शनिवार, २९ जुलै, २०१७

बिहारमधील सत्तापालट


बिहारमध्ये पुन्हा जेडीयु-भाजपा युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यामुळे राजकरणातील नैतिकता, लोकशाची मूल्ये,    राज्यपालांची  कर्तव्ये इत्यादी बाबीवर नेहमीप्रमाणे चर्चा होत आहे. आपल्या हिंदू मान्यतेप्रमाणे नीती हा शब्द द्वापार युगाच्या उत्तरार्धातच गायब झाला आहे आणि ह्या भूतलावावर  आता जे राहिलं आहे किंवा चालू आहे ते राजनीती नसून केवळ  राजकारण आहे.  एकदा हे सत्य मान्य झालं कि बिहारमधीलच नव्हे तर कुठेही  सत्तापालट झाला तरी त्यावरून  नैतिकता आणि अनैतिकतेची जी चर्चा होत आहे त्यात भाग घेणार्या कोणालाही पराभव शिवत नसतो.

भारतीय राजकारणात सर्वात बेजबाबदार राजकीय मंडळी कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे केला तरी "जिथे समाजवादी तिथे भांडण आणि राजकिय अस्थिरता" ही बाब सर्वश्रूत आहे. सन १९७७ साली जनता पार्टीचे सरकार समाजवाद्यानी पाडले. कधी जनता पार्टी तर कधी जनता दल अस रूप घेत ही मंडळी केंद्रात आणि अनेक राज्यात सत्तेवर येत राहिली आणि लागलीच पायउतार होत राहिली. मूळात खोट कुठे आहे तर सदा तात्विकेतचा आव आणण्यात ह्यांना फार रस असतो. त्यामुळे ह्या पक्षांतील नेत्यांमध्येच भांडणं होत राहिली आणि छोटे तुकडे होत गेले. पूर्वी समाजवादी तसेच काॅम्रेड म्हणवून घेण्याची एक फॅशन विकसनशील आणि अविकासित देशात होती. परंतु साम्यवाद वा समाजवाद ह्या विचारसरणीचा ऐहिक विकासाच्या दृष्टीने उपयोग होण्यापेक्षा अडथळे निर्माण होत गेले. त्यामुळे आता बहुतांश देशांनी आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण स्विकारीत भांडवलशाहीला प्रोत्साहन देण्याचं धोरण स्विकारले. आपल्या देशाचा प्रवासही त्याच दिशेने सुरू झाला. मग कुठलं तरी एक नवीन तत्व राजकारणात आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय ह्या समाजवाद्यांना राजकारण रेटता येणं अशक्य झालं. देशात भारतीय जनता पक्षाचं बळ वाढू लागल्यानंतर सर्वधर्मसमभाव हे नाणं अधिक पाॅलीश करून राजकारण करता येते कां ह्यावर विचार करून भाजपाचा जो  विरोधी, तो आमचा मित्र असे ह्यांच धोरण ठरलं. म्हणून ज्या काॅग्रेस पक्षाला सत्तेवरून खेचण्यासाठी डाॅ राम मनोहर लोहियांनी जनसंघाचे अध्यक्ष पंडीत दिनदयाळ उपाध्यांशी चर्चा करून सहमतीच्या राजकरणाचा पाया रोवला, त्याच काग्रेस पक्षाशी संधान बांधत भाजपाद्वेश वाढत ठेवण्याचं काम लोहीयांच्या अनुयायांनी हाती घेतलं. सर्वधर्मसमभाव हे नाणं इतकं गुळगुळीत झालं कि ते निष्प्रभ होत जात आहे हे दृष्टीस येऊ लागले. मग भांडायचं कोणाबरोबर? हा प्रश्न ह्यांना कधीतरी सतावणार होताच. त्यातूनच बिहारमधील लोहियांच्या दोन शिष्यात शह-प्रतिशहचा खेळ झाला, आणि महागठबंधनचे सरकार कोसळले.

बिहारमधील जेडीयू आणि आरजेडी मधील भांडणाचं कारण समाजवाद्यांच्या वृत्तीतच दडलेलं आहे. नितिशकुमार आता कितीही टाहो फोडीत भ्रष्टाचारासंबंधी झिरो टाॅलर्नसचा आव आणत असले तरी लोक विश्वास ठेवतील असे वाटत नाही. विधानसभेच्या निवडणूकीत केवळ भाजपाला विरोध म्हणून महागठबंधन करीत लालूप्रसाद यादवांच्या आरजेडीला सामील केलं तेव्हा लालूप्रसाद भ्रष्टाचारी नव्हते कां? भाजपासह तब्बल दहा वर्षे सत्ता उपभोगली तेव्हा भाजपा सांप्रदायिक का वाटला नाही? बिहारमध्ये आज जे सत्तांतरचं नाटक घडले ह्यावर चर्चा करतांना नितिशकुमार आणि लालूप्रसादांना दोष देण्याऐवजी भाजपा केंद्रातील सत्तेचा गैरवापर करीत विरोधी पक्षांची सरकार पाडीत आहे असा आरोप काॅग्रेस आणि मित्र पक्ष करीत आहेत. असा आरोप करणे सर्वथा चूक जरी नसले तरी भाजपालाच खलनायक बनविण्याचा काॅग्रेस आणि आरजेडीचा प्रयत्न ही तितकासा पटत नाही. मूळात बिहारमधील गठबंधंन हे कोठल्याही तत्व व सिध्दांताविना अस्तित्वात आलेलं बूजगावणं होत. बिहारमधील मतदारांनी विधानसभेच्या निवडणूकीत महागठबंधनाच्या बाजूने कौल दिला होता, त्यामागील कारण मोदी नको वा भाजपा नको असं जे भासविण्यात येते ते ही तर्कसगंत वाटत नाही. बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपाचे नेते अरूण जेटलीनीं मतदारसंघनिहाय आकड्यासहीत दाखवून दिले होते कि भाजपाला जितकी मते लोकसभेच्या निवडणुकीत मिळाली होती जवळपास तिकीच मतें विधानसभेच्या निवडणूकीत मिळाली होती. केवळ विरोधी पक्षांची मते विभागली गेली नाही त्यामुळे भाजपाचा पराभव झाला. एक गोष्ट मान्य करावी लागेल कि नरेंद्र मोदी ह्यांच्यं  डीएनेसंबंधीचं वक्तव्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचं आरक्षणासंबंधीच्या विधानावरून मतदारांचा बुद्धीभेद होऊ शकतो ही बाब महागठबंधंनाच्या strategist मंडळींच्या लक्षात आली आणि तसा फायदा उठविण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करणे सोप गेलं, त्यातूनच भाजपाचा पराभव करण्यात महागठबंधंनला यश मिळाले. असो.

आता लालूप्रसाद, नितिशकुमारांवर एका दंगलीत हात असल्याचा आरोप करीत आहेत. ह्यावर विश्वास ठेवता येणारच नाही असे ठामपणे म्हणता येईल इतकी विश्वासहर्ता नितिशकुमारची राहिलेली नाही. तेजस्वी यादवनी राजीनामा द्यावयास हवा होता आणि त्यांनी राजीनामा दिला असता तर महागठबंधनचं सरकार कोसळले नसते, असं खाजगीत नव्हे तर टिव्ही चॅनलवरील चर्चेत भाग घेताना अली नावाच्या आरजेडी नेत्यांनी म्हटले आहे. ह्याउलट काही जेडीयूचे नेते (अगदी शरद यादवासारखे नेतेही) नितिशकुमारांवर नाराज दिसतात. काही राजकीय अभ्यासकांचं म्हणणं असे आहे कि, लालूप्रसादांना जेडीयूमध्ये फूट पाडून तेजस्वी यादव ह्याला मुख्यमंत्री करून भ्रष्टाचार प्रकरणीची संभाव्य अटक तसेच खटला टाळावयाचा होता. म्हणून नितिशकुमारांनी घाई करीत शपथविधीचा सोपास्कर पार पडला. ह्यातही तथ्य असू शकते. जगभरातील प्रत्येक देशात कुठल्याही राज्यप्रणालीत वरच्या पातळीवर काय शिजत असते, हे सामान्यांपर्यत पोहचतेच असे होत नाही. एक पक्षीय किंवा हुकूमशाही राजवटीत सरकार दरबारात काय घडत असते हे कळत नसतं, कारण तिथे सरकार पुरस्कृत मिडीया असते. तर लोकशाहीमध्यें माध्यमांचा इतका सूळसूळाट आणि काही संपादकांचे किंवा चॅनेल, वा वृत्तसंस्थांच्या मालकांचे लागेबांधे राजकीय पक्षांशी इतके जुळलेले असतात की राजकीय पटलावर घडणार्या घटनांच्या सत्यतेबद्दल सर्वसामान्यांचा गोंधळ उडत असतो. शेवटी दोन्ही प्रकारच्या राजवटीत प्रशासन म्हणजेच Governance किती लोकहितवादी असते ह्यावरच लोकांना अवलंबून राहून आपले मत ठरविण्याचे तेवढे हाती राहते. फरक हा आहे कि लोकशाहीत निदान governance किंवा performance ह्यावर सर्वसामान्यांना मत देण्याचा अधिकार असतो. हुकूमशाहीत वा एकपक्षीय राजवटीत तशा प्रकारचा अधिकार जनतेला नसतो, म्हणून अशा प्रकारच्या राजवटीत रक्तरंजित क्रांतीच सत्तापालट करीत असते.

मी मांडलेलं वरील विवेचन हेच सत्य मानण्याचा माझा आग्रह नाही. वाचकांची मतें भिन्नच असणार हे मी नाकारीत नाही. आणि ह्याचच नाव, जरी सुसंवाद म्हणता येत नसलं तरी, संवाद आहे असं माझं म्हणणं आहे. नितिशकुमारांवर भाजपाने दबाव आणला असेल असं जे म्हटलं जात आहे, त्यात फारसं तथ्य दिसत नाही. परंतु असं काहीतरी कारण आहे ज्याच्यामूळे नितिशकुमार भाजपाच्या दावणीला गेले. मग ते कारण कोणते? लालूप्रसादांनी नितिशकुमारचा पक्ष फोडून तेजस्विनी यादवाला मुख्यमंत्री बनाविण्याची तयारी केली होती. अस सुत्रांच म्हणणं आहे. मला वाटतं ह्याच कारणामुळे नितिशकुमारांना भाजपाच्या आधाराची गरज भासली असावी. दुसरे असे की राष्ट्रीय पातळीवर मोदींशी सामना करणं आता आपल्या आवाक्यात नाही ह्याची जाणीव नितिशकुमारांना झालेली असावी. त्यातही लालूप्रसादांच्या परिवारातील सदस्यावर एकामागोमाग भ्रष्टाचाराच्या केसेस दाखल होत आहेत. ते ओझे आपल्या डोक्यावर घेऊन बिहारमधील आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणे मूर्खपणाचे आहे हे ही नितिशकुमारांच्या लक्षात आलेलं असणारच. एकंदरीत भाजपाने नितिशकुमारला फितविलेलं नसून नितिशकुमारांना भाजपाची साथ हवी आहे. हे इतकं स्पष्ट असताना भाजपावर आरोप करण्यात येतात. हे काही बरोबर नाही. भाजपावर राजकीय पटलावरील डावपेचांबाबत टिका झाली तर तीही मान्य करण्यासारखी आहे पण ह्या नाट्यात भाजपालाच खलनायक मानण्याची वृत्ती ही सुध्दा खलप्रवृत्ती आहे. मूळात लालूप्रसाद आणि नितिशकुमाराची हातमिळवणीच कमकुवत होती. जयप्रकाश नारायण, डाॅ राम मनोहर लोहीयांचा वारसा, सेक्युलरिझम इत्यादी सार्या गप्पा हवेतल्या आहेत. महात्मा गांधीजींचा काॅग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला काॅग्रेसने मानला कां? नाही, का तर स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय घेत सत्ता मिळत  होती. परंतु लोकशाहीत सदा सर्वकाळ सर्वच लोकांना ऊल्लू बनविण्यात यश मिळत नसते. निपक्षपातीपणे म्हणावयाचे असल्यास भाजपाला दोष देण्याऐवजी आघाडी धर्माचं पालन करण्यात लालूप्रसाद आणि नितिशकुमार अयशस्वी ठरले हेच खरे कारण बिहारमधील सत्तापालटासंबंधीच आहे. मग बिहारी जनतेने दिलेल्या मॅन्डेट (कौल) ह्यासंबंधी चर्चा तरी का करावी?

आता पुढे काय? राजभवन हे नेहमी केंद्रातल्या सरकार पक्षाची मर्जी राखत असते. त्यामुळे "पार्टी विथ डिफरन्स " ह्या भाजपच्या घोषवाक्यावर टिका करणार्या विद्वान मंडळींची भारतात कमतरता नाही. टिका करणार्यापैकी काही विद्वान निःपक्षपातीपणाने म्हणत असतील, कि भाजपाला ह्यात पडायावयास नको होते. हे जरी तत्वतः खरे मानले तरी कुठल्याही राज्यातील घडामोडीवर केंद्र सरकारला स्वस्थ बसणे शक्य नसते. प्रश्न नैतिकतेचा नसून संविधानात्मक कार्यवाहीचा असतो. संविधानात कूठेही एका सर्वात मोठ्या पक्षाला संधी देण्याचे निर्देश नाहीत मात्र बहूमताच्या जवळपास पोहोचून स्थिर सरकार देऊ शकणार्या समुहास सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी असे नमूद केले आहे. केंद्रात काॅग्रेसचे सरकार असतेवेळी, १९९६ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही भाजपाला बहूमत सिध्द करण्याची संधी तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारीनी दिली नाही. इतकेच नाही तर पूढे कल्याण सिंह ह्यांना नरेश अगरवाल व चौधरी नरेंद्र सिंह ह्याच्या पक्षांचा पाठिंबा असूनही सरकार बरखास्त केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यपाल महोदयांच्या ह्या निर्णयाला असंवैधानीक ठरवून पून्हा कल्याणसिंह यांना मुख्यमंत्री बनविले. परंतू त्यानंतर भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये उतरती कळा लागली. ही बाब ह्या ठिकाणी का नमूद केली, तर सामान्यतः कुठलाही मतदार आपल्या राज्याचा राज्यपाल संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यात कूचराई करतात का ह्यावर काथ्याकूट करीत बसत नाही तर नवीन मूख्यमंत्री वा आघाडी लोकहिताची कामे करते कि नाही ह्यावरच त्याचं लक्ष असते. त्यानंतरच्या काळात मूलायमसिंग आणि मायावतींनी मिडियाला हाताशी धरून असं काही चित्र रंगविले कि भाजपा आणि काॅग्रेस हे पक्षच उत्तरप्रदेशात नाहीत. त्यामुळे सपा आणि बसपा लोकानुनाय घोषणा व जातीयवादी राजकारण करीत मतदारांना गुंगवत ठेवीत गेले आणि सत्ता आलटून पालटून एकेक टर्म उपभोगीत राहिले. परंतु मोदीलाटे नंतर मतदारांना भूलविण्याचा प्रकार करणारे हद्दपार झाले. केंद्रात मोदी सरकार अस्तित्वात आल्यावर सार्याच पक्षांच्या मूखातून विकासाची भाषा येऊ लागली. ह्याहून आपल्या लोकशाहीसाठी चांगली बाब तरी कुठली? इतकं जरी श्रेय भाजपा आणि पंतप्रधान मोदींना द्यावयास कोणी तयार नसतील तर त्यांनी लोकशाहीची मूल्यें, नैतिकता इत्यादीवर चर्चा तरी का करावी? व्यवहारात आपण म्हणत असतो कि झोपलेल्या माणसाला उठवता येते. पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, हेच खरें. जर नितिशकुमार आणि भाजपा यूतीचं सरकार चांगलं काम करेल तर पुन्हा निवडून येऊ शकते. आणि काही चागंली कामगिरी नाही केली तर मोदींचा करिष्मा विधानसभेच्या निवडणुकीत कामाला येईलच असेही नाही. परंतु त्या अगोदर आरजेडीने ह्यासदंर्भात न्यायलयात दाद मागितली त्यावर न्यायालयाचा काय निर्णय येतो, आरजेडी पक्षाचे सर्वच आमदार ठामपणे लालूप्रसादाच्या पाठी उभे राहतात कां इत्यादी गोष्टी बघणे औत्सूक्याचं ठरेल. तसेच महागठबधंनातील आमदार नव्याने स्थापन झालेल्या सरकाराला विधानसभेत कसा विरोध करतात, जनतेकडे आपल्यावर अन्याय झाला आहे ही बाब कशा रितीने पेश करतात ह्यावर महागठबंधन विरूध्द जेडीयु-बीजेपी ह्या सामन्याचा निकाल अवलंबून आहे. तुर्तास राष्ट्रीय पातळीवरील भाजपा विरूद्ध विरोधी पक्ष ह्यांच्या मधील महायुध्दांत मोदींच्या तोडीचा सेनापती विरोधी पक्षाकडे नाही, हे बिहारमधील सत्तापालटांतून सिध्द झालं आहे.

शनिवार, १५ जुलै, २०१७

युध्द मोदी समर्थक आणि विरोधकांचे‍‍!



केंद्रात मोदीचं सरकार आरूढ होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा अनेक वृत्तपत्राद्वारे, टिव्ही चॅनेल्स द्वारे आपल्यापर्यंत पोहचला आहे. भाजपातर्फे सरकारने केलेल्या जनहिताच्या कामाची जंत्री पाहिली तसेच विरोधी पक्षांनी दाखविलेल्या सरकारच्या उणीवा, त्रूटी ह्यासंबंधीची माहिती आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे ह्या लेखात त्यावर चर्चा न करता मोदी समर्थक आणि विरोधक ह्यामधील चालू असलेले युध्द ह्यावर चर्चा करावी असे मनात आले. आपली लोकशाही ही संसदीयप्रणालीची असूनही आजच्या चर्चेचा विषय भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष असा का नाही? ह्याचं कारण मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या वेळेपासून एक दिवस असा गेला नाही कि मोदींवर कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने टिका केली नसेल. असे असूनही काही राजकीय समीक्षक भाजपाला दोष देत म्हणत आहेत कि भाजपाने एका व्यक्ती भोवती लोकशाहीचं केंद्रीकरण केलं. सत्य हे आहे की हीच समीक्षक मंडळी भाजपाऐवजी मोदीजीवर टिका करीत असतात. टिव्ही न्यूज चॅनेल्सवर राजकीय घडामोडीवरील चर्चेचं स्वरूप चर्चा कमी आणि वादविवाद अधिक असेच असते टिव्हीवरील चर्चेत संसदेतील संख्याबळावर आधारीत प्रवक्त्यांची संख्या नसते. त्यामुळे भाजपाचा एक प्रवक्ता तर विरोधी पक्षाचे चार प्रवक्ते असा सामना असतो. ह्याचंच प्रत्यतंर सोशल मिडीयावर असते. मोदीविरोधी आवाज मोठा परंतु विरोधी पक्षाचं विविध निवडणूकीतील यश नगण्य. असे का ह्यावर विरोधी पक्ष चितंन करीत आहेत असे दिसतच नाही. मग सत्तेचं केंदीकरण होत आहे असा आरोप करण्यात काय अर्थ? बहुतांश विरोधी पक्ष सत्ताधारी म्हणून वावरलेले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही सत्ताधिशाप्रमाणे वावरत, सोशल मिडीयावर मोदी विरोधी टिपणी करीत चमकण्याच्या नशेत तर भाजपाचे कार्यकर्ते बूथ आणि वार्ड पातळीवर कूठल्याही निवडणूकीच्या सहा महीने अगोदरच कामाला लागलेले असतात. मोदींच्या विरोधी वक्तव्य करीत राहणे हाच एक कलमी कार्यक्रम ज्यांचा आहे, ती मंडळी माझ्या ह्या लेखावरही टिका करणार हे मी गृहीत धरले आहे. आज राजकीय पटलावर जो तमाशा सुरू आहे तो शांतपणे बघत बसलेला मतदार राजाच काय तो निवाडा २०१९ साली होणार्या निवडणुकीत देणार असल्यामुळे माझ्या लेखावर होणार्या टिकेचंही मी हसतमुखानं स्वागत करीन. 

प्रथम असहिष्णुतेच्या भावनासंबंधी चर्चा करू या. मुळात असहिष्णुता हा विषय चर्चेला ज्यांनी आणला,ते लोक कोण आहेत? प्रतिथयश सिनेस्टार अमीर खान ह्यांनी त्यांच्या पत्नीला भारतात रहावयास असुरक्षित वाटू लागले असे निवेदन प्रसिद्ध केले. ह्यावर WhatsApp वर एक प्रतिक्रिया अशी आली कि '' मी काय म्हणतोय, कि बायको बदलून ह्या प्रश्नाचं उत्तर मिळते कि नाही हे बघायला काय हरकत आहे?".संपूर्ण भारतीय जनतेला आरोपीच्या पिंजर्यात टाकणार्या अमीरखानची भाषा असहिष्णुतेची कि WhatsApp वर अमीरखानच्या भाषेला प्रत्युत्तर देणार्याची भाषा असहिष्णुतेची? अमीरखानचा बोलाविता धनी दुसराच कोणी असू शकतो. (सध्या अमीरखानचा दंगल चित्रपट चीनमध्ये जोरात चालतो,आणि सीमेवर चीनची अरेरावी सूरू असतांना गुप्तपणे काॅगेसचे उपाध्यक्ष चीनच्या राजदूतांना भेटतात ह्या सार्या गोष्टी एक योगायोग आहे कि राजकीय षडयंत्र. देव जाणे).अमीरखानवर टिकेचा भडीमार सोशल मिडीयावरून झाला. मग अमीरखानची भाषा बदलली.

कोणीतरी एक लेखक म्हणे मोदी पंतप्रधान झाल्यावर मी देश सोडून जाईन असे म्हणाले होते. ते आता खरोखर देश सोडून गेले की नाही ह्याबद्दल मला काही माहिती नाही. ते खरेच देश सोडून गेले असतील तर त्यांच्या पाठोपाठ किती लेखकांनी देश सोडला आहे? जर पंधरा वीस लेखकांनी देश सोडला असेल तर ती बातमी आम जनतेला माहीत पडली असती. परंतु तसे काही घडले नाही. मग ह्या लेखक महाशहाची भाषा असहिष्णुतेची कि त्यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शविणार्या लेखक मंडळीची? मोदीजी पंतप्रधान झाल्यावर पुरस्कार वापसीची साथ आली होती. परंतु सरकारद्वारे ह्या रोगाच्या साथीवर काहीही औषधोपचार न करता ती थांबली. कशी थांबली? मला उत्तर देता येत नाही. भारतीय मतदारांना ह्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे. पण ते सारेजण लोकसभेच्या पुढील निवडणुकीत उत्तर देणार. 

मोदीजी वारंवार परदेश दौर्यावर असतात, त्यासंबंधी उपहासाने चर्चा केली जाते. प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे कि आजही ह्या जगात बळी तो कान पिळी हा कायदा अस्तित्वात आहे. त्याच जोडीला व्यापार, उद्योग, संरक्षण इत्यादी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविणे हा ही आजच्या युगाचा धर्म आहे. आपला देश अजून महसत्ता झालेला नाही. आपला देश महासत्ता असता तर मोदींनी कशाला परदेशवारी केली असती? आता तर मोदीजी इजरायल ह्या छोट्या परंतु जगात दबदबा असणार्या देशाचा दौरा करून आले. मोदीजींचे अमेरिका, रशिया, इग्लंड, फ्रान्स ,जर्मनी, जपान ऑस्ट्रेलिया तसेच पच्चीम आशिया असो वा आखाती देश ह्या सार्या देशांचे दौरे झाले. ह्या सार्या देशाबरोबर शेती, व्यापार, गुतंवणूक, उद्योग सहकार्य,संरक्षण सहकार्य, संरक्षण विभाग अपडेट इत्यादी विषयासंबंधी द्विपक्षीय करार झाले. इजरायल दौर्याचे टायमींग छान साधलं आहे. एक आक्रमक आणि अत्याधुनिक शस्त्रांने परिपूर्ण अशा देशाचा हा दौरा. आणि तो देखील सीमेवर चीनची अरेरावी चालू असताना. इजरायलचा दौरा पाकिस्तान आणि चीनला बदलत्या भारताची ओळख देऊन गेला. शत्रूनां कसे गोधंळात टाकावयाचे आणि आपसुकच चीनने सूरू केलेला अरेरावीपणाचा विषय अप्रत्यक्षरित्या आतंरराष्ट्रीय करून मोदींजीनी बड्या देशांनाही चक्रावून सोडले आहे. आमचा पर्याय हा आम्हीच शोधू हेच पंतप्रधान मोदीजींनी इजरायलचा दौरा करून आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. ह्यालाच म्हणतात खंबीर नेतृत्व. बीबीसचे जेष्ठ संपादक आणि राजकिय विश्लेषक मार्क टूलीने म्हटलं आहे कि "मोदींच्या कारकीर्दी पासून भारत बदलत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. असे असूनही मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण केले जातील तरीही श्री मोदी समर्थपणे तोंड देत सर्व अडथळ्यावर मात करतील". मार्क टूलींचा भारतातील राजकरणाचा अगदी जवळून अभ्यास आहे. त्यामुळे मार्क टूलीने ' मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण केले जातील ' असं जे म्हटलं आहे त्यात तथ्य आहे असे मला वाटतं. ह्याची कारणे दोन आहेत. एक काॅग्रेसचे मणी शंकर अय्यर पाकिस्तान टिव्ही चॅनलेच्या सुत्रसंचालकला मोदी सरकारला संबोधून  "आप इन्हे हटाइये और हमे लाईए" अशी विनंती कि सूचना देताना आपण टिव्हीवरून पाहिले. दूसरी गोष्ट ही कि एका बाजूला चीन आणि पाकिस्तानवर दबाव वाढावा म्हणून जगातील अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या इजरायल देशाशी विविध करार करीत आपले पतंप्रधान मैत्री वाढवित आहे तर दूसर्या बाजूला काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी चीनच्या राजदूतांना गूप्तपणे भेटतात. काय म्हणावं? अशा नेत्यासंबंधी. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्क टूलीचं मत पटत नसेल, तरी सामान्य मतदार सरळ पुढील निवडणुकीतच ह्यावरचा निवाडा देइल तो पर्यंत वाट पाहणे ह्यातच शहाणपण आहे. 

मोदींच्या कार्यपद्धतीत जाहिरातबाजी जास्त आणि काम कमी. अशी चर्चाही अधून मधून होत असते. "इंदिरा गांधी आयी है, नयी रोशनी लायी है" अशी जाहिरात माझ्या काॅलेज जीवनात ऐकू येत होती. इंदिराजीच्या अगोदर पंडित नेहरू म्हणजे इंदिरा गांधीचे वडील आणि काही काळासाठी लालबहाद्दूर शास्त्रीजी पंतप्रधान होते. म्हणजे काॅग्रेसचेच सरकार होते. जाहिरतीवरून वाटले कि इंदिरा गांधीच्या अगोदर देशात अंधार होता कि काय ? इंदिराजींनी संस्थानं खालसं केली, त्यांचा तनखा बंद केला. पण त्यांच्याच कुटुंबाचं संस्थान निर्माण झालं. सपूर्ण काॅग्रेस पक्षच त्यांच्या कुटुंबियांचा झाला. मग हळूहळू देशात, डीएमके, शरद पवार घराणे, पश्र्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथेही प्रत्येक पुढाराच्यांची संस्थाने, मुलायमसिंग घराणे, ठाकरे घराणे, मायावती घराणे, शेखअब्दूला घराणे, बादल घराणे लालू घराणे इत्यादी आणि  अशीच  भारतातल्या प्रत्येक जिल्हा, तालूका, पातळीवर अनेक संस्थानं उभी राहिली. प्रश्न असा आहे कि राजकीय क्षेत्रात इतकी संस्थानं कशी आणि कोणी उभी केली? राज्यशास्त्राच्या अभ्यासकांचं ह्या प्रश्नावरील उत्तर "राजा कालस्य कारणम्!" हेच होय. स्वर्गीय इंदिरा गांधीनी 'गरीबी हटाव' चा नारा दिला होता, गरीबी हटली कां? हटली असेल तर मग राहूल गांधी कोणाच्या झोपडीत जाण्याचं नाटक करीत आहेत? राजीव गांधीची ' Mr Cleen ' अशी जाहिरात झाली. भ्रष्टाचार कमी झाला कां? जर राजीव गांधी हे Mr Cleen होते तर त्यांच्या मातोश्री भ्रष्ट होत्या कां? इत्यादी प्रश्नांची उत्तरे काॅग्रेस पक्षाकडून अनुत्तरीत राहिली. परंतु मतदारांनी वेळ आली त्या त्या वेळी मतदानाद्वारे दिली. नोटबंदीने काय साधले ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही काही लोकांना तातडीने हवं आहे. पण वाचकहो, सामान्य जनतेने त्रास सहन करीत सरकारच्या निर्णायाचं स्वागत केले. तरीही विरोधी पक्षांनी आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही घसा फोडीत विरोध केला. आणि अजूनही करीत आहेत. आणि करीतही राहणार. नोटाबंदी एक राजकीय खेळी आहेच असे मी आणि आणखिन कोणी मानले तरी त्यासंबंधीचा निर्णय मतदारच देणार . आता मतदार हुषार झाला आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कुठे आणि कोणते डावपेच खेळत आहेत हे मतदारांना चांगले ठाउक आहे. पण ते शांतपणे तमाशा बघतात आणि उत्तर मात्र लोकसभेच्या पुढील निवडणुकीत देतील. तोपर्यंत वाट पहायची.

म्हणे मोदीजी जातीयवादी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम बांधवांला उमेदवारीचं तिकीट दिलं नाही. विरोधी पक्षांचा हा आरोप उत्तर प्रदेशातील जनतेला पंसत पडला नाही. तेथील जनतेने भाजपाला अभूतपूर्व बहुमत देउन विजयी केलं. हे कसं शक्य झालं? कारण मुस्लिम बांधवांच्या घरातही गॅसच्या शेगड्या पोहोचल्या आणि आगीच्या चूलीतील धूरांपासून सगळ्या गृहीणीची सूटका केली. आणि हे मी मुंबईतील रिक्षाचालकाकडून निवडणूकीपूर्वी ऐकलं होतं. आता मला सांगा की मोदीजी कूठे भेदभाव करतात? "जशी दृष्टी तशी सृष्टी ".मोदीजी सव्वाशे कोटी भारतीयांचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत."सबका विकास, सबका साथ" आता ही घोषणा मोदीजींनी उत्तर प्रदेशात प्रत्याक्षात उतरविली. म्हणून त्यांना उत्तर प्रदेशात प्रचंड यश मिळाले. परंतु ह्या विजयाचं श्रेयही मोदींना द्यायला विरोधी पक्ष तयार नाहीत. मला वाटतं " सबका साथ सबका विकास" ह्या घोषणेत "ना किसी एकके उपर मेहरबान" हे तत्व समावलेले असल्याकारणाने ह्यांची दूकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ह्या विरोधी पक्षांना नैराश्याने ग्रासले असावे. सन १९९८-९९ मध्ये दै लोकसत्ता ह्या वृत्तपत्रात " सर्वधर्मसमभाव आणि राजकिय पक्षांचा व्यवहार" ह्या मथळ्याखाली माझा संपादकीय लेख प्रसिद्धीस आला होता. तो लेख मी काॅग्रेसचे विद्वान नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांनी दै मटामध्ये दिलेल्या मुलाखत मधील एका वाक्याच्या अनुषंगाने लिहिला होता. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांच ते वाक्य असे होते. "काॅग्रेस पक्षाला बहूसंख्यांकांच्या हिताला, त्यांच्या भावनाकडे दूर्लक्ष करून चालणार नाही". बॅ विठ्ठलराव गाडगीळांचा सल्ला काॅग्रेस आणि सहयोगी पक्षांनी मानला नाही. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करीत एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचं धोकादायक धोरण भाजपेतर पक्ष करीत राहिले. त्यामुळे भाजपा संसदेतील सर्वाधिक जागा मिळवूनही त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यात विरोधी पक्ष यशस्वी होत राहिले. सत्ताधारी पक्ष मग जगभरातील कुठल्याही देशातील असो, त्यांना बहुसंख्यांकाकडे दूर्लक्ष करणे कधीतरी महाग पडत असतेच. जगभरातील अनेक देशात अशा पध्दतीचे सत्तांतर घडून आल्याची उदाहरणे आपण पाहिली आणि पाहात आहोत. फरक इतकाच कि आपल्यासारख्या लोकशाहीप्रधान देशात निवडणूकीच्या माध्यमातून सत्तातंर होत असते. २०१४ मधील आपल्या देशात भाजपाला बहूमत प्राप्त मिळण्याच्या पाठीमागे भाजपेतर पक्षांचा सर्वधर्मसमभावासंबंधीचं ढोंग हे ही एक कारण आहेच. हे मान्य करण्याचं धाडस भाजपेतर पक्षांकडे नाही. जे धाडस बॅ विठ्ठलराव गाडगीळांनी दाखविले होते. वाजपेयीच्या सरकार नंतर तब्बल दहा वर्षे काॅग्रेस आघाडीने राज्य केलं. परंतु जनतेचा भ्रमनिरास झाला. पुढला इतिहास आपण जाणत आहात. काॅग्रेसच्या पतनाचं कारण भ्रष्टाचार हे होतेच. तसेच बहूसंख्यांकाची नाराजी ह्यावरही आपण चर्चा केली. परंतु आणखिन एक वेगळं कारणही होते. ते म्हणजे २००९ सालच्या विजयाबाबत काॅग्रेसच्या नेत्यांनी काढलेला चूकीचा निष्कर्ष. वस्तूतः डाव्या पक्षांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगाची वेळोवेळी केलेली कोंडी मतदारांना पसंत पडली नव्हती. त्यातून डाॅ मनमोहनसिंगसंबंधी सहानुभूती निर्माण झाली. डाव्या पक्षांना धडा द्यावयाचा निर्णय मतदारांनी घेतला आणि काॅग्रेस विजयी झाली. परंतु काॅग्रेसला वाटले कि हा विजय सोनीया गांधीच्या करिष्माचा होता. त्यातून मनमोहनसिंगाच्या पदाचे अवमूल्यन होत गेले आणि काॅग्रेस व मित्र पक्ष ह्याचें बारा वाजले. मतदार टोकाची भूमिका का घेतात ह्याचं कारण राज्यकर्ते मतदारांना गृहीत धरून चालतात. हेच होय. 

आजही जातीवरून किंवा धर्मावरून एखाद्या पक्षाने निवडणुकीत उमेदवार उभे करावेत का? प्रत्येक वेळी सरकारने नागरिकाला त्याच्या धर्मावरून ओळखावे का? ही कुठली राजनीती ? हा कुठला राजधर्म झाला? महाराष्ट्रात सेना-भाजपाची प्रथमच युती झाली होती. तेव्हा सत्ता हातातून निसटती आहे हे लक्षात आल्यावर शरद पवारांनी एका जाहीर सभेत "आपणास जोशी-महाजनाचं सरकार हवयं कां? असा प्रश्न केला. लागलीच एका जाहीर सभेत स्व. प्रमोद महाजनांनी "दिल्लीत ब्राह्मणांची लुगडी धुण्यात ज्यांनी आपली हयात घालविली त्यांना मतदार चागंले जाणतात". असेच काहीतरी उत्तर दिल्याचं आठवतंय. अलीकडे ह्या जातीय जाणता राजाने कुठल्या तरी एका कार्यक्रमात आपले जातीय विष ओकलेच. फडणवीस नावाची व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर कशी काय बसू शकते? हीच बाब ह्यांना सतावत असते. भारतीय जनता पार्टीने कोल्हापुरातील राजघराण्याच्या वशंजाला राज्यसभेवर पाठविले. त्यामुळे एका कार्यक्रमात म्हणे " पूर्वी राजे पेशवाईची नेमणूक करीत व पेशवे फडणवीसांची, आता फडणवीस राजेंना राज्यसभेवर पाठवित आहेत". इतक्या खालच्या थरावरचे उद्गार शरद पवारांनी काढले. हेच शरद पवार सातार्यातील राजेनां सतत आपल्या पक्षाचं तिकीट देत लोकसभेवर वा राज्यसभेवर वर्णी लावत आहेत. आपण काय बोलतोय ह्याचं भान ह्या जाणत्या नेत्याला राहात नाही तर ह्यांचे अनुयायी जितेंद्र आव्हाड ह्यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी काय ठेवावी? जितेंद्र आव्हाड तर राष्ट्रवादी पक्षाचं स्वरूप एका जिल्हापुरता आणून ठेवणार असे दिसत आहे. हे झालं महाराष्ट्रात. तसेच अनेक राज्यात विरोधी पक्षांची अशीच स्थिती झाली आहे. भारत बदलत आहे. हे मार्क टूली म्हणतात. आणि ह्यावर विश्वास ठेवावयाचा नसेल तर आपल्या येथील समाजशास्त्राचे बुजुर्ग अभ्यासक शीव विश्वनाथन ह्याचां हिंदुस्थान टाईम्स ह्या वृत्तपत्राच्या दिनांक 1 जुलै 2017 च्या अंकातील "Why South India finds BJP more acceptable now" ह्या मथळ्याखालील लेख वाचावा. ते म्हणतात, "The new aspirational and mobile, global South Indian is more ready for BJP and Modi than epic battles of ideology and electoral politics." ज्या दक्षिण भारतात भाजपाला कधीही स्थान मिळू शकत नव्हते आणि इतक्या लौकर मिळणार नाही असे खात्रीलायक रित्या म्हणणार्या विरोधी पक्षांचे नेते आणि मिडीयातील बुध्दीवाद्यांना तेथील मतदार चक्क वेड्यात काढणार असेच दिसू लागले आहे. दाक्षिणात्य प्रान्तांतील मतदारांना पारंपारिक स्थानिक पक्ष बुरसटलेल्या मनोवृत्तीचे वाटू लागले आहेत. तर भाजपा आणि पंतप्रधान मोदीजी आधूनिकेतेचे प्रतिक वाटतात. हे सारं काय दर्शविते? भारत बदलतोय हेच ते सत्य. आता हे सत्य कोणाला जाहिरातबाजी म्हणून थट्टेवर सोडावयाचे असल्यास ते सोडू शकतात. मी एवढंच म्हणेन, घोडा मैदान जवळ आहे.

अटलबिहारी वाजपेयी हे उदारमतवादी होते ही एक नवी तक्रार विरोधक आळवताना दिसतील. हो उत्तर शंभर टक्के बरोबर. परंतु विरोधी पक्षांनी हे केव्हा मान्य केलं? मोदी नावाचे वादळ ह्या पक्षांच्या अंगावर धडकावयास सुरवात झाली तेव्हापासून. अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपा संसदेतील सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष परंतु त्यावेळी ते उदारमतवादी आहेत असे ह्या पक्षांना वाटले नाही. निवडणूकपूर्व आघाडी नसतानाही ही मंडळी एकत्र आली आणि देवेगौडांना पंतप्रधान म्हणून बसविले आणि सरकार स्थापन केले. नंतर देवेगौडा त्यानांच आवडेनासे झाले. कां? ना मिडीयाला कळलं ना मतदार राजाला. मग गुजरालांना पंतप्रधानपदी बसविले. कोणालाही पंतप्रधानपदी बसविण्यात ह्या सार्या विरोधी पक्षाचां हातखंडा. तशी तालीम ह्या मंडळीनी ह्याआधी चरणसिंह आणि चंद्रशेखरांच्या वेळी केली होती. नरसिंहराव हे ही बसविलेलेच पंतप्रधान. कारण त्याचं सरकारही अल्पमताचंच. फक्त भाजपाने अविश्वासाचा ठराव आणला कि आपआपसात अविश्वास असणारी मंडळी एकत्र येत होती. अटलबिहारी वाजपेयींबद्दल ज्या विरोधी पक्षांना आदर वाटतो त्या मडंळीनी एका मताच्या फरकाने त्यांचे सरकार पाडले होते. त्यासाठी महाराष्ट्रातील पहेलवान शरद पवार ह्यांचा उपयोग झाला. मायावतीच्या साह्याने एक मत जे कमी पडत होते त्याची व्यवस्था शरद पवारांनी केली हे आपण टिव्ही वरून लाइव पाहिले. देशावर विनाकारण तेरा महिन्याच्या कालावधीत निवडणूकीचा प्रचंड खर्चाचा बोजा टाकला. आणिबाणीच्या खालोखाल पापकृत्य म्हणून भारतीय राजकरणाच्या इतिहासात ह्याची नोंद झाली. तेव्हाच खरं म्हणजे नियतीने नरेंद्र मोदीचा राष्ट्रीय राजकरणातील प्रवेश      निश्चित केला होता. आणि सोबत ह्या सार्या राजकीय नेत्यांची हाकलपट्टीही निश्चित केली होती. जनतेलाही कळून चूकले होते की वाजपेयींसारख्या उत्तुंग व्यक्तीमत्व असलेल्या नेत्यावर दुष्ट दृष्टी ठेवण्याचं पाप ह्या मंडळीनी केलं. त्यामुळे वाजपेयीचं सरकार पाडून सुध्दा पुन्हा निवडणुकीत भाजपप्रणित आघाडीचाच विजय झाला. तेरा महिन्याच्या कालावधीत कुठला लेखाजोगा मतदार मागणार होते? पण सत्तेसाठी सर्वात लाचार आणि संधीसाधू नेते म्हणजे शरद पवार, मायावती, मूलायमसिंग आणि लालूप्रसाद यादव. देशात सदैव अस्थिरता रहावी, त्यातून लोक कम्युनिझमकडे वळतील अशी आशा बाळगणारे डावे पक्ष, ह्या संधीसाधूना बाहेरून पाठिंबा द्यायला नेहमी तयार असतातच. येनकेन प्रकारे भाजपाला सत्तेत बसू द्यायच नाही, हेच ह्याचं ध्येय. आपला जन्मच सत्ताधारी म्हणून झालाय असा काॅग्रेसचा भ्रम. त्यामुळे जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली. पुढे वाजपेयींनी पाच वर्षे चांगल्या कारभाराचं दर्शन घडविले. परंतु भाजपाला अतिआत्मविश्वास नडला. पुन्हा काॅग्रेस पुरस्कृत आघाडी सत्तेत आली. मनमोहनसिंगांचा कारभार कसा होता ह्यावर चर्चा करण्याची गरज नाही. मोदी नावाचं अस्त्र भाजपाने आपल्या पोतडीतून काढले आणि ह्या सर्व पक्षांचा पायाच उध्वस्त केला. खरं म्हणजे लोकशाहीत प्रजाच मालक. मग मोदींनी ह्या पक्षांचा पाया उध्वस्त केला असं कां म्हणावं? श्री नरेंद्र मोदींच्या पुढे ह्या सार्याचं गुजरात मध्ये काही एक चाललं नाही. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करीत नाना प्रकारे मोदींचा छळ केला. भगवा आतंकवाद काय, इशरत प्रकरण काय, मौतका सौदागर काय, सारी यंत्रणा आणि मिडीया हाताशी धरून जेवढं मोदीं आणि भाजपाला बदनाम करता येईल तितके सारे महाउद्योग सार्या विरोधी पक्षांनी केले. परंतु ह्यांच्या पापाचा घडा भरला होता. जनतेने ह्या सार्या मंडळीनां आता एकेक राज्यातून उखडावयास सुरूवात केलेली आहे. अनेक वर्षे सत्ताधारी म्हणून वावरल्यामूळे लोकांकडे जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे ह्यांना जमत नाही. म्हणून त्यातील काही लोक भाजपामध्ये गेले. काही जाण्याच्या वाटेवर आहेत. भाजपामध्ये ती मंडळी जात आहेत म्हणून भाजपा इतर पक्षांची फोडतोड करीत आहे अशी ओरड अनेक विश्लेषक करतात. भारतीय राजकरणात आयाराम-गयाराम ह्या पध्दतीचा पाया स्वर्गीय इंदिरा गांधीनींच घातला आहे. हे सोयिस्करपणे विसरयाचे हा अनेक बुद्धीवाद्यांचा धंदा आहे. आता धंदा म्हटलं तर ह्यावर चर्चा तरी कशी करावी? काय धडा त्यांना द्यावयाचा हे मतदार राजालाच ठरवू द्या की.

आता मोदी आणि मोदींचे भक्त ह्यासंबंधी चर्चा करू या. मोदींवर टिका करीत असताना हमखास मोदींच्या भक्तांना अंधभक्त म्हणून संबोधले जात आहे. संबोधले जाते ऐवजी हिणवले जाते असा शब्दप्रयोग मी टाळीत आहे. कारण आज अनेक दृष्टीहीन समाजबांधव स्वकर्तृवाने विविध क्षेत्रात चागंल यश मिळवित आहेत. अंधभक्त असा शब्दप्रयोग करणार्यांनी प्रथम हे ध्यानांत घ्यावे कि कूण्या समाजबांधवाच्या शरीर रचनेवरून टिका करण्याचा अधिकार आपल्या देशाच्या संविधानद्वारा आपल्याला मिळालेला नाही. मी तर भाषातज्ञ आणि सरकारला सूचवू इच्छितो कि सर्व भाषांमधील मानवी शरीराच्या अवयवावरून जितक्या म्हणी, वाक्प्रचार वा शब्दप्रयोग आहेत ज्यामुळे काही समाजबांधवाना यातना पोहोचतील ते सर्व शब्द, वाक्प्रचार,म्हणी रद्दबातल करावेत. नाहीतरी अशा शब्दांमूळे भाषेचं सौंदर्य वाढते असे काही दिसत नाही. ज्याचां काही संबंध नाही अशा समाजबांधवांना अशा प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार, शब्दाद्वारे मानसिक क्लेश देणे ही सुध्दा एक प्रकारची हिंसा आहे. जागोजागी अशी हिंसा करणारे विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोदीजींना हिटलर तर कधी चहावाला म्हणून संबोधितात. आता ह्यानां काय म्हणाव? मोदींना हिटलर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त सबोंधणार्या विरोधी पक्षांच्या नेत्याचीं आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करू या. भाजपा सोडून भारतातील बहुतांश पक्ष मग ते राष्ट्रीय, प्रादेशिक,जिल्हा, किंवा तालूका पातळीवरील असो ते घराणेशाहीवर आधारीत आहेत. त्या सर्वांच्या पक्षांतर्गतील निवडणूका वैगरे नुसता फार्स असतो. जो पक्षाचा प्रमूख त्याचा आदेश हाच कायदा. त्यामुळे त्या पक्षातील कार्यकर्त्यांना तसेच नेत्यांना सर्वत्र हिटलर दिसत असावा. आणखिन दोन महत्वाच्या बाबी म्हणजे मानहानीकारक पराभव पचविण्याची ताकद ह्यांच्यात नसावी ,आणि दूसरी बाब ही कि मोदी सरकारवर टिका करण्यासाठी ह्यानां मुद्दा मिळत नसावा. मोदी समर्थकांना अंधभक्त हे लेबल ह्यांना कोठून सूचलं असेल? कदाचित ह्यानां ह्याच्यांच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्यासाठी डोळ्यावर कापडी पट्टी बांधून जावे लागत असेल कां? मी तो विचार सोडून दिला. आणि नंतर कळले कि ह्या घराणेशाही असलेल्या पक्षांची धूरा हळूहळू त्या घरातील शेंबड्या पोरांकडे गेलेली दिसत आहे. आणि तिथे त्या यूवा नेत्यांचे आजोबा शोभतील इतक्या वयाचे कार्यकर्ते देखील यूवा नेत्यांचे चरणस्पर्श करताना दिसत असतात. त्यामुळे ही मंडळी स्वतःची दृष्टी हरवून बसले असावेत का? तस असेल तर त्यातून मोदींचे समर्थक ह्यानां अंध दिसणारच त्यात नवलं काय ते. अर्थात मला काय वाटते ह्यापेक्षा जनता-जनार्दनला काय वाटते, हेच महत्वाचे ठरणार आहे. मी फक्त एवढेच सांगू शकतो कि पंतप्रधान मोदीसंबंधी जितका पराकोटीचा द्वेष कराल, तितका मोदींना लोकांचा पाठिंबा मिळत जाणार. गुजरातच्या तीन विधानसभा निवडणूकीचा प्रचार आणि निकाल आपल्या समोर आहे. निवडणुकीत मोदी हाच मुद्दा राहात गेला तर लोकांचा मोदी मोदी असा घोष सुरूच राहणार. तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणून हिणवण्याने भाजपा पराभूत होणार नाही हेच मला विरोधी पक्षांना सांगावयाचे आहे. भाजपा कार्यकर्ते किती? परंतु लाखो मतदार मोदींच्या पाठीशी उभे आहेत त्यांना तुम्ही अंध कसे संबोधणार? प्रथम विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डोळस वृत्तीने आत्मपरीक्षण करावे आणि मतदारांपर्यंत पोहचलं पाहिजे. परंतु ह्यातील बरेच पक्ष सत्ताधारी राहिलेले. त्यामुळे ह्यांचे कार्यकर्ते मिडीयावर चमकण्याच्या नशेत तर भाजपा, संघाचे लोक वार्ड आणि बूथ पातळीवर घाम गाळीत आहेत. विजयश्री कोणाकडे जाणार? 

शेतमालाची किंमती, अपूरं पर्जन्यमान, अपूरी सिंचन व्यवस्था, अवकाळी पावसामुळे होणारं शेतमालाचं नूकसान, ह्यातून होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या, कर्जपुरवठा,कर्जमाफी इत्यादी समस्या बाबत मोदी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या चकमकी चालू असतात. मूलतः ह्या समस्यांचा जन्म स्वातंत्र्याकाळापासूनचा आहे. भले हरित क्रांती, धान्य उत्पादनात आपलं स्वयंपूर्ण होणं ह्या जमेच्या बाजू असल्या तरी सिंचन व्यवस्थापनातील भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, त्यात सुधारणा करण्यासाठी लागणार्या दूरदृष्टीचा अभाव तसेच शेतमालाची होणारी नासाडी थाबंविण्याच्या उपाययोजनात आधूनिकता आणण्यातील अपयश, विविध पिकांच्या उत्पादनात लागणार्या जलाचा शास्त्रोक्त अभ्यास, जलस्त्रोत शोधण्यासाठीचं आणि जल साठवण्याच्या युक्त्या शोधण्यात अपयश, बी बियाणे, वीजेचा पुरवठा , धरणातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी किती, शेती, उद्योग तसेच एकमेकांच्या शेजारी असलेल्या स्वभाषिकांना किती, त्यातही एकमेकांच्या शेजारी असलेल्या प्रान्तामधील विवाद इत्यादी गोष्टीचं खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचं हेच सरकार आणि विरोधी पक्षांमधील लढाईच स्वरूप आहे. केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून श्री शरद पवार होते. त्यांचा शेती ह्या विषयांवरील अभ्यास दांडगा असूनही ते कूठेतरी कमी पडले असा रोष जनसामान्यांत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. केवळ मोदींच्या "अच्छे दिन आयेंगे " ह्या घोषणांनांना भूलून लोकांनी मोदींजीना आणि फडणवीसांना सत्तेवर बसविले नाही. आजचा मतदार भूलथापांना बळी पडणारा नाही. स्वच्छ चारित्र्य आणि लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे कोण हे आता जनतेला चांगलं कळतयं. महाराष्ट्रापुरता म्हणायचं झालं तर साखर उत्पादनावर आणि साखर कारखानदारीवर तसेच जिल्हा सहकारी बॅंका ह्या तिन्ही संस्थावरील अमर्याद सत्ता ह्यामूळे काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काग्रेसचे नेते आधूनिक संस्थानिक झाले अशी भावना सर्वसामान्यात आहे. तसेच दहा वर्षात जी काही कर्जमाफी झाली, त्याच्या वाटपातही घोटाळा आहे. जिल्हा सहकारी बॅंकाही तोट्यात. सरकारी तिजोरीत ठणठणाट आणि राज्यावर प्रचंड कर्जाचा बोजा अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी कारभार हाती घेतला. शेतकर्यासाठी जल शिवारं, कर्जमाफी, शेतमालाची खरेदी विक्री मधील दलाली संपुष्टात आणण्याचं काम असो त्यात त्यांचा प्रामाणिकपणा दिसतोय. तरीही विरोधी पक्ष तसेच शिवसेनेची टिका सुरूच आहे. दूध आणि शेतमालाची ,सरकारी मालमत्तेचं नुकसान करीत आंदोलनं चालूच राहणार असतील तर ह्या तिन्ही पक्षांकडे चांगला पर्याय आहे, तो म्हणजे फडणवीस सरकारवर अविश्वासाचा ठराव पास करून राज्यात नवीन शेतकर्याचं हितरक्षण करणारं सरकार स्थापन करावं, किंवा मध्यावधी निवडणूकीला सामोरं जावे. लोकभावना काय आहे हे मतदानाद्वारें कळेलच की. उगीच तमाशा कशाला? आपला महाराष्ट्र पुरोगामी! फूले-शाहू-आंबेडकरांचा वारसा जपायला हवा ना!

आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने श्री रामनाथ कोविंद ह्यांना उमेदवारी दिली. ह्यावर चर्चा होताना त्याचं दलित होणं ही राजकीय खेळी आहे असा कयास विरोधी पक्षांनी लावला आणि मीराकुमारींना मैदानात आणले. परंतु आतापर्यंत डाॅ अब्दुल कलामांचा अपवाद वगळता बहुतांश राष्टपतीपदासाठी उमेदवार काही ना काही राजकीय स्वरूपाचा फायदा वा सोय बघूनच निवडले गेले आहेत. ते कूणी निवडले? ह्यावर चर्चा करावयास कोणी मोदी विरोधक येणार नाहीत. सत्य हेच 'जे पेरले ते उगवते'. किंवा आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येते हा सृष्टीचा नियम आहे. विरोधी पक्षांनी राजकीय मैदानावर जे नियम केले त्याच नियमानुसार मोदीजी खेळत असतील तर चरफडण्यात काय अर्थ? विरोधी पक्षातील नेते म्हणत असतात कि "मोदीजीको प्रधानमंत्रीपदके गरीमाको भूलना नही चाहिये". पण मोदी पंतप्रधान आहेत ही बाब विसरावयाची आणि त्यांच्यावर खालच्या पातळीवर येऊन टिका करावयाची. त्याचं काय? आपलं जाऊ द्या हो. मतदारांना काय वाटते हे आपल्याला कूठे माहित आहे?  ते सारे जण लोकसभेच्या पुढील निवडणुकीत उत्तर देणार. 

राहता राहिला प्रश्न अलीकडच्या GST संदर्भातील. नोटबंदी असो वा GST ह्या संबंधी अनेक जाणकारांची मते भिन्न. जगातील सर्व घड्याळ निर्मिती करणार्या कंपन्यांनी कितीही दावा केला तरी त्यांनी तयार केलेली घड्याळे एकाच वेळी तंतोतंत अगदी सेंकदाचा फरक न दाखविता वेळ दाखवू शकतात कां? नाही हाच आपला अनुभव. तसेच अर्थशास्त्रातील तज्ञ ह्या GST आणि नोटासंबंधीच्या विषयांवर भिन्न मते मांडणार. GST संदर्भात निदान एक गोष्ट स्पष्ट आहे कि सार्या राजकीय पक्षांनी केवळ सहमतीनेच नव्हे तर एकमताने बील केलं  पारीत आहे. त्यामुळे आता GST संबंधी सोशल मिडीया वा टिव्ही चॅनेलद्वारे दिसणार्या चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यह आहे. कारण विरोधी पक्षांनीही ह्या विषयाचा चेंडू २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदाराच्या कोर्टवर ढकलला आहे. लोकशाहीत निवडणुकीतील निकालानेच सरकारच्या कामगिरीचे व विश्वासाहर्यतेचे मूल्यमापन होत असते. जनतेचा कौल बघितल्यानंतर एकच वाक्य आपल्या सर्वाच्या मूखी असते ते म्हणजे "ये पब्लिक है, सबकुछ जानती है!".

गुरुवार, ६ जुलै, २०१७

आषाढी एकादशी निमित्ताने



आज आषाढी एकादशी. आपल्या हिंदू धर्मातील मान्यते नुसार भगवंत चार महिन्यासाठी झोपी जातात. मागील लेखात मी भगवंतांचं स्वरूप जशी दृष्टी तसे त्या शक्तीचं रूप असे म्हटलेलं आहे. आणि त्यातूनच विविध स्वरूपाने नटलेल्या त्या शक्तीचं रूप ज्यांना जसं दिसलं ते ते त्या धर्माचे संस्थापक म्हणून गणले गेले आणि त्यानुसार धर्मांची नावे उदयास आली असावीत. असा निष्कर्ष आपण काढला. आपल्या धर्माची व्याख्या फार व्यापक असल्यामुळे,आणि कोणी संस्थापक नसल्यामुळे 'जो समाजाची धारणा करतो तोच धर्म ' तोच शाश्वत धर्म,असे आपण मानले. आणि तोच हिदूं ह्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आपल्या सर्व सणांच्या उद्दिष्टांमागे कुठलंतरी एक सामाजिक प्रयोजन असतेच. ह्यासंबंधीचं परिपूर्ण आणि सुरेख विवेचन स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्या ' संस्कृती पूजन ' ह्या पुस्तकात आढळते. पूजनीय शास्त्रीजी देवशयनी एकादशीच्या निमित्ताने संदेश देतात तो असा "कर्म करा पण अभिमान करू नका. कर्म करतांना ' मी ' ची समाधी लागू दे. 'अहम ' गाडा, झोपू द्या. प्रभू झोपी गेला म्हणजे अहम् न ठेवता तो स्वतःचे कर्म म्हणजे जगव्यवहार करीत राहिला". अशा प्रभूचं स्वरूप ज्यांना पुर्णपणे कळले आणि आपल्यातील 'अहम् ' ला गाढून ज्यांनीं जगाच्या उद्धारासाठी आपलं जीवन वेचलं ते देवदूत वा संतजन. त्यांचा ह्या भूतलावरील वावर ही सृष्टीची आपल्याला मिळालेली देणगी होय.

संतांच्या शिकवणीत आणि त्यांच्या साहित्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणी शुद्ध भाव निर्माण करण्याची क्षमता आहे. संतंमंडळींचं चरीत्र आणि त्यांचे साहित्य थोडेफार जरी कळले, तरी त्यांच्या बुद्धीमत्तेचा आवाका पाहून आपण अचंबित होतो. ह्या संतमडंळींचा भूतलावरील वावर पाहिला, तर आपल्या लक्षात येते कि ही सारी मंडळी एकाच जन्मात शांतीदूत, तत्ववेत्ता, साहित्यिक, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, प्रबोधनकार, समुपदेशक, व्यवस्थापनकुशल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवजातीचेच नव्हे तर सार्या प्राणीमात्रांचे पालक होते. आपण म्हणतोच कि "जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती!". मंडळी, आपल्याच नव्हे तर जगभरातील सर्वच संतांनी आपआपल्या परीने, आपआपल्या भाषेत जो काही उपदेश दिला आहे, त्यात फारसा फरक नाही. तसेच संतांच्या वाटेला आलेली उपेक्षता, छळ ह्यातही बरेच साम्य दिसून येते. संतांच्या संपूर्ण कार्यावर तसेच साहित्यावर चर्चा करणे ही अशक्यप्राय बाब आहे. एक सत्य असे आहे कि संतांना सारी सृष्टी प्रिय होती तसेच सृष्टीतील सत्यें त्यांनी जाणली होती आणि ही बाब त्यांनी आपणांस सांगितलेल्या जीवनमूल्यांतून समजू शकते. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुध्द भाव रूजावा ह्यासाठी संतांनी नामस्मरणावर भर दिला. ह्यामागे एक मानसशास्त्रीय सत्य असावे ते असे की, माणूस जन्मतो आणि चालायला, बोलायला लागतो,असे घडत नसते. संतानांही संतपदापर्यत पोहोचताना कुठली तरी शक्ती मग ती गुुरूरूपाने किंवा एखादी घटना वा अनुभूतीच्या रूपाने मदतगार ठरली होती.  कुठलीतरी एक शक्ती ह्या विश्वाचं नियंत्रण करीत असते. त्या शक्तीचं जे रूप आपल्याला भावते त्या शक्तीला शरण जाणे म्हणजेच नामस्मरण होय!  त्यातून आपला अंहकार जो जन्मताच आपल्यात असतो, तो कमी होतो. तसेच जन्मतः भीती असते तीही नष्ट होण्यास मदत होते. म्हणजेच आत्मविश्वास वाढतो. आणखिन सांगायचे म्हणजे, आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रभाव हृदयाखालोखाल मेंदूत जास्त असतो. नामस्मरणामूळे आपल्या शरीरात विराजमान असलेली सकारात्मक ऊर्जा सशक्त बनते आणि चंचल असलेले मन स्थिर बनते. त्यातून एकाग्रता वाढते. कुठल्याही क्षेत्रातील यशाचा मार्ग आत्मविश्वास आणि एकाग्रतेतूनच दिसतो. हे सत्य तर आपल्याला दैनंदिन जीवनातही अनुभवयास येते. शेवटी यश हेच तर स्वर्गीय आंनदाचं दूसर नाव आणि तेच परमआत्म्याचे सत् चीत् आनंदमय रूप. 

नामस्मरणाबरोबर सुसंगतीचं महत्व, श्रमाचं वा प्रयत्नाचं महत्व, परोपकार आणि परपीडा न देणे ह्यावरही संतानी जास्त भर दिलेला आहे असे मला वाटतं. आपले तुकाराम महाराज म्हणतात "संग सज्जनांचा, उच्चार नामाचा!". मोरोपंतांनी म्हटलं आहे, "सुसंगती सदा घडो!". दूर्जनांची संगत घडली कि, निसर्ग नियमानुसार आपण सराईत गुन्हेगारच होणार. मग कूठल्या क्षेत्रात काम करता हा प्रश्न गौण आहे. प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात फसवाफसवी, बनावटगिरी असतेच. दूर्जन वा दूष्टप्रवृत्तीची लोक मूळात असतातच कां? किंवा सामान्यतः माणूस पूर्णतः शुध्द अंतःकरणाचा का नसतो? हा आपल्याला नेहमी सतावणारा प्रश्न. त्याचही उत्तर सृष्टीचा नियम वा तत्व ह्यातच दडलं आहे. जशी झाडावरून कोकीळेचं मधुर कुजंन ऐकू येते तसाच आपणांस भयभीत करणारा घुबडाचे कर्कश खेसकणेही ऐकू येते. निसर्गात काटेरी झूडपे कशीही आणि कोठेही वाढतात. त्यांना त्यांच्या वाढीसाठी, ना सूर्यप्रकाश लागतो, ना पाणी! ना खतें, ना मशागत! आंबा-फणसांच्या झाडांच्या वाढीसाठी किती अपार कष्ट लागतात, हे आपण पाहतोच आणि म्हणूनच सत्संगला संतांनी मानवी जीवनात अग्रकमाने महत्व दिल्याचे दिसून येते. सत्संग महत्वाचा का? असा प्रश्न नारदमूनींनाही पडला होता. तेव्हा भगवंतांनी त्यांच्या शंकेचं निरसन केले. त्यासंबंधीची एक कथा पूजनीय श्री रामकृष्ण क्षीरसागरमहाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितली आहे. ती थोडक्यात अशी आहे.

देवर्षी नारद, भंगवंताना "सत्संगचे जीवनात महत्व काय?",असा प्रश्न विचारतात. तेव्हा नुकताच जन्मलेल्या एका किड्याला हा प्रश्न विचारून ये. असे भगवंतं सांगतात. नारदमूनी किड्याला तो प्रश्न विचारतात, तात्काळ किडा मरून पडतो. भगवंतं नारदानां नुकताच जन्मलेल्या कूत्र्याकडे पाठवितात. प्रश्न तोच. नारदानी प्रश्न विचारला तेव्हा ते कूत्रं मरण पावते. नंतर गाईच्या वासराबाबतीत असेच घडते. आपल्या प्रश्नामूळे तिघांना मरण आले ही बाब नारदांच्या जिव्हारी लागली. भगवंतांनी त्यांच सांत्वन केलं आणि हाच प्रश्न तेथील राजघराण्यात नुकताच जन्मलेल्या बालकाला जाऊन विचार अशी आज्ञा केली. नारदमूनी अनिच्छेनेच राजमहालात जातात. राजाने यथोचित स्वागत केले. नारदांनी राजाचे पूत्रलाभानिमित्त अभिनंदन केले आणि सांगितले कि मला तुमच्या बाळाला एक प्रश्न विचारायाचा आहे. राजाने आश्चर्याने म्हटले, "देवर्षी, ते नुकतेच जन्मलेले बाळ कसे काय उत्तर देऊ शकेल". नारदांनी म्हटले, "राजन तशी भगवंतांची आज्ञा आहे." राजाने नारदांना बाळापाशी नेले. नारदांनी बाळाला विचारले, "बाळा,संत्संगचे महत्व काय?" आणि काय आश्चर्य! त्या बालकाने उत्तर दिले, "देवर्षी मी किडा असताना तुम्ही हा प्रश्न विचारीत आहात, तेव्हापासून तुमच्या संगतीतून मला उत्तोरत्तर उच्च कूळात जन्म मिळत गेला आणि आता राजकूळात जन्माचं भाग्य लाभलं. नारदांना सत्संगचं महत्व कळले. सुसंगतीतून सत्याचा साक्षात्कार होतो तर कूसंगतीत सत्यानाश होत असतो. संतांनी सुसंगतीसाठी इतका कमालीचा आग्रह का धरला असावा, ह्याच कारण काय असू शकते? इथेही वैश्विक सत्य दडलेलं दिसते. ते सत्य असे कि "Man gets attracted towards bad ideas in faster manner". विकृतीकडे मानवी मन लौकर धावते. त्याच बरोबर विकृतीचं लोण ही लौकर पसरते. हयावरून संतांचा मानसशास्त्र व समूह मानसशास्त्राचाही (Group Psychology) अभ्यास होता, हे स्पष्ट दिसते. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम सत्संग निर्माण केला. त्यातून वारकरी पंथ निर्माण झाला,आणि बहरला. समतेचा झेंडा फडकला. आणि आज पढंरीची वारी जगभरातील अनेक विद्वानांच्या कुतूहलाचा विषय ठरला.

संतांनी सृष्टीतील आणखीन सत्य जे आपणासमोर मांडले आहे, ते हे कि "जी सृजन होते ती सृष्टी". आणि विधात्याने विश्वाची रचना अशी केली आहे, कि इथली सृष्टी सृजन करण्यासाठीचे प्रयत्न वेळोवेळी मानवालाच करावे लागणार आणि तेही आपल्यातील अंगभूत निर्मितीशक्तीतूनच. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी निसर्गदत्त अशी कुठली तरी कला वा शक्ती असते. "अयोग्यः पुरूषः नास्ती|". समाजातील प्रत्येक व्यक्तीमधील निर्मितीशक्ती, सृजनशीलता शाबूत रहावी, तिच्यात नाविन्यता यावी, तसेच आळसरूपी राक्षसाने ती गिळू नये, त्यासाठी संतानी छोटे-मोठे दृष्टांत सांगून देवाची व्याख्या "यत्न तोची देव" किंवा "प्रयत्नांती परमेश्वर " अशी मांडलेली दिसून येते. क्षेत्र कोठलेही असो, नामस्मरण, सत्संग आणि अथक परिश्रम ह्या मूल्यांचे महत्व अपार आहे. संतंमंडळीनीं नामस्मरणावर भर निश्चित दिला,परंतु सर्वसामान्यांनी आकाशातील देव आपलं भलं करील अशी आशा बाळगून आपल्या ठायी असलेली निर्मितीशक्ती वाया घालवू नये, ह्यासाठी संतंमडंळीनी उपदेश देताना "प्रयत्नांती परमेश्वर " ह्यावर अधिक भर दिलेला दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " भाग्याचिये भडसे | उद्यमाचेनि मिषे | मग समृद्धीजात आपैसे | घर रिघे |. अग्नी अति सुक्ष्म असला तरी वार्याच्या साह्याने चेतून मोठा होतो त्याचप्रमाणे कर्माच्या साह्याने दैव कितीही दुबळे असले तरी ते चेतले जाऊन मोठं यश मिळून जाते. एडीसन ह्या शास्त्रज्ञाचे म्हणे नऊशे नव्याण्णव प्रयोग असफल झाले आणि नंतर हजाराव्या प्रयोगात त्यांना टेलीफोनचा शोध लावण्यात यश मिळाले. अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात यश मिळाल्याची उदाहरणे देता येतील. मूळात विद्वत्ता आणि कुवत ह्यांच्यामध्ये एक फरक आहे. An intelligent man not necessarily be an abled man. विद्वान व्यक्ती कर्तबगार असतेच असे काही म्हणता येत नाही. परंतु विद्वत्ता नसतानाही एखादी व्यक्ती कर्तबगार बनू शकते. Ability has to be acquired. कुवत ही कमवावयाची असते. त्यासाठी आलेली संधी गमावयाची नसते. इग्रंजीमध्ये संधीची व्याख्या अशी आहे, Opportunity means a course of action which is immediately possible. काही शास्त्रज्ञ शालेय जीवनात अभ्यासात साधारण श्रेणीचे होते. तसेच काही उद्योगपतीही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात उच्च श्रेणीचे नव्हते. मूळात जिज्ञासा महत्वाची आणि त्याच्या जोडीला चिकाटी असणे गरजेचे असते. चिकाटी विना जिज्ञासा माणसाला अधिक चंचल बनविण्याचा धोका असतो. एकदा एक अध्यात्मिक गुरू जीवनात चिकाटीचं महत्व आपल्या शिष्याला पटवून देत होते. त्यावेळी एका शिष्याला गुरूला निरूत्तर करण्याची इच्छा झाली. त्या शिष्याने गुरूला विचारले, "गुरूवर्य मी चाळणीत पाणी घालीत आहे,तर चालता चालता मी चिकाटीने कोठवर चालत जावे, जेणेकरून चाळणीत पाणी जमा झालेलं असेल. मला वाटतं ह्या ठिकाणी तुम्ही सांगितलेली चिकाटी उपयोगी पडणार नाही". परंतु गुरू ते गुरूच. गुरूने लागलीच उत्तर दिले, तू चाळणीत पाणी टाकत टाकत उत्तरेकडील शेवटच्या टोकापर्यंत चालत राहा. एक दिवस तु चाळणीत टाकत असलेले पाणी बर्फाच्या रूपात साचलेले आढळेल. संतांनी सांगितलेला यत्न तोची देव, तो अशाच रूपाने दर्शन देतो.

महर्षी व्यासांनी अठरा पुराणातील महत्वाची दोन वचने कोणती ह्यावर उत्तर देताना म्हटले आहे " परोपकाराय पुण्याय,पापाय परपीडनम्|". ह्या सृष्टीचा कारभारच मूळी कर्माच्या सिध्दांतावर आहे. असेच भंगवंतानी गीतेत पदोपदी सांगितले आहे. "पेरीले ते उगवते" "करावे तसे भरावे", संताची ही दोन्ही वचने म्हणजे सृष्टीतील सत्यच होत. पूजनीय स्वामी सुखबोधानंदानी आपल्या "हे मना, रिलॅक्स प्लीज!" ह्या पुस्तकात एक बोधप्रद सत्यकथा सांगितली आहे. ती थोडक्यात अशी आहे - 

फ्लेमींग या स्काॅटीश शेतकर्याने एकदा मदतीकरीता कुणीतरी धावा करीत असल्याचे ऐकले. एक छोटा मुलगा कमरेपर्यंत चिखलात रूतला होता. आणि सुटकेकरीता धडपडत होता. फ्लेमिंगने त्या मुलाचे प्राण वाचविले. दुसर्या दिवशी अत्यंत रूबाबदार पोषाख केलेली एक कुलीन व्यक्ती फ्लेमींगकडे आली आणि म्हणाली," तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचविले. तुमच्या या सद्कार्याकरिता मला तुम्हाला बक्षिस द्यावयाचे आहे". "छे,छे, त्या कामाचे बक्षिस कशाला हो, ते तर माझे कर्तव्यच होते," फ्लेमिंग उत्तरला. तेथेच उभ्या असलेल्या मुलाकडे बोट दाखवित त्या घरंदाज व्यक्तीने विचारले,हा तुमचा सुपुत्र होय?"फ्लेमींगने होकारार्थी मान डोलाविली. सदिच्छेच्या भावनेतून त्या घरंदाज व्यक्तीने फ्लेमिंगच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली. काही वर्षे लोटली. फ्लेमिंगचा सुपुत्र पुढे सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग झाला,ज्याने पेनिसिलीनचा शोध लावला. तर दुसरीकडे त्या कुलीन व्यक्तीचा पुत्र जिवघेण्या न्युमोनिया ह्या रोगाने आजारी पडला. त्या मुलाचे प्राण कुणी वाचविले? तर ती होती पेनिसिलीनची लस! त्या कुलीन व्यक्तीचे नाव होते लार्ड रॅन्डाॅल्फ चर्चिल आणि जे न्युमोनियातून वाचले ते त्यांचे सुपुत्र, त्यांच नाव सर विन्स्टन चर्चिल! दुसर्या महायुद्धांतील इंग्लंडच्या विजयाचे नायक! शेवटी "जे तुम्ही देता,तेच फिरून तुमच्याकडे परत येते. "परोपकाराय पुण्याय:" हेच सत्य. 


अशीच एक दुसरी कथा--- एका खेड्यातील दुधदुभत्याचा व्यवसाय करणारा एक शेतकरी गावातील बड्या दुकानदाराला रोज एक किलो लोणी विकत असे. एके दिवशी त्या दुकानदाराने त्या शेतकर्याकडून लोणी घ्यावयाचे नाकारले, आणि शेतकर्यावर रागावूनच म्हटले, "तु फसवेगिरी करतोस,तुझे लोणी शंभर ग्रॅम कमी भरते". त्यावर तो गरीब शेतकरी गयावया करीत म्हणाला " शेठजी, असे करू नका,माझ्यावर दया करा. मी खरच लबाडी करीत नाही. माझ्याकडे तराजू आहे पण वजनाचं माप कुठे आहे ?, 'आपणच मला एक किलोची साखर देता तेच माप म्हणून वापरतो". असे म्हणत त्या शेतकर्याने दुकानातील एक किलोच्या साखरेचं पाकीट तराजूत ठेवून दुसर्या बाजूला स्वतः आणलेल्या लोण्याचा गोळा ठेवला. पाहतो तर दुकानदाराचीच लबाडी उघडकीस आली. लोण्याचं वजन आणि साखरेचं वजन समसमान." पापाय परपीडनम्!".' करावे तसे भरावे '! "जे तुम्ही देता,तेच फिरून तुमच्याकडे परत येते". ह्याहून अधिक स्वच्छ सृष्टीचा नियम तरी कुठला?.

साध्या राहणीचे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचे महत्व संतानी वेळोवेळी पटवू दिले. उपयोग आणि भोग ह्यावर छोटे छोटे दृष्टांत देऊन भोगवृत्तीवर प्रहार केले. सर्वांच्या गरजा पुर्या करण्याइतकी क्षमता आपल्या धरणीमातेची आहे, परंतु लालसा पुरी करण्यात ती कमी पडणारच आणि म्हणून संतांनी स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवून आदर्श निर्माण केला. मग ते आपले तुकोबा महाराज असो वा साॅक्रेटिस असोत,संत हे देवदूतच हो.

सारांश रूपाने म्हणायचे असल्यास एवढंच म्हणू या की, मानवाची कितीही प्रगती झाली असेल आणि होत जाणार असली तरी सृष्टीतील महत्वाचं सत्य हे आहे कि विज्ञानातून येणारी हर एक नवीन सुविधा, एका नवीन असुविधाला जन्म देत असते. आणि त्यातून धोक्याची घंटी ऐकू येत असते. मग ती पर्यावरणासंबधी असो वा वाढते सायबर क्राइमच्या घटना असो. वाढते अत्याचार असो वा बलात्कार की गुंडगिरीच्या घटना असो. संपत्तीविषयक भांडणे वा सीमासंबंधीचे वाद असो. किंवा शस्त्रस्पर्धेतून घोघांवणारं तिसरे महायुद्धासंबंधी असो. पिण्याचे पाणी,ऊर्जा इधंन असे एक ना अनेक बाबींचा तुटवडा पडत जाणार. विचार तर संपूर्ण मानवजातीने करावयास हवा. शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले ते मानवाच्या कल्याणासाठी हे निश्चीत. उर्जेची कमतरता भासू नये ह्यासाठी अणूचा शोध लावला. विनाशकारी वा संहाकरक शस्त्रे बनविण्यासाठी नाही. असं म्हटलं जातं कि संपूर्ण सृष्टी ही एका नियमानुसार चालत आहे. तो नियम म्हणजे उत्पती, स्थिती आणि लय म्हणजे विनाश. आणि पुन्हा उत्पत्ती. सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे यत्किंचित काजव्याने सूर्याचे तेज फिके पाडण्याचा प्रयत्न होय. एक सृष्टी नष्ट झाली तरी त्या विश्वाला काही फरक पडेल असे वाटत नाही. मानव नव्हता त्या कालातही पशू पक्षी इत्यादी प्राणी होतेच. समुद्र होते ,नद्याही वाहात होत्या. सृष्टीला आणि ह्या विश्वाला मानवाची अत्यंत गरज आहे, असे काही अनुभवयास येत नाही. उलट इतर प्राण्यांपेक्षा मानवाला विशेष उपयूक्त अशी ही सृष्टी आहे. सृष्टीत मानवासाठी असलेल्या अनुकुलतेचा फायदा मानवाने करीत रहावे, आपला ऐहिक आणि परलौकीक विकास करीत सहजीवनाचा आनंद घ्यावा. मानवाने स्वतःहून स्वतःच्या विनाशासाठी खड्डा खणू नये. हीच संतांची शिकवण. आणि हेच सृष्टीचे बोल. "नरेची केला नर किती हीन "अशी स्थिती येऊ द्यावयाची की, "नरकी करणी नरका नारायण हो जाय " हे सत्यात आणावयाचे. सृष्टी हसत हसत मानवाला सांगत आहे. Choice is yours. 

जय योगेश्वर !

गुरुवार, २२ जून, २०१७

चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः |



आपल्या प्रातःस्मरणीय प्रार्थनेत,

"पृथ्वी सगन्धा सरसास्त आपः | स्पर्शीच वायू, ज्वलनच्च तेजः | नभः सशब्दम् महता सैहव|" असे  पंचमहाभूतांचं वर्णन आहे.

ओम् हे नादब्रह्म तसेच शब्दब्रह्म. सा,रे,ग,म,प, ध, नी, हे सप्त स्वर. कळकाच्या बेटातून वाहणार्या वार्याचा सळसळ आवाज, धबधब्याचा एकसूरी ताल, आंब्याच्या झाडावरून ऐकू येणारं कोकीळेचं सुमधूर कुजंन, समुद्राच्या लाटांचा चौघडा, उंच उंच ताडामाडाच्या गुजगोष्टी, विविध पक्ष्यांची सुरेल किलबिल, इत्यादींनी ज्यांच्यावर मोहिनी घातली, त्यापैकी कोणी गायक, कोणी वादक, तर कोणी संगीतकार वा वादन- यंत्रनिर्माते झाले. पृथ्वी ही रसपूर्ण आहे. जसा ज्यांचा स्वभावधर्म, त्याला अनुसरून कोणी काव्ये रचली,कोणी कथा,कादबंरी वा नाटय लिहली. बदलते ऋतुमानातूनही कोणाला काव्ये सूचली. ही सारी साहित्यिक मंडळी.  माणसांच्या, पशू-पक्षी इत्यादींच्या आहार-विहारावरून कोणाला विनोदी कथा,तर कोणाला चूटके- विडबंन स्फुरलें. तर काहींना मनोरंजन करण्याची स्फुर्ती मिळाली. ते कलाकार झाले. हिरव्यागार घनदाट जंगलातील निरव शांतता, खळखळणारे झरे,अजस्त्र डोंगर काहींच्या मनांत मूर्तीमंत पावित्र्य साकार करीत जीवनाचं दर्शन घडविणारे महाकाव्ये स्पूरली, ती मंडळी तत्ववेत्ता आणि संतजन म्हणून अजरामर झाली. पृथ्वीवरील ऋतुमानातील बदल, समुद्राला येणारी भरती-ओहटी, रोज उगवणारा सूर्य, कलेकलेने वाढत आणि कमी होत जाणारा चंद्रमा,मेघांचा गडगडाट, आकाशातून चमकणारी वीज,अंनत तारे-तारकांचा समूह इत्यादींबाबतचे गूढ, ह्यातून कवी मंडळी निर्माण झाली. आणि ह्यांत ज्यांना आव्हान वाटलं ती सारी मंडंळी शास्त्रज्ञ, संशोधक,तंत्रज्ञ,तसेच भौतिक, रसायन, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र इत्यादींचे अभ्यासक म्हणून उदयास आली. पुढे औषधनिर्मिते, डाॅक्टर मंडळी इत्यादी उदयास आली.

पंचमहाभूते म्हणजे सर्वात मोठी संसाधनं. जेथून सार्या प्रेरणा प्रक्षेपीत होतात, तेथेच सार्या घडमोडी, क्रिया विसावल्या जातात आणि त्याही जशाच्या तशाच,तेच आकाश नावाच महाभूत. आजचे रेडीओ, टेलीव्हिजन, मोबाईल, माहिती आणि तंत्रज्ञानातील आधूनिक क्रान्तीचं माहेरघर म्हणजे आकाश. ते ही शास्त्रज्ञांच्या मनाचं आणि बुद्धीच निवासस्थान ठरले. आपली धरतीमाता तर अनेक खनिज संपत्तीचा खजीना. वृक्ष,फळं फूलं,वन-वेली अनेक प्रकारच्या धांन्यांचीही खाण. त्यातून मानवाला लागणार्या भूकेचं शमन करण्यासाठी अन्न निर्माण करण्याची कल्पना सूचली ती सारी मंडळी शेतकरी ,ज्यांना वस्तूनिर्मितीचे अंग आहे अशांना विविध धातूपासून उपयोगी वस्तू, कारखाने, कलाकुसरी,हत्यारे उर्जा निर्मितीचं स्पुरण मिळाले आणि ते सारे उत्पादक वा उद्योजक असे गणले गेले. जिथे उत्पादन,तिथे मागणी आणि ग्राहक ही तयार. ही सुध्दा एक नैसर्गिक साखळीच. त्यातूनच व्यापार उदिम, विक्रीकला उदयास आली. आजच्या जगाचं जे स्वरूप दिसत आहे ते निसर्गाच्या परिवर्तनिय नियमाची म्हणा वा उत्क्रांतीवादाची परिणीती आहे. ह्या जगाचं वर्णन अनेक भागात करता येईल, इतकं ते विस्तराले आहे. हे जग आर्थिक-जगत, कला-जगत, राजकीय-जगत,शिक्षण-जगत, औद्योगिक- जगत,व्यापार-जगत, अध्यात्मिक-जगत, क्रिडा-जगत, स्पर्धा-जगत,विज्ञान-जगत, तंत्रज्ञान-जगत अशा विविध रूपात वाढत जात आहे. ह्यालाच आपण काळाचा महिमा म्हणतो. शास्त्रज्ञ म्हणतात "When there was nothing in existence, time was there". आपल्या संस्कृतीतला महाकाळ, शीवच तो आणि तोच ईश्वर. सृष्टीच्या स्वरूपाची व्याप्ती आपल्याला दिसू लागली, तरी ती अंशात्मकच. कारण अजूनही सृष्टीतील बरीच रहस्ये मानवाला ज्ञात झालेली नाहीत. आणि त्या रहस्यांमागे जितके आपण धावू, तितकी ती पुढे जात राहणार. काही रहस्ये आपल्या हाती गवसतील तर काही नवीन निर्माण होत राहतील. ह्या सृष्टीचा तो नियंता वा विश्वभंर म्हणा वा कानडाचा राजा, त्याचा अंतपांर वेदानांही कळलेला नाही, हेच खरे. आपण जे काही मिळवितो, ते सारे सृष्टीतूनच, आणि जे काही गमावितो ते ही सृष्टीतच समाविले जात असते.

मला वाटते, "विश्वाची निर्मिती ही ईश्वराची लीला आणि तिचा शोध ही मानवाची कला!". कलेचा जन्म मानवाच्या कल्पनाशक्तीतूनच होतो. दस्तुरखुद्द विख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणतात 'Imagination is more important than knowledge.' अर्थ हा कि, कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्वाची असते. आपले शास्त्रकार म्हणतात, ज्ञान हे पूर्ण असते आणि त्या अनुषंगाने विचार करता आपली कल्पनाशक्ती हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचं माध्यम असावं. त्यामुळे साहित्य, संगीत, गायन, नाट्य, क्रिडा, जाहिरात, चित्रकला, शिल्पकला, अभिनय ह्याच केवळ कला नसून विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, शेती, छोटे-मोठे उद्योग, व्यापार ह्या सार्या कलाच ठरतात. इतकेच नव्हे तर ऋषीमुनींची तपश्चर्या ही सुध्दा एक कलाच होय.

क्षेत्र कुठलेही असो, प्रत्येक क्षेत्राच्या जन्मामागे जी प्रेरणा असते ती निसर्गातूनच प्राप्त होते. त्या प्रेरणाचं स्वरूप "जशी दृष्टी तशी सृष्टी" असेच असावे. त्यामूळेच कला क्षेत्र इतके विस्तृत झालेले आपण पाहात आहोत. कुठल्याही कलेच्या जन्मानंतर सराव, नंतर सवय, त्यापुढे स्वभाव बनत असावा आणि त्या स्वभावानुसार माणसं आपली विहीत कर्म पार पाडीत आली आहेत. त्यातून होणारा निर्मितीचा अविष्कार हा त्या त्या माणसांचा विशेषगूण मानला गेला आणि त्या त्या विशेषगुणांचे नामकरण आणि पाठोपाठ वर्गीकरण झाले असावे. पुढे अंकशास्त्र ,संख्याशास्त्र आणि पैसा नावाचं एक  विनिमयाचं साधन उदयास आले. त्यामूळे आर्थिक प्राप्ती,  ही बाब सुध्दा  समाजचं आणखीन वर्गीकरण करण्यासाठी एक निकष ठरू लागली आणि त्यातून आर्थिक स्तर निच्चित होऊ लागले. म्हणजे आधुनिक युगातही वर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहेच. ह्या सार्याचा अर्थ काय? " चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविभागशः"|. असाच मानावा कां? बहूदा तेच सत्य.

कलेच्या कुठल्याही वर्गात तुम्ही मोडत असाल तरी, एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या कलेतील तुमच्या प्रगतीचा आलेख झटपट उंचावत जातो. परंतु त्या कलेत प्राविण्य मिळविण्यासाठी वा highly professional (निष्णांत) होण्यासाठी करावा लागणारा प्रवास फार खडतर तसाच प्रदीर्घ असतो किंवा अंनतच असतो असेच समजावे. प्रत्येक क्षेत्रात Sky is the limit and Excellence is always a moving target हाच आपला अनुभव. मग आपोआप मुखातून बोल उमटतात "ईश्वरी लीला अगाध; तिला नाही अंत" हेच सृष्टीतील सर्वात पहिले तत्व वा सत्य. आईन्स्टाईन ह्यांनी हीच बाब वेगळ्या शब्दात मांडली आहे. ते म्हणतात ह्या विश्वात सर्वात गुढ वस्तू कूठली तर ती "हे विश्वच होय".

मानवाच्या कल्पनाशक्तीतून विभिन्न कला उत्पन्न झाल्या. त्यातून पुढे कर्म आणि नंतर कर्मानुसार वर्गीकरण झाले असावे, असा निष्कर्ष आपण काढला. त्या व्यवस्थेला आपण जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था वा वर्गव्यवस्था असे जरी म्हणत असलो तरी मूलतः ती नैसर्गिक विविधता आहे. असेच मला वाटते. कारण त्या व्यवस्थेची उत्पत्ती "जशी दृष्टी तशी सृष्टी" ह्या सिध्दांतातून जन्मली आहे. सृष्टीतील विविधतेतून जशी प्रेरणा मिळते, तशी दृष्टी प्राप्त होत असते. दृष्टी म्हणजे नुसते पाहणे नसावे. पाहणे ही क्रिया घडताना मनाची शक्ती आणि बुद्धीची शक्ती किती प्रमाणात जोडली गेली ह्यावर पाहिलेली वस्तू वा प्रसंग ह्याची निश्चित अशी जाणीव निर्माण होत असावी. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या ठायी बौद्धिक पात्रता  भिन्न असते. आणि  मनाची  स्थिती  क्षणोक्षणी  भिन्न होऊ शकते. त्यामुळे सृष्टीतील आणखीन एका सत्याचा परिचय होतो. ते म्हणजे " जशी बुध्दी, जशी मनशक्ती, आणि हो, जसे प्रयत्न, (यत्न तोची देव जाणावा ही तर संत वाणी म्हणजे सृष्टीचेच बोल) तशी कुवत. कुुुवत म्हणजे गुण" . त्याही पुढे "जशी कुवत तसे कर्म". त्यातून समाजात वर्ग निर्मिती झाली असावी. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे," चातुर्वण्यं मया सृष्टी गुणकर्मविभागशः|". ही सृष्टी तामस,रज,सत्व अशा त्रिगुणांची आहे. आणि जी वर्गवारी झाली ती गुणांनुसार. गुण परिवर्तनशील आहेत. उचीत साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात व राजसमधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो. हा उन्नतीचा मार्ग आणि उलटा प्रवास अवनतीचा. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मानुसार उच्च स्तरावर पोहचू शकते. जन्मानुसार कोणी उच्च नाही, ना कोणी नीच. परंतु जगभरातल्या प्रत्येक देशात सामाजिक संतुलन वेळोवेळी बिघडलयं आणि बिघडत असते. तसे आपल्या भूमीतही घडलं आणि घडतही आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांनी कुठेही जात-जमात पाहून त्यांच्या आचरणातून आणि व्यवहारातून कोणावर अन्याय केलाय असे महाभारतात उदाहरण दिसत नाही. हो "जसे कर्म तसे फल". हे सृष्टीतील सत्य भगवंतांनी मांडले. ते सत्य पडताळून पाहणे अगदी सोपे आहे. भिंतीवर चेंडू आपल्याकडे परत येण्याच्या उद्देशाने फेकला तर तो आपल्याकडे परत येणारच. चेंडू फेकताना योग्य ती गती आणि योग्य ती दिशा साधली कि नाही हाच खरा प्रश्न असतो. त्याचेच नाव कुवत. म्हणजे गुण. इतकी चर्चा पुुरी करून आपण परत  गुणापाशीच येतो. गुण तसे कर्म आणि कर्म तसे वर्ग.  म्हणूनच ' चातुर्वण्यम मया सृष्टी गुणकर्म विभागशः'! असे  भगवंतांनी  म्हटले आहे, ते पटते. चातुुुर्वण्य व्यवस्था ही जात व्यवस्था नव्हती.  त्यामध्येे दोष उत्पन्न  झाले हेे मान्य. परंतु जगभरातील प्रत्येक देशात काही ना  काही ना दोष समाज व्यवस्थेत निर्माण झालेले आहेतच आणि ह्याचं  मूूूळ माणसांमाणसां मध्ये असलेली श्रेष्ठत्वाची भावना. आता  कर्म कसे  करावे ह्यावर  भगवंत काय  म्हणतात ते पाहू या. "योगस्थःकुरू कर्माणि सड्गं त्यक्त्वा|".आसक्ती सोडून कर्म कर. पुढे म्हटले आहे, "तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"|. एकदा आसक्ती सोडली कि एकाग्रता प्राप्त होते. पूर्णपणे समरस होऊन एकाग्रतेने पार पाडलेली जबाबदारी म्हणजे योग. योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. म्हणजे कर्म पार पाडताना फलाची आशा न धरता निष्काम कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न जो करील तो श्रेष्ठत्वाची पायरी चढत जातो. जातीने नव्हे हे स्पष्ट आहे. 

ह्या विश्वाच्या निर्मितीच्या पाठीमागे कोणती तरी एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचं स्वरूपही जशी दृष्टी तसे तिचं स्वरूप असावं. त्यामुळे तिथेही भिन्नता आलीच. त्यातून मानवजातीत विभिन्न धर्म,संप्रदाय,पंथ निर्माण झाले. त्या शक्तीच्या स्वरूपाचं ज्यांनी ज्यांनी वर्णन केले, स्वाभाविकतः ती मंंडळी  ईश्वराचे पूत्र, दूत,प्रेषित, वा त्या त्या धर्माचे संस्थापक गणले गेले. पुढे धर्माच्या नावावर श्रेष्ठता-कनिष्ठता असा मध्ययुगीन काळात संघर्ष झाला. मानवानेच मानवाचे रक्त सांडले. त्याचे इतिहासात नाव पडले क्रुसेड्स. तेवढ्यावर भागले नाही. पुढे बाटवा-बाटवी,जबरदस्तीने धर्मातंर ,साम्राज्यवादाची स्पर्धा आणि विनाशकारी दोन महायुद्धे झाली. आज जरी बहुतांश देश स्वतंत्र असले तरी साम्राज्यवादी अपप्रवृत्ती आणि धार्मिक उन्माद ह्या दोन्ही गोष्टी जिवंत आहेतच. जे काही धर्म आज गणले जातात, त्या प्रत्येक धर्माला संस्थापक आहे. फक्त हिंदू धर्म सोडून. आणि त्या अर्थी तोच शाश्वत तसेच वैश्विक धर्म आहे अशी आपल्या अध्यात्मिक क्षेत्रातील तज्ञ मंडळींची आणि स्वाभाविकपणे आपली धारणा आहे. राममहात्म्यामध्ये रामनामाचं महत्व विशद करताना " बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम्"| अस शेेेेवटचं चरण आहे. ह्याचा  अर्थ असा ' रामनाम धर्मरूपी वटवृक्षाचे बीज असून  रामनामाचा जप केल्याने सर्वजनांचे कल्याण होते. ह्या ठिकाणी  धर्म असे म्हटले आहे  तो शाश्वत वा वैश्विक धर्म असेच आपल्या शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे,  "यदा यदा धर्मस्य ग्लानीर्भवती भारत|". ह्या ठिकाणीही धर्म म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, सदाचरण हेच अभिप्रेत आहे. जेव्हा ह्या गुणांच अवमूल्यन होते तेव्हा मी अवतार घेतो. आपल्या शास्त्राकारांनी" यथो धर्मः तथो जयः|." जिथे सत्याची बाजू ,    तिथे  विजय असतो. हा शाश्वत नियम मांडला आहे. आपण पूत्रधर्म, माताधर्म, पिताधर्म, शिष्यधर्म, राजधर्म, शरीरधर्म असा उल्लेख नित्याने करीत असतो. शिवाय क्षात्रधर्माचाही, उल्लेख करीत असतो. शांतीचे सारे मार्ग बंद झाले आणि युद्ध लादले गेले तर स्वरक्षणासाठी क्षात्रधर्म आचरणात आणावा असे आपले तत्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदू धर्मीयांनीच आज तागायत सर्वात अधिक सहिष्णुता पाळत आणलेली दिसते. परंतु वाजवीपेक्षा अधिक सहिष्णुता दाखविल्यामूळे आपल्याला पारतंत्र्यात जावे लागले. भगवान श्रीकृष्णाने युध्दाच्या भीषण परीणामांच्या विचाराने हातातील शस्त्र टाकलेल्या अर्जूनाला "तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतनिश्चयः|" असे सांगत त्याला क्षात्रधर्माची आठवन करून दिली. येथे हे ही लक्षात घ्यायला हवे कि असा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनला केव्हा दिला? संभाव्य युद्ध टाळण्यासाठी स्वतः केलेली शिष्टाई फलद्रूप झाली नाही तेव्हाच. कारण सूर्यप्रकाश, खते,मशागत ह्यांच्या विना जशी काटेरी झुडपे उगवतात, तसेच माणसाच्या मनात ही दुष्ट भावना सहज रित्या उपजते. मग तिला मूळापासून काढावी लागते. बहुतांश देश "जीवो जीवस्य जीवनम्|" हाच मंत्र पाळणारे आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा "अंहिसा परमो धर्मः|" हे तत्व विशिष्ट मर्यादेपर्यंत पाळावे, कारण "देवो दुर्बलो घातकः|" हे ही सृष्टीतील सत्य आहे. भगवंतांनी पुढे विभूती योगात म्हटले आहे, "मृगाणाम मृगेन्द्र अहम् |" मी प्राण्यामध्ये सिंह आहे. असे का म्हटले? तर स्वरक्षण आणि दूष्टांचा संहार हेही धर्माचं अंग आहे. म्हणून आपल्याला सामरिक आणि तंत्रज्ञान दृष्ट्या अधिक सशक्त व्हावे लागेल. आणि त्यासाठी आपले वैज्ञानिक आणि सेनादले अहोरात्र मेहनत करीत आहेत. एकदा का आपण महासत्ता म्हणून उदयास आलो कि विविधता ही सृष्टीची देणगी आहे , सहजीवन हाच मानवाला निसर्गाने दिलेला मूलमंत्र आहे, तसेच आमची जीवनपध्दत ही विश्वकल्याणकारी आहे. हे पटवून देऊ शकतो. त्यासाठी देश, समाज म्हणून काय करावे आणि अडचणी कुठल्या ह्यावरील चर्चा राजकीय स्वरूपाची आहे ती येथे नको करू या.

वस्तूतः सारी मानवजात एक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ज्ञान, शक्ती, व्यापार, सेवा ही चार तत्त्वें चळवळ करणार्या चैतन्यात असतात. शरीरात असणारे चैतन्य तर एकच असते. "सृष्टी असो वा निसर्ग अथवा ईश्वर ह्यांच्या दरबारात भेदभाव नाही." हे सृष्टीतील अनादि कालापासून असलेले सत्य. नदी एका व्यक्तीला गोड आणि दुसर्या व्यक्तीला खारट पाणी देत नाही. परंतु 'River can go no reverse ', हा सृष्टीचा सिद्धांत. त्यात आपण हस्तक्षेप केला तर निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागते. वृक्ष एका व्यक्तीला सावली देणार आणि दुसर्या व्यक्तीला नाकारेल असे होत नाही. परंतु वृक्षावरील फळांच्या मधुरतेत आणि आकारमानात भिन्नता राहणार. त्याचबरोबर आपण मर्यादे बाहेर वृक्षतोड करू लागलो तर ते सृष्टीला सहन होणारं नसतं. आपल्या शरीरात विभिन्न अवयव विद्यमान आहेत. त्यांची कामें ही विभिन्न,परंतु हृदयातूंन शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रोहिणी नावाची रक्तवाहीनी हातांना जास्त रक्त आणि पायांना कमी रक्त पुरविते, असे होत नाही. इतकेच काय हा डावा हात आणि हा उजवा हात असा भेदभाव रोहिणी कडे नसतो. हा जसा शरीरविज्ञानाचा नियम तसाच तो एक सृष्टीचाही सिद्धांत. कारण आपल्या शरीरात पंचमहाभूते विराजमान असतात. सूर्य म्हणजे तेज, ते ही पाण्याच्या तुषारातून जाते तेव्हा सप्त रंगाचे दिसते. परंतु गतीरूप आणि एकरूप होता,एकच पांढर्या रंगाचे दिसते. जे त्या तेजाचे मूळ रूप. सूर्याची भ्रमंती अनेक युगापासून सुरू आहे. आपली पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते हे ही वैज्ञानिक सत्य. Sunset at one place is always Sunrise at another place. एका ठिकाणीचा सूर्याास्त हा पृथ्वीच्या दुसर्या भागातला सूर्योदय असतो. पृथ्वीचा आकर गोलाकार असल्या कारणाने आणि पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते म्हणून असे घडते.  हे ही सत्य. त्यातूनच पौवार्त्य आणि पाच्शिमात्य देश अशी विभागणी झाली. ती मानवाने केली. परंतु मूळ सत्य, "पृथ्वी तीच आणि सूर्य ही तोच ". जल पृथ्वीवर सर्वत्र आढळेल पण त्याचे घटक म्हणजे हैड्रोजन दोन भाग आणि ऑक्सीजन एक भाग असेेच सर्वत्र  असणार. सृष्टीत विविधता ठायीं ठायीं भरलेली आहे. जे ग्रह आपल्याला ज्ञात आहेत. त्याच्यांत ही विभिन्नता आहे. प्रत्येकाचा आकार वेगळा, गती भिन्न, कक्षा भिन्न, तसेच त्यांचेे  गुरुत्वाकर्षण  भिन्न.  ह्याचा अर्थ असाच कि Imbalance is the feature of this Universe. तरीही आजपावेतो कुठल्याही ग्रहाच्या भ्रमणातील गतीमध्ये असा काही मोठा बिघाड निर्माण झाल्याची घटना नाही. कुठल्याही ग्रहाने मर्यादा सोडलेली नाही. आपली कक्षा बदलली नाही. "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे "असाच सृष्टीचा मानवाला संदेश असावा.  ब्रह्मांडामध्ये  एक सुनियोजित व्यवस्था आहे  असे दिसतेे जिच्यामूळे हे सृष्टीचक्र व्यवस्थित सूरू आहे.

सृष्टी म्हणा, ब्रम्हांड म्हणा, विविधता हे खास वैशिष्ट्य. भले चातुर्वण्यव्यस्थेत दोष निर्माण झाले, तरीही काळा-गोरा, पौवार्त्य-पाश्र्चिमात्य, विकसनशील-विकसित देश, विकसित-अविकसित देश, कुठे लोकशाही,तर कुठे एकपक्षीय राजवट,तर कुठे लष्करशाही,आणि  राजेशाही हे सारे भेद अलीकडच्या काळातील. कोणी श्रीमंत, कोणी मध्यमवर्गीय. कोणी गरीब, कोणी दारिद्र्यरेषेखालील. बरं हे वर्ग आर्थिक निकषावरून मानले तरी प्रत्येक देशातील मोजमाप ही वेगळे. कोणी अधिकारी तर कोणी शिपाई . कोणी राज्यकर्ते तर कोणी आम नागरिक,कोणी नोकरशहा. कोणी मालक कोणी नोकर. कोणी विक्रेता कोणी ग्राहक. असे अनेक वर्ग. प्रत्येक क्षेत्राचा विचार करता अगणीत वर्गवारी.
 I therefore feel that at any time, at any part of the world and in any system of government, there can be no classless society. वर्गरहित समाज ही जगातल्या कुठल्याही भागात आणि कुठलीही राजवट का असेना सदाकाळी स्वप्नवतच ठरेल, असं मला वाटते. परंतु सृष्टीत जशी एक सुव्यवस्था दिसते तशी मानव निर्माण करू शकतो. नव्हे ती मानवानेच करावी असा सृष्टीचा वा त्या नियंताचा संदेश असावा.

माझ्या शालेय जीवनात मराठी विषयाच्या पुस्तकात "मानव्याच्या दिशा" नावाचा धडा होता. लेखकाचे नाव वामन चोरघडे. त्या धड्यात एक मेंडपाळ आणि त्याच्याकडे असलेल्या मेंड्याशी त्याच नातं किती अतूट होतं ह्याच सुरेख वर्णन केलं आहे. तो धडा म्हणजे सहजीवनाचा एक आदर्शच. पंचमहाभूतांच कार्य पहा. समुद्र पाणी घेतो, सूर्य वाफ करतो पण संपूर्ण समुद्र आटवित नाही. का? सारा संसार अळणी होऊ नये म्हणून. आणि वाफ आकाशाकडे सोपावितो. आकाश वाफ घेते आणि ती मेघात साठवून गोड जलात रूपातंर करते. कसे? आपल्याला ठाऊक नाही. मग ते गोड जल पावसाच्या रूपाने भूमीकडे देेेते.  वनस्पती जल घेतात. आणि फळं, फुले देतात. एक आंब्याच बी रूजते, अनेक आंबे देते. भूमातेला एक दाणा द्या, हजारो दाणे घ्या. भूमातेचं स्वरूपही पृथ्वीवर विभिन्न. तशी फळं फूलं अन्नही विभिन्न. बस तिच्या पुत्राने देवाण-घेवाणाची सुव्यवस्था निर्माण करावी. सृष्टीचा संदेश आहे "जियो और जिने दो" हा मानव जातीसाठी. दूसरा "जीवो जीवस्य जीवनम्|" हा पशु-प्राण्यांसाठी. सृष्टी मानवाला सांगतेय Choice is yours.

शनिवार, २० मे, २०१७

देश,सरकार,आणि समाज


एका विशिष्ट संस्कृतीने आणि पंरपरेने बांधलेला समाज जेव्हा एका विशिष्ट भूभागावर बर्याच काळासाठी वास्तव्यात असतो, तेव्हा तेथील समाजाला राष्ट्र वा देश अशी संज्ञा प्राप्त होत असते. आणि त्याच देशातील काही लोकांचं एक मंडळ  असते, जे त्या देशाचा कारभार पाहात असते, ते मंडळ म्हणजे तेथील सरकार. मला वाटत, आजच्या चर्चेसाठी सरकारची, तसेच राष्ट्राची इतकी व्याख्या पुरेशी आहे.

जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशात सरकार नावाची यंत्रणा आहे. त्यातही प्रकार आहेत. कुठे लोकांनी निवडून दिलेलं, तर कुठे राजेशाही, कुठे लष्करशाही, तर कुठे एक पक्षीय सरकार आहे. कुठल्याही पध्दतीचं सरकार असो, प्रजेची सुरक्षा आणि ऐहीक विकास ही सरकारची वा राज्यकर्त्यांची प्राथमिक कर्तव्ये होत. संरक्षण, उदरभरण आणि प्रेम या गोष्टीची निश्चिती झाली कि निश्चिंत मन सर्जनशीलतेची भरारी घेत असते. त्यातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्राचा विकास होत असतो. पुष्कळदा सरकार आणि प्रशासनातील लोक (नोकरशाही) ह्यांच्यात समन्वय नसतो. नोकरशाही भ्रष्ट असते, असेही ऐकायला येत असते. याउलट "सरकारमधील मंत्री भ्रष्ट असतात. नोकरशाहीला का दोष देता?" असे ही ऐकतो. कुठलाही देश आणि कुठलिही राज्यप्रणाली असो, कमी अधिक प्रमाणात अशा गोष्टी ऐकावयास मिळतात आणि त्या बहुतांशी खर्या असतात. परंतु किती दोषी नेत्यांना वा नोकरशहानां शिक्षा झाली असेल, याबाबत सर्वच देशांना आणि राज्यप्रणालीनां नेगेटिव्ह गुण सारखेच मिळतील असे मला वाटते. आर्थिक घोटाळा रकमेने किती मोठा आणि किती प्रमाणात देशाचं नुकसान करतो, ह्याच प्रमाण मात्र प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असू शकते. अविकसित आणि विकसनशील देशावर भष्टाचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर विपरीत परीणाम करीत असतात. हे ओघाने आलेच. आपला देश विकसनशील देशांमध्ये गणला जातो आणि सरकार आपल्या मतदानाच्या हक्कातूनच अस्तित्वात येते, मग भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकिस येते तेव्हा समाज म्हणून आपणही जबाबदार ठरतोच की. आपण ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी खाली देत असलेल्या दोन कथांचा आधार घेऊ या.

एका गावात गावदेवीचं मंदिर असते. ते रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जमिनीवर होते. भाविक गाडी पकडण्याच्या घाईत असल्यामुळे, आपली पादत्राणे न काढताच मंदिरात प्रवेश करून देवीचं दर्शन घेत असत. गावातल्या एका गृहस्थाला हे काही रूचत नव्हते. म्हणून त्याने सरपंचाकडे लेखी तक्रार केली. सरपंच म्हणाले, "मी काय करणार? आपलीच मंडळी ही. मी समजावून सांगितले नाही कां?" असे म्हणत त्यांनी तक्रार दाखल करून घेतली. दुसर्या दिवशी, मंदिराच्या दरवाज्यापाशी "सर्व भाविकांना विनंती करण्यात येते कि, गावदेवीचं गाभार्यातून दर्शन घ्यावयाचे असल्यास, आपली पादत्राणे बाहेर काढून ठेवावीत. आपला सरपंच".असे फलक लागले. त्या फलकावर धूळ साचत गेली. काही परीणाम झाला नाही. मग तक्रारदाराने तहसील गाठले. तिथे तक्रार दाखल केली. तहसीलदारांनी लक्ष घालतो असे आश्वासन दिले. तिसर्या दिवशी मंदिराच्या गेटपाशी फलक लागले. फरक इतकाच कि फलकातील  सूचनेमध्ये थोडासा बदल केला. "जो कोणी भाविक पादत्राणे घालून देवीचं दर्शन घेतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शेवटी सूचनेच्या खाली हूकमावरून, मामलेतदार. हे दोन शब्द वाढले. पण स्थितीत काही बदल झाला नाही. ना कोण्या भाविकाने तहसीलदाराच्या सूचनेला मान दिला.  ना कोणा भाविकावर कारवाई झाली. तक्रारदाराने जिल्हाधिकार्यांचं ऑफीस गाठलं. तक्रार केली. जिल्हाधिकार्यांनी लागलीच तक्रारदाराच्या समक्ष तहसीलदारा  फोनवरुन फैलावर घेतले. तक्रारदाराला आश्वस्त केले, आणि सांगितले, कि दोन दिवसात प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यासाठी माझ्या ऑफीसमधील सिनियर अधिकार्याला पाठवितो. तक्रारदाराने टेबलावर आणलेला चहा घेतला आणि आनंदीत होऊन कल्टेक्टरसाहेबांचे आभार मानून घरचा रस्ता धरला. दोन दिवसानंतर जिल्हाधिकारीच्या ऑफीस मधील एक अधिकारी काही काळासाठी त्या गावदेवीच्या मंदिरातील तक्रार निवारण करण्याच्या कामावर रूजू झाले. त्यांची राहण्याची व्यवस्था ही झाली होती. रोज मंदिरात स्वतः जातीने एक बूथ ऊभे करून ते अधिकारी कोणी भाविक पादत्राणे घालून गावदेवीचे दर्शन घेत नाही ना याची खातरजमा करीत होते. तक्रारदाराला आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली हयाचं समाधान मिळाले. काही व्यवसायाच्या कामानिमित्त तक्रारदार बाहेर गावी गेला. काही दिवसानंतर तो परत आला, तर काय पाहतो? भाविक त्या अधिकार्यांच्या टेबलाखालून पैसे देत पादत्राणे न काढता देवीचे दर्शन घेत होते. आपल्याच गावातील बांधवांना देवीच्या दर्शनासाठी पैसे द्यावे लागत असल्याने त्याचे मन कष्टी झाले. त्यानी पुन्हा जिल्हाधिकारीकडे तक्रार केली. जिल्हाधिकार्यांनी एक तडफदार तरूण अधिकार्याची नियुक्ती केली. नवीन अधिकार्याने आपल्यासोबत एका शिपायाला आणलं. मंदिराच्या गेटपासून थोडं दूरवर चप्पल स्टॅंड उभारला. भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी बांबूचा छोटेखानी मंडप आणि चप्पल काढून ठेवण्यासाठी स्टॅन्ड ही उभारला. भाविकांनी चप्पल येथे काढावीत आणि मगच मंदिरात प्रवेश करावा, असा फलक ही लावला. सहा महीने झाले. सारं काही जिल्हाधिकार्याने केलेल्या नियमाप्रमाणे घडत होतं. भाविकांना हया नव्या अधिकार्याला लांच देण्याची हिम्मत झाली नाही. आता देवीच्या दर्शनासाठी वेळ जास्त लागायला सुरुवात झाली. म्हणून घरातूनच भाविक लौकर बाहेर पडू लागले. गावदेवी मंदिराचा वर्धापन दिवस उजाडला. पहाटेपासून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. त्या अधिकार्याचा शिपाई चप्पल स्टॅंड जवळच उभा होता. चप्पल काढा, चप्पल काढा, चला चला, पुढे चला असा घोष शिपाईचा चालू होता. रांग पुढे सरकत होती. एक भाविक अनवाणीच आला होता. त्यालाही चप्पल काढा आणि पुढे चला हेच वाक्य शिपयाने उच्चारले. त्या अनवाणी भाविकाने म्हटलं, मी चप्पल कुठे घातलेत? पंरतु तो शिपाई त्या भाविकाला पुढे जाऊ देत नव्हता. भाविकाने अधिकार्याला विनवणी केली. परंतु त्या अधिकार्याने त्याला पुढे जाण्यास मज्जाव केला. तो भाविक वैतागून म्हणाला, अहो साहेब मी कूठे चप्पल घातलेत? अधिकार्याने उत्तर दिले, "त्या फलकावर काय लिहले आहे, ते वाचले ना! कायदा म्हणजे कायदा. तुम्ही घरी जा. चप्पल घालून या. चप्पल स्टॅन्ड वर ठेवा, मग मंदिरात जा." कलेक्टरसाहेबांचा आदेश आहे ".तो भाविक म्हणाला, अहो साहेब, कलेक्टर साहेबांकडे तक्रार करणारा तो मीच आहे. ते अधिकारी म्हणाले "मग तुम्हाला नियम जास्त माहीत हवा. ते काही नाही तूम्ही चप्पल घालून या. येथे काढा मग दर्शनासाठी आत जा. त्या भाविकाने कपाळावर हात लावला आणि घरी परत गेला. शासकिय पातळीवरील दोन अधिकार्याचे वागणं कसे आहे? एक 'काय द्यायचे' ते बोलतो तर दुसरा अधिकारी म्हणतो, फक्त कायद्याचे बोला.

एखादा मंत्री जेव्हा  नोकरशहासंबधी वरील  ही गोष्ट सांगेल तेव्हा आपण त्यांना सम्राट चंद्रगुप्त ह्यांच्या जीवनातील गोष्ट सांगू शकतो. ती अशी आहे. सम्राट चंद्रगुप्ताला वेष बदलून नगरात फेरी मानण्याची सवय होती. त्यामुळे आपल्या स्वतः बद्दल, सेनापती, प्रधान, दरबारातील इतर अधिकार्याबद्दल प्रजेचं काय मत आहे, ह्याची माहिती मिळत असे. एकदा सम्राट, वेष बदलून नगरात पायी फिरत राहिला. नंतर त्याला थकवा आला. म्हणून रस्त्यावर उभ्या असलेल्या टांग्यात (घोडागाडी) बसतो. आणि टांगेवालाल्या सांगितले, "मला राजमहल पर्यंत सोड आणि पैसे ही तुला तिथेच मिळतील". माझ्याकडे आता पैसे नाहीत. टांगेवालाने नकार दिला. पुढे त्याने सांगितले की, "तुम्ही राग मानू नका, मी राजदरबारातल्या अधिकार्यांना राजमहलापर्यंत अनेकांना सोडलं आहे. परंतु त्या सर्वानी पैसे देण्याचं आश्वासन पाळलं नाही. राजमहल मध्ये शिरतात आणि बाहेर आलेच नाही." टांगेवाल्याला माहित नव्हतं कि तो प्रत्यक्ष आपल्या राजाशी बोलतोय. तो सम्राटाला राजमहलपर्यंत एकाच अटीवर सोडावयास तयार झाला. अट अशी होती कि राजाने आपला सदरा टांगेवाल्याकडे द्यावा आणि टांगाभाडे दिल्यानंतर सदरा राजाला परत मिळेल. बस, सम्राटांनी अट मान्य केली. आणि आपला सदरा टांगेवाल्यापाशी दिला. महलाच्या थोड्या दूरवरच टांगा उभा केला. राजाला त्या अवस्थेतून महलात शिरताना पाहून   प्रधानासकट सर्वच अधिकारी टांगेवाल्याला दम देण्यासाठी टांगेवाल्यापाशी जाऊ लागले. राजाने त्या सर्वांना "मागे फिरा; कोणीही टांगेवाल्याशी हुज्जत घालू नका आणि सर्वांनी दरबारात यावे असे फर्मान सोडले. दरबारात राजाने, सर्वाना फैलावर घेत म्हटले, "तुमच्यामूळे मला आज एका टांगेवाल्याकडून अशा मानहानीला सामोरे जावे लागले. ज्या कोणी, अधिकार्याने, टांगेवाल्याची भाड्याची रक्कम दिलेली नाही, त्यानी ती निमूटपणे माझ्याकडे जमा करावी, नाहीतर मी टांगेवाल्याला बोलावून आपल्या पैकी कोणी त्याचं भाडे थकविले असेल त्या सर्वांची ओळख पटवून त्यांना नगराबाहेर हाकलून देईन". ज्यांनीं ज्यानीं टांगेवाल्याची थकबाकी ठेवली होती ती त्यांनी  सम्राटाकडे सूपूर्त केली. सम्राटांनी स्वतः चे भाडे आणि दरबारातील अधिकार्यांनी जमा केलेली थकबाकी व्याजासकट टांगेवाल्याला दिली. टांगेवाला खूष झाला. तो सम्राटांना नमस्कार करून बाहेर पडला.

वरील दोन्ही कथातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिल्या कथेतून काय स्पष्ट होते, ते हे की नोकरशाही भ्रष्ट असते. तसेच काही वेळा नोकरशाही कायद्याचा पुस्तकी व्याख्या प्रमाण मानते. म्हणजे नको तिथे नियमाचा उदोउदो करते. दोन्ही गोष्टी प्रजेच्या हिताला मारक. दूसर्या कथेतून हे दिसते, की राज्याचा वा देशाच्या प्रमुखावरच आदर्श निर्माण करण्याचं उत्तरदायित्व असत. राज्यकर्त्यांचा नोकरशाहीवर अंकूश असावा. याचा अर्थ "राजा कालस्य कारणम् " हेच तत्व प्रमाण मानायचे कां? थोड्याफार प्रमाणात होय, हेच उत्तर. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रजा आपल्यावरील उत्तरदायित्व झिडकारू शकत नाही. काही प्रमाणात सत्ताधारी पक्षांला मतदानाद्वारे पराजित करून प्रजा आपले कर्तव्य पार पाडते. परंतु ज्यांना सत्तेवर बसविते, त्यांचाही कारभार मागील सरकार प्रमाणेच राहिला, तर मतदार, निवडणूका, ह्या गोष्टींना काही अर्थ उरत नसतो. कित्येकदा आपणच नैराश्याने ग्रासतो आणि म्हणू लागतो, "सत्तेवर कोणी बसला तरी आपल्या जीवनात काय फरक पडतो?" " सध्या मोदींची हवा आहे, असे म्हणतो, का तर प्रशासनातील बदल जाणवत आहे". असे नारायण मूर्तीं सारखे उद्योगपतीही म्हणतात, जे स्वतः मोदींचे समर्थक नाही, अशी पुस्तीही तसे विधान करताना जोडतात. तेव्हा त्यात तथ्य आहे, हे मानण्यासाठी मन मोठं का करू नये? सरकारवर टिका करण्याचा हक्क आहेच परंतु त्यासाठी पाकिस्तानातल्या टिव्हीवरून अय्यर सारख्या नेत्याने, "मोदीं सरकारको आप लोग हटाओ" असं विधान करणे योग्य आहे का? केजरीवालसारखे जे नव्याने राजकीय व्यवस्थेत आहेत, त्याचं ठीक आहे हो, परंतु साठ वर्षाहून अधिक काळ सत्ताधारी म्हणून वावरले, त्या पक्षांच्या नेत्यांनी, अय्यरांच्या विधानांबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता ना! स्वातंत्र्य हे बंधना शिवाय असू शकत नाही. बोलायला वाणी लागते; परंतु कोठे आणि काय बोलावयाचे, ह्यासाठी आपल्या अंगी विवेक असावा लागतो. काळ झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्ष, सरकार आणि जनता, राष्ट्र आणि जग, ह्यातील नात्यांचा नव्याने विचार करायला हवा. मोदींचं सरकार अस्तित्वात येऊन काही राज्यांच्या निवडणूका झाल्या, निकाल लागले आणि मिडीयात पुढच्या लोकसभेची निवडणूक, पुढचा पंतप्रधान कोण ह्यावर चर्चा होते. ह्याला काही अर्थ आहे का? केवळ निवडणूका म्हणेजचं राजकारण असेच मानायचे कि काय? त्यामुळे संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलण्यास आपण प्रजा किंवा मतदार म्हणा अपुरे पडतो असे नाईलाजाने म्हणावं लागतं. समाज म्हणून आपण किती वर्षे अल्पसंख्याक-बहूसंख्यांक, जाती-जमाती, प्रान्त-भाषा ह्यात विभागलेले राहणार?

राज्यकर्त्यावर प्रजेचा, विरोधी पक्ष, स्वायस्थ संस्था जशा कि न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, सीबीआय ईडी, तसेच स्वंयसेवी संघटना, मिडीया इत्यादींचा अंकुश असणे गरजेचं असते. परंतु ह्यातील फक्त न्यायव्यवस्था जनतेच्या विश्वासास अधिक पात्र आहे असे दिसते. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमें ह्याचांही सरकारवर अकुंश असतो परंतु तो इतका वाखाणण्याजोगा नसतो. ह्याच कारण ह्या क्षेत्रात आलेला बाजारीपणा. निवडणूक आयोग, ईडी, कॅग, ह्या संस्थाचा कारभार समाधानकारक आहे. स्वंयसेवी संघटनाचं कार्य समाधानकारक आहे, तरीही काही स्वंयसेवी संघटनांचं काम वादग्रस्त असल्याचं चित्र समोर येत आहे. परदेशातून येणारी मदत पुष्कळदा देशात कुठलं तरी अंदोलन छेडण्यासाठी वापरली जाते. जगातल्या सामरिक दृष्टया आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि प्रगत देशांची ही नेहमीची खोड आहे. कारण तेथील निवडणूका वा सत्ता जिकंण्याचं आणि मोठमोठ्या बहूराष्ट्रीय कंपन्यांचे तसेच शस्त्रनिर्मीती करणार्या कंपन्यांचे आर्थिक हितसंबंध मजबूत करण्याचं हे एक मोठं हत्यार आहे. आजही जगात बळी तो कान पिळी हाच न्याय आहे. बलाढ्य देश सतत संपत्ती आणि अत्याधुनिक शस्त्रांच्या जोरावर अविकसीत तसेच विकसनशील देशांत पर्यावरणाच्या नावाखाली कूठे अंदोलने, तर कुठे दशहतवाद्यांना अप्रत्यक्षरित्या मदत, कूठे नक्षलवाद, कुठे जिहादाचं भूत, कूठे ईलेट्राॅनिक्स मिडीयाला हाताशी घेऊन नवीन वाद निर्माण करून अस्थिरता माजवीत असतात. दूर्दैवाची गोष्ट ही की आपलेच मूठभर युवक, समाजबांधव अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नशेत चूकीची वाट पकडतात. आपण जेव्हा ह्या सार्या व्यवस्थेवर टिका करतो, तेव्हा आपण नागरिक म्हणून आदर्श आहोत कां? हा प्रश्न कोणाला विचारायाचा? वरील दोन्ही कथांत गावदेवीचं दर्शन घेणारे भाविक आणि चंद्रगुुप्ताच्या दरबारातील अधिकारी हे सुद्धा समाजाचे घटकच ना! ज्या संस्थांनी सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवावा,त्यांच्याच कारभारा बद्दल आपण असमाधानी असतो. त्या संस्थां मध्ये उच्चपदस्थ अधिकार्या पासून ते शिपाया पर्यंत काम करणारी मंडळी आपले समाज बांधवच ना! सरकारी आस्थापांनात काय नी खाजगी कंपन्यांत असणारी मंडळी, तेही आपलेच लोक. दस्तुरखुद्द सरकार चालवणारे लोकंही आपलेच. ह्यावरून हेच समजून घ्यावयाचे की आपल्या देशात घडणार्या सार्या बर्या- वाईट घटनांना समाज म्हणून आपणच जबाबदार ठरतो. 'Charity begines at home' हे सर्वसामान्यांना लागू होत नाही का? अगदी शंभर टक्के लागू होते. राज्यशास्त्रात म्हटले जाते कि, 'You get the government, what you deserve'. जसे आपण तसे आपले सरकार, तशा आपल्या संस्था. परंतु हे विधान फक्त लोकशाही राज्यप्रणालीलाच लागू होत असते असे नाही. एक पक्षीय राजवट असो वा राजेशाही किंवा लष्करी राजवट असो,  भ्रष्टाचार, पक्षपात, अशा कुप्रवत्ती सर्वच राज्यप्रणालीत दिसत असतात. एक वाक्य वाचनात आले आहे, ते असे "The progress of the nation is far less depend upon the form of it's institution, rather than the character of it's own men" कुठल्याही राष्ट्राचा विकास हा तिथे कुठल्या पध्दतीची राज्यप्रणाली आहे, ह्याही पेक्षा तिथल्या लोकांच्या चारित्र्यावर अधिक अवलंबून असतो. असे म्हटले जाते कि, "माणसामध्ये ज्या सहजप्रवृत्ती असतात त्या बदलता येत नाहीत. कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते वाकडेच राहणार! तीच अवस्था सहजप्रवृत्तीची असते". परंतु हे निव्वळ अर्धसत्य असावे. ज्यांच्यासमोर जीवनलक्ष्य नसते केवळ त्यांच्याबाबतीत खरे असावे. ध्येयनिष्ठ माणसांच्या बाबतीत तर 'नर करणी करे तो नरका नारायण बन जाय' हेच खरे असते. भक्त प्रल्हादाकडून इंद्रदेवाचा पराभव होतो. तेव्हा आपलं राज्य, वैभव परत मिळविण्यासाठी इंद्रदेव बृहस्पतीच्या सल्ल्यानुसार प्रल्हादाकडे याचक वेषात जातो. प्रल्हादाकडे शील मागतो. प्रल्हाद म्हणतो, "हे , माझे शील तूला दिले". त्वरित एक तेजस्वी आकृती प्रल्हादाच्या शरीरातून इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करते. ती आकृती शीलाची. पाठोपाठ शौर्य नावाची आकृती बाहेर पडते. ती इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करण्याअगोदर प्रल्हादाला म्हणते, "मी शीलाचं रक्षण करणारी, जेथे शील, तेथे मी". नंतर धनलक्ष्मी, विद्यादेवी, शक्तीदेवी, आणि शेवटी राजश्री प्रल्हादाच्या शरीराचा त्याग करून इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करती झाली. तात्पर्य हेच की शील असेल तर निष्ठा उच्च श्रेणीची बनते. मग कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. देशात बदल घडवायचा असेल तर प्रथम आपल्यात बदल केला पाहिजे. मग आपोआप समाजात बदल होतो. सर्व व्यवस्थांमध्ये बदल घडतो. भारताचे माजी राष्ट्रपती सन्माननीय श्री अब्दुल कलाम ह्यांच्या  European Union मधील भाषणातील काही भाग नमूद केल्याशिवाय  ह्या लेखाला पूर्णत्व येत नाही असे ठामपणे वाटत असल्यामुळे तो भाग खाली देऊन लेख  संपवितो.
"Where there is righteouness in the heart there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is an order in the Nation and when there is an order in the Nation there is peace  in the world."

सोमवार, १५ मे, २०१७

सामाजिक बांधिलकी



मंडळी, मागील लेखात आपण असुरक्षिततेच्या भावनेपोटी, मनुष्य समूहात राहू लागला आणि नंतर समाज व्यवस्था उभी राहीली, हे पाहिलं. त्याच लेखात समाजाची ढोबळ रित्या दोन वर्गात मांडणी केली. एक वस्तू-निर्मिती करणारा आणि दूसरा सेवा- निर्मिती करणारा. परंतू ही मांडणी व्यावहारिक पातळीवरील झाली. मुलतः माणूस समाजाशी ज्या कर्तव्याने स्वतःहाला बांधून घेतो ती 'सामाजिक बांधिलकी' म्हणजे काय? ह्याची ठोस स्वरूपात आणि संक्षिप्त रित्या व्याख्या करणे अवघड आहे. साधा अर्थ म्हणजे माणूसकी. परंतु ती परिपूर्ण व्याख्या होत नाही. ज्या गोष्टी व्याखेत बसत नाही, अशा सार्या गोष्टी निसर्गरम्य असतात, एवढं निश्चीत. मूलतः मनुष्याचं जीवन सामाजिक असते. ह्या जगात जितके म्हणून प्राणीमात्र आहेत, त्या सर्वात मनुष्य बुद्धीमान. त्या बुद्धीच्या जोरावर इतर प्राण्यापेक्षा मानवाने प्रगती करीत त्यांच्यावर हूकमत मिळविली. परंतु एखादी व्यक्ती दूसर्या व्यक्तीवर हूकमत गाजवावयास लागली, कि त्याला माणूसकी नाही, असे आपण मानतो. कां? येथूनच सामाजिक ह्या शब्दाच्या व्याख्येला सुरवात होते. मुंगीपासून वाघ, हत्ती सारखे प्राणी असोत, वा चिमणीपासून गिधाड्या सारखे पक्षी असोत, त्याचं जीवन सामुदायिक असते. पण सामाजिक नसते. त्यांच्या जीवनात कार्यव्यवस्था असू शकते. परंतु कर्तव्यभावना नसते. त्यांच्या कामात यांत्रिकता असते. पण भावना, बुद्धी, दूरदृष्टी, इतिहास, परंपरा, सम्यक ज्ञान यांचा त्यांच्या जीवनात अभाव असतो. मनुष्याच्या जवळ या सर्व गोष्टी असतात म्हणूनच तो सामाजिक जीवन जगतो.

मान्टेस्क नावाच्या विद्वानाने म्हटले आहे, "Man is a social animal being formed to please and enjoy in society." मनुष्य समाजात असला म्हणजे त्याला आनंद मिळतो. परिवार,विद्यालये,खेळ, नाट्य, संगीत, साहित्य, राष्ट्र, पंथ, संप्रदाय, सभा, संमेलने, उत्त्सव-समारोह, आदी नावाखाली चाललेले मनुष्याचे उद्योग त्याच्या सामाजिकतेचीच ग्वाही देतात. सामाजिक बांधिलकी ह्या शब्दात माणसाचं एकंदरीत समाजातील वागणं, तसेच लोकांशी व्यवहार (relationship) ह्या गोष्टीचाही अंतरभाव असतोच. ह्या संदर्भात एका पाश्चात्य विचारवंताने  म्हटले, "Be Civil to all, Social to many, Familiar with few, Friend to one, and Enemy to none. कोणाशीही वैर नसावे. एकदा का कोणी शत्रू नाहीत, असे आपल्या मनाने स्विकारले कि आपण सर्वांशी सुसंस्कृतपणाने वागू शकतो. Civil ह्या शब्दाचा Civic Science (नागरिक शास्त्र) प्रमाणे, शब्दशः अर्थ पकडला तरी अर्थ बदलत नाही. जसा मी देशाचा नागरिक, तसेच ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती देशाची नागरिक आहे, हे मान्य केले पाहिजे आणि ते ही मनापासून. जास्तीत जास्त लोकांशी सामाजिक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लोकांशी जवळीक असावी. जवळीक (familiar)    ह्याचा अर्थ आपल्या संताच्या शिकवणीच्या आधारे घ्यावयाचा असेल तर नेहमी सुसंगतीत असावे, असाच धरू या. आणि मैत्री एकाशीतरी असावी.  हा उपदेश ज्या कोणी साहित्याकाने दिला असेल, त्याला "एकच मित्र असावा" असे अभिप्रेत नाही. तसे असते तर त्याने only one friend असा शब्द वापरला असता.

सामाजिक बांधिलकी पुष्कळदा आपण दैनंदिन जीवनात अनुभवीत असतो. कोणाच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर सगेसोयरे, शेजार-पाजारी, मित्रपरिवार, सगेसोयरे, ओळखीपाळखीचे इतकेच काय पण अनोळखी आणि जातीपातीचा संबंध नसलेले लोक ही त्याच्याकडे येतात, त्याला मदत करतात, सात्वंन करतात. तसेच आपण दूसर्याच्यां सुखात ही सामील होतो. कुठे अपघात घडला तर त्या ठिकाणी जाऊन जखमींना रूग्णालयात नेण्याची जबाबदारी स्विकारणे, वादळ, पूर,भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावणे, अलीकडे शेतकर्याच्यां दुर्दैवी स्थितीत त्यांच्यासाठी उभार्यल्या जाणार्या निधीमध्ये आपलाही हातभार लागणे, शहीद जवानांच्या आप्तानां मदत करणे, वनवासी, दलीत-पीडीतांना सहाय्य करणे, रक्तदान, देहदान, वृक्षारोपण इत्यादी कामें करण्यात जो सहभागी होतो तो खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपतो. प्रत्यक्ष समाज कार्य आपल्या हातून घडत नसले तरी काही स्वंयसेवी संघटना आहेत जसे कि बाबा आमटे ह्यांनी सुरू केलेले उपक्रम, गिरीश प्रभुणे ह्यांनी भटक्या व विभुक्त जमातीसाठी यमगरवाडीत शाळा सुरू केलेला उपक्रम, सिंधुताई सकपाळांचा अनाथ मुलांसाठीचा उपक्रम, विश्वहिंदू परिषदेचे वनवासी कल्याण आश्रम, अशांना आर्थिक मदत वा मोफत कपडे, भांडी, पुस्तके, वह्या इत्यादींचं वाटप करून समाज कार्यात हातभार लावता येतो. मराठी विज्ञान षरिषद असो, वा साक्षरता आणि स्वच्छतेची मोहीम ह्यात आपला खारिचा वाटा उचलून अंशतः आपण समाजाचं ऋण फेडू शकतो. सगळ्या जगाशी तुसडेपणाने वागतो, शेजारी रडतोय तर रडू दे, रस्त्यावरून वुध्द आजोबा क्राॅसींग ओलाडंताना चाचपडत आहेत तर राहू द्या त्याला तसेच, गावाला आग लागली तर लागू दे. अशा वेळी माझं काही कर्तव्य आहे, हेच जो विसरतो, त्याला आपण माणूस मानतो का? नाही .

एकदा इसापाचा मालक झांथस इसापला म्हणाला, "मला नदीवर स्नानाला जायचे आहे. तेथे किती माणसे आहेत पाहून ये बरे. गर्दी असेल तर मी इतक्यात जाणार नाही." इसाप नदीवर जाऊन आला आणि म्हणाला,"महाराज तेथे एकही माणूस नाही." "घे तर मग माझे कपडे " असे म्हणून राजा नदीवर जायला निघाला. तेथे जाऊन पाहतो तो, नदीवर बरीच गर्दी होती. तेव्हा राजा इसापवर रागावला आणि म्हणाला, "काय रे,तू तर मला सांगितलेस की नदीवर एकही माणूस नाही!" इसाप म्हणाला, होय महाराज, मी जे सांगितले ते अगदी खरे आहे. हा पाहा, हा वाटेत एक मोठा दगड पडला आहे. येणार्या-जाणार्याला त्याची ठेच लागत आहे; पण कोणीही तो बाजूला सरकवीत नाही. ज्यांच्याजवळ माणूसकी नाही, जे दुसर्याचा विचार करीत नाहीत, त्यांना मी माणूस कसे म्हणू?" इसापने जे म्हटले त्यात काही चूक दिसत नाही.मग  माणूस कोण? असा प्रश्न आपल्याला पडतो.  ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक कथा सांगियली जाते, ती अशी आहे.

ईश्वराच्या मनात एकदा चैतन्याचं स्पूरण चढले. मग फार कष्ट करून त्याने पंचमहाभूते निर्माण केली आणि आपल्या घरी रात्री उशीरा पोहचला. आपल्या पत्नीला म्हणजेच शक्तीदेवीला आंनदाने माहिती दिली नतंर जेवण उरकून झोपी गेला. पण एक तासानंतर त्याला जाग आली. पुन्हा कामाला लागला. देवीने विचारले, हे काय विश्वभंरा, आपण झोप मोडून कामाला कसे लागलात?  ईश्वराने म्हटले, कालच्या पेक्षा आज भरपूर काम आहे आणि ते  बाहेर पडले. आता तर दुप्पट कष्ट घेतले आणि विविध झाडं, फूलं, पर्वत,दर्या-खोर्या, नद्या, समुद्र, डोंगर निर्माण केले.  विविध रंगीबेरंगी अशी सृष्टी तयार झाली. ईश्वर आपल्या घरी. परतला. आज तर स्वारी खुशीत होती. ईश्वराने आंनदाने सृष्टीचे वर्णन करून देवी कडून जेवण घेतले. झोपताना "आज मला चागंली झोप लागेल" असं म्हटलं देखील. कालच्या रात्री पेक्षा आज झोप चांगली लागली असे दिसू लागले. आज झोपून दोन तास झाले तरी त्याला जाग आली नाही. असे समजून देवी झोपण्याची तयारी करणार इतक्यात ईश्वर जागा झाला. आणि म्हणाला, देवी, मला आज फार ऊशीर होईल, असे म्हणून कामाला लागला. सृष्टी चांगली सजली होती, परंतु ईश्वराला तिच्यात हालचाल दिसत नव्हती. ईश्वराला हवी होती सृष्टीत movement. मग ईश्वराने विविध रंगाचे,विविध आकाराचे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, समुद्रांत, नद्यांत, सरोवरात विहार करणारे विविध प्राणी निर्माण केले आणि घरी परतला. आज ईश्वर फारच खुषीत होता. "सृष्टी सजली आणि चालती बोलती झाली, आनंद होणारच ". हे उदगार होते ईश्वराच्या अर्धांगीचे. आता माझे कार्य संपले असे म्हणत ईश्वर झोपी गेला. आज लगेच गाढ झोपली. परंतु चार तासानंतर जाग आली. देवीला झोपेतून ऊठविले आणि सांगितले, काम संपलं नाही. आता जे काम पुढ्यात आहे ते पूर्ण होण्यास अनेक वर्षे  लागतील. देवीलाही कळले. (ईश्वराचं एक वर्ष म्हणजे भूलोकातील सहस्त्र कोटी वर्षे). ईश्वर कामाला लागला. दिवस-रात्र कष्ट चालूच राहिले. कारण त्याला ह्या सृष्टीला सतत सृजन करणारा प्राणी निर्माण करावयाचा होता, नुसती movement करणारा नव्हे, तर improvement करणारा हवा होता आणि तो कसा असावा, तर सृष्टीला सृजन करीत करीत त्याचा म्हणजेच ईश्वराचा शोध घेईल. महत प्रयासा नंतर ईश्वराने हवा तसा प्राणी निर्माण केला. त्याचेच नाव आहे, मानव. 

जी सृजन होते ती सृष्टी. मानवाने समाज नावाची व्यवस्था निर्माण केली. त्यातूनच काही अलिखीत, काही लिखीत असे नियम बनले. त्या नियमाला अनुसरून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती त्याची सहज प्रवृत्ती मानली गेली. त्या नियमाला न जुमानता स्वतःच्याच हिताला प्रधान्य देऊन दुसर्या व्यक्तीचे अहित करून एखादी व्यक्ती व्यवहार करते ती विकृती आणि विकृतीचं टोक गाठून अजूनही तसाच व्यवहार ती व्यक्ती करीत राहीली कि हळूहळू खाली पशुत्वाकडे पोहचते. ह्या उलट सामाजिक नियमांचं पालन करीत, आपल्या हिताचा त्याग करीत आपल्या हिस्साचं फळ दुसर्या समाजबांधवा साठी देतो तेव्हा प्रवृत्तीचं रूपांतर संस्कृतीत होते आणि  पुढे संस्कृतीच्या वाटेवर  निवृत्तीची वाट सुरू होत असते.  पण ती कोठून सुरू होत असावी याचा अंदाज बांधता येत नाही. पण ती वाट खडतर आणि प्रदीर्घच असते. तीच संताची वाट. तीच मोक्षप्राप्तीची वाट. तीच  पंढरीची वाट, जिथे जीवा शिवाची भेट होते.
 
सामाजिक भावना ज्याच्याजवळ ज्या प्रमाणात अधिक असेल, तो त्या प्रमाणात श्रेष्ठ मानला जातो. सर्व महापुरूषांच्या चरित्रांचे हेच सार आहे. आणि त्यांच्या श्रेष्ठत्वाचे हेच गमक आहे. तो महापुरूष प्राचीन असो की अर्वाचीन, पौर्वात्य असो की पाश्र्चिमात्य,तो आपल्या घरापेक्षा मोठा होतो, गावात, प्रांतात, देशात, आणि परदेशातही मोठा होतो. लोकांची दुःखे दुर करतो. त्यांना सन्मार्ग दाखवितो. प्रसंगी निंदानालस्ती,मानहानी सहन करतो. बस रामदास स्वामी ने म्हटल्याप्रमाणे "चंदनाचे परि त्वां झिजावें!". अशा मंडळींना माझे शतशः प्रणाम!.

गुरुवार, ११ मे, २०१७

व्यक्ती आणि समाज


मंडळी, पुष्कळदा संवादातूनही लिखाणासाठी विषय सूचतो, असे ऐकिवात आले आहे. राजेश खन्नाच्या चित्रपटातील एका गाण्यासाठी लागणारी चाल, नायक-नायिकेचं नृत्य, शूटींगचं ठिकाण, इत्यादी बाबी तयार होत्या आणि त्यावरून गीत तयार करण्याचे आव्हान गीतकारांसमोर होते. संगीतकारांच्या घरात बैठक संपली. गीतकारांना गाणं काही सुचलं नाही. गीतकार संगीतकारांना म्हणाले, अच्छा तो हम चलते है! संगीतकारांनी पृच्छा केली, फिर कब मिलोगे? असा संवाद झाला आणि गीतकार घरी गेल्यानंतर या संवादावरून गीत तयार केले. मराठीतील 'सखी चांदणी' ह्या अजरामर गाण्याचा जन्म संपूर्णतया वेगळा आहे. गीतकारांना गाणं सुचत नव्हतं आणि त्या कारणाने गीतकाराला रात्री झोप येत नव्हती. ते झोपेला आमंत्रण देत राहीले आणि तेच गाणं म्हणून स्विकारले गेले. अलीकडे माझ्या एका मित्राने "Your blog is gaining momentum" असा मेसेज मला पाठविला. मी त्याला आभार मानताना सहज म्हणालो, "आपण आपआपसात चर्चा करतो, त्यातूनही विषय सूचतात". मित्राशी बोलणं संपलं, माझं विचारचक्र सुरू झालं. बस त्यातून जे काही सूचत गेलं ते ते सारे लिहित गेलो. लेखाची व्याप्ती वाढत गेली. नंतर असे ठरविले जे काही लिहिलंय ते प्रत्यक्ष आपल्या पर्यंत पोहचवावे ते टप्प्याटप्प्याने. आपण स्वागत कराल अशी आशा बाळगतो.

लिखाणासाठी आधी शब्द सूचतात कि विषय? थोडया वेळासाठी वाटलं, विषय सुचला तरच लिखाण करू शकतो. लगेचच मनातल्या मनात म्हटलं, आपआपसांत चर्चा करतो, तीही आपल्या वाणीद्वारें बाहेर येणार्या शब्दातूनच की. आपण आपल्याशी बोलत असतो ते ही परा नावाच्या वाणीच्या साहाय्यानेच. चीनमधील तत्ववेत्ता कनफ्युशस म्हणतो "शब्द हा आत्म्याचा उद्गगार आहे". ज्ञानेश्वर महाराज, वाड़ःमयरूपी श्री गणेशाचे वर्णन करून, ज्ञानेश्वरी ग्रंथात सुरवातीलाच शब्दब्रह्माला नमन करतात. "हे शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ती सुवेष||". तुकाराम महराजांनीही म्हटले आहे, "तुका म्हणे पहा,शब्दाचि हा देव| शब्देंचि गौरव, पूजा||"

शब्द म्हणजे साक्षात ईश्वराचं रूप. असं म्हटलं जातं, कि भगवान शंकराने डमरू वाजविला. त्यातून "ॐ" असा ध्वनी निघाला. तेच नादब्रह्म आणि तेच ते अ ऊ म हे शब्दब्रह्म. मानवाने हे ईश्वरी रूप प्रथम अनुभविले ते आपल्या वाणीतूनच. पुढे ते क्रमशः अक्षरातून, म्हणजे लेखणीतून अनुभवयास सुरूवात झाली.मग छापखाने आले, शब्द छापून येऊ लागले, आता तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून शब्दांची भेट होत आहे. लेखनाची माध्यमे बदलत गेली. लेखनासाठी विषयाची सूची वाढत आहे. आजचा काळ झपाट्याने बदलत आहे. असे असुनही, लेखनासाठी लागणार्या विषयाचा उगम आजपावेतो मानवाच्या मेंदूतून आणि मनातील भावविश्वातून होत आहे. पुढेही ही क्रिया अशीच राहिल, असे वाटते. हे आपण शरीर विज्ञानात शिकलो आहे. समाज, आसपासचा परिसर, सृष्टीत घडणार्या घटना, निसर्ग व मानवामधलं नातं ह्या गोष्टी लेखनाचे स्त्रोत आहेत आणि भविष्यातही तेच स्त्रोत राहतील. असे वाटते. ह्याचं कारण या सृष्टीत सर्वात अधिक संवेदनशील प्राणी कोण आहे तर त्याच उत्तर निःसंदिग्धपणे 'मानव' हेच आहे. त्यामुळे आसपासचा परिसर, समाज ह्यांच्यासह राहणे हे त्याच्यासाठी नैसर्गिक आहे.

माणसाला समाजात राहायला आवडणं, हे आपण नैसर्गिक  मानलं. पण समाज म्हणजे काय? आणि निसर्ग म्हणजे काय? ह्या दोन्ही प्रश्नापैकी निसर्गाबाबतची व्याख्या अतिविस्तिर्ण      आहे. एका वाक्यात उत्तर  द्यावयाचे असेल तर    "पंचमहाभूताचा समुदाय" हेच होय. अंबामातेच्या स्तवनात म्हटले जाते "मेळोवोनी पंचमहाभूताचा मेळ, अंंबे त्वां रचिला  गोळ!" अशा ह्या पंचमहाभूतांची आपल्याला अनुभूती येत असते. त्यामुळे आणखिन खोलात जाऊन त्याविषयी चर्चा नको करुयात. निसर्गातील अगदी मेघांचा गडगडाट असो वा त्या पाठोपाठ आकाशात दिसणारे वीजेचे लोळ असो, वा अती वेगाने आणि तेही चक्रगतीने घोंघावणारे वादळ, सागराला येणार्या उंच उंच लाटा, अक्राळविक्राळ प्राणी, त्यांच्या भयंकर आरोळ्या आणि तसेच निसर्गातील न उलगडलेली रहस्यें, यामुळे असुरक्षिततेची भावना अष्मयुगापुर्वीपासूनच मानवामध्ये होती आणि त्यातूनच समूहामध्ये मानव राहू लागला. हा इतिहास आहे. समूहातून समाजाची निर्मिती आणि मग पुढे प्रगती होत होत जगात सर्वत्र प्रगत समाज(Civilized Society) निर्माण झाले. जगभरातील अनेक विद्वानांनी समाजाच्या व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी प्लेटोने म्हटले आहे, "मानवाच्या विविध गरजा व त्यांच्यी पूर्ती स्वतःच करण्याविषयीची त्याची असमर्थता या दोन कारणांमुळे समाज निर्माण झाला असावा". तर अॅरिस्टाॅट्लने, ती माणसाची उपजतप्रवृती असे मानले. आपल्या येथील ऋषीमूनीपासून ते संतांपर्यतांच्या महापुरूषांनी ह्यासंबंधी जे काही म्हटले आहे, त्याच सार एका वाक्यात सांगावयाचे, तर "सृष्टीमाजी जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे " हाच समाज.

आपल्याला काय हवयं ह्याची जाणीव होणे, आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. त्यातून समाजाच्या गरजा, त्रूटी तसेच मानव आणि निसर्ग हयामधील नातं काय आहे हे ही त्याला कळत गेलं असावं. समाजातील लोकांच्या ठायीं अंगभूत गुणवैशिष्ट्येही विभिन्न असतात. त्यामुळे समाजातील काही लोक आपल्या अगंभूत गूणांच्या आधारे समाजाच्या ऐहिक, गरजा पूर्ण करण्याचं काम हातात घेतात, तर कोणी वैचारिक गरजा पूर्ण करण्याचा कार्याला लागतात. आणखिन काही लोक भावनिक गरजा पुर्ण करण्याचं काम हाती घेतात. ऐहिक गरजा ह्या बहुतांशीं विविध वस्तूच्यां उपयोगातून वा उपभोगातून पूर्ण होतात. त्यामूळे ज्या लोकांमधला अंगभूत कल वस्तूनिर्मितीकडे असतो, त्यातून लघु उद्योगपती, मोठे उद्योगपती, व्यापारी, कारागिर, ठेकेदार, बिल्डर, औषधी उत्पादक, टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलवाले, ट्रान्स्पोर्टवाले, हाॅटेलमालक, इत्यादी मंडळी उदयास आली असावीत. ह्यांना Entrepreneurs असेही म्हटले जाते आणि ज्या लोकांना सेवा निर्मितीचे अंग प्राप्त झाले आहे, त्यातून शास्त्रज्ञ, डाॅक्टर,कवी, लेखक, कलाकार, चित्रकार, शिल्पकार, शेतकरी, वकील, प्राध्यापक, चार्टड अकौंटंट, प्राध्यापक, प्रवचनकार, किर्तनबूवा प्रबोधनकार ही मंडळी उदयास आली असावी. हा माझा ढोबळ अंदाज आहे असेच समजावे. ह्या बाबतीत अधिक तार्किक दृष्टया खुलासा मानसशास्त्र, समाजशास्त्र, तसेच मानववंशशास्त्रातील तज्ञ मंडळीच करू शकतात.

माणसाच्या गरजा ह्या भौमैतिक पध्दतीने वाढत असतात. कूठलीही एक नविन सुविधा येते, तिच्यासंगे नवीन असुविधाही येत असते. त्यामुळे व्यक्ती, मग ती श्रीमंत असो, वा गरीब,पुरूष असो वा स्त्री, सदाकाळ सुखी राहिल ही गोष्ट असभंवनीय वाटते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात "जगी सर्व सुखी असा कोण आहे". पण मग सुखी होण्याचा मार्ग काय? समर्थांनीच उत्तर दिलयं, "विचारे मना तूची शोधून पाहे| मना त्वाची रे पूर्वसंचीत केले| तयासारिखे भोगणे प्राप्त झाले||". पूर्वसंचीता प्रमाणे भोग म्हणजे नेमकं काय? मागच्या जन्मीचे पाप पुण्य वगैरे म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून समाजात तुम्ही कसे वागता ह्यालाच तुमचे संचित म्हणावे. पाप काय नी पुण्य काय त्याच्या परीभाषा समाज हितानुरूपच ठरविलेल्या दिसतात. म्हणूनच माणसाने समाजाची चिंता केली पाहीजे. समाजाला दु:खी ठेवून तो एकटा सुखी होऊ शकणार नाही. त्याच प्रमाणे व्यक्तीला दु:खी ठेवून समाजही सुखी होऊ शकणार नाही. शरीरामधे ज्याप्रमाणे हृदयाकडून अवयवांकडे आणि अवयवांकडून हृदयाकडे रक्ताचे अखंड अभिसरण सुरू असते, त्याच प्रमाणे समाजाकडून व्यक्तीकडे आणि व्यक्तीकडून समाजाकडे सुखांचे, इच्छा-आकांक्षांचे, विचारांचे,तत्वज्ञानाचे आणि ध्येयवादाचे अभिसरण होत राहिले पाहिजे. या परस्पर आदान-प्रदानावरच मानवी समाजाचे सुख अवलंबून आहे.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...