रविवार, २० ऑगस्ट, २०१७

स्वतंत्रता आणि आपण


स्वतंत्रता ही प्रायः सर्व प्राणीमात्रांना प्रिय असते. ती तर एक स्वाभाविक, नैसर्गिक भावना आहे. जगभरातील अनेक तत्ववेत्त्यांनी, साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीतून स्वातंत्र्याची महती वर्णन केली आहे. त्या सार्या वर्णनांतून मतितार्थ काढावयाचा म्हटला तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे. यातील स्व म्हणजे मी,स्वतः आपण,स्व म्हणजे सर्व शरीराचे अधिष्ठान,स्व म्हणजे कर्तृत्वशक्तीचे मूळपीठ. तंत्र म्हणजे रीती, नीती, किंवा पध्दती; तंत्र म्हणजे यमनियमांची बंधने; तंत्र म्हणजे विधिनिषेधात्मक आदेश; तंत्र म्हणजे धारणेसाठी निश्चित केलेली बंधने. हा झाला स्वातंत्र्याचा शब्दशः अर्थ. भगवंतांनी अठराव्या अध्यायात अर्जुनाला उपदेश देताना शेवटी म्हटलं,
 "इति ते ज्ञानम् आख्यातं गुह्यात गुह्यतरम् मया|
   विमृश्य एतत अशेषेणे यथेच्छसि तथा कुरू||
"अर्जुना, याप्रमाणे सर्व ज्ञानातील गुह्यातील गुह्य ज्ञान मी तुला सांगितले. याचा पूर्ण विचार कर. मग तुझ्या इच्छेस जे येईल तें कर". ह्याचा अर्थ भंगवतं ह्या ठिकाणी अर्जुनाला त्याच्या इच्छेनुसार कृती करण्याचं स्वातंत्र्य देत आहेत असे दिसते. ह्यावरून असेही म्हणता येते कि स्वातंत्र्य ही केवळ नैसर्गिक भावनाच नसून ती ईश्वराची देणगीच आहे.

आता प्रश्न असा पडत असतो कि आपण किती स्वतंत्र आहोत. असे म्हटले जाते कि प्रत्येक माणसात दोन मनें विराजमान असतात. बाह्य मन आणि अंतरमन. कुठलीही कृती (दैनंदिन शरीरधर्माचे नैसर्गिक विधी सोडून) करताना बर्याच वेळा करू कि नको अशी स्थिती आपली होत असते. एक प्रकारचे द्वंद्व सुरू असते. मनच ते, लहरी असतेच. ते आपली बुध्दी स्थिर करू देत नसते. अशा द्विधा अवस्थापुरता तरी आपण सारे अर्जुनच. असे, व पू काळे म्हणतात ते पटते. पण आपल्याला साथ देण्यासाठी पार्थसारथी नसतो ना. हीच मोठी पंचाईत. मग वाटते कर्मत्याग करावा. प्रपंचाचे सगळे  पाश सोडावेत. माझ्या शालेय जीवनात मराठी विषयाच्या पुस्तकात "मृत्यू ते म्हणती सबूर" अशी एक कवीता होती. त्या कवितेचं पहिलं चरण असे होते. 
"मृत्युते जन बाहतात परि ते भोगास वैतागुनी|
मृत्युते म्हणती सबूर परि ते ना स्वार्थ वृत्तीमूळी|| 
 शेवटचं चरण खालील प्रमाणे आहे,
पाहोनी चिमणी पिला भरविते आणोनी चारामुखी|
आपोआप मनात बोल ऊठले मृत्यू येऊ नको की||"

खरंच बंधनं सुटता सुटत नाही. मग वाटते कसले हो आपण स्वतंत्र? परंतु इथेच आपण स्वातंत्र्याचा अर्थ समजण्यात अनर्थ करीत असतो. स्वातंत्र्य म्हणजे बंधने,आणि ती ही स्वतःवर घालून घेतलेली. बंधने जिथे नाहीत तिथे सत्कार्य कसे असणार. मग तो स्वैराचारच की. आकाशात स्वैर विहार करणारे पक्षी खरेखुरे स्वतंत्र, असे वाटते. पण आपण हे लक्षात घेत नाही कि आकाशात स्वैर विहार हा पक्षांचा स्वाभाविक स्थायीभाव. ते अन्न कुठून आणि कसे गोळा करणार? आपल्या लक्षात हे ही येत नाही कि आणलेले अन्न साठवून ठेवण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे का? पावसाचे पाणी डोंगरमाथ्यावर पडते आणि बारा वाटांनी वाहू लागते. त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नसतो. पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहू लागले, त्याला तटाघाटांची बंधने आली कि उपयोगी पडते. त्याला शक्तीचे रूप प्राप्त होते. आकाशात स्वैर विहार करणारी वीज तारांच्या बंधनात बांधली गेली तरच घरीदारी उपयोगी ठरते. देहाचे बंधन आहे म्हणून आत्मा विविध प्रकारची कार्यें करीत असतो. प्रत्यक्ष परेमेश्वरदेखील, त्याने स्वतःवर घेतलेल्या मायेच्या आवरणामूळे तो आपल्याला भासमान होतो. त्याच्या मायेतच त्याचे कर्तृत्व आहे. 

जे प्राणी मनुष्याच्या अधीन नाहीत, ते ही स्वतंत्र नाहीत, परतंत्र आहेत. रानात मुक्तपणे चरणार्या हरिणांना ज्या वेळी जो चारा मिळेल तो खावा लागतो. त्यांना आपल्याला हवा तसा चारा निर्माण करता येत नाही ना निकडीच्या वेळेसाठी साठवता येतो.  वाघ, सिंह इत्यादी हिंस्त्र पशू मोठे बलवान असतात. पण जे प्राणी तावडीत सापडतील त्याचेंच मांस त्यांना खावे लागते. हवे ते खाद्य नेहमी मिळत रहावे, या दृष्टीने वाघसिंहांनी हरिणालये, शूकरालये किंवा शशकालये चालविल्याचे कधी दिसले नाही. आपल्याला काय हवे ह्याची जाणीव होणे आणि ते निर्माण करण्याची बुध्दी, क्षमता फक्त मनुष्यात. म्हणून तो खरा स्वतंत्र. जो स्वतःच्या इच्छेने, स्वतःसाठी किंवा दुसर्यासाठी वागतो , खपतो आणि मरतो तो मनुष्य.

परमेश्वराला ताब्यात ठेवील, बंधनात जखडील, नियमांनी बांधील असा या जगात कोण आहे? अर्थात कोणीच नाही. पण त्या सर्वशक्तीमान परमेश्वराने स्वेच्छेनेच स्वतःहाला नियमबद्ध केले आहे. चंद्राच्या उमलत्या कला पाहा, की प्रचंड ग्रहगोलांची परिभ्रमणे पाहा; समुद्राची भरतीओहटी असो;सर्वत्र व्यवस्था आहे नियम आहेत. परमेश्वराच्या सर्व कृती त्याच्या स्वतःच्याच नियमांनी नित्य बांधलेल्या आहेत. म्हणूनच तो परमेश्वर स्वतंत्र आणि स्वयंभू असे आपण मानतो. 'हृषीकेश ' म्हणजे इंद्रियांचा स्वामी, 'वृषकर्मा ' म्हणजे धर्ममय कामे करणारा, 'नियमः' म्हणजे स्वतः नियमाने वागणारा व सगळ्या प्रजेला नियमांनी वागवणारा, 'यमः' म्हणजे आतून, स्वतःचे आणि सर्व जगाचे नियंत्रण करणारा, अशी जी परमेश्वराची सुप्रसिद्ध अभिधाने आहेत ती सर्व स्वतंत्रतेचेच स्वरूप दर्शवितात. 

जन्म आणि मृत्यू ह्याबाबतीत आपण स्वतंत्र नसतोच. कोणाच्या पोटी आपला जन्म होणार तसेच कुठे, केव्हा, आणि कसा आपला मृत्यू होणार हे ही आपल्याला ठाऊक नसते. एक प्रौढ गृहस्थ रस्त्याच्या कडेला पायी चालत असता पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या ट्रकचं चाक पन्नास फूट दूर असताना निखळून गरगर करीत नेमक्या त्या प्रौढ गृहस्थाला पाठीमागून धडक देते. आणि तो गृहस्थ खाली पडतो,अशाच जागेवर जिथे एक अणुकूचीदार दगड होता त्यावर त्याचे डोक आपटले जाते आणि मृत्यूमुखी पडतो. कधीही शेअर बाजाराच्या इमारतीत न गेलेला माणूस त्याच्या मालकाच्या कामासाठी शेअर बाजाराच्या इमारतीत प्रवेश करतो आणि तेव्हाच बाॅम्ब स्पोट घडतो आणि प्राण गमावितो. भूकंप होतो; सार्या मोठमोठ्या इमारती पडतात आणि तिथे खचाखच पडलेल्या डबरीत छोटं बाळ सुरक्षित सापडते. पुष्कळदा आपण पाहतो, साथींच्या दिवसात किंवा काही दुर्घट घटनेमुळे आई वडीलांना स्वतःच्या मुलाचा/मुलीचा मृत्यू पहावा लागतो. मृत्युला क्रम नसतो. हेच सत्य. म्हणूनच आद्यवाल्मीकी गदिमा म्हणतात, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतात  म्हणून जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात दैवावर विश्वास ठेवणं समर्थनीय ठरत नसतं. अपयश पदरी पडल्यानंतर निराश अवस्थेत राहणे ही सुध्दा आपलं स्व स्वतःहून गमाविण्यासारखे आहे. उत्साह म्हणजे जीवन तर नैराश्य म्हणजे मृत्यू. उत्साह म्हणजे स्वतंत्रता, नैराश्य म्हणजे पारतंत्र्यता.

नैराश्याची कारणे विविध असली तरी जगरहाटी स्विकारताना जे दंद्व आपल्या मनात असते, ते आपण स्वतः सोडवावयाचं असते. "आपणच आपले न्यायाधीश" हेच आपण विसरतो. म्हणजेच आत्मपरिक्षण करीत नाही. श्रीमंत लोक घरातील लग्न कार्यादि सारख्या मंगल कार्यात जसा खर्च करतात, तसा बेताची आर्थिक स्थिती असलेल्यांनी करण्याची गरज असते का? त्याने अंथरूण पाहूनच हातपाय पसरावयाचे असतात. "आपणच आपल्या जिवनाचे शिल्पकार" असे सुप्रसिद्ध वचन आहे. आपल्याला लागणार्या वस्तू विकत घेणं, करिअर निवडणं, व्यवसाय निवड व तो वृदिगंत करणं, इत्यादी बाबतीत वरील वचन सतत ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर बेडकी बैलासारखी फुगण्याचा प्रयत्न करते तशी आपली फसगत होऊ शकते. तसेच Excess of anything is poison. हा ही सिध्दांत सतत ध्यानी ठेवणं महत्वाचं असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती हे त्रिवार सत्य. आपल्या शरीराचा पिंड, मनाची बैठक, आवड इत्यादी गोष्टी कशा आहेत त्यावरून आपला आहार, विहार साभांळावेत. दुसर्याचं अनुकरण करणे म्हणजे गुलामीच की. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पध्दतीचं अनुसरण आत्मानुसंधान, आत्मप्रगटीकरण; स्वतंत्रता म्हणजे मी माझ्या विचाराने ठरविलेल्या गोष्टीचे आचरण. स्वतंत्रता म्हणजे दुसर्याचा विचार न करणे असे बिलकूल नाही. ज्या समाजात राहतो त्यासंबंधीची बांधिलकी झूगारून देणे म्हणजे स्वैराचार. सामाजिक बाधिलकी जपणे, आपल्या देशातील कायदे, आपल्या देशाचं संविधान, ह्यावरील निष्ठा ढळू न देणे, जीवन जगत असता समाजाप्रती, देशाप्रती असलेली कर्तव्ये जो पाळतो तो खरा स्वतंत्र. सारं काही दैवावर सोडून आपले नियत कर्माला सोडचिठ्ठी देणे म्हणजे गुलामी. ह्या सार्या विषयांवर "सामाजिक बांधिलकी '', "आपली वाणी आपलं यश", "आपल्यातील देव", "देशभक्ती नारेबाजीत नव्हे अंतःकरणी असावी ", " आषाढी एकादशीच्या निमित्ताने " इत्यादी लेखात मी चर्चा केलीली आहे. म्हणून पुनरावृत्ती टाळीत आहे. फक्त इतकचं सांगावयाचे वाटते कि व्यक्तीसुख आणि व्यक्तीस्वातंत्र्य या गोष्टी अत्यंत इष्ट आणि फार महत्वाच्या असल्या तरी त्या सुखाला आणि स्वातंत्र्याला इतरांच्या सुखाची आणि स्वातंत्र्याची बंधने असतातच. नाहितर रशियात राज्यक्रान्तीनंतर घडलेल्या एका गोष्टीतल्या बाईसारखी समाजाची स्थिती होते. तिथल्या राज्यक्रांतीनंतर माणसांनी आणि वाहनांनी गजबजलेल्या माॅस्कोच्या रस्त्यावरून एक बाई अगदी मधून हवी तशी चालू लागली .पोलिसांनी कडेने चालण्याची सूचना दिली तर ती चक्क म्हणाली, "आता मी स्वतंत्र  झाले आहे. मी हवी तशी चालणार! तूम्ही कोण मला हुकूम देणार? मी स्वतंत्र  आहे ". ही गोष्ट दोन तीन ठिकाणी माझ्या वाचनात आली आहे. म्हणजे खरी असावी. आपल्या देशात ही अशा प्रकारच्या घटना घडत असतात. दस्तुरखुद्द लोकप्रतिनिधीच कायदे मोडून हव्या त्या गतीने वाहनं चालवितात. हवा तसा नियमात बदल करून आपल्या आप्तेष्टांना सरकारी योजनांतून मालामाल करणं , हवं तेव्हा वेळवर पोहचायचं नाही, संसद असो वा विधीमंडळ उपस्थिती बेताची परंतु त्याही वेळी गोंधळ माजवायचा आणि सभात्याग करायचा, इत्यादी सारे वर्तन स्वातंत्र्याच्या अर्थाच्या विरोधातीलच होय. स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःच्या बेशिस्त वागण्याच्या समर्थानार्थ जोडायचा आणि सरकारी नोकरांना मारहाण करावी असे प्रकार लोकप्रतिनिधी करीत नाहीत का? 

अलीकडे WhatsApp वर घरातल्या मुख्य कर्ताकरविता मातेच्या संदर्भात गांभीर्याने विचार करावी लागणारी एक पोस्ट आली होती. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर घरातील कामें अविरतपणे सुरच ठेवणार्या त्या मातेला मूलगा व सून कशाप्रकारे गृहीत( taken for granted) धरत असतात, ह्यासंबंधीचं वर्णन त्या पोस्टमध्ये आहे. त्यातच त्या मुलाचे निवृत झालेले वडील, कसे स्वच्छंदी जीवन जगत असतात हे ही दाखविले आहे. निवृत्ती नंतर मित्रमंडळीशी सकाळ-संध्याकाळी बाहेर फेरफटका मारतात, कधी रस्त्यावरील भेळ, पानीपुरी खाण्याची सर्रास मौज पुरी करतात, महीन्या दोन महिन्यांतून एक दिवसाच्या पिकनीकला जातात आणि वर दर दिवशी वाॅटर बॅग, जाॅगिंगचे बूट, नॅपकिन इत्यादी वस्तू पत्नीकडून घेण्याची सवय. परंतु ह्याबाबतही त्या महिलेच्या मनात ना हेवा ना काही तक्रार. अशी स्थिती त्या महिलेनी स्वतःहून आणली हे सत्य असलं तरी तिने स्व गमाविला असे म्हणता येणार नाही. उलट एका उदात्त हेतूने, निस्वार्थ वृतीने, आपल्या संस्कृतीतील 'माता' ह्या नात्यात वर्णिलेल्या उच्च प्रतिमेला नैसगिर्क, स्वाभाविक न्याय ती देत आहे. त्यातूनच तीचं कुटुंबासाठी झटणं अविरत सुरू आहे. परंतु त्या महिलेचा मूलगा, सून तसेच तिचा पती स्वातंत्र्याचा गैरफायदा(जाणूनबूजून नसेलही कदाचित) घेत आहेत हे तर निश्चित मान्य करावे लागते. आजची स्त्री पूर्णपणे स्वतंत्र आहे का? ना सरकारला होय म्हणता येते ना समाजाला. स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्षे पूर्ण झाली तरी दर दिवशी स्त्रिच्या शोषणाची, छळाची, बलात्काराची बातमी ऐकू येतच आहे. पतीप्रेम ही कितीही उच्च भावना असली तरी दारूबाजीच्या खितेर्यात वर्षानुवर्षे लोळणार्या आणि व्यसनाधीन होऊन आपल्या पोराबाळांना अत्यंत निर्दयतेने वागविणार्या नवर्याच्या लाथा खात राहणे व एके दिवशी त्याच्या हातून आपला कपाळमोक्ष करून घेणे हे काही सध्याच्या काळात अनुकरणीय पातिव्रत्य होऊ शकत नाही. ती एक प्रकारची गुलामीच होय. स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून जी सामाजिक जागृती दर्शवायला पाहिजे होती, जी सार्वजनीक नीतीची चाड बाळगणे आवश्यक होते, तिचा मागमूसही अजून आपल्यात आढळत नाही. जुनी ध्येयं आम्ही कधी प्रामाणिकपणे आचरणात आणली नाहीत. मात्र ढोंगीपणाने त्यांची पूजा केली. आपल्या ढोंगाचे आणि दुबळेपणाचे स्तोम माजविले. ही सारी लक्षणे मानसिक दुर्बलतेचेच आहेत. मग स्वतंत्रता कुठे राहिली? न पाळले जाणारे पावित्र्य, आचरणात न उतरणारी नीतीमूल्ये, निसर्गाशी व प्रचलित जीवनक्रमांशी सुसंगत नसलेले ध्येये, ह्यांचा ऊदोऊद करण्यात आपल्याला आनंद वाटतोय कि काय? This is also no less than one type of Bipolar Depression . 

महाभारतात जेव्हा अर्जून श्रीकृष्णाच्या बहीणीला सूभद्राला पत्नी म्हणून घेऊन इंद्रप्रस्थात येतो, तेव्हा द्रोपदीचा अंगाचा तीळपापड होत असतो. तेव्हा ती श्रीकृष्णाला जळजळीतपणे विचारते, "तुझी आत्या कुंती ती यादव. तिने मला पाच नवर्यांची बायको बनवलं आणि तू ही यादव. आता तूझी बहीण माझी सवत म्हणून आणली. वर आणखिन दासी आणल्या. तुमच्या राजकारणातले जसे पवित्र्ये, यूद्धात जशी शस्रे, तशा कावेबाजीत साधनं म्हणून आम्ही बायकाच का येतात? शत्रू भुलवायाचा झाला, मित्र फिरवायचा झाला की त्याला एक स्त्री द्यायची, राजांना दासी पुरवायच्या आणि धनवंतांना भोगदासी देऊन रिझवायचे! किमान तू स्त्रियांच्या अशा वापराला अपवाद का नाहिस? श्रीकृष्ण क्षणभर थांबून उत्तर देतो. "पांचाली, राजकरणात आणि राजकारणी माणसांकडून फक्त स्त्रीच वापरली जात नाही. पुरूषाचं प्रात्त्कतनही त्याहून वेगळे नसतं. लढणारे आणि मरणारे सैनिक काय स्वतःसाठी लढत आणि मरत असतात का? गावपातळीपासून ते प्रधान सेनापती पर्यंतचे लोक स्वतःच्या इच्छेने काम करतात का? स्पष्टच सांगायचं तर राजांना आणि सम्राटांनाही त्यांच्या इच्छेनुसार जगता येत नाही. परिस्थितीची मागणीच सार्यांच्या दिशा निश्चित करते. राजाने ठरवायचं आणि सैनिकांनी मरायचं . येथे कोण आहे स्वतंत्र?". द्रौपदी काही न बोलता आपल्या महालाकडे  निघून गेली.

मानव देह धारण करून अवतारणार्या देवांनाही छळ, पीडा, अपयश, द्वंद्व, आरोप, वादविवाद सुटले नाहीत हेच खरं. After all, Man is a servant of circumstances. 

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

मिडीयातील सुत्र नावाचं अपत्य


लोकशाहीचा चौथा आधारस्थंभ म्हणजे प्रसारमाध्यमें. "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नारा, हाच आधार या व्यवसायाचा"! परंतु सारीच माध्यमें मग ती प्रिन्ट असो वा इलेक्ट्रॉनिक्स, काही महत्वाच्या राजकीय घटनांसंबंधी सुरवातच मूळी  "सुत्रांकडून मिळालेली बातमी अशी आहे कि" ह्या वाक्याने करतात.  नंतर विस्तराने मांडणी करतात. मिडियातील सूत्रांचा सूत्रधार कोण हे कधीच कळत नाही. प्रत्येक वृत्तपत्र सर्वाधिक खपाचं असते. प्रत्येक न्यूज चॅनेल एक नबंरवर असते. ही नंबरवारी कोण करीत असते हे सामान्यजनांना कळतच नसते. प्रत्येक न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्राचा घोषा असतो कि आम्हीच लोकहितवादी. आम्हीच लोकशाहीचे सच्चे रक्षणकर्ते. आम्हीच खर्याखूर्या पत्रकारितेचे खंदे पुरस्कृतें. एका बाजूला विज्ञानाची कास धरण्याचा प्रचार तर दुसर्या बाजूला राशीभविष्याचं सदर सादर होते. अल्पसंख्याकांच्या अंधश्रद्धा ह्या त्या त्या धर्माचा अंतर्गत मामला आणि त्यांचा तो घटनात्मक हक्क. त्यात सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. अशीच भावना बहुतांश प्रसारमाध्यमांची असल्यामुळे हिंदू धर्मीयांच्या अंधश्रद्धावर सडकून टिका करण्यासाठी विषय आणि निमित्त शोधावयाचे आणि दुसर्या बाजूला अनेक ज्योतिषीबुवांचा ग्रहण काळातील पथ्यांसबंधीचा खास कार्यक्रम ठेवायचा. हिंदू धर्मातील पुराणें, देव-देवता, त्यांच्या मूर्त्या, अवतार-कथा, मिथ्यकें, तसेच भरपूर प्रमाणातील आख्यायिका  इत्यादी  गोष्टी मिडीयावाल्यांसाठी  एक  मोठं भांडवल आहे. पण ते उघडपणे मान्य करणे म्हणजे आपलं पुरोगाामित्वं धोक्यात येत असल्याचं भय बहुतांश सर्वच चॅनेल्स आणि वृत्तपत्रांना वाटत असते. पुष्कळदा भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतात, ती खरच मिडीयामार्फत बाहेर येतात कि राजकीय पक्षांमधील अंतर्गत गटबाजीमुळे?हा सर्वसामान्यांना पडत असलेला नेहमीचा प्रश्न. परंतु त्याचं उत्तर कधी मिळू नये अशी व्यवस्था ह्या क्षेत्रात असते.  तरीही भ्रष्टाचाराची पहीली बातमी आम्हीच दिली हे ही वारंवार सांगायचे आणि दाखवयाचे. आता सोशल मिडिया नावाचं एक जबरदस्त हत्यार जनसामान्यांच्या हातात आलं आहे. परंतु ह्या माध्यमावर राजकीय विषयांवर होणारी चर्चा वरील दोन्ही माध्यमांद्वारें मिळालेल्या माहितीच्या आधारेच बहुतांश घडत असते. त्यामुळे WhatsApp आणि Facebook, वर राजकिय घटना सदंर्भातील चर्चेत भाग घेणार्यांचे सरळ सरळ दोन तीन तट पडलेले दिसतात. बहुदा हे तट विविध राजकीय विचारसरणी अंगिकारण्याची आपल्यामध्ये जी सहजप्रवृत्ती असते, त्यातून पडत असतात. एक सार्वत्रीक अनुभव असा आहे कि कुठल्याही राजकीय विचारसरणीचा आपण अंगीकार करतो, तो अशा वयात जेव्हा आपल्याला सार्या विचारसरणीसंबंधीचं पुरेसं ज्ञान नसते. कुणाच्या  सांगण्यावरून, कुटुंबातील थोरल्या मंडळीकडून आलेला वारसा, व्यवसायिक हितसंबंध, परिस्थितीचा रेटा इत्यादी गोष्टींमूळे एखाद्या राजकीय विचारसरणीशी किंवा पक्षाशी आपली जवळीक किंवा संधान साधले जाते. माणसाची ही सहजप्रवृत्ती, केवळ  राजकिय विचारसरणीशी होणार्या सलगी पूरताच नव्हे तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राकडे बघण्याच्या दृष्टीत आणि त्यायोगे कार्यप्रवृत्त होतानाही निर्माण होत असते. मला वाटतं मानसशास्त्राचे अभ्यासक ह्या विधानाला पुष्टी देतील. कारण अनुकरणीयता हे प्रत्येक प्राण्यांमधील एक जन्मजात वैशिष्ट्यच. असो. सोशल मिडीयावर राजकिय विषयांवरील चर्चेत जे तट पडतात त्या संबंधी मी हेच म्हणू इच्छितो कि, प्रिन्ट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडियावर दैनंदिन राजकीय घडामोडीचं ज्या प्रकारे सादरीकरण केलं जाते त्याचच ते प्रतिबिंब असते. ह्या मागील कारणे बहुदा नैसर्गिक स्वरूपाची किंवा समूह मानसशास्त्रीय असावीत. सोशल मिडिया हे मिडियातील अलीकडचे अपत्य. व्यावसायिक पत्रकारिता म्हणून सर्वत्र प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमेंच मानली जातात. राजकीय घटनांसंबंधींच्या माहितीचा स्त्रोतही मूलतः हीच दोन माध्यमे. ह्या स्त्रोतमध्ये सर्वसामान्यांना न दिसणारं एक  सुत्र असते. आणि तीच बाब मिडिया क्षेत्रातील कंपन्यांंच्या  स्थिरतेचं आणि यशाचं गमक ही ठरत असते. 

राजकीय नेतेमंडळी, नोकरशहा, आणि प्रसारमाध्यमें ह्यांच्यामधील संबंध हे मिलीभगत स्वरूपाचे नाही असे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. कधी  नेतेे मंडळी मिडीयाला मॅनेज  करतात, तर कधी मिडीया नेेेत्यांना सांभाळून घेतात. असं ऐकतो कि देशाची राजधानी  सत्तेच्या दलालांचं एक फार मोठं केंद्र आहे. मंत्रीमंडळाचा शपथविधी असो वा विस्तार, पद्म पुरस्काराची घोषणा असो वा राज्यसभेवर स्विकृत खासदाराची भरावयाची जागा, तसेच अनेक सरकारी योजनांचे कंत्राटं देण्याची अंतीम तारीख, इत्यादी वेळी सत्तेच्या दलालांचा सुळसुळाट माजतो.  ह्या दलालात मोठ्या प्रमाणावर मिडीयातीलही अधिकारी असतात. मोदीजींच्या हाती सत्ता आल्यापासून बदल होत आहे असे ऐकीवात येत आहे. परंतु ह्या व्यवस्थेत संपूर्ण बदल कधी होईल हे सांगता येत नाही. काही न्यूज चॅनेल्स आणि  वृत्तपत्रे एका पक्षासाठी अनुकूल असतात, तेव्हा दूसरी न्यूज चॅनेल्स आणि  वृत्तपत्रे दुसर्या पक्षासाठी  अनुकूल असतात.  हे असे चित्र का असते? कारण राजकीय विचारसरणीच्या अंकित होण्याची जी सहजप्रवृत्ती सर्वसामान्यांनामध्ये असते, तशीच न्यूज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांचे संपादक आणि मालक मंडळीमध्येही असते. आणि ते स्वाभाविक आहे. परंतु एका गोष्टीचं नवल वाटते ती म्हणजे प्रिन्ट मिडीया आणि न्युज चॅनेल्सच्या संपादकांंची मर्जी एकाच पक्षाच्या नेत्यांसाठीही भिन्न पातळीवरची असते. असे का व्हावे? Because it depends on the  bargening power which includes financial standing, popularity and rank of the leaders in their respective party'.                              

देशाला  स्वातंत्र्य  मिळाल्यापासून आजपावेतो बहुतांश वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्सचा कारभार (म्हणजेच बातम्यांचं सादरीकरण तसेच संपादकिय लेख वा निष्कर्ष) हिंदूत्ववादी पक्षांचं खच्चीकरण करणाराच राहिला असे मला सतत वाटत असते. नामांकित मराठी वृत्तपत्रांचा खप सामना ह्या वृत्तपत्राने घटवला. ह्याचं कारण सतत शिवसेनेला आरोपीच्या पिंजर्यात ठेवण्याची त्यांची वृत्ती नडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर एक नावाजलेले व्यंगचित्रकार. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी व्यंगचित्रे पुरविलेली होती. असे असुनही केवळ त्यांनी भगवा ध्वज घेऊन शिवसेना पक्ष स्थापन केला, आणि हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असा प्रचार करू लागताच झाडून सर्व वृत्तपत्रे त्यांच्यावर टिका करू लागले. आणि जेव्हा टिका असहाय्य होऊ लागली तेव्हा शिवसेनेने वृत्तपत्र क्षेत्रात पदार्पण केलं. जो व्यवहार शिवसेनेशी केला,तसाच व्यवहार संघ आणि भाजप बाबतीत अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्सनी केला आणि करीतही आहेत. आज हिंदूत्व विचारसरणीला अधिक प्रमाणात जनतेचं समर्थन का मिळू लागले? अमर्याद सत्ता बर्याच काळासाठी भोगणार्या पक्षांचा आधार बहुतांश मिडियातील कंपन्यांना मिळत राहूनही तथाकथित सर्वधर्मसमभाववाद्यांची इतकी पिछेहाट का झाली? ह्यावर मिडीयातील कंपन्या आत्मपरीक्षण करीत आहेत असे दिसत नाही. सूंभ जळला तरी पीळ जात नाही, असेही घडत आहे का? भाजपतेर पक्षांच्या पिछेहाटीला त्या पक्षांची धोरणें, संघटनात्मक कामातील ढिलाई, सुस्ती अशी कारणे असली तरीही, मिडीयातील लोकांचा हिंदूत्व पक्षाविषयी असलेला आकस हा वाचकांना आणि प्रेक्षकांना रूचविणे जड होत गेले. ही बाब सुध्दा भाजपेतर पक्षांची पिछेहाट होण्यास कारणीभूत ठरली आहे. हिंदुत्व पक्षांवर आणि विचारसरणीवर टिका करण्याची  चढाओढ माध्यमातील कंपन्यांमध्ये दिसत असते,  त्या पाठीमागे कुठली तरी शक्ती आहे. त्याचच नाव मिडीयामधील सुत्र नावाचं अपत्य. आपल्या देशाची राजकीय व्यवस्था, प्रसारमाध्यमें आणि नोकरशाही ह्यावर प्रभाव टाकणार्या शक्ती ज्या ब्रिटिशांच्या काळात होत्या ,त्या स्वातंत्र्यानंतरही अबाधित राहिल्या. शालेय स्तरापासून  ते महाविद्यालयीन आणि पोस्ट ग्रॅज्यायुट स्तरापर्यंत अनेक विषयांवरील विशेषतः इतिहासाचा  अभ्यासक्रम ठरविणार्या संस्था आणि विद्यापिठांवर आजही त्याच शक्तीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या प्रभाव  आहे. समाजवाद, साम्यवाद, आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द ऐकावयास बरे वाटतात. म्हणूनच सतत ते शब्द भारतीय जनतेच्या कानी ऐकू येतील अशी व्यवस्था उभी करून सरकार, प्रसारमाध्यमें, नोकरशहा ह्यांचं जनतेप्रती काही दायीत्व आहे, ह्या मूलभूत बाबीलाच गौण ठरवित देशाचा कारभार रेटला गेला. त्यामुळे सरकार, प्रसारमाध्यमें,  नोकरशहा आणि सत्तेचे दलाल अशी भक्कम चौकट निर्माण झाली. त्या चौकटीतून जे अपत्य निर्माण झाले त्याचच नाव मिडीयातील सुत्र. त्याचच आजच्या आर्थिक जगतातील नाव म्हणजे प्रसारमाध्यमातील पैसारूपी भांडवल. हा पैसा कोठून येतो? कोणकोणत्या देशातून येतो ? कोण कोणत्या NOG मार्फत? त्या NGO चां हेतू शुध्द आहे का? ह्याकडे मोदी सरकारचं बारीक लक्ष आहे. अलिकडे NDTV सारख्या मातब्बर पण सतत पक्षपाती कारभार करणार्या चॅनेलच्या भांडवलासंबंधीचा गैरकारभार म्हणा वा आर्थिक अफरातफरीसंबंधी चौकशी सुरू झाली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर नोकरशाहीच्या वागण्यात आणि काम करण्याच्या गतीत बदल दिसून येत आहे. जे आपल्याला अशक्य कोटीतील वाटत होते. परंतु त्यात यश मिळतय. कारण The leader himself is leading from the front. त्यामुळे मिडियातील त्या सुत्राभोवती असलेली पोलादी पकड ढिली होत जाईल, अशी आशा वाटते. 

परंतु आज स्थिती काय आहे? आपला TRP वाढविण्याच्या नादात न्यूज चॅनेल्स आणि त्यांचा entertainment विभाग भरकटत असताना दिसतोय. मिडिया एक व्यवसाय आहे,एक employment generator आहे हे मान्य. कित्येकदा सरकार दरबारातील लोकहीताच्या कामात होणार्या दिरंगाईवर माध्यमें प्रहार करतात. हे ही मान्य. दुष्काळ पूर ह्या सारख्या आपत्तीत समाजबांधवासाठी, तसेच गरीब विद्यार्थ्यासाठी देणग्या गोळा करण्याची कामें ही माध्यमें करीत असतात. हे ही कौतुकास्पद आहे. तरीही माध्यमातील अनिष्ट सवयी, त्रूटी दूर करण्याची गरज नाही, असे मानणे गैर आहे. विचार स्वातंत्र्याचा कैवार घेणार्या ह्या संस्थांच्या अंतर्गत कारभारात सार काही आलबेल नसतं. संपूर्ण निःपक्षपाती धोरणाचं तसंच पारदर्शकतेचं दर्शन मिडीयातील संस्थांच्या कारभारातून जितकं व्हावयास हवं तितकं दिसत नाही. न्यूज चॅनेल्सवर राजकीय विषयासंबंधीचं चर्चा सत्र कसं असते? नुसता मासळीचा बाजार. सुत्रसंचालन करतेवेळी ध्वनीचं प्रदूषण घराघरात होणार नाही ह्याची दक्षताच घेतली जात नाही, इतक्या मोठ्या आवाजात टाॅक शोज घडतात. विविध राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा जो खेळ मांडला जातो त्यालाच व्यवसायिकता मानावयाची का? प्रसारमाध्यमांना दोष देत राजकीय व्यवस्थेतील नेते मंडळी हात झटकू शकत नाही. संसद असो वा विधानसभा, आपल्या प्रतिनिधींचा गोंधळ आपण पाहातच असतो. एकमेकांच्या उखाळया-पाखाळ्या काढण्यासाठी ती मंडळी निवडून गेली आहे का? त्याचांच कित्ता सोशल मिडीयावर सर्वसामान्य गिरवीत असतात. सोशल मिडीयावरील सर्वसामान्यांना माझं सागंण आहे कि, तुमचे राजकीय विषयासंबंधी मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये ह्याची काळजी घ्या. मला असे का वाटते? पहिल कारण हे कि मिडिया, पक्ष प्रवक्ते, लोकप्रतिनिधी, नेते मंडळी ह्यांच्यात जे काही वादविवाद होतात ते होऊ द्यात. कारण त्याचां तो व्यवसाय आहे. व्यवसाय कालातंराने  स्वभाव बनतो. स्वभावाला औषध नसते. कोणाला पटो कि न पटो; पण हे सत्य आहे. दूसरं कारण म्हणजे आपली लोकशाही अजून विकसनशीलतेच्या वाटेवर आहे. ही जबाबदारी सर्वसामान्यांच्याच पाठीवर असते. तिसरं आणि चौथं कारण संयुक्तिक रित्याच मांडणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांमध्ये राजकीय घटनावरून जेव्हा जेव्हा मनभेद होतात त्या त्या वेळी पक्षीय वाद विकोपाला जातात. त्यावेळी कार्यकर्त्यांवर नेेेत्यांचंही  नियंत्रण राहात नाही. कार्यकर्ते इतक्या जोशात असतात,कि त्यातून मारामारी, रक्तपात,आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असते.  नंतर पोलीस कचेर्यांवर आणि कोर्टातील वार्या आपल्या माथी आल्याच समजा. बरं रक्तपात कोणाचा? आपला आणि आपल्याच बांधवांचा. मोर्चा व अंदोलनांत नेतेमंडळींची मूलं नसतात. ती जेव्हा वयात येतात, तेव्हा तेही नेतेच बनतात. जगभरातील प्रत्येक देशातील राजकरणात फार थोडेच लोक तत्वबोधासाठी वाद घालतात. बहुतांश वादाची कारणे सत्तेची- संपत्तीची लालसा, पूर्वग्रहाचे प्रिय डोलारे सांभाळणे, आणि अंहकार सुखाविणे हीच असतात. पुष्कळदा हे वाद ही वरवरचे दिसतात. कारण काल परवा पर्यंत एकमेकांचे शत्रू असलेले पक्ष आणि नेते आज परस्पर गळयात गळा घालतात. मग उद्याची बात उद्याच. आज त्यावर  भाष्य करता येत नाही. क्रिकेट खेळामधील  जुने समालोचक (रेेडिओ वरील) डी की रत्नाकर,   देवराज पुरी, म्हणत असत, " Cricket is a game of chance. म्हणजेच  बेभरवशाचा खेळ. राजकीय क्षेत्र ही तसेच बेभरवशाचं असते. हे अलीकडे सिद्ध होत जात आहे.

राजकीय व्यवस्था, मिडीया आणि नोकरशहा क्षेत्रातील मंडळींना आपआपल्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागते. तिन्ही क्षेत्रातील उच्च पदस्थ मंडळींना अतिमानव (superhumanist) बनण्याचीही एक सुप्त इच्छा असते. त्यामुळे प्रत्येक नेत्याला सर्वसामान्यांच्या व्यथेकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. नोकरशहा मंडळीत अतिमानव बनण्याची इच्छा धरणार्यांची टक्केवारी कमी असेल, परंतु त्यांना सेवेत extension मिळण्याची इच्छा असतेच आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू असतातच. अतिमानव होण्याची धडपड करणार्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात नेहेमी विसंगती दिसते. ह्यासंबंधी आल्डस हक्स्लेन ह्या विचारवंतानी केलेलं वर्णन वाचण्याजोगे आहे. ते म्हणतात "In practice vast majority even of superhumanists live inconsistently. They are one thing in Church and another out ; they belive in one way and act in another ; they tamper spirituality with fleshliness, virtue with sin, and  rationality with superstition". हक्सलेच्या ह्या विधानाची शक्यता पटविणारी माणसे तर आपल्याभोवती वावरणार्या राजकीय, सार्वजनिक तसेच प्रसारमाध्यमातील मंडळीत दिसत असतात. परंतु शेवटी आपण पडलो सर्वसामान्य! म्हणून वानगीदाखल उदाहरण देण्याच्या फंदात कसे पडणार? हक्सलेंच्या विधानची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मी ह्या ठिकाणी एक वाचलेलं (पाहिलेलं नव्हे) उदाहरण खाली देत आहे; जे माझ्या हाती खात्रीलायक सुत्रातर्फे आले आहे!

अमेरिकेच्या न्यूर्याक शहरात दोन साप्ताहिके निघत. प्रत्येक गोष्टीत ती एकमेकांच्या विरूध्द लिहीत. ती दोन्ही पत्रे एकमेकांवर अतिशय कडाडून हल्ले चढवीत. खोचक-बोचक लेखणीने परस्परांना रक्तबंबाळ करीत. एका साप्ताहिकातील एखाद्या विषयावरील लेख वाचल्यानंतर वाचक आपापसात म्हणत,"आता त्या साप्ताहिकाचा गुरूवारचा अंक पाहू या. त्यात या महाशयाची खूपच हजेरी घेतलेली असेल". गुरूवारनंतर पुन्हा वाचक म्हणत, "आता रविवारी त्या साप्ताहिकात खूपच भंबेरी उडविली जाईल. ती वाचलीच पाहिजे. अशाप्रकारे त्या दोन्ही साप्ताहिकांचा खप धूमधडाक्याने वाढत होता. न्यूयॉर्क शहरातील एका विचारवंताने ती दोन्ही साप्ताहिके वाचली तेव्हा त्याला असे वाटले की या दोन्ही संपादकांच्या लेखनात आवेश, धार, ओज, लालित्य, आकर्षकता, बहूश्रुतता, शब्दसंपत्ती आदी गुण आहेत, पण त्यांचे हे गुण परस्परांना शिव्याशाप देण्यात वाया जात आहेत. या दोघांना एकत्र आणून ह्याच्यांत सलोखा घडवून आणावा आणि ह्यांना विधायक कार्याला लावावे जेणेकरून देशाला व मानवतेला लाभ होईल. ह्या कल्पनेतून त्या विचारवंताने दोन्ही संपादकांना पत्रे पाठवून आपल्या घरी चहापानासाठी आमंत्रण दिले. ठरल्या दिवशी ठरल्या वेळेस एक संपादक उपस्थित झाले. त्या मध्यस्त विचारवंताने त्या संपादकाचं स्वागत केले. आणि म्हणाले "नमस्कार, या! थोड्या वेळाने ते दूसरे संपादकही येतील."इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चहा ही झाला. पंधरा मिनिटे होऊन गेली. त्या विचारवंताने दुसर्या संपादकाच्या कार्यालयात फोन करून विचारणा केली. तर तेथील कर्मचारी म्हणाला संपादकसाहेब तुमच्याकडे येण्यासाठी कधीच निघाले आहेत. पून्हा दहा मिनिटे वाट पाहिली. मग त्या विचारवंताने उपस्थित संपादकांना म्हटलं, एव्हाना ते यावयास हवे होते. त्यावर ते संपादक म्हणाले, ते येणार नाहीत. त्यावर विचारवंत म्हणाले, तुम्हांसारख्या हुषार संपादकांमध्ये इतकं वैर शोभत नाही. त्यावर उपस्थित संपादक म्हणाले, अहो महाशय, दूसरे कोणी येणार नाहीत, ह्याचं कारण दूसरा संपादकही मीच आहे. विचारवंत आश्चर्यचकित होऊन म्हणाले, ह्याचा अर्थ काय? त्यावर संपादक शांतपणे म्हणाले, टोपण नावे धारण करून दोन्ही साप्ताहिकाचे संपादन व लेखन मीच करतो. मीच माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करतो. मीच मला शिव्या देतो आणि घेत असतो. लोक मिटक्या मारीत दोन्ही साप्ताहिके वाचतात. ती खूप खपतात. मला रग्गड पैसा मिळतो. 

बिचारे ते विचारवंत! काय बोलणार?  कोणाला दोष देणार? संपादक महाशयांना कि लोकांना? कि स्वतःच्याच अक्कलेला?.

दिल्ली राज्य निवडणूक निकाल--केजरीवाल नावाचं काटेरी झुडपं भस्मसात ? (भाग -१)

गेल्या शनिवारी म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. बहुतांश न्यूज चॅनेल्सनी मांडलेले भाकीत खरे ठरले. भ...