायाधिशांवर आरोप ठेवीत चार न्यायाधिशांनी केलेल्या बंडाला याच विरोधी पक्षांनी , विचारवंतानी, व संपादक मंडळींनी पाठींबा दिला होता. सर्वोच्च न्यालयातील चार न्यायाधिशांनी बंड करून देशाच्या इभ्रतीत कोणती भर टाकली होती की, विरोधी पक्षांना व सेक्यूलरीस्ट संपादक महाशहांना त्यांच्या बंडाचे समर्थन करावे लागले होते? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र टाईम्सच्या संपादक महाशहापासून ते डाव्या पक्षांचे सिताराम येचूरी पर्यंतच्या सर्वांनी प्रथम देशवासियांच्या समोर ठेवावयास हवे. न्यायाधिशांचे ते बंड तसे पाहता वरकरणी तरी न्यायालयीन कामकाजाच्या संबंधीत  होते. त्यात विरोधी पक्षांनी आगीत तेल ओतण्याची काय गरज होती (या संबंधीत ब्लाॅगवरील स्वतंत्र लेख  कृपया वाचावा)  हा  प्रश्न नंबर २ आहे? बरं त्यातील काही न्यायाधिश निवृत्त झाले आणि निवांतपणे जीवन जगत आहे. मग ते बंड होते कशासाठी? याचे उत्तर बंडखोर न्यायाधिशापेक्षा त्यांचे समर्थन करणार्या माध्यमातील मंडळींनी करावयास हवे. पण तो प्रश्न ही अनुत्तरीत राहीला.  आत्मपरीक्षण करून अशा प्रश्नांची उत्तरें देण्याची तसदी मिडीयावाले (विशेषतः स्वतःला पुरोगामी मानणारे) घेत नाहीत. त्यामूळे लोकसभेच्या मतदानाच्या वेळी मतदार यांच्या अग्रलेखांना व संपादकिय स्थंभाना कवडीची ही किंमत देत नाहीत. राज्या-राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत जरी भाजपाचे संख्याबळ घटत असले तरी भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी घटत नाही. शिवाय विधानसभेतील निवडणूकीत स्थानिक समस्या,  स्थानिक घराणेशाहीचा प्रभाव, बंडखोरी इत्यादी मुद्यांवर मतदान होत असते हे लक्षात घेणे आवश्यक असते.  महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड येथील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाची झालेल्या पिछेहाटीमूळे विरोधक व त्यांच्या मिडीयातील समर्थकांना आनंदाचे उखाळ्या फुटलेल्या आहेत. त्या आनंदाच्या नशेत नागरिकत्व सुधारीत कायद्याचे निमित्त साधून त्यांनी हिंसक अंदोलने करण्याची मोहीम आखली आहे. सतत भाजपावर सांप्रदायिकत्वाचा आरोप  करून त्याच्या नेत व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादाची, धर्माची नशा चढली असे म्हणत  राहणार्यांनी भाजपा वा संघाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कधी केले आहे हे प्रथम पुराव्यानिशी दाखवावे. आम्ही डावे, आम्ही पुरोगामी,  आमचा वसा आधूनिकतेचा  असे म्हणत  मिरविणार्यांची नशा देशात अराजक माजविण्यापर्यंत मजल जात आहे यावर मिडीयांनी दुर्लक्ष करणे ही सुद्धा एक अत्यंत धोकादायक बाब आहे असे मला वाटते.

जनरल रावतांना काय अपेक्षित आहे याचा स्वतः अर्थ काढून मटासारख्या वृत्तपत्राने अग्रलेख लिहीला. तो लेख वाचल्यानंतर संपादक मंडळी नेहमीच तटस्थेने विश्लेषण करतात असे नाही हे अनुभवास आले. खरोखरीच मटा संपादक तटस्थेने आपले काम बजावित असते तर मटाने मुबंईतील आयाआयटी बी च्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारीत कायद्याच्या समर्थानार्थ काढलेल्या मोर्चाच्या  फोटो खाली आपल्या २५ डिसेंबरच्या दैनिकात नागरिकत्वाच्या विरोधात काढलेला मोर्चा अशी टीप ठेवली आहे. ती वाचकांनी फक्त प्रिन्टींग चूक समजावी का? वृत्तपत्राच्या कामकाजासंबंधी रेग्यूलटरी कायद्याच्या आधारे वाचकांनी मटाचा हा खोटारडापणा चव्हाट्यावर आणला तर आमची चूक झाली अशी माफी मागून  मटाचे संपादक मोकळे होतील. मागे लोकसत्ताच्या कुबेरांनी तसेच केलेले आहे. पण त्याने काय साधणार आहे ? नागरिकत्व कायद्याला समर्थन देणार्या मोर्च्यासंबंधी इतकं धडधडीत खोटे दाखवून जनरल रावतांच्या वक्तव्यावर मटा सारख्या पत्र नव्हे मित्र असे ब्रीद घेणार्या वृत्तपत्राच्या संपादकाचे म्हणणं आम्ही वाचकांनी तटस्थेचे मानावयाचे काय?  हिंसक अंदोलने करीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना,  विरोधी पक्षांच्या नेत्यांना चार खडे बोल अजून का सुनाविले नाहीत. नागरिकत्व सुधारीत कायदा मंजूर झाला आहे,  ते काही विधेयक नाही इतकी समज मटाच्या संपादक महाशहांनी अंदोलनकरांना देऊ नये का?  कायद्याच्या समर्थनार्थ निघालेला  शांततापूर्ण मोर्चाचा फोटो,  त्या कायद्याच्या विरोधातील आहे असे भासविण्याचा प्रयत्न का करावा ? मी तर म्हणतो, यातून मटाच्या संपादकांचा निव्वळ कोडगेपणाचे दर्शन झाले आहे. मूळात जे विधेयक संसदेने मंजूर करून त्याचे कायद्यात रूपातंर झाल्यानंतर दंगलदृश स्थिती निर्माण कोण करीत आहे याचा तपास पत्रकार मंडळींनी करावयाचा असतो. जर अंदोलने शांततापूर्ण झाली असती तर जनरल रावतांनी तसे वक्तव्य केलेच नसते. त्यातही जेएनयुतील देशके टुकडे गँगच्या घोषणा जनरल रावतांना ऐकू गेल्या नाहीत असे मटाचे संपादक मानत आहेत का? नैसर्गिक आपत्तीत जवान लागतात, अंदोलनातून आगीचा डोंब उसाळला की लष्कर आणावे लागते. तेव्हाच कूठे स्थिती पुर्वपदावर येत असते. अशा लष्काराच्या प्रमूखांनी अंदोलने हिंसक होतात, नेतृत्व चूकते आहे असे म्हटले तर त्यात काय मोठे आकाश कोसळले? जे सत्य आहे ते निःपक्षपाती लष्कर प्रमुखाने मांडले तेच योग्य झाले आहे. डाव्या विचारवंताच्या आहारी गेलेल्या मध्यममार्गीय, मध्यमवर्गीय आपले संपादक व पत्रकारांचीही बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय असे वाटू लागले आहे . डावे पक्ष, विचारवंत व मिडीयाच्या मालकांना आज ही अशी आशा आहे की, भाजपा व संघाला बदनाम करणारी त्यांची कम्युनिस्ट स्टाईलची मोहीम एक दिवस यशस्वी होईल. त्यांनी तशी आशा जरूर धरावी. त्या संबंधी विरोध नाही. पण त्यांनी मोहीम शांततेने राबवावी, पुर्णतः भारतिय संस्कृतीला साजेल अशी राबवावी.  स्टॅलीन आणि  क्रूश्चेव स्टाईलची नव्हे. गेली पाच वर्षे त्यांच्या मोहीमेचा भाजपालाच फायदा होतो आहे. त्यातूनच  सिताराम येचूरी व राहूल गांधींना उपहासाने भाजपाचे स्टार प्रचारक असा उल्लेख सोशल मिडीयावर होताना दिसतोय. २०२४ च्या लोकसभेचा प्रचार जेव्हा सुरू होईल, तेव्हा कदाचीत सिताराम येचूरी व राहूल गांधी सोबत, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अनेक वृत्तपत्रांचे न्यूज चॅनेल्सच्या संपादक मंडळीचा ही उपहासाने भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश झालेला सोशल मिडीयावर दिसला तर आश्चर्य वाटू नये.

एकंदरीत नागरिकतत्व सुधारीत कायद्यासंबंधीत होत असलेला गदारोळ संपणार नाही हे मी मागील लेखात सुचीत केलेलं आहे. मोदी सरकारने निर्णय घ्यावयाचे  व विरोधी पक्षांनी त्याला विरोधासाठी विरोध करीत राहावयाचे;  सोबत काही न्यूज चॅनेल्स व वृत्तपत्राचे संपादक, पत्रकार, राजकीय अभ्यासक, व विचारवंतांनी विरोधकांची तळी उचलत मिरवायाचे ; हा राष्ट्रीय स्तरावरील राजकीय मंचावरचा न संपणारा खेळ वा न संपणारी एक मालिका आहे असे समजून जे होतयं ते कायद्याला समर्थन देणार्या वाचकांनी, मतदारांनी पाहात बसावे, त्यांनी मोर्चा काढू नयेत, समर्थनासंबंधीचे भाष्य करू नये अशी इच्छा झाडून सार्या पुरोगामी वृत्तपत्रे व न्यूज चॅनेल्सची झालेली असेल तर त्यांनी वाचक आणि प्रेक्षकांचे आम्ही प्रबोधन करतो आहेत असा टेंबा मिरविण्याची गरज नाही.

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...