गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

रामजन्मभूमीवर मंदिर होण्याचा मार्ग मोकळा होणार?


आपल्या देशातील प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला रामजन्मभुमी खटल्या संबंधीचा महत्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयातर्फ घोषित केला. आजच्या निर्णयाने १९९४ साली इस्माईल फारूखी ह्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर पुनर्लोकन होणार नाही. हे स्पष्ट केले आहे. बाबरी मशीदीत नमाज पडला जात नव्हता आणि नमाज पडण्यासाठी मशीदीची गरज नसते ह्यावर शिक्कामोर्तब झाले. सुप्रिम कोर्टाने रामजन्मभूमी खटल्यातील जमीनी संबंधीत सुनावणी २९ आक्टोबर पासून सलग रित्या सुरू करावी असाही निर्णय दिला.  

ह्या निर्णयाने रामजन्मभूमीवर राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असे म्हटले जात असले तरी ह्या विषयावर राजकारण चालूच राहील असे दिसते. काही महीन्यापूर्वी काॅग्रेसचे नेते कपील सिब्बल ह्यांनी रामजन्मभूमीची सुनावणी २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीनंतर घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. कपील सिब्बल हे रामजन्मभूमी खटल्यात मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्डच्या वतीने बाजू मांडणारे वकील आहेत. एक वकील ह्या नात्याने त्यांनी कुणाचं वकील पत्र घ्यावयाचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशीलाच्या वतीने सुनावणी लौकर वा पुढे ढकल्याची मागणी करणे, ही न्यायालयातील प्रशासकीय कामकाजातील सामान्य बाब आहे. ती मागणी पूरी करावी की फेटाळून लावावी हा न्यायधिशाचा हक्क असतो. कुठल्याही केसचा निवडणूकाशी संबंध असला तरी त्याच्याशी न्यायालयाला काही देणं-घेणं नसते. अपेक्षे प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने कपील सिब्बल ह्यांची मागणी फेटाळून लावली. तेव्हाच सर्वोच्च न्यायालय ह्या खटल्याचा निर्णय लौकर घेणार असा अंदाज आला होता. कपील सिब्बलच्या मागणीतून दोन अर्थ निघतात. स्वतः कपील सिब्बल ह्या खटल्यातील मुस्लीम बोर्डाचे वकील असल्याने त्यांना ह्या खटल्यात त्यांचे अशील नमाज पडण्याबाबतच्या विषयावर हरतील अशी खात्री झाली होती. भाजपाला ह्या खटल्याच्या निकालाचा २०१९ च्या निवडणूकीत फायदा मिळू नये हा ही कपील सिब्बलांचा हेतु होता हे स्पष्ट झाले आहे. आणखिन कारण असे की न्यायालयातर्फे रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी आता सुरू झाली तर 'भाजपाने सुप्रीम कोर्टाची स्वायतत्ता नष्ट केली आहे.' असा कांगावा करण्याची संधी वाया घालवयाची नव्हती. ती संधी काॅग्रेस आणि साम्यवादी घेणार हे निश्चित. पण त्यांना इतर मित्र पक्ष आणि प्रादेशिक पक्ष श्रीरामजन्मभूमीच्या न्यायालयीन प्रक्रीयेत बाधा उत्पन्न करण्याच्या कटात साथ देतील असे वाटत नाही, आणि सहकार्य केले तरी बहुसंख्याकांची मते विरोधी पक्षाच्या हाती फारशी लागणार नाहीत. तरीही कपील सिब्बलची ही मागणी पुढील खेळी रचण्यासाठी होती हे अनुभवास मिळेल. कारण न्यायालयात बंड करण्याचे षडयंत्र करणारी काॅग्रेस आणि साम्यवादी मंडळी किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे आपण अनुभविले आहे.

रामजन्मभूमीचा विवाद स्वातंत्र्यपूर्वीपासूनचा आहे. मोगल आणि ब्रिटीश राजवटीत ह्या प्रश्नासंबंधी काय झालं, आणि तोडगा का निघाला नाही, ह्यासंबंधीची चर्चा देशाच्या स्वातंत्र्यनंतर आपोआप निरर्थक ठरयाला हवी होती. कारण त्या दोन्ही राजवटी आक्रमकांच्या होत्या. दुसरे असे की देशाची फाळणीच मुळी हिंदू-मुस्लीम समाजाची वस्ती कुठे,आणि किती प्रमाणात होती ह्या सिध्दांतावर झाली, आणि ती ही स्वतंत्र भूभाग आणि स्वतंत्र देश मुस्लीम बांधवांनी मुस्लीम लीग नावाच्या पक्षातर्फे मागितल्यामुळेच झाली. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय सभेचे म्हणजेच काॅग्रेसचे स्वरूप आपोआप हिंदुची प्रतिनिधत्व करणारी संस्था इतकेच राहीले होते. बहूसंख्य मुस्लीम बांधव ना नेहरूंना जुमानत होते ना गांधीजींना मानत होते. भले काॅग्रेसचे आजचे नेते हे सत्य मानो वा न मानो. आज आपल्या देशातील ओवेसीच्या एमआयएम सारखे पक्ष, काश्मीर मधील हुरियत, अलगावादी, व सिमी सारखी संघटना इत्यादींची चाललेली मुजोरी पाहता असे वाटते की मुस्लीम आणि ब्रिटीश राजवटीत जमीनदोस्त झालेल्या देशातील सर्व  मंदिराच्या जागेचा हक्क (फाळणीतील एक अट म्हणून) मागावयास हवा होता. आणि मगच  फाळणी स्विकारावयास हवी होती. फाळणी नंतर जे हिंदू भारतात परत येण्यासाठी निघाले, त्यापैकी कित्येक जणांच्या मुस्लीमांनी कत्तली केल्या. त्यांच्या संपत्ती सामानाची लूट केली. माता-भगिनीवर अत्याचार केले. जे वाचले ते कसेबसे जीव मुठीत घेऊन निर्वासितासारखे आले. भारतातून जे मुस्लिम पाकिस्तानात गेले ते स्वखुषीने आणि ते ही सुखरूपपणे. आणि जे राहीले, त्यांना नमाज पडण्याची सोय देशभरच्या प्रत्येक भागात आहे. तसेच अयोध्या परीसराच्या जवळपासही आहे. बाबरी मशीदमध्ये नमाज पडला जात नव्हता, हे ही सामान्यजनांना माहीत आहे. विवाद कशासंबंधी होता, त्यावरचा खटला कसा आणि केव्हापासून न्यायालयात प्रलंबित आहे, ऐताहासिक पुरावे इत्यादी संबंधीची माहीती सामान्यजनांना ढोबळ मानाने ठाऊक आहे. हा खटला न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे खटल्यासंबंधी चर्चा करणे उचीत नाही. विविध राजकीय पक्षांचा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टकोन कसा राहीला आहे, आतापर्यंतच्या केंद्र सरकारचा त्यासंबंधीतीतला धरसोडपणा, विविध पक्षांनी वेळोवेळी खेळलेल्या राजकीय चाली तसेच येणार्या लोकसभेच्या निवडणूकापूर्वी त्यांच्या संभाव्य राजकीय खेळी काय असू शकतात ह्यावर आपण चर्चा करू या.

प्रथम रामायणाच्या अभ्यासकांनी श्रीरामा संबंधी काय म्हटलंय, त्याचं सार पाहू या. श्रीराम हा राजा दशरथाचा जेष्ठ सुपुत्र होता. व त्याचा जन्म अयोध्यात झाला होता. राम हा सामाजिक समतेचे प्रतिक आहे; राम वनवासी लोकांच्या सानिध्यात राहीला; ज्याला राष्ट्राचं उत्तरदायित्व स्विकारायचं, किंवा राजा व्हायचं आहे, त्याने जनसामान्यांच्या जीवनातील कष्ट, यातनांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा हे राज्यशास्त्रातील सर्व प्रकारच्या राज्यप्रणालीसाठी आवश्यक असलेलं, त्रिकालातीत तत्वाचे दर्शन घडते ते श्रीरामाच्या वनवासातूनच. वनवासात जाण्याची पितृआज्ञा पाळणे हे पुत्र धर्माला अनुसरून आहे. पण ह्यातच रामाचं मोठेपण थांबत नाही तर, राज्याभिषेकाची तयारी पूर्ण होत असताना, वनवास स्विकारणे हे स्थितप्रज्ञाचं सर्वोच्च पातळीवरील अद्भूत दर्शन मानव जातीला देणारी विभूती म्हणजे राम असेच मानावे. रामाने वानर समाजाची वालीच्या दशहत आणि छळापासून सुटका केली. रयतेला छळणार्या सर्वच राक्षसांचा नायनाट केला तोही रयतेशी एकरूप होऊन. रामाने शबरीची उष्टी बोरं आनंदाने खाल्ली. मते मिळावित ह्या हेतुने केलं जाणारं ते नाटक नव्हते. समाज व्यवस्थेतील उच्च-नीचता, गरीब-श्रीमंत, साक्षर-निरीक्षर असे भेदभाव दूर करण्यासाठी प्रथम विविध  राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शुध्द अंतःकरणाने प्रयत्न करावयास हवा. हे राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी एक बोधप्रद तत्वच आहे की. रामातील देवत्व रामाने निर्माण केले आहे. मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे राम स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवितो. विचार असो वा विकार, व्यवहार असो वा तत्वज्ञान, सर्व कार्यात त्याने मानवी मर्यादा सोडली नाही. भारतीयांच्या जीवनात राम पूर्णतः एकरूप झालेला आहे. कोणत्याही कार्यात राम नाही असे म्हटले तर ते काम फारसं वैयक्तिक तसेच समाजाच्या उन्नतीसाठी राहीले नाही असा अर्थ निघतो. तसाच काहीसा अर्थ रामराम ठोकणे ह्या वाकप्रचारातूनही उमटतो. म्हणजे काळानुसार पध्दतीत बदल स्विकारावा हेच होय. दोन व्यक्ती रस्त्यात भेटल्यावर राम राम म्हणतात; का? तर 'तुझमे राम मुझमे राम ' हा भाव व्यक्त करून परस्पर स्नेह वाढावा, टिकावा ह्यासाठीच. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी 'रामराज्य'  शब्द पर्याय म्हणून आपल्या देशातील सर्व भाषात प्रचलीत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या मनातील लोकाभिमूख आणि कल्याणकारी राज्याची कल्पना श्रीरामचरीत्राचं सततच्या चिंतनातून तयार झाली आहे. सत्तेच्या लालसेला मर्यादा असाव्यात, संपत्तीच्या लालसेला मर्यादा असाव्यात; सोन्याच्या लंकेची भुरळ पडली नाही; शौर्याची महती साम्राज्यवादाच्या लालसेने हीन बनते असे मानून रावणाचा भाऊ बिभिषणाला लंकेच्या गादीवर बसविले; त्यातूनच 'मातृभूमीलाच स्वर्ग भूमी माना ' असा संदेश ही आपल्याला दिला आहे. 'मरणांते वैर ' ह्या सिद्धांता नुसार राम, लक्ष्मणाला रावणासंबंधी असलेल्या घृणेवर नाराजी व्यक्त करीत रावणाच्या विद्वत्तेबदल आदर ठेवावयास सांगतो. बिभिषणाला रावणाच्या पार्थीवावर योग्य ते अंतिम संस्काराची व्यवस्था करावयास सांगतो. रामाच्या संपुर्ण चरीत्रातुन सतत एकच सिद्धांत आपल्याला ज्ञात होतो तो  म्हणजे  'मानवी जीवन हे मर्यादेतूनच भूषणावह ठरते.' हा होय. म्हणूनच रामाला मर्यादा पुरूषोत्तम असे मानले जाते. म्हणूनच 'अति तेथे माती'  'Anything in excees is poision ' असे वाक्प्रचार सर्व भाषात रूढ झाले असावेत. मानवी जीवनमूल्याची खाण, म्हणजे राम. राम राजा होता, म्हणून प्रजेचा विश्वास संपादन करणे प्रथम कर्तव्य मानतो. सीतेचा त्याग केला तो राजा म्हणून. त्यानंतर पुढे यज्ञ करतेवेळी दुसरे लग्न न करता सीतेची प्रतीमा बनविली व यज्ञ पुरा केला. हृदयात फक्त एकच स्त्री. ती म्हणजे सीता. दांपत्य धर्म व राजधर्म ह्या दोहोमधील संघर्षाची रामाने योग्य उकल केली. हजारो वर्षापुर्वीच्या इतिहासातील राम, देशाच्या काना-कोपर्यातील लोकांच्या हृदयात देवासारखा विराजमान झालेला आहे हे कोणी अमान्य करणार नाही.

आपल्या देशातील राजकीय पक्षांनी रामाला कुठल्या दृष्टीने पाहीलंय ते पाहू या. प्रथम भाजपापासून सुरवात करू या. सर्वसामान्यांनी रामात जे देवत्व पाहीले, त्याचा भारतीय जनता पार्टीने आदर केला. भाजपाने स्पष्ट भूमिका मांडण्याचं धैर्य दाखविले. ह्याचं कारण भाजपाच्या पाठीमागे उभी असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शक्ती. संघ आणि भाजपा श्रीरामाला ह्या देशातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनातील मानबिंदू मानतात. त्यासाठी ते इन्डोनिशिया ह्या  देशाचं उदाहरण देतात, जिथे बहुसंख्याक मुस्लीम असूनही तेथील मुस्लीम श्रीरामाला आजही आपला पूर्वज  मानतात. आजही तिथे रामलीलाचा भव्य कार्यक्रम होतो. संघ व भाजपा म्हणतात तो हाच सांस्कृतिक राष्ट्रवाद. ही व्याख्या हिंदू समाजाला भावली आणि इथेच इतर पक्षांनी मार खाल्ला. राम मंदिराची नव्वदच्या दशकात जी लाट होती तशी आता नाही, हे सत्य असले तरी त्याचा अर्थ असा नाही की अयोध्येत राम मंदिर जनतेला नकोसे झाले आहे. मोदींचे सरकार हे कट्टर हिंदुत्ववादी असून अल्पसंख्याकांची सुरक्षा धोक्यात येत आहे, असा विरोधी पक्षांच्या सततच्या अपप्रचारामुळे हिंदु मताचे जे धृवीकरण होत आहे, ते राम मंदिराच्या लाटेपेक्षाही अधिक आहे. त्यातही आपल्या देशात असलेल्या विदेशी स्वयंसेवी संस्था व संघटना, ख्रिच्चन धर्मगुरू, मुस्लीम धर्मगुरू इत्यादी विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला दुजोरा देत असल्याने परकियांचा आपल्या देशातील राजकारणतला हस्तक्षेप वाढतो आहे असा समज सामान्यजनात होत आहे. त्यामुळे भाजपाला काॅग्रेस व मित्र पक्षावर आघात करण्याची संधी मिळत आहे. पाकचे पंतप्रधान इमरानखान ह्यांनी राहूल गांधी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली हे कसले निर्देशक आहे? फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्षांनी केलेले राफेल विमान खरेदी संबंधीतील वक्तव्य नेमके आताच कसे प्रसारीत झाले? फ्रान्स मधील विद्यमान सरकारने केलेला खुलासा पाहता काॅग्रेसच्या आरोपात फारसा दम दिसत नाही. काॅग्रेसकडे भक्कम पुरावे असते तर काॅग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे टाळले असते का? थोडसं विषयातंर झाले, पण रामजन्मभूमीच्या खटल्यातील निकालातून देशातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता पाहता सद्य राजकीय स्थितीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे, असे मला वाटते.

स्वातंत्र्यानंतर अधिकांश काळ केंद्रात तसेच, उत्तर प्रदेश सकट सर्व राज्यात काॅग्रेसची सत्ता होती. तो पर्यंत राम मंदिराचा प्रश्न तडीस का लावला नाही? भाजपाने १९८९ सालच्या लोकसभेच्या निवडणूकीत प्रथम राम मंदिराचा मुद्दा मांडला. त्याचा फायदा भाजपाला झाला. पण थोडाफार. तरीही भाजपा बहूमताच्या फार दूर होताच की. देशात आघाडी सरकाराचे पर्व सुरू झाले ह्याचं कारण स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांनी काॅग्रेस सोडून भिन्न पक्ष निर्माण केले. त्यातील काही प्रादेशिक स्तरावर स्थिरावले. त्यातून काॅग्रेस कमकुवत होत गेली. भाजपाने आघाडी पर्वात राम मंदिर निर्मीतीचा मुद्दा सोडला नव्हता पण बाजूला ठेवला होता. त्यामूळे अटलजींचं सरकार ह्या संबंधी पुढाकार घेणं अशक्यच होतं. मधल्या काळात दहा वर्षे केंद्रात काॅग्रेस आघाडीचेच सरकार होते. २०१४ साली लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने विकास ह्याच मुद्यावर निवडणूक लढविली आणि ती ही मित्र पक्षांना सोबत घेऊनच. भाजपा आपल्या संघटन शक्तीमूळे काॅग्रेसला पर्यायी पक्ष ठरत गेला. तो केवळ राम मंदिराच्या मुद्याला पांठीबा दिल्यामूळे नाही. आज भाजपा सत्तेत आहे, ह्याची कारणे तीन आहेत. डाॅ मनमोहनसिंग सरकारच्या २००९ - २०१४ ह्या काळात कारभारात राम राहीला नव्हता. भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. सरकार निष्क्रीय झाले होते. दुसरे कारण भाजपाची वाढत जाणारी शक्ती . तिसरं कारण राष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या पोकळीत नरेंद्र मोदीजींच्या तोडीचा नेता विरोधकांकडे नव्हता. आजही नाही म्हणा. 

काॅग्रेस तसेच मित्र पक्ष रामाला जाणून बुजून केवळ मोक्षदाता समजातात. म्हणजे राजकारणात धर्म आणता येत नाही, असे हिंदूना समजाविण्याची सोय होते. त्यातही आपण सहिष्णू आहोत, आपण मोठे भाऊ आहोत अशी समजाविण्याची भाषा हिंदूबांधवासमोर माडण्यात ही मंडळी लोकमान्य टिळकांसारख्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीच्या नेत्याच्या निधनानंतर  तरबेज होत गेली. अल्पसंख्यांकाशी जोडून राहण्यासाठी संघ व भाजपाचा बागुलबुवा उभा करण्यातही पटाईत. अधुन-मधुन हिंदु समाजामध्ये जातीयतेच्या आधारावर विभाजन करयाचे उद्योग तसेच सत्तेसाठी मते मिळविण्याचे इतर प्रकार ह्या मंडळींनी स्वातंत्र्यापुर्वीच शिकून घेतले होते. त्यामुळे साठ-सत्तर वर्षे ही मंडळी सत्तेत राहीली. पण रामजन्मभूमीच्या प्रश्नाबाबत ह्यांची बेफिकीरपणा नडू लागला. आता तर रामजन्मभूमीच्या खटल्याची सुनावणी गतीने होणार असे सुप्रिम कोर्टाने जाहीर केल्यामुळे रामजन्मभूमीचा खटला ह्या मंडळीसाठी येणार्या निवडणूकातील यशात मोठा अडसर अडसर ठरण्याची शक्यताच अधिक दिसते.  त्यासाठी रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी लौकर सुरू होता कामा नये, ह्यासाठी प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून कपील सिब्बलने खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकी पूर्वी खटल्याचा निकाल लागला आणि तो श्रीराम न्यासाच्या बाजूने लागला तर बहुसंख्याकांची मते भाजपाच्या पारड्यात पडतील ही भीती ह्या सार्या पक्षांना वाटत आहे. बरं निकाल श्रीराम न्यासाच्या विरोधात लागला, तरी ह्या मंडळींना ना विजय साजरा करता येणार, ना ह्यांना ह्यांच्या लाडक्या अपत्याला होणार्या हर्षाला आवरता येणार. ह्या दोन्ही प्रकारच्या भीतीला ह्या सार्या पक्षांना ग्रासले आहे. ही अवस्था ह्या पक्षांनी स्वतःहून ओढून घेतली आहे. 

आपण आपल्या दैनंदिन जीवनातही पाहात असतो की एखादं काम आपण उद्या करू असे म्हणतो आणि मग उद्याचा दिवस काही उजाडत नाही. आणि ते काम फार गुंतागुंतीचे होऊन बसते. साधा ताप अंगात भरला आणि वेळीच औषध घेतलं नाही की जीवावरही बेततण्याचा प्रंसग उभा राहतो. रामजन्मभूमीसंबंधीचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर जसे सोमनाथ येथे शीव मंदिर दिमाखाने उभे केले तसेच खंबीरपणे सरकारने अयोध्या येथे श्रीरामाचं मंदिर बांधून हा प्रश्न सोडविला असता तर, ना कारसेवकांचे रक्त सांडले असते , ना बाबरी मस्जीद पडली असती. आज काॅग्रेसला तसेच इतर विरोधी पक्षांना ह्या खटल्याच्या निकालाची जी भीती वाटते ती वेळही आली नसती.

काश्मीर प्रश्नाबाबतही असेच म्हणता येईल. ह्या लेखात हा विषय मांडणे गैर नाही. कारण भारतीय जनसंघाची म्हणजेच आजच्या भाजपाच्या निर्मितीचं कारण त्यात दडलयं. स्वतंत्र भूभाग आणि सोबत ५५ कोटी रूपये देऊनही देशाच्या फाळणीच्या वेळी हजारो हिंदूच्या कत्तली केल्या. पाकीस्तानी टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला. आपलं लष्कर पाक टोळ्यांना सडेतोड उत्तर देत असतांना काश्मीर प्रश्नाची उकल युनोतर्फे सोडवू असे पहीले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केलं. युध्द थाबंल. तेव्हा जिथे तुमचं सैन्य तो भाग तुमचा, त्या पुढे जावयाचं नाही असा तात्पुरता तह. त्यालाच Line Of Control हा शब्द. आक्रमण पाकिस्तानने केले होते. स्वाभाविकपणे काश्मीरचा भाग पाक सैन्याने लौकर पादक्रान्त केला होता. त्यामुळे युध्द थांबवताच एक तृतीयांश काश्मीरचा भाग पाकिस्तानकडे राहीला. तो आजपर्यंत पाकिस्तान कडेच आहे. तो भाग POK. म्हणून मानला गेला. तोच भाग भारत विरोधी दशहतवाद्यांचा अड्डा बनलेला दिसतो. त्यावेळीच राष्ट्रहीत डोळ्यासमोर ठेवून पाक टोळ्यांच कबंरडं मोडले असते तर आज, ना दशहतवाद असता, ना काश्मीरमध्ये अलगावादी निर्माण झाले असते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर जो प्रचंड ताण पडला आणि पडतोय ही स्थिती उद्भवली नसती. पंडीत नेहरूनीं काश्मीर बाबतची घेतलेली मिळमिळीत भूमिका पुढे देशाची डोकेदुखी ठरणार असे ठामपणे ज्यांना वाटले असे नेहरूच्यांच सरकार मधील मंत्री डाॅ श्यामाप्रसाद मुखर्जी विरोध करीत मंत्रीपदाचा आणि काॅग्रेस सदस्यात्वाचा राजीनामा देऊन बाहेर पडले. 

डाॅ श्यामाप्रसाद मुखर्जींनी काही दिवसानंतर हिंदूच्या राष्ट्रवादी संघटनेच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघचालक गोलवळकर गुरूजींकडे नव्या राजकीय पक्षासाठी स्वयंसेवक मागितले. का ? कारण डाॅ श्यामाप्रसाद मुखर्जींना हवे असलेले, सदैव देशहिताला प्राधान्य देणारे, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात जात-पात,भाषा-धर्म भेदभाव न करता देशबांधावांना समर्पित भावनेने मदत करणारे त्यागी, संयमी, अभ्यासू वृत्तीचे, शिस्तप्रिय, बलशाली कार्यकर्ते नव्या पक्षासाठी हवे होते, ते त्यांना फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनच मिळतील अशी पक्की खात्री होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय संरसंघचालक गोळवळकर गुरूजींनी, पंडीत दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, बलराज मधोक, नानाजी देशमुख, सुदंरसिंग भंडारी, कुशाभाऊ ठाकरे, इत्यादी स्वयंसेवकांना संघाच्या कार्यातून मुक्त केले आणि त्यांच्याच साह्याने डाॅ श्यामाप्रसाद मुखर्जीनी जनसंघ नावाचा राजकीय पक्ष काढला. तोच पुढे भाजपा झाला. 

इथे भारतीय जनसंघाचा भाजपा पर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करण्याची गरज नाही. नाव बदलले पण विचारसरणी, धोरणे बदलत नाहीत. भाजपाच्या धोरणात संघीय विचाराचा प्रभाव स्वाभाविकपणे राहणार. त्यामुळे भाजपाने राम मंदिराचा प्रश्न आपल्या एजंडावर घेतला. आपल्या देशाचे जे मानबिंदु , श्रध्दास्थाने आहेत, त्यांची अवहेलना होत असेल तर परकिय राजवट आणि स्वराज्यात फरक तो काय उरतो? अशी भावना बहुसंख्याकांना झाली. परंतु त्यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे असा कांगावा काॅग्रेस व विरोधी पक्षांनी करण्याची गरज होती का? देशाचे संविधान सार्याच धर्मीयांना समान धार्मिक स्वातंत्र्य देण्याची हमी देते की नाही? लोकशाहीत बहुसंख्याकांच्या हिताचा विचार होणे गैर आहे का? १९८९ साली केंद्रात वि. पी. सिंहांच्या सरकारला भाजपाने पाठींबा दिला होता. त्यांनी राम मंदिरासाठी प्रयत्न केले नाहीत. कारण अल्पसंख्याक नाराज होतील म्हणून. त्यांनी मतासाठी मंडल आयोगाचं भूत काढले. का ? तर दलीतांच्या मतासाठी. लालकृष्ण अडवाणींनी राम मंदिरासाठी काढलेल्या रथयात्रेला अडवून त्यांना अटक केले. कशासाठी? मुस्लीमांच्या मतासाठी. भाजपाचे तत्कालिन अध्यक्ष श्री लालकृष्ण अडवानींची रथयात्रा अडविण्यासाठी तत्कालिन बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव (दोघेही वी पी सिंहांचे समर्थक) वाजवीपेक्षा अधिक आतूर झाले होते. वस्तुतः ह्या दोन्ही मुळच्या समाजवदी नेत्यांमध्ये लालकृष्ण अडवानींचा रथ अडविण्याची तुबंळ स्पर्धा होती. अडवाणीची रथयात्रा बिहारमार्गे अयोध्या येथे जात असतांना रथयात्रा अडविण्याची पहिली संधी लालूप्रसाद यादवांना मिळाली. ती त्यांनी संधी साधली. 

रामजन्मभूमी संबंधीत खटल्यात राजकारण चिघळले ह्याला जबाबदार तत्कालीन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव आहेत. मुलायमसिंह यादवांनी विश्व हिंदू परिषदने अयोध्येत आयोजित केलेल्या करसेवामधील कार्यकर्त्यांवर लाठीमार, अश्रुधूर व गोळीबार केला होता. राम मंदिराच्या प्रश्नासाठी हिंदूचे रक्त स्वराज्यात सांडले गेले. अल्पसंख्याकांचा मसीहा होण्यासाठी राजकारण इतके हीन पातळीवर आले होते की भाजपाला आपल्या अजेंड्यावर रामजन्मभूमीचा प्रश्न घेण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली. तत्कालीन पंतप्रधान वी पी सिंह ह्यांना अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये अडविली काय किंवा उत्तरप्रदेशमध्ये अडविली काय ह्यासंबंधी फरक पडत नव्हता. कारण आपले सरकार पडले आणि पुन्हा निवडणूक आल्या तरी मंडल आयोगामुळे फायदा होणार्या जातीची मते मिळतील अशी आशा वी पी सिंह ह्यांना होती. शिवाय अडवाणींचा रथ अडवून मुस्लीम समाजाची एक गठ्ठा मताची तजवीज झालीच होती. हिंदू समाजाने उत्स्पुर्तपणे अडवाणींच्या रथयात्रेला प्रतिसाद दिला होता. Congress was no where in race of electrol politics at that junction. म्हणून भाजपाने व्ही पी सिंहच्या सरकाराचा पांठीबा काढून घेतल्यानंतर काॅग्रेसने श्री चंद्रशेखरांना सरकार बनविण्याचा पांठींबा दिला. चंद्रशेखर पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर राम मंदिर व मंडल आयोगाच्या अमंलबजावणीच्या निर्णयाने तापलेले वातावरण पुर्वतत झाले. परंतु चंद्रशेखरांनी राम मंदिराच्या प्रश्नात दिखाऊ का असेना पण लक्ष घालण्याची सुरूवात केल्यानंतर आपल्या सोयीने दुसरेच कारण देऊन काॅग्रेसने श्री चंद्रशेखरांच्या सरकारचा पांठीबा काढून घेतला व मुदतपुर्व निवडणूकीसाठी सज्ज झाला. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधीची  दुर्दैवी हत्या झाली नसती तर भाजपा त्याचवेळी सत्तेच्या नजीक पोहचली असती.

मुळात रामजन्मभूमी समस्याबाबत राजकारण प्रथम काॅग्रेसने केले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या सरकारने शहाबानो प्रकरणी मुस्लीम महिलेला तलाखानंतर पोटगी देण्याचा कोर्टाचा निर्णय रद्दबादल करण्याची गरज काय होती? आज मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश करणारे तथाकथीत विचारवंत, राजकीय विश्लेषक, संपादक, पत्रकार, डावे, पुरोगामी मंडळी त्यावेळी बुरखा घालून झोपले होते. केवळ मुल्ला-मौलवींच्या दबावा खाली येऊन काॅग्रेसने न्यायालयाचा निर्णय फिरविला. ह्याहून न्यायव्यवस्थेत अतिक्रमण करण्याचे मोठे उदाहरण कुठले होते? भाजपाकडे तर केद्रातील सत्ता नव्हती. न्यायालयाला कमी लेखण्याचे काम ह्या आधी स्वतःची निवडणूक कोर्टाने रद्दबदल केली तेव्हा राजीव गांधीच्या मातोश्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी केले होतेच. मग राजीव गांधी 'माॅ से बेटा सवाई ' झाले त्यात नवल ते काय? राजीव गांधींनी केवळ मुस्लीम पुरूषांना खुष केले. मुस्लीम बायकांवर त्यांच्या पतींची दडेली होतीच त्यामुळे आपल्या पक्षाची मुस्लीम मते इनटॅक्ट राहणार होतीच. पण हिंदूनांही खुष ठेवण्याची गरज भासली. त्यातून अयोध्या येथे राम मंदिराचा शिलान्यास केला. तो केवळ देखावा ठरला. हिंदू समाजाला विभाजीत करून ठेवावयाचे आणि मुस्लिम समाजाला गोंजारीत जावे. हा खेळ काॅग्रेस तसेच मित्र पक्ष खेळत आले. काॅग्रेसचा एक होरा आहे तो म्हणजे हिंदू समाज राम मंदिराच्या प्रश्नाबाबत सुस्त होत जाईल. काही अंशी काॅग्रेसचा अंदाज खरा ठरला व काॅग्रेसला २००४ ते २००९ पर्यंत मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्ता मिळाली. पण ती सतत मिळत राहील असा समज काॅग्रेस सकट सर्वच विरोधी पक्षांना कधीतरी भोवणार होताच.

काॅग्रेस व इतर भाजपेतर पक्षांचे सततचे अल्पसंख्यांना गोंजाविणारे धोरण हळूहळू महागात पडत गेले. पुढे १९९२ साली संतप्त हिंदू कारसेवकांनी बाबरी जमीनदोस्त केली. बहुसंख्याकावर अन्यायी धोरण राबविल्यामूळे देशभर जे जिल्हे, तालूका, खेडी, घराणे, कुटुंबं, जी काॅग्रेसची हमखास मतपेटी होती ती भाजपाच्या तसेच महाराष्ट्रात शिवसेनेच्या झेंड्याखाली आली आहेत. (मी स्वतः १९७५ ते१९८३ पर्यंत राजकारणात कार्य केल्यामूळे माझ्या नजरेत हा फरक स्पष्टपणे जाणवला आहे) ही ना लाट आहे, ना क्रान्ती. ही एक उत्क्रान्ती हिंदू समाजामध्ये झालेली दिसत आहे. भले संघाचं रचनात्मक कार्य भाजपाला उपयोगी पडत असलं तरी जरासी कुठे हिंदू समाजाच्या सणासूदावर टिका झाली, किंवा दशहतवाद्यांना मानवी हक्काच्या नावाखाली सवलत दिली गेली तर सोशल मिडीयावर युवक वर्ग तथाकथीत सेक्यूलर पक्षांना धारेवर धरताना दिसत आहे.ही सारी मंडळी संघ वा भाजपा समर्थक आहेत असे नाही. सोशल मिडीयावर गांधी घराण्यासंबंधी अनेच पोस्ट अधून-मधून व्हायरल होताना दिसत आहे. त्यात सत्यांश असो वा नसो पण ह्यातून देशातील बहुसंख्यांक हिंदु समाजात बर्यापैकी संख्येने काॅग्रेस आणि भाजपेतर पक्षासंबंधी दिसत असलेल्या रोषाचे प्रतिबिंब दिसतेच ना ! ते योग्य की अयोग्य ह्या विषयी मतदाराला धारेवर धरता येत नाही. 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंह असताना, त्या राज्याचे जे मुख्य सचीव होते त्यांनी अलीकडे त्यांच्या पुस्तकात रामजन्मभूमी खटल्यासंबधीतील राजकरण कसं खेळलं गेलं ह्याची माहिती पत्रकांरामोर सांगितली. त्यांनी लिहलेल्या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीना म्हणजे १९७५-७६ काळातच भारतीय उत्खलन सर्वेने सादर केलेला अहवाल दडपविला. त्यात स्पष्टपणे सिध्द केलं आहे कि ज्या ठीकाणी बाबरी मस्जीद होती, तिथे खाली श्रीविष्णु ह्या हिंदू देवाचेच मंदिर होते. ही माहीती गुप्त ठेवण्यात आली हे ही त्यांनी मिडीयासमोर सांगितले. देशाच्या मानबिंदू संबंधीच्या बाबतीत किती धोकादायक राजकारण काॅग्रेस आणि इतर पक्षांनी केलं, ह्याचा अंदाज बांधता येतो. श्रीराम जन्मभूमी संबंधीचं श्रेय संघ आणि भाजपालाच मिळू शकते. कारण संघ परिवाराने ह्यासंबंधी जनजागरण अभियान छेडलं. अनेक स्वयंसेवकांनी त्यासाठी लाठ्या खाल्या, प्राणाची बाजी लावली. तुरूंगवास भोगला. भाजपाने तर आपल्या जाहिरनाम्यामध्ये अयोध्यात  भव्य श्रीरामाचं मंदिर उभारू असे वचन दिलं आहे. त्यानुसार भाजपा प्रयत्न करीत राहणारच. ह्यात वावगे काही नाही. 


एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवळकर गुरूजींनी भाषणात सांगितले की "मी भारतमातेची पूजा करीत आहे. माझ्या शेजारचा पाट रिकामी आहे. त्यावर अहिंदूनेही येऊन बसावे व पूजा करावी." ह्या विचाराने श्री राम मंदिर बांधणे म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी रामभक्त कबिराचा धागा रक्षाबंधनाकरिता वापरण्यासारखे आहे. ही भावना आपल्या अंतःकरणात ठेवून सर्व पक्षकाराने, सर्व राजकीय पक्षाने सहमती दाखविली तर निवाडा न्यायालयाच्या बाहेर होऊ शकतो. परंतु मुस्लीम लाॅ बोर्ड तयार होईल की नाही ह्याबाबत कपील सिब्बल सांशक आहेत. कारण बाबरी ढाचा पाडल्या गेल्यानंतर तत्कालीन काॅग्रेसचे अध्यक्ष व पंतप्रधान स्वर्गीय नरसिंहरावांनी  तिथेच मस्जीद बांधून देण्याचे आश्वासन दिलेले आहे ना. 

रामजन्मभूमीसंबंधीचा खटला आता फार काळ प्रलंबीत ठेवता येणार नाही अशी भावना सर्वोच्च न्यायालयाला झालेली होतीच. त्यामुळेच हा खटला निर्णयासाठी टेबलवर आला, आणि नमाजासाठी मशीद आवश्यक नसते ह्यावर आज शिक्कामोर्तब केले. न्यायालय ना राम मंदिर बांधण्यासंबंधी निर्णय देणार, ना मशीद बांधण्यासंबंधी पर्याय मांडणार. न्यायालय रामजन्मभूमीसंबधीच्या खटल्यावर निर्णय देताना जिथे बाबरी मशीद होती ते हिंदू देवताचं मंदिर होतं आणि ते हवे तसे पाडून तिथे मशीद बांधली, ह्या घटनेसंबंधीशी निगडीत असलेल्या पुरावाच्या आधारे जमीनीचा मालकी हक्कासंबंधीचा निर्णय देणार आहे. शेवटी कायद्याचा अर्थ लावण्याचे काम त्यांना संविधानाने दिले आहे. लोकशाहीत Judiciary can do no wrong हेच तत्व प्रमाण मानणे सर्वसंबंधितांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 


शेवटी राजकारणातल्या खेळींचं विश्लेषण आणि भाकीत व्यक्त करणे हे राम भरोसे आहे, असेच समजू या. त्यात हा रामजन्मभूमी खटल्याचा प्रश्न, प्रदीर्घ काळ रेंगाळलेला, देशातील राजकारण ढवळून काढलेला. त्यामुळे भाजपा विरूद्ध भाजपेतर पक्षात जोरदार लढाई सुरू झाली तर नवल वाटू नये. भाजपेतर पक्ष आपल्या सवयीप्रमाणे मुस्लीम बांधवांना भडकविण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. भाजपा आपले नेहेमीचे राजकारण रेटत राहील. रामजन्मभूमी खटल्याचा निकाल काहीही आणि कधीही लागो, देशाचे राजकारण जे भाजपाभोवती केंद्रित झालेलं आहे, त्यात फारसा फरक पडणार नाही. दुसरे असे की, मुस्लीम पर्सनल लाॅ बोर्ड Out Of Court तोडगा मान्य करीत नाहीतच. ही त्यांची अपरिहार्ता आहे. कदाचित कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागणार नाही हे ही त्यांना माहीत आहे. पण Out of Court तोडगा स्विकारला तर त्या बोर्डावरील सदस्यांना कायमचं घरी बसावे लागेल. म्हणजे मान, मानधन सारं बंद. कोर्टाच्या निर्णयाने पराभव झाला, तर त्यांची नालायकी सिध्द होत नाही. श्रीराम न्यासाची मंडळी Out Of Court तोडग्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणेच अधिक पंसत करीत आहेत. कारण त्यांना गमवावयाचे काही नाही. तसेच निकालही आपल्या बाजूने लागणार अशी खात्रीही असावी. त्यात भाजपाचं राजकारण आहे असे ज्यांना वाटते त्यांनी तसे समजावे. वस्तुस्थिती ही आहे की सारेच पक्ष आपआपले राजकारण रेटत राहतील. बघु या, न्यायालयात पुढील सुनावणी कशी चालली जाईल, आणि त्यानुसार आपण ही चर्चा पुढे रेटत ठेवू.

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

आपण व आपली दैवते - (ध्येय हाच देव)



गणपतीसाठी गावी (नालासोपारा -- नाळा) गेलो होतो. रविवारी जेष्ठागौरी पूजनाच्या दिवशी मी मागविलेली पुस्तके घेऊन माझा मित्र राजू नाईक माझ्या घरी सकाळी साडे अकराच्या सुमारास आला. तो पुस्तकप्रेमी आहे. त्याच्या पत्नीच्या विरार (प) येथील मुद्रा प्रकाशनाच्या व्यवसायात आणि छोट्याशा पुस्तक डेपोत मदत करतो. तसेच स्वयंसेवी संस्थांचेही कामे करीत असतो, ते ही स्वतःची नोकरी सांभाळून. पुस्तके देतानाच तो म्हणाला, "मी फार घाईत आहे. एका संस्थेच्या सांयकाळी होणार्या बैठकीच्या तयारीसाठी जावयाचे आहे, थांबत नाही."  सर्वत्र गणेशोत्सव जोरात साजरा होत आहे, आणि हा माझा मित्र एका समाजसेवी संस्थेच्या कामासाठी जाण्याच्या घाईत आहे हे पाहून मी चकीत झालो. मी ना त्याला चहाचा आग्रह धरला, ना माझ्या घरच्या गणपतीच्या दर्शनाचा आग्रह केला. त्याला जाऊ दिले. त्यावर आभार मानत तो जितक्या वेगात माझ्या घराच्या पायर्या चढला, त्याहून अधिक वेगाने पायर्या उतरत गेला. एकंदरीत समाजाच्या स्थितीवर विशेषतः युवक वर्गाबद्दल विचारवंत व समाजशास्त्रज्ञ नाराजीचा सुर आळवत असताना, माझ्या मित्राची स्वयंसेवी संस्थेच्या कामासंबंधीतील धावपळ आणि ती ही सणासुदींच्या दिवसात पाहून ऊर भरून आला. ध्येयाने वेडे होणे म्हणजे काय आणि ते ही वैयक्तिक उन्नतीसाठी नाही तर समाजाच्या भल्यासाठी ह्याचं उदाहरण प्रत्यक्ष डोळ्याने पाहावयास मिळाले. माणसे दुसर्याच्या भल्याचा, समाजाच्या भल्याचा विचार का करतात ह्या संबंधीचे उत्तर शोधताना केवळ त्यांच्या आई-वडीलांचे संस्कार एवढ्यावर थांबून माझे समाधान होई ना. विचार करता करता अचानक छोटा गंधर्वांचे शिष्य उदयराज गोडबोलेंनी गायलेले 'देह देवाचे मंदिर' हे गीत आठवले. कोडे सुटले. ध्येय म्हणजे देव आणि त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी झटणे म्हणजे भक्ती. मंदिरातील देवाला प्रसन्न करण्यासाठी जसे ध्यान आवश्यक असते तसेच आपल्या देहातील देवाला प्रसन्न करण्यासाठी ध्येय आवश्यक असावे अशी खात्री होत गेली. त्यातूनच ह्या विषयावर संवाद साधण्याचा हा प्रयत्न. 

धर्म, ज्ञान, यश, ऐश्वर्य, वैराग्य, पुरूषार्थ, पराक्रम, सौंदर्य ह्या आठ गुणांना भग म्हणतात. हे गुण ज्याच्यापाशी असतात त्याला भगवान म्हणतात. ह्या सर्व गुणांची जोपासना करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यात विराजमान असलेल्या आत्मिक शक्तीची वाढ करण्याची एक उत्तम साधना होय. कारण हे सारे गुण दैवी शक्तीची रूपे आहेत.

वर नमुद केलेले गुण परस्परांना पुरक आहेत. एका गुणाची जोपासना करता करता आपोआप आपल्यात दुसर्या गुणाची निर्मिती होत जात असावी. आपण देवाच्या नावाचा जप करण्यासाठी जशी माळ निर्मिली तशीच सृष्टीत ईश्वराने गुणांची माळ गुंफली असावी. एका माळेवरून हात सरकला की दुसर्या गुणाकडे आपोआप जात असावा. एक पेशीतून दुसरी, तिसरी पुढे अनेक संपूर्ण स्वतंत्र पेशी तयार होत जातात, तद्वत ही गुणांची उत्त्पती असावी. आपली धरती माताच अनेक गुणांची खाण आहे. आपल्या संस्कृतीत धर्म ह्या संज्ञातच सारे गुण सामाविलेले असतात आणि अधर्म म्हणजे सारे दुर्गुण. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत, 
धर्म संस्थापनार्थाय सम्भवामी युगे युगे ||

देव जाणण्याची मानसिक प्रक्रीया आपल्यात जन्मतःच विराजमान आहे हे मी मागच्या लेखात पटवून दिले आहे. म्हणून तर सांगावेसे वाटते कि वरील सर्व गुणांची जोपासना करण्याची पहीली पायरी म्हणजे आपल्या देहाला देवाचे मंदिर मानणे. म्हणजेच ध्येयवादी बनणे होय. मुलतः प्रत्येक व्यक्ती चांगली असते. जन्मतः मुल निरागस असतेच. आर्य चाणक्य म्हणत असत 'अयोग्यः पुरूषः नास्ती |' आपल्या हातून काहीतरी चांगले साधावे अशी इच्छा जेव्हा प्रबळ बनते तेव्हाच आपल्या मनीं कुठल्या तरी ध्येयाचा जन्म होत असावा. ध्येय हे देवासारखे पवित्र असावे लागते. कुणाचे तरी अहित करण्याची इच्छा म्हणजे ध्येय नव्हे. ती आसुरी वृत्ती. गुरूपूजन म्हणजे काय ह्यावर प्रवचन देताना पुजनीय पांडुरंग शास्त्रीजी सांगतात, " गुरूपुजन म्हणजे ध्येय पुजन. गुरूचे जीवन ध्येयमूर्तीसारखे असते. ध्येयाला साकार रूप असते. ध्येय जीवनात आले की संयम बळावतो. संयम बळावला की शक्ती संग्रहीत होत जाते आणि या शक्तीनेच आपण ध्येयाजवळ पोहोचतो आणि शेवटी त्याचा साक्षात्कार होतो." शास्त्रीजींचे बोल म्हणजे संताचे बोल. म्हणून ध्येयाला देव मानण्यास काही प्रत्यावाव नसावा असे वाटते.

जिथे सारे ऐश्वर्य एकटवलेले आहे, तो देव. व्यक्तीगत जीवनात प्रामाणिकपणे ऐश्वर्य प्राप्त करण्याचे ध्येय असणे ही बाब आपल्या संस्कृतीने गैर मानले नाही. जीवनाचे अंतिम ध्येय ऐहीक आणि परलौकीक उन्नती असेच आपण मानले आहे. म्हणून आपले अगस्ती ऋषी महालक्ष्मीचे स्तुती गाताना म्हणतात, 

पांडीत्यम् शोभते नैव न शोभन्ते गुणः नरे |
शिलत्वम् नैव शोभते महालक्ष्मी त्वया विना ||
(अर्थ--- मनुष्य विद्वान असला आणि सोबत तो धनवान असेल तरच त्याच्या पांडीत्याला अधिक झळाळी येते. अंगिभूत असलेले गुण आणि शील सुद्धा भरपूर धनदौलत असली की अधिक शोभिवंत बनतात) 

एक भोळा सज्जन लाकुडतोड्या होता. तो रोज जंगलातील लाकुड तोडून आपला व आपल्या पत्नी आणि मुलांचा उदरनिर्वाह करीत असे. जंगलातून परत येते वेळी एका साधूची सेवा करायचा आणि मग घरी जायचा. तो साधू त्याच्याशी प्रेमाने गोष्टी करायचा. त्या लाकुडतोड्याची इच्छा होती की आपल्या मुलाबांळानी चांगले शिकावे, मोठे व्हावे. एके दिवशी तो साधुला म्हणाला, "महाराज, ह्या लाकुडतोडीच्या धंद्यातून फारशी कमाई मिळत नाही. मला काही उपाय सुचवा." साधु महाराज म्हणाला, " हे बघ बेटा, केवळ इच्छा ठेवून तुला हवे असलेले मिळणार नाही. जे तुला हवे आहे, त्याचा तुला ध्यास लागला पाहिजे. तु तुझे ध्येय निश्चीत कर. चाकोरी जीवनातुन बाहेर पड. लाकुडतोड्याने विचारले, "म्हणजे काय महाराज?" साधुने उपदेश देत म्हटले, "तु पुढे जात जा. सतत पुढे जाण्याचा क्रम ठेव. मी सुद्धा सतत माझ्या ध्यानाची जागा बदलत असतो. थोड्या दिवसानंतर मी दुसर्या वनात जाणार आहे." दुसर्या दिवशी लाकूडतोड्या पुढच्या जंगलात गेला. ते तर सागाच्या झाडाचे जंगल होते. आता सागाच्या लाकडातून त्याला मोठी कमाई मिळू लागली. त्याने हाताखाली कारागिर नोकर ठेवावयास सुरूवात केली. साग लाकडाचे फर्निचर बनविणे सुरू केले. पैसा दामदुपटीने येऊ लागला. चांगले ऐसपैस घर बांधले. मुलांना शिक्षणासाठी शहरातील शाळेत पाठविले. गावात त्याचा लौकिक वाढला. एक शेठजी म्हणून आसपासच्या परिसरात त्याची ओळख झाली. आता त्याला नावीन्याचाही ध्यास लागला. तो थांबला नाही. आणखिन पुढच्या जंगलात जाऊ लागला. ते तर चंदन वृक्षाचेच जंगल होते. चंदनाच्या लाकडातून वेगवेगळ्या उदबत्त्या, धुप औषधे बनविण्याच्या कंपन्या सुरू केल्या. त्याचे नाव देशभरातील प्रमुख उद्योगपतींमध्ये गणले जाऊ लागले. सरकार दरबारातही त्याचा मान वाढला. तो थांबला नाही. पुढच्या जंगलात काय आहे ते पाहण्यासाठी जाऊ लागला. पण पुढे जंगल संपले. पुढे फक्त महासागर. पण पुढे जावयाचे होतेच. दोन बोटी खरेदी केल्या. महासागर धुंडाळून टाकण्यासाठी तज्ञ खलाशी व इंजिनियर्सना हाताशी धरले. अथक प्रयत्न सुरू झाले. तो शेठजी रोज खलाशी आणि इंजिनियर्सचे काम संपेपर्यंत थांबायाचा. का तर ध्येयाने त्याच्या देहाच्या नसानसात प्रवेश केला होता. शेवटी महासागराच्या विशिष्ट भागात ऑईल सापडले. रिफाइनरी सुरू केली. पेट्रोल, डिझेल कंपन्या काढल्या. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख उद्योजक आणि ऐश्वर्यवान म्हणून ओळखला जातो. व्यक्तीगत जीवनात ध्येयालाच देव मानून त्यानुसार कार्यरत झाले की अंशात्मक का होईना ऐश्वर्यवान देवाचे दर्शन कसे होते हे ह्या कथावरून समजते. ही कथा काल्पनिक असली तरी अनेक उद्यीगपतींच्या जीवनचरीत्राशी मिळती-जुळती आहे. 

परंतु ज्या समाजात, ज्या राज्यात, ज्या देशात आपण वाढलो ते ऐश्वर्यवान न झाले तर मग आपण ईश्वराची अधिकाधिक अनुभूती कशी अनुभवणार? आज अमेरिकेला आपण पृथ्वीवरील स्वर्ग का मानतो? परमपित्याच्या ऐश्वर्याची अधिक अनुभूती घ्यावयाची असेल तर व्यक्तीगत जीवनाच्या उन्नतीच्या पलीकडे जाण्याचे ध्येय उराशी बाळगावे लागते. कारण तो परमपिता चराचर सृष्टीत व्यापुनही दशांगुळे वर उरतो. त्याचे दर्शन ध्येयरूपात अधिक स्पष्टपणे पाहावयाचे असेल तर आपल्याला अधिक व्यापक व्हावे लागेल तसेच ध्येयाची व्याप्ती वाढवावी लागेल. कोणीतरी त्याग केल्याशिवाय, ना समस्त समाजबांधवांचे भले होते, ना देशात स्वर्ग निर्माण होतो. मग त्याग कोणी करावयाचा? कोणी तरी करतातच ना ! का करतात? हाच तो प्रश्न, माणसे दुसर्याच्या, समाजाच्या, भल्याचा कसा काय विचार करतात, जो मी सुरवातीला मांडला आहे. ह्या लेखातील चर्चेचा केंद्रबिंदू. आता त्याकडे वळू या.

जगभरातल्या प्लेटो, हेगेल, अॅडम स्मिथ, टाॅलस्टाॅय, थाॅमस हाॅब्ज, मार्क्स, इत्यादी विदेशी समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञांच्या साहित्याचाही ज्यांनी अभ्यास केला आहे असे प्राध्यापक प्र ग सहस्त्रबुद्धे , वैचारिक लिखाण करणार्या लेखकापैकी एक सिद्धहस्त लेखक. ते म्हणतात " एक मनुष्य दुसर्या मनुष्याचा विचार का करतो, आणि त्याने तो का करावा, यासंबंधी भारतवर्षात अतिप्राचीन कालापासून जो विचार विद्यमान आहे तो अधिक मूलगामी आणि निर्दोष वाटतो. भीती, स्वार्थ, करार, अहंकार,दयाबुद्धी, परलोकभय, केवळ ह्या कारणांमुळे मनुष्य व्यापक विचार करीत नाही, तर स्वतःच्या व्यापकतेचा ज्या ज्या प्रमाणात त्याला साक्षात्कार घडतो त्या त्या प्रमाणात तो दुसर्याचा विचार करतो. 'अणोरणीयान् महतो महीयान्' अशा परभेश्वराचा अंश असल्यामुळे त्याला स्वतःच्या विशालतेची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जाणीव होते, आणि तो दुसर्याचा विचार करतो. हृदयातून शुद्ध होऊन निघालेला रक्तकण ज्याप्रमाणे सगळ्या शरीराला माझे म्हणतो, तद्वत आत्मानुभूती झालेला मनुष्य सगळ्या समाजाला आपले म्हणतो." 

म्हणूनच अनाथ मुलांना नाथ कसा मिळेल, कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदवन कसे फूलेल, वनवासी बांधवांना जीवनात राम कसा वाटेल, भटक्या, विभूक्ती जनजातींना स्थैर्य कसे मिळेल, व्यसनाआहारी गेलेल्यांना भक्तीच्या मळ्यात कसे यावयास वाटेल, इत्यादी सुरवातीला वेडगळ वाटणार्या कल्पना, अनुक्रमाने सिंधुताई सकपाळ, स्वर्गीय बाबा आमटे, राष्ट्रीय स्वयंसेवकांचे जेष्ठ कार्यकर्ते व विश्व हिंदू परिषदेचे स्व माधवराव काणे, भटक्या व विभूक्त जनजाती परिषदेचे व संघाचे जेष्ठ कार्यकर्ते गिरीष प्रभूणे, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते स्व पांडुरंगशास्त्रीजी, इत्यादींनी प्रत्यक्षात साकारल्या ना ! आपआपल्या क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या जीवनाची होळी करून समाज बांधवासाठी स्वर्ग उभे केले ना ! 

प्राध्यापक सहस्त्रबुद्धेच्या म्हणण्याचा सारांश हाच की व्यापकता ही जन्मतः आपल्यात असते. जो जितक्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी जपतो तितके त्याचे ध्येय व्यापक बनते आणि तितक्या प्रमाणात तो श्रेष्ठतेच्या उंचीवर जातो. म्हणजेच त्याची देवा विषयीची अनुभूती वाढत जाते. आपण जन्मलो आणि चालू लागलो, बोलू लागलो असे होत नाही. आपले जन्मदाता आई-वडील, काका-काकी, मामा-मामी, आत्यांजी-आत्या, आजी-आजोबा, इतर सगे-सोयरे ह्यांच्या प्रेमातून आपली वाढ होत जाते. पुढे शाळेत जाणे सुरू झाले की गुरूजन, आपले संवगडी. नंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षण, तेथील मित्र. नोकरी-व्यवसायात आपल्याला ज्यांचे सानिध्य लाभते ते सहकारी व अधिकारी. ज्ञाती संस्था, सहकारी संस्था, सरकारी संस्था, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक उत्सव इत्यादींच्या सानिध्यामुळे आपण परिपक्व होत जातो. आपल्या जन्मापासून ते अंतिम यात्रेपर्यंत ही नात्याची साखळी आपल्या भोवती असते तिलाच संक्षिप्त रित्या समाज, आणि देश असे मानले जाते. जग, विश्व, परलोक इत्यादी हे प्रवासाचे पुढचे टप्पे आहेत. 

ऐश्वर्य हे केवळ आर्थिक प्राप्तीचा निकष लावून मोजवयाचे नसते. मनाची श्रीमंती, वर्तणूकीची श्रीमंती, वैचारिक श्रीमंती, शारिरीक व मानसिक शक्ती, संयम, शांती, इत्यादी बाबी ऐश्वर्यदर्शक असतात. ह्याशिवाय समाज, राज्य, देश इत्यादींचे ऐश्वर्य मोजण्यासाठी एखाद्या राज्यात वा देशात ज्ञानदान व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, न्याय व्यवस्था, राजकीय व्यवस्था, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था, सहिष्णूता, शांती, इत्यादी समाधानकारक आहेत का,  प्रत्येक क्षेत्रातील कारभार आणि त्यातून दिसणारी पारदर्शकता, नागरिकांचे व नेत्यांचे चारित्र्य,  सेनादले, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील तत्परता, शेती-उद्योग, पशुधन, ऊर्जा व अन्न निर्मिती ह्या सर्व बाबीं देवरूपी ऐश्वर्याची अनुभूती मिळू शकतील अशी परिमाणे वा निकष आहेत. कारण मानव ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे, आणि ही सृष्टी अधिक सृजन करण्याची जबाबदारी मानवाची आहे. सर्वांगिण विकास हेच खरेखुरे ऐश्वर्य मग ते व्यक्तीचे असो वा समाजाचे वा एखाद्या संस्थेचे. आपले ध्येय जितके व्यापक व उच्च, तितके आपण भगवंताचे दर्शन घेण्यास अधिक पात्र होतो. इंग्रजीत म्हटले जाते Low aim is crime. समर्थ रामदास स्वामीनी म्हटले आहे, " उत्कट तेचिं घ्यावे | मिळमिळीत अवघे टाकावें ||

जय योगेश्वर !

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

सबाह्य अभ्यंतरीची पूजा (स्वच्छता - एक देवता)



आज ॠषिपंचमी. समाजाला सुसंकृतपणाचे धडे ज्यांनी गिरविले, अशा ऋषीमुनींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिन. वैदिक काळाच्या इतिहासाची पाने वरच्या वर जरी चाळली, तरी आपल्याला आढळून येते की प्रत्येक ऋषींनी आपाआपले आश्रम स्थापन करून समाजाला प्रथम 'अन्नं बहु कुर्वीत |' असे सांगत अन्नधान्याची वाढ करण्याचे कौशल्य शिकविले. सोबत वस्त्र आणि निवारा ह्या आणखिन मुलभूत गरजा कशा भागवयाच्या ह्याचे शिक्षण दिले. पुढे वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता आणि निरोगी आरोग्यासंबंधी धडे दिले. सकाळी झोपेतून उठल्यावर प्रातःविधीपासून ते रात्री झोपेपर्यंतचे दैनंदिन जीवन आनंदमय कसे करावे ह्या बाबतचे ऐहीक व परलौकीक नियम लोकांना अवगत केले. 'नायमात्मा बलहिनेन लभ्यः| (दुर्बलांना ईश्वर भेटत नाही) असा शाश्वत सिद्धात पटवून समाजाला बल व शक्तीची उपासनाही शिकविली. सुरक्षासाठी शस्त्रे -अस्त्रे चालविण्याचे शिक्षण, विविध विद्या, कला-संगीत-नृत्य, छंद-व्याकरण, उद्योग-व्यापार, न्यायशास्त्रे, तर्कशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी संबंधीचे ज्ञान देण्यासाठी गुरूकुल व्यवस्था उभी केली. आपण जे काही मिळवितो, उपभोगतो ते सारे निसर्गाच्या कृपेने ह्याची जाणीव समाजाच्या मनीं ठासविण्यासाठी काही उत्सव साजरे करण्याची पंरपंरा निर्माण केली. निसर्गाप्रती कृतज्ञता व समरसतेचा भाव ठेवत एक सुसंस्कृत जीवनशैली निर्माण केली, जी आज जगभर हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते. ह्या जीवन पद्धतीचा आधार ईश्वर आहे. म्हणून सारी कर्मे ईश्वराला अर्पण करण्याची दिक्षा समाजाला देण्यासाठी ऋषीमुनींनी ईश्वराचे विविध पद्धतीने असे काही वर्णन केले आहे की तो ईश्वर, जो दिसत नाही, तो जणू समोर उभा आहे असे वाटावे. त्यापैकी स्वच्छता-एक देवता ह्यावर आज चर्चा करू या.

ज्याच्या पायाशी सारं ऐश्वर्य, विराम पावते, त्या देवाला आपण नवस का करतो? देवाला काहीतरी वाहण्याचं कर्म का करतो? असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. निर्गुण रूपातला देव पाहणे आपल्या सारख्या सामान्यजनांच्या आवाक्याच्या पलिकडचे असते. म्हणून मुर्तीपुजेची कल्पना मांडण्यात आली. त्यामूळे मला फूल आवडते म्हणून देवाला फूल आवडते. मला स्नान आवडते म्हणून मी देवाला स्नान घालतो. हा भक्ताचा भक्तीशील आग्रह, म्हणजे श्रद्धेचा भाग झाला. कोणी म्हणतं, जिथे विज्ञान थांबते तेथून श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. 'सत्ये प्रतिष्ठत: धारणः सा श्रद्धा | ' (सत्य काय आहे हे जाणून घेऊन आचरण करणं म्हणजे श्रद्धा). हा झाला पहिला मतप्रवाह. तसे पाहता, विज्ञान सुद्धा एक प्रकारे सत्यच शोधत असते. श्रद्धेतून अंधश्रध्दा जन्मास येतात. हा झाला दुसरा मतप्रवाह. ह्यात सत्यांश नाही असे म्हणवत नाही. परंतु ह्या मतप्रवाहांपैकी देवाचे अस्तीत्वच नाही असे मानणारा एक पोटविभागही पहावयास मिळतो. तसेच विविध धर्मातील अंद्धश्रद्धां बाबत टिका करतांना पक्षपात करणारा, वा राजकीय फायदा-तोट्याचे गणित मांडणारा असा एक आणखिन वर्ग ह्या मतप्रवाहात निर्माण झालेला दिसतो. एक आणखिन पोट विभाग ह्या मतप्रवाहात आहे तो म्हणजे  स्वतःच्या धर्माच्या अनुयायींची संख्या वाढविण्यासाठी इतर धर्मीय विशेषतः हिंदू समाजापैकी लोकांना अमिष दाखविणारे महाभाग. तिसरा मतप्रवाह असा आहे की जो ह्या जगताला बाजारपेठ मानणारा आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की आजचं जग कितीही म्हटले तरी आर्थिक जगत आहे. 'One man's expenditure, is another man's income' (एका व्यक्तीचा खर्च हा दुसर्या व्यक्तीसाठी आर्थिक उत्त्पन्नाचा स्त्रोत होय) हा आजचा युगमंत्र. त्याची अवहेलना कशी करणार? ईश्वर सर्वत्र आहे हीच दृष्टी ठेवावी. देव-देवतांच्या मंदिरांच्या पायथ्याशी कोणी नारळवाला आहे, कोणी फूलवाला आहे, कोणी पुजेच सामान विकणारा आहे, कोणी प्रसाद म्हणून मिठाई विकणारा आहे, कोणी मंडपाचं काम करणारा, कोणी रंगकाम करणारा आहे तर कोणी मुर्ती बनविणारा आहे इत्यादींच्या हातांना काम व रोजगार मिळतो. ह्यांच्याकडून आपण हवे तसे देवपुजेचे सामान खरेदी करतो म्हणजे आपण ग्राहक. 'ग्राहक हा देव' ही एक व्याख्या आजच्या युगात मान्य पावलेली आहे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ह्या व्याखेस संमती दिल्याचे वाचण्यात आले आहे. ग्राहक म्हणून आपण पुजेचं सामान विकत घेतो आणि आपण पैसे देतो.' जो देतो तो देव' ही कल्पना नाकारता येत नाही हे ही तितकेच खरे. 

मुर्तीपुजेची गरज मांडली गेली त्यातूनच देव-देवतांची मंदिरे अस्तित्वात आली. हजारो-लाखो संख्येने  वेगवेगळ्या मंदिरात भाविकांची ये जा असते. त्या मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणे हे जसे प्रशासनाचे कर्तव्य आहे तसेच ते भाविकांचे आणि आसपासच्या हार-तुरे, प्रसादाचे जिन्नस विकणार्यापासून ते मोठमोठी दुकाने, हाॅटेल्स- लाॅज मालकांचेही कर्तव्य आहे. कारण सार्वजनिक ह्या शब्दातील सर्वजनात आपण स्वतः गणले जात असतोच.

मंदिराच्या आसपासचा परिसरच नव्हे तर आपल्या वस्ती भोवतालचा परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वसंबंधीतांनी नेकीने पार पाडली तर आपोआप मंगलमय वातावरण निर्माण होते. त्यातून आपले मन विकारपासून तर शरीर संसर्ग रोगापासून दूर राहते. शरीर विज्ञानामध्ये स्वच्छतेचा महीमा ठासून भरलेला आहे. परिसर स्वच्छ असला की साथीच्या रोगाचा फैलाव होत नाही. वैयक्तिक जीवनातही स्वच्छतेची सवय लावून घ्यावी. एकदा की मन स्वच्छ झाले की शरीर सक्षम बनते. सक्षम शरीर असले की बुद्धी तल्लक बनते. शक्ती आणि तल्लक बुद्धीच्या साह्याने आपले कर्म , कार्य चांगल्या तर्हेने पार पाडू शकतो. हे झाले शरीर विज्ञान. विज्ञानाप्रमाणे अध्यात्मातही स्वच्छतेचा कमालीचा आग्रह मांडलेला आहे. स्वच्छेतेचे महत्व मनावर ठसावे म्हणूनच आपल्या येथे केरसुणीला मान दिला जातो. दिवाळीला अन्य काही आणता आले नाही तरी केरसुणी अवश्य विकत आणतात. नवी केरसुणी आणली की तिला हळदकुंकू वाहतात. कारण देवाच्या अनेक नावापैकी 'स्वच्छता हे ही एक नाव मानले जाते. स्वच्छतेचे महत्त्व जसे विज्ञानाने सांगितले आहे तसेच अध्यात्माने ही स्वच्छतेचे महत्त्व विषद केले आहे. फक्त वेगळ्या शब्दात. 'हात फिरे तेथे लक्ष्मी वसे, असे म्हटले आहे. तेही पटते. अध्यात्मात शरीर विज्ञान 'आयुर्वेद ' ह्या नावाने ओळखले जाते. अलीकडे आयुर्वेदालाही सर्वत्र मान्यता मिळत आहे हे आपण पाहतोच.

केशरयुक्त दुध न घासलेल्या, गंजलेल्या, कळकटलेल्या, घाणेरड्या पेल्यात कोणाला प्यावयास दिले तर चालेल का? तसेच चकचकीत भांड्यात नासलेला पदार्थ ठेवला तर तो आपण खाऊ शकतो का? बाह्य शुद्धी आणि आंतरिक शुद्धी दोन्ही महत्वाच्या. आंतरिक शुद्धीसाठी प्राणायाम तसेच सत्संग, ध्यानधारणा आवश्यक मानले आहे. आज जगभर योग दिवसही मानला जात आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहेच, 

"आणि शौचहि निष्पाप|द्विविध जेथ|
मन भावशुद्धी भरलें|आंग क्रिया अळंकारिले|
ऐसें सबाह्य जियालें|साजिरें का||" .

एकदा एका रस्त्यावरून राजाची स्वारी जाणार होती. रस्ते झाडून धुऊन स्वच्छ केलेले होते. जागोजागी सुंदर कमानी उभारल्या होत्या. रस्त्यावरून राजा जाणार म्हणून दोन्ही बाजूस शिपाई उभे होते, ते कोणाला सडकेवर येऊ देत नव्हते. पण तेवढ्यात एक कुत्रे कोठून आले ते कळलेच नाही आणि सडकेच्या मधोमध घाण करून निघून गेले. ऐनवेळी काय करावे सुचत नव्हते त्या शिपायांना. राजाची स्वारी जवळ आली होती. वाद्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. तेथे उभ्या असलेल्या शिपयांपैकी एकाने रस्त्याच्या कडेवर असलेल्या दुकानातून ओंजळभर गुलाल आणून त्या घाणीवर ओतला. झाले; वेळ निभावली. राजाची स्वारी निघून गेली. मागाहून येणार्या एका भाबड्या माणसाने गुलाल पाहिला, पिशवीतून चार फुले काढली, वाहिली गुलालावर. तो दुकानदार मोठ्याने हसला आणि म्हणाला, "अहो वर फुले आणि गुलाल आहे पण आंत काय आहे?" 

ज्ञानदेवाने मांडलेल्या आंतरिक शुद्धीचं महत्व पटवून देणे हा उद्देश वरील कथेत दिसला आहेच शिवाय 'दिसला गुलाल, वाहा फुले' अशा मानसिकतेचाही समाचार घेतला आहे. अशा मानसिकतेमुळे रस्त्यावरील वळणावर किंवा चार रस्त्यावर मधोमध कुठे छोटे मंदिर, कुठे मुस्लीम बांधवांचा पार -मस्जीद वा कुठे ख्रिचन बांधवांचा क्राॅस दिसतात. ते ही जागोजागी. रस्त्यावरील वाहतूक खोळबंत सरकणार. डिझेल, पेट्रोलची नासाडी, जोडीला प्रदुषण आणि सार्वजनिक स्वच्छेतेचा बोजवारा. लोकांच्या धार्मिक भावना दुखविता येत नाहीत. कारण सर्वधर्मसमभाव. हा शब्द आपल्या देशाच्या राज्यघटनेत दुरूस्ती करून सामावला आहे. त्यावर इथे चर्चा नको. पण वरील कथेत राजा रस्त्यावरून जाणार असतो, म्हणून तो रस्ता आधीच पूर्णपणे चकाचक करून ठेवला होता, तसा अनुभव आजही आपल्याला येत असतो. राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान तसेच मंत्री रस्त्यावरून जाणार असतील तर पालिका असो वा जिल्हा परिषद खडबडून जागी होतात. रस्ता तात्पुरता चकाचक, खड्डे बुजवून गुळगुळीत, परिसर स्वच्छ, गटारी सुध्दा स्वच्छ केलीली असतात. पण ही तात्पुर्ती डागडूजी. अशी स्वच्छता दरदिवशी पहावयास कधी मिळेल हे फक्त तो देव जाणो. आजही आपल्याच नव्हे तर विकसनशील आणि अविकसीत देशात हजारो लाखो लोक पालिकेच्या, झेडपीच्या हद्दीत वर्षोनुवर्षे घाणीच्या नरकात राहतात. का?  दुसरा पर्याय नाही. गावे ओसाड अन् शहरं-नगरं बकाल. असे किती वर्षे चालणार? जोपर्यंत आपले मन स्वार्थाने बरबटले राहणार तोपर्यंत. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे "ज्या कर्मात दोन्ही प्रकारचे शौच असते ते खर्या अर्थाने पवित्र कर्म होय." अशा पवित्र कर्माचा आदर्श नेतेमंडळीने घालून दिला तर गावात, तालूक्यात, वार्डात, नगरात, शहरात सर्वत्र स्वच्छता-देवतेचं पदोपदी दर्शन घडेल. 

धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ. त्यांच्या प्राप्तीचं साधन आपले शरीर होय. म्हणून धर्मशास्त्रात 'शरीर माध्यम् खलू धर्मसाधनम्|' असे म्हटले आहे. घरंदारें स्वच्छ, की शरीर सक्षम, परिसर स्वच्छ आणि समाजही सक्षम होतो. पुढे आपोआप बौध्दीक तसेच शारिरीक कष्ट उपसता येतात. त्याच जोडीला मनाच्या शुद्धतेकडे लक्ष पुरवित गेले की 'कष्टापोटी असती फळे गोमटी' हे अनुभवयास येते. त्या गोमटी फळाचे नाव आजच्या आर्थिक जगतात पैसा हे होय. म्हणजेच 'हात फिरे तिथे लक्ष्मी वसे' ह्या सिध्दांताची अनुभूती मिळते. ह्याचा अर्थ हाच की ' जिथे सारं ऐश्वर्य विराम पावते तो देव ' थोड्या अंशाने का असेना अनुभवयास येतो. कोणीतरी म्हटले आहे 'दारिद्य्राचा उगम हा पैशाच्या अभावात नव्हे तर मानसिकतेतून होत असतो. सरकारी कचेर्या आणि खाजगी कंपनीच्या कचेर्या ह्यांच्यात स्वच्छते बाबतीत जमीन आसमानाचा  फरक का दिसतो. ह्याचे कारण असे की जे कोणी यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले त्यांनी स्वच्छता नावाच्या देवतेची भक्ती केलेली असते. स्वच्छता राखणे हे एक आचरण आहे. त्यामुळे त्याचा समावेश सदाचारात होत असतोच की. म्हणून जिथे सारा सदाचार एकवटलेला असतो तो देव अंशात्मक रित्या अनुभवयास येतो.

देव सर्वत्र आहे. ह्या सृष्टीतील कण न् कण ईश्वराचं आसन आहे. शरीर-मन, व्यक्ती-समाज, घर-अंगण, घर- गाव, गाव-तालुका, तालुका-राज्य, राज्य-देश सर्वत्र स्वछता असली पाहिजे. कारण ह्या जोड्या नसून एकाच गोष्टीचे दोन रूपे आहेत. आतंरिक आणि बाह्य स्वच्छतेची उपासना अविरतपणे सुरू ठेवावी. कारण प्रत्यक्ष माऊलीचे तसे सांगणे आहे.

जय योगेश्वर! 

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

आपण व आपली दैवते (देव म्हणजे काय?)


'आपण व आपली दैवते ' ह्या विषयावर 'काहीतरी लिहावे ' असे बर्याच दिवसापासून वाटत होते. हा विषय अति व्यापक आणि गहन. तितकाच अति संवेदनशील. त्यामुळे ह्या विषयावर काहीही आणि कसेही लिहीले तर चालणार थोडेच? म्हणून प्रथम ईश्वर चरणी प्रार्थना केली, 'बाबा रे तुच सांभाळून घे मला.' सोबत ज्यांच्या मुळे अध्यात्म विषयात गोडी उत्पन्न झाली असे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पुजनीय पांडुरंगशास्त्रीजी आठवले ह्यांची मनोभावे पुजा केली. पाठोपाठ ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला आणि गुरू पोर्णीमेला  ह्या दोन्ही शुभ दिवसांचे महात्म्य, जे पुजनीय शास्त्रीजींनी मांडले आहे त्यावर आधारीत ह्याच ब्लाॅगवर लेख पब्लीश केले. त्यामुळे ह्या विषयासंबंधीत असलेले मनावरील दडपण कमी झाले.

विठ्ठल-विठ्ठल नामाच्या गजरात तहान-भूक विसरून ऊन- पाऊस ह्यांची तमा न बाळगता वर्षानु-वर्षे पंढरीची वारी करणार्या एखाद्या वारकर्याला  देव-देवतासंबंधीचे जितके ज्ञान आहे, त्यातील एका कणाएवढेही ज्ञान माझ्यापाशी नाही. हे प्रांजळपणे आपल्यासमोर कबूल करतो. ह्या विषयावर मी जे लिहीन, त्यातील आपल्याला जे म्हणून काही आवडेल ते माझे नाही हे आपण जाणताच. कारण ते सारं आपल्या देशात, ह्या जगात होऊन गेलेल्या आणि कार्यरत असलेल्या अध्यात्म विषयावरील महामेरूंचे आहे. जे काही कंटाळवाणे आणि  खटकणारे वाटेल त्यासंबंधीचा दोष हा सर्वस्वी माझा आहे.  मानवी जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यु ह्यामधील प्रवास होय. भगवान श्रीविष्णुच्या षोडषनाम स्त्तोत्रात 'प्रवासे त्रिविक्रमम' असे म्हटले आहे.  हा प्रवास कुठपर्यंत? फक्त तो देव जाणो. 'सतत भंगवंताचे नाम  मुखी ठेवा' असा आपल्या संताचा उपदेश आहे. तो उपदेश निदान ह्या लेखमालिकेच्या निमित्ताने का असेना मी पाळायला सुरवात केली आहे अशी  माझी भाबडी समजूत आहे. त्यातूनच ह्या संवादमय लेखमालिकेचा प्रंपच मांडला आहे. प्रथम देवाच्या विविध व्याख्या व स्वरूप  लिहण्याचे ठरविले आहे. नंतर संतमंडळी आणि थोर पुरूषांना झालेली  देवाची अनुभूती ह्या विषयाकडे वळेन. पुढे हळूहळू देवाच्या अवताराच्या पाठीमागील वैज्ञानिक तसेच  सामाजिक प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. एकूण ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. म्हणून अधूनमधून ह्या लेखमालिकेवर लिहणार आहे. ही  लेखमालिका कुठपर्यंत सुरू राहील,  ह्याबाबत मी पामर काय सांगणार? कर्ता-करविता तो देवच आहे. आपली साथ मिळत राहो अशी प्रार्थना करतो आणि ह्या लेख मालिकेला सुरवात करतो.

हरि ओम् ! नमस्कार !
देव हा संस्कृत भाषेतील शब्द. देव म्हणजे तेज. ह्या विश्वाची उत्पत्ती एका तेजगोळ्याच्या स्फोटाने झाली असे विज्ञान म्हणते. ह्याचा अर्थ आपल्या अध्यात्मातील विश्वाच्या उत्पत्तीची कल्पना विज्ञानाशी मिळती जूळती आहे असे दिसते. संपूर्ण ब्रह्मांडावर नियंत्रण करणारी एक शक्ती आहे ह्या पलीकडे आपण सामान्यजन देवा संबंधी अधिक काही बोलू शकत नाही. 'जो आपल्याला संकटात, दुःखात तारतो तो देव.' तसेच 'जो देतो तो देव' अशी आपली धारणा. आपली संत मंडळी म्हणतात, " देव आपल्या हृदयात स्थिर असतो. देव सतत चांगले ते आपल्याला देत असतोच पण एक तर आपण चांगले घेण्यात कमी पडतो वा चांगले घेतलेले टिकवू शकत नाही." आपल्याच कर्मदारिद्र्यामूळे आपण चांगले घालवून बसतो. म्हणूनच 'दैव देते आणि कर्म नेते ' असा वाकप्रचार संभाषणात दृढ झालेला असावा. ह्याचा अर्थ आपल्या कर्मातही देव असतो हे ही ओघाने आलेच की.

सर्व प्राणीमात्रात जे चैतन्य आहे, ते एकच आहे. भगवंताने अर्जुनाला गीतेत म्हटले आहे,
               ईश्वरः सर्व भूतानां हृदेशेऽर्जन तिष्ठती !
          (मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थिर असतो)
ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे,
               जे जे भेटें भूते ते ते मानीले भगवते !
इतक्या परम कोटी दर्जाची अध्यात्मिक शक्ती आपल्या सारख्या सर्वसामान्यांत नसते. तरीही ' जे जे भेटें भूते ते ते मानीले भगवते ' ह्या संबंधीचा अनुभव आपल्याला दैनंदिन जीवनात येत असतो. आपल्या घरातील एखादा पाण्याचा नळ गळू लागला तर आपली चिडचिड सुरू होते. तसेच घरातल्या गिझरचे सर्कीट जळाले की तशीच आपली अवस्था. एक दोन दिवस घरातल्या कोणाही सदस्याला दैनंदिन रडगाण्यातून सवड मिळत नाही. आणि मग अचानक रविवारच्या सकाळी ओळखीचा प्लबंर वा इलेक्ट्रीशियन आपल्या घरी येतो, आणि त्याला पाहताच आपल्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडतात, 'बघ, तू आज कसा देवासारखा धावून आलास.' अशी कैक उदाहरणे देता येतील. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीत असलेला चांगुलपणा पाहून आपण त्याची 'देवमाणूस' 'देवभोळा' किंवा 'भोळा शंकर' अशी भलावणही करतो. ह्याचा अर्थ असा आहे की देवासंबंधीची ठोस व्याख्या भले आपल्याला करता येत नसली, तरी देव जाणण्याची एक मानसशास्त्रीय प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात तरी का असेना जन्मतः आपल्यात असावी. त्यामूळे तो देव चल की अचल हा प्रश्न आपल्याला उद्भवत नाही. तो अचल असला, तरी त्याचा वेग मानवी मनाच्या वेगाहून सहस्त्रपटीने अधिक आहे, असेच आपण मानतो. तो क्षणात येथे तर क्षणात विश्वाच्या पल्याडच्या अंनत अंतरावरील बिंदूमध्येही आहे. हे ही आपण स्विकारले आहे. देव दिसत नसल्यामुळे देवाचं अस्तित्व न मानण्याची वृत्ती ही आपल्यात येऊ शकते. पण ते ही आपण स्वाभाविक मानले आहे. हेच आपल्या संस्कृतीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य.

माझा एक मित्र; तो देव न मानणारा. पण नेहमी म्हणत असे की मी नियतीला मानतो. एकदा अशीच चर्चा सुरू असताना मी सहज त्याला विचारले, तु कधी नियतीला पाहिले आहेस? नियती तुला दिसते का? त्याने उत्तर दिले, 'नाही.' मी मुद्दा पुढे रेटत म्हणालो, " रस्त्यावरून चालताना मागे वळून पाहीले तर ठेंच लागते ना. रस्त्यावरून चालताना आपण सावधानी बाळगत नसतो, तेव्हा असे प्रकार घडतात. रस्त्यावर चालताना डावीकडून चालणे इत्यादी नियम आपणच  निर्माण केलेले असले तरी शेवटी रस्त्यावरील वर्दळीला एका व्यवस्थेत बसविणे हा प्रशासनाचा राजधर्म आहे असेच आपण मानतो. म्हणून तो एक समाजशास्त्रीय नियम झाला. तो आपण पाळला पाहिजे. कारण ' समाज ' हा ही आपण एक प्रकारे देवच मानला आहे. आपल्या संस्कृतीत एके ठिकाणी देवाच्या स्वरूपा संबधीचे वर्णन आहे, ते असे आहे, 
        ओम् सहस्त्रशीर्षः पुरूषः सहस्त्राक्षः सहस्त्रपात||
              स भूमिं विश्वतो वृत्वात्यातिष्ठद्दशांगुलम्||
(अर्थ ---- त्याला हजारो मस्तके, हजारो डोळे, आणि हजारो चरण आहेत. सकल प्राणीरूपाने अनंतशः अनंत अवयव धारण करणारा विराटसंज्ञक पुरूष सर्व भागी व्यापून दहा अंगुळे उरलाच आहे.)"

माझा मित्र शांतपणे ऐकत होता. बरं ते जाऊ दे, असे म्हणत मी त्याला विचारले, "एखादा माणूस रस्त्याच्या डाव्या बाजूला सायकल चालवित जात असताना पाठीमागून एखादी कार भरधाव वेगाने येते; ड्रायवरचा कारवरील ताबा सुटतो; आणि सायकलस्वाराला कारची धडक बसते. तो खाली शेतात पडतो, तोही अशा रितीने की त्याचे डोकेच एका दगडावर आपटते, आणि मृत्युमुखी पडतो. अशा गोष्टी घडत असतात की नाही?." माझा मित्र म्हणाला, 'हो घडतात'. मी म्हणालो, "मित्रा, सायकलस्वाराची काही चूक नसताना तो प्राण गमावितो. अशा वेळी मी म्हणेन, त्याचा काळ आला होता. तु म्हणशील हा नियतीचा खेळ. काळ आणि नियतीत काही फरक आहे का?" मित्र उत्तरला, 'बिलकूल नाही.' मी त्यावर म्हटले, "काळ हे ही देवाच्या अनेक नावापैकी एक आहे. कोणी त्याला काळ म्हणतात, कोणी महाकाळ. एकीकडे कधीतरी सुर्याची ऊर्जा संपणार असे विज्ञान म्हणते. तेव्हा जीवसृष्टी राहील का? नाही हेच उत्तर. तर दुसरीकडे अध्यात्म म्हणते, कधीतरी प्रलय होणारच.त्यावर पुष्टी म्हणून अध्यात्म सांगते ' ईश्वराच्या असतात तीन शक्ती; उत्पत्ती, स्थिति आणि लय. लय म्हणजे नाश.' ह्या उदाहरणात मृत्यु. शेवटी मृत्यु म्हणजे शरीराचा नाश. सायकलस्वारामध्ये प्राण होता, त्याचेच नाव आत्मा वा चैतन्य. आणि ते अविनाशी असते. तोच परमात्मा. आपल्यात परमात्माचा अंश असतोच  आता आपल्याला ना आत्मा दिसतो, ना परमात्मा. आणि नियतीही दिसत नाही. पण एवढ्यावरून देवाचं अस्तित्व नाहीच असे म्हणणे म्हणजे तू ज्या नियतीला मानतो तिचेही अस्तित्व न मानणे असेच ना. आपल्यात सुध्दा देवाचा अंश असतोच. त्याचं अस्तीत्व केवळ तपोबलानेच दिसू शकते. ते आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. पण देव दिसत नसला तरी आपल्या  आचरणाने वा कर्मातून आपल्याला देवाची अनुभूती येऊ शकते." ह्यसंबंधीचे एक दोन उदाहरणे कथाच्या माध्यमातून मी त्याला दिली. तरीही माझ्या मित्राचे मतपरिवर्तन झाले नाही. (वाचकांनी कृपया ह्याच ब्लाॅग वरील ३० मार्च २०१७ चा 'आपल्यातला देव' ह्या शिर्षकाचा लेख वाचावा. त्यामध्ये आपल्यात देव कुठल्या स्वरूपात असू शकतो ह्या संबंधीत कथांच्या माध्य्यामातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.) 

शेवटी मी माझ्या मित्राला आणखिन एक गोष्ट ऐकवली. एकदा एका राजाला देव आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर हवे होते. दरबारातील सारे विद्वान-पंडीत म्हणाले 'देव आहे.' राजाने म्हटले 'दाखवा मला'. सारे विद्वान-पंडीत गोंधळून गेले व लागलीच म्हणाले, "आम्ही देव दाखवू शकत नाही. आम्ही देव पाहीला नाही, मग आम्ही तुम्हाला कसा दाखविणार?" राजाने प्रधानाला सांगितले 'दवंडी पिटवा, प्रजेपैकी कोणी मला देव दाखवू शकतो का ते पाहू या.' झाले; दवंडी पिटविली. एका महीन्यात चार वेळा दिवंडी पिटविली गेली तरी राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रजेपैकी कोणी पुढे येईना. शेवटी राजाने ' जो कोणी मला देव दाखवील, त्याचा राजकन्येशी विवाह होईल ' असे जाहीर केले.

पंधरा दिवसाने एक युवक राजवाड्यात आला. प्रधानाने त्या युवकाचे स्वागत केले. दरबार भरला. राजा आपल्या सिंहासनावर बसला. त्याने युवकाला नाव, गाव विचारले, आणि थेट प्रश्न विचारला 'कुठे देव आहे , दाखव पाहू.' त्या युवकाने राजाला वंदन केले आणि तो उत्तरला, "महाराज, मी देव दाखविण्याऐवजी आपणांस देवाची शक्ती दाखविली तर चालेल का? राजा म्हणाला, 'दाखव की'. युवक म्हणाला 'माझी एक अट आहे.' राजाने अट विचारली. तो युवक म्हणाला, "महाराज, आपण सिंहासनवरून खाली उतरावे व माझ्या जागेवर बसावे. मी तुम्हाला सिंहासनावर बसून देवाची शक्ती दाखवू शकेन. राजाने अट मान्य केली. तो युवक सिंहासनावर बसला. राजा, राणी व राजकन्या तसेच दरबारातील मंडळी पुढे काय होणार, हे बघण्यासाठी आतुरलेले होते. युवकाने पाच मिनिट डोळे मिटून आपल्या इष्टदेवतेचे चिंतन केले आणि म्हणाला, "महाराज, देव कुठे आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याच प्रजाजनातील माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडून मिळावे यासाठी आपल्या सारख्या महाराजाला खाली बसावे लागले आहे आणि मी सिंहासनावर बसलो आहे. ह्यावरून महाराज, देवाची शक्ती कीती मोठी असेल ह्याची कल्पना करा. जिथे ह्या विश्वातील सारी शांती, दया, क्षमा, सत्य, दानधर्म, संयम, सद्भाव, सहकार, सहमती, सदाचार, शालीनता, प्रेम, करूणा एकटवलेले दिसते तो देव. सारे ज्ञान-विज्ञान, सार्या कला, विद्या, चातुर्य, सारं संगीत, सारे शोध-उद्योग, मानवाने साधलेला विकास, सारे ऐश्वर्य, ज्याच्या चरणाशी विराम पावतात तो देव. जिथे सारे धैर्य, शौर्य, कल्पकता, नाविन्यता, कर्तृत्व, निर्मीती, सारं बल, शक्ती, शस्त्रे, ज्याच्या पुढे थिटे पडतात तो देव. महाराज, आपण जो सुर्य पाहतो त्याहून कितीतरी लाखो पटीने ज्याचे तेज आहे, असा महाकाय, अंनंत कोटी ब्रह्मांडनायक जो आहे, तो देव. असा तो देव, त्याचे ते विराट रूप, त्याचे प्रचंड तेज पाहण्याइतकी तोला-मोलाची दृष्टी, आणि शक्ती आपल्याकडे आहे का? महाराज, कृपया विचारा हा प्रश्न आपण स्वतःलाच." इतके बोलून तो युवक थांबला. राजा जागेवरून उठला. थेट युवकाच्या दिशेने जाऊ लागला. आता पुढे काय होतेय, ह्याकडे दरबारात हजर असलेल्या सार्यांचे डोळे लागले. राजा त्या युवकाकडे पोहचताच युवक सिंहासनावरून उठतो. राजाने त्या युवकाला, प्रेमाने अलिगंन देत, शाब्बास असे म्हणत पाठीवर शाबासकी दिली. तो युवक पुढे काही म्हणायच्या आतच राजा म्हणाला, "हे युवका, मला तुझ्या धाडसाचे कौतुक आहे. आपला राजा अतार्कीक प्रश्न विचारीत असताही तु राजाच्या डोळ्यात अंजन घालायला बिथरला नाहीस. मी आज तुझ्यात देव पाहीला. तुझ्यातले धाडस, तुझा आत्मविश्वास, आणि तुझ्या वाणीतून मला देवाचे दर्शन झाले. हेच ते देवाचे रूप. मी तुझ्यावर प्रसन्न आहे." दरबारात टाळ्याचा कडकडाट झाला. युवकाने राजाला वंदन केले आणि सिंहासनावरून खाली उतरला. पुढे त्याचा राजकन्येशी विवाह झाला.

मी मित्राला म्हणालो, मित्रा, उत्तर मिळाले का? तो भानावर आला, व म्हणाला "देव आहे हे निश्चीत. पण त्याला पाहण्यासाठी कठोर तप करावे लागते. कच्च्या दुधापासून तुप तयार होत नसते. प्रथम दुध फार तापवावे लागते; मग त्याचे लोणी करावयाचे; लोणी फार घुसळवयाचे; लोणी भरपूर घुसळवून झाले की मंद आचेवर उकळावयाचे; लोणीवरील आपली नजर जराही ढिली होऊ न देता; मग आपल्या हाती तुप येते. देव प्रत्यक्ष पाहण्यासाठी शीव आणि जीव ह्यामधुन जीव वजा केला म्हणजे राहतो तो शीव, तोच देव. जीव वजा करीत जाणे म्हणजे आपल्यात विराजमान असलेल्या आत्मीक शक्तीची उन्नती करण्याच्या कामाला लागणे हेच होय. त्यात कसलाही हलर्गजीपणा नको वा आळस नको." एका तासापुर्वी देव न मानणार्या माझ्या मित्राचे उत्तर ऐकून मला त्याच्या उत्तरात देव दिसला.

जय योगेश्वर !

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

२०१९च्या निवडणूक प्रचारातील तुंबळ युद्धाचे ढग


डाॅ. नरेंद्र दाभोळकर आणि काॅम्रेड पानसरेच्या हत्यामागचे सुत्रधार शोधण्यात अखेरीस महाराष्ट्र सरकारच्या एटीएसला यश आले. आरोपी हे सनातन संस्थेचे कार्यकर्ते आहेत हे ही घोषीत करून सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. पाठोपाठ भीमा-कोरेगाव दंगलीच्या अगोदर पुण्यातील एल्गार परीषदेत भडकाऊ भाषणे देऊन पंतप्रधान मोदी ह्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करीत महाराष्ट्र पोलीस खात्याने डाव्या विचारसरणीच्या जेष्ठ नेत्यांनाही अटक केली. परंतु त्याबाबत न्यायालयाने अटक केलेल्या डाव्या चळवळीच्या नेत्यांना पोलीस कस्टडी ऐवजी त्यांच्या घरात नजरकैदीत ठेवण्याचा निर्णय दिला. ह्या दोन्ही घटनेनंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रिन्ट, इलेट्रानिक्स, आणि सोशल मिडीयावर उलट-सुलट प्रतिक्रीयांचा पूर आलेला दिसतोय. तिथे केरळला निसर्गाच्या तांडवाने थैमान घालून आतापर्यंत कधी झाली नव्हती इतकी जिवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. तिथेही युएई सरकारने सातशे कोटीची मदत केरळ सरकारला देऊ केली होती आणि भारत सरकारने ती मदत नाकारली आहे, ह्या कथित बातमीवरून भारतीय मिडीयाच्या अवकाशातही उलट-सुलट आरोपाचं थैमान सुरू झालेले आहे. ह्या तिन्ही घटनांवर सारासार विचार करून मतैक्य साधण्याचा प्रयत्न संबंधित सरकार, विविध संस्था, राजकीय पक्ष, मिडीया ह्यांनी करावयास हवा पण तसे घडत नाही आणि घडणारही नाही. कारण ह्या सार्या घटना २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारातील तुबंळ युद्धाचे ढग आहेत. त्यात दिवसेंदिवस आणखिन ढगांची भर होत जाणार.

केरळ राज्यातील पूरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती आहे. स्वातंत्र्यानंतर आजपावेतो ज्या ज्या राज्यात नैसर्गिक आपत्ती ओढावली त्या राज्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकार सतत धावले आहे. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी वेळोवेळी नैसर्गिक आपत्तींचा जातीने आढावा घेऊन युद्ध पातळीवर उपाययोजना आखल्याचा एक छान पायंडा आपल्या देशात पाडलेला आहे. नैसर्गिक आपत्तीत आपले राज्य सापडलेले असते तेव्हा त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे सारे लक्ष आपत्ती निवारण्यात असावे लागते आणि केरळचे मुख्यमंत्री आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यात गर्क असणारच ह्याबाबतच शंका घेण्याचे कारण नाही. परंतु त्याचसोबत अशा आपत्तीच्या काळात युएई सरकारकडून मिळण्यात येणार्या सातशे कोटीच्या आर्थिक मदतीत मोदी सरकार आडकाठी करीत आहे असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या आरोपाची भाषा डाव्या पक्षाच्या नेंत्यांनी करावी हे त्यांनीच पाठींबा दिलेल्या डाॅ. मनमोहनसिंगच्या सरकारने तयार केलेल्या धोरणात बसते तरी का? नैसर्गिक आपत्तीत परकीय देशाची आर्थिक मदत न घेण्याचे धोरण हे सर्वपक्षीय निर्णयाचे फलीत आहे. असे माहीत असूनही खोट्या मदतीची अफवा उठवावयाची आणि मोदी सरकारने तशी मदत नाकारली असा धादांत खोटेपणा मिडीयात दाखविला गेला, ही २०१९च्या निवडणूकीत मोदी सरकार विरूद्ध जनमत तयार करण्याची निव्वळ एक राजकीय संधी साधली गेली आहे. केरळी बांधवाच्या मदतीसाठी देशभरातून सर्व थरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केरळमधील सरकार पक्षाचे कार्यकर्ते बिनभोबाट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या घडवितात. दशहत पसरवितात. त्याच संघाचे स्वयंसेवक केरळमध्ये प्रत्यक्ष पुरग्रस्त जिल्ह्यात तळमळीने मदतकार्य करीत आहेत ते ही धर्म जात, राजकीय विचारसरणीसारखा भेदभाव न करता. हे भारतीय लोकशाहीचे भूषण नव्हे काय? लौकरात लौकर केरळवासीयांचे जीवन पुर्वपदावर यावे अशी देशवासियांची इच्छा आहे. त्यामुळे ह्या विषयावर राजकारण करणार्यां व्यक्तींना, राजकीय पक्षानां वा संबंधित मिडीयांना देशवांधव फारसे गंभीरपणे घेतील असे दिसत नाही. 

डाॅ. दाभोलकरांच्या हत्त्यासंबधीत संशयितांना अटक झाली आहे. त्याबद्दल फडणविस सरकार आणि महाराष्ट्र पोलीस खाते अभिनंदनास पात्र आहेत. एकंदरीत फडणवीस सरकारचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार पेक्षा चांगला आहे. भाजप सरकारविरूद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरण ऐकू आले नाही. सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकरांनीही टिव्ही चॅनेलवरील एका चर्चेत भाग घेतांना फडणवीस सरकारची स्तुती केली आहे. परंतु त्याच मेघा पाटकर, डाव्या चळवळीतल्या नेत्यांना अटक झाल्यानंतर फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्च्यात सामील झालेल्या दिसल्या. थोडेफार वैचारिक साधर्म्य असल्यामुळे मेघा पाटकरानांही डाव्या चळवळीतल्या नेत्यांच्या समर्थनार्थ मोर्च्यात सामील होणे आवश्यक वाटले असावे. परंतु एकदंरीत त्यांची कार्यपद्धत डाॅ. लोहीया, मधु दंडवते, मृणाल गोरे ह्याच्यांसारखीच असल्यामुळे उच्चभ्रू वस्तीत वावरणार्या, आणि मिडीयांशी संधान बाधून सतत चमकणार्या तथाकथीत डाव्या विचारवंताप्रमाणे बेजबादारपणा त्यांनी कधी केलेला आढळत नाही. ज्यानां अर्बन नक्षलवादी म्हटले जाते अशा सर्वांना डाॅ. मनमोहनसिंगाच्या सरकारच्या काळातही सरकार विरूद्ध चिथावणी देण्याच्या आरोपाखाली चौकशी व अटक  झालेल्या आहेतच. मुळात अशा सर्व विचारवंताना समाजाशी काही घेणं-देणं नसतेच. उच्चभ्रू राहणीमान असलेली ही मंडळी आपल्या घरातील, कार्यालयातील नोकर-चाकर आणि ह्यांच्या खाजगी वाहनांचे ड्रायव्हर मंडळींना समतेची वागणूक देतात का असा प्रश्न मिडीयावाले ह्यांना विचारणार नाहीत. कारण मिडीयातील मंडळीही विदेशी पैशावर पोसलेली आहे. मेघा पाटकरांसारख्या निस्सिम समाजवादी मंडळी साधी राहणी आणि उच्च विचारसरणीच अवलंबित असतात. त्यांच्या कार्यपद्धतीत हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडाफोडीसारख्या कृत्यांना स्थान नसते. मार्क्सवादी आणि माओवादी चळवळ ह्यांचा अंहिसेवर विश्वास नसतो. मुळात ही मंडळी धर्म अफूची गोळी मानतात. पण इथे भारतात ही मंडळी इस्लाम धर्मीय आणि इसाई धर्मीय बांधवांचा कैवार घेतात. हिंदूत्व पक्ष आणि विचारसरणीच्या लोकांना ही मंडळी आपले कट्टर शत्रू मानतात. ह्याचे कारण हिंदूत्व हेच ह्यांच्या विचारसरणीला, ह्यांच्या एक पक्षीय कारभारास मोठा अडथळा वाटतो. म्हणून हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षांविरूद्ध सोयीनुसार आघाडी करीत असतात. जगात सर्वत्र कामगारांचे राज्य आणण्याचे ह्यांचे स्वप्न. भांडवलशाहीच्या विरोधात आग ओकणे हे ह्यांचे ब्रीद. पण शेवटी आर्थिक उदारीकरण आणि जागतीकरण ह्यांनाही स्विकारावे लागलेच ना. आता तर ह्यांच्या पक्षांचे वरिष्ठ नेतेच चीन आणि रशिया मध्ये भांडवलदार झाले आहेत. चीनमध्ये सर्वसाधारण कामगांराचे हाल कुत्रा खात नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचे पुसटचे नावही नाही. प्रसारमाध्यमे फक्त सरकार मालकीची. इथे भारतात ह्यांचेच सुभेदार व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रवचन देत असतात. लोकशाहीत आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार त्यानां आहे ह्याबाबत दुमत नाही पण ह्यांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मजल देशविरोधी घोषणा आणि कृत्ये करण्यापर्यंत जाते. हा कुठला मानवाधिकार आला? हातात शस्त्र आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यार्या कुठल्याही पक्षाच्या अंदोलकांना सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद करून त्यांच्या शरीरामधील रग विधायक कामाला लावण्यात आली तरच देशातील युवाशक्तीला फितविण्याचे उद्योग बंद होतील. आपल्या राजकीय विरोधकांना पशूसारखी वागणूक देणारी ह्यांच्या बापज्यादांची नीती कुठल्या धर्मात क्षम्य मानली आहे? 

वस्तुतः डाॅ दाभोलकर, काॅम्रेड पानसरे, ह्याच्या हत्येबाबतच्या तपासातील विलंबाचा दोष फक्त फडणवीस सरकारला देणे योग्य नाही. तसेच डाव्या चळवळीतल्या नेत्यांची धरपकड, ही सुद्धा युपीए सरकारच्या कारवाईचाच एक नवा अध्याय आहे. हे ही मान्य करावे लागते. सनातन संस्थेचे कार्यकर्ते असो वा डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते असो, ह्यांच्या संबंधित पुरावे नव्याने शोधण्याचे काम विद्यमान सरकारची यंत्रणा करू शकते मग भले त्यात सरकार पक्षाची राजकीय चाली आहेत असा आरोप झाला तरी त्यासंबंधातही आरोपी किंवा संशयितांच्या वकीलांना पुरावे न्यायालयात देण्याची संधी तर मिळणार आहेच. जेव्हा न्यायालय पुरावे मागेल, तेव्हा मोदी सरकाराविरूद्ध असलेले पुरावे द्या. उगीच मोदी सरकारवर मनाला येईल त्याप्रमाणे मोदी सरकार राजकारण खेळत आहे, असा आरोप करण्याने काय साध्य होणार आहे? शेवटी न्यायप्रविष्ट विषया संबंधीत मिडीयातील किंवा सोशल मिडीयातील उथळ चर्चेचा न्यायपालिकेवर काही परीणाम होत नाही. आपली न्यायव्यवस्था एकंदरीत सचोटीने वागते असे समाजमानसास पटते हे तर कोणी नाकारू शकत नाही.

दुसर्या बाजूला जगातील विशेषतः पाश्चीमात्य आणि अमेरिकासारखे देश लोकशाही आणि मानवधिकाराच्या गप्पा मारत असले तरी ह्या मंडळीचाही इतिहास सामाज्यवादी राहीला आहे. आज जरी प्रत्यक्षात दुसर्या देशावर राज्य करीत नसले तरी हे सारे देश येनकेन प्रकारे जगातील विकसनशील आणि अविकासित देशात अस्थिरता निर्माण करून आपल्या सोयीच्या लोकांना वा पक्षांना सत्तेवर बसवितात. किंवा आपल्या बहूराष्ट्रीय कंपन्यांमार्फत इतर देशात आर्थिक साम्राज्य निर्माण करीत असतातच. सोबत ह्याच्यांच कंपन्याच्या विविध एनजीओ सेवेच्या नावाने त्या त्या देशाचे मानबिंदू, सांस्कृतिक प्रतिके इत्यादी गोष्टी विरूद्ध विष कालवित असतात. सेवा हा धर्म आहे.पण धर्माच्या नावाने वा अमिषाने केलेली सेवा हा एक प्रकारे अधर्मच होय. ब्रिटिशांनी आपल्या देशाची फोडा आणि झोडा ही नीती अवलंबून फाळणी केली. अरब लोकांनाही हाताशी धरून ज्यु लोकांच्या कत्तली केल्या. ज्यूनां हद्दपार केले. मध्यपुर्वेतही फोडा आणि झोडा हीच नीती अमेरिकासह ही युरोपियन देश अवलंबीत आहेत. एकेश्वरीय धर्म मानणारे जमाती म्हणजे इस्लाम आणि ख्रिश्चन. आपआपल्या धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या स्पर्धेतून रक्त सांडलेल्या ह्या जमाती. परंतु भारतात ही मंडळी एकी करून हिंदू समाजाला विभाजीत करण्याचे प्रयत्न करतात. इमाम असो वा फादर मंडळी राष्ट्रवादी पक्षांना निवडणूकीत पराभव करा असे फतवे काढतात. तरीही मोदी सरकारने अघोषित आणिबाणी आणली असा आरोपही करीत असतात. ह्यांना हे स्वातंत्र्य आपल्या थोर राष्ट्रपुरूषांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या भारतिय संविधानानेच मिळाले आहे की नाही? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या थोर पुरूषांनी त्याग केला ह्यांच्यापैकीच नेत्यांनी देशाचे संविधान तयार केले आहे. ह्या सर्वांनी उभारलेला स्वातंत्र्यलढा अंहिसा आणि क्रान्ती अशा दोन भिन्न मार्गातला असला तरी ह्या सर्व नेत्यांची विचारसरणी राष्ट्रवादीच होती. म्हणून धर्माच्या नावाखाली निवडणूकीत मते देण्याचे फतवे आणि पत्रके काढणे आणि राष्ट्रवाद्यांचा पराभव करा असे आवाहन करणे हा राष्ट्रद्रोह होतोच की.

एकंदरीत जगात आजही बळी तो कान पिळी हाच न्याय दिसतो. साम्यवादी चीन असो वा लोकशाहीवादी अमेरिका असो, आपल्या देशात त्यांच्या हिताचे सरकार नसले की त्यांचे पित्त खवळणार. इतिहास जेते देश लिहीतात. जर्मनीचा दुसर्या महायुद्धात पराभव झाला. पण गोबेल्सचे तंत्र जिंकले आहे. कारण सर्वच बड्या राष्ट्रांनी ते अवलंबिले आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञानातील अद्भूत क्रातीमुळे गोबेल्सचे तंत्र किती ताकदवान झाले आहे ह्यांचा अंदाज सायबर क्राईमच्या घटना, आर्थिक घोटाळे आणि मिडीयातील फेक न्युजवरून थोडाफार तरी बांधता येतो. आजकाल आपल्या देशात ज्या काही घटना घडतात आणि पुढे ज्या घडतील त्यात राजकारणच आहे आणि असणार. मोदी सरकार विरूद्ध निकराची लढाई लढण्याच्या अनेक क्लुप्त्या विरोधी पक्ष वापरतील. देश-विदेशातील लाॅबी असणार. कुठल्याही देशातील निवडणूक व प्रचार मोहीम ही फक्त त्या देशापुरता मर्यादीत राहील ह्याची शाश्वती देता येत नाही असा एकूण आजच्या जागातिक राजकीय पटलावरील ट्रेंड आहे. त्याबाबत आपल्यासारख्या सामान्यांना फार खोलवरचे काही दिसणारे नसते.

पण ज्या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत, त्या मांडून ह्या लेखाची समाप्ती करतो. पहीली गोष्ट म्हणजे आजही पंतप्रधान मोदीच्या तोडीचा नेता इतर पक्षात नाही. दुसरे असे की भाजपासारखी संघटनशक्ती इतर पक्षात दिसत नाही. १९९७-९८ च्या दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विचारवंत बॅरीस्टर विठ्ठलराव गाडगीळ ह्यानी इशारा दिला होता की "काँग्रेसला हिंदू समाजाला दुखाविणे परवडणारे नाही." काँग्रेस श्रेष्ठीने दुर्लक्ष केले. कोणी कितीही भाजपावर बहुसंख्याकांच्या धृवीकरणाचा आरोप केला तरी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांनी जे म्हटले आहे त्यात तथ्य असल्याशिवाय भाजपाची ताकद वाढली नसतीच. तब्बल दहा वर्षे युपीएच्या नावाने सत्ता उपभोगली. पण २०१४ च्या निवडणूकीत काँग्रेस विकलांग झाली, सोबत विरोधी पक्षांचे राज्यातील स्वयंभू जाणते नेतही विकलांग झाले. साम्यवाद्यांना उदारमतवादी सोमनाथ चटर्जीना पक्षातून काढून टाकण्याचे पाप भोगावे लागत आहे. उदारमतवादी नेता म्हणून अटल बिहारी वाजपेयीचा केवळ मुखाने गौरव करीत त्यांचे सरकार एका मताने ज्यांनी पाडले होते त्याची किंमत मुलायम- मायावती-शरद पवार इत्यादी मंडळीना मोजावी लागत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचाराच्या काळात असे ऐकू आले होते की नरेद्र मोदीच्या प्रचारसभांना मिळणारा प्रतिसाद पाहून शरद पवारांनी मोदींना बारामतीत प्रचारसभा घेऊ नये अशी विनंती केली होती. त्रिपुरा, नागालॅन्ड, मेघालय, आसाम इत्यादी ईशान्य भागात मिशनरी असो वा साम्यवादी वा सर्वधर्मसमभावी मंडळी ह्यांची दुकाने बंद झाली आहेत. देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चीम भागात विरोधी पक्षांचे नामोनिशाणही राहील की नाही अशी स्थिती दिसत आहे. केरळ, बंगाल येथूनही ह्या मंडळीच्या पायाखालची जमीन हळूहळू का होईना सरकू शकेल असे दिसते. ह्या देशाच्या कुठल्याही भागात इथल्या मातीतील सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीत मान्य पावलेला सेवा धर्मच स्थायी विकास घडवून आणू शकतो. ना डाव्याच्या रक्तरंजीत क्रान्तीने ना धर्मातंराच्या अमिषाने हे जनमानसाला पटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विधायक कार्याने लोक प्रभावित होत आहेत हे ही स्पष्टपणे दिसत आहे. कर्नाटकात महाआघाडी लाईफ सर्पोटवर आहे. तेलंगण, तामीळनाडू आणि आंन्ध्र प्रदेशातही भाजपला मित्रपक्ष मिळू शकतात आणि बर्यापैकी यश मिळू शकते. दोनदा सरकार पडूनही अटलजीनांच पंतप्रधान ठेवण्याची भाजपाची नैतिकता २०१४ साली पुर्णपणे फळास आली. आज ते अटलजी आपल्यात नाहीत. पण त्यांची "अधेंरा मिटेगा, सुरज निकलेगा और कमल खिलेगा " ही घोषणा भारतीय राजकरणाच्या अवकाशात आणखिन काही वर्षे दुमदुमत राहणार असेच दिसते.

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

आसाममधील घुसखोरी आणि गृहयुद्धाचा फार्स




आसाम मधील नागरिक नोंदणीचा अंतिम मसुदा जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे बांगला देशातील घुसखोरीचा आकडा जाहीर झाला. १९७१ साली पाकिस्तानातल्या गृहकलहातून पुर्व पाकिस्तानातल्या नागरिकांवर होणारा अत्याचार आणि तेथून आपल्या देशात येणार्या निर्वासितांचे लोंढे, पाहता माणुसकीच्या न्यायाने आपल्या देशाला युद्धात पडावे लागले. युद्धात आपला विजय झाला. पाकिस्तान देशापासून पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगला देश निर्माण झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या खंबीर नेतृत्वाची देशभर प्रशंसा झाली. तापलेल्या तव्यावर पोळी न भाजणारा एकही राजकीय पक्ष जागतिक क्षितीजावर उगवलेला नाही आणि उगवणारही नाही. कारण हे कलीयुग आहे. स्वाभाविकपणे पंतप्रधान इंदिरा गांधींनी मुदतपूर्व निवडणूका घेतल्या. भारतीय जनतेने काँग्रेसला न भूतो न भविष्यती असा विजय देऊन पुन्हा सत्तेवर बसविले. वाटले होते असे की बांगला देश आपल्या उपकाराबद्दल कायम कृतज्ञ राहील. परंतु बांगल देशाचे परराष्ट्र धोरण नेहमीच अस्थिर राहलेले आहे. त्या देशाला आपल्या देशापेक्षा चीनचा अधिक पुळका कधी येईल, हे सांगता येणार नाही. शिवाय अलिकडच्या काळात पंतप्रधान शेख हसीना यांचा हेफाझत आणि इतर प्रखर  इस्लामी संघटनांशी वाढता घरोबा काही लपून राहिलेला नाही.

आपल्या देशाचा इतिहास सांगतो की आपला चांगुलपणा सतत आपल्या अंगाशी आलेला आहे. पृथ्वीराज चौहान ह्या राजाने महमंद घोरी सारख्या परकीय आक्रमकाचा सतरा वेळा पराभव करून त्याला क्षमा केले. पुढे झाले काय? अठराव्या लढाईत पृथ्वीराज हरला आणि घोरीने त्याला हाल हाल करून मारले. तेव्हा घोरीला मदत करणारा जयचंद राठोड आपलाच. आपल्या देशातील राजे-महाराजांच्या आपआपसातील दुहीमूळे देश एक हजार वर्षे पारतांत्र्यात अडकला. कोणाच्या ताब्यात होता देश? धर्माच्या नावाखाली आपआपसात रक्त सांडणार्या दोन जमातींकडे. पहीले मुस्लिम व दुसरे ख्रिश्चन.  दोन्ही साम्राज्यवादी.

स्वातंत्र्य मिळाले. पण फाळणी होऊन. स्वतंत्र भूभाग दिला. सोबत एक्कावन कोटीची मदत दिली आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान निर्माण झाले. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? देशाची फाळणी होते वेळीच पाकिस्तानातील मुस्लिमांनी लाखो हिंदू लोकांच्या वर अत्याचार केले; मालमत्तेची नासधूस केली; बायका-मूलींची अब्रू लुटली आणि जे काही हिंदू बांधव जीव मुठीत घेऊन भारतात आले ते ही रक्ताने माखलेल्या फाटक्या कपड्यात निर्वासितांसारखे. जे ह्या हिंदूस्थानचे मूळ रहिवासी त्यांची अशी अवस्था झाली. आपल्या देशातून जे मुस्लिम लोक नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात गेले तेही स्वखुषीने. ह्या देशातल्या हिंदूनी त्यांना सन्मानाने पाठविले आणि जे इथे राहीले त्यांना तर पुरोगामी पक्षांनी लाडके पुत्र मानले. हा आपल्या समाजाचा आणखीन एक चांगुलपणा. परंतु त्यामुळे हिंदु कायर, डरपोक, काफर आहेत ही भावना पाकमधील मुस्लिम बांधवात होती तशीच ती इथल्या काही जिहादी मुस्लिम बांधवातही रूजली आणि त्यातून हुरियत, सिम्मी, व ओवेसींच्या AIMIM सारख्या संघटना फोफावल्या. अर्थात त्यांना विरोध करणारे राष्ट्रीय बाण्याचे मुस्लिम बांधवही देशात सुदैवाने आहेत ही जमेची बाजू. पाठोपाठ पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. आपले जवान सडेतोड प्रत्युत्तर देत असतानाही आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूनी चांगूलपणा दाखविण्याच्या नादात काश्मीर प्रश्न नाहक युनोमध्ये नेला. झाले काय? एक तृतियांश काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यातच राहिला. जगभर त्या भागाचे पाकव्याप्त काश्मीर असे नाव झाले. त्याच भागात पाकिस्तानने आपल्यावर वारंवार हल्ले करणार्या खतरनाक दशहतवाद्यांचा अड्डा बनवून ठेवला. म्हणून स्वातंत्र्यानंतर काश्मीर सतत धुमसतच राहिले आहे.

पंचशील तत्त्वाखाली पहीले पंतप्रधान पंडीत नेहरूनी 'हिंदी-चीन भाई भाई 'असे धोरण आखले. देशाच्या संरक्षणांसाठी ना भक्कम तरतुद केली, ना सीमा सील केल्या. झाले काय? १९६२ साली चीनने आक्रमण केले आणि हजारो मैलाचा भूभाग चीनने बळकाविला. १९६५ मध्ये पाकिस्तानने पुन्हा युद्धाची आगळीक केली. आपला विजय झाला. अफगाणसंबंधीत अमेरिका आणि रशियामध्ये शीत युद्ध होते त्या वेळेचा काळ तो. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धाचा शेवट तहाने झाला. कुठे तर रशियातील ताश्कंदला. आपण युद्धात मिळविलेला पाकिस्तानचा भूभाग परत केला. काय आले आपल्या हातात? त्या युद्धातील विजयाचे शिल्पकार तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींजींचा ताश्कंद येथेच अकल्पीत रित्या मृत्यु झाला; हादरलेल्या, भेदरलेल्या स्थितीत सारा भारत; शास्त्रीजींचा पार्थीव देहच काय तो पाहत राहिला. देशाच्या सर्वोच्च नेत्याचा परदेशात झालेला गुढ मृत्यू इतक्या सहजासहजी इतर कोणत्याही सरकारने मान्य केला नसता.

१९७१ साली बांगला देशाच्या निर्मीतीसाठी झालेल्या युद्धात विजय मिळाला. आपला फायदा काय झाला? शूर जवान गमाविले; युद्धात तिजोरी खाली झाली; आणि बांगला देशाच्या पुनर्निर्माणासाठीची तरतूद भरून काढण्यासाठी कितीतरी वर्षे प्रजेच्या खिशातून सार्वजनिक बस सेवेच्या तिकाटात पन्नास पैसे अधिक घेतले गेले. त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? बांगला देशातील नागरिक लाखोंच्या संख्येने भारतातल्या ईशान्ये कडील राज्यात बेकायदा रितीने कायमचेच वास्तव्य करण्यासाठी येऊ लागले. त्याच्यांसोबत त्यांच्या देशात ब्रह्मदेशातून येणार्या रोहींग्ये मुस्लीम तसेच पाक पुरस्कृत दशहतवादी ही ईशान्य भारतात घुसलेले आहेत. एकट्या आसाममध्ये ४० लाख बांगला देशातील मुस्लिम नागरिक बेकायदा रितीने घुसखोरी झाली असल्याचा अहवाल आता बाहेर आला आहे. हा आकडा तयार करतेवेळी काही खर्या भारतीय नागरीकावर अन्याय झालेला आहे पण ती प्रशासनीय कामातील चुक आहे असे म्हणत महाप्रबंधक आणि जनगणना आयुक्त शैलेश ह्यांनी भारतीय नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, त्यांच्या वरील अन्याय दुर केला जाईल अशी हमी दिली आहे. त्यामुळे केवळ त्या कारणाचं निमित्त करून ह्या आकड्यांचे राजकीयकरण करण्याचे विरोधी पक्षाचे विशेषतः तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, काँग्रेस पक्षाचे प्रयत्न समर्थनीय ठरू शकत नाहीत. साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांना ह्या घुसखोर्यामधील गुंडाची मदत ईशान्य भारतात निवडणूकात होत आलेली असावी, त्यामुळे त्यांचा आक्रास्तळेपणा होत आहे. परंतु काँग्रेस पक्षाने ह्याबाबतीत सुज्ञपणा दाखवावयास हवा. कारण ह्या समस्यासंबंधीचे गांभीर्य माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनाही कळले होते. परंतु ह्या दोन्ही नेत्यांनीही, ना सीमापार होणारा आंतकवाद थांबविला, ना घुसखोरी थांबविली. सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून पंजाब मधील खलिस्थान चळवळ मोडून टाकली. मग  मस्जीद, मदरेशात आंतकवादी लपले जातात, तिथे कडवा धर्माभिमान शिकवला जातो. तिथे का नाही लष्करी कारवाईचे धाडस दाखविले? ख्रिश्चन धर्मगुरूंना चर्च मधून राष्ट्रवाद्यांना निवडणूकीत पराभव करा असे पत्रक काढण्याची हिम्मत कोणाच्या पांठीब्यावरून मिळते? हिंदु समाजातील लोकांचे कुठे बळजबरीने तर कुठे अमिष दाखवून धर्मातंर केले जाते, तिथे लष्करी कारवाई करण्याचे धाडस का दाखविले नाही? 

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची सुरूवात मोदी सरकारने केली आहे. विरोधकांनी संसदेत भाजपा अध्यक्ष अमित शहांना बोलू न देण्यासाठी हवे ते करा, सर्वधर्म समभाव संकटात आहे असा टाहो कितीही फोडा, देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे अशी कितीही आदळआपट करा; विदेशी आर्थिक सहाय्य घेऊन, देशात विविध समस्यांचा पुरेसा अभ्यास न करता कितीही अंदोलने करून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करा, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करा; देशके टुकडे होगे हजार, हमें चाहीये आझादी, घर घरसे अफजल निकलेगा, अशा आक्रमक घोषणा देणारे, मेवानी-कन्हैया, कितीही निर्माण करा, माओवाद्यांनी सशस्त्र क्रान्ती करण्याचे सत्र आणखिन कितीही जोरात करा, पंतप्रधान मोदींना जितक्या शिव्या देता येतील तितक्या दिल्या, तरी आपली छाती ५६ इंचाची आहे तसेच हे राष्ट्र मिश्र संस्कृतीचे (अभिप्रेत अर्थ अल्पसंख्यांकाच्या लांगूलचालनापायी देशहित विसरणे) नसून मुलतः सर्वसमावेशक हिंदु संस्कृतीचे आहे ह्याचा सढळ पुरावा दिल्याशिवाय पंतप्रधान मोदी थांबतील असे दिसत नाही.

आता आपण म्हणाल, भाजपा राजकारण करीत आहे. परंतु वर नमूद केलेल्या देशापुढील समस्यांचे मूळ स्वातंत्र्य पुर्वकाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीत आणि रणनीतीत दडलेले आहे. लोकमान्य टिळक असे पर्यंत स्वराज्यासंबंधीची जागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती सारखे कार्यक्रम सुरू झाले. काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथम वंदे मातरम् गायल्या शिवाय कामकाज सुरू होत नव्हते. पण दुर्दैवाने लोकमान्य टिळक आपल्यातून निघून गेले. नंतर स्वराज्य लढ्याला सत्तातंराच्या मोहीमेच स्वरूप आले. मुस्लिम बांधवांना स्वातंत्र्य संग्रमात सामील करण्यासाठी खिलाफत स्थापनेचा संबंध स्वातंत्र्य संग्रामाशी जोडण्याची इच्छा काँग्रेसमधील अग्रणी नेते, महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरूनां कोठून उत्पन्न झाली देव जाणो. बस मुस्लिम लिग पेक्षा आपण कसे मुसलमानांचे खरे नेतृत्व करतो हे बिंबवण्यासाठी मुस्लिम बांधवांना गोंजरण्याची सुरूवात झाली. पुढे त्यांच्यातील धर्मांध हिंसक वृत्तीना वेळप्रसंगी आपल्या बलिदानाने बदलून घेता येइल का ह्याचे प्रयोगही झाले ( संदर्भ - गांधीजींनी देशाच्या फाळणी दरम्यानच्या काळात  हिंदूनिर्वासितांना केलेले उपदेश पहावेत). ती परंपरा आजतागायत सुरू आहे. गांधीजींच्या ठिकाणी महात्मा होण्यासारखी वैशिष्टे जरूर होती, त्याबाबत दुमत नाही. त्यांनी रामराज्याची कल्पना मांडली. अकबरराज्याची कल्पना मांडली नाही. महात्मा गांधीजींच्या त्यागा बद्दल शंका नाही. त्यातून प्रेरणा घेऊन अज्ञान व दुष्ट रूढी निर्मूलन, साक्षरता प्रसार, व्यसन मुक्ती, अस्पृशता निवारण, स्वच्छता स्वावलंबन इत्यादी कार्ये करता आली आणि केली जातही आहेत. पण एका हातात आत्यंतिक अहिंसा हे शस्त्र धरून दुसर्या हातात खिलापत चळवळ हाती घेत स्वतंत्र मतदार संघ मुस्लीम बांधवासाठी राखीव करण्यात का आले हे समजण्याच्या पलिकडचे ठरले. तरीही मुस्लिम नेते आणि बहुतांश मुस्लीम बांधवाची सत्तेची भूक आणि स्वतंत्र भूभाग मिळविण्याची आस थांबली नाही. ब्रिटीशांना आपली सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व मवाळ नेत्यांच्या हातात राहणे सोयीचे पडत गेले. त्यांनी सारी शक्ती फोडा आणि झोडा ह्या तत्त्वावर केंद्रीत केली. त्यांनी झोडपले कोणाला? तर प्रखर राष्ट्रवादाची लोकमान्य टिळकांकडून दिक्षा मिळालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखालील क्रातीकारांना. ना गांधीना झोडपले ना नेहरूंना झोडपले ना मुस्लीम लिगच्या नेत्यांना. अखेर धर्माच्या नावावर पाकिस्तान निर्माण झाले. त्यावेळी सच्चे गांधीवादी जयप्रकाश नारायण ह्यांनीही गांधीजी ऐवजी सरदार वल्लभभाई ह्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व असावयास हवे होते असे उद्गार काढले. थोर समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत अच्युतराव पटवर्धन ह्यांनी मुसलमानांच्या प्रश्नाबाबत महात्मा गांधीजी आणि पंडीत नेहरूंनी केलेल्या चुका दाखविल्या आहेत. साने गुरूजींनी भारतीय संस्कृती ह्या पुस्तकात वैदिक मंत्र तसेच रामायण- महाभारत हे आपल्या संस्कृतीचे धागे मानले आहेत. डाॅ राम मनोहर लोहियांची तीच धारणा होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीही हिंदू संस्कृतीशी नाळ असलेला बौद्ध धर्म त्याचमुळे स्विकारला. पाकिस्तान धर्माच्या आधारावर निर्माण झालेले नाही. ते निव्वळ धर्माच्या नावावर निर्माण झाले आहे म्हणजेच पाकिस्तान अधर्मानेच निर्माण झाले. काटेरी झुडपांवर आंबा-फणसाची कलमे करता येत नाही. हे सत्य दडविण्यासाठी धर्म राजकारणात नको असा टाहो करीत राहावयाचे, पाकपुरस्कृत हुरियत, हैद्राबादी ओवेसींना गोजारायचे व हिंदूत्ववादी नेत्यांना झोडपण्याचे काम आजतागायत सुरू आहे. परंतु सत्य फार काळ दडपता येत नाही. म्हणून २०१४ साली नविन सरकार दिल्लीत अस्तित्वात आले आणि ज्या विचारांवर व मुल्यांवर त्या सरकारला लोकांनी पांठीबा दिला आहे, ती विचारसरणी अवलंबात आणणे ह्याला  सत्तेचा दुरूपयोग म्हणता येत नाही.घटनेच्या चौकटीत राष्ट्रहितासाठी जे जे करता येईल ते करण्याचे सरकारचे कर्तव्यच आहे. विरोधी पक्ष आणि काही मिडीयातील विचारवंत संघाचा अजेंडा सरकार राबवित असा आरोप करीत असतात ते लोकशाही मुल्याशी सुसंगत ठरत नाही. संघासारख्या संघटनेवर सतत टिका करता करता विरोधी पक्षांची शक्ती क्षीण होत चालली आहे. ह्याची जाणीव विरोधी पक्षांना होत आहे. म्हणून राहूल गांधी हिंदू मंदिरात जाऊ लागले. मोहरमसाठी दुर्गा विसर्जन सोहळा पुढे ढकलणार्या ममता बॅनर्जीं दुर्गादेवीच्या पायापुढे आज  लोटांगण घालू लागल्या आहेत.  पण लोकांना हे सारं नौटंकी वाटते. सार्या विरोधी पक्षांची स्थिती 'कळतेय पण वळत नाही' अशी झालेली दिसत आहे.

काश्मिरच्या Demography ची चिंता वाटणार्या विरोधकांना तिथे इतर राज्यातील भारतीय नागरीकही नको असतात. मात्र आसाम व आसपासच्या प्रांतात परकीयांची घुसखोरी राजरोस इतकी वर्ष चालली आणि त्यावर काही कारवाई प्रशासनाने वा सुरक्षा दलाने केली की विरोधी पक्ष, आणि तथाकथीत विचारवंत, मिडीयातील पुरोगामी-साम्यवादी-समाजवादी संपादक मंडळी,  मुस्लीम पर्सनल बोर्ड, ख्रिश्चन धर्मगुरू इत्यादींना मानवतावादी दृष्टीकोण आठवतो. NRC मुळे गृहयुध्दाची धमकी देण्यापर्यंत ममता बॅनर्जींची मजल गेली आहे ह्यातच विरोधी पक्षांना देशापेक्षा मतपेटीचे सोयर सुतक अधिक आहे,.असेच दिसते. धोका परकियांपेक्षा आपल्याच व्यवस्थेतील आत्मघातकी जयचंदी वृत्तीचा अधिक आहे.  अशा वृत्तीची बदलत्या भारतात डाळ शिजेल असे वाटत नाही.

शुक्रवार, २७ जुलै, २०१८

गुरू पौर्णिमा-पुज्य पांडुरंगशास्त्रीजींच्या शब्दात



आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा तसेच गुरू पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या देशात वैदिक काळात संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रीतींने अनेक ऋषींनी केले आहे. पण महर्षी वेदव्यासांनी सर्व विचाराचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष असा महाभारत ग्रंथ दिला. भारतः पन्चमो वेदः असे म्हटले गेले. महाभारत ह्या ग्रंथाला पाचव्या वेदाची उपमा प्राप्त झाली. महाभारताद्वारे व्यासांनी सांस्कृतिक विचार द्दष्टान्तासहित सरळ भाषेत समाजासमोर ठेवला. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने मुनिनामप्यहम् व्यासः असे विभूती योगात म्हणत व्यासांचा गौरव केला आहे. संस्कृती घडवितांना व्यक्तीचा मोक्ष आणि समाजाचा उद्धार ह्या दोन्ही आदर्शाकडे महर्षी व्यासांनी अभेद दृष्टीने पाहीले. अभ्युदय आणि निःश्रेयस ह्या दोहोंचा समन्वय साधता कसा येईल ह्यावर चिंतन करून त्यांनी ग्रंथ लेखन केले. म्हणून अध्यात्म परायण असे महर्षी व्यास एक अग्रणी समाजशास्त्रज्ञ ठरले. त्यांचे वैदिक व लौकीक ज्ञान एवढे अमर्याद होते की, 'व्यासोच्छिष्टं जगत् सर्व ' आणि महाभारताला 'सारं विश्वस्य' असे म्हटले गेले. सार्या मानव जातीला कवेत घेणारे साहित्य निर्मिती त्यांनी केली. पुढे त्यांनी पुराणेही लिहली. एका परिने महर्षी व्यासांना हिंदू संस्कृतीचा प्रणेता अशी मान्यता मिळाली. वेदव्यासांचे जीवन व कथन अमर बनविण्यासाठी त्यांच्या अनुयायी चिंतकांनी, संस्कृतीचा प्रचार करणार्या सर्वानी त्यांच्यासाठी' व्यास' संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या पिठावरून सांगितले जात होते त्याचे नाव व्यासपीठ म्हणून रूढ झाले. प्रणेता ह्या शब्दाला साधा पर्यायी शब्द म्हणजे गुरू. पंरपंरागत सुरू झालेली व्यासपूजा पुढे गुरूपुजा मानली गेली. तो दिवस आषाढ शुद्ध पौर्णिमा. 

पुज्यनीय शास्त्रीजींनी महर्षि व्यासांची महत्ती आपल्यासमोर मांडून व्यास पौर्णिमेचे नाव गुरू पौर्णिमा कसे झाले ; सांस्कृतिक कार्यक्रमाला जो मंच उभा केला जातो त्याचे नाव व्यासपिठ कसे झाले अशी माहिती देऊन शास्त्रीजींनी आपल्यावर फार उपकार केले आहेत असेच मानावयास हवे. कारण आपण सामान्यजन कुठे पुराणे, गीता, उपनिषदे वाचायला बसतो? सतत व्यासपिठाचा उच्चार करीत असतो पण व्यासपीठ म्हणजे काय हे आपणास ठाऊक होते कुठे? धर्मशास्त्रातील कर्मे करतो पण त्याचा अर्थ, त्यामागील धार्मिक, वैज्ञानिक, शारीरशास्त्रीय , सामाजिक इत्यादी कारणे काय आहेत हे कुठे ठाऊक होते? या संबंधीतील सारी माहिती सरळ आणि सोप्या भाषेत 'संस्कृती पूजन ' हे पुस्तकाद्वारे आपल्या समोर ठेवून आपल्यासारख्या सामान्यजनांत शुद्ध भक्तीभाव निर्माण केल्याबद्दल शास्त्रीजींचे धन्यवाद व्यक्त करावयास शब्द अपूरे पडतात. आजच्या गुरू पौर्णिमेच्या शुभ पर्वावर त्यांना कोटी कोटी प्रणाम! 

सामान्यतः आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचा आपण आदर करतो, ज्यांचा आपल्याला आधार वाटतो अशा व्यक्ती आपल्या जीवनात बर्यापैकी संख्येने येतात. परंतु आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांचा आदर करतो तसेच जे आपल्याला आधारवड असतात आणि त्याही पलिकडे जाऊन आपल्याला ज्यांची भक्ती कराविसी वाटते अशा व्यक्ती दुर्मीळ असतात. अशा लोकांना आचार्य, गुरू संबोधले जाते. व्यक्तीगत जीवनात माता-पिता, आप्त आणि आप्तांच्या व्यतिरिक्तही गुरू असतात. मानवी जीवनाच्या कक्षा इतक्या विस्तारल्या आहेत की प्रत्येक क्षेत्रात गुरू आवश्यक असतात. मानवाने जी अनेक क्षेत्रात प्रगती केली ती पुर्वाश्रमींनी केलेल्या संशोधन, निष्कर्षाच्या आधारेच. मानवाने प्रगती केली पण पशू-पक्ष्यांचे काय? त्यांच्यात गुरू-शिष्य पंरपंरा आहे का? ना पक्षी आपल्या पिल्लांना उडण्याची कला शिकवतो, ना सिंह आपल्या बछड्याला शिकार शिकवितो. आपण आपली उन्नती करू शकतो ही जाणिव मानवातच आहे. म्हणून त्याला गुरूची आवश्यकता वाटते. दुसरे असे कि, आर्य चाणक्य म्हणत की,' प्रगतीद्वारा येणारी प्रत्येक नवीन सुविधा, एका असुविधेला अथवा दुष्परिणामांना जन्म देत असते.' म्हणून संस्कृती आणि समाज व्यवस्थेचं, सामाजिक स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी जी व्यवस्था आपल्या समाजात आहे त्याचे नाव आहे 'गुरू-शिष्य पंरपंरा'. ती अबाधित राहणे गरजेचे असते. कारण गुरू हा मानव आणि ईश्वर यांच्यातील एक दुवा असतो. म्हणून आज भारतभर गुरू-पुजनाचा उत्सव साजरा होत असतो.

गुरू पूजन का हवे ह्याचे उत्तर देताना पुजनीय पांडुरंग शास्त्रीजी म्हणतात, जसे निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज(मानवी हाताची) लागते तशीच साधारणतः जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठविण्यासाठी जीवंत व्यक्तीची आवश्यकता भासते. ही व्यक्ती म्हणजेच गुरू. मानवाला देवत्वा कडे जाण्याच्या वाटेवर स्वतःच्या पशुतुल्य वृत्तीवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा त्याला गुरूच्या जीवनातून मिळत असते. गुरू म्हणजे जो लघु नाही तो आणि लघुला जो गुरू बनवितो तो. गुरूपुजन म्हणजे ध्येयपूजन. गुरूचे जीवन ध्येयमूर्तीसारखे असते. ध्येयाचे साकार रूप असते. मानवाच्या जीवनात ध्येय येताच संयम येतो. संयमाने शक्ती संग्रह होत जातो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी साक्षात्कार होतो.
गुरूच्या उपकारानी ज्याचे हृदय भरून आले की त्याच्या मुखातून आपोआप कृतज्ञता बाहेर पडते--

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः |
गुरूः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः || 

ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणाचा निर्मात; विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा संहारक, तसाच जीव व शिव ह्यांचे मिलन करणारा गुरू हा साक्षात परब्रह्मासमान आहे. अशा गुरूचे पुजन हे भारतीय संस्कृतीचे सुमधुर व भावार्द काव्य आहे. गुरूजवळ पोहताच बुद्धी ग्रहणशील बनते. त्याचा सहवासच इतका मधुर असतो की, त्याच्यापासून दूर होणे मनातच येत नाही. त्याच्या एका चित्ताने वर्षानुवर्षाचा थकवा दूर होतो. त्याची कृपादृष्टी होताच मनाची मलिनता दूर होते. म्हणून गुरू पूजन होत असते. गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्या भावनेतून एखादी वस्तू वा दक्षिणा गुरूच्या चरणी वाहण्याची पंरपंरा सुरू झाली आहे.

शास्त्रीजी पुढे म्हणतात, 'मी कोणाचा तरी आहे ' हा मधुर भाव त्यात आहे. ह्या भावनेत कृतज्ञता असते. जनकाचे गुरू याज्ञवल्क्य होते आणि शुकाचार्याचे गुरू जनक होते. सांदीपनीचा शिष्य म्हणवून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानीत होते. विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते. वेद, उपमन्यु किंवा आरूणी ह्यांना धौम्य ऋषी गुरू लाभले ह्याबद्दल ते स्वतःला धन्याता समजत होते. द्रोणाबद्दल अर्जुनाच्या मनात असलेला नाजूक भावच त्याला युद्धकर्तव्यात थोडा शिथिल बनवितो. परशुरामापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्णाने खूप कष्ट घेतले. शुक्रचार्यापासून संजीवनी प्राप्त करणार्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरूभक्ती आजही आपल्याला नतमस्तक बनविते. गंडपदाचार्याचे नाव येताच शंकराचार्य भावविभोर होत असत. पाश्चात्य देशातही ' मी अमक्याचा शिष्य आहे ' असे मानण्यात गौरव अनुभवतात.' मी साॅक्रेटीसाचा शिष्य आहे ' असे समजण्यात प्लेटो स्वतःला कृतकृत्य समजत होता. तर 'प्लेटो माझा गुरू आहे ' असे सांगण्यात आॅरिस्टाॅटल स्वतःचे जीवन धन्य समजत होता.

पुज्यनीय शास्त्रीजींनी गुरू-शिष्य पंरपंरा विशद करून आपण शिष्य कसे असलो पाहिजे हे ही अप्रत्यक्षपणे वरती सांगितले आहे. मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी गुरू केल्या शिवाय त्याला खरे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. अशी भारतात सार्वत्रिक मान्यता आहे. ज्याच्या ठिकाणी अहंकार नसेल आणि जो ज्ञानार्त असेल तोच गुरू करील आणि त्याच्याच ज्ञानाला काही आकार येऊ शकतो. पंढरपुरच्या विठ्ठलाचा नामदेव किती परमभक्त! पण ज्ञाना शिवाय नाम ही अधुरे असते. म्हणून देवाने नामदेवाला विसोबा खेचरांना गुरू करण्याविषयी पुनः पुनः स्वप्नादेश दिला. म्हणून "गुरूपुजन म्हणजे ज्ञानाचे पुजन, अनुभवाचे पुजन, सत्याचे पुजन." गुरू-शिष्य परंपरा ही मानव जातीतच आहे. एका पिढ्याकडून दुसर्या पिढीला ज्ञानाची पुंजी सरकत गेली म्हणून मानव प्रगत झाला. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक शतकात ज्ञानी, तसेच शिक्षण, आरोग्य, विज्ञान, कला, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याचे कसब असलेली मंडळीच प्रायः गुरूपदावर आरूढ होत आलेली आहेत. गुरू-शिष्य पंरपंरा म्हणजे ज्ञानाची गंगोत्रीच. गुरूशिष्य पंरपंरेमुळे मनुष्याला अनंत काळाचा वारसा प्राप्त झाला. गुरूशिष्य पंरपंरा म्हणजे मानवाच्या व्यापकतेचा आणि एकात्मतेचा साक्षात्कार आहे. संसहवेदना हे मानवाचे एक वैशिष्य आहे. गवसलेल्या गोष्टीचा आपण एकट्यानेच उपभोग घेणे ही पाशवी वृत्ती आहे. आपल्याला मिळालेली वस्तु इतरांना वाटावी ही मानवाची सहज प्रवृत्ती. तिच्यामुळेच गुरू-शिष्य पंरपंरा सुरू झालेली दिसते.
जें जें आपणास ठावे | तें तें इतरांस शिकवावे | शहाणे करून सोडावे | सकल जन | 
ह्याच मानवी स्वभावातून गुरू- शिष्य परंपंरा निर्माण झालेली दिसते. 

क्षेत्र कुठलेही असो प्रत्येक क्षेत्रातल्या गुरूचे वर्तन, स्वभाव, शिष्यासंबंधीची ओढ, इत्यादी गुण-वैशिष्टे कमी अधिक प्रमाणात सारखीच असतात. 
पुढे शास्त्रीजी गुरू कसा असतो, ह्याचे वर्णन पुजनीय संस्कृतमधून लिहून मराठीत अर्थ समजून देतात, 



ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीं |
द्वंदातीत गगनसद्दशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ||
एकं नित्यं विमलमंचलं सर्वधीसाक्षिभूतं |
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि || 



ब्रह्माचा आनंदरूप, परमसुखरूप,ज्ञानमूर्ती, द्वंदापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वामसि तोच तू आहेस, हे ईशतत्त्व तूच आहेस त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही मनाच्या पलिकडे, त्रिगुणरहित, अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो.'

शेवटी शास्त्रीजी म्हणतात असा गुरू मिळाला नाही तर? ' कृष्णं वन्दे जगदूगुरूम् '. भगवान कृष्णाला गुरू मानून त्याने गीतेत सांगितलेल्या जीवनपंथावरून चालणे हैच श्रेयस्कर.' त्यासाठी स्वाध्याय परिवाराच्या आश्रयास जाऊन तेथून ' कृष्ण चरीत्र ' व 'गीतामृत ' ही पुस्तके घेऊन वाचावित आणि त्यातील बोधावरून जीवनाचा प्रवास केला की खरे गुरूपुजन होईल आणि गुरूला खरी दक्षिणा मिळाल्यासारखे होईल.



जय योगेश्वर !

आपण व आपले उत्सव--मातृदिन (भाग १)

आपण व आपले उत्सव-- मातृदिन   देवीयों और सज्जनो नमस्कार ! हमारी मातृभूमी को देव-देवताओंकी भूमी माना जाता है | इसका कारन हमारे यहाँ सृष्टी हर ...