रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

महाराष्ट्र मध्यावधी निवडणूकीच्या मार्गावर?


अलिकडे शिवसेना कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे ह्यांनी श्री शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूकीची हवा आहे अशी समजूत अनेकांची झालेली दिसत आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुका कधी होतील ह्याबाबतचा अंदाज कोणी वर्तवू शकत नाही. असे असले तरी भाजपाचा द्वेष करणारे सेनेचे तसेच विरोधी पक्षांचे काही कार्यकर्ते चर्चेच्या ओघात आपआपसांत कमालीच्या  शक्यता  वर्तवित आहेत. त्यापैकी एक म्हणजे दोन्ही काॅग्रेस पक्ष बाहेरून पाठींबा देऊन शिवसेना सरकार स्थापन करू शकते. किंवा शिवसेना सत्तेतुन बाहेर पडणार आणि निवडणूका येणार ही दुसरी शक्यता. परंतु सध्यातरी ह्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याचं धाडस वरील तिन्ही पक्ष करणार नाहीत. कारण गुजरात निवडणूकीत भाजपचा पराभव होईल कि नाही ह्याबाबत हे पक्ष साशंक आहेत. तसेच महाराष्ट्रात भाजपाचा सपशेल पराभव होईल इतका असंतोष जनतेत दिसत नाही. त्यामुळे दोन्ही शक्यताबाबत चर्चा करणं निरर्थक आहे. म्हणून महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीवरून श्री उध्दव ठाकरे आणि श्री शरद पवार ह्यांच्या मधील भेटीचा काय अर्थ निघतो ह्यावर चर्चा करू या. 

कुठल्याही दोन राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट, त्यातच ती भेट सत्तेतील भागीदार पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची, विरोधी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशी असली तर राज्य वा केंद्र सरकार असो त्याच्या स्थिरतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच आहे. महाराष्ट्रात सरकार पक्षाचा घटक शिवसेना सतत भारतीय जनता पक्षावर टिका करीत आहे. शरद पवारांचा पक्ष आणि काॅग्रेस ह्या दोन्ही पक्षांना भाजपा सरकार पाडता येणं शक्य नाही. ह्या दोन्ही पक्षाची अट तसेच इच्छा शिवसेनेने सरकारवर अविश्वास ठराव आणावा, अशीच असणार. आणि शिवसेनेला ते शक्य होईल असे दिसत नाही. म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रातील सरकारवर जे अस्थिरतेचं सावट दिसत असते, त्याला कारणीभूत उध्दव ठाकरेंंची मनोवृत्ती आहे.  कोण्या एके काळी विरोधी पक्षाशी संधान बांधून वसंतदादांच  सरकार पाडले होते, म्हणून शरद पवारांचा हात असेल असा अंदाज बांधण्यात काही तथ्यांश दिसत नाही. राज्य सरकारवर अस्थिरतेचं सावट उध्दव ठाकरेंंच्या  धरसोड वृत्ती मूूळेच येत आहे. काही अंशी उध्दव ठाकरेंचा अहंकार, काही अंशी श्री शरद पवारांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी देऊ केलेला बिनशर्त पाठींबा तसेच सेनेतील आमदारांत सत्तेत सामील व्हावयाचं कि नाही ह्याबाबत पडलेले दोन तट इत्यादी कारणांमुळे उध्दव ठाकरे सत्तेत सामील होतेवेळी  धरसोड वृत्तीत अडकले होते. त्यातून त्यांना बाहेर येणं अजूनही जमलं नाही. सत्तेत सामील झाल्यानंतर महत्वाची खाती (अर्थात अर्थरूपी) मिळाली नाही, त्यामुळे शिवसेनेची कुचंबणा वाढत गेली. शरद पवारांनी निवडणूक निकाल पूर्ण येण्या अगोदरच भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून पाठींबा जाहीर केला. त्यामुळे मोदी-पवार ह्यांच्यात असलेल्या मैत्रीच्या गवगवाचा फायदा घ्यावा, आपणच सरकारवर टिका करीत रहावे, विरोधी पक्षाची स्पेस ही घ्यावी आणि योग्य वेळ येईल तेव्हा सरकारचा पाठिंबा काढून मध्यावधी निवडणूकीला सामोरे जावयाचे अशी व्यूहरचना उद्धव ठाकरेनीं आखली. परंतु त्याचा फारसा फायदा शिवसेनेला झाला नाही. हे मुंबई तसेच इतर पालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यानंतर सिध्द झाले आहे. फडणवीस सरकारला तीन वर्षे पुरी झाली तरी शिवसेना सरकारमध्ये आहेच. 'आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो' असं व्यक्तव्यं सेनेच्या मंत्र्यांच्या मुखी सदैव असायचं, त्याची  काॅग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी वेळोवेळी खिल्ली उडवली. राज ठाकरे तर सेनेला  सत्तेसाठी  लाचार असेच  हिणवितात.  अनेेकांनी सोशल मिडीयावर ही खिल्ली उडवली. ह्यापेक्षा मोठी कुचंबणा वा चेष्टा कुठली असु शकते. सेनेचे गल्लीबोळातील सैनिक काय करणार ?  फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टिका करण्यातच शौर्य गाजवत आहेत. अर्थात प्रत्येक विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडे सध्या तरी तेच एकमेव  काम हाती राहीलं आहे. म्हणून आपल्या पक्षाच्या नेत्याची समदुःखी(समविचारी ह्या शब्दाचं मोदी लाटेत बदलेलं नाव) पक्षाच्या नेत्यांशी भेट झाली कि ह्यांना वाटतं कि आता फडणवीस सरकार गडगडणार. परंतु पुन्हा पुन्हा शिवसेना सत्तेपुढे गुडघे टेकविते हाच अनुभव त्यांना येतो आणि त्यातून नैराश्य पदरी पडते. असं वारंवार नैराश्य पदरी येण्यामुळे वरील तिन्ही पक्षांच्या  कार्यकर्त्यांची विशेषकरून शिवसैनिकांची शक्ती उगीच  खच्ची  होत असते. आणि त्यातून तिन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना भाजपवासी व्हावयाचं वाटलं तर नवल वाटायला नको. शेवटी सत्तेचा मोह फक्त मोठ्या नेत्यानांच असतो असे नाही तर राजकीय पक्षांच्या प्रत्येक पातळीवरील नेते, कार्यकर्ते ह्यांना ही असतो. सत्तेपुढे शहाणपण नसते. हेच खरं.


अलीकडे शिवसेनेने मनसेेचे मुंबईतील नगरसेवक फोडून मनसेवर अन्याय केला अशी भावना मराठी लोकांत झाली. त्यातून श्री राज ठाकरे भोवती सहानुभूती निर्माण झाली. त्याचा योग्य तो फायदा उठविण्यासाठी अकस्मात रित्या राज ठाकरेनीं मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी मनसे स्टाईलने अंदोलन छेडले. त्यात यश ही मिळत गेलं. आज राज ठाकरेंच्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत असल्याचे आपण पाहात आहोत. त्यामुळे मराठी मतदारांचा वाटा मनसे वाढवित आहे. हेच मोठं आव्हान शिवसेने पुढे उभे राहिले आहे. मनसेला सध्या मिळत असलेला पाठींबा आणि त्यातच भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारनी अलिकडे श्री राज ठाकरेंची घेतलेली भेट शिवसेनेला संभ्रमित करणारी ठरली. काॅग्रेसनेही संजय निरूपमनां मैदानात उतरावून अमराठी फेरीवाल्यांच्या समर्थानर्थ दंड थोपाडले. त्यामुळे शिवसेना प्रिन्ट, इलेट्राॅनिक्स आणि सोशल मिडीयातून बाहेर फेकली गेलेली दिसत आहे. त्यामुळेच उध्दव ठाकरेनीं शरद पवारांकडे भेट घेऊन भाजपावर काही दबाव पडतो का ह्याची चाचपणी केली असावी किंवा उध्दव ठाकरे स्वतःवर वाढलेल्या दबावाखातर बाळासाहेबांचे मित्र शरद पवारकाकाकडे गेले असावेत. ह्या पलिकडे त्या भेटीतून फारसं काही घडेल असे संभवत नाही. कारण सध्या पवारांना स्वतःच्या पक्षाची कमी होत असलेले बळ भेडसावत आहे. तसेच उध्दव ठाकरे ह्यांच्या पक्षाशी युती करणं त्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अडचणीचे आहे. आणि ही बाब उध्दव ठाकरे जाणत नाहीत असे ही नाही. परंतु शिवसैनिकांची सत्तेतुन बाहेर पडण्याची इच्छा अवसानघातकी असल्यामुळे  श्री उध्दव ठाकरेंवर  दबाव वाढत  राहतो. शिवसैनिकांची इच्छा अवसानघातकी आहे, त्यामागे  दोन कारणे आहेत. एक राज ठाकरेंचं Challenging Come Back आणि मराठा मोर्चासंबधी सेनेने सुरवातीला केलेलं व्यक्तव्य. कारण  खालच्या पातळीवर काम करण्यार्या मराठा शिवसैनिकाला मराठा मोर्चासंबंधीचं वाटलेलं आकर्षण लपून राहीलेलं नाही. कोण जाणो मराठा मोर्च्याचं राजकीय पक्षात रूपांतर झालं तर? गुजरात मधील पटेलाचं, राजस्थान- हरियाणा मधील गुर्जर आणि जाटाचं, महाराष्ट्रातील मराठाचं आरक्षणासाठी होत असलेली अंदोलने ही राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांना अडचणीचे ठरणार आहेतच. कारण न्यायालय हे संविधान प्रमाण मानणार. त्यांना लोकांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भावनांशी काही देणं-घेणं नसते. आपणच लोकांच्या भावना चेतावयाच्या आणि त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याची राजकीय पक्षांची खेळी निंदनीय तशीच धोकादायक आहे. एकविसाव्या शतकातील महासत्तेचं स्वप्न पाहात असलेल्या आपल्या देशात एकामागून एक अशा सर्वच प्रान्तात ही आरक्षणाची लागण लागली तर आपलं काही खरं नाही असेच अत्यंत कष्टी मनाने म्हणावयासं वाटतं. 

मागे मी एकदा म्हणालो आहे कि शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका निभावणे फार कष्टदायक वाटते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालतील आकडेवारी शिवसेनेच्या अंदाजानुसार नव्हती. निकाल बाहेर येत असतेवेळीच शिवसेनेने भाजपचं अभिनंदन करून सरकारला पाठींबा दर्शविला असता तर शरद पवारांना पाठींबा दर्शविण्याची संधी मिळाली नसती. शरद पवारांच्या पक्षाचा पाठींबा घेऊन भाजपाला सरकार स्थापणे शक्य नव्हतंच. इतकं स्पष्ट दिसताना शिवसेनेने सत्तेत सामील होण्यासाठी दिरंगाई केली ती शिवसेनेला मारक ठरली. मुळात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही ह्याचा अंदाज श्री शरद पवारांना उध्दव ठाकरेपेक्षा लौकर आला. त्यातून त्यांनी शिवसेनेच्या अगोदरच भाजपला पाठिंबा दर्शवून केवळ शिवसेनेचीच नव्हे तर भाजपाचीही गोची केली. भाजपाने एनसीपीचा पाठींबा घेतला नसला तरी भाजपा आणि एनसीपी मध्ये गुप्त संगनमत आहे अशी चर्चा निर्माण करण्यात तरी शरद पवार यशस्वी झाले. अशा प्रकारच्या चर्चेमुळे शिवसेनेला सत्तेत राहूनही भाजपावर टिका करणे आवश्यक भासलं. शिवसेना म्हणजे सर्वात लोकहितकारक पक्ष आहे असे उध्दव ठाकरे भासवत असले तरी त्यावर लोकांचा विश्वास बसत आहे असे काही दृष्टीस येत नाही. सामना वृत्तपत्रात तसेच उध्दव ठाकरे करीत असलेली सरकारवरली टिका फार तर शिवसैनिकांना सतत चेतवत ठेवण्यासाठी मदतगार ठरत असेल परंतु सरकारमध्ये राहून केंद्र आणि राज्य सरकारवरील टिका शिवसेनेला मारक ठरणार असा अंदाज मी वर्तविला होताच. सध्या मनसेला मिळत असलेल्या लोकांच्या पाठींब्यावरून हा अंदाज खरा ठरत आहे असे दिसते. कारण महाराष्ट्रातील शहरात अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये बिगर मराठीवाल्यांची संख्या अधिक असु शकते ह्याचा अभ्यास राज ठाकरेंनी केलेला असावा. आणि त्यातून मराठी माणूस आपसुक सुखावला जात आहे. सध्या शिवसेनेची 'ना भाजपचा, ना विरोधी पक्षांचा मित्र. ना सत्ताधारी ना विरोधी पक्ष!'. अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. आणि त्यात मराठी मतांचा भागीदार असलेला मनसे फार चर्चेत आहे. त्यामुळे शिवसेना दिशाहीन होत आहे. शिवसेनेला ना भाजपावर उगारलेले शस्त्र म्यान करता येते, ना  तिच्याकडे विरोधी पक्षांची मोट बांधण्याची कुवत. त्यामुळे "शिवसेना विकासाच्या मार्गात अडथळे उभे करीत आलेली आहे त्यामुळे सरकार चालविणे अशक्य बनले " असे जाहीर करीत, योग्य वेळी विधानसभा विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाणं हे भाजपलाच अधिक श्रेयस्कर आहे असेच मला दिसत आहे. असे असले तरी भाजप पाच वर्षे पूर्ण करण्यावर भर देईल आणि तशी बहुमतासाठी पाठींबा देणारे आमदार मिळण्याची सोय भाजपकडे असावी. पण पाठींबा काढून स्वतः सरकार स्थापन करणे आता तर सेनेला आत्मघातकी ठरेल. आणि तसं केलं तरी राष्ट्रपती राजवटीचं भय समोर उभे ठाकणारच ना! त्यामुळे सेनेच्या नेेत्यांच्या विरोधी पक्षाच्या  नेत्यांशीं परस्पर किती भेटी होवो, महाराष्ट्र सरकार किती स्थिर वा अस्थिर ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त भाजपच्या हातात आहे. आणि हेच महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय स्थितीवरील भाष्य अचुकतेच्या जवळपास जाणारं आहे असे वाटते.

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा


अलिकडे WhatsApp वर एका ग्रुप वरून पोस्ट आली होती; त्यात म्हटले होते कि "जीवनात अर्धे दुःख चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्याने येते, तर बाकीचे अर्धे दुःख खर्या लोकांवर संशय घेतल्यामुळे येते". WhatsApp वरील ही पोस्ट चुकीची नाही. कारण व्यवहारी जगात विश्वासघाताचा प्रसंग सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला अनुभवास आलेला असतो. तसेच सच्च्या माणसांवर संशय घेतल्याने स्वतःचेच नुकसान झाल्याचा अनुभवही प्रत्येक व्यक्तीस आलेला असतो. हे मान्य करीत त्या पोस्ट वर मी माझं मत मांडले ते असे, "आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो ही आपली चूक आहे तसेच खर्या माणसांवर संशय घेतो तीही आपली चूक असते; After all man is a servant of circumstances ".

मी माझं मत नोंदविल्यानंतर लागलीच, मला माझेच मत    अपूर्ण वाटू लागले. मग विचारचक्र सुरू झालं. त्यातूनच हा लेख आकारास आला. म्हणून वरील पोस्ट ज्या व्यक्तीने WhatsApp वर पाठविली त्याने मला उपकृतच केले आहे, असेच मी मानतो. ब्लॉग वर लिहणं हे मी संवाद मानतो. संवादातून लेखनासाठी विषय सुचतात. ख्यातनाम लेखिका आणि मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे 'युगान्त' ह्या पुस्तकातील प्रस्तावनेत सांगतात, "आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटते ते इतरांना सांगावे ही एक दबून न राहणारी प्राथमिक प्रवृत्ती आहे". इरावतीमॅडमचं  म्हणणं  इतकं खरं आहे कि सामान्यतल्या सामान्य व्यक्तीमध्ये असलेल्या ह्या प्रवृत्तीला संवादातून तसेच लिखाणाद्वारे न्याय मिळतो. "प्रतिपदा संवादाची" ह्या माझ्या पहील्या लेखातच मी ही बाब कबूल केलेली आहे. संवादातून जीवनाला गोडी प्राप्त होत असते. संवादात आपण स्वतः व्यक्त होत असताना,समोरच्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठीचा संयम म्हणा वा सकारात्मक प्रतिसाद देण्याची सवय आपसुक आपल्या अंगात भिनते. हे लोकशाहीच्या मूल्याशी सुसंगत आहे. आणि लोकशाही हीच आजच्या सुसंस्कृत मानवाला सर्वात साजेशी अशी राज्यप्रणाली आहे. कारण ''जशी दृष्टी तशी सृष्टी" आणि ''व्यक्ती तितक्या प्रकृती'' इत्यादी नैसर्गिक सिध्दांतांच्या जवळपास जाणारी ती एकमेव अशी राज्यप्रणाली आहे. असो. आता आपण मूळ विषयाकडे येऊ या.

To err is human being. जो चुकतो, तो माणूस. असे जे म्हटले जाते ते चुकीचे नाही. अगदी आपणास वंदनीय असलेल्या थोर पुरूषांच्या हातून चूका झालेल्या आहेत हे ही आपल्या वाचनात आलेले आहे. साधारणतः हातून  होणार्या चुकासंबंधी चर्चा करते वेळी कुठल्या परिस्थितीत त्या चुका होतात ह्यावर फारसा विचार करण्याचा प्रघात नसतो. ज्यांच्या हातून किंवा ज्यांच्यामुळे चुका झाल्या त्यांना जबाबदार धरण्याची ही एक सहज मानवी प्रवृत्ती आहे. एखाद्या व्यक्तीने आपला विश्वासघात केल्यामुळे आपलं नुकसान होते किंवा आपल्याला एखाद्या कार्यात अपयश येते. हे अगदी बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण विश्वासाने काही काम सोपवितो तेव्हा ती व्यक्तीच चुकीची आहे, हे लक्षात आलेलं नसते. त्यामुळे चुक ही अप्रत्यक्षरित्या आपलीच असते, नाही का. म्हणून मी माझ्या पोस्ट मध्ये प्रांजळपणे मांडले कि व्यक्ती निवडण्यात आपली चूक होते. परंतु माझं हे मत ही पूर्णतया बरोबर नाही. कारण एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा कुठलीतरी परिस्थिती जिच्यावर आपलं नियंत्रण नसते, ती आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कब्जा मिळवित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यावर विचार करता करता सविस्तर रित्या माझं मत मांडण्याचा हा खटाटोप करीत आहे.

आता त्या पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळू या. खर्या माणसांवर संशय घेतल्यामुळे आपल्या पदरी दुःख येते. हे ही खरेच आहे. परंतु ह्या ठिकाणीही आपण संशय का घेतो, किंवा कुठल्या परिस्थितीत संशय घेतो ह्यावर चर्चा केल्याशिवाय ठोस अशा उत्तरापर्यंत आपण पोहचू शकणार नाही. आदीमानव समूहात का राहात होता? असुरक्षिततेची भावना हा दोष वा वैशिष्ट्य माना, परंतु ती जन्मतः माणसांमध्ये विराजमान असते. त्यातूनच संशय नावाचं भूत माणसाच्या मानगुटी वर सतत बसलेले असते. अतीसावधनेतूनही संशयवृत्ती जन्मास येते हे सत्य आपण नाकारू शकतो का? विशेषतः आर्थिक व्यवहारात कोणातरी व्यक्तीवर संशय येणे वा त्या व्यक्तीवर भरवसा न ठेवणे हे ही नैसर्गिक आहे. परंतु अशा व्यक्ती खरोखरीच खर्या आणि प्रामाणिक असतात, असा निष्कर्ष काढणे हे ही धाडसाचे ठरते. परंतु आपण तसे करतो. ह्याचं कारण ज्यांच्यावर आपण संशय घेतला, त्या व्यक्ती वाईट आहेत असं अनुभवयास आलेलं नसल्यामुळे आपल्यामध्ये एक अपराधपणाची भावना बळावत असते. आणि त्यातून त्यांच्या प्रती एक सहानुभूती निर्माण होते. खरं पाहता जेव्हा आपण अशा व्यक्तींशी व्यवहार करू आणि आपला विश्वासघात झाला नाही असा प्रत्यय आपल्याला येईल तेव्हाच त्यांना प्रामाणिकतेचं सर्टिफिकेट देणे योग्य होईल, असे मला वाटते.

सारांश असा की विश्वास आणि संशय ह्या परस्पर विरोधी गोष्टी असल्या तरी आपल्या मनात त्या जन्मतः विराजमान असतात. फक्त विश्वास कोणावर ठेवायचा आणि संशय कोणावर घ्यावयाचा हा प्रश्न सोडवता येणे आवश्यक असते. परंतु त्यात सर्वोच्च श्रेणीतील यश मिळेल ह्याची शाश्वती जवळपास नसतेच. काही दुःखे प्रारब्धानुसार भोगणे, ह्या पलीकडे आपल्या हाती काही नसते. आणि प्रारब्ध म्हणजे तरी काय, आपल्याच कर्माची ती फळं ! अनेक विद्वानांनी श्रीमद्भगवदगीतेतील कर्मयोगावर भाष्य केलं आहे. बहुतांश विचारवंतानी पुर्व जन्मातील कर्मांची चांगली-वाईट फळे आपल्याला वर्तमान जन्मात चाखावी वा भोगावी लागतात, असे म्हणत जन्माचा फेरा आपल्याला चुकवीता येत नाही ह्या मान्यतेला दृढ केले आहे. अलीकडे 'Prominent Scientists Claim That Death Does Not Exist' ह्या मथळ्याखाली www.dailyamaze.com ह्या साईटवर लेख वाचला. त्यात पदार्थविज्ञानाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ डाॅ राॅजर पेनरोझ आणि त्यांची टीम तसेच म्यूनीच येथील Institute of Physics मधील शास्त्रज्ञ बराच अभ्यास केल्यानंतर आपल्या धर्मातील आत्म्याचं अमरत्व, मनकोश,पारब्ध इत्यादी संबंंधी पुष्टी देऊ लागलेत असं दिसतंय. आपले समर्थ रामदास स्वामी  म्हणतात,
मना त्वाचीं रे पूर्वसंचित केले!
तयासारखी भोगणे प्राप्त झालें!!.
पुढे ते म्हणतात,
मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते !
अकस्मात होणार होऊनि जातें!!
घडे भोगणें सर्वही कर्मयोगें!
मतीमंद ते खेद मानी वियोगें!!
समर्थांच्या शिकवणीची प्रचीती खाली दिलेलं उदाहरण वाचल्यावर आपणांस येऊ शकते.

ग्रहांचे शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्यांना लीलावती नावाची मुलगी होती. तिच्या जन्मकुंडलीत ती विधवा होणार असे लिहले होते. म्हणून त्यांनी  तिचे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या शिष्यांना हे काही रुचले नाही. ते भास्कराचार्यानां म्हणाले अमुक एका मुहूर्तावर लग्न झाले तर तिला वैविध्य येणार नाही. त्यावर भास्कराचार्यांनी शंका काढली की तुम्ही सांगता त्या मुहूर्तावर लग्न लागेल का? त्यावर शिष्य म्हणाले, "त्याची आम्ही हमी देतो!". एकाहून एक सरस अशा त्यांच्या विद्वान शिष्यांनी हमी दिल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न करावयाचे ठरविले. मुलीच्या लग्नाच्या दिवशी भास्कराचार्य आत देवघरापाशी जाऊन बसले. ठरल्याप्रमाणे लग्न विधीला सुरवात झाली. सारे काही व्यवस्थीत सुरू होते. एवढ्यात लिलावतीच्या गळ्यातील मोत्याच्या हारातील एक मोती केव्हा पडला आणि घटीकापात्राच्या छिद्रात कधी जाऊन पडला हे कोणालाच कळले नाही. भास्कराचार्य आतील देवघरापाशी बसले होते तरी, त्यांच लक्ष बाहेर होतं. पोरीचं लग्न अजुनही कसे नाही लागले? झाले तरी काय, हे पहावयास ते बाहेर आले आणि घटीकापात्रात डोकावून त्यांनी पाहिले. तर घटीकापात्राच्या छिद्रात एक मोती पडलेला दिसला. ते म्हणाले "चुकले, मुहूर्ताची वेळ निघून गेली".त्यांनी मग शिष्यांना हाका मारल्या. त्यावर शिष्य म्हणाले "अजूनही घटीका भरली नाही महाराज " ते ऐकून भास्कराचार्य म्हणाले "अरे, भरली नाही काय म्हणता? नीट बघा". तेव्हा शिष्यांनाही घटीकापात्राच्या छिद्रावर पडलेला तो मोती दिसला. मग कसेबसे मुलीचे लग्न लावणे भाग पडले. थोड्याच दिवसात नियतीप्रमाणे लीलावती विधवा झाली. इथे भास्कराचार्यासारख्या विभुतींनी आपल्या शिष्यावर विश्वास कसा काय ठेवला,असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु उत्तर काय?

सतरा वेळा युध्दात पराभव ज्याचा केला त्या महंमद घोरीला पृथ्वीराज चौहान का क्षमा करतो? केवळ कैकयीने हट्ट धरला आणि श्रीरामाच्या वाटेला वनवास आला. का? केवळ सीतेने हट्ट केला म्हणून श्रीराम कांचनमृगाच्या मागे धावतात. असे सोनेरी हरीण असते का, असा प्रश्न श्रीरामाला का पडला नाही? लक्ष्मणाने आखलेली रेषा ओलांडून सीता रावणाला भिक्षा देते.का? भिष्माला प्रतिज्ञापूरतीचा कैफ; तो का व कसा वाढत गेला? द्रौपदी स्वतःच्या रूपाभिमाने भरलेली का राहते? एकदा घेतलेला त्रागा ती अखेरपर्यंत का सोडीत नाही? युध्दिष्ठीर द्यूत खेळणं सोडत नाही. का? भीम कौरवांना जळावयाचे सोडीत नाही, अर्जुन लढायचे सोडत नाही, दुर्योधन द्वेष सोडीत नाही, कर्ण पीळ सोडीत नाही, कुंती खंत सोडीत नाही; धृतराष्ट्र आधीच दृष्टीहीन परंतु त्याबाबत महाभारताच्या वाचकांनी कधी चेष्टा केली असावी असे संभवत नाही. परंतु तो पितृप्रेमाने इतका अंध होतो कि भर दरबारात वस्रहरण होताना कुलवधुचा त्रागा त्याला ऐकू का येत नाही? ह्या बाबतीत सारा दोष त्याच्या पदरात पडलाच ना; पुत्रप्रेम ही स्वाभाविक बाब; पण त्याला मर्यादा असणे ओघाने येतेच ना! आपल्या देशाची फाळणी ही आपल्यासाठी शोकांतिकाच. परंतु सत्ताधारी तर ब्रिटिश होते ना! बॅरिस्टर जीनाची महत्वाकांक्षा का कशी वाढली? इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत राष्ट्राच्या, समाजाच्या, आम आदमीच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात, अनेक चुका घडतात. आणि त्यांची किंमत मोजतच पुढे वाटचाल करावी लागते. का? उत्तर एकच. ते म्हणजे After all man is servant of circumstances. मनुष्य परिस्थितीचा गुलाम असतो. हे सत्य पडताळून पाहणे शक्य आहे, परंतु ज्या गोष्टी आपल्या आधीन नाहीत त्यावर आपण मात करू शकत नाही. हे ही तितकेच खरे .

आपले डोळे (दृष्टी), वाणी (आवाज), नाक(वास), त्वचा(स्पर्श), जिव्हा(रस/चव) आणि कान (ऐकू येणं) ही आपली ज्ञानेंद्रिये. मेंदू आपल्या शरीराचा राजा आणि बुध्दी ही मेंदूच्या कार्याचा भाग आहे. इथपर्यंत विज्ञानाने आपल्याला ज्ञात केलं आहे. मग विचार-विकार, संस्कृती -प्रवृत्ती- विकृती, पाप-पुण्य, सुख-दुःख, हार-जीत, आशा-निराशा, संशय-विश्वास, मोह- लोभ, दया-क्रोध, प्रेम-मत्सर इत्यादी भावना मनामध्ये विराजमान आहेत असे आपण मानतो, ते मन कुठे असतं? मन म्हणजे नेमके काय? परंतु मनाची व्याख्या आजपावेतो पूर्णत्वास गेलेली नाही. मन हे फार चंचल असते. ते काबूत ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योग, इत्यादी उपाय आपल्यासाठी उपलब्ध असतात. तसेच आधुनिक वैद्यकीय शास्त्रातही औषधें उपलब्ध आहेत. परंतु तशा प्रकारांच्या उपाययोजनेचा फारसा उपयोग होत नसतो. कारण त्या उपाययोजना कार्यन्वयीत करण्यात आपलं सातत्य कमी पडत असते. मग सातत्य कमी पडल्यावर काही उपाययोजना आहे का? असा प्रश्न पडतो. हो, उत्तर आहे. ते म्हणजे चिकाटी. परंतु चिकाटीने ज्या काही कार्यात आपण यश प्राप्त करतो ती सारी कार्यें प्रथमदर्शनी बहुतांश वैयक्तिक पातळीवरची असतात. एखाद्या परीक्षेतील यश वा संशोधनातून शास्त्रज्ञांनी तयार केलेले यंत्रे ही त्यापैकी काही उदाहरणे होत. टेलीफोनचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ एडिसनचे ९९९ प्रयत्न चुकले आणि हजाराव्या प्रयोगात ते टेलीफोनचे यंत्र बनवू शकले. त्यावर ९९९ वेळा प्रयत्न केले म्हणून यश मिळाले अशी मार्मिक प्रतिक्रिया एडिसनने दिल्याची वाचनात आले आहे. ह्याचा अर्थ असा की एडिसन ह्यांचे ९९९ प्रयत्न चुकीचे नव्हते, ते तर त्यांच्या शोधकार्यातील टप्पे होते असेच मानायला हवे. पोर्तुगीज खलाशी कोलंबस सागरमार्गे भारताकडे यावयास निघाला, परंतु पोहचला दुसर्या देशात. त्याचेच नाव अमेरिका असे पडले. एडिसन असो वा कोलंबस ह्यांच यश वैयक्तिक पातळीवरील मानले तरी त्यातही त्यांचे आई-वडील, गुरूजन (शास्त्रज्ञांच्या बाबतीत पूर्वासुरीचे शास्त्रज्ञ किंवा निसर्गरूपी गुरू) ह्यांची मदत झाली होतीच की. कोलंबसने म्हणे, तेथील राणीला भारतातील सुंदर नक्षीकाम असलेले दागिने आणण्याची लालूच दाखविली होती आणि त्याचमुळे त्याला परवानगी मिळाली. शिवाय राणीतर्फे प्रवासाचा खर्च, सरकारी गलबतही मिळाले. तात्पर्य हेच कि समाजाचा एक घटक म्हणून आपण वावरत असतो, त्यावेळी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अनेक आपले आप्त, इष्ट- मित्र, शेजारी, अशा अनेक आपल्या संपर्कातील समाजबांधवांच्या वर्तणूकीचा आपल्यावर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडत असतो. कारण ह्या विश्वाची उत्पत्ती ऊर्जेतून झाली असं विज्ञान सांगते. तेच अध्यात्मिक गुरूही सांगत असतात. फक्त ते ऊर्जाऐवजी चैतन्य हा शब्द वापरतात. विश्वातील ऊर्जा दोन प्रकाराची असते. एक सकरात्मक(धन) दुसरी नकारात्मक (ऋण). ह्या विश्वाची निर्मिती हा एक अपघात आहे असे विज्ञान मानते, तर अध्यात्मशास्त्र विश्वाची निर्मिती ही ईश्वराची लीला मानते. परंतु त्यामुळे विश्वाच्या रचनेत, स्वरूपात, वैशिष्ट्यात तसेच दोन्ही प्रकारच्या ऊर्जातही काही फरक पडत नाही. आंब्याच्या झाडावरून कोकीळेच्या सनईचे गुंज ऐकू येते तर दुसर्या बाजूला ताडाच्या वृक्षावरून घुबडाचा भयभीत करणारं कर्कश खेसकणेही ऐकू येत असते. ह्या सत्यातही अजूनही बदल झाला नाही आणि होणार ही नाही. त्यामुळे विश्वासू माणसांचा शोध करावयाचा तरी कसा? प्रत्येक व्यक्तीत रज, तम, सत्व हे त्रिगुण विसावलेले असतात. त्यामुळे कोणी मानो वा न मानो दैवी शक्ती आणि आसुरी शक्तीं मधील दंद्व सतत आपल्या अंतःकरणी सुरू असते. आणि बहुतांशी आसुरी शक्ती लौकर उफाळून वर येत असते. कारण काटेरी झुडपं सुर्यप्रकाश, खते आणि मशागताविना वाढत असतात. तीच निसर्गाची नियमावली आहे. आणि तिचं परिचीत नाव आहे 'नियती '. नियतीचा पराभव आपण करू शकत नाही. मानवी रूपात अवतार घेणार्या विभूतीनांही दुःख भोगावं लागलं. त्यांना ही छळ, चुका, मानहानी, वादविवाद आरोपांना सामोरे जावे लागले. शेवटी काय 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा '. हेच सत्य. म्हणून जीवनात आलेल्या संकटांना, आरोपांना, अन्यायाला फसवणूकीला, मानहानीला, हसतमुखाने स्विकारत, मुखी हरीनाम घेत, जे सदेही वैकुंठात गेले अशा संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग सदैव ओठीं, कंठी, ठेवणे हाच सुखःदुखा वरील रामबाण उपाय असावा असेच मला वाटते.
मन करा रे प्रसन्न! सर्व सिद्धीचें कारण!
मोक्ष अथवा बंधन! सुख समाधान इच्छा ते!

(विशेष सूचना:- प्रस्तुत लेखक दैववादाचा पुरस्कार करीत नाही. प्रयत्न हाच देव ह्यावर त्यांची निष्ठा आहे. ह्याच ब्लाॅगवरील 'आपल्यातला देव ' तसेच  'आपली वाणी आणि आपलं यश ' ह्या लेखावरुन प्रचीती येईल)

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

पक्षातंराचा दिवाळी फराळ!


अलिकडे दिवाळीच्या पर्वावर मुंबई महापालिकेतील मनसेच्या सातापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ह्यावर वृत्तपत्रांचे संपादक, न्युज चॅनेल्सचे संपादक, तसेच सोशल मिडीया आणि गल्लीबोळातून गप्पांच्या कट्ट्यावर सामन्यजनांनी ही आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या. ह्यातील आपल्या भुवया उंचावतील अशी प्रतिक्रिया म्हणजे, 'म्हणे, राज ठाकरे ह्यांनीच हे पक्षांतर घडवून आणले. असल्या अंदाजात ९९ टक्के तथ्य दिसत नाही. भाजपा आणि शिवसेनामधील कलगीतुरासंबंधीही असे ऐकू येते, कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ह्या दोघांनीही विरोधी पक्षांना काही स्पेस मिळू नये म्हणून आखलेली एक राजकीय चाल आहे. ह्यात तथ्य असू शकते. कारण अशीच स्ट्रटेजी मुलायमसिंग आणि मायावतीनी वापरात आणून उत्तर प्रदेशात आलटून पालटून सत्तेवर येत राहिले. क्रिकेट मधून क्लाइव्ह लाईड आणि विव्ह रिचर्डस ह्यांच्या निवृत्तीनंतर वेस्ट इन्डियन फलंदाजीसंबंधी क्रिकेट मधील समालोचक म्हणत असत "Predictibility of West Indian batting is Unpredictibity" त्याची आज आठवण येत आहे. कारण आजकाल राजकारण वेस्ट इंडियन फलंदाजी सारखं बेभरवशाचं झालं आहे. येथे काहीही घडू शकते. ह्याबद्दल लोकांना आता बिलकूल शंका राहिलेली दिसत नाही.

मागे मी एका लेखात म्हटलं आहे कि पंडीत नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, बॅ नाथ पै, डाॅ शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, डाॅ लोहिया ह्यांच्या काळात आपण राहात नाही. काॅग्रेसमधील सिंडीकेट आणि इंडिकेटचे भांडण हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान  लालबहाद्दूर शास्त्री ह्यांच्या अकस्मात निधनानंतर सुरू झाले; तेव्हापासून भारतीय राजकरणाचा पोत घसरू लागला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या संरक्षण आणि तत्कालीन परराष्ट्र धोरणातील मुत्सद्दीपणाचं मी कौतुक करीत असतो .परंतु देशांतर्गत राजकारणाचा पोत घसरण्याचा दोष इंदिराजीकडे जातो. हे माझे तितकेच प्रांजळ मत आहे. इंदिरा गांधीच्या काळात स्टेट बॅंकमधील घोटाळा, रेल्वे मंत्री ललित नारायण मिश्रा आणि नगरवाल ह्यांच्या हत्येसंबंधात इंदिराजींचा हात असल्याची चर्चा, अलाहाबाद हायकोर्टाने त्यांच्यावर निवडणूकीत केलेला अपहाराचा ठपका देऊन त्यांची  निवड दोषपूर्ण करून त्यांना निवडणूक लढविण्यिसाठी ६ वर्षाची केलेली बंदी, नंतर सत्तेसाठी राष्ट्रपतीनांही अंधारात ठेवून देशभर आणलेली आणिबाणी आणि आणीबाणीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना कारावास पाठविणे, संचारबंदी, इत्यादी कृष्णकृत्ये भारतीयांनी प्रथमच अनुभवली. १९६७-६८ काळात काही राज्यामधील विरोधी पक्षांची आघाडी- सरकारे उलथून पाडण्यांचं कृत्त्य इंदिरा गांधींनी केलं. त्याचा वचपा विरोधी पक्षांनी १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या तेव्हा उत्तर भारतातील  काॅग्रेसची  सत्ता  असलेली  सर्व  राज्य    सरकारे  बरखास्त करून काढला. १९८० साली इंदिरा गांधींची केंद्रात सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांची राज्यातील सरकारे बरखास्त केली. हरियाणा मध्ये तर जनता पार्टीच्या पूर्ण सरकारनेच काँग्रेसमध्ये प्रवेश करून भारतीय राजकारणातील पक्षातंराचा अजब प्रकार घडविला. 

पक्षातंरावर बंदी आणण्यासाठी सर्व पक्षानी एकमताने पक्षातंरबदीचा कायदा अस्तित्वात आणला. फार मोठी आशा निर्माण झाली. परंतु सर्वच पक्ष कायद्यातील त्रुटींवर मात करीत वेळोवेळी दुसर्या पक्षामध्ये उभी-आडवी, तिरकी-बेरकी फूट पाडण्यात माहिर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला दोष न देता अशा घाऊक आयारामामुळे शिवसेना बळकट होईल का ह्यावरच चर्चा करू या. राज ठाकरे ह्यांनी त्यांचे नगरसेवक शिवसेनेत पाठविले असं काही म्हटल जाते, ते काही तर्काला धरून नाही. हे मी वर मांडले आहे. मनसे हा पक्ष नेहमी मराठी माणसांच्या मतांसाठी कायम स्वरूपात शिवसेनेला स्पर्धक राहणार हे निश्चित. संपूर्ण मराठी मतदार ह्या दोघांत विभागला जाऊन तामिळनाडूतील डीएमके आणि एडीएमके पक्षासारखे आलटून पालटून सत्तेवर येत राहतील अशी शक्यता नजिकच्या भविष्यात संभवत नसली तरी मराठी माणसांमध्ये राज ठाकरे ह्यांच्याबद्दल त्यांच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सहानुभूती निर्माण झालेली आहे असे दिसते. जर हे नगरसेवक भाजप मध्ये गेले असते तर भाजपावर सर्वच बाजूने जोरदार टिका झाली असती. कारण केन्द्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. परंतु मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला ही बाब मराठी मनाला (ह्यात शिवसैनिकांची मनेंंही अंतर्भूत आहेत हे विशेष) अधिक कष्टदायक वाटते. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस ह्या तिन्ही पक्षांचे नगरसेवक वा आमदार फोडले असते तर शिवसेनेचं कौतुक झालं असतं. 'शिवसेनेला मनसे हाच पक्ष फोडायला मिळाला का, शिकार करायची होती तर वाघ, सिंहाची तरी करायची होती ', असं आता ऐकू येत आहे. ह्याचा फटका शिवसेनेला पडेल असेच दिसत आहे. 'महाराष्ट्र सरकार किती स्थिर, किती अस्थिर' ह्या माझ्या लेखात मी स्पष्टपणे सांगितले आहे कि जर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठींबा काढला, आणि राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका आल्या तर मनसे ह्या पापांचं खापर शिवसेनेवर फोडेल. कारण 'तुम्ही सत्तेत राहिलात कशाला? ही तुमची लाचारी '. असेच मनसे शिवसेनेला उद्देशून म्हणणार. जरी फडणवीस सरकार लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकलं तरीही शिवसेनेवर टिका करणे मनसेला अधिक सोयीचं असतं. कारण ह्या दोन्ही पक्षाची मतपेटी समान आहे. सरकारवर टिका करताना मनसे भाजपावर टिका करेल, अगदी सणकून. तरी त्यातून मनसेला फायदा संभवत नाही हे राज ठाकरे जाणून आहेत. आता तर शिवसेनेने मनसेचे नगरसेवक पळविले त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा मांडताना शिवसेना कमकुवत ठरलेली दिसेल. अगदी मुंबईत महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न सोडविले तरीही. भाजपाही इतर पक्षाची फोडाफोडी करीत आहे,  परंतु त्यावर  मनसेच्या टीकेची धार आपोआप कमी झालेली दिसेल. त्यातच मुंबईतील भाजपा नेते आशिष शेलारनी लागलीच राज ठाकरे ह्यांची भेट घेतली. कशासाठी ही भेट घेतली, ह्याचा तपशील बाहेर आला नसला तरी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात बदल होण्याचे संकेत अंधुक प्रमाणात का होईना दिसत आहेत.

प्रश्न उरतो तो हाच कि शिवसेनेला मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी इतकी घाई का झाली? असं ऐकिवात आहे कि शिवसेनेचे काही आमदार सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी मनसेचे नगरसेवक फोडले असावेत का? हीच शक्यता असावी. कारण शिवसेना तसेच मनसे ह्या पक्षांची मांडणी अशी आहे कि ह्या दोन्ही पक्षाच्या मुंबईतील नेत्यांचा प्रभाव (अर्थात अर्थरूपीसुध्दा) ग्रामीण महाराष्ट्रातील ह्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पडत असतो. त्यामुळे मुंबई महापालिका (एक मोठं उत्पन्नाचं साधन) हातातून जाऊ नये, आणि ग्रामीण महाराष्ट्रात मनसेचं बळ वाढणार नाही ह्यावर उध्दव ठाकरेंचा कटाक्ष आहे. सोबत सेनेतील काठावर बसलेले आमदार आणि नारायण राणेंचा एनडीयेमधील संभाव्य प्रवेश ह्या सर्व वजाबाकीच्या बाजूमध्ये होणारी संभाव्य बेरीज उध्दव ठाकरे टाळू इच्छितात असे दिसते.

श्री उध्दव ठाकरे सतत केंद्र आणि राज्य सरकारवर टिका करीत आले आहेत. त्यांना असेही वाटत असावे कि सध्या भाजपाच्या केंद्र सरकारवर लोकांची नाराजी दिसत आहे. त्यामुळे Anti-incumbency चा तोटा त्यांच्या पक्षाला भोवणार नाही. अजूनही २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीला अवकाश आहे. केंद्र सरकारवर जी नाराजी दिसत आहे, तीचं स्वरूप कसं आहे, ह्याकडे एक नजर टाकली तर असे दिसून येते कि टीव्हीवरील राजकीय चर्चेचे जे कार्यक्रम असतात, त्यामध्ये विविध पक्षाच्या प्रवक्त्यांची संख्या लोकसभेतील पक्षीय बलानुसार नसते. त्यामुळे भाजपाचा एक प्रवक्ता आणि तोच प्रवक्ता एनडीएचा. परंतु विरोधी पक्षांना प्रत्येकी एक प्रवक्ता. त्यामुळे सरकार विरोधी बोलणार्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे सरकारविरोधीचं वातावरण वाटत असलं तरी मनमोहनसिंगच्या दहा वर्षकालीन सरकारकावर जनतेचा जितका रोष होता तितका रोष मोदी आणि फडणवीस ह्यांच्या सरकारवर आहे असा समज कोणी करून घेऊ नये. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकाला तसा अवकाश आहे. विरोधी पक्षाकडे मोदी सरकार विरूध्द लाट उसळवू शकेल असा नेता नाही. आणि तसा नेता निर्माण झाला तरी मनसेच्या नगरसेवकांचं पक्षातंर घडवून आणल्याच्या कॄत्यावर मनसेकडून होणार्या टिकेला शिवसेनेलाच तोंड द्यावं लागेल. त्यातून सेनेची सुटका नाही. आणि सेनेचं उत्तर काहीही असलं तरी मराठी मतदार ते कितपत स्विकारतील हा प्रश्न उरतोच. आपण चर्चा करून तो सुटेल असं दिसत नाही. एकंदरीत शिवसेनेला हा दिवाळी फराळ फळतो की भोवतो हे पहाणं एवढंच काय ते आपल्या हाती आहे. 

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

ग्रामपंचायत निवडणूका आणि राजकारण


ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या पक्षातीत असाव्यात. असा पंचायतराज कायदा सांगतो. काल-परवा महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या निकालानंतर प्रत्येक पक्षाने सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक सरपंच आमचेच असा दावा मांडला. एकदा का कोणी दावा मांडला कि प्रतिदावा आलाच, मग क्षेत्र आणि संस्था कुठलेही असो. त्यातही जिथे निवडणूका असतात तिथे निकालानंतर राजकिय पक्ष आपआपले दावे मांडणार ह्यात आश्चर्य वाटावयास नको. तरीही न्युज चॅनेल्सनी ह्या विषयांवर प्रत्येक राजकिय पक्षाच्या प्रवक्त्यांना बोलावून चर्चा घडविल्या. चॅनेल्सच्यां सूत्रधारांनी सर्व राजकीय पक्षांना दोषी ठरवित ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षातीत असाव्यात असा ठणकावून उपदेश दिला. न्युज चॅनेल्सनां मनापासून ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षातीत असाव्यात असे वाटत असतं तर त्यांनी ह्याबाबतीत निषेध नोंदवत ह्या विषयांवरील चर्चा सत्रात राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना स्थान द्यावयास नको होते. परंतु तसे केले असते तर त्या चर्चाच्या कार्यक्रमांना टिआरपी फारसा मिळाला नसता. त्यांच्या धंद्यात टिआरपी महत्वाचा असतो. एखाद्या घटनेला राजकीय स्वरूप मिळालं तर ते  न्युज चॅनेल्सनां हवंच असतं. काही चॅनेल्स तर एखाद्या घटनेला राजकीय स्वरूप देण्यातही माहीर असतात. न्युज चॅनेल्सवर पंचायत निवडणूक आणि त्यांचे निकाल ह्यावर झालेल्या चर्चासत्रात अप्रत्यक्षपणे विविध पक्षांच्या प्रवक्त्यांकडून पुन्हा आपआपले दावेच मांडले गेले. शिवाय परस्परविरोधी दावे सिद्ध करण्याचे आव्हानही दिले गेले. जिथे चर्चाच निकोप होत नाही, तिथे पंचायतीच्या निवडणूका पक्षातीत कशा काय होणार?

ग्रामपंचायतीचा कारभार पक्षातीत असावा ही कल्पना चांगली आहे. परंतु ती कल्पना दुर्दैवाने कागदावरच राहीली आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी गावातील प्रत्येक मतदाराला पंचायत निवडणूकीसाठी उभे राहिलेले गावातील उमेदवार हे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात, हे ठाऊक असते. ह्याचं कारण  विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीत ह्याच उमेदवारांनी कुठच्या तरी राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन काम केलेलं गावकर्यांनी पाहीलेलं असतं. त्यामुळे पंचायत निवडणूकीत कितीही प्रयत्न केला तरी राजकारण येत असतंच. आणि येत राहणार. आपल्या नैतिक जगात जे घडले वा घडते ते किती अप्रिय, अनिष्ट असले तरी त्यात सामान्य मनुष्याचा दोष थोडा असतो. कारण तो प्रवाहपतित असतो. परिस्थितीमुळे त्याला तसे व्हावे लागते. अंतर्मुख होऊन विचार करायची आणि त्या प्रमाणे आचरण करण्याची शक्ती त्याजपाशी नसते. स्वतंत्र रित्या चिंतनाला लागणारे स्वास्थ्य त्याला कधीही लाभत नाही. चरितार्थाच्या चिंतेतून मुक्त होण्याची संधी त्याला सहसा मिळत नाही. म्हणूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जे मतदान होत आले आहे ; होत जाईल, ते राजकीय पक्षांच्या प्रभावाने होत असते, हे आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. कारण "महाजना ये गतः सा पंथः!". 

प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील राजकारण कसे टाळता येईल हा नसून पंचायत राज कायद्यात अभिप्रेत असलेलं सत्तेचे विकेंद्रीकरण कसं साध्य होणार हा आहे. महात्मा गांधीजींचा ग्रामोद्योग, पंडित दिनदयाळ उपाध्याय ह्यांचं अंत्योदय आणि डाॅ राम मनोहर लोहीयांचं ग्रामीण अर्थव्यवस्थेसंबंधीचा विचार ह्यात मूलतः कुठलाच फरक नाही. असे असुनही राजकीय पक्षांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत इतका रस का असतो? तिथेही त्यांना राजकारण का करावे लागते?. कारण सत्तेचं विकेंद्रीकरण असा शब्दप्रयोग जो कायद्यात मांडला गेला, त्यातील सत्ता ह्या शब्दावरच राजकीय पक्षांच लक्ष केंद्रित झालं. वस्तुतः पंचायत राज कल्पनेत सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे विकासाचं विकेंद्रीकरण होणं हेही अभिप्रेत आहे. ज्या सोयी-सवलती शहरातील लोकांना मिळतात तशा ग्रामीण भागातील लोकांनाही मिळणे आवश्यक आहे. अन्यथा शहराकडे ग्रामीण जनतेचा लोंढा कमी होणार नाही. आज देशभरातील सर्वच राज्यांची स्थिती काय आहे? शहराची लोकसंख्या भौमितिक पध्दतीने वाढत असून शहरं बकाल; तरी हातांना काहीतरी काम. तर गावे ओसाड; त्यात वारंवार दुष्काळ किंवा अवेळी    गारपीटच संकट, त्यामुळे शेती उजाड. त्यातून हात बेकार मग नैराश्य, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, आत्महत्या. असे कुठपर्यंत चालत  राहणार? वेळीच गावांच्या विकासवर लक्ष न पुरविले तर परदेशी गुंतवणूकदार तिसर्या जगतातील म्हणजे आफ्रिकन आणि लॅटीन अमेरिकन देशाकडे आपला मोर्चा वळवितील. त्यांना आपण रोखू शकणार नाही. मग महासत्तेचं स्वप्न कसे साकार होणार? 

गावात सोयी सवलती कशा प्रकारे देता येतील? ग्रामविकासात कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यावे, ह्यासंबंधीचा अभ्यास आपल्या देशातही सतत होत असतो. इतकंच नव्हे तर काळानुसार इष्ट तो बदल कसा असावा हे ही ग्रामीण विकास आणि कृषी मंत्रालयातर्फे वेळोवेळी जो विकास आराखडा जाहीर केला जातो त्यात प्रतिबिंबित होत असतो. अर्थसंकल्प मग तो राज्याचा असो वा केंद्र सरकारचा , ग्रामीण विभागाच्या विकासासाठी पुरेशी तरतूद ही केली जात असते. मग विकासाची गंगा गावापर्यंत पोहचत का नाही? उत्तर स्पष्ट आहे. आणि ते म्हणजे भ्रष्टाचार. विकास निधीतून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित होत असताना ठेकेदार, लोकप्रतिनिधी, आणि नोकरशहा ह्याच्यातील मिलीभगत मुळे ग्रामविकास निधीचा विनियोग पारदर्शी राहात नाही. अनेक योजना रखडण्याचे प्रकार घडत राहतात. आणि नंतर पुढे त्या पुर्ण करताना खर्चही वाढत जात असतो. प्रत्येक आमदार, खासदारांना  त्याच्या मतदारसंघात विभिन्न योजना राबविता याव्यात म्हणून तसेच विकासकामासाठीही स्वतंत्र  निधी मिळत असतो. परंतु कित्येकदा जनप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे वा बेपर्वाइमूळे मिळालेला निधी  न वापरता पडून राहतो. 

एकंदरीत काय तर सर्व अवनतीमागे भ्रष्टाचार हेच प्रमुख कारण असते. भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार बनला आहे. सार्वजनिक जीवनात पैशाचा प्रभाव फार पडत असतो. त्यातून सत्ता मिळत असते. आणि सत्तेतुन पैसा. म्हणूनच ग्रामपंचायतीच्या निवडणूका असो वा सहकारी संस्था व बॅंकातील निवडणूका असो प्रत्येक राजकीय पक्ष हिरिरीने लढवत असतात, मग संविधानांत वा कायद्यात किती पवित्र भाव मांडलेला असला तरी. ज्ञानपीठ विजेते विख्यात लेखक वि स उर्फ भाऊसाहेब खांडेकरांनी आपल्या एका पुस्तकातील प्रस्तावनेत काय म्हटले आहे हे साररूपाने ऐकू या. "मोठमोठया संस्था असो वा सरकारी महामंडळे,  कृषी उत्पन्न बाजार समित्या असो, वा गावपातळीवरील सहकारी डेअर्या, ग्रामपंचायतपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, वा  सहकारी बॅंका,  सहकारी साखर कारखाने असो वा शिक्षण संस्था, किंवा  मोठमोठाली उत्पन्न असणारी देवालये, ह्या सार्या ध्येयवादी महात्म्यांच्या स्फुर्तीतुन आणि त्यागातुन निर्माण झालेल्या आहेत. परंतु पै-पै करून पैसा मिळविणार्या बापाच्या कष्टांची कल्पना आयत्या बिळावर नागोबा होणार्या त्याच्या गर्भश्रीमंत मुलाला जशी येत नाही ,त्याप्रमाणे कुठल्याही संस्थेच्या संस्थापकांचा ध्येयवाद ती चालविणार्या पुढल्या पिढीच्या आचरणात उतरत नाही. संस्थेचा उज्वल ध्येयवाद, ती चालविणार्या पुढल्या पिढीला हिणकस झाल्याशिवाय राहातच नसावा. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाच्या अग्रभागी असलेल्या सर्व संस्थांचा गेल्या तीन पिढ्यांचा इतिहास पाहिला, तर पहिल्या पिढीची ध्येयाची पताका तिसर्या पिढीला उपयुक्त लंगोटी म्हणून वापरण्यात येत आहे असे दिसून येते. राष्ट्राच्या उध्दाराकरिता तरूण पिढी विशिष्ट संस्कारांनी युक्त व्हायला हवी म्हणून काढलेल्या शिक्षणसंस्थांना आज कारकून निर्माण करण्यार्या कारखान्यांचे स्वरूप आले आहे. वनराजाने जिथे स्वच्छंद विहार करावयाचा, त्या स्वतंत्र अरण्याला मेंढरांच्या कोंडवाड्याचे स्वरूप यावे, ह्यापेक्षा अधिक दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते? पुढे पुढे हा दुबळेपणा लपविण्यासाठी 'संस्था जगली पाहिजे' हे सूत्र फार उपयोगी पडते असा सर्व संस्थाचालकांचा अनुभव आहे! पण निर्जीव संस्थेच्या चिरंजीवनापेक्षा सजीव संस्थेचा अपमृत्यु शतपटीने श्रेष्ठ असतो; तो स्फूर्तीची दिव्य ज्योत अमर ठेवून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवू शकतो, हे त्यांच्या लक्षात येत नसते, वा लक्षात येऊनही दुर्लक्ष करणे त्यांना सोयीचे ठरत असावे. संस्था कुठल्याही क्षेत्रातील असो, एकदा का त्या आपल्या मूळच्या ध्येयापासून च्युत झाल्या आणि ठराविक चाकोरीतून वाटचाल सुरू झाली कि साहजिकच दोन प्रकारच्या साधूंचा तिथे लवकरच शिरकाव होतो. पहिले संधीसाधू आणि दुसरे स्वार्थसाधु. लोकशाहीचा जयजयकार करीत हे दांभिक लोक संस्थेतल्या मूठभर निष्ठावंत सेवकांची गळचेपी करू लागतात. टोळ्या केल्याशिवाय चोरांचे व्यवहार चालू शकत नाहीत; उलट तपस्व्याला एकांतातच ध्यानधारणा करणे आवडते. ह्या नियमाला अनुसरून असल्या संस्थांत स्वार्थसाधूंचे कंपू तयार होतात व सज्जन माणसे एकाकी पडतात. मग कुटील कंपू त्यांचा सहजगत्या पराभव करतात. आपल्या राजकिय व्यवस्थेतील  संसद वा राज्यांच्या विधानसभा ह्या ही संस्थाच.  विविध क्षेत्रातील सरकारी महामंडळेही संस्थांच.  शैक्षणिक, सहकारी, सामाजिक संस्थांप्रमाणे सरकारी महामंडळे ही संरमजमशाहीच्या काळातील संस्थानांचं रूप घेताना दिसत आहेत आणि  उल्के प्रमाणे पहिला अविष्कार संपला की तिचे जसे  पाषाणात रूपांतर झालं, तशीच अवस्था  अनेक  सरकारी  महामंडळांची आणि संस्थांची स्थिती झाली असावी कि काय असा प्रश्न पडतो".

मग ह्यातून मार्ग कोणी आणि कसा काढावा?लोकशाही राज्यव्यवस्था यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्यांत 'आपण ह्या देशाचे महत्वाचे घटक तसेच रक्षक आहोत'. ही भावना अंतःकरणी रूजावयास हवी. घटनेने आपल्याला काही हक्क आणि काही कर्तव्यें पार पाडण्याची जबाबदारी दिली आहे. म्हणून  ही भावना आपल्या समाजबांधवात पसरविण्यासाठी आपल्यालाच सामुहिक रित्या काम करावे लागेल. जगभरातील प्रगत देशाचा इतिहास पाहिला तर आपल्याला आढळून येईल कि ह्या प्रगत देशात सर्वसमान्यांनीच उठाव करून बलाढ्य राजेशाही संपुष्टात आणली. आणि आपला व आपल्या देशाचा विकास घडवून आणला. डोंगरपठारावरून पाण्याचे हजारो लोंढे खळाळत खाली कोसळले म्हणून काही शेते पिकत नाहीत किंवा वीज निर्माण होत नाही. कुठल्याही शक्तीचा उपयोग करण्यासाठी सामुहिक बुध्दी आणि योजकता कशी कामी येते हे वाळवंटी प्रदेश म्हणून मानल्या गेलेल्या इजरायल देशाने पाण्याच्या दुर्भिक्षेवर केलेली विलक्षण मात पाहून आपल्याला समजू शकते. अथक परिश्रमांतून आधुनिक विज्ञानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली औद्योगिक प्रगती करत, सर्वात छोटा देश असुनही सामरिक रित्या सर्वात बलशाली राष्ट्र म्हणून इजरायलने स्थान पटकावले आहे. क्युबामधील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, फिनलॅड मधील शाळा व संपूर्ण शिक्षण व्यवस्था, डेन्मार्कमधील सर्व संस्था आणि व्यवस्थेतील व्यवहार भ्रष्टाचाराविना कसे चालतात ह्या सार्या गोष्टी पाहण्याजोग्या आहेत. आपल्या येथील बहुतांश राज्यातील मंत्री , खासदार ,आमदार, नगरसेवक, इत्यादींनी कुठल्या नी कुठल्या परदेशात अभ्यास दौरे केले आहेत आणि करीतही आहेत. परंतु स्वतःची परदेशवारीची हौस पिटविण्याखेरीज गावाच्या वा शहराच्या विकासासाठी ह्या लोकांनी भरीव काही केलं असे दिसतच नाही. ह्याच कारण नेत्यांवर प्रजेचा अंकुश नाही. आणि तसा अंकुश निर्माण करण्यासाठी मध्यमवर्गीय लोकांनी Comfort Zone मधून बाहेर येणं आवश्यक आहे. शहरी आणि नागरी मध्यमवर्गीयांनी गावातील लोकांना राजकिय, आणि आर्थिक रित्या साक्षर बनविले पाहीजे. सामान्य मनुष्याच्या सर्व गरजा चांगल्या रितीने भागविल्या जातील तरच संतापासून पुढार्यापर्यंत सर्व लोक जे नीतिपाठ देत असतात ते त्यांच्या गळी उतरतील. मनुष्य सुखासुखी किंवा सहजासहजी चांगला होत नाही. उपोभोगाइतकी त्यागाची वृत्ती स्वाभाविक नसते. ती संस्कृतीने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. माणसाला चांगले बनवावे लागते. तो तसा बनला तरी त्याचे चांगुलपण टिकवावे लागते. म्हणून ह्या सर्व गोष्टींना पूरक अशी सामाजिक परिस्थिती निर्माण होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी राजकीय नेत्यांनी वृथा अभिमान सोडून परस्पर सहमतीने, समाजातील विभिन्न क्षेत्रातील तज्ञानां, समाजातील विद्याविभूषितांना बरोबर घेऊन ग्रामीण भागातील लोकांचे विज्ञानासबंधीचे, शेती व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी असलेले अज्ञान दुर करावे लागेल. प्रजा आणि राजा जेव्हा हातात हात घालून कार्यारंभ करेल तेव्हा एक वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला आधुनिक, समर्थ, आणि प्रगत भारत उदयास येऊ शकेल.

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

सहिष्णुता : हिंदू जीवनमूल्य


चातुर्वण्यम् मया सृष्टी गुणकर्मविगागशः ह्या लेखात मी म्हटलं आहे कि विविधता हे सृष्टीचं वैशिष्ट्य आहे. निसर्गातील पंचमहाभूतें आप (जल), तेज ( प्रकाश) वायु, आकाश आणि पृथ्वी इत्यादीचीं कार्ये आणि वैशिष्टे ही भिन्न आहेत. आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रहांचे आकारमान, गती, कक्षा, गुरूत्वाकर्षण ह्यातही भिन्नता आढळते. मानवी शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं शरीर, त्याचे मन, त्याची बुद्धी, दुसर्या व्यक्तीचं शरीर, मन, बुद्धी पेक्षा भिन्न असते. आपल्या जन्मदात्या आई-वडीलांच्या जनुकामुळे काही अंशी अनुवांशिक गुण, स्वभाव, रंग,रूप ह्यात साधर्म्य आढळत असले तरी एकंदरीत प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र अस्तित्व असते. त्यातूनच पुढे व्यक्ती तितक्या प्रकृती, जशी दृष्टी तशी सृष्टी, जशी बुध्दी तशी कुवत इत्यादी नियम अस्तित्वात आले असावेत. कुवत म्हणजेच गुण. जसे गुण तसे कर्म आणि कर्म तसे फल. त्यातून विभागणी म्हणजे वर्ग असावेत. परंतु मूळ सत्य हे कि विविधता हेच विश्वाचे वैशिष्ट्य. आणि त्या विविधतेतील चैतन्य म्हणा वा ऊर्जा ते एकच. आणि तेच तत्व विसरले गेले आणि केवळ आपल्या देशात नाही तर जगातील प्रत्येक देशात. इतर देशातही वेळोवेळी समाजव्यवस्थेत काहीना काही स्वरूपात भेदाभेद निर्माण झालेले दिसून येतात. ह्याचं मूळ कारण माणसामध्ये श्रेष्ठत्व दाखविण्याची असलेली ऊर्मी. त्यामुळे कालच्या जगात संघर्ष होता.  आजही आहे. आणि भविष्यातही राहणार असेच दिसते. 

ही सृष्टी निर्माण होण्यामागे कुठलीतरी एक शक्ती आहे. त्या शक्तीचं स्वरूप कसे? तर ' जशी दृष्टी तशी सृष्टी ' ह्या नियमाचेच वेष्टन असलेले. त्यामुळे तिथेही भिन्नता निर्माण झाली. त्यातून विविध धर्म, पंथ, संप्रदाय निर्माण झाले. ज्यांनी ज्यांनी त्या शक्तीच्या स्वरूपाचं वर्णन केले त्यांना ईश्वराचा पुत्र, दूत, प्रेषीत वा त्या त्या धर्माचे पंथाचे संस्थापक मानले गेले. पुढे मध्ययुगीन काळात दुर्दैवाने त्यात श्रेष्ठता आणि कनिष्ठतेचा वाद विकोपाला जात युध्दे झाली. त्यालाच क्रुसेडेस म्हटलं गेलं. मानवाने मानवाचेच रक्त सांडले. एवढ्याने भागले नाही. मग बाटवा-बाटवी, सक्तीने धर्मातंर, साम्राज्यवादाची लालसा असे प्रकार घडले. आणि त्याची परिणती विनाशकारी दोन महायुध्दात झाली. 

आज बहुतांश देश स्वतंत्र असले तरी साम्राज्यवादी अपप्रवृत्ती, धार्मिक उन्माद शिल्लक आहेतच. आज जे काही प्रमुख धर्म आहेत त्या सर्व धर्मांना संस्थापक आहेत. हिंदू धर्माला कोणी संस्थापक नाही. वर उल्लेख केलेल्या अपप्रवृत्ती आणि क्रुसेडस ह्याचें जनक इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म मानणारेच. हे ऐतिहासिक सत्य आहे. या उलट हिंदू धर्म हा सहनशिलता आणि संयमाची शिकवण देणारा. तसेच more inclusive. येथे प्रत्येकाच्या मताला, विचाराला मान आहे. येथे धर्म आणि देव न मानणार्यांनाही सन्मान दिला जातो. कारण येथे कर्म चांगले असणे महत्वाचे मानले जाते. हिंदू ही एक जीवनपध्दत आहे. असा आपल्या सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे. 

वस्तूतः हिंदू धर्माचं स्वरूप कसं आहे? "नाही जन्म, नाही नाम! नाही कोणी माता, नाही कोणी पिता ! नाही कुठला एक ग्रंथ प्रमाण, नाही एक भाषा प्रमाण ! नाही कुठला एकच देव, नाहि कुठला एकच सण! विविध देव - देवता , विविध वेषभूशा ! विविध पुजा-अर्चा, विविध उपासना !" एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति! इतकी व्यापक देवाची व्याख्या आपल्या शास्त्रकारांनी केलेली आहे. सत्य हाच ईश्वर अशी आपली उपनिषदें मानतात. छांदोग्य उपनिषदात सत्य म्हणजे काय हे ही मांडले आहे. सत्य हा शब्द स, ति आणि य ह्या तीन मात्राने बनलेला आहे. स म्हणजे सत् अर्थात अविनाशी; म्हणजे ईश्वर, सृष्टीचे कारण. ति म्हणजे नाशिवंत. अर्थात सृष्टी. म्हणजेच  कार्य. ह्यांचा योग म्हणजे जुळणी य ने झाली. आणि सत्य झाले. कोणत्याही प्रसंगीं कारण आणि कार्ये ह्यांचा संबंध यथार्थाने ओळखणे म्हणजे सत्य होय. ही व्याख्या विज्ञानालाही शोभून दिसते. उपनिषदांना भौतिक विज्ञानाचे वावडे नाही. विज्ञानाचेच काय कुठल्याही विषयाचे वावडे नाही. उपनिषदे अंत्यत स्पष्टवक्तीं आहेत. ऐहिक आनंदाची श्रेष्ठतम प्रचिती जननेंद्रियेनेंच घेता येते इथपर्यंत स्वच्छ विधानें आहेत. त्यात अर्थशास्त्र आहे, कामशास्त्र आहे. शेतकीशास्त्र शिक्षणशास्त्र, सृष्टीशास्त्र , विज्ञान, सारं काही आहे. 

'एक तत्व नाम 'ही सुध्दा उपासना. कर्म करीत असता ईश्वराच्या नामाचं स्मरण केलं तरी ती उपासनाच होय. येथे केरसुणीची पूजा होत असते. तसेच वृक्षाचे पूजन होत आलेले आहे. जे जे मानवी जीवनाला कल्याणकारक ते सारे पूजनीय असेच मानले जाते. यत्किंचित प्राणी, पक्षी सारे ईश्वरमय.' जे जे भेटीले भूत ते ची भगवंत'. चराचर सृष्टीत ईश्वर सामावलेला आहे.' इशावास्यम् इदं सर्वम् '! हे उपनिषदातींल वचन. अनादि काळापासून ह्या धर्माचं अस्तित्व. रामनाम महात्म्यामध्ये म्हटलं आहे, बीजं धर्म मूलस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम् !! अर्थ असा आहे, श्रीराम हे धर्मरूपी वृक्षाचे बीज आहे. असे हे श्रीराम नाव तुम्हांला वैभव व सुख प्रदान करो. ह्या ठिकाणी धर्म म्हणजे वैश्विक धर्म असेच आपल्या शास्त्रकारांना अपेक्षित आहे. म्हणून सर्वे भवन्तु सुखीनः ! सर्वे सन्तु निरामया! अशी प्रार्थना आपल्या येथे वैदिक काळापासून आजतागात म्हटली जात आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पासयदान ही सुध्दा वैश्विक प्रार्थना. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत आपण स्वतः मानवी अवतार केव्हा घेतो ह्या संबंधी म्हटले आहे,कि
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ! धर्माची ग्लानी म्हणजे सदाचारणाचा अभाव, नीती मूल्यांची अवहेलना. पुढे भगवंतांनी म्हटले आहे, परित्राणायम् साधूनाम्, विनाशाय च दुष्कृताम् ! धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे !! साधु-सज्जनांच्या रक्षणासाठी आणि अधर्म कृत्ये करणार्यांचा नायनाट करण्यासाठी आणि धर्मतत्वांची पुन्हा प्रतिष्ठापनाकरितां मी युगा-युगात अवतार घेत असतो. येथेही हिंदूधर्म असा उल्लेख दिसत नाही .धर्म म्हणजे सदाचारण, सामंजस्य, सत्य, सहकार, सहमती, सहजीवन आणि सख्य हाच अर्थ मांडलेला दिसतोय. "जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला" हीच भगवंतांच्या भक्ताची व्याख्या. त्या व्यक्तीचा भगवंत कुठला हा प्रश्नच गौण. आजकाल मानवता धर्माचा जो वांरवांर उल्लेख सर्वत्र होत आहे, त्याही पलीकडे जाऊन म्हणजे प्राणीमात्रांच्याही हिताचा , सुखाचा, आणि पर्यावरणाचा विचार जिथे मांडला गेलेला आहे , ती आपली संस्कृती. मग त्याचं नाव भारतीय संस्कृती म्हणा वा हिंदू संस्कृती. आपल्याच देशाचीच ती संस्कृती. अशा संस्कृतीत ज्यांच पोषण झालेलं आहे, त्यांनी इतर धर्मियांच्यावर जबरदस्तीने वा धाकातून छळ केलेला आहे असे वाचनात आले आहे का? वैदिक काळापासून आपल्या येथे ' समाजाची धारणा करतो, तो धर्म' हे धर्माचे स्वरूप राहिलं आहे. त्यामुळे  पुत्रधर्म, पिताधर्म, माताधर्म, अतिथीधर्म, गुरूधर्म, शिष्यधर्म, शरीरधर्म, सेवाधर्म, शेजारधर्म, दानधर्म, नीतीधर्म, संन्यासधर्म अशा अनेक संज्ञाने व्यापलेला असा शाश्वत धर्म प्रचलीत आहे. आचार-विचार, आहार- विहार, इत्यादी संबंधीचं मूल्यांवर आधारीत मार्गदर्शन असलेल्या ग्रंथांची भली मोठी तिजोरी असलेला हा आपला देश. बहुसंख्याक हिंदू. आणि जे अल्पसंख्याक म्हणून गणले जातात ते ही मुळातील ह्याच देशाचे. म्हणून सहिष्णुता पाळणार्या नागरिकांचीही संख्याही अधिक. हे ऐतिहासिक सत्य कोणीही नाकारू शकत नाही. Intolerance आणि Secularism हे शब्द आयात झालेले आहेत. गुण्यागोविंदाने राहणे ही परंपरा जिथे रूजली, तिथे असहिष्णुतेचं काटेरी झाड कोठे आणि कसे उगवेल? सतरा वेळा महमंद गझनीचा पराभव करून त्याला जीवदान देणारे पृथ्वीराज चौहान सारखे राजे ह्याच भूमीत जन्मतात. Excees of anything is poison ह्या निसर्ग नियमाचं भान भारतातल्या अनेक राजे महाराजांना राहिले नाही. सहिष्णुतेची वा चांगुलपणाची नशा, आपआपसातील वैर, फितूरी इत्यादी संबंधी मर्यादा जेव्हा जेव्हा ओलाडंली गेली, तेव्हा तेव्हा शक्तिमान असा आपला देश पारतंत्राच्या शृखंलात अडकला गेला. आजही "जियो और जिने दो" हे आपले ब्रीद परंतु जगातील बहुतांश देश आजही "जिवो जिवस्य जिवनाम्" ह्या तत्वाचंच आचरण करीत आहेत. आजही' बळी तो कान पिळी' हाच जगाचा न्याय दिसतो." अहिंसा परमो धर्मः"!. हे तत्व फार काळ उराशी बाळगता येत नाही. कारण" नायमात्मा बलहिनेन लभ्यता." " देवो दुर्बलो घातकः"! ही वचनें ही उपशिषदातील. दुर्बलांना ईश्वर भेटत नाही. देव म्हणतोय मी तुला दोन कर(हात) दिले आहेत. त्या हातातून काहितरी चांगलं कर. युध्दाच्या भयानक परिणामांची तीव्रता अर्जुनाला गोधंळवून टाकीत असताना भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतोपदेश दिला. तस्मात उत्तीष्ठं कौतेंय असे म्हणत अर्जुनाचा क्षात्रधर्म जागविला. त्यातून सत्य आणि धर्माचा विजय झाला. येथे हे ही ध्यानात घेणे आवश्यक आहे कि युध्द हा शेवटचा पर्याय असतो. स्वतः भगवान श्रीकृष्णाने शांतीसाठी केलेली शिष्टाई फलद्रुप झाली नाही. म्हणून त्यांनी अर्जूनाला क्षात्रधर्माची आठवण करून दिली. शेवटी क्षात्रधर्म हा ही धर्माचं एक अंग आहे. हे विसरता येत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागलीच पाक पुरस्कृत टोळ्यांनी काश्मीरवर हल्ला केला तेंव्हा महात्मा गाधीजींनीही  लष्कर कारवाईला हिरवा कंदील दिला होता. आपला देश अणू-परमाणू सारख्या शस्त्राने सज्ज असला तरी केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी परमाणूचा प्रयोग संभाव्य युद्धात प्रथम करणार नाही, असेच आपले धोरण आहे. आणि ते आपल्या संस्कृती आणि सभ्यतेला साजेसंच आहे. 

आपले वैज्ञानिक आणि सेनादल देशाला सामरिक दृष्टया बलवान करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आपण सामरिक रित्या बलवान होत आहोत. जेव्हा केव्हा आपला देश महसत्ता म्हणून उदयास येईल तेव्हा विविधता हे सृष्टीचं वैशिष्ट्य आहे, सहमती आणि सहजीवन हाच मानवाला निसर्गाचा संदेश आहे, आणि आपली जीवनपध्दत विश्वकल्याणकारी आहे हे जगाला पटवून देऊ शकतो. परंतू त्यासाठी सर्वात मोठं दायित्व हे राजकिय पक्षांवर आहे. राजकिय स्वार्थापोटी जाती-जमातीत भेदभाव वाढविण्याचे काम थांबविणे आवश्यक आहे. एखाद्या राजकिय विचारसरणीशी घट्ट चिकटून बसण्याचा हट्ट सोडून परस्पर सहमतीने, सर्व देशबांधवांना एका सुत्रात बांधून ठेवण्यासाठी वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. कुठल्याही परकिय देशाचा    प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या(विविध NGO साठी परदेशातून येणारी आर्थिक मदत) हस्तक्षेप आपल्या देशांतर्गत कारभारात होऊ नये हे पाहणं प्रत्येक राजकिय पक्षाची जबाबदारी आहे. आजच्या युगात विचारसरणी कुठली, जात कुठली, धर्म कुठला, आपली भाषा कुठली ह्या बाबी गौण आहेत. प्रत्येक प्रान्तामधील भाषेतील उत्कृष्ट साहित्यकृतीचं देशभरातील सर्व भाषातं अनुवाद होऊन देशभर प्रिय होईल असे प्रयत्न होणं गरजेचं आहे. प्रांता-प्रांतातील भाषेत समान अर्थाच्या म्हणी , वाक्प्रचार आहेत त्याचाही अभ्यास शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना देता येऊ शकतो. महाविद्यालयीन शिक्षणात परकिय भाषा ऐच्छिक विषय असू शकतो तर शेजार-पाजारील प्रांताची भाषा अभ्यासणं अडचणीची का वाटावी? नद्याचं पाणी वाटप असो वा धरणातून निर्माण होणारी वीज असो ह्याबाबत प्रांता-प्रांतातील वाद प्रत्येक वेळी न्यायालयातून सोडविण्याची गरज असते का? मग न्यायालय नसत्या विषयात हस्तक्षेप करते अशी ओरड राजकीय पक्षांनी का करावी ? When govt machinery fails , judiciary becomes proactive हे तर राज्यशास्त्रातील सुत्र आहे. अनेक धार्मिक सण-उत्सव ह्या मधील भाव वा धारणा ह्यात समानता दिसून येत असते. त्यावर भर देऊन, भले उत्सव साजरे करण्यातील भिन्नता असेल, वा उपासना पध्दत भिन्न असेल तरी, संपूर्ण समाज एकसंध होण्यात अडचण भासणार नाही. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत ही भावना वाढविण्यासाठी सर्वच राजकिय पक्षात सहमती झाली तर एक सशक्त देश म्हणून आपण उदयास येऊ शकतो. शेवटी सामान्यजनांवर नेते मंडळींचा प्रभाव पडत असतोच. हे तर समाजशास्त्र आणि राज्यशास्त्रातील त्रिकालातीत सत्य. म्हणतात ना, "राजा कालस्य कारणाम् "! 

पुन्हा असहिष्णुतेचा मुद्दा!!


आजच्या जगाची व्याख्या करावयाची असल्यास आर्थिक जगत अशी केली तरी ती अतिशयोक्ती ठरत नाही. जगातील बहुतांश देशांनी आर्थिक उदारिकरण आणि जागतिकरण स्विकारले आहे. सरकार कुठल्या विचारसरणीच्या लोकांचे आहे ही बाब सर्वत्र गौण ठरली आहे. मग तो देश साम्यवाद्यांचा चीन असो कि समाजवादी भारत असो. सारं जग हे एक व्यापार केंद्र बनले आहे. संपूर्णतः भांडवलशाहीवादी आणि लोकशाही मानणार्या अमेरिकेचा  साम्यवादी आणि एक पक्षीय राजवट असलेल्या चीन  देशाशी  सर्वात जास्त व्यापार  आहे. अनेक वेळा सीमा प्रश्नावरून कुरापती काढणार्या साम्यवादी चीनसाठी आपला देश व्यापार क्षेत्रातील एक मोठा ग्राहक आहे. अलीकडे दोन्ही देशामध्ये डोकलाम ह्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. चीनची भाषा दिसामाशीं आक्रमक होत गेली. पुढे युद्धाची धमकी दिली . ह्याच काळात आपल्या पंतप्रधानांनी जगातील सर्वात छोटा परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सामरिक रित्या बलशाली आणि आक्रमक असलेल्या इजरायल देशाला भेट देऊन चीनच्या आक्रमकतेतील हवा काढली. आपल्या पंतप्रधानांनी दाखविलेला संयम आणि मुत्सद्दीपणा ह्या संबंधीचं जगभरातील अनेक देशांनी कौतुक केलं  

असहिष्णुतेचा मुद्दा चर्चीला जात असता, भारत-चीन ह्या दोन देशातील परस्पर संबंध तसेच आजचं आर्थिक जगत, ह्या विषयाचं प्रास्ताविक मी का मांडले असा प्रश्न आपल्याला पडला असावा. परंतु अलीकडे देशाच्या राजकिय पटलावर घडलेल्या घटनावर नजर टाकली तर त्यासंबंधी फारसं आश्चर्य वाटणार नाही. मूलतः चीन साम्राज्यवादी देश आहे. आणि आपल्या देशातील माओवादी नक्षलवाद्यांना फूस लावण्याचं काम चीनी राज्यकर्ते करीत असतात हे सर्वश्रुत आहे. गौरी लंकेशच्या हत्येनंतर काही अवधीतच काॅग्रेसचे उपाध्यक्ष श्री राहूल गांधी आणि मार्क्सवादी पक्षाचे नेते सिताराम येचूरी ह्यांनी तथाकथित असहिष्णुतेची पुंगी वाजवत गौरी लंकेशच्या हत्येत भाजपा आणि पंतप्रधान मोदींचा हात आहे असा आरोप केला. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुणाच्या हत्ये संबंधी दुसर्या पक्षाच्या नेत्यावर आरोप केला कि त्यात काही राजकिय खेळी असते. हे समजण्याइतकी भारतातील सामन्यातील सामान्य नागरीकालाही राजकिय जाण आहे हे निश्चीत. अलिकडे भारत-चीन सिमेवर युध्दजन्य स्थिती झालेली असताना आपले पंतप्रधान इजरायल देशाच्या दौर्यावर गेले होते. का तर चीनवर दबाव वाढविण्यासाठी तर दुसरीकडे राहूल गांधी रहस्यमयरित्या चीनच्या भारतातील दूतवासास भेटीला. का व कशासाठी ? ना काॅग्रेसला स्पष्टीकरण द्यावयाचं वाटलं, ना माध्यामांनी माहिती काढली. भारतीय कम्युनिस्ट पार्टी दुभंगली ह्याचं कारण रशिया आणि चीन ह्या साम्यवादी देशात मतभिन्नता झाली म्हणून. त्यामुळे सिताराम येचुरींनी (ज्यांच्या पक्षाचा ओढा रशिया ऐवजी चीनकडे असल्यामूळे) राहूल गांधीसोबत गौरी लंकेशच्या हत्येत मोदी सरकार आहे असा आरोप केला. राहुल गांधींना येचूरीनीं पाठींबा दिला कि येचूरींना राहुल गांधीनी पाठिंबा दिला. हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार. येचुरीनीं  बंगालमधील निवडणुकीत काॅग्रेसशी घरोबा केल्यामुळे मार्क्सवादी पक्षात बवाल माजला आहे. न्यूज चॅनेल्स वरील राजकिय विषयावरील चर्चेत गौरी कधी दिसल्या आहेत, असे मला स्मरत नाही. असे असुनही  त्यांच्या हत्येसंबंधी आवेशपूर्ण चर्चा  न्युज चॅनेल्सवर  घडल्या. बहुतांश न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी असहिष्णुता वाढत आहे, अशी हाकाटी मारावयास सुरूवात करून उजव्या विचारसरणीच्या मंडळीनां टारगेट केलं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशातील माध्यमांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला सतत सापत्न वागणूक कशी दिली, हे 'माध्यमातील सुत्र नावाचं अपत्य ' ह्या माझ्या लेखात मांडले आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर काही न्यूज चॅनेल्स पंतप्रधान मोदी आणि सरकारचं कौतुक करीत आहेत, नाही असे नाही. तरीही एकूण मिडीया व्यवसायातील आर्थिक उलाढाल, हितसंबंधी आणि गुंतवणूकदारांची यादी पाहता उजव्या विचारसरणीच्या मंडळीवर माध्यमें टिका करीत राहणार हे निश्चीत. मुद्दा मोदी सरकारवर टिका करण्याचा नाही. तो तर पत्रकार मंडळी आणि माध्यमांचा हक्कच आहे. परंतु जिथे काॅग्रेस पक्षाचं सरकार आहे अशा कर्नाटकात गौरी लंकेशची हत्या झाली असतांना तिथल्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारवयास हवा कि नको? गौरी लंकेशच्या हत्येसंबंधीची प्राथमिक स्तरावरील पोलीस चौकशी सुरू होण्याअगोदरच, राहूल गांधी आणि सिताराम येचूरीनीं न्यायधिशांच्या थाटात संघ आणि भाजपाला आरोपी कसं ठरविलं हा खरा मुद्दा आहे. सध्यातरी कुठच्याही शक्यतेचा अंदाज वर्तविणे हे उचीत नाही. परंतु राजकरणात अंधूक वातावरणातच शत्रू पक्षाला गारद करण्याची संधी मिळविण्याची घाई करणे फायद्याचं असतं. अशी समजूत सर्व राजकीय पक्षांची असते. परंतु पुष्कळदा तोंडघशी पडण्याची पाळी येते. ह्याचा विचार करायलाही वेळ काढायचा नाही ही राजकिय पक्षांची खोड आहे. आणि तोच प्रकार गौरी लंकेशच्या हत्येसंबंधी होत असताना दिसतोय.

मोदी सरकारनी अलिकडे तीन वर्षे पूर्ण केली. अनेक माध्यमातून २०१९ च्या लोकसभेत पुन्हा भाजपाचेच सरकार येणार आणि मोदीजी पुन्हा पंतप्रधानपदी असणार असा अंदाज वर्तविला जातो. विरोधी पक्षाकडे मोदींना टक्कर देऊ शकेल असा तोडीचा नेता नाही. जो नितिशकुमाराच्या रूपाने होता तो ही भाजपवासी झाला. राजकिय स्थिती इतकी मजबूत असताना एखाद्या फारशा नावाजल्या न गेलेल्या पत्रकाराची हत्या भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्याने केली असेल हे तर्काला धरून नाही. रक्तरंजित क्रांती हे संघ आणि भाजपाचं बोधवाक्य नाही. रशिया आणि चीन देशाचा अर्वाचीन इतिहासाकडे पाहता रक्तरंजित क्रांती ह्यावर विश्वास फक्त साम्यवादी विचारसरणीच्या लोकांचा असतो, भले अर्थकरणातं त्यांचा सपशेल पराभव झाला असला तरी. भारतातील समाजवादी तसेच काॅग्रेसची मंडळी (१९८४ दिल्लीतील शिखांची कत्तल वगळता) तशी नेमस्त. जर का भाजपा आणि संघावर आरोप करता येतो तर डाव्या विचारसरणीच्या पक्षावरही आरोप होऊ शकतो. चीन सारख्या साम्राज्यवादी देशाचं आपल्या देशात अस्थिरता निर्माण करण्याचं कृत्य म्हणजेच गौरी लंकेशची हत्या असा अंदाज भाजपाही मांडू शकतो. डाव्या विचारसरणीच्या पक्षात माजलेली दूही तसेच नक्षलवाद्यांमध्ये असलेले अंतर्गत भेद हे ही कारण गौरी लंकेशच्या हत्येच्या पाठीमागे असू शकते. कर्नाटकात पुढल्या वर्षी निवडणूका आहेत. अॅन्टी इनकंबन्सी फॅक्टर असणार. मोदी आणि भाजपाला अडचणीत आणू शकणारा खास मुद्दा विरोधी पक्षांकडे नाही. त्यामुळे डाव्या पक्षाच्या अतंर्गत झगड्यातून गौरी लंकेशची हत्या होणार असा सुगावा लागूनही कर्नाटकाच्या मुख्यमंत्री सितारमैय्यांनी गौरीला सुरक्षा पुरविण्यात हलगर्जीपणा दाखविला असण्याची शक्यता असू शकते. इत्यादी सारे  अंदाज मिडीयातील टाॅक शो मधूनच आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यात सत्यता किती, हे काळ ठरविल. प्रत्येक पक्षात टोकाची भूमिका घेणारे कार्यकर्ते आणि हमरीतुमरीवर येणारे प्रवक्ते असतात. त्यामुळे कुणा एका भाजपाच्या कार्यकर्त्यांने गौरीच्या हत्येसंबंधी 'असे घडणारच होतं ' अशी प्रतिक्रिया दिली म्हणून  भाजपा किंवा संघाला आरोपी ठरविता येत नाही. गौरीच्या हत्येनंतर  काही अवधीपूरताही  काॅग्रेसचे आणि मार्क्सवादीच्या राष्ट्रीय नेत्यांना संयम पाळता आला नाही तिथे भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्याकडून संयमाची अपेक्षा कशी ठेवता येईल? मिडीयात कुठल्याही विषयांवरील चर्चेत आक्रास्तळेपणा दिसणं हे नित्याचं झालं आहे. आणि त्यालाच रंगतदार हे नाव प्राप्त झालं आहे. ही बाब दुर्दैवी असली तरी आपण पंडीत नेहरू, सरदार पटेल, बॅरिस्टर नाथ पै, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी, डाॅ लोहिया आणि पं. दिनदयाळ उपाध्याय ह्यांच्या युगात राहात नाही. हे वास्तव स्विकारायला हवेच. मिडियातील चर्चा रंगत असतात. कुठपर्यंत रंगत राहतात? सांगता येत नाही. परंतु नवीन विषय मिळाला कि गौरी लंकेशच्या हत्येचा विषय बाद. आज हा लेख पूर्ण होईतो, मिडीयाला नवीन विषय मिळालेला ही असू शकतो. मुळात चौकशी कोणत्या एजन्सी मार्फत करावयाची ह्यावर कर्नाटक सरकार विचार करण्यासाठी वेळ घेणार. कारण त्यांचे श्रेष्ठी दिल्लीत बसतात. त्यानतंरच्या प्रकियाला वेळ किती लागणार ह्याचा अंदाज नरेंद्र दाभोलकर, पानसरे आणि कुलबुर्गी ह्यांच्या हत्येतील तपासात झालेल्या दिरंगाईवरून बांधता येतो. गौरीच्या हत्येसंबंधीचा प्राथमिक तपास पुर्ण होईपर्यंत कर्नाटकात नवीन सरकार येणार. जरी काॅग्रेस परत सत्तेवर आली तरी सितारमैय्या पुन्हा मुख्यमंत्री असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे न्यायालयात खटला उभा राहिल्यानंतर अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहात बसणे. हया व्यतिरिक्त आपल्या हातात काही नाही. 

राहता राहिला प्रश्न तथाकथित असहिष्णुतेचा. सहिष्णुता हे हिंदू जीवनशैलीतील मूल्य. ह्यासंबंधी एक स्वतंत्र लेख ह्या लेखापाठोपाठ पब्लीश करीत आहे. काॅग्रेस, तृणमूल काॅग्रेस, आरजेडी, द्रमुक आणि डावे पक्ष ह्या सार्यांचा एक कलमी कार्यक्रम म्हणजे कुठेही हत्या घडली कि मोदींना ह्यात कसं गोवता येईल हाच आहे. असहिष्णुता, मुस्लिमांची असुरक्षिततेची भावना असे विषय घेत युपीएचे घटक पक्ष उगाच आपली शक्ती खर्च करीत आहेत. गुजरात मधील दंगलीपासून विरोधक मोदींना टिकेचं लक्ष्य करीत आहेत.परंतु त्यांच्या हाती काही गवसत नाही.उलटपक्षी मोदी अधिक बलवान होत आहेत. मोदी विरोधी कार्यक्रमात अलीकडे    उपराष्ट्रपतीपद ज्यांनी भुषविले असे हमीद अन्सारीही उतरले. मुस्लिमांना आजकाल असुरक्षितता वाटत आहे असं वक्तव्य आपला कार्यकाल संपताना करण्याची गरज होती का? सोशल मिडीयावर त्यांची खिल्ली उडविली जात आहे. आजच सोशल मिडीयावर 'अन्सारी साहेब, मुस्लिमांना भारतात असुरक्षित वाटत असल्यामुळे रोहिंग्या निर्वासितांना समजावून सांगा कि, येथे येऊ नका '. अशा अर्थाची पोस्ट व्हायरल झाली. स्वतः अन्सारींनी व्हायरल होत असलेली ही पोस्ट पाहिली तर त्यांना कळू शकेल की डाव त्यांच्यावर उलटला आहे. सध्या सर्वसामान्यांना सोशल मिडीयाचं शस्र गवसले आहे त्यातून मुत्सद्दी राजकिय नेत्याचीही मग तो नेता कुठल्याही पक्षाचा असला तरी विकेट पडते. विरोधासाठी विरोध हेच ध्येय ठेवत गेलात तर राजकरणात पराभवाशिवाय हाती काही लागत नाही. हे जितक्या लौकर विरोधी पक्षांना कळेल आणि त्यानुसार ते वागण्याचा प्रयत्न करतील तर ते त्यांच्या हिताचे ठरेल. सारे विरोधी पक्ष स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्युहात अडकत आहेत. आणि हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ विचारवंत म. गो. वैद्य ह्यांनी अलिकडेच माध्यमांकडे काॅग्रेसची भौमितिक पध्दतीने होणार्या घसरण संबंधी चिंता व्यक्त केली आहे. म. गो. वैद्यांनी राहूल गांधीना अपरिपक्व म्हटलं आहे आणि घराणेशाहीचा ठपक्यातून बाहेर येण्यासाठी दुसरी लायक व्यक्ती शोधावी असा मोलाचा सल्ला काॅग्रेसला दिला आहे. ह्यावर काॅग्रेसने विचार करावयास हवा. इतर सर्व विरोधी पक्षापेक्षा आजही गावपातळीवर बर्यापैकी काॅग्रेसचा बेस आहे. साम्यवाद्यांनीं काॅग्रेसला वेळोवेळी अडचणीत आणले. आपले पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूनांही त्यांच्याच मंत्रिमंडळातील साम्यवादी विचारसरणीचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन ह्यांनी गोत्यात आणले आणि १९६२ मध्ये चीनशी युध्दात आपल्याला पराभव स्विकारयला लागला. अलिकडील चीनच्या अरेरावीत जी वाढ दिसली त्या पाठीमागे मार्क्सवादी पक्षाची चीनशी असलेल्या जवळीकीतून उत्पन्न झालेली राजकिय खेळी असू शकेल का?  देव जाणो. परंतुु  फितूरीचा रोग आपल्या समाजात पुर्वापार पासूनचा आहे ह्या सत्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.          

सध्यस्थिती अशी आहे कि साम्यवाद्यांच्या हातातून बंगालची  सत्ता गेलेली आहे. साम्यवाद ही कालबाह्य होत आहे. आणि त्या पक्षात केवळ वैचारिक गोंधळच नव्हे तर सोबत गटबाजी फार वाढली आहे. आणि ह्या गटबाजीला कधीही हिंसक वळण लागू शकेल. पक्षांतर्गत शह काटशहाचे खेळ करीत असताना त्या मंडळींतल्या विभिन्न गटांमध्ये एनकेन प्रकारे देशात अस्थिरता निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झालेली असू शकते. कारण साम्यवाद पसरविण्यासाठी रक्तरंजित क्रांतीकारक मार्गच पत्कारावा  लागतो. परंतु तसला विचार आपल्या भूमीत फार काळ टिकत नाही. कारण आपल्या समाजाचा क्रांतीवर विश्वास नसतो. त्याची उत्क्रांतीवर श्रध्दा आहे. ही बाब माजी पंतप्रधान मनमोहनसिंग जाणून होते. म्हणून सरकारला डाव्यांचा पाठींबा असूनही त्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अमेरिकेशी अणू-करार केला. काॅग्रेसला २००९ साली पुन्हा विजय   मिळण्यात हे ही एक कारण होते. डाव्या पक्षांनी मनमोहनसिंगाची बर्याच वेळा कोंडी केली. त्यामुळे मनमोहनसिंगबाबत मतदारांची सहानुभूती निर्माण झाली आणि काॅग्रेस पुन्हा सत्तेवर आली. परंतु काॅग्रेसला नेहमी वाटत असते कि त्यांना गांधी परिवारामुळे विजय मिळतो. आणि त्याचमुळे काॅग्रेसचा २०१४ च्या निवडणुकीत कधी नव्हता झाला असा दारूण पराभव झाला. काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधीचे सल्लागार साम्यवादी आहेत कि काय अशी शंका येत आहे. काॅग्रेसला पुन्हा उभारी घ्यावयाची असल्यास त्यांनी लालूप्रसाद यादव आणि साम्यवाद्यांचा नाद सोडावा आणि शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूका लढवाव्यात. कारण राजकरणातही पुष्कळदा शार्टकट्स महाग पडतात. बिहारमधील महाआघाडीचा प्रयोग फसल्याचा महाअनुभव काॅग्रेसच्या नुकताच पदरी आलेला आहेच की.

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

दुर्घटनांचा महिना व सरकारची हतबलता


उत्तराखंडासह उत्तर व ईशान्य भारतातील नद्यांना आलेला पूर, उत्तरप्रदेशमध्ये झालेला  रेल्वे अपघात, मुंबईसह महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी, काल- परवा मुंबईतील भेंडीबाजारात इमारत कोसळण्याची घटना, गोरखपूर आणि फारुकाबाद सरकारी रूग्णालयात झालेले बालकांचे मृत्यू इत्यादी घटनामूळे जवळपास गेला महिना दुर्घटनांचा म्हणावा लागेल. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियमच आहे. जगभरातील प्रत्येक देशात दुर्घटना घडतच असतात. त्यातील काही घटना नैसर्गिक आपत्तीच्या प्रकारात मोडत असतात तर काही मानवाने आमंत्रित केलेल्या असतात. परंतु वित्त आणि जिवीतहानी दोन्ही प्रकारच्या आपत्तीत होत असते. फरक फक्त आपत्तीची तीव्रता किती आणि त्या संबंधी घेतलेली आगाऊ खबरदारी तसेच आपत्ती काळात प्रशासकीय पातळीवरून केलेला प्रतिकार किंवा निवारणासाठी केलेला प्रयत्न ह्यावर दोन्ही प्रकारच्या आपत्तीतील वित्त तसेच जीवीतहानीचं प्रमाण अवलंबून असते.

नैसर्गिक आपत्तीत निश्चितच वित्त व जीवीतहानीचं प्रमाण अधिक असते. आपत्ती नैसर्गिक वा मानवाने आमंत्रित केलेली असो, आपल्या देशात सर्वसामान्य नागरिक आपत्तीत सापडलेल्या देशबांधवांना मदत करीत असतात आणि तेही स्वयंस्पूर्तीतून. ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे. परंतु त्याचं कौतुक केलं कि आपली जबाबदारीतून किंवा आपल्या कर्तव्यातून सूटका होते असा सत्ताधारी पक्ष समज करून घेतात, ही त्यांची घोडचूक होत असते. काल-परवा तुफान पावसात मुंबईवासियांची उडालेल्या त्रेधाची बारा वर्षापूर्वी झालेल्या पूरग्रस्त स्थितीशी आज तूलना होत आहे. बारा वर्षापूर्वी मुंबईत पडलेल्या पावसापेक्षा २९ ऑगस्टला पडलेला पाऊस कमी होता हे वेधशाळेने केलेल्या तूलनात्मक अभ्यासाअंती जगजाहीर झाले आहे. त्यामूळे मुंबईतील सत्ताधारी शिवसेनेच्या मताधिक्यात जी घसरण सुरू आहे ती आणखिन घसरत जाईल, हे निश्चीत. जसं २६ जूलैची घटना लोकांच्या स्मरणात आज ही दिसते तसेच २९ ऑगस्ट हा दिवस ही मुंबईतील मतदार पुढल्या पाच वर्षात स्मरणात ठेवणार नाही असे कसे म्हणता येईल? जाहिरातीद्वारें आपण कितीही आपली पाठ थोपटून घेतली तरी, सत्ताधारी पक्षाला नैसर्गिक वा मानव निर्मित आपत्तीमधील अपयशाची निदान आपत्तीत सापडलेल्या मतदारसंघ वा राज्यापूरता किंमत मोजावी लागतेच. मग ते मुंबईतील सत्ताधारी असो कि उत्तराखंडातील. आसामातील असो कि उत्तरप्रदेश. ह्याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना झालेली दिसत आहे, हे त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात केलेल्या फेररचनेवरून दिसत आहे. Government has to deliver. हा सिध्दांत कुठल्याही प्रकारच्या राज्यप्रणालीचा श्वास असतो. If Government fails to deliver, it gets finished, how mighty it may. तसेच When Government machinery fails, Judiciary becomes proactive, wheather party in power does  like or not,  people welcome Judiciary's decession. इत्यादी सिद्धांतांची जाणीव असल्यामूळेच पंतप्रधान मोदीजींनी अनुभवी आणि कार्यक्षम नोकरशहांना आपल्या मंत्रीमंडळांत स्थान दिलं आहे.

देशाच्या पंतप्रधानांना जी जाणीव दिसली ती आसाम उत्तराखंड, व उत्तरप्रदेश येथील भाजपच्या सरकारातील मंडळीनां झाली आहे कि नाही ह्याबाबतची माहिती हाती आली नाही. तर दुसर्या बाजूला मुंबई महापालिकेतील शिवसेनाप्रणित सत्ताधार्यांनी सारा दोष निसर्गावर टाकून हात झटकले आहेत. वस्तुतः आपत्ती ही नैसर्गिक असली, तरी कमीत कमी त्यासंबंधींचं स्पष्टीकरण देताना साळसूदपणाचा आव आणू नये. प्रशासकीय चूकांची जबाबदारी झटकण्याची वृत्ती सरकारमधील मंडळीनां महागात पडत असते हा ही एक निसर्गाचा नियम आहे, ज्याचे नाव "करावे तसे भरावे " असं आहे. रेल्वेचे झालेले अपघात ही आपली जबाबदारी आहे असे मानून स्वतःहून पंतप्रधानांकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा तीन दिवस अगोदरच पाठवून देणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ह्यांना असलेली नैतिकतेची चाड ही निश्चितच ह्या दुर्घटनांच्या महिन्यातील आपल्या लोकशाही राज्यप्रणाली संबंधी एक शूभ घटना मानावी लागेल. एखाद्या मंत्र्याने राजीनामा द्यावा आणि वरिष्ठाने तो फेटाळावा अशी नाटकं आपल्याला परीचित आहेत. श्री सुरेश प्रभू एक सनदशीर, बुद्धीवान, सौजन्यशील तसेच कल्पकतेने आणि चोखपणे काम करणारे व्यक्ती आहेत. ह्याबाबत कुणाचे दूमत होणार नाही. रेल्वेमधील गुतंवणूक वाढविण्यासाठी एलआयसीकडून मोठालं कर्ज मिळविले. जागतिक बॅंकेतूनही तीस बिलीयन डाॅलर कर्ज मंजूर करून घेतलं. रेल्वेची इजिनं, डबे, स्टेशन्समध्ये आधूनिकता आणण्याचे कार्य शिघ्र गतीने सुरू केलं. बिहारमध्ये फ्रान्समधील तसेच अमेरिकेतील कंपन्या द्वारे जवळपास पचवीस कोटी रूपये खर्च करून प्रोजेक्ट उभारले. भारतीय रेल्वेच्या इतिहासात इतकं परकिय भाडंवल आणून दूरदर्शीपणा अजूनपर्यंत एकाही रेल्वेमंत्र्याला जमलेलं नाही. रेल्वे विस्तारिकरण जे युपीए सरकारच्या २००९-२०१४ पाच वर्षात झालं त्याहून जवळपास ८५ टक्के अधिक विस्तारिकरण एका वर्षात सुरेश प्रभूनी करून आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे. त्यांनी सिग्नल यंत्रणेची सुधारणा असो वा रेल्वेमधील कर्मचार्यांच्या भरतीमधील पारदर्शकता असो, वा महिलांवर होणार्या छळासंबंधीच्या घटना कमी करण्यासाठी आखलेली योजना, अशा अनेक कामांची यादी सविस्तर आकडेवारी सहित श्री अनुपम कांबळी ह्यांच्या वाॅलवर उपलब्ध आहे. रेल्वे खात्यामधील सचीव पातळीवर असलेल्या अधिकार्या पेक्षाही सुलभ रित्या मांडणी करणार्या श्री अनुपम कांबळींच्या अभ्यासासंबंधी कौतुकाचे शब्द आपोआप आपल्या ओठीं येतात. 

श्री प्रभूच्यां कामाचा तपशील येथे ह्यासाठी दिला कि तसं पाहिलं तर रेल्वे अपघातासाठी ते अप्रत्यक्षरित्याही जबाबदार ठरत नाहीत. कुठलंही सरकार अस्थिर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रेल्वे ट्रॅकवर थोडंफार उलटसुलट केलं कि नक्षलवादी, दशहतवादी, समाजकंटकांचं काम भागतं. श्री अनुपम कांबळीनीं आपल्या लेखात श्री प्रभूनीं रेल्वे खात्यातील नोकरशहा आणि ठेकेदारांनी संगनमताने इतकी वर्षे सुरू असलेली लूट e टेंडर पध्दतीने संपविली ; त्यामुळे ठेकेदारांनी घातापात घडवून आणल्याची शक्यता वर्तविली आहे. मूळात रेल्वेचा प्रचंड आवाका आणि देशाच्या कानाकोपर्यंत पसरलेलं जाळं पाहता रेल्वे मार्गावरील सुरक्षेचं काम फक्त रेल्वे पोलीसांपुरता न ठेवता संबंधीत राज्य सरकार, केंद्रीय गृहखातं तसेच इन्टीलींजन्स सर्विसेस ह्यांना ही जबाबदार धरायला हवं. नैसर्गिक आपत्तीत वेधशाळा, डिझाझस्टर मॅनेजमेंट, गृहखातं, पुनर्वसन खातं ह्यामधे एक कोआर्डीनेशन ठेवलं तर निदान जीवीत हानी तरी वाचू शकेल. तसेच विकास आराखडा आखतानाच पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उकल करणे हे सरकारचं काम असते. सरकारी रूग्णालयात ऑक्सीजनचा तुटवडा होणे आणि त्यातून बालकांचे प्राण गमाविणं ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. अशा घटना योगी सरकारचाही ऑक्सीजन पुरवठा खंडीत करणार नाही असे कसे म्हणता येईल? सरकार केंद्रातील असो वा राज्यातील, प्रजेचा ऐहीक विकास आणि सुरक्षा ही सरकारची प्राथमिक कर्तव्यें आहेत. ह्याचा विसर सरकार वा प्रशासनाला पडू नये. सबबी सांगत जबाबदारी झटकून टाकण्यार्यांनी हे ही लक्षात ठेवावे कि प्रत्येक वेळी जनता लाटेवर मतदान करीत नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी सोनिया गांधींच्या करिष्म्यावर अवलंबून राहणार्या काॅग्रेस पक्षाची होत असलेली घसरण आपण पाहात आहोतच. श्री नरेंद्र मोदींच्या करिष्मावर सतत अवलंबून राहणार्या भाजपाच्या राज्या-राज्यातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी वेळीच सावरून लोकहीताच्या कामातील दिरंगाई, हलगर्जीपणा दूर करणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्परता आणि कार्यक्षमता सिद्ध करणे गरजेचं आहे. हाच ह्या दुर्घटनेच्या महिन्यातील  भाजपाला संदेशवजा इशारा आहे. 

वरील सर्व  दुर्घटनेत मृत्यू पावलेली बालकं, देशबांधव ह्यांच्या आत्म्यांना शांती लाभो तसेच त्याच्यां कुटुंबीयांना धक्यातून सावरण्याची शक्ती लाभो अशी प्रार्थना करतो.तसेच ज्या समाजबांधवांना दुखापत झाली आहे त्यांना लवकर बरं वाटावे अशी प्रार्थना करून हा लेख संपवितो. 

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...